टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • रामदेव बाबा यांचे पौष्टिक हॉटेल, नरेंद्र मोदी, स्नॅपचॅट आणि कार्ड पेमेंट
  • Mon , 17 April 2017
  • विनोदनामा टपल्या बाबा रामदेव Baba Ramdev स्नॅपचॅट Snapchat नरेंद्र मोदी Narendra Modi पतंजली Patanjali पौष्टिक रेस्टॉरंट Postik restaurant स्नॅपडील Snapdeal

१. हजारो कोटींची उलाढाल असलेला रामदेवबाबा यांचा पतंजली उद्योगसमूह आता हॉटेल व्यवसायात उतरला आहे. चंदीगडमध्ये पतंजलीचे शाकाहरी रेस्टॉरंट सुरू झाले असून या रेस्टॉरंटचे नाव ‘पौष्टिक’ असे ठेवण्यात आले आहे. चंदीगडमधील जिरकपूर भागात हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असून इथे शुद्ध शाकाहारी पदार्थ खवय्यांची भूक भागवतात. भिंतींवर आणि मेन्यू कार्डवर बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

अरे देवा, आता पतंजलीच्या परंपरेप्रमाणे आसपासच्या हॉटेलांमधले लोकप्रिय पदार्थ पतंजलीच्या प्लेटींमध्ये मिळणार बहुतेक! पुन्हा वर तोंड करून हे सांगतीलही की, जो माल स्वत:च्या नावाने खपत नाही, तो पतंजलीच्या नावाने धडाधड खपत असेल, तर कोणाला अडचण काय?

............................................................................................................

२. सरकारने उद्योगांना भाडेपट्टय़ाने (लीज) किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनी निवासी वापरासाठी रूपांतरित करण्यासाठी मुभा देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रासह पुणे, नाशिक व अन्य मोठ्या शहरांमध्ये बरीच जमीन निवासी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योगपतींचे उखळ पांढरे होणार असून बिल्डरांनाही मोठा लाभ होईल आणि गृहबांधणीला मोठी चालना मिळणार आहे. मात्र, सरकारने भूसंपादन करून उद्योगांना जमीन दिली असेल, तर त्याचा मात्र निवासी कारणासाठी वापर करता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.

काही सरकारी अधिकाऱ्यांची, काही पक्षांची आणि काही लोकप्रतिनिधींचीही या निर्णयाने चांदी होणार आहे, हे बातमीत लिहिलेलं नाही. ते सर्वांनाच ठाऊक असल्याने लिहिलं नसावं. एकीकडे लाखो घरं बांधून तयार आहेत, ती घ्यायला ग्राहक नाहीत. दुसरीकडे लाखो लोक हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. त्यावर काहीही ठोस करायला गेलं तर लाभार्थींच्या साखळीवर विपरीत परिणाम होईल. ते सरकारला कसं परवडेल? त्यापेक्षा असे निर्णय घेत राहिलं की सगळ्यांचंच रोलिंग सुरू राहतं.

............................................................................................................

३. भारतीय जनता पक्षातील नेत्यांची वक्तृत्वकला चांगली आहे. मात्र, सत्तेत असताना जरा गप्प बसण्याची कलाही त्यांनी शिकून घ्यायला हवी, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपनेत्यांना रविवारी कानपिचक्या दिल्या. ओदिशातील भुवनेश्वर येथे भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप रविवारी झाला. तेव्हा मोदी यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या आपल्याच पक्षातील नेत्यांना फैलावर घेतले. ध्वनिक्षेपक म्हणजे बोलण्यास भाग पाडणारे यंत्र नव्हे, असा टोला लगावत, भाजपनेत्यांनी शांत बसण्याची कला शिकून घ्यावी, असे मोदी म्हणाले. पक्ष सर्वत्र जिंकत असताना पक्षातील मंडळींमध्ये उत्साह संचारणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र त्या उत्साहाचे रूपांतर उन्मादामध्ये होता कामा नये, असेही त्यांनी बजावले.

मोदी यांना हे सांगण्याचा सर्वार्थाने अधिकार आहे. ते त्यांच्या सोयीची ‘मन की बात’ सांगतात. कुठेही, अगदी वंदनबिंदन केलेल्या संसदेतही कोणाच्या प्रश्नांना उत्तरं द्यायच्या भानगडीत शक्यतो पडावं लागणार नाही, याची काळजी घेतात. निवडणुकीत पदाच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता वाट्टेल त्या थराची भाषा वापरून आक्रमक प्रचार करतात. अधूनमधून प्रवचनवजा सुभाषितं ऐकवतात आणि अनेक कळीच्या प्रश्नांवर मौन धारण करून बसतात. खरंच ही कला त्यांच्याकडून शिकून घ्यायला हवी भाजपच्या इतर नेत्यांनी.

............................................................................................................

४. स्नॅपचॅट हे अॅप श्रीमंतांसाठी आहे. भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशांमध्ये या अॅपचा विस्तार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असे स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इव्हान स्पिगेल हे २०१५ साली झालेल्या एका बैठकीत म्हणाले होते, अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर भारतात तीव्र पडसाद उमटले. हे अॅप वापरणाऱ्यांनी ते अनइन्स्टॉल केलं, तर जे वापरत नव्हते, त्यांनी इन्स्टॉल करून अनइन्स्टॉल केलं. त्यामुळे स्नॅपचॅटच्या मानांकनात घसरण झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा फटका स्नॅपडीललाही बसला. स्नॅपचॅटशी काहीच संबंध नसलेल्या स्नॅपडीलचं अॅपही लोकांनी अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली आहे.

आपण किती विक्षिप्त काळात जगतो आहोत, याची ही झलक आहे. दोन वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी बोललं होतं, असं प्रसृत होतं आणि त्यातून लोक एखादी कृती करायला प्रेरित होतात, हे धक्कादायक आहे. शिवाय स्नॅपडीलला स्नॅपचॅट समजून ते अनइन्स्टॉल करणाऱ्यांनी एका वेगळ्या प्रकारच्या दारिद्र्याचं दर्शन घडवलेलं आहेच.

............................................................................................................

५. काश्मीरमधील दंगलींमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.  काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना पाकिस्तान कॅशलेस फंडिंग करत असल्याचे एका वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. पाकिस्तानने यासाठी वस्तू विनिमय प्रणालीचा अवलंब केल्याचे सांगण्यात येते. पैसे पुरवण्याऐवजी दंगलखोरांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.

भक्त मंडळींनी ही बातमी जरा जपूनच वाचायला हवी. कुठेही कॅशलेस हा शब्द वाचला की, ते लगेच मोदींचा जयजयकार करायला लागतात. मोदींनी सगळा देश कॅशलेस करायला घेतल्यानंतर, सर्वच प्रकारचे व्यवहार, त्यातही दोन नंबरचे धंदे कल्पकतेने कॅशलेस होणार हे उघडच होतं म्हणा! आता दहशतवादी आणि त्यांचे अर्थपुरवठादारही मोदींचा जयजयकार करत असतील ही आयडिया मिळाल्यामुळे.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......