भाजपचे ‘अनैतिक उद्योग’ त्या पक्षालाच अधिक प्रमाणात विघातक ठरले, हे या निकालातून स्पष्ट झाले. स्वतःच्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड हाणून घेणे, ही म्हण भाजपला पूर्णपणे लागू पडते
पडघम - राज्यकारण
हरिहर सारंग
  • महाराष्ट्राचा नकाशा आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या पक्षांची बोधचिन्हे
  • Mon , 10 June 2024
  • पडघम राज्यकारण शिवसेना Shvsena एकनाथ शिंदे Eknath Shinde राष्ट्रवादी NCP शरद पवार Sharad Pawar अजित पवार Ajit Pawar भाजप ‌‌BJP काँग्रेस Congress उद्धव ठाकरे Uddhav Thackeray

भाजपने भ्रष्ट मार्गाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम केले, याबाबत जनतेला शंका नव्हती. आणि त्याचे फळही त्यांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले आहे. या फोडाफोडीमुळे फुटलेल्या दोन्हीही पक्षांचे मोठे नुकसान होऊन त्याचा आपल्या पक्षाचा फायदा होणे भाजपला अपेक्षित होते. आणि त्यासाठीच हे सगळे अनैतिक उद्योग करण्याची भाजपला गरज पडली होती. परंतू या पक्षांचे नुकसान करता करता भाजपने आपलेही थोडे अधिकच नुकसान करून घेतले.

२०१९च्या निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवून २३ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या २५  जागांचे मताधिक्य २८.८ टक्के एवढे होते. या वेळी २८ जागा लढूनही त्यांना अवघ्या ९ जागा मिळाल्या. गेल्या वेळेपेक्षा ३ जागा अधिक लढवूनही त्यांचे मताधिक्य २६.२पर्यंत घसरले. या वेळी २०१९ची स्थिती कायम राहिली असती, तर हे मताधिक्य २८ जागांसाठी ३१.१४ टक्क्यांपर्यंत वाढायला हवे होते.

त्यांना या वेळी शिवसेनेची मोठ्या संख्येतील मते पडली नसावीत, असे म्हणण्याला जागा आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना मताची ही घट भरून काढू शकली नाही, असाही त्याचा अर्थ करता येतो. शिंदे यांना त्यांच्या ठाणे, कल्याण या प्रभावक्षेत्राच्या बाहेर शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांवर फारसा प्रभाव टाकता आला नाही. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे नेते बरोबर असूनही भाजपला त्यांचा विशेष फायदा झाला नाही.

अजित पवार तर या फुटीनंतर स्वतःच्या मतदारसंघातही आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत. त्यामुळे भाजपला त्यांचा इतरत्र फायदा होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. त्यासोबतच अनेक कारणांसाठी भाजपवर नाराज असलेल्या काठावरील मतदारांनीही भाजपला सोडले असावे. शरद पवारांचे खच्चीकरण करणे हाही अजित पवारांना फोडण्याचा उद्देश असावा. परंतु भाजपचा हा उद्देशही पूर्ण होऊ शकला नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे. उलट या निवडणुकीच्या निकालाने शरद पवारांचा प्रभाव मात्र निर्विवादपणे सिद्ध झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या फाटाफुटीत एकनाथ शिंदे यांचा मात्र फायदाच झाल्याचे आता दिसून येत आहे. भाजपबरोबर गेल्यामुळे त्यांना सुरक्षितता मिळाली, असे बोलले जाते. त्याशिवाय त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्यास मिळाले. ठाकरे यांचे राजकीय नुकसान करण्याचा जो उद्देश या फुटीमागे होता, तोही बराचसा पूर्ण झाला. या बरोबरच त्यांना या निवडणुकीत  स्वतःचे  राजकीय यशही प्राप्त करता आले.

शिंदे गट आणि ठाकरे गट हे एकूण १३ जागांवर एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यापैकी शिंदे गट ठाकरे गटाच्या विरुद्ध ७ ठिकाणी जिंकलेला आहे. ठाकरे गटाला मात्र शिंदे गटाच्या फक्त  ६ उमेदवारांविरूद्ध विजय मिळवता आला. सरासरीच्या बाबतीतही शिंदे काही प्रमाणात  वरचढ ठरले, हेही स्पष्टपणे दिसून येते. शिंदे गटाने १५ जागा लढवून ७ जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गटाला मात्र ९ जागा जिंकण्यासाठी २१ जागा लढाव्या लागल्या.

या निवडणुकीत शिंदेंचे एकूण मताधिक्य १२.९ टक्के असून, ठाकरे यांचे १६.७ टक्के एवढे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. परंतु ठाकरे यांनी शिंदे गटापेक्षा ६ जागा अधिक लढवल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा प्रत्येक जागेमागे सरासरी मताधिक्य ठाकरे यांच्यापेक्षा अधिक आहे. नेमके सांगायचे झाल्यास, शिंदे आणि ठाकरे गटांना अनुक्रमे ०.८६ टक्के आणि ०.७९ टक्के एवढे आहे. यावरून शिंदे यांचे यश ठाकरे यांच्यापेक्षा थोड्या प्रमाणात का होईना, सरस असल्याचे दिसून येते.

शिंदे गटाच्या या यशाची मीमांसा पुढीलप्रमाणे करता येणे शक्य आहे, असे वाटते. एकनाथ शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रातील मतदारसंघात त्यांची स्वतःची तर मते होतीच, पण तिथे भाजपच्या पारंपरिक मतदारांनीही त्यांना साथ दिली. त्यामुळे शिंदे यांच्या ठाणे, कल्याण येथील उमेदवारांना भरघोस मते मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. इतर मतदारसंघांत काही अपवाद वगळता, त्यांचा विशेष प्रभाव नव्हता.

असे जरी असले, तरी त्यांच्या उमेदवारांना भाजपच्या मतदारांची चांगलीच साथ मिळाली. त्यामुळे त्यांचे मताधिक्य उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वाढले. त्यामुळे कमी जागा लढवूनही त्यांना अधिक जागा जिंकता आल्या. काही ठिकाणी शिंदे यांचा शिवसेना म्हणून फारसा प्रभाव नसला, तरी बारणेसारखे स्थानिक नेते अधिक प्रभावी होते. त्यांनी स्वतःच्या मतदारांसहित भाजपच्या मतदारांच्या मदतीने आपले विजय मिळवले.

स्थानिक नेतृत्वाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच या स्थानिक नेत्यांना आपला प्रभाव निर्माण करता आला, हे मात्र विसरता येत नाही. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना मोठ्या उदारपणे अर्थपूर्ण मदत केल्याचेही बोलले जाते. शिंदे यांची संघटनकुशलता, सामान्य कार्यकर्त्यांशीही मानवी स्पर्श असलेले अर्थपूर्ण संबंध, आपले नेते, कार्यकर्ते यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्याची वृत्ती, या गुणांमुळे त्यांनी नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर आपला प्रभाव निर्माण केलेला आहे. त्यामुळे अशा नेते आणि कार्यकर्ते यांचे आपल्या पक्षप्रमुखाशी हितसंबंध निर्माण झालेले असावेत. मग या हितसंबंधी गटांनी आपल्या मुख्य नेत्याला जीव तोडून मदत करणे स्वाभाविक होते.

अशा अनेक कारणांमुळे खोके आणि गद्दारीचा शिक्का बसूनही एकनाथ शिंदे यांना लक्षणीय यश प्राप्त करता आलेले आहे. तथाकथित खोके आणि गद्दारी याबद्दल मतदारांना, आपले मत नाकारण्याइतके काही आक्षेपार्ह वाटत होते काय, हाही प्रश्न या निवडणुकीनंतर आपल्याला पडतो.

पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा खरा फायदा काँग्रेसला झालेला आहे. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसने २५ जागा लढवूनही त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्या वेळी त्यांचे मताधिक्य होचे १६.४ टक्के. या वेळी काँग्रेसने एकूण १७ जागा लढवून तब्बल १३ जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळेपेक्षा ८ जागा कमी लढवूनही त्यांचे मताधिक्य १६.९ टक्के एवढेच राहिले आहे. यावरून काँग्रेसचे यश अतिशय अद्भुत राहिलेले आहे.

या पक्षाच्या यशाची कारणे आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील. या निवडणुकीत काँग्रेसचा पारंपरिक मतदार तर बरोबर राहिलाच, पण शरद पवार आणि ठाकरे यांनीही आपले मतदार प्रामाणिकपणे काँग्रेसकडे वळवले. त्याबरोबरच ठाकरे यांनी मोदींना थेट अंगावर घेऊन मोदीविरुद्धच्या जनतेच्या असंतोषाला वाट करून दिली. त्याबरोबरच आरक्षण आंदोलनामुळे मराठा समाज; भाजपच्या मुस्लीमद्वेषाच्या राजकारणामुळे मुस्लीम समाज; घटनाबदलाच्या संशयामुळे दलित समाज आणि शेतकरीविरोधी निर्णयामुळे शेतकरी हे भाजपच्या विरुद्ध आणि काँग्रेसच्या बाजूने गेली.

याशिवाय भाजपने जे फोडाफोडीचे, तपाससंस्थांद्वारा विरोधकांवर दहशत निर्माण करण्याचे आणि बऱ्याच प्रमाणात सुडाचे जे राजकारण केले, तेही लोकांना आवडले नसावे. भ्रष्टाचारी नेते जेव्हा भाजपच्या वळचणीला जातात, तेव्हा ते सुरक्षित होतात, हे जनतेने उघडपणे पाहिले होते. भाजपच्या दृष्टीने भ्रष्टाचार या मुद्द्याला किती महत्त्व आहे, हेही जनतेला समजले.

मोदी यांचा तथाकथित प्रभाव तर महाराष्ट्रात क्वचितच दिसून आला. ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारामुळे हे सर्व मुद्दे टोकदारपणे जनतेच्या प्रत्ययाला आणण्याचे काम केले. खरे तर याचा फायदा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना व्हायला पाहिजे होता. आणि असा फायदा दोन्ही काँग्रेसला झालाही. परंतु ठाकरे यांना मात्र तो म्हणावा तेवढा झाला नाही. (त्याची कारणे पुढे सांगितलेली आहेत.) 

महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या घटनेमुळे काँग्रेसचा कोणताही तोटा झालेला नाही. कारण या फुटीचा कोणताही परिणाम काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवर होण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु या पक्षफुटीमुळे काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती प्रचाराचा मात्र फायदा करून घेता आला. आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनीही काँग्रेसच्या पारड्यात आपली मते टाकली.

शिवसेनेतील फुटीचा अप्रत्यक्ष फायदा शरद पवारांच्या पक्षालाही झाला, परंतु त्यांच्या स्वतःच्याच पक्षातील फुटीमुळे त्यांचेही नुकसान झालेच होते. परंतु त्यांच्या मुत्सद्दीपणाने त्यांना हे नुकसान आटोक्यात ठेवण्यात यश मिळवता आले.

अनेक वर्षांचा राजकीय अनुभव, लोकांशी असलेला सततचा संपर्क आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले अनेक निर्णय  यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मनात त्यांचे विशिष्ट स्थान निर्माण झालेले आहे. आणि आपल्या सततच्या प्रयत्नांमधून त्यांनी हे स्थान टिकवून ठेवलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या या प्रभावामुळे अजित पवारही त्यांच्या मतदारांत फारशी फुट करू शकले नाहीत. त्यामुळेही त्यांनी केवळ १० जागा लढवूनही  ८ जागांवर विजय मिळवण्यात यश प्राप्त केले.

२०१९ मध्ये त्यांनी १९ जागा लढवून फक्त ४ जागांवर विजय मिळवला होता. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही निवडून आणण्यात ते यशस्वी झाले होते. त्या वेळी त्यांच्या पक्षाचे मताधिक्य १५.७ टक्के एवढे होता. या वेळी केवळ १० म्हणजे गेल्या वेळेच्या अर्ध्या जागा लढूनही त्यांचे मताधिक्य १०.३ टक्क्यांपर्यंत राहिले आहे. प्रत्येक जागेची सरासरी काढली, तर ती २०१९ या वर्षी ०.७९ टक्के येतो. या वर्षीच्या निवडणुकीत ती १.०३ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते. 

ठाकरे यांच्या पक्षातील फुटीमुळे त्यांच्याकडील शिवसेना, शरद पवारांच्या पुढाकाराने, काँग्रेसच्या गटात जाण्याची अभूतपूर्व घटना घडून आली. परंतु  त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बाजूचे मतदार आणि भाजपचे मतदार स्वाभाविकपणे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरुद्ध गेले. ठाकरे यांच्या मतांतील ही घट सहजपणे भरून येण्यासारखी नव्हती.  

एकंदरीत भाजपच्या पक्ष फोडण्याच्या कृत्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठ्या दारूण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. या फुटीमुळे त्यांची परिस्थिती प्रारंभी अत्यंत दयनीय झाली होती. त्यांच्याकडील बहुसंख्य आमदार, खासदार आणि त्याचे कार्यकर्ते यांनी ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यांच्या पारंपारिक मतदारांतही फूट पडली. मोठ्या संख्येत कार्यकर्ते दूर गेले आणि संघटन शक्तिहीन झाले.

उद्धव ठाकरे यांनी क्षेत्रीय नेत्यांशी संपर्क ठेवला असेल, परंतु त्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या संघटना आणि कार्यकर्ते यांच्याशी फारसा संपर्क ठेवता आला नव्हता. त्यामुळे शिंदे यांनी या नेते आणि कार्यकर्त्यांना सहजपणे आपल्याबरोबर घेतले. आणि शिंदेंच्या बाजूचे हे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेचे पारंपरिक मतदार आपल्या सोबत घेण्यात यशस्वी झाले असावेत. भाजपवर नाराज असणाऱ्या काठावरील मतदारांनाही ठाकरे यांच्यापेक्षा शिंदे यांचा पर्याय स्वीकारार्ह वाटला की काय, असेही वाटून जाते. 

निवडणूक आयोगाने तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे  नाव आणि चिन्हही काढून घेतले. ठाकरे यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार होता.  अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांचे नव्याने संघटन बनवून लढायला तयार व्हावे लागले. त्यांना दोन्ही काँग्रेसने बऱ्यापैकी मदत केली, एवढीच त्यांची जमेची बाजू ठरली. परंतु ठाकरे यांना या निवडणुकीत  १२ ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे. कारण भाजपच्या मतदारांसाहित त्यांच्या पारंपारिक मतांतील घट दोन्हीही काँग्रेसना भरून काढता आली नाही.

शिवसेना आणि भाजपचे जे पारंपरिक मतदारसंघ आहेत, तिथे या दोन्हीही काँग्रेसचा विशेष प्रभाव नसल्यामुळे हे झाले असावे. तसेच विरोधकांच्या आर्थिक ताकदीपुढे ठाकरे यांचा निभाव लागणेही शक्य नव्हते. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही ९ उमेदवार निवडून आणण्याची त्यांची कर्तबगारी दृष्टीआड करता येणार नाही. मुंबई उत्तर पश्चिम आणि हातकणंगले या दोन जागा फार थोड्या फरकानेच गमवाव्या लागल्या, हेही लक्षात घेतले पाहिजे.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे ठाकरे यांचे झालेले नुकसान भरून काढण्याचा त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने जोरदार प्रयत्न केला. आणि त्यांना त्यात लक्षणीय प्रमाणात यशही मिळाले. जनतेची थोडी फार सहानुभूतीही त्यांच्या बाजूने होती, हेही नाकारण्यात अर्थ नाही. तरीही उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मतांतील घट भरून काढणे शक्य झाले नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या यशाला मर्यादा पडली असण्याची शक्यता आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

अजित पवार यांच्याबाबतीत काय बोलणार! ऐनवेळी बंडखोरी करून आपल्या आजारी आणि वृद्ध चुलत्याला धोका देणे जनतेला आवडणे शक्यच नव्हते. असा धोका देण्याचे कोणतेही कारण त्यांना शेवटपर्यंत सांगता आले नाही. उलट लोकांनीच काय समजायचे, ते समजून घेतले.

त्याशिवाय शरद पवारांसारख्या अनुभवी आणि मुत्सद्दी नेत्याला टक्कर देणे मुळातच  सोपे नाही, हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आले होते, असे वाटत नाही. त्यांची एक जागा आली, तीही सुनील तटकरे यांच्या वैयक्तिक प्रभावामुळे. एकूण या गाजलेल्या बंडातून अजित पवार यांच्या हाताला काहीही लागले नाही. उलट त्यांचे अभूतपूर्व राजकीय नुकसान मात्र झाले. त्यांचे मताधिक्य ३.६ टक्के एवढा कमी असल्याचे दिसून आले.

तर भाजपचे ‘अनैतिक उद्योग’ त्या पक्षालाच अधिक प्रमाणात विघातक ठरले, हे या निकालातून स्पष्ट झाले. स्वतःच्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड हाणून घेणे, ही म्हण भाजपला पूर्णपणे लागू पडते.

.................................................................................................................................................................

लेखिक हरिहर सारंग माजी राज्यकर उपायुक्त आहेत.

harihar.sarang@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......