अजूनकाही
काहीही होवो, मागे सरायचे नाही, असा हिंदुत्ववाद्यांचा एक पवित्रा असतो. त्यामुळे संघ असो की भाजप, त्यांची दिलगिरी अथवा क्षमायाचना क्वचितच पाहायला मिळते. अगदी भयंकर काही घडले, तरच त्यांचा माफीनामा पुढे येतो. बाकी कसेही नुकसान होवो, ते देशाचे असो की समाजाचे; एखाद्या संस्थेची वाट लागलेली असो की, एखादी व्यक्ती आयुष्यातून उठो, संघवाले खुल्या मनाने ना चूक कबूल करतील, ना पश्चात्ताप! त्यांचा खुलाश्याचा स्वरही फार काही बिघडले नसल्याचा असतो. ‘असे व्हायचेच’ म्हणून संबंधित घटनेवर पटापट पडदा टाकायचा खटाटोप सुरू होतो.
आताही बघा ना, ‘नीट’ (NEET) परीक्षेतल्या भ्रष्टाचारामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक भरडले गेले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे अध्यक्ष प्रदीपकुमार जोशी संघवाले आहेत. परंतु तेही स्वत: समोर येऊन काही भूल-चूक मान्य करत नाहीत, ना शिक्षणमंत्री. पंतप्रधान मोदी तर कधीच माघारीच्या वा पडत्याच्या पवित्र्यात नसतात. विरोधी पक्ष कितीही ओरडोत किंवा जुनेजाणते लोक कितीही अस्वस्थ होवोत, मोदी आणि मोदींचे सरकार बधीर ते बधीरच!
असे त्यांच्याबाबतचे अनुभव गेली १० वर्षं देशाने कितीदा तरी घेतले आहेत. लोकशाही राज्यव्यवस्थेतली जबाबदारी थातूरमातूर स्पष्टीकरणे देत स्वीकारल्यासारखे मोदी सरकारने अनेकदा केले. पुढेही ते असेच वागत राहणार...
याचे मूळ दडले आहे, ते त्यांच्या ब्राह्मणी अहंकाराच्या हिंदुत्वात. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना अहंकार दिसला, तो फक्त मोदी व शहा यांच्यात. त्या अहंकारातून त्यांनी संघाला अन् प्रत्येक हिंदुत्ववाद्याला बाजूला काढले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हिंदूंचा इतिहास पराभवाचा आहे, असे एक विधान आपल्या देशाच्या संदर्भात केले जाते. तुम्ही कोण आणि काय म्हणून लढाया केल्या, या निकषावर जय-पराजय यांची वर्णने केली जातात. मुघल, इराणी, तुर्क, इंग्रज, डच, फ्रेंच इत्यादी या देशावर चाल करून आले, तेव्हा त्यांनी हिंदूंवर चढाई करू, असे जाहीर केले होते का?
सर्व लढाया आणि नंतरची राज्ये इस्लामी, ख्रिश्चन झाली का? तसे तटस्थ व जाणकार इतिहासकार म्हणत नाहीत. परंतु हे ‘हिंदू राष्ट्र’च आहे, असे १९२५पासून ज्या संघाने ठरवले आणि तत्पूर्वी सावरकरांनी लिहून ठेवले, त्या सर्वांनी या लढाया आणि जेते-जीत यांना धर्माचे रंग चढवून ठेवले. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांचा प्रत्येक घटना पडताळण्याचा दृष्टीकोन धार्मिक असतो. ‘भारत गुलाम झाला’ हे राज्य करणाऱ्या वर्णाला व जातींना समजे; बाकीच्यांना हे आले काय, ते गेले काय, काही फरक पडत नसे. साहजिकच ज्या राज्यकर्त्या जाती होत्या, त्यांना आपल्या पराभवाचा सल जाणवे. तो जावा, यासाठी ‘अजेय हिंदुत्व’ पुढे आणले गेले.
त्यातही हे हिंदुत्व ब्राह्मण-क्षत्रिय-बनिया या तीन वर्णांपुरते मर्यादित होते. कारण युद्धे या तीनच वर्णांसाठी महत्त्वाची असत. सततची पराभूत भावना घालवायची असेल, तर आम्ही पराजित नाही, आम्ही पराक्रमी आहोत, इथपासून मोदींच्या ‘विश्वगुरुत्वा’पर्यंत एक उत्साही व हताशेवर मात करणारी स्वप्रतिमा बनवली गेली. ती शाखांमध्ये येणाऱ्या तमाम स्वयंसेवकांच्या मनावर बिंबवली जाते. त्यासाठी इतिहासाचा विपर्यास आणि मोडतोड यांना भरपूर वाव दिला जातो.
म्हणजे देशातली गरिबी, विषमता, अत्याचार, बेकारी, नापिकी, कर्जे, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, जातीयता आदी असंख्य समस्यांशी झगडून त्यांवर मात करण्याचा मुद्दाच राहत नाही. उलट एक खोटा स्वाभिमान खोट्या इतिहासावर उभा करून लोकांना चाळवायचे, असा संघाचा उद्योग. लोकांना उगाचच चेतवण्याचा हा खेळ.
मोदी हा अत्यंत धोक्याचा खेळ त्यांच्या भाषणांमधून रोजच करत, तेव्हा मोदी व त्यांचे सरकार गोड वाटले संघाला. मग २४० जागा जिंकून साधे बहुमतही गमावलेल्या भारतीय जनता पक्षाला पराभव, हार किंवा मात याची जाणीव कशी होईल?
म्हणून अहंकार, मर्यादा उल्लंघन, प्रतिपक्षाचा अनादर हे भागवतांचे आरोप चक्क बनाव वाटतात. जो आपल्ली बेइज्जत झाली, हे मान्य कधी करणार नाही, त्याला असे टोकणे मुळीच कमीपणाचे वाटणार नाही. बहुजनांच्या भाषेत ‘गिरे तो भी टांग उप्पर’ अशी अवस्था ज्यांनी कायम स्वीकारलेली आहे; त्यांना पराभव, अपमान आणि कुचेष्टा यांचे काहीही वाटत नाही. ‘हिंदू अस्मिते’साठी जन्मलेले हे संघटन हादरून गेले, ते वेगळ्याच कारणासाठी.
ते म्हणजे या वेळच्या लोकसभा निवडणुकीत म्हटल्यानुसार ‘हिंदू राष्ट्रा’ची उदघोषणा करण्याची संधी हातात येता येता राहिली. ज्या राममंदिरासाठी १९८६पासून देशाच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ केला, तिथेच भाजपचा पराभव झाला. अयोध्येतल्या राममंदिराच्या उदघाटनात खुद्द डॉ. मोहन भागवत होते. त्यांचाही पराभव झाला. कारण पंतप्रधान मोदींच्या मांडीला मांडी लावून भागवत तिथे बसले होते.
अयोध्या हे गाव ज्या फैजाबाद मतदारसंघात येते, तिथे भाजपचा पराभव यापूर्वीही अनेकदा झालेला आहे. या वेळचा पराभव प्रत्यक्ष राममंदिर उभे राहिल्यानंतरचा आहे. तो भागवतांच्या जिव्हारी लागला. ‘मंदिर वहीं बनाएंगे’ ही भयंकर उर्मट घोषणा संघाचे स्वयंसेवक जणू देत नव्हते, असा समज भागवतांनी का करून घेतला? अहंकार, उर्मटपणा, इतरांपेक्षा अधिक राष्ट्रभक्त असल्याचा तोरा स्वयंसेवकांना ओळखणाऱ्या लोकांना नवा नाही. मग का बरे सरसंघचालक तसे बोलले?
काही गोष्टी फक्त बोलण्यासाठी असतात, असा सत्तेचे राजकारण करणाऱ्या व्यक्तींचा सिद्धान्त असतो. कायद्यापुढे सारे समान, संविधानापुढे आम्ही नतमस्तक, लोकांना जे हवे ते देण्याचे काम आमचे, आम्ही नि:स्वार्थ समाजसेवक… अशी वाक्ये भारतात रोज ऐकायला येतात. संघपरिवार याहून अतिशयोक्तीपूर्ण वाक्ये ऐकवत राहतो; कारण धर्म, परंपरा व राष्ट्र हे तीन पदार्थ त्याने आपल्या हवाली केले आहेत. त्यातच या तिन्ही पदार्थांचा वापर भारतातल्या हिंदूंनी न केल्यामुळे ते कायम आक्रमकांच्या तावडीत सापडले, असे संघ पसरवतो. या प्रचाराचा अनेक हलक्या कानाच्या आणि इतिहासाचे अज्ञान असणाऱ्यांच्या मनावर परिणाम होतो.
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळे तर मोदी यांना हर्षवायू व्हायचे बाकी आहे. फक्त तो त्यांना दाखवता येत नाही. पण ज्या तऱ्हेने मोदी-नीतीशकुमार-चंद्राबाबू नायडू सरकारने संसदेत विरोधकांच्या अनुषंगाने सूडाचे राजकारण सुरूच ठेवले आहे, ते पाहता मोदी-भाजप-संघ कधीही सुधारणार नाहीत, हे लोकांना कळून चुकले आहे. याचे कारण शाखांमध्ये प्रत्येक स्वयंसेवकाच्या डोक्यात भरून दिलेली वर्चस्वाची, आत्मगौरवाची व दैवी शक्तीचा वास आपल्या कार्यात असल्याची भावना.
संघाचे काम हे ‘ईश्वरी’ कार्य असल्याचा समज स्वयंसेवकांना करवून दिला जात असल्याने इतरेजन आपोआपच राक्षस, असुर, दानव, दैत्य आणि नराधम बनतात. त्यांचा सर्वनाश देवांनी केलेला असतो. सबब तो स्वयंसेवकांनीही करायला पाहिजे असा दंडक. त्यामुळे देशाचे अवघे राजकारण, समाजकारण, धर्मकारण एक रणभूमी बनून गेल्याचे आपण पाहतो, अनुभवतो आहोत. लोकशाही अशी ‘खतम’ केली जाते.
संघ व भाजप या दोन परस्परजीवी संघटना नीतीशून्य संघटना असल्याचेही भारताने अनेकदा अनुभवले आहे. संघाचा आरंभाचा पवित्रा अत्यंत उदार, मोकळा अन् समजूतदार असतो. पण एकदा का नाड्या सापडल्या की, तो मित्र म्हणवल्या जाणाऱ्यांनाही सोडत नाही.
हिंदू समाजात अथवा धर्मात सर्वांत अहंकारी असण्याचा अधिकार अर्थातच ब्राह्मणांचा आहे. त्याचे प्रतीक भाजपने थेट संसदेत आणून ठेवले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या हाताला सोंगोल उभा करून ठेवलेला आपल्याला संसदटीव्हीच्या प्रक्षेपणात दिसत राहतो. याचा अर्थ काय? समाजवादी पार्टीच्या एका खासदाराने अध्यक्षांना विचारले आहे की, या सभागृहात संविधानाची जागा असली पाहिजे. मात्र ती नसून त्या जागी एक तथाकथित धर्मदंड आहे!
या विचाराला अर्थातच भाजप दाद देणार नाही. कारण संघाला जोवर त्याची जागा छळत नाही, तोवर तो तसाच उभा असणार. आता याला आखडूपणा, अहंकार म्हणणार नाही, तर काय? भाजपच्या आणि मोदींच्या मतासारख्या गोष्टी लोकशाही व्यवस्थेवर आघात करणाऱ्या असल्या तरी काय बिघडले? संघ सदा बिनचूक असतो. तो सच्चा हिंदुत्वाचा प्रतिनिधी आहे ना!
परंतु या हिंदुत्वाची जातकुळी ब्राह्मणी आहे. तिचा आविर्भाव क्षत्रियत्वाप्रमाणे आक्रमक आहे. त्याचा हेतू व्यापारी आहे. ‘असू दे तुमची राज्यघटना तुमच्यापाशी, आम्ही आमचा एक प्रतिनिधी इथे आणून बसवला आहे तुमच्या पुढ्यात!’ असा दर्प हा दंड तमाम सभागृहाला दाखवत राहतो. सनातन हिंदुत्व आणि सनातन संस्कृती, यांचा गजर संघाचे लोक उगाच करत नाहीत. ‘जय हिंदू राष्ट्र’ असा समारोप भाजपच्या एका खासदाराने शपथ घेतेवेळी केलेला आठवतो ना? एवढी हिंमत होण्याचे कारण काय? हा उर्मट व उद्धट आविष्कार नव्हता का? मग केवळ एक-दोन व्यक्तींचा अहंकार भाजपला बाधला, असे म्हणण्यात अर्थ काय?
भाजपची तिसरी सत्ता देशाचे लोकशाही प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष व स्वातंत्र्य-समता-बंधुता यांवर उभे प्रारूप मोडून टाकायला आतूर असणार, पण संख्येची ताकद त्यापाशी नाही. पण म्हणून काय झाले? या पाच वर्षांत कट-कारस्थाने अमाप होत राहणार. २०२९नंतरही आपणच सत्तेत राहू, असा आत्मविश्वास सेंट्रल हॉलमध्ये व्यक्त झालाच आहे. संघ कधी सहजासहजी हातातली सत्ता सोडत नसतो. किंबहुना सदोदित सत्तेचा विचार करणारी ती एक वर्चस्ववादी आणि नीतीशून्य संघटना आहे. २४० जागांनी ती अस्वस्थ आहे. तरीही आपली पकड ढिली होत चालल्याचे तिला तिच्या अहंकारी व बहुसंख्याक वृत्तीमुळे समजत नाही.
सारे काही पूर्वीसारखे चालू आहे. आकाशवाणीवर ‘प्रधानमंत्री मोदी ने कहा हैं कि…’ अशी बातम्यांची सुरुवात आणि सरकारी योजनांच्या जाहिरातींत मोदी यांची भली मोठी छबी. ‘योग दिना’ची कल्पना त्यांचीच. त्यामुळे सकाळपासून योगासने, योगाचे महत्त्व आणि मोदींनी चार दिवस आधीच प्रसारित केलेली त्यांची आसनांची चित्रफित. माध्यमांनाही मोदींवाचून करमत नाही आणि मोदी तर माध्यमांवाचून मोदीच राहत नाहीत…
कोणी तरी म्हणत होते की, पंतप्रधानांचा चेहरा पडला, तो काळवंडला, अंगातला उत्साह ओसरला, स्वत:च ‘मोदी मोदी’ म्हणून करायचा गजर घटला… पण छे, संघ जसा कधी बदलणार नाही, तसे मोदीदेखील कधी बदलणार नाहीत. त्यांच्यापैकीच कोणी तरी म्हणाले म्हणे की, सिंह म्हातारा झाला, तरी तो गवत खाऊन जगत नाही. त्याचा रुबाब तसाच कायम राहतो!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
मोदी पूर्णपणे स्वकेंद्री, एकहाती कारभार करणारे राजकारणी आहेत. त्यांच्या अशा हुकूमशाहीला साजेशा शैलीला २५ वर्षं पूर्ण व्हायच्या बेतात आहेत. २००१ साली ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्या वेळी ना ते आमदार होते, ना साधे मंत्री. पण त्यांनी ते पद मिळवलेच. राहुल गांधी यांनी मोदी यांचे विश्लेषण करताना असे म्हटले आहे की, मोदींची सत्ता मार्केटिंग आणि दहशत या दोन घटकांवर गुजरातपासून सुरू झालेली आहे.
प्रचंड खर्च करून स्वत:चा प्रचार आणि सरकारच्या निरनिराळ्या संस्थांचा वापर करून तयार केलेले भय, या त्या दोन गोष्टी. त्यामुळे २४० जागांचा हा नेता तडजोड करून, स्वत:ला थोडे बाजूला ठेवून पुन्हा पंतप्रधान झाला खरा, पण ‘सुंभ जळाला तरी पीळ’ अजून कायम आहे!
नीतीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूने पंतप्रधानपद मिळाल्याचा त्यांना प्रचंड राग आलेला असणार. सलग १० वर्षं आपण म्हणून तसे राजकारण झाले, आता आपले स्वातंत्र्य मर्यादित झाले, अशी तडफड त्यांची होत असणार.
‘ये मोदी की गारंटी हैं’ अशी त्यांची ती गर्जना अन् ती करताना डाव्या हाताने दिलेल्या थापट्या गेल्या की वाया. विरोधी पक्षांची अत्यंत तुच्छतेने केलेली वर्णने आणि राहुलसारख्या नेत्यांची केलेली निंदा, आठवत असेल का मोदींना आता? वाटले असेल का त्यांना की, आपण खूपच बरळत गेलो. खोटेनाटे आरोप करत गेलो…? छे! अशक्य!!
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment