‘नमन नटवरा’ या नाटकातील चढउतार समजून घ्यायचे असतील, तर बालगंधर्वांचे जीवन थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे...
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘नमन नटवरा’ या नाटकातील काही प्रसंगांची छायाचित्रं
  • Sat , 22 June 2024
  • कला-संस्कृती नाटकबिटक नमन नटवरा बालगंधर्व Bal Gandharva गोहर जान Gauhar Jaan

बालगंधर्वांच्या सबंध जीवनावर नाटक सादर करण्यापेक्षा त्यांच्या जीवनाच्या शोकात्म उत्तरार्धावर नाटक सादर केल्याबद्दल गोव्याची नाट्यसंस्था ‘श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य समाज बांदिवडे’ यांचे खास अभिनंदन. बालगंधर्व उर्फ नारायण श्रीपाद राजहंस (१९८८-१९६७) या नाट्यकर्मीवर महाराष्ट्राने अलोट प्रेम केले. ‘माणूस’कार श्री.ग. माजगावकरांच्या मते महाराष्ट्राने शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व या तीन व्यक्तींवर फार प्रेम केले. बालगंधर्वांवर आजवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत, २०११ साली एक मराठी चित्रपटही येऊन गेला आहे. पण नाट्यरूपाने कदाचित पहिल्यांदाच बालगंधर्व नाट्यरसिकांसमोर आले आहेत.

‘नमन नटवरा’ या नाटकातील चढउतार समजून घ्यायचे असतील, तर बालगंधर्वांचे जीवन थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीची वर्षं म्हणजे मराठी नाटक कंपन्यांची भरभराटीची वर्षं. त्यापैकी एक प्रमुख नाटक कंपनी म्हणजे ‘गंधर्व नाटक कंपनी’. किर्लोस्कर संगीत मंडळीतून १९०५ साली बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द सुरू झाली. १९११ साली किर्लोस्कर कंपनीचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर कंपनीत वादावादी सुरू झाली. परिणामी बालगंधर्व ‘किर्लोस्कर संगीत मंडळी’तून बाहेर पडले. मग १९१३ साली बालगंधर्वांनी गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या मदतीने ‘गंधर्व संगीत मंडळ’ स्थापन केली. पुढे या ना त्या कारणांनी इतर भागीदार कंपनी सोडून गेले आणि १९२१मध्ये बालगंधर्व कंपनीचे एकमेव मालक झाले. तेव्हा कंपनीच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झालेले होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या बालगंधर्वांनी पुढच्या सात वर्षांत सर्व कर्ज फेडले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्यानंतर पुढच्या काळात कंपनीची आर्थिक स्थिती पुन्हा एकदा नरमगरम झाली. यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे नाटकातील प्रॉपर्टी आणि इतर अनेक गोष्टींत उच्च दर्जा, अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह! या टप्प्यावर झालेल्या कर्जातून बाहेर येण्याचा एक मार्ग म्हणून त्यांनी ‘प्रभात फिल्म कंपनी’च्या ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिका साकारली. पण त्यांचा जीव चित्रपटसृष्टीत रमला नाही.

१९३३ साली बोलपटांचा जमाना सुरू झाले आणि मराठी नाटक कंपन्यांना ओहोटी लागली. याला ‘गंधर्व संगीत मंडळी’ अपवाद नव्हती. १९३५ साली बालगंधर्वांचा गोहरजानशी परिचय झाला. ती बालगंधर्वांच्या गायकीची भक्त होती. त्यांची गायकी पुढे चालावी म्हणून चित्रपटव्यवसायात जम बसलेला असूनही ती बालगंधर्वांकडे आली. गोहरजानला स्त्री भूमिका देऊन बालगंधर्वांनी नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ. स्त्री असूनही रसिकांनी गोहरजानला स्त्रीच्या भूमिकेत स्वीकारले नाही.

बालगंधर्वांचा शेवटचा काळ फार विपन्नावस्थेत गेला. १९५२ साली त्यांच्या एका पायात अधूपणा निर्मांण झाला. नंतर त्यांचे दोन्ही पाय पंगू झाले. या कठीण काळात गोहरजानने त्यांना साथ दिली.

बालगंधर्वांच्या तशा सरळमार्गी जीवनात त्या काळी गोहरजान कर्नाटकीमुळे कमालीची खळबळ माजली होती. खरं तर त्या काळी अशा प्रकारे अंगवस्त्र ठेवण्याची राजरोस पद्धत होती. तरी गोहरजानच्या विरोधात टीकेचं काहूर माजलं होतं. गोहरजान येण्याअगोदर गंधर्व कंपनीत पैशाची फार उधळपट्टी होत असे. गंधर्व कंपनीच्या चलतीचा काळात हे धकून गेले. आता याला आळा घातला पाहिजे, म्हणत गोहरजान कंपनीच्या कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक हितसंबंधी नाराज झाले, चिडले आणि गंधर्वांना सोडून गेले. शेवटी तर कंपनीचा मॅनेजर म्हणून काम पाहात असलेला त्यांचा भाऊसुद्धा सोडून गेला. जगण्यासाठी पैसे लागतात, म्हणत बालगंधर्वांना त्याही वयात रंगमंचावर यावे लागले, भजनाचे कार्यक्रम करावे लागले. शेवटी अत्यंत दु:खद अवस्थेत त्यांचे निधन झाले.

बालगंधर्व आणि गोहरजान यांच्यातील संबंधांबद्दल आपल्याकडे टोकाची मतं आहेत. गोहनजानने शेवटच्या काळात बालगंधर्वांची खूप सेवा केली, त्यांचा आर्थिक डोलारा जमेल तसा सावरला, हे एक मत. तर दुसरीकडे तिने बालगंधर्वांचा छळ केला, त्यांचे पैसे लाटले, असेही आरोप ऐकू येतात. असं असलं तरी शेवटच्या काळात गोहरजानने बालगंधर्वांचा सांभाळ केला, हे सत्य उरतेच.

‘नमन नटवरा’ या नाटकाचे मला खास कौतुक करायचे आहे. यात जेव्हा बालगंधर्व आणि गोहरजान पती-पत्नीसारखे एकत्र राहायला लागतात, तेव्हा त्यांची कायदेशीर पत्नी लक्ष्मीबाई आणि इतर अनेक प्रियजन त्यांना टोमणे मारतात. बालगंधर्व शांतपणाने एकेक आरोपांना कधी उत्तर देतात, तर कधी देत नाहीत. मात्र काहीही झालं तरी शेवटपर्यंत गोहरजानची साथ सोडत नाहीत. एका प्रसंगी तर ते पत्नी लक्ष्मीला स्वच्छ शब्दांत समजून सांगतात- ‘तू माझा संसार उत्तम केला, पण सुख तिने दिले’. हे वाक्य पुरेसं बोलकं आहे.

‘संसारसुख’ आणि ‘स्त्रीसुख’ यात योग्य तो फरक केल्याबद्दल नाटककार दत्ताराम कामत बांबोळकर यांचे अभिनंदन. असे वस्तुस्थिती दाखवणारं वाक्य एकविसाव्या शतकातच लिहिता आले, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या समाजावर आजही मोठ्या प्रमाणात वि.स. खांडेकरांचे संस्कार आहेत. मागच्या शतकात जर असं नाटक लिहितं असतं, तर बालगंधर्वांची ‘भानगड’ आलीच नसती किंवा आली असती तर पुरेशी सावधगिरी बाळगत.  

ही सर्व गुंतागुंत समोर ठेवत नाटककाराने हे दोन्ही अंक नाटक लिहिले आहे. नाटक कुठेही रेंगाळत नाही. अनेकदा बिनमहत्त्वाचे प्रसंग घेतल्यामुळे चरित्रात्मक नाटक कंटाळवाणे होते. ‘नमन नटवरा’चा प्रयोग फार आकर्षक होतो. याचे श्रेय गोव्याचे तरुण दिग्दर्शक सुशांत नायक यांचे.

बालगंधर्वांच्या जीवनावरील नाटक म्हणजे त्यात नाट्यपदांची रेलचेल असणार, हे अगदी स्वाभाविकच म्हणावे लागेल. नाटककार दत्ताराम कामत बांबोळकर आणि तरुण दिग्दर्शक सुशांत नायक यांनी या वस्तुस्थितीचा कल्पक उपयोग करत अनेक प्रसंगांत बालगंधर्व रंगमंचाच्या मधोमध उभे, त्यांच्या आजुबाजूला ‘सिंधू’, ‘रुक्मिणी’, ‘भामिनी’ वगैरे त्यांनी अजरामर केलेली स्त्रीपात्रं उभी आहेत. प्रसंगानुरूप ती बालगंधर्वांशी बोलत आहेत, अशी छान कल्पक रचना केली आहे.

अमोघ बुडकुले (बालगंधर्व), ममता शिरोडकर (गोहरजान) आणि अनुजा पुरोहित (लक्ष्मी) या तिघांनी तिन्ही महत्त्वाची पात्रं योग्य प्रकारे सादर केली आहेत. अमोघ बुडकुले यांनी बालगंधर्वांच्या मनातले आर्थिक-मानसिक स्थितीबद्दलचे जीवघेणे चढउतार, संगीत नाटकाची, रंगभूमीवरची त्यांची अव्यभिचारी निष्ठा, असा बालगंधर्व रंगवणे सोपे नव्हते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

या प्रमुख कलाकारांना इतर सहकलाकारांची यथोचित साथ लाभली. यातील उल्लेखनीय नावं म्हणजे अजित केरकर, रघुराम शानभाग, गौतम दामले, डॉ. श्रावणी नायक आणि अन्य कलाकार नाटकाची रंगत वाढवतात.

या नाटकाचे नेपथ्य (सौमित्र बखले) सुटसुटीत आणि उपयुक्त आहे. प्रकाशयोजनेची (साईनाथ वळवईकर आणि साहिल बांदोडकर) योग्य साथ लाभल्यामुळे नाटक उत्तरोत्तर रंगत जाते. प्रेक्षकांना चरित्रनायक संगीत नाटकातील महत्त्वाचे नाव होते, याचे भान प्रकाशयोजना देत राहते.

या नाटकाचा प्राण ‘संगीत’ असल्यामुळे यात संगीत फार महत्त्वाचे असणार होते. ती जबाबदारी तानाजी गावडे यांनी सफाईने पार पाडली आहे. ते प्रेक्षकांना संगीताच्या गंधर्वयुगात नेतात.

हे नाटक मुंबईत सादर केल्याबद्दल ‘भूमिका थिएटर्स’ आणि ‘श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य समाज बांदिवडे, गोवा’ यांचे खास आभार. तब्बल ३० रंगकर्मी असलेले नाटक प्रॉपर्टीसह गोव्यावरून मुंबईला प्रयोग सादर करणे, हे अतिशय कौतुकास्पद आहे.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......