विनय हर्डीकर या एक शिक्षकी ‘मुक्त-विद्यापीठा’त मी ‘लिबरल एज्युकेशन’चा एक दीर्घ कोर्स करत आहे… ‘साकल्य प्रदेशा’ची मुशाफिरी अशी त्याची पद्धत आहे…
पडघम - सांस्कृतिक
शशांक जेवळीकर
  • विनय हर्डीकर आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Sat , 29 June 2024
  • पडघम सांस्कृतिक विनय हर्डीकर Vinay Hardikar

लेखक, पत्रकार, प्राध्यापक, समीक्षक, संपादक, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता-अभ्यासक, संगीतसमीक्षक आणि ट्रेकर श्री. विनय हर्डीकर यांनी २४ जून २०२४ रोजी अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने पुण्यात २३ जून रोजी ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले, तर २४ जून रोजी हर्डीकरांच्या ‘एक्सप्रेस पुराण : माझी शोध पत्रकारिता’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी हर्डीकरांची मुलाखत घेतली आहे. या निमित्ताने हर्डीकरांविषयीचा हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

साधारण ९३-९४ साल. इंजीनियरिंग पूर्ण करून पुण्याला नोकरी करत होतो. श्रीकांत उमरीकर माझा वर्गमित्र. तो परभणीहून आला होता. त्याचे वडील अ‍ॅड. अनंतराव उमरीकर हे त्या वेळी परभणीमध्ये ‘शेतकरी संघटने’चे काम करणारे. ज्वारीपासून अल्कोहोल तयार करण्याच्या प्रयोगात गुंतलेल्या राजीव बसर्गेकर यांना काही कागदपत्रे विनय हर्डीकरांमार्फत पोचवायची होती. ‌मी त्या वेळी सदाशिव पेठेत चित्रशाळा चौकाजवळ राहत होतो. हर्डीकरांचे घर फार अंतरावर नव्हते. एके दिवशी आम्ही त्यांच्या १७९१, सदाशिव पेठची बेल वाजवली.

व्हरांड्यात तयार केलेल्या बैठकीत आम्ही स्थानापन्न झालो. समोरच्या बाजूला काही पुस्तकांचा गठ्ठा होता. डाव्या हाताच्या भिंतीवर हर्डीकरांसारखीच दाढी असलेल्या आणि आपल्या डोळ्यांत पाहणाऱ्या एका माणसाचं छायाचित्र फोटो होतं. श्रीकांतने ओळख करून दिली. हर्डीकरांनी ‘मी चहा करतोय, तुम्ही घेणार आहात का?’ असा प्रश्न आला. आम्ही ‘हो’ म्हणालो.

हर्डीकर त्यांचा तो ‘जगप्रसिद्ध’ चहा करण्यासाठी आत गेले. चहा-बिस्किटे आली. त्या तुरट-कडवट चहाचे घोट घेत घेत गप्पा सुरू झाल्या. आदल्या दिवशीच मी आणि श्रीकांत पु.लं.ना भेटायला गेलो होतो आणि ‘भाई भेटू शकत नाहीत’, असा फटका खाऊन दारातून परत आलो होतो. तसेच चालत व्यंकटेश माडगूळकर या दुसऱ्या आवडत्या लेखकाकडे जाऊन तासभर गप्पा मारून आलो. हे सगळं करण्यात माझ्यापेक्षा श्रीकांतचा उत्साह जास्त होता. त्याने हे हर्डीकरांना सांगितल्यावर त्यांची पु.ल., माडगूळकर, मराठी लेखक यावरची फटकेबाजी सुरू झाली. मराठी वाचकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या उपरोधाचे फटके आम्हाला पडायला लागले.

बोलता बोलता मिरासदारांचा उल्लेख निघाला. त्यांचं ‘नावेतील तीन प्रवासी’ माझं आवडतं पुस्तक असल्याचा मी उल्लेख केला आणि त्यातलं काहीतरी सांगू लागलो. हर्डीकरांनी आत जाऊन जेरोम के जेरोमचं ‘थ्री मेन इन बोट’ आणलं आणि “आधी हे वाच! मग बोल” असं फर्मान काढलं. भिंतीवरच्या छायाचित्राकडे जाणारी माझी नजर पाहून “ते शंकर गुहा नियोगी आहेत. तुमच्या लोकांनी त्याला मारलं.” आम्ही कोणाकोणाचे प्रतिनिधी झालो होतो, कळत नव्हते.

आम्ही बाहेर पडलो. हर्डीकर काहीही म्हणत असले तरी आपल्याला जे लेखक आवडतात, ते आवडतात, असं मी श्रीकांतला म्हणालो. (आम्ही खरंच ‘मराठी वाचकांचे प्रतिनिधी’ झालो होतो!) श्रीकांत म्हणाला “आधी कुठेतरी नेऊन चांगला चहा पाज. त्या चहानं माझं तोंड कडू पडलंय.” उमरीकर मंडळींची ‘हर्डीकरी चहा’शी असलेली दुश्मनी आणि त्यावरून दोन्ही बाजूला चालणारी जुगलबंदी मी नंतर कितीतरी वेळा पाहणार होतो, हे मला तेव्हा माहीत नव्हतं. हा माणूस लेखकही आहे आणि त्याचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’ हे खूप गाजलेलं पुस्तकही आहे, हे मला त्या दिवशी माहीतदेखील नव्हतं.

पुढे मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून काम करायला लागलो. पुणे सुटले असले, तरी कामाचे ठिकाण खालापूर असल्याने सुट्टीच्या दिवशी पुण्यात किंवा मुंबईत जायचो. तीस-पस्तीस लहान खेडी आणि वाड्या-पाड्यांच्या वीज पुरवठ्याची देखभाल करण्याच्या कामानं मला पुरतं बदलून टाकलं. वाचण्याची सवय तर होतीच.

आमच्या आजूबाजूला जोरात असणारी हिंदुत्ववादी चळवळ स्पर्श करून गेली होती. इंजीनियरिंग संपल्यानंतर आलेल्या काही महिन्यांच्या रिकामपणाने आणि पुण्यात येऊन नोकरी शोधतानाच्या अनुभवाने अनेक प्रश्न आणि गोंधळ मनात निर्माण केले होते. खालापुरातल्या कामाने तर मला आजवर ऐकलेल्या, वाचलेल्या सगळ्यालाच प्रश्न विचारावेसे वाटू लागले. समोर येईल ते काम जीव तोडून करावं, पुण्या-मुंबईच्या चकरांमध्ये नवीन नवीन पुस्तकं आणि गाण्यांच्या कॅसेट्स घेऊन याव्यात आणि सगळा उरलेला वेळ त्यात घालवावा, असा दिनक्रम झाला.

‘कोसला’नंतरच्या भालचंद्र नेमाडेंच्या तिन्ही (नंतर त्या चार झाल्या) कादंबऱ्यांचा माझ्यावर खूप परिणाम झाला. पण त्याच वेळी आपण करतोय ते काम लोकांच्या उपयोगाचं आहे, ते अजून चांगलं करता येऊ शकतं, करावं, त्यातले अधिक तांत्रिक अंगाचे विषय समजून घ्यावेत, अजिबात जुळवून घेता येत नाही, अशांपासून लांब राहावं, काय चाललंय याचा आपल्यापुरता अर्थ लावायला जावं आणि अधिकच प्रश्नात पडावे असे गोंधळ.

नेमाडेंचे ‘सो कॉल्ड’ अस्तित्ववादी नायक जवळचे वाटावे, पण इथं काहीतरी चुकलं आहे असंही वाटावं अशी परिस्थिती. गावातली वीज गेल्यानंतर अंधारात वावरताना आदिमतेशी जोडून घेणाऱ्या ‘जरीला’तल्या चांगदेव पाटलाची सोय मात्र मला नव्हती. गेलेली वीज परत आणण्यासाठी रात्रंदिवस लोकांसोबत काम करणं मला वर्तमानाशी जोडून ठेवत होतं.

प्राचीन तत्त्वज्ञान सांगणारे, पण भारतीय समाजाला आजच्या प्रश्नांशी जोडू पाहणारे विवेकानंदही वाचत राहावे आणि कुमार गंधर्व, आमिर खाँ यांचे स्वर ऐकत रहावे, असं ‘डेडली कॉकटेल’ मला बदलून टाकायला कारणीभूत होतं. माझी बहिर्मुख वृत्ती जवळपास संपून गेली होती.

अशा स्थितीत असताना ‘उन्मेष’ या दिवाळी अंकातला ‘भागवत - पंथ की संप्रदाय?’ हा हर्डीकरांचा लेख वाचनात आला. तो वाचताना, या माणसाचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’ नावाचं पुस्तक आहे तरी काय असं मनात आलं. मुंबईत दादरच्या पुस्तक प्रदर्शनात ते मिळालंही.

एका शनिवारी संध्याकाळी मी ते वाचायला सुरू केलं आणि संपवूनच खाली ठेवलं. त्या क्षणी नेमाडेंच्या नायकांचं आणि भाषिक कृतीचं गारुड संपलं. त्या दिवशी मात्र या माणसाला भेटलंच पाहिजे असं वाटलं. जुन्या भेटीचा धागा पकडून पुण्यात भेटायला आलो. तेव्हा हर्डीकरांचं दुपारचं जेवण रूपालीमध्ये असायचं. तिथं पोहोचलो, तेव्हा त्यांचे विद्यार्थी / मित्र सोबत होते. त्यांची नेहमीची फटकेबाजी चालू होती. चाललेली ‘ओव्हर’ संपल्यावर त्यांनी मला विचारलं की, ‘आता तू का आलास ते सांग.’ ‘मी जनांचा प्रवाहो चालिला’ वाचल्याचं, आवडल्याचं सांगितलं. त्यावर ‘तशीच पद्धत आहे’ असं खाडकन वाक्य आलं; वर प्रश्न आला, ‘किती दिवसांत वाचलंस?’ मी म्हणालो, “सलगच वाचलं एका दिवसात.” आधीच्या फटकेबाजीचा अंदाज आल्याने पुढचा प्रश्न येण्याआधीच म्हणालो की, आता का आवडलं ते पण सांगतो. त्यावर ‘आता याची बॅटिंग’ असं उत्तर.

मग मी ‘बोललो, इकडच्या तिकडच्या कॉमेंट्स केल्या. हर्डीकरांनी कुमार गंधर्वांवर लेख लिहिला असल्याचं श्रीकांतने सांगितलं होतं. तो मागितला. त्यावर तो लेख कुमार आणि मन्सूर दोघांवरही असून ‘त्यासाठी तुला माझं पुस्तक विकत घ्यावं लागेल’, असं उत्तर मिळालं. जेवण झाल्यावर त्यांच्यासोबत अ.भि. शहांच्या बंगल्याच्या बाहेरच्या भागात असलेल्या ‘न्यू क्वेस्ट’च्या ऑफिसमध्ये गेलो. ‘पुण्यात आलास की, परत भेटायला ये’ असं आमंत्रण मिळालं. त्यांच्या घरचा आणि ‘न्यू क्वेस्ट’ ऑफिसचा फोन नंबर घेऊन परत आलो.

त्यानंतरच्या प्रत्येक पुणे भेटीत ‘न्यू क्वेस्ट’मध्ये भेट, दुपारी ‘रूपाली’वर जेवण, असा ठरलेला कार्यक्रम असायचा. खरं म्हणजे तिथलं जेवण त्यांना हवं तितकं तिखट नसायचं. त्यामुळे तिथली हिरवी चटणी कशाकशात मिसळून जेवण चालायचं. ‘ज्ञानप्रबोधिनी’तले विद्यार्थी, मित्र, इतर क्षेत्रातले त्यांचे मित्र, ‘शेतकरी संघटने’शी संबंधित बाहेरून आलेले कोणीतरी असे कितीतरी जण मला तिथे भेटले. ‘ग्रामायन’चे गिरीश प्रभुणे, पुढे पुण्याचे खासदार झालेले प्रदीप रावत तिथेच भेटल्याचे आठवते.

तेव्हा ‘शेतकरी संघटना’ हा विषय सतत बोलण्यात असायचा. श्रीकांतने माझी परस्पर वर्गणी भरल्याने ‘शेतकरी संघटक’ हे संघटनेचं पाक्षिक आधीपासूनच घरी यायलं लागलं होतं. पण कसल्या तरी पूर्वग्रहातून मी काही ते वाचत नव्हतो. रूपालीवर एकदा ‘शेतकरी संघटना’ हा विषय निघाला आणि मग काही घटना, शेतकरी संघटनेचा विचार, इतर राजकीय विचार आणि शेतकरी संघटना, आंदोलनाची गणितं, दिल्लीतील आंदोलनाचा आणि टीकैत यांच्या गोंधळाचा अनुभव, अयोध्येला शीलापूजन करून शेतकरी आंदोलनाला येणारे शेतकरी, असा क्लास रंगला… तो ‘रूपाली’त जेवण संपवून परत ‘न्यू क्वेस्ट’च्या ऑफिसमध्ये आणि नंतर त्यांच्या त्या वेळच्या ‘एम एटी’वरून फिरतानाही चालत राहिला.

त्या दिवशी मला तोवर पाहिलेल्या, अनुभवत असलेल्या ग्रामीण वास्तवाचा नवीन अर्थ सापडल्यासारखं झालं. नंतर श्रीकांत उमरीकर, इंद्रजीत भालेराव सर आणि हर्डीकरांचे अजून एक-दोन मित्र अंगारमळ्यात शरद जोशींना भेटायला जाणार होते. मीही त्यांना सामील झालो. ‘शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती’ व इतर पुस्तकं घेऊन आलो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आमच्या ‘सिलॅबस’ला आलेला हा विषय विविध स्वरूपात नंतरही चालू राहिला… मला वाचण्याच्या, विचार करण्याच्या आणि माझ्या नोकरीतल्या कामांच्या नवीन रस्त्यांवर घेऊन गेला. ‘रूपाली’ आणि ‘न्यू क्वेस्टमध्ये असे बरेच वर्ग चालले. बहुतेक वेळा हर्डीकरांच्या डोक्यात काहीतरी विषय चालू असायचा. त्यावर बोलणं व्हायचं किंवा आपण काहीतरी वाचलेलं सांगायचं आणि तिथून नवीन विषय सुरू व्हायचा. ‘करंट अफेयर्स’ हा त्यांचा तेव्हा रानडे इन्स्टिट्यूटमध्ये (पुणे विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग) शिकवण्याचा ‘ऑफिशिअल’ विषय होता. त्यामुळे तोही असायचा.

त्या वेळी मला आकर्षित करणाऱ्या मराविमंच्या नोकरीत अधिक तांत्रिक स्वरूपाच्या ‘पॉवर सिस्टिम टेस्टिंग’ या विभागात महाराष्ट्रात कुठेही मिळालं तरी काम करायचं होतं. पण ते काही होत नव्हतं, म्हणून दुसऱ्या नोकरीसाठी पुण्यात एक मुलाखतही दिली होती. त्या सुमारास हर्डीकर शिवापूरच्या कनक उद्योगासोबत काम करत होते. त्या कामाच्या निमित्ताने आयएसओ वगैरेशी संबंध आल्याने त्यातली निरीक्षणंही त्यांच्या बोलण्यात यायची. ते निमित्त होऊन ज्ञानप्रबोधिनी, खेड शिवापूर, आप्पा पेंडसे असंही सेशन झालं होतं.

उद्योगाच्या व्यावहारिक आणि तांत्रिक बाजूपेक्षा तिथला सामाजिक व्यवहार (Social dynamics), उद्योजकतेमागच्या प्रेरणा आणि त्यातही गोष्टी क्रिएटिव्हली करायचा प्रयत्न होतोय की काही नुसताच सरधोपट व्यवहार चालू आहे, यावर जास्त भर असायचा. माझ्या नोकरी बदलाबाबत मी न बोलताही एके दिवशी हर्डीकरांनी ‘तुझ्या मनात नोकरी बदलायचा काही विचार असेल, तर तू खेड शिवापूरला कामाला ये’ अशी ऑफर दिली.

आम्ही खेड शिवापूरला चालणारं काम बघायला गेलो, पण त्याने मला काही फार आकर्षित केलं नाही. हर्डीकर बाजूला गेलेले बघून एकाने ‘तुम्ही खरंच इथं येण्याचा विचार करताय का? सध्याची नोकरी सोडण्याचा विचार करण्याआधी एकदा घरच्यांशी बोला’, असा सल्ला दिला. त्यानंतर काही काळात मला माझ्या कामात हवा असलेला बदल मिळाला आणि मी हर्डीकरांच्या ‘मुक्त-विद्यापीठा’ची ‘इंटर्नशिप ऑफर’ स्वीकारली नाही. माझी मराठवाड्यात बदली झाली आहे आणि मला आवडणाऱ्या विषयात काम करायला मिळायची शक्यता आहे, असं मी सांगितल्यावर ‘आवडणारा विषय’ या शब्दावर त्यांनी असा काही चेहरा केला की, ‘आवड’ या शब्दाशी जोडलेला प्राथमिकपणा एकदम लक्षात आला.

प्रत्यक्षात मराठवाड्यात रुजू होण्यापूर्वी आमचा एक भन्नाट परभणी दौरा झाला. परभणीतल्या ‘बी. रघुनाथ स्मृतीसमारोहा’त हर्डीकरांची मराठी कादंबरीवर व्याख्यानं ठरली होती. उमरीकरांकडे मुक्काम असणार होता. आम्ही पुण्याहून रात्रीच्या ट्रॅव्हल्सच्या बसने निघालो. त्या वेळी या बसेसमध्ये रात्री सिनेमा दाखवायची पद्धत होती. नाना पाटेकरांचा कुठला तरी भयंकर आरडाओरडा चाललेला सिनेमा लावण्यात आला. मग काय, मला टार्गेट करून हर्डीकर सुरू झाले की, तूच हा तुझ्या आवडता सिनेमा लावायला सांगितला असशील. पहा पहा काय तो अभिनय वगैरे. मी म्हणालो की, नशीब समजा की, ही परभणीची गाडी आहे, आमच्या उदगीर-लातूरकडे जाणारी असती, तर तिथे पोहोचेपर्यंत रात्रभर सिनेमे दाखवले असते. मग सिनेमा संपेपर्यंत नाना हर्डीकरांची फटकेबाजी चालत राहिली. तीव्र उपहास, नकला, टवाळी यांना काही धरबंद नव्हता. आपण आपल्या परीनं त्यात भर टाकत रहायची.

सकाळी उमरीकरांकडे पोहोचलो. हे घर त्यांच्या आणि माझ्याही सवयीचं होतं. इतकंच नाही तर घरातल्या सगळ्यांशी त्यांचं खास नातं होतं. त्यामुळे पोचल्याबरोबरच “शशांक, तू बाबा आपला माणसांसारखा चहा पी. त्या हर्डीकरांना त्यांचा चहा पिऊ दे” अशी काकूंनी सुरुवात केली. पण परभणीतल्या फक्त याच कुटुंबाशी नाही, तर गावातल्या कितीतरी जणांची हर्डीकरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यात ‘शेतकरी संघटने’ची मंडळी तर होतीच, पण इंद्रजीत भालेराव सरांसारखे इतर लोकही होते.

व्याख्यानं जोरदार झाली. परभणीकर मंडळी ऐकायला उत्सुक, उत्साही, मोकळेपणाने हसणारी आणि दाद देणारी. कादंबरीची युरोपातील सुरुवात इथपासून, पहिली मराठी कादंबरी ते नेमाडे, भाऊ पाध्ये इथपर्यंतचा पट. नरहर कुरुंदकर, कुसुमावती देशपांडे आणि भालचंद्र नेमाडे या तीन टीकाकारांच्या मांडणीचा आढावा, त्यांच्या मर्यादा, काही मांडणीचा प्रतिवाद, चांगला कादंबरीकार मराठीला मिळण्यासाठी लिहिणाऱ्यांना काय करावं लागेल, याबाबत राजवाड्यांच्या निबंधापासून स्वतःची स्वतंत्र मांडणी, अशी दीर्घसूत्री मांडणी हर्डीकरांनी केली.

साधारण मध्यलयीत बोलण्याची पद्धत, अभ्यासपूर्ण मांडणी, तिरकस, तीक्ष्ण विनोदबुद्धी आणि स्वतंत्र विचार… हर्डीकरांनी जागतिक वाङ्मयात स्थान मिळवू शकेल, अशा मराठीतल्या कादंबरीचा आणि कादंबरीकाराचा माझा शोध चालूच राहील, असा शेवट केला. परभणीकरांचा भरपूर प्रतिसाद तिन्ही दिवस होता. नंतरही काही वेळा मी त्यांच्या परभणीतल्या व्याख्यानांना हजर होतो. भारत काळे, आसाराम लोमटे अशी परभणीतल्या हर्डीकरांच्या मित्रांची संख्या पाहत होतो.

एक दिवस आम्ही औंढा नागनाथला जाऊन आलो. औंढा नागनाथाचे सुंदर मंदिर चहूकडून फिरून पाहिलं. दर्शनाची हौस हर्डीकरांनाही नव्हती, मलाही. तिथल्या टेकड्यांवर फिरून नंतर ‘शेतकरी संघटने’चे कार्यकर्ते ब.ल. तामसकरांना भेटून परत आलो. व्याख्यानांमध्ये भल्याभल्या कादंबरीकार, टीकाकारांसोबत आम्हाला फिरवून आणणाऱ्या हर्डीकरांनी सकाळी परभणी स्थानकावर बंद पडलेली बस ढकलायला मदत केली आणि औंढ्याहून येताना गच्च गर्दीच्या बसमध्ये ड्रायव्हर शेजारी बसून प्रवास केला. गावाकडच्या प्रवाशांनी गच्च भरलेल्या त्या बसमध्ये हर्डीकर त्यांच्या पोशाखाने पूर्ण वेगळे दिसूनही सहजपणे त्यांच्यात सामीलही होत होते, हे लक्षात आलं किंबहुना आजूबाजूच्या सगळ्या व्यवहाराला बारकाईनं पाहणारा पत्रकारही त्यांच्यात आहे, हेही कळालं.

पुढे काही काळानं आंबेजोगाई जवळच्या गिरवली सबस्टेशनला मी रहायला आलो. माझ्यासाठी इथं कामाचं एक नवीन जगच सुरू झालं. पुण्याला आणि मुंबईला कोणत्याही कामासाठी जायची तयारी असायची. पुण्याला गेलो, तर हर्डीकरांची भेट ठरलेली आणि लातूर, परभणी, नांदेड, बीड या भागात काही कार्यक्रम असला की, त्यांची गिरवलीला भेट, हेही ठरून गेलं.

 

लातूरला हर्डीकरांची व्याख्यानं होती. जोडूनच दुसऱ्या दिवशी पाशा पटेल यांनी औरादला दोन कार्यक्रम ठेवले होते. सकाळी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन, मग ‘मला आवडलेल्या कादंबऱ्या’ हा विषय. इथं त्यांच्याकडून ‘मुजरिम हाजीर’विषयी ऐकून मला बिमल मित्र सापडले. त्यांच्या प्लासीच्या लढाईपासून भारतीय स्वातंत्र्यापर्यंतच्या काळावरच्या कादंबऱ्यांबद्दल हर्डीकरांच्या बोलण्यातून समजले. नंतर बिमल मित्रांच्या ‘बेगम मेरी विश्वास’, ‘साहब बीबी गुलाम’ या कादंबऱ्या शोधून वाचल्या. ‘खरीदी कौड़ियों के मोल’ ही अफाट कादंबरी मिळवून हर्डीकरांनाही वाचायला दिली. त्यातली ‘इकाई दहाई सेकड़ा’ अजून शोधतो आहे.

संध्याकाळी हर्डीकरांचं दयानंद महाविद्यालयात ‘मराठी साहित्य आणि शेतकरी’ या विषयावर मराठी साहित्यिकांची खरडपट्टी काढणारं भाषण होतं. शेतकरी संघटनेच्या विचाराच्या प्रकाशात दिसणारं ग्रामीण व शेती अर्थव्यवस्थेचं चित्र आणि त्याचा पूर्ण व्यत्यास असणारं मराठी साहित्यातलं शेतकरी जीवन, याची मांडणी ऐकून श्रोत्यातल्या एका कवीने अस्वस्थपणे बावळट प्रश्न विचारून जणू मराठी लेखकांबद्दलच्या हर्डीकरांच्या मांडणीवर शिक्कामोर्तब गेलं.

मी गिरवलीहून माझी स्कूटर घेऊन गेलो होतो. ती लातूरला ठेवून आम्ही दुसऱ्या दिवशी औरादला पाशा पटेल यांच्या गाडीतून निघालो. त्या प्रवासातली कोल्हापुरी आणि मराठवाडी ग्राम्य म्हणींची स्पर्धा इथपासून शरद जोशी नावाच्या आपल्या अत्यंत अवघड नेत्याला कसं सांभाळावं, याची चर्चा अशा औरसचौरस गप्पा झाल्या. औरादला एका महाविद्यालयात विद्यार्थी संसदेचं उद्घाटन आणि संध्याकाळी एनएसएसच्या शिबिरात भाषण असा कार्यक्रम होता. तो संपवून आम्ही लातूरला पोचलो, तेव्हा रात्रीचे बारा वाजले. पाऊस सुरू झाला होता.

हर्डीकर म्हणाले, ‘लातूरला थांबण्याऐवजी आपण असेच गिरवलीला जाऊ.’ मी ‘हो’ म्हणालो. लातूरला ठेवलेली माझी स्कूटर घेऊन निघालो. आंबेजोगाई रस्त्याला लागलो आणि हर्डीकरांमध्ये संचारलेल्या बुवांनी स्वर लावला. रस्त्यावर कोणीही नव्हतं. पावसाचा, गाडीचा आणि हर्डीकरबुवांचा असे तीनच आवाज होते. आणि सगळे आवाज एकत्र ऐकणारा मी एकटाच होतो. ही अजब मैफल होती. चार-पाच किलोमीटर स्वर लावण्याचं काम चालल्यावर, बुवांनी ऐकणाऱ्याची अडचण ओळखून ‘डिक्लेअर’ केलं- ‘राग मालकंस’.

दोन दिवसांतले सगळे विषय आता मागे पडले होते. हर्डीकरबुवा मालकंसाचे स्वर आळवत होते. मध्येच कशाशी तरी ताडून पाहिल्यासारखे, “ॱहा, हे ...जमतंय” असंही मला, कदाचित स्वतःला, सांगत होते. एकापाठोपाठ एक बंदीशी म्हणताना मध्येच “हे गंगुबाई असं म्हणतात, ही ग्वाल्हेरवाल्यांची पद्धत, आग्रावाले असे, ही कुमारांची बंदिश, अशी छोटी कॉमेंट्री चाललेली... बंदीशी पाठ होत्या, त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘मेमरीआई’ त्यांना प्रसन्न होती. त्यांच्या मनात मुक्कामाला असलेल्या लाडक्या कलावंतांची मैफल ते कधीही भरवू शकत होते. गाणं फारसं कळत नसलं, तरी त्या प्रवासात हे मला कळायला लागलं…

हर्डीकरांची गाण्याविषयीची दीर्घ कॉमेंट्री एखादं रेकॉर्डिंग ऐकताना किंवा ऐकून झाल्यावर चालायची. त्यांच्या घरी, माझ्या घरी, ‘देशमुख कंपनी’त असं रेकॉर्डिंग ऐकणं चालायचं. पुण्यात आलो की, ठरलेल्या कॅसेटच्या दुकानातून कॅसेट घ्यायचो. पुढे सीडीजचा सुळसुळाट झाल्यावर आणि इंटरनेटचे दिवस आल्यावर कुठली कुठली रेकॉर्डिंग्ज पुण्याला आणि मुंबईला फुटपाथवर मिळायला लागली. सिनेमे आणि रेकॉर्डिंग शोधण्यासाठी मी हमखास अशा ठिकाणी जायचो.

हर्डीकर माझ्याकडे आले की, नवीन सापडलेलं काहीतरी त्यांच्यासोबत ऐकायचं, नंतर विविध दिशांनी जाणारी त्यांची दीर्घ कॉमेंट्री चालायची. मध्ये आपण काहीतरी प्रश्न विचारायचा, (बहुदा चुकीचा) किंवा विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं (तेही बहुदा चूकच) आणि आपण बरा प्रश्न किंवा योग्य उत्तर दिलं, तर एक “हूं” असा उद्गार येऊन बोलणं पुढे चालू राहायचं.

यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचे नायक असायचे- गाणारे आणि त्याबद्दल लिहिणारे. ऐकलेल्या मैफली असायच्या. बंदीशी आणि त्यातलं काव्य किंवा बंदीशी आणि त्यात नसलेलं काव्य, असा विषय असायचा. मौखिक परंपरेनं पुढे जाणाऱ्या बंदिशींमध्ये झालेल्या गमती असायच्या, घराण्याचे किस्से असायचे, इतिहास असायचा, पाहिलेल्या नायकांचे स्वर आणि आविर्भाव दोन्हीही स्मरणात आणि त्याची नक्कल करायची हौसही.

गंगुबाई हनगल आणि मल्लिकार्जुन मन्सूर (त्यातले मन्सूर त्यांच्यावरील लेख वाचल्यापासून) मी हर्डीकरांमुळे ऐकायला लागलो. भारतीय शास्त्रीय संगीताच्या अफाट विश्वात वेगवेगळ्या दिशांनी विहार करायचा, त्यातल्या नायकांनी निर्माण केलेल्या कलाकृती आपली प्रश्नवाचक मेधा जागृत ठेवून निरखायच्या, नव्या संगती शोधायच्या, महान कलावंतांचा प्रवास जागरूकतेनं बघायचा. त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर विचार करायचा, तो मांडायचा… एक ‘गद्य-मैफल’च चालायची.

पुढे बंगळूरच्या शबनम वीरमणी यांनी ‘कबीर प्रोजेक्ट’ केला. त्यातली एक फिल्म कबीर आणि कुमार गंधर्व यांच्यावर होती. त्यांनी रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारात हर्डीकरांची घेतलेली दीर्घ मुलाखत ही याच प्रकारची ‘गद्य-मैफल’ आहे. जवळजवळ पाच-सहा तासांचं हे रेकॉर्डिंग ऐकून मी हरखून गेलो होतो. (प्रत्यक्ष फिल्म त्यामानानं साधारण वाटते) या मुलाखतीत कविता (कबीरापुरती) आणि कुमारांचे गाणं, हे हर्डीकरांच्या जिव्हाळ्याचे दोन्ही विषय एकत्र आलेले आहेत. रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारातील मागच्या बाजूला असलेल्या कॅन्टीनमध्ये या मुलाखतीचं चित्रीकरण झालं आहे. या कॅन्टीनमध्ये त्यांना भेटायला गेल्यास तिथं विद्यार्थ्यांसोबत नवे तास चालू असतात. वर्गात न बसणारी मुलंही या तासाला येऊन बसतात.

 

हर्डीकरांनी एके दिवशी ‘रूपाली’च्या टेबलवर एक कागद माझ्या हातात ठेवला. ती त्यांची कविता होती. पुढे ‘कारुण्योपनिषद’ वाचल्यावर या विषयाचा ते किती गांभीर्यानं विचार करतात, हे समजलं. ‘कारुण्योपनिषद’मुळे कवीच्या निर्मिती-प्रक्रियेची काही नवीन सूत्रं सापडल्याची माझी भावना झाली होती. मर्ढेकर या जिव्हाळ्याच्या कवीला तर हर्डीकरांनी त्यांच्या कविता वाचून, इतरांना ऐकवून, शिकवून, त्यांच्या कवितेचं आणि निर्मिती प्रक्रियेचं विश्लेषण करून, आणि कवितांना नवीन चाली लावून, अशा सर्व प्रकारे जणू मानवंदना दिली आहे.

त्यांच्यासोबत प्रवास करताना गाणं आणि कविता, हे दोन्ही विषय तासन्तास चालू शकतात. संतकवींपासून कुसुमाग्रज, मर्ढेकर, अनिल, बोरकर, इंदिरा संत, वसंत बापट हे सगळे त्यांच्या बोलण्यात येतात. नंतरचे कवी त्यांनी वाचलेले असले, तरी ही नंतरची कविता त्यांच्या मनात रुळणाऱ्या कवितेपैकी नाही.

पाठ असलेल्या कविता इतरांना ऐकवणं, याची हर्डीकरांना मोठी हौस आहे. इतकंच नाही, तर बोलत असलेल्या किंवा गप्पा चालू असलेल्या विषयाशी जोडली जाणारी कविता त्यांना लगेच आठवते. असेच एकदा ‘देशमुख कंपनी’मध्ये बसलो असताना हर्डीकरांनी हिंदी कवी रामधारी सिंह दिनकर यांची ‘भग्न मंदिर बन रहा हैं, स्वेद का जल दो रश्मियाँ, अपनी निचोडो ज्योती उज्वल दो’ ही कविता ऐकवली.

दुसऱ्या दिवसापासून मी दिनकरांच्या कविता शोधायला लागलो. ‘दिनकर रचनावली’मध्ये मला ही कविता सापडली नाही. मग हर्डीकर गिरवलीला आले असताना मी ती त्यांच्याकडून पुन्हा एकदा म्हणवून घेऊन रेकॉर्ड करून घेतली. रेकॉर्ड करताना एक ओळ आठवली नाही म्हणून परत एकदा रेकॉर्ड केली हेही आठवतं. अर्थाची आणि लयीची पूर्ण जाण आणि भान ठेवून ते कविता सादर करतात.

हर्डीकरांसोबतच्या एका परभणी-छत्रपती संभाजीनगर प्रवासात इतर अनेक कवितांसोबत शंकराचार्यांचं ‘नर्मदाष्टक’ त्यांच्या लयबद्ध स्वरांमुळे आजही लक्षात आहे. दुसऱ्या एका प्रवासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही गाणी – नेहमीच्या आक्रमक हिंदुत्ववादी भाषेपेक्षा वेगळी, कुठेही आक्रमक भाषा न वापरता समर्पणाला, देशभक्तीला, भावनिक आवाहन करणारी आणि त्यांच्या रागदारीवर आधारित चाली, हे बोलत बोलत मग त्याला जोडूनच मानवी संघटना आणि गाणी असा विस्तार हर्डीकरांनी केला.

या प्रवासाची आठवण अजून एका कारणासाठी रोचक आहे. मी तेव्हा छत्रपती संभाजीनगरला अधीक्षक अभियंता म्हणून काम करत होतो. तिथल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हर्डीकरांचा आमच्याकडे मुक्काम होता. संध्याकाळी आम्ही गप्पा मारत फिरत असताना मला फोन आला. आमच्या चारशे के.व्ही. गिरवली उपकेंद्रात एका मोठ्या उपकरणात बिघाड होऊन स्फोट झाला होता. आगही लागली होती. त्यात ते उपकरण जळालं होतं. पण इतर हानी झाली नव्हती. आग आटोक्यात आणली गेली होती.

अशा बिघाडांच्या कारणांचा तपास करणं, उपाय शोधणं हा माझ्या आवडीचा विषय होता /आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिकडे जाण्याचा प्लॅन ठरला व मी फोन ठेवला. हर्डीकर मला म्हणाले, ‘तू तिकडे जाणार असशील, तर मलाही सोबत यायचं आहे.’ तो प्रवास आम्ही सोबत केला. रिॲक्टरचं ते धूड आम्ही पोहोचलो तेव्हासुद्धा धुमसत होतं. प्रत्यक्ष पाहणीनंतर तिथल्या रेस्ट हाऊसमध्ये बसून डिजिटल रेकॉर्डची तपासणी, मिली सेकंदात घडत गेलेल्या घटनांची आणि आधीच्या रेकॉर्डची संगती लावणं, इतर ऑपरेशनची रेकॉर्ड्स पाहणं, अशा आमच्या चर्चा\ ॲनालिसिस ऐकत ते शांतपणे माझ्यासोबत बसलेले होते.

माझ्या गिरवलीतल्या काही सहकारी मित्रांशी हर्डीकरांचा एव्हाना परिचय झालेला होता. काम संपवून आम्ही सगळे जेवायला बसलो, तेव्हा हर्डीकर म्हणाले, ‘ ‘डिस्कवरी’वर विमानांच्या अपघाताच्या आणि नंतरच्या अभ्यासाच्या फिल्म्समध्ये दाखवतात, तसं तुमचं सगळ्यांचं चाललं होतं.’ माझ्या मित्रांचे डोळे चमकले. कालपर्यंत माझ्याशी कलावंतांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलणाऱ्या या माणसाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, आव्हानांना क्रिएटिव्हली समोरं जाणाऱ्या सगळ्या माणसांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये रस आहे, हे तोवर मला माहीत झालेलं होतं.

 

माझं ‘श्रद्धांजली’ वाचून झाल्यावर ‘ ‘जनांचा प्रवाहो चालिला’ आणि ‘श्रद्धांजली’ यांची रेटिंग्स तू कशी लावशील?, असा प्रश्न हर्डीकरांनी विचारला होता. असे प्रश्न आणि अचानक घेतल्या जाणाऱ्या परीक्षा हे या ‘मुक्त अभ्यासक्रमा’चं वैशिष्ट्य होतं. विषयांचं तर कुठलंच बंधन नव्हतं. ऐकताना-बोलताना सापडलेल्या गोष्टींवर आपण विचार करायचा, त्याला जोडणारी पुस्तकं शोधायची, वाचायची, गाणी शोधायची-ऐकायची. सिनेमे शोधायचे-बघायचे. तुम्ही काही नवीन सांगितलं तर त्याचं स्वागत होतं, पण त्याची तऱ्हा कधी अजब असायची.

गुरुचरण दास या लेखकाचं ‘India unbound’ हे पुस्तक मला असंच मिळालं. भारतातल्या आर्थिक सुधारणांचं मनापासून स्वागत करणारं आणि मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या अनुभवांचा अर्थ लावणारं हे पुस्तक मला अतिशय आवडलं. पुढच्या भेटीत हर्डीकरांना ते सांगितल्यावर, “कोण हा गुरुचरणदास? तू काहीही वाचण्यात वेळ वाया घालवतोस.” असं उत्तर मिळालं. तरीसुद्धा मी रेटून त्याबद्दल बोललोच.

त्यानंतर काही दिवसांनी हर्डीकरांची आंबेजोगाईला तीन व्याख्यानं होती. त्यातल्या एका भाषणात भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांच्या संदर्भात बोलताना त्यांनी ‘India unbound’चा उल्लेख केला. त्यातील काही भागाबद्दल सांगितलं. मधल्या काळात त्यांनी ते वाचलं होतं आणि त्यांना आवडलंही होतं.

आंबेजोगाईच्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेतील ही व्याख्यानं होती. मराठी ग्रामीण कादंबरी, एकविसाव्या शतकातील भारतासमोरची आव्हानं आणि जॉर्ज ऑर्वेल, असे तीन प्रकारचे विषय होते. या व्याख्यानमालेला आंबेजोगाईकरांचा भरपूर प्रतिसाद असायचा. तरीसुद्धा इथं ऑर्वेलवर कोण ऐकणार, हे अशीही प्रतिक्रिया मी आधी ऐकली होती. अशी प्रतिक्रिया देणाऱ्यांनाही ऑर्वेलच्या दोन कादंबऱ्यांच्या (अर्थातच ‘Animal Farm’ आणि ‘1984’) नावापलीकडे काहीही माहीत नव्हते, हेही लक्षात येत होतं.

पहिले दोन्ही दिवस व्याख्यान झाल्याबरोबर श्रोत्यांच्या गराड्यात न घुटमळता निघायची त्यांना घाई असायची. तिन्ही व्याख्यानं झाल्यावरच संयोजक दगडू लोमटे, मित्र अमर हबीब, माझे सहकारी व मित्र नंदन फाटक यांच्यासोबत गप्पा, जेवण झाले. (त्या वेळी संयोजक दगडू लोमटे यांनी सांगितलेले साहित्यिकांचे काही किस्से सुरस आणि चमत्कारिक होते). ‘जॉर्ज ऑरवेल  - खऱ्या बंडखोरीचे दर्शन’ असा शेवटच्या व्याख्यानाचा विषय होता. ते भाषण सगळ्यात सुंदर झालं. त्या दिवशी जेवण करताना अमर हबीब यांची त्यावरची प्रतिक्रिया लक्षात राहण्यासारखी होती. “आधीची दोन्ही भाषणं छानच झाली, पण तू ऑर्वेलवर बोललास ते एखाद्या मोठ्या समुद्रात आपली स्वतंत्र होडी घेऊन सफर करावी आणि सोबत आम्हालाही सफर घडवावी, असं तुझं भाषण झालं.”

इंग्रजी वाचन अगदीच जुजबी असल्यानं मी ऑर्वेलचं काहीच वाचलं नव्हतं. ते व्याख्यान ऐकलं आणि पुढच्या पुणे भेटीत मी हर्डीकरांसोबत जाऊन ‘ब्रिटिश लायब्ररी’चा सभासद झालो. मग त्यांनी सुचवलेली आणि सापडलेली इतर पुस्तकं वाचली, काही चाळली.

सतत विद्यार्थी गोळा करणाऱ्या हर्डीकरांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नाठाळपणाचे फटकेही खावे लागतात. माझ्यातही काहीएक नाठाळपणा होताच (आहे!). हर्डीकरांना लिखाणासाठी लेखनिक लागतो. लेख डोक्यात पूर्ण तयार झाल्यावर ते धडाधड डिक्टेशन देतात. हे खोड, हे वाक्य काढून टाक, असा प्रकार नसतो. एकदा त्यांच्या घरी एका लेखाचा काही भाग लिहून घेण्यासाठी मी हे काम केलं होतं. गिरवलीला त्यांचा फोन आला, ‘दोन दिवसांसाठी तुला पुण्यात यायला जमेल का? मला इथं लिहून घेण्यासाठी कोणीच मिळत नाहीय’. मला जमण्यासारखं होतं. मी ‘हो’ म्हणालो. आम्ही तारीख ठरवली. मी दुसऱ्या दिवशी जाऊन तिकीट काढून आलो. निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा फोन केला आणि उद्या रात्री निघून परवा पोचतोय, असं सांगितलं. हर्डीकर भडकले. काहीतरी घोटाळा झाला होता. मी एक दिवस उशिराचं तिकीट बुक केलं होतं. त्यांचा सगळा प्लॅन बिघडला होता. ते मला म्हणाले, ‘आता तू येऊच नको’. पण हा घोटाळा निस्तरणं भागच होतं. मी ठरल्याप्रमाणे गेलो. तोपर्यंत मामला थंड झाला होता. पण त्यांनी चक्क लेखनिक न घेता अर्धा लेख लिहून काढला होता. अर्धा मी लिहून घेतला. श्री.अ. दाभोळकरांवरचा हा लेख पुढे २००१च्या ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाला. (‘विठोबाची आंगी’ या पुस्तकातही आला.) त्यानंतर त्यांची लेखनिक वापरायची सवयच सुटली.

हर्डीकरांच्या एरवीच्या गप्पांमध्ये, विशेषतः मित्रही जमलेलले असताना शाब्दिक टोलेबाजी खूप चालते. किंबहुना ती झाल्याशिवाय त्यांनाही मजा येत नाही. सगळे मित्र तेव्हा त्यांच्या शत्रूपक्षात असतात. शेतकरी संघटनेतल्या मंडळींचे असे अनेक किस्से त्यांनी मला सांगितलेले आहेत.

एकदा हर्डीकरांच्या दोन दिवसांतल्या पाच भाषणांचा विक्रम पाहून मी म्हणालो, ‘आता तुमच्या अजून काही भाषणांचा माझ्याकडे साठा झाला की, मी ‘नॉनस्टॉप विनय हर्डीकर थर्टी टू’ अशी सीडी काढणार आहे. तिचं कव्हर कसं असेल हे ठरलं आहे. ते कोलाज असणार आहे. त्यात शरद जोशी कुमार गंधर्वांच्या पोजमध्ये तान घेत असतील, कुमार गंधर्व ‘शेतकरी संघटने’चा बिल्ला लावून बसलेले असतील, कितीतरी मराठी लेखक बॅकग्राऊंडला हर्डीकरांचं भाषण बंद करा, म्हणून आंदोलन करत असतील आणि आप्पा पेंडसे स्वतःच्याच पोजमध्ये असतील, पण त्यांचे कपडे मात्र विनय हर्डीकरांसारखे असतील. There is no dull moment!’

 

गर्दीचं या माणसाला वावडं नाही, एवढंच नाही, तर अत्यंत फटकळ आणि रोखठोक बोलणं असलं तरी तीव्र बुद्धिमत्तेसोबतच तीव्र भावनिकता ही त्यांची वृत्ती आहे. माझ्या लग्नाच्या वेळी ते पूर्ण दोन दिवस आमच्या कुटुंबीयांसोबत होते. उदगीरला तर त्या दिवशी आमच्या घरी खास मराठवाडा पद्धतीचा गर्दी-गोंधळ चालू होता. माझ्या भावाचा मुंबईहून आलेला मित्र घरातल्या गर्दीत नेमकं कुठं उभं राहावं आणि काय करावं, हे न सुचून भांबावून गेला होता. हर्डीकर मात्र आरामात राहून आपल्याला हवा तसा चहा माझ्या वहिनीकडून करून घेत होते आणि सगळ्यांसोबत आमच्या शेजाऱ्यांच्या घरी क्रिकेट मॅच टीव्हीवर बघत होते. (अनिल कुंबळेने त्या दिवशी १० विकेट्स घेतल्या होत्या!).

पुढे काही वर्षांनी मला थोडंसं आजारपण आणि छोट्शा सर्जरीमुळे काही दिवस उदगीरला राहावं लागलं. तेव्हा मुद्दाम मला भेटायला आलेल्या हर्डीकरांना पाहून या माणसाची वृत्ती भावनिकच जास्त आहे, या माझ्या मतावर मीच शिक्कामोर्तब केलं. केवळ माझ्याच नाहीत, तर कितीतरी मित्रांच्या कुटुंबांशी ते स्वत:ला जोडून घेतात, राहतात.

स्वयंपाक ही त्यांनी मुद्दामहून जोपासलेली आवड त्याला हितकारक ठरते. भाज्यांची वेगवेगळी किंवा कशाचीही कॉम्बिनेशन्स तयार करणं, ही त्यांची आवड आहे. माझ्या घरी त्यांनी शिकवलेल्या भेंडी, बटाटा, सिमला मिरची आणि अजून काही (उपलब्धतेप्रमाणे) असं कॉम्बिनेशन असणारी आणि एक दोडक्याची, अशा रेसिपीज नेहमी केल्या जातात.

२००४-५ सालची गोष्ट. ‘जग बदल घालुनी घाव’ हा शेतकरी संघटनेवरचा लेख हर्डीकरांनी मला वाचायला दिला. वाचून झाल्यावर मी फोन केला, प्रतिक्रिया दिली. शेतकरी संघटनेची ‘पॉलिटिकल इकॉनॉमी’ आवडल्याचं सांगितलं. आणखी काही बोलणं झालं. तेव्हा आत्तापर्यंतच्या लेखांचं पुस्तक आता येणार आहे. त्याच्या प्रकाशन समारंभात औरंगाबादला तू बोलशील का, असं त्यांनी मला विचारलं. मी ‘हो’ म्हणालो. कवी इंद्रजीत भालेराव, ‘शेतकरी संघटने’चे अमर हबीब, भास्करराव बोरावके, लेखक विश्वास दांडेकर असे सगळे साहित्य, समाजकारण यांच्याशी संबंधित लोक बोलणार होते.

मग सुट्या कागदावर छापलेले सगळे लेख माझ्याकडे आले आणि आपण कोणत्या परीक्षेला बसलोय, याचं भान आलं. राजकीय-सामाजिक धारदार विश्लेषण असलेल्या लेखांचा तो संग्रह. परत सलग वाचून काढला. ‘जनांचा प्रवाहो चालिला’ लिहिणाऱ्या लेखकाचा हा कितीतरी पुढचा टप्पा होता. हा कसला प्रवास आहे, असा विचार करत असताना हर्डीकरांनी त्यांच्या ‘वारकरी’ या कवितेचा दिलेला कागद आठवला. मी तो काढून वाचला आणि काय बोलायचं, याची रचना माझ्या डोक्यात तयार झाली. इतकी ती कविता या लेखकाच्या प्रवासाशी जोडलेली वाटली.

तयार पुस्तकाची प्रत मला प्रकाशन समारंभातच मिळणार होती. पुस्तक हातात घेतल्यावर समजलं की, त्याच्या मलपृष्ठावरच ही कविता छापली आहे. त्या कवितेच्या आणि मला झालेल्या या प्रवासाच्या मांडणीनं मी माझं भाषण संपवलं. हर्डीकर प्रेक्षकांत बसलेले होते. त्या दिवसापासून मी हर्डीकरांना ‘विनय’ म्हणू लागलो!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

हर्डीकर गिरवलीला आले की, त्या भागातल्या ‘शेतकरी संघटने’च्या मंडळींशी भेट असायचीच. श्रीरंगनाना मोरे यांच्याविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. अमर हबीबसारखे संघटनेतील मित्र असायचे. कधी योगेश्वरी महाविद्यालयात नाट्यशास्त्र शिकवणारे प्रा. केशवराव देशपांडे (त्यांनीही पूर्वी ‘शेतकरी संघटने’चे काम केलेले) हेही असायचे. अच्युत गंगणे व कालिदास आपेट यांच्यासारखे मुख्य भेटायचे. या सगळ्यांशी माझीही मैत्री झाली.

एका शेतकऱ्यांच्या शिबिरात वीज कशी तयार होते आणि ती शेतकऱ्यापर्यंत व घरापर्यंत कशी पोहोचवली जाते, याबद्दल मला अच्युत गंगणे यांनी भाषण करायला लावलं. एकदा माझ्या कामातल्या मित्रांसोबत गिरवली गावातली एक सभा आम्ही मागे उभं राहून ऐकत होतो. बोलणारा वक्ता अचानक तावातावाने म्हणाला “.... आणि ही उष्टी खरकटी वीज आम्हाला दिली जाते.” माझे मित्र माझ्याकडे बघायला लागले. हसावं की रडावं असा त्यांचा चेहरा झाला होता. मी म्हणालो, “तो ‘व्होल्टेज रेग्युलेशन’बद्दल बोलतोय, असा विचार करून पहा.”

वीज क्षेत्र आणि शेतकरी हे एक विचित्र नातं आहे. मी त्याला ‘Love-hate agriculture loads’ असं नाव ठेवलं आहे. मराठवाड्यात काम करत असताना मला सर्वत्र, विशेषतः ग्रामीण भागात असलेली व्होल्टेजची समस्या लक्षात आली. वर्षभर अभ्यास करून मी ती उपायासकट मांडली. पण ती सरसकट नाकारली गेली. परिणामी ५० वरिष्ठ अभियंत्यांच्या मीटिंगमध्ये मी एकटा पडलो. सर्वोच्च पदांवर बसलेल्यांपेक्षा वेगळ बोललं जातं, तेव्हा गप्प बसणं सर्वांना श्रेयस्कर वाटतं. माझ्या आक्रमकपणावर शेवटचा उपाय काढला गेला- ‘आम्ही सांगतोय म्हणून हे करावं लागेल.’ मी उत्तर दिलं, “तरी सुद्धा तुमचं सोल्युशन चुकीचंच असेल.” मग मात्र पारडं माझ्या बाजूनं झुकलं.

हॉलमधून बाहेर आल्यानंतर तुमचं बरोबर आहे, असं आम्हालाही वाटत होतं, असं सांगणाऱ्यांपासून मी नॉशिया आल्यासारखा बाजूला झालो. माझ्या डोक्यात त्या वेळी ‘सुमारांची सद्दी’चा शेवटचा भाग होता. विनयने उद्धृत केलेले डी.एच. लॉरेन्सचे शब्द होते- “Ours is a tragic age, but we refuse to take it tragically” आणि त्यानंच पहिल्यांदा ऐकवलेली रामधारी सिंह दिनकर यांची ‘भग्न मंदिर बन रहा हैं’ ही कवितादेखील होती.

मी त्याला तसा मेसेज केला. ते सोल्युशन पूर्ण राबवेपर्यंत त्यावर काम केलं. गरज पडली, तेव्हा ते समजून सांगण्यासाठी वेगवेगळ्या गावांत इंजिनियर्सची शिबिरं घेतली. अभियंत्यांच्या अनेक टीम्सनी मिळून ती कामं पूर्ण केली. वर्षभरानंतर मी अ‍ॅनालिसिस केलं. आमचं सोल्युशन १०० टक्के बरोबर होतं. एक छोटी गॅप, छोट्या काळासाठी भरली गेली. मी फक्त ‘हर्डीकर मुक्त-विद्यापीठा’त शिकलेली पद्धत छोट्या प्रमाणात लावून पाहत होतो.

प्रत्येक वेळी हे करता येत नाही. समजलेले प्रश्न वेगवेगळ्या टप्प्यांवर अडकत राहतात, पण आपण अडकून पडलो आहोत, असं वाटत नाही. विनय हर्डीकर या एक शिक्षकी ‘मुक्त-विद्यापीठा’ने मला हे शिकवलं आहे.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

विनय हर्डीकर हा माणूस विलक्षण ‘मनस्वी’ आहे, पण ‘दुटप्पी’ आणि ‘दांभिक’ नाही!

विनय हर्डीकर या उद्धट माणसानं मला घराबाहेर काढलं होतं...

.................................................................................................................................................................

या आठवड्यात विनयची पंचाहत्तरी पुण्यात दोन दिवस साजरी झाली. पहिल्या दिवशी संगीत मैफल आणि दुसऱ्या दिवशी विनयच्या पुस्तकाचं प्रकाशन व त्याची मुलाखत. मुलाखतीत ठरल्याप्रमाणे तुम्ही यांना का सोडलं, त्यांना का सोडलं, तिथंच का नाही राहिलात, असे प्रश्न विचारले जातात. दोन दिवस मित्रपरिवारांनी गच्च भरलेलं सभागृहं, प्रत्येकाला त्याच्याशी वाटणारा स्नेह आणि उल्लेखली जाणारी कामांची, विचारांची विविध क्षेत्रं पाहून खरं तर विचारायला हवं होतं की, हे सारं कसं जोडलं?

मुलाखत संपल्याबरोबर मुंबईला यायला निघालो. कितीतरी छोट्या-मोठ्या गोष्टी आठवत होत्या. त्याने घरात एका कागदावर लिहिलेला ‘नीतिशतका’तला श्लोक वाचून मी काही दिवस ‘नीतीशतका’त गुंगलो होतो. शेक्सपिअरवरील त्याच्या बोलण्यामुळे नंतर शेक्सपिअरच्या इंग्लिशच्या ठेचा खाल्ल्या होत्या. त्याच्या भिंतीवर एकदा ‘Omnia dubitandum’ पाहिल्यावर याला जोडून अजून काहीतरी हवं ते शोधत राहिलो. मला स्वतंत्रपणे सापडलेल्या, पण आमच्यात ‘कॉमन इंटरेस्ट’च्या राहिलेल्या होमिओपॅथीच्या प्रवर्तकाच्या ‘Aude Sapere’ या शब्दात ती जोड सापडली. ‘Humanism in developing societies’ या त्याच्या लेखाचा माझा फसलेला अनुवाद आठवला.

माझ्या मनात विचार आला की, शिक्षण नेमकं काय असतं? उदारमतवादी शिक्षणाचं प्रयोजन काय असतं? व्यक्तीला परंपरेच्या, परिस्थितीच्या, स्वतःच्या अक्षमतांच्या बंधनांतून मुक्त करून मोकळेपणाने विचार करण्याची ताकद देणं… त्याच वेळी तिच्यामध्ये परंपरेकडे, परिस्थितीकडे डोळसपणे आणि चिकित्सकपणे पाहण्याची क्षमता निर्माण करणं, रूढ गृहितकांना प्रश्न विचारण्याची ताकद मिळवून देणं आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनांना सामोरं जाऊन त्यांची पारख करण्याची पात्रता तिला मिळवून देणं, हे जर शिक्षणाचं प्रयोजन असेल, तर केवळ तांत्रिक किंवा अ-तांत्रिक कौशल्यं वाढवणाऱ्या शिकण्यातून ते पूर्ण साध्य होणार नाही.

अशा कौशल्यांच्या आवश्यकतेसह मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या विविध ज्ञानशाखा, विविध कला, त्यांच्यातील अंतरसंबंध यांच्या जाणीवेतून व्यक्तीची स्वातंत्र्याची कक्षा विस्तारू शकण्याची कुवत निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही, तर अशा उदारमतवादी शिक्षणाचा अंतर्भाव अधिक विचारी आणि जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठी आवश्यक असेल. माझ्या मते विद्यापीठ अशाच शिक्षणाचं माध्यम असतं.

चार भिंतींच्या बंद खोल्यांमध्ये चालणारं शिकवण्याचं काम तर इथं झालेलं आहेच, पण त्याबाहेर चालणारं, अनेक ठिकाणी पसरलेलं, स्थळाचं, वेळेचं आणि ठरवलेल्या विषयांचं बंधन नसलेलं, प्रवेशताना परीक्षा झाली, असं भासूनही मुक्त-प्रवेश असलेलं, अनेकांची मोठ्या आकाशाची जाणीव आणि त्यात झेपावण्याची क्षमता वाढवणारं, विनय हर्डीकर हे एक शिक्षकी ‘मुक्त-विद्यापीठ’ आहे.

त्यात ग्रेड्स पूर्ण केल्या नसल्या, तरी मी ‘लिबरल एज्युकेशन’चा एक दीर्घ कोर्स करत आहे. ‘साकल्य प्रदेशा’ची मुशाफिरी अशी त्याची पद्धत आहे.

शेते शत नांगरता

किती कुंपणे तुटली

अनुभव पीक उगे

तीक्ष्ण विचारे जोखली

 

बेणं प्रकाशफुलांचं

कैक शोधण्या रपेटी

वाटा चालण्या असंख्य

अजून समोर येती

 

जन प्रवाही व्यक्ती व्याप्ती

निरखे तिसरा डोळा

विठोबाच्या आंगीसाठी

हाती अस्सल ऐवज गोळा

 

अशा गर्दीत घाईत

कुठे थांबता जरासं

मैत्र देवाचे लाडके

सदा मनी आसपास

 

ऐशी ज्या मुशाफिरीची

तऱ्हा आणि बात खास

मैफिल ही रंगविण्या

मिळोत अजून पन्नास!

.................................................................................................................................................................

शशांक जेवळीकर

Shashank.jewalikar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......

म. गांधी आणि डॉ. आंबेडकर हयात असते, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर त्यांचेही एकमत झाले असते, त्यांनी या निकालाचे स्वागतच केले असते...

‘अधिक मागे राहिलेल्यांना मागेच ठेवण्याचा (थोडे सक्षम झालेल्यांचा) हा डाव आहे का? आणि समजा, अजून ती वेळ आलेली नाही, तर अधिक पिछड्यांना पुढे कसे आणायचे? पाऊणशे वर्षे पुरेशी नसतील, तर आणखी किती वर्षे उपवर्गीकरण नको, की ते कधीच नको?’ या सर्व चर्चेत ‘आरक्षणाचे धोरण व मूळ उद्दिष्ट काय आणि कशासाठी’ याकडे दुर्लक्ष होते आहे. शिक्षण व सरकारी नोकऱ्या यांमध्ये मागास घटकांचे पुरेसे प्रतिनिधित्व झाले पाहिजे, हे आहे मूळ उद्दिष्ट.......

पसमंदा मुस्लिमांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे, हा केवळ विशिष्ट जमातीचा विकास नसून, भारताच्या वैविध्यपूर्ण समाजात सामावलेल्या क्षमतांना मान्यता आणि वाव देण्यासारखे आहे

विविध अभ्यासांत असे दिसून आले आहे की, एखाद्या समूहाला सामाजिक, आर्थिक विकासापासून वंचित ठेवण्यात आले, तर ते ‘जमातवादी’ किंवा ‘मूलतत्त्ववादी’ राजकारणाकडे ढकलले जातात. ‘मागासलेपणा’ आणि ‘धर्मवादी राजकारण’ यांच्यात नेहमी सहसंबंध दिसून येतो. तसे काहीसे पसमंदांचे होऊ नये, यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना करून सबलीकरण करून त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्याची, सामाजिक व राजकीय प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे.......