संघाने भाजपवर छडी उगारली आहे, मारली नाही अजून!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघप्रचारक इंद्रेश कुमार
  • Sat , 15 June 2024
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP संघ RSS मोहन भागवत Mohan Bhagwat इंद्रेश कुमार Indresh Kumar

आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि आता इंद्रेशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या ‘अहंकारी स्वभावा’बद्दल केलेल्या सूचक इशारावजा वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंध मधुर राहिलेले नाहीत, नात्यात तणाव आलेला आहे, हे आता पुरेसं उघड झालं आहे. हे संबंध ताणले गेल्याची जी चर्चा काही पत्रकारांच्या लेखना-बोलण्यात गेल्या दोन वर्षांत अनेकदा आली, त्यात तथ्य असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

‘लोकसत्ता’साठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे बीट मी अनेक वर्षं सांभाळलेलं आहे आणि त्याआधी ‘उदरनिर्वाहा’ची गरज म्हणून ‘तरुण भारत’ या दैनिकात नोकरी करताना संघाशी संबधित व्यक्ती आणि घटनांचं वृत्तसंकलन जास्तीत जास्त माझ्या वाट्याला कसं यायचं, हे याआधी अनेकदा लिहिलेलं आहे, म्हणून त्याची पुनरुक्ती करत नाही.

त्या काळात संघातील अगदी ‘व्यवस्थे’त असणाऱ्या स्वयंसेवकापासून अनेकांशी जवळचा संपर्क प्रस्थापित झाला. (त्यापैकी अजूनही अनेक संपर्कात आहेत.) त्यामुळे संघ पूर्ण कळलेला नसला, तरी संघाची कार्यपद्धती बऱ्यापैकी जवळून ठाऊक असणाऱ्या पत्रकारांपैकी आस्मादिक एक आहेत.

संघवर्तुळातून भाजपच्या पाठिंब्यावर मायावती मुख्यमंत्री होणार, मोहन भागवत सरसंघचालक होणार, इथपासून ते अनेक ‘एक्सक्लुझिव्ह’ राजकीय बातम्या मिळवण्यात त्या काळात अनेकदा यश आलेलं आहे. त्या अनुभवाच्या आधारे सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला सध्या इशारा दिला आहे, अजून खरा धडा शिकवलेला नाही, असाच मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

संघाच्या कार्यपद्धतीत बहुसंख्य वेळा थेट कृती नाही, तर सूचक इशारा दिला जात असतो आणि तो इशारा समजून घेतला गेला नाही, तर मग थेट धडा शिकवला जातो. म्हणजे आधी छडी केवळ उगारायची आणि तरी ऐकलं नाही, तर मग मारायची असा हा प्रकार आहे!

संघ हा एक ‘परिवार’ आहे आणि त्या परिवारात अनेक संस्था, संघटना काम करतात. वरवर  कितीही नाही म्हटलं, तरी भारतीय जनता पक्ष हा त्या परिवाराचा एक भाग आहेच. या परिवारात संघच सर्वोच्च स्थानी असतो. कोणत्याही सत्तेत परिवारातील कुणीही कितीही वरिष्ठ पदावर असला, तरी कुणीही संघापेक्षा मोठा (श्रेष्ठ?) नसतोच, हे लक्षात घ्या.

या मोठेपणावरून भाजप आणि संघातील संबंधात असे ताणतणाव या आधीही निर्माण झालेले आहेत, त्यांची भरपूर चर्चाही वेळोवेळी झालेली आहे. त्या प्रत्येक वेळी संघ आधी इशारा देतो आणि मगच धडा शिकवतो. 

या आधीही हिंदुत्ववादी अजेंडा आणि सत्तेची पर्वा न करता संघानं भाजपला धडा शिकवलेला आहे, असाच अनुभव आहे. दोन घटना सांगतो- पहिली घटना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाची आहे. वाजपेयी तेव्हा लोकप्रियतेच्या कळसावर होते; इतके कळसावर की, तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन त्यासमोर फिके पडले होते!

ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता यांच्या ‘एनडीटीव्ही’ या प्रकाश वृत्तवाहिनीवरील ‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात बोलताना सुदर्शन यांनी अटलबिहारी वाजपेयी ‘सुमार’ पंतप्रधान असल्याचं वक्तव्य केलं. त्याचा खरपूस समाचार तेव्हा ‘लोकसत्ता’नं घेतला होता. नंतर (आधी अनौपचारिक आहे, असं सांगितलं गेलेल्या आणि मग त्या चर्चेवर आधारित बातमी करायला हरकत नाही, असं सुचवल्या गेलेल्या) सुदर्शन यांनी वाजपेयी यांच्याविषयी जे विस्तृत मतप्रदर्शन केलं, ते ‘मळमळ’ या सदरात मोडणारं असल्याचं माझं मत झालं.

(त्या चर्चेत सहभागी होण्याचं आमंत्रण मलाही होतं) त्यावर ‘सुदर्शन यांची मळमळ’ असा अग्रलेख ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाला होता. तो वाद तेव्हा बराच गाजला. (या संदर्भात तेव्हा मी लिहिलं होतं आणि त्याचा प्रतिवाद आजवर झालेला नाही. ती हकीकत माझ्या ‘लेखणीच्या अग्रावर’ या पुस्तकात पान क्रमांक १७५वर विस्तारानं आहे.) 

त्याच काळात नागपूरला झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात व्यासपीठावर केवळ वाजपेयी होते आणि लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, मुरली मनोहर जोशी या नेत्यांना चक्क श्रोत्यांच्या रांगेत बसवण्यात आलं होतं. ‘परिवारात संघच सर्वोच्च आहे’, हाच तो इशारा होता. नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया शायनिंग’ ही प्रचार पार काळवंडवून टाकत संघपरिवार मतदानापासून लांब राहिला होता, परिणामी बहुमत न मिळाल्यानं भाजपला केंद्रीय सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.

भाजपचा निर्णय पटला नाही की संघ निवडणुकीपासून न बोलता अलिप्त राहतो, या माझ्या म्हणण्याला पुष्टी देणारी दुसरी घटना सांगतो. लोभस व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या आमच्या अटलबहादूर सिंग या उमद्या मित्रानं लढवलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे घडलं.

कट्टर राम मनोहर लोहियावादी असणारं आणि राजकारणात असूनही सुसंस्कृत, सुविद्य असणारं अटलबहादूर सिंग हे अख्ख्या नागपूरचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांची अपक्षांची एक आघाडी होती. निवडणुकीत १२/१४ नगरसेवक निवडून आणण्याची त्या आघाडीची क्षमता होती. त्या बळावर नागपूर महापालिकेचं सत्ताकारण अटलबहादूर सिंग यांनी प्रदीर्घ काळ चालवलं. तेही दोन वेळा महापौर झाले.

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि संघाची अडीच-पावणेतीन लाख मते आहेत, हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. ही अधिक अटलबहादूरसिंग यांची मते मिळवून, तेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर या लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असं वाटत असल्यानं (संघाचे तत्कालीन ‘ब्ल्यू आइड बॉय’) नितीन गडकरी यांच्या हट्टापोटी भाजपनं अटलबहादूर सिंग यांना २००४च्या निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र उमेदवार म्हणून अटलबहादूर सिंग संघाला मान्य नव्हते.

परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मतदार मतदानाला बाहेर पडलेच नाही, म्हणे त्यांना तसा आदेश नव्हता. अनेक बूथ आणि ‘पन्ना प्रमुख’ यांनी हे तेव्हा खाजगीत कबूल केलं होतं. त्या निवडणुकीत नागपूर मतदारसंघात अटलबहादूरसिंग यांचा (आणि देशात भाजपचा) दारुण पराभव झाला.

भाजपच्याच मतदारांनी अटलबहादूर सिंगचा ‘चिवडा’ केला. त्याप्रसंगी ओलावलेले अटलचे डोळे आजही आठवतात… दिल्लीत विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांच्या पराभवाच्या चर्चा ऐकल्यावर, मला अटल बहादूरसिंग यांची आठवण झाली होती. तेव्हाही नेमकं असंच घडलेलं होतं. हे या आधी लिहिलेलं आहे आणि त्याचा साधाही प्रतिवाद तेव्हा झालेला नव्हता, कारण तसा तो करण्याची संघाची कार्यशैली नाही. कर्कश प्रतिवादाचं पर्व सुरू झालं, ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर. ‘ट्रोल्स’च्या असंख्य टोळ्याच सोशल मीडियावर मग जन्माला घातल्या गेल्या.

आता जे इशारे मोहन भागवत आणि इंद्रेशकुमार यांनी दिले आहेत, तो संघाच्या कार्यशैलीचा एक भाग आहे. गेल्या दोन वर्षांपासून संघ आणि भाजप यांच्या संबंधात ताण निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत, म्हणजे मोदी-शहा संघाचं वर्चस्व झुगारू पाहत आहेत किंवा ते संघाला जुमानत नाहीत (मीही या स्तंभात त्या संदर्भात एकदा सूचन केलेलं होतं!) आणि त्या  इशाऱ्यांची दखल भाजप म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतली नाही.

उलट ‘संघाच्या पाठिंब्याची आता गरज नाही’, संघटन सचिव पदावरून स्वयंसेवकाला हाटवण्याचा निर्णय, निष्ठावंतांना निवडणुकीत डावलणं, राममंदिर निर्मितीचं श्रेय घेणं, अशा संघाला आव्हान देणाऱ्या निर्णयांची त्यात भरच पडली. म्हणूनच संघांनं डोळे वटारले, परिणामी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या केवळ तीन राज्यांत लोकसभा निवडणुकीत २०१९च्या तुलनेत २०२४मध्ये भाजपला तब्बल ५९ जागा कमी मिळाल्या आणि बहुमत गमावण्याची नामुष्की या पक्षावर आली.

सत्ता आली, पण त्यासाठी एनडीएतील अन्य पक्षांचा टेकू भाजपला घ्यावा लागला. स्वत:ला ‘ईश्वरा’चा अंश म्हणवून घेण्याची मजल मारणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा ‘ईश्वर’ संघ आहे, हेही संघांनं दाखवून दिलं आहे. 

महाराष्ट्रात तर भाजपच्या जागा अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाल्या. संघाच्या मुखपत्रानं त्याचं खापर अजित पवार यांच्या (महा)राष्ट्रवादीवर फोडलेलं असलं, तरी तेच एकमेव कारण नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडल्यामुळे जनमानसात व पक्षातही असणाऱ्या नाराजीवर अनेकदा बोललं आणि लिहिलं गेलं, पण भाजप (पक्षी : अमित शहा यांच्या वरदहस्तामुळे देवेंद्र फडणवीस) त्याकडे साफ दुर्लक्ष करत मनमानी केली.

या मनमानीचं उत्तम उदाहरण संघ आणि भाजप कार्यकर्त्यांचा विरोध डावलून अमरावतीची जागा नवनीत राणा यांना देणं. देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भात केवळ नागपूर आणि अकोला मतदार संघात विजय मिळाला त्यात नागपूरचा विजय नितीन गडकरी यांचा आहे. ‘आम्ही भाजपला नाही, तर गडकरी यांना मतदान केलं,’ असं सांगणारे नुकत्याच झालेल्या नागपूर चकरेत ‘पायलीला पन्नास’ भेटले!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या चंद्रपुरातही भाजपला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. बाय द वे, शेतकऱ्यांची नाराजी, जरांगे फॅक्टरसोबतच जातीयवादी ध्रुवीकरणही मोठ्या प्रमाणात झालं. ते सर्वच पक्ष आणि नेत्यांनी केलं, पण त्याच खापर एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडलं जाणं, म्हणजे ताकाला जाताना भांडं लपवण्यासारखं आहे, पण ते असो, तो काही आजचा विषय नव्हे.

महायुतीला धक्का देणारी लोकसभा निवडणूक संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीत तर आत्तापासूनच भांड्याला भांडं लागल्याचे आवाज सुरू झाले आहेत. संघानं दिलेला इशारा लक्षात घेऊन महायुतीला आणि त्यातही विशेषत: भाजपला (पक्षी : अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस) फारच सावध पावलं टाकावी लागणार आहेत. सत्तेसाठी वाट्टेल तशा कोलांटउड्या मारताना मिळालेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, तर संघ उगारलेल्या ‘छडी’चा ‘प्रहार’ केल्याशिवाय राहणार नाही.

थोडक्यात, ताकही फुंकून पिण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांवर आलेली आहे, हाही मोहन भागवत आणि आता इंद्रेशकुमार यांनी दिलेल्या इशाऱ्याचा आणखी एक अर्थ आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......