विनय हर्डीकर या उद्धट माणसानं मला घराबाहेर काढलं होतं...
पडघम - साहित्यिक
हेरंब कुलकर्णी
  • विनय हर्डीकर
  • Sat , 22 June 2024
  • पडघम साहित्यिक विनय हर्डीकर Vinay Hardikar

लेखक, पत्रकार, प्राध्यापक, समीक्षक, संपादक, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता-अभ्यासक, संगीतसमीक्षक आणि ट्रेकर श्री. विनय हर्डीकर २४ जून २०२४ रोजी अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने पुण्यात २३ जून रोजी ‘संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तर २४ जून रोजी हर्डीकरांच्या ‘एक्सप्रेस पुराण : माझी शोध पत्रकारिता’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस हे हर्डीकरांची मुलाखत घेणार आहे. या निमित्ताने हर्डीकरांविषयीचा हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

महाराष्ट्राच्या उद्धटपणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा विनय हर्डीकर यांच्यावर स्वतंत्र प्रकरण असेल. खरं तर पालकांनी मुलांची नावं ती मोठी झाल्यावर त्यांचे गुण बघून ठेवायला हवीत, असं हर्डीकरांकडे पाहून मला नेहमी वाटतं. उद्धटपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या माणसाचं नाव ‘विनय’ का ठेवलं असावं?

माझी त्यांची मैत्री १९९५पासूनची. पुण्यात गेलो की, भेटायचो. एकदा ‘साधना’चे आताचे संपादक विनोद शिरसाठ यांना आपण हर्डीकरांकडे जाऊ या म्हणालो. तेव्हा त्या दोघांची मैत्री नव्हती. मला मोठा अभिमान वाटायचा की, हर्डीकर माझे मित्र आहेत. मोठ्या कौतुकानं विनोदला घेऊन गेलो. पण हर्डीकर माझ्याकडे बघेचनात. त्यांनी विनोदची जुजबी माहिती घेतली. चहा केला व नंतर मला म्हणाले, ‘तू आता माझ्या घरातून निघायचं. आज मी तुझ्याशी काहीच बोलणार नाही.’ आणि मला घालवून दिलं.

विनोदला तर काही कळेना. ते म्हणाले, ‘विठोबाच्या आंगी’ या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी महाराष्ट्रातील निवडक मित्रांना बोलावले होतं. त्यात तूही होतास. मी तुला मित्र मानतो आणि तू असा वागतोस. त्याची शिक्षा म्हणून आज बोलायचं नाही.’ खरं तर त्या वेळी मी बाहेरगावी असल्यानं जाणं टाळलं होतं. खरं तर विसरून गेलो होतो. त्यामुळे ते दुखावले होते. आम्ही रस्त्यावर आलो. विनोद आणि मला हर्डीकरांच्या वागण्याचं हसू येत होतं. मला हा अपमानही वाटला, पण त्याच वेळी विनय हर्डीकर हे आपल्याला जवळचे मित्र मानतात, याने मनोमन सुखावलोही होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या माणसाचा परिचय ३० वर्षांपूर्वी असाच उद्धट रितीनं झालेला. मी ऐन पंचविशीत असताना त्यांचं ‘जनांचा प्रवाहो चालिला’ हे पुस्तक वाचलं होतं. खूपच आवडलं. त्यानंतर श्री. पु. भागवत यांच्यावर टीका करणारा ‘भागवत पंथ की संप्रदाय?’ असा उद्धटपंथीय लेख वाचून त्यांच्या प्रेमातच पडलो. भागवत-पटवर्धन जे लेखकांना पुनर्लेखन करायला सांगायचे, त्यावर त्यांनी लेखकाने संपादक सांगतो म्हणून पुनर्लेखन करू नये, असं भेदक लिहिलं होतं. भागवतांचा अनादर न करता लेखकाच्या आत्मसन्मानाची प्रभावी मांडणी केली होती. हा लेख वाचल्यावर मी त्यांचा पत्ता मिळवला आणि त्यांना पत्र लिहिलं.

त्या काळात मी राजकीय वात्रटिका लिहायचो. त्याचे कार्यक्रम करायचो. सारे जण कौतुक करत. त्यामुळे आपण मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक असल्याच्या आविर्भावात होतो. त्या पत्रासोबत माझ्या राजकीय वात्रटिका, कविता पाठवल्या. त्यावर ‘तुझ्या कविता raw material आहेत’ असं खास उद्धट शैलीत उत्तर आलं.

पण तरी या माणसाविषयी उत्सुकताही वाटली. मला निकालात काढलं असलं तरी, स्पष्ट लिहिणारा हा माणूस मनातून आवडला. पुण्यात गेल्यावर भेटायला गेलो. तेव्हा ते अ.भि. शहा यांच्या मासिकाचे संपादक होते. आम्ही कार्यालयात भेटलो. मी raw material लिहिणारा लेखक असूनही अतिशय सन्मानानं वागवलं. इतर गप्पा इतक्या सुंदर होत्या की, कविता हा विषय बोललो नाही. फक्त अज्ञानात आनंदी राहण्यासाठी या माणसांकडून समीक्षा परत कधीच करून घेतली नाही. माझी आजवर १२ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, पण एकही त्यांना भेट द्यायचं धाडस केलं नाही, पण मैत्री तशीच राहिली.

१९९६ साली आळंदीच्या साहित्य संमेलनात भेटल्यावर आवर्जून चहा प्यायला नेलं. तेव्हा लक्षात आलं की, या माणसाच्या तुलनेत आपली वैचारिक पात्रता काहीच नसताना, आपण raw material असताना, आपलं वय कमी असतानाही हा माणूस आपल्याला समान पातळीवर वागवतो. तेव्हा या माणसाची उंची समजत गेली आणि त्यामुळेच त्यांना देशमुख कंपनीत रात्री, तर कधी घरी पुन्हा पुन्हा सतत भेटत राहिलो. स्वभावात नाटकी उत्स्फूर्तता नसल्याने ते थंड स्वागत करतात. आपल्याला वाटतं की, आपलं येणं आवडलं नसावं बहुधा, पण पुढे मनापासून बोलण्यातून स्नेहपूर्णता लक्षात येते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

शंकर गुहा नियोगी यांच्यावर रंगनाथ पठारे व सुमती लांडे यांनी लिहिलेल्या पुस्तकावर मी लिहिलेला परिचय दै. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. मोठ्या अभिमानानं कात्रण घेऊन त्यांना इम्प्रेस करण्यासाठी गेलो. पुरवणीत आले, हे पुन्हा पुन्हा सांगितलं. पण त्यांच्यावर काहीच परिणाम नाही. म्हणाले, ‘ठीक आहे. एखाद्या पुस्तकावर सद्भावना मनात ठेवून जितकं चांगलं लिहिणं शक्य आहे, तितकं लिहिलं आहे... हा परिचय आहे, परीक्षण नाही.’ पुण्यात भर दुपारी सदाशिव पेठेत कमीत कमी शब्दांत मूल्यमापन आणि कचरा करणं, अनुभवायला मिळालं. एकदा ‘साधना’तला माझा लेख वाचून त्यांचा दोन शब्दांचा मेसेज आला- ‘तद्दन कारागिरी’…

पण तरीही या माणसाचा मोह सुटत नाही. त्यांची सतत व्यासंग आणि विचार करण्याची पद्धत शिकत राहावी वाटते. शेतकरी संघटना हा आणखी आमच्यातील समान धागा. त्याविषयीही बोलायचो.

त्यांची तीव्र तरल विनोदबुद्धी फोनवर आणि प्रत्यक्षात अनुभवणं हा एक अनुभव असतो. त्यांचं एखाद्या व्यक्तीवरचं एक किंवा दोन शब्दांचं भाष्य हसवतं. पण ते अचूक मूल्यमापन असतं. लेखनातही मार्मिक विनोद ठायी ठायी असतात, पण कधी कधी त्यांची चेष्टा जीवघेणी असते. त्यांची पत्नी धनवंती हर्डीकर यांचं पहिलीपासून इंग्रजी विषयात मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझा स्वतंत्र संपर्क होता. एकदा त्यांना ‘बालभारती’त भेटल्यावर हर्डीकरांचं काय चाललं आहे, असं विचारलं. त्यांच्यासमोर माझी जवळीक दाखवण्यासाठी हर्डीकरांना फोन लावला. धनवंती यांनी ऐकावा म्हणून फोन स्पीकरवर ठेवायची मला दुर्बुद्धी झाली. कौतुकानं सांगितलं की, ‘तुमच्या पत्नी यांना भेटायला आलोय.’ त्यावर टोला आला- ‘मित्राला टाळून मित्राच्या बायकोशी संपर्क साधण्याचं समाजवादी आणि बुद्धिजीवींचं कौशल्य तुझ्यात यायला लागलं तर....’ मी एकदम संकोचून गेलो. धनवंती यांनी डोक्यावर हात मारला. मी पटकन फोन बंद केला..

असा हा माणूस शेतकरी, सामान्य माणसं यांच्याशी बोलताना अगदी वेगळा असतो. एकदा आमच्या गावात त्यांना व्याख्यानाला बोलावलं. तेव्हा या माणसाला विद्वत्ता दूर ठेवून सामान्य माणसांशी बोलणं अगदी सहज जमतं, हे जाणवलं.

मला त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रं खूप खूप आवडतात. गोविंद तळवलकर, शंकर गुहा नियोगी, स्वामी अग्निवेश, वि. म. दांडेकर यांच्यावरील त्यांचे लेख मी पुन्हा पुन्हा वाचतो. त्यांची स्मरणशक्ती थक्क करून टाकते. कितीतरी वर्षांपूर्वीचे प्रसंग ते तपशीलात लिहितात. आणि त्यात केवळ आठवणी नसतात, तर वैचारिक चर्चाही असते. त्या व्यक्तीचं सामर्थ्य आणि मर्यादा असतात. त्याला माणूस म्हणून समजून घेतलेलं असतं.

हर्डीकरांची व्यक्तिचित्रं आपल्यालाही स्पष्टता देतात. स्वामी अग्निवेश यांच्याबद्दल वाचताना माझ्यातील कार्यकर्ता त्यात वाचता आला आणि कार्यकर्ते असण्यामुळे काय चुका होतात, आयुष्य कसं दिशाहीन होतं, या बाबी अधिक ठळकपणे लक्षात आल्या. मराठीत व्यक्तिचित्रं लिहिण्याची ही वेगळीच शैली आहे. हर्डीकरांची व्यक्तिचित्रं आठवणी आणि विचार यांचं संतुलित मिश्रण असतात. शरद जोशी गेल्यावरचा त्यांचा शेतकरी संघटनेवरील लेखही भेदक सर्जरी असलेला आहे.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

विनय हर्डीकर - मराठीतले जॉर्ज ऑर्वेल!

विनय हर्डीकर हा माणूस विलक्षण ‘मनस्वी’ आहे, पण ‘दुटप्पी’ आणि ‘दांभिक’ नाही!

कवि, कुछ ऐसी तान सुनाओ

गोविंदराव, आय मिस यू!

.................................................................................................................................................................

मला त्यांचा आणखी एक विशेष जाणवतो. जे रस्त्यावरील आंदोलनात जातात, त्यांना साहित्य आणि साहित्यिक हे बनचुके, फिजुल वाटायला लागतात. जे मर्ढेकर वाचतात, त्यांना शंकर गुहा नियोगीचं आकर्षण नसतं आणि नियोगीचे अनुयायी तरल कविता वाचण्याच्या फंदात पडत नाहीत. हर्डीकरांचं वैशिष्ट्य असं की, शंकर गुहा नियोगी, शरद जोशी, स्वामी अग्निवेश यांच्यासोबत राहूनही मराठी साहित्य त्यांना फिजुल, क्रांतीसाठी निरुपयोगी वाटत नाही. तितक्याच आदरानं त्यांनी मर्ढेकर समजून घेतले आणि सांगितले आहेत. प्रतिभावंत आणि समर्पित व्यक्तींविषयीचा कृतज्ञता हा त्यांचा स्थायीभाव आहे, हे जाणवतं. आणि ते नसताना जे जे दिसेल त्यावर प्रहार होत राहतात. हर्डीकरांच्या लेखन आणि व्यक्तिमत्त्वाचं हे वैशिष्ट्यच आहे.

आणखी एक जाणवतं. कार्यकर्ते कोरडे होतात. सतत रुक्ष भाषा बोलत राहतात, पण हा माणूस सतत शास्त्रीय संगीत गुणगुणत असतो. एकाच वेळी साहित्य, संगीत, कला, समीक्षा, पत्रकारिता, आंदोलनं, भटकंती, राजकारण या सर्वांत गती असणारं हे रसायन आजच्या ‘सुमारांच्या सद्दी’त (त्यांनी मराठी भाषेला देणगी दिलेला खास शब्द) केवळ आणि केवळ एकमेवाद्वितीय आहे.

माझ्यावर मागील वर्षी जीवघेणा हल्ला झाला. त्या वेळी अचानक विनय आणि विनोद शिरसाठ येऊ नका, असं सांगूनही घरी आले. खरं तर ज्यांनी शेतकरी संघटनेत गोळीबार बघितलेला आहे, त्यांच्यासाठी हा हल्ला क्षुल्लक वाटायला हवा होता, पण मित्र जपण्याची, काळजी करण्याची ही वृत्ती कायम लक्षात राहील.

.................................................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......

म. गांधी आणि डॉ. आंबेडकर हयात असते, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर त्यांचेही एकमत झाले असते, त्यांनी या निकालाचे स्वागतच केले असते...

‘अधिक मागे राहिलेल्यांना मागेच ठेवण्याचा (थोडे सक्षम झालेल्यांचा) हा डाव आहे का? आणि समजा, अजून ती वेळ आलेली नाही, तर अधिक पिछड्यांना पुढे कसे आणायचे? पाऊणशे वर्षे पुरेशी नसतील, तर आणखी किती वर्षे उपवर्गीकरण नको, की ते कधीच नको?’ या सर्व चर्चेत ‘आरक्षणाचे धोरण व मूळ उद्दिष्ट काय आणि कशासाठी’ याकडे दुर्लक्ष होते आहे. शिक्षण व सरकारी नोकऱ्या यांमध्ये मागास घटकांचे पुरेसे प्रतिनिधित्व झाले पाहिजे, हे आहे मूळ उद्दिष्ट.......

पसमंदा मुस्लिमांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे, हा केवळ विशिष्ट जमातीचा विकास नसून, भारताच्या वैविध्यपूर्ण समाजात सामावलेल्या क्षमतांना मान्यता आणि वाव देण्यासारखे आहे

विविध अभ्यासांत असे दिसून आले आहे की, एखाद्या समूहाला सामाजिक, आर्थिक विकासापासून वंचित ठेवण्यात आले, तर ते ‘जमातवादी’ किंवा ‘मूलतत्त्ववादी’ राजकारणाकडे ढकलले जातात. ‘मागासलेपणा’ आणि ‘धर्मवादी राजकारण’ यांच्यात नेहमी सहसंबंध दिसून येतो. तसे काहीसे पसमंदांचे होऊ नये, यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना करून सबलीकरण करून त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्याची, सामाजिक व राजकीय प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे.......