हे पुस्तक लिहिण्यामागील एक हेतू हा होता की, आपल्या डोळ्यांवरील ‘इझम’चे, पारंपरिक समज-गैरसमजांचे काळे गॉगल उतरावेत...
ग्रंथनामा - झलक
रवि आमले
  • ‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 22 June 2024
  • ग्रंथनामा झलक परकीय हात Parkeey Haat रवि आमले Ravi Amale रॉ RAW

ज्येष्ठ पत्रकार व लेखक रवि आमले यांचं ‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ हे नवंकोरं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेलं हे मनोगत…

.................................................................................................................................................................

‘‘… तेव्हा भारतात हा ‘परकीय हात’ काम करत होताच. आजही करत आहे. तो स्वतंत्र पुस्तकाचा विषय ठरावा.’’

‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या मनोगतातील हे वाक्य. ते पुस्तक २०१८मधले. ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ या आपल्या गुप्तचरसंस्थेची यशोगाथा हे त्याचे स्वरूप होते. आपल्याकडील एका विशिष्ट वर्गात विदेशी गुप्तचरसंस्था, त्यातही खासकरून इस्रायलच्या ‘मोसाद’चे फार कौतुक. ते असायला हरकत नाही. पण त्या कौतुकात आपल्या गुप्तचर यंत्रणांना कमी लेखणे असे. ते खटकणारे.

रॉविषयी, तिच्या कारवायांविषयी काहीही माहिती नसताना, तिची तुलना मोसादशी करायची; ते मोसादवाले कसे अरब-मुस्लीम अतिरेक्यांना त्यांच्या देशात घुसून ठोकून काढतात आणि आपण कसे बुळे अशी कुजबूज करत आपल्याच देशाला नावे ठेवायची, असा तो सारा प्रकार असे. गेल्या ७०-७५ वर्षांत देशात काहीच झाले नाही, या कृतघ्न आणि अडाणी भावनेचाच तो एक भाग. तर त्यावरील प्रतिक्रियेतून रॉ या पुस्तकाची पहिली ठिणगी पडली. स्वाभाविकच त्या पुस्तकात रॉच्या यशाच्या कहाण्यांना प्राधान्य होते. त्याकरता वाचन, संशोधन करत असताना समोर इतरही बरीच माहिती येत होती.

रॉचा सगळाच इतिहास काही देदीप्यमान म्हणता येईल असा नाही. त्या संस्थेच्या नावाला काळीमा फासणाऱ्या घटनाही येथे घडून गेलेल्या आहेत. तेही कुठेतरी येणे आवश्यक आहे असे वाटत होते. दुसरीकडे परराष्ट्रांनी, त्यांच्या हेरसंस्थांनी भारतात केलेले उद्योगही ठोसपणे समोर येत होते. त्यातील काही उद्योग आपल्या हेरसंस्थांच्या साह्याने केलेले. काही आपल्या विरोधातले. राजनैतिक मुत्सद्दी, नेते, गुप्तचर अधिकारी यांची आत्मकथने, पुस्तके, संशोधन लेख, पेपर, ‘विकिलिक्स’, तसेच एडवर्ड स्नोडेन यांनी फोडलेली गोपनीय कागदपत्रे, खुद्द अमेरिकी हेरसंस्थांनी तेथील कायद्यानुसार जाहीर केलेली कागदपत्रे या सगळ्यांतून त्या ‘फॉरिन हँड’वर, ‘परकीय हाता’वर प्रकाश पडत होता.

त्याची एकत्रित नोंद व्हावी, तत्कालिन घटना-घडामोडी यांचे बिंदू एकमेकांना जोडून त्यातून भारतातील परकीय हाताची कारस्थाने आणि कारवाया, यांचे सलग चित्र समोर यावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची ती बाजू मांडावी, असे रॉचे लेखन सुरू होते, तेव्हापासूनच मनात होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा ‘परकीय हात’ तसा आपल्याला नवा नाही. इंदिरा गांधी यांचा काळ ज्यांनी अनुभवला आहे, त्यांना तर त्याचा चांगलाच परिचय असेल. आणीबाणी लागली, तेव्हा मी शाळकरीच होतो. तेव्हाच्या दोन आठवणी आहेत. एक म्हणजे आमच्या जीवन शिक्षण मंदिरातील गणेशोत्सवात रांगोळीने काढलेले ‘आले अनुशासन पर्व, वागू शिस्तीने सर्व’ हे वाक्य आणि नंतर ओतूरच्या बाजारपेठेतील भिंतीवर निळ्या शाईने लिहिलेली ‘अंधेरे में एक प्रकाश… जयप्रकाश, जयप्रकाश’ ही घोषणा. पण तेव्हाच्या काळात ‘परकीय हात’ हे एक ‘चलनी नाणे’ होते.

इंदिरा गांधी यांच्या प्रचारातील तो एक हुकमी एक्का होता. इतका की, त्याचा विनोदविषय झाला. पण पुढे कधी एखादा फितूर पकडला जाई, कुठे हेरगिरी कारवाया उघडकीस येत आणि विदेशी हेरसंस्थांच्या, परराष्ट्रांच्या हस्तक्षेपाची चर्चा कानावर येई. पंजाब-काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडाळी यातून तो दिसे.

महाविद्यालयात एक कम्युनिस्ट मित्र होता. पूर्वी डोंबिवलीत राहायचा तो. त्याच्या तोंडात सीआयएच्या अतिरेकी कारवाया नेहमी भिजत पडलेल्या असत. पण त्या पलीकडेही हा परकीय हात कार्यरत असतो. तो येथील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, एवढेच नव्हे, तर अगदी सांस्कृतिक बाबींनाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतो, हे फारसे गावी नव्हते. पत्रकारिता करताना, येथील समाजकारण जाणून घेताना, आंतरराष्ट्रीय राजकारण, ‘इंटेलिजन्स’ या विषयांचा अभ्यास करताना या गोष्टींची समज येऊ लागली. अनेकांना मात्र आजही त्यावर विश्वास ठेवणे जड जाताना दिसते.

भारतात परराष्ट्रांच्या हेरसंस्था नाना उद्योग करतात यात खरे तर काहीही धक्कादायक नाही. फार पूर्वीपासून हे सुरू आहे आणि भारतीय हेरसंस्थाही अन्य देशांत तेच करत असतात. पाकिस्तानातील फुटीरतावादी चळवळींना, तेथील दहशतवादी संघटनांना रॉने केलेली मदत जगजाहीर आहे.

कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधातील, श्रीलंकेतील, नेपाळमधील रॉच्या कारवाया हे उघड गुपीत आहे. तेव्हा विदेशी शक्ती भारतात हस्तक्षेप करतात म्हणून रडण्यात अर्थ नाही. आपल्या राष्ट्राचे हित, स्वार्थ साधणे आणि त्यासाठी प्रसंगी कोणत्याही थराला जाणे, हा हेरसंस्थांच्या कार्याचाच एक भाग असतो. आता त्यातील नैतिकता, अनैतिकता हा वेगळा मुद्दा. त्यावर वाद होऊ शकतो. पण तशीही हल्ली ही बाब संयुक्त राष्ट्रांचे व्यासपीठ, आंतररराष्ट्रीय परिसंवाद आणि मुत्सद्द्यांची चर्चा एवढ्यापुरतीच मर्यादीत राहिलेली दिसते. प्रत्यक्ष व्यवहारात ‘माय कंट्री… राईट ऑर राँग!’ हेच चाललेले असते.

जे भारत अन्यत्र करत होता, तेच अन्य देश भारतात करत होते. त्यातील काहींची वर्तणूक एक हात मैत्रीचा आणि दुसऱ्या हातात खंजीर अशीही होती. काही देश भारतविरोधी कारवाया करत होते, तशाच भारताच्या भूमीवरून एकमेकांविरोधातही लढत होते. एरवी या गोष्टी भारतीय इतिहासातील ‘फूट नोट्स’ म्हणूनही क्वचितच समोर येतात. परंतु नीट पाहिले, तर लक्षात येते की, या अशा कारवाया आणि कारस्थानांमध्ये भारताच्या इतिहासाला कुठे ना कुठे तरी वेगळे वळण लावण्याची क्षमता होती. तसे झालेही आहे.

एकूणच कोणत्याही राष्ट्रीय घटना, तत्कालिन राजकारण यास विविध कंगोरे असतात आणि ते त्या घटना वा राजकारण यांच्या लोकप्रिय मापनाहून खूपच भिन्न असतात. ‘परकीय हात’मधील प्रकरणे वाचताना हे नक्कीच जाणवेल. हे पुस्तक लिहिण्यामागील एक हेतू हाच होता की, डोळ्यांवरील ‘इझम’चे, पारंपरिक समज-गैरसमजांचे काळे गॉगल उतरावेत. राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक, अधिक खोल व्हावी. आपल्याकडील मास-मीडियाच्या चवचालपणामुळे झाले असे की, राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठीच्या साठमाऱ्या असेच चित्र उभे राहिले. पण त्या संघर्षामागेही काही वेगळी बले कार्यरत असतात. आणि ती देशाचे ‘राजकारण’ घडवत असतात. येथील निर्णयांवर, धोरणांवर, एवढेच नव्हे, तर लोकानुबोधावर, पर्सेप्शनवरही परिणाम करीत असतात. ‘परकीय हात’ हा त्याची जाणीव करून देण्याचा एक प्रयत्न आहे.

हे सारे मांडत असताना काही मर्यादा नक्कीच होत्या. एखादी फाईल गोपनीय आहे, याचा अर्थ त्यातील माहिती म्हणजे ब्रह्मसत्यच, असा एक समज उगाचच निर्माण झालेला असतो. गुप्तचरसंस्थांतील अधिकारी, त्यांचे विश्लेषक हे लिहितात ती काळ्या दगडावरची रेघ मानण्याचेही कारण नसते. कारण अखेरीस तीही माणसे असतात. त्यांची नोंदवलेली माहिती, त्यांची सूत्रे चुकीची वा अर्धवट असू शकतात. हीच बाब गुप्तचर अधिकारी वा मुत्सद्दी आदी मंडळींच्या लेखनाबाबतची.

अशा आत्मकथनांना अनेकदा स्वसमर्थनाचा आजार झालेला असतो. त्या आजारात तथ्ये अशक्त होतात. तेव्हा या सगळ्या माहितीकडे तारतम्याने पाहणे, ती इतर माहितीशी वा स्रोतांशी ताडून पाहणे, हे आवश्यक ठरते. जेथे ते अजिबातच अशक्य, तेथे त्या घटना वजा करणे हेच योग्य असते. या पुस्तकाच्या लेखनात आवर्जून तसा प्रयत्न केला आहे. त्याबाबत कुठे शंका निर्माण झालीच, तर हे लक्षात घ्यावे, की कोणत्याही लेखनास लेखकाच्या वैचारिकतेची, अनुभवाची, विश्लेषक शक्तीचीही मर्यादा असतेच.

हे लिहीत असताना अशी काही गूढ ठिकाणे आली, की जेथे खऱ्या-खोट्याचा साधा अंदाजही लावणे कठीण होते. इस्रोतील हेरगिरी प्रकरण हे त्यातीलच एक. त्यामुळेच त्याचा समावेश या पुस्तकात करावा की काय याबाबत द्विधा मनस्थिती होती. मात्र काहीही असले, तरी त्या हेरगिरी प्रकरणाने भारतीय अंतराळ कार्यक्रमावर मोठा परिणाम झाला. विदेशी शक्तींना आणखी काय हवे असते? त्यामुळेच त्याचा समावेश येथे केला.

या आणि खरे तर एकूणातच इतिहास लेखनाची ही एक मर्यादा असते की, आज हाती असलेल्या माहिती आणि पुराव्यांवरूनच त्याचे लेखन करावे लागते. उद्या त्या माहितीत आणखी भर पडली, काही नवे पुरावे समोर आले, तर आजचे कथन बदलावे लागते, सुधारून घ्यावे लागते. तेव्हा हेच काय ते अंतिम सत्य असे मानण्यात अर्थ नसतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

पुस्तकाच्या या मर्यादेची कबुली देतानाच, हेही सांगायला हवे की, परकीय हाताच्या या बखरीतून आजवर आपण मनाशी जपलेल्या अनेक कथा-कहाण्यांना, प्रतिमांना तडे जाण्याची शक्यता आहे. मनोमन त्याचीही तयारी ठेवायला हवी. हे पुस्तक लिहिण्यामागे कोणाचे प्रतिमासंवर्धन करणे वा चारित्र्यहनन करणे हा हेतू नाही. पण तरीही तसे काही होत आहे असे वाटल्यास, त्याचे कारण तत्कालीन घटना-घडामोडींत, त्या व्यक्तींच्या तेव्हाच्या वर्तनात शोधावे लागेल.

जगभरात शांततेची, नैतिकतेची भाषणे देणारे पं. जवाहरलाल नेहरू हे चीनशी मैत्रीचा हात पुढे करीत असताना तिबेटी बंडखोरांना शस्त्रपुरवठा करीत असतात, दलाई लामांना आसरा देत असतात आणि चीन हा आपला संभाव्य शत्रू क्रमांक एक आहे, अशी नोट इंटेलिजन्स ब्युरोला पाठवत असतात.

हे नेहरूंच्या प्रतिमेला जसा तडा देते, त्याच प्रकारे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणांचे सहकार्य घेत असतात आणि काँग्रेस पक्षातील काही ‘अतिरेकी प्रवृत्तीं’वरील पाळत सुरुच ठेवण्यास आयबीला संमती देत असतात, ही गोष्टही पटेलांच्या प्रतिमेशी विसंगत ठरते. पण ही ऐतिहासिक तथ्ये सुटी सुटी पाहण्यात अर्थ नसतो. ती तेव्हाच्या काळाच्या, परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तेव्हाचे संदर्भ लक्षात घेऊनच पाहायची असतात. अन्यथा त्यातून अर्धसत्ये आणि अपमाहितीची पिलावळ जन्मास येते.

‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ – रवि आमले

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने – ४७२ | मूल्य – ५९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......