तरुण पत्रकार हिनाकौसर खान यांचा ‘इज्तिहाद : जगण्याच्या सम्यक शोधात मुस्लीम’ हा लेखसंग्रह नुकताच पुण्याच्या हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाला परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मार्क्सवादी विचारांचे अभ्यासक दत्ता देसाई यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…
.................................................................................................................................................................
‘इज्तिहाद’चा एक अर्थ आहे, प्रयत्न करणं. दुसरा अर्थ, विचार करून व शोध घेऊन मत बनवणं. याचा आणखी एक अर्थ आहे; नवेपणा, नवी निर्मिती. धर्मशास्त्रानुसार शरियाच्या आदेशाशी जोडलेल्या या शब्दाच्या अर्थामध्ये आत्ता न जाता हे अर्थ लक्षात घेतले, तर जे काय दिसतं, ते म्हणजे हे पुस्तक. आपले साचेबद्ध समज आणि चाकोरीबद्ध उत्तरे बदलतील, अशा लेखांचा हा छोटेखानी संग्रह, पण मोठ्या आशा जागवणारा! हिनाकौसर खान या तरुण पत्रकार-सामाजिक अभ्यासकर्तीने दै. ‘लोकसत्ता’च्या स्तंभामध्ये लिहिलेल्या लेखांचा संग्रह. प्रयत्न करणं, विचार करून व शोध घेऊन मत बनवणं आणि नवेपणा धुंडाळणं या ‘इज्तिहाद’च्या अर्थांचं प्रत्यंतर देणारा संग्रह.
हे पुस्तक मुख्यत: मुस्लीम समाजाविषयी आहे, पण ते फक्त तेवढंच नाही. त्याचा मुख्य रोख हा दीर्घ काळापासून पसरलेलं विष, गैरसमजुती आणि अविश्वास दूर करण्यासाठी, संवाद करण्याचा आहे. यातील ‘संवाद’ हे मुख्य सूत्र, मात्र लेखिकेने तो पुरेशा स्पष्ट भूमिका घेत मोकळेपणाने केला आहे. एकांगीपणा न करता एक संतुलीत दृष्टी विकसित व्हावी, यासाठीचा हा संवाद आहे.
मुस्लीम समाज, मुस्लिमांच्या रंगवल्या जाणाऱ्या प्रतिमा, त्यांची अवस्था, मुस्लीम समूहांच्या चिंता आणि त्याच वेळी त्यांच्यातील क्षमता, त्यांच्यात घडत असलेले बदल आणि त्यांच्यातील चिवट जीवनेच्छा व संघर्षशीलता हा या पुस्तकाचा गाभा आहे. मात्र मुस्लीम या विशिष्ट समूहावर प्रकाश टाकणारा हा लेखसंग्रह त्यापलीकडे अस्तित्वात असणाऱ्या अन्य समाजांना लागू होणाऱ्या काही सार्वत्रिक मुद्द्यांकडेही निर्देश करतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
एक म्हणजे, त्यातून सर्वच अल्पसंख्याक, सीमांतीकरण होणाऱ्या आणि असुरक्षित समाजांविषयी नव्याने विचार करण्यासाठी वाचकाला हा लेख-संवाद मदत करतो. मुस्लीम समाजाच्या ‘अल्पसंख्याक’पणाशी जोडलेले अनेक आयाम आणि पदर पुढे आणताना, तो सर्वच अल्पसंख्याक समाजांविषयी विचार करण्याला काहीएक दृष्टी देतो.
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक इथल्या बहुसंख्य समाजाविषयीदेखील आहे. काहींना हे प्रथमदर्शनी पटकन पटणार नाही, पण हे पुस्तक जे बहुसंख्याक वा हिंदू आहेत, त्यांना आरसा दाखवणारं ठरतं. म्हणजेच, एका अर्थी ते खुद्द हिंदूंविषयीही बोलतं. हिंदू स्वत:कडे आणि मुस्लीमांकडे कसं पाहतात, त्यातील बरेचसे हिंदू, अशा ‘इतरां’विषयी चुकीचे ग्रह बाळगताना, स्वत:विषयीही कोणत्या चुकीच्या कल्पना जोपासतात. हिंदुत्ववादी समजेतून इतर समूहांना ‘दानव’ म्हणून उभं करताना आणि मानव म्हणून त्यांचं अवमूल्यन करताना ते स्वत:चंही अवमानवीकरण (डिह्युमनाझेशन) कसं करतात, याचंही भान या लेखांमुळे येतं.
तिरस्कार आणि द्वेष हे शस्त्र नुसतंच दुधारी नसतं, तर ते दोन्ही टोकांनी आणि उत्तरोत्तर अधिक तीव्रपणे कार्यरत होत असतं. हे असं शस्त्र असतं की, जे समोरच्या व्यक्तीच्या पोटात खुपसलं जात असताना त्याचं विरुद्ध बाजूचं टोक त्या खुद्द खुपसणाऱ्याच्याच पोटात घुसू शकतं! जी संवेदनहीनता, जो द्वेष आणि जी हिंसकता ‘तिऱ्हाईतां’विषयी, आपल्या समूहाबाहेरच्यांविषयी वाढवली जाते, ते विष स्वत:मध्ये, स्वत:च्या कुटुंबांमध्ये आणि समूहांमध्येही कसं आणि केव्हा पसरत गेलं समजतदेखील नाही. मुस्लीमद्वेष करता करता तो करणारे हिंदू स्वत:तच एकंदर द्वेषवृत्ती वाढवत नेताहेत. या लेखांमधील चर्चा वाचकाला याचं भान देत जाते.
तिसरं म्हणजे, हे लेख भारत आणि भारतीयतेविषयीही आहेत. हा देश आणि याची वैशिष्ट्यपूर्णता सांगणाऱ्या कल्पना काय आहेत, त्या काय मानल्या जाताहेत आणि त्या काय असायला हव्यात, याबद्दल हे लेख आपल्याला विचारासाठी अनेक मुद्दे देतात, आपल्या मनात प्रश्न उपस्थित करत जातात.
चौथं म्हणजे, आपल्या देशातील हे चित्र पाहताना त्याचा देशाबाहेरील व्यापक जागतिक पटाशी असलेले संबंध विसरता येत नाहीत. गेली काही दशकं जगात धर्माधिष्ठित सांस्कृतिक कल्पनांच्या आधारे ‘क्लॅश ऑफ सिविलायझेशन्स’ (महासंस्कृतींचा संघर्ष) छापाची मांडणी केली जात आहे. त्याआधारे जे भूराजकीय आणि भूसामरिक राजकारण केलं जात आहे, ते अतीव भीषण आहे. अफगाणिस्तानपासून पॅलेस्टाईनपर्यंत पश्चिम आशियाला रणक्षेत्र बनवलं गेलं आहे.
‘क्लॅश ऑफ सिविलायझेशन्स’च्या व्यूहनीतीमध्ये जागतिक पातळीवर ‘इस्लाम’ हा अन्य धर्म व संस्कृतींचा शत्रू कल्पिला गेला आहे. यात पश्चिम आशियातील खनिज तेलसाठ्यांवरील वर्चस्वाच्या मुद्द्याबरोबरच एकंदर जागतिक वर्चस्वासाठीचा प्रश्नही गुंतला आहे. मात्र, आधी जागतिक भांडवलशाहीला तगण्या-विस्तारण्यासाठी शत्रू असलेला समाजवाद कोसळल्यानंतर नवा शत्रू हवा होता. तो इस्लाम आणि दहशतवाद हा ठरवला गेला!
तशी जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक सांस्कृतिक-राजकीय कथने गिरवणे व विस्तारणे सुरू झाले. प्रत्यक्षात विविध दहशतवादांची निर्मिती होत राहिली, मात्र त्यात कथित इस्लामी मूलतत्त्ववाद व दहशतवाद याविषयीची कथनं ‘अधिकृत’ व ‘समाजमान्य’ केली गेली. यातून ज्या व्यूहरचना अंगिकारल्या जात आहेत, त्यांचा आणि त्यातून उद्भवलेल्या व्यापक चिंतांचा संदर्भ भारतीय-मराठी वाचकांनी ध्यानात ठेवणं गरजेचं ठरतं.
आणि पाचवं, अर्थातच विविधता आणि मानवता याविषयीचे; तसेच त्यांच्या भवितव्याविषयीचे प्रश्न व चिंता हे पुस्तक आपल्या मनात उभं करतं. मात्र ते तेवढ्यावर थांबत नाही, तर आजच्या प्राप्त परिस्थितीत न डगमगता, विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि या अनेकविध चिंतांमधून मुक्त होण्यासाठी कोणती पावले आपण टाकू शकतो, याचीही चर्चा पुस्तकात जागोजागी येत जाते.
पुस्तकात अनेक लेखांमधून प्रतिमा निर्मितीच्या राजकारणाचं विश्लेषण येतं जे आज अत्यावश्यक आहे. धार्मिक-जमातवादाने उभ्या केलेल्या आव्हानांचा तो प्रारंभबिंदू आहे. मुस्लीम पुरुष हे आक्रमक, हिंसक, क्रूर, गुन्हेगारी वृत्तीचे वगैरे आणि मुस्लीम महिला या केवळ दु:खीकष्टी, पीडित, दडपलेल्या, दयनीय वगैरे वगैरे.
म्हणजे माणूस म्हणून जणू हे स्त्री-पुरुष काही नाहीतच, त्यांच्या जगण्याला जणू अन्य सारे मानवी-सामाजिक आयाम नाहीतच! त्यांच्यात चांगलं जगण्याची धडपड, आत्मविश्वास, हिंमत हे जणू काही अस्तित्वातच नाही! मुस्लिमांची लोकसंख्या वाढेल आणि ते भारतात वर्चस्व प्रस्थापित करतील, ते फुटीरतावाद वा दहशतवाद जोपासतात, हेही असेच गैरसमज!
या व अशा अनेक गैरसमजांवर आधारित वेगवेगळी कथनं कशी पसरताहेत आणि पसरवली जाताहेत? अल्पसंख्य समाज आणि खास करून मुस्लीम समूह, त्यातील बायाबापड्याच नव्हे, पुरूषही आणि केवळ तरुण-तरुणीच नव्हे, तर लहान लेकरंदेखील ज्या भयानं भरलेल्या वातावरणात कोंडले गेले आहेत, त्याची बाकी, विशेषत: बहुसंख्य समाजातील बहुतेकांना कल्पना तरी आहे का? व्यंगचित्रांपासून माध्यमांपर्यंत आणि घराघरांत व लोकमानसात.
हे सारं विविध क्षेत्रांत, जी सार्वजनिक मानलेली आहेत आणि जिथे वस्तुनिष्ठ विचार केला जातो असं मानलं जातं, अशा सर्व क्षेत्रांमध्ये एकांगीपणा कसा ओतप्रोत भरून राहिलेला आहे, याचं चित्रण कशा रितीनं केलं जातं वा केलंच जात नाही, आणि प्रसिद्धी नेमकी कशाला दिली जाते, वृत्तपत्र आणि माध्यम क्षेत्रातही मुस्लीम व्यक्तीला व खास करून मुस्लीम स्त्रीला कोणत्या समजांसह वागवलं जातं आणि कसं ‘अडवलं’ जातं? अशा अनेक मुद्द्यांची या लेखांमधून येणारी चर्चा आम वाचकाला नक्कीच नवी दृष्टी देणारी ठरते.
आपल्या सर्वांसमोर आज अनेक अरिष्टं आणि संकटं उभी आहेत. अगदी ‘भारत महासत्ता बनतोय’ आणि खरंच ‘अच्छे दिन’ आलेत, असे मानणारेही चिंतामुक्त नाहीत! त्यांना राष्ट्र आणि हिंदू धर्म संकटात आहे, या भयगंडानं पछाडलेलं आहे! बहुसंख्याकांना अल्पसंख्याक आपल्यावर वर्चस्व प्रस्थापित करतील, या भयगंडाने ग्रासलं आहे! तर अल्पसंख्याक समाजांना जी असुरक्षितता आणि जे भय अनुभवाला येतंय, त्याचंही रूपांतर ‘तो तो धर्म वा ती ती जात खतरें में’मध्ये केलं जातंय. या घोषणा देण्यामध्ये, अर्थातच; सर्वच धर्मांमधले पुरुषसत्तेसह सत्ताधारी व वर्चस्वशाली वर्ग-जाती गट हेच आघाडीवर असतात.
ही असुरक्षितता आणि हे भय ज्यातून येतं, ते राजकारण आणि ती लोकशाही, ते अर्थकारण आणि तो विकास, ते सामाजिक जीवन आणि निसर्ग व पर्यावरण हेही धोक्यात आहे, याकडं हे सारे बहुसंख्य-अल्पसंख्य जमातवादी लक्ष देऊ इच्छित नाहीत. त्याकडं ते लोकांचं (निदान ‘आपापल्या’ तरी!) लक्ष वेधत नाहीत. उलट या साऱ्याकडे लक्ष वेधणारे आणि ही परिस्थिती सुधारू पाहणारे गट-चळवळी-प्रवाह हेच एका अर्थी सर्व जमातवाद्यांकडून आज ‘अल्पसंख्याक’ बनवले गेले आहेत!
या संदर्भात आज आपल्यासमोर काही गंभीर प्रश्न उभे आहेत. देशात आणि जगात सारं काही कुंठित-तुंबलेलं आहे का? समाजामध्ये सारं काही ठप्प आणि घट्ट गोठलेलं आहे की, नुसतंच अस्थिर आणि गोंधळवून टाकण्याइतकं वेगवान आहे? आपण स्थिर बुद्धीनं विचार करू शकत आहोत की, आपण आणखीनच विमनस्क, हरवलेले आहोत?
सारे समूह, सभोवतालची माणसं जुन्या, चाकोरीबद्ध समजांमध्ये अडकलेली आहेत, की नवं स्वीकारत चालली आहेत की, तसं करतानाही त्यातील काही नव्या गैरसमजांमध्ये गुरफटत निघाली आहेत? मुक्त अर्थव्यवस्था आणि विश्व खुली करणारी तंत्रज्ञाने यांच्या नव्या झंझावाती युगात आपण आजही पूर्वग्रहांनी भारलेलोच आहोत की, खुल्या मनानं जगाकडे पाहतो आहोत? वेगवेगळ्या समूहांच्या मानसिकतेमध्ये काय बदल दिसताहेत? त्यांची आपण नोंद तरी घेतो आहोत का? विविध धार्मिक-जातीय समूहांना यातून काय ‘दिसतं’ आहे, काय काय ‘बघावं’ लागतं आहे? स्त्रियांना आणि दडपलेल्या विभागांना यातून काय भोगावं लागतं आहे?
हे आहेत ‘नव्या भारता’समोरचे प्रश्न! अशा प्रश्नांना पुढे नेणारे आणखीही प्रश्न निघतील. उदाहरणार्थ, या ‘नव्या’मुळे आपण व्यक्ती, समूह आणि देश म्हणून अधिक विघटित-विखंडित, अस्थिर, असुरक्षित आणि विक्षुब्ध झालो आहोत का? आणि तरीही, आपल्यात आणि आपल्या सभोवताली बदलाच्या, मुक्तीच्या कोणत्या प्रक्रिया आकार घेताहेत, कोणत्या नव्या शक्यता दिसताहेत? अशा प्रश्नांची माळ उलगडत आणखीही पुढं जाता येऊ शकते.
प्रस्तुत पुस्तकातील लेख हे वर उपस्थित केलेल्या प्रश्नांचे भान देतात, त्याची चाकोरीपलीकडे जाणारी उत्तरे शोधायला काहीएक मदत करतात. ते साचेबद्ध प्रतिमांच्या पलीकडे जायला तर भाग पाडतातच, पण मुस्लीम समाज, युवापिढी आणि स्त्रिया यांच्यामध्ये होत आलेल्या बदलांना सामोरं जायला वाचकांना मदत करतात.
उदाहरणार्थ, मुस्लीम महिला-मुली त्यांच्यावरील बंधनांना छेद देऊन स्वातंत्र्य मिळवण्याचे जसे प्रयत्न करताहेत, तसंच बंधनांचा आधार घेऊन स्वातंत्र्यासाठीचा अवकाशही त्या शोधताहेत. त्या हे कसे करताहेत हे पाहिल्यास प्राप्त परिस्थितीत समतेकडं, काहीएका ‘बेहतर जिंदगी’कडे जाण्यासाठी, जमेल त्या स्वरूपात त्या जे छोटे-मोठे संघर्ष करताहेत, ते समजून घेता येतात.
पुस्तकाचा भर मुस्लीम समाजावर असला, तरी लेखिकेचा दृष्टीकोन मुस्लीम स्त्रिया वा समुदायापुरता मर्यादित नाही. तो व्यापक आहे, सांविधानिक व मानवी मूल्ये आणि समता, मानवता, बंधुभगिनीभाव या आधारे पुढे जाऊ पाहणारा तो प्रगतीशील विचार आहे. त्यामुळेच ‘तुम्हीही औरत आहात म्हणून’मध्ये महिला कुस्तीगिरांना बिल्किस बानो काय पत्र लिहाल याचा विचार येतो.
त्या निमित्ताने भारतातील सर्व धर्म व समुदायातील महिलांचे प्रश्न - महिला म्हणून असलेले प्रश्न - आणि शासन यंत्रणा व सत्ताधारी वर्गांचा त्याबाबतचा दृष्टीकोन हे सारे पुन्हा एकदा समोर येते. दंगली आणि हत्याकांडं, मॉब-लींचिंग,‘लव जिहाद’, ‘कोरोनास्प्रेडर तबलिगी’, ‘टमाटर जिहाद’ असं जे सतत घडत आहे, घडवलं जात आहे. तसंच कोणत्या प्रकारचा ‘प्रोपगांडा’ चालवला जात आहे, याची परखड चर्चा इथे येते.
‘केरळा स्टोरी’ या चित्रपटाचे वास्तव काय आहे किंवा समान नागरी कायद्याचा प्रश्न आणि याचे राजकारण काय आहे, या दोन्हीबाबत लेखिका अजिबात निसरडी वा चाकोरीबद्ध भूमिका घेत नाही.
लेखिका आक्रमक हिंदुत्ववादाची परखड टीकाकार आहे, पण ‘समान नागरी कायद्या’च्या प्रश्नावर आक्रमक हिंदुत्ववादाचे निमित्त करून ती बचावात्मक वा पारंपरिक भूमिका घेत नाही. आजही अनेक लोकशाहीवादी आणि प्रगतीशील राजकीय पक्ष व प्रवाह या प्रश्नाबाबत बचावात्मक वा परंपरावादी भूमिका घेताहेत. याचे दोन परिणाम स्पष्ट दिसताहेत -
एक, त्यामुळे समाजातील जैसे-थे वादी भूमिका बळकट होते आणि केवळ मुस्लीमच नव्हे, तर सर्वच धर्मातील स्त्रियांचे दुय्यम स्थान कायद्यानेही टिकून राहते. सर्व परंपरावाद्यांना आणि धार्मिक जमातवाद्यांना हेच हवं आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना जे हवं ते आपोपापच घडतं.
दुसऱ्या बाजूनं, समान नागरी कायद्याचा पुरस्कार करून हिंदुत्ववादी हे स्वत: जणू समतावादी आणि स्त्रियांच्या हिताची भूमिका घेणारे आहेत, असं पोज करतात. परिणामी, हिंदुत्ववादी हेच जणू सकारात्मक व प्रगतीशील आहेत आणि विरोधक हे जणू नकारात्मक व प्रतिगामी आहेत असं चित्र उभं होत आहे. लेखिका या सापळ्यात न अडकता याबाबत स्पष्ट, समंजस व स्त्रीहिताची भूमिका घेते.
बहुसंख्याकवाद वा नवहिंदुत्ववाद आणि एकंदर धार्मिक-जमातवादी विचारसरणी ज्याला उजाळा देत आहेत, जे पेरताहेत, ते आता लोकांचे ‘सार्वत्रिक’ समज बनू पाहताहेत, ते ‘सामान्य ज्ञान’, ‘व्यावहारिक शहाणपण’, ‘कॉमनसेन्स’, ‘सारासार-विवेक’ वगैरे समजले जाऊ लागले आहेत. त्यात दडलेले पूर्वग्रह आणि ‘संस्कार’ अनेक गंभीर प्रश्न उभे करताहेत. याचा प्रभाव हिंदू समाजात तर दिसतोच, पण तो थेटपणे वा विरुद्ध बाजूनं मुस्लीम समाजातही काहीएक प्रमाणात दिसतो. बहुसंख्याकवादी/हिंदुत्ववादी विचारविश्वानं प्रचलित केलेल्या विचारांचा मुस्लीम जाणिवांमध्ये, साहित्य व सामाजिक वागणुकीमध्ये जो प्रभाव दिसतो वा मुस्लिमांमध्ये काही वेळा जी शरणागततेची भावना दिसते, त्याचीही लेखिका मोकळेपणाने चर्चा करते.
मुस्लीम समाजानं स्वत:च्या कोशात वा बाहेरून-आतून लादल्या गेलेल्या प्रतिमांच्या पिंजऱ्यात अडकून काहीच साधणार नाही. लेखिका याचा स्पष्ट उच्चार करते. बदलत्या परिस्थितीचं भान मुस्लीम समाजानंही ठेवणं गरजेचं आहे, याकडं ती लक्ष वेधते. जकातीचा वापर आधुनिक कल्याणकारी कामासाठी व्हावा, यावर लेखिका बोलते.
स्वत:च्या प्रतिमांना छेद देणारे व्यवहार व अन्य समूहांशी संवाद करण्यात मुस्लीमांनी स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे, अशी आग्रही व कृतीशील भूमिका ती घेते. असे जे धार्मिक-सांस्कृतिक आणि सामाजिक-वैचारिक पूर्वग्रह व गैरसमज पसरवले जाताहेत, त्यांची हाताळणी कशी करावी, त्यांना प्रतिक्रिया कशा द्याव्यात/न द्याव्यात आणि आपण सकारात्मक प्रतिमा मांडणी व संवाद कसे घडवावेत, अशाही मुद्द्यांना लेखिका स्पर्श करते.
या निमित्ताने काही मुद्द्यांचा खोलवर विचार होण्याची गरजही यातून समोर येते. उदाहरणार्थ, धर्म आणि नीती, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, धर्म आणि आत्मिक जीवन, धर्म आणि संस्कृती (दोन्ही अनेकवचनी), धर्म-संस्कृती आणि राष्ट्रवाद व राष्ट्रीयता याबाबतचे प्रश्न या लेखांमधून थेटपणे उपस्थित होतात वा ध्वनित होतात. त्यावर अर्थातच अधिक चर्चा होत राहणं गरजेचं आहे. विशेषत: ‘बहुसंख्य व अल्पसंख्य’ ही विभागणी.
बहुसंख्याकवाद हा आज प्रभावी आहे. त्या आडून नवहिंदुत्ववाद आपलं वर्चस्व लादत आहे, हे तर खरंच आहे. लोकशाही म्हणजे बहुसंख्यकवाद तर राष्ट्रवाद वा भारतीयता म्हणजे नवहिंदुत्व आणि इथली संस्कृती वा हिंदू धर्म म्हणजे वैदिक-ब्राह्मणी पुरूषप्रधान वर्णाश्रम संस्कृती/धर्म, अशी व्याख्या यातून केली जात आहे. देशाच्या एकात्मतेला, लोकशाहीला व समता प्रस्थापनेला हा मोठा धोका नक्कीच आहे.
या विभागणीतून उभे राहिलेले प्रश्न आणि त्यावरील टीका यात ‘नक्कीच’ हा शब्द अत्यावश्यक आहे, मात्र जेव्हा बहुसंख्याकवाद हा शब्द वापरला जातो, तेव्हा त्यात दडलेल्या अर्थाकडं आणि बहुसंख्य-अल्पसंख्य असं द्विभाजन का उभं राहतं? याकडेही नीट पाहिले पाहिजे. या विभागणीच्या आड सर्वच समाजातील वर्गीय-जातीय-जमातीय आणि पुरुषी वर्चस्वाचे मुद्दे लपत वा लपवले जात तर नाहीत ना? याकडं लक्ष द्यावं लागेल. कारण, ही विभागणी आणि त्यावर आधारित विचारसरणी व दृष्टीकोन हे अशा विषमतेवर व उतरंडीवर आधारित समाजव्यवस्थेची निर्मिती आहे, हेही ध्यानात घ्यावं लागतं.
मुस्लिमांना वेगळं मानण्याची प्रवृत्ती, त्यांच्या विशिष्ट साचेबद्ध प्रतिमा रंगवण्याचे आणि द्वेषबुध्दी जागवण्याचे प्रयत्न हे सारं का केलं जातं आहे? त्यांना आणि अन्य अल्पसंख्य विभागांना भयग्रस्त का ठेवलं जातं आहे? या मागच्या कारणांची मालिका खरं तर खूप खोलवर जाणारी आहे. ती मानसिक विकृतीपासून मानवी अस्तित्वाच्या भौतिक मुळांपर्यंत पोचणारी आहे.
या साऱ्याची गरज ही सामाजिक उतरंड, राजकीय सत्ता, सांस्कृतिक वर्चस्व, शोषणाची रचना व स्वस्त श्रमाची राजकीय अर्थव्यवस्था टिकवण्याशी जोडलेली आहे. भय, असुरक्षितता, दमन, दहशत, दडपशाही, हिंसाचार ही सत्ताधाऱ्यांची (केवळ राजकीय पक्षांची नव्हे तर सर्व क्षेत्रांतील सत्ताधाऱ्यांची) साधनं आणि माध्यमं आहेत.
या आधारे दलित - आदिवासी - भटके - कारागिर - कष्टकरी वर्ग- जाती- जमाती आणि स्त्रिया यांना विभाजित ठेवणं, त्यांना ‘फुकट’ वा अत्यल्प मोबदल्यात राबवून घेण्याची व्यवस्था टिकवणं, हे केलं जातं. हे विभाग स्वत:चा व एकंदर श्रमिक वर्गांचा निर्वाह स्वस्तात व्हावा आणि त्यांचे श्रम, पर्यायानं सर्व उत्पादनं व सेवा हे आजच्या जागतिक, तसेच भारतीय अर्थ-राजकीय व्यवस्थेला स्वस्तात उपलब्ध व्हावेत, यासाठी राबवले व ‘नियंत्रित’ केले जात आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
आजच्या संरचनात्मक व पर्यावरणीय सार्वत्रिक संकटात आणि अमाप आर्थिक केंद्रीकरणाच्या युगात एकाधिकारशाह्या आणि हुकूमशाह्या या वर्तमान भांडवल व्यवस्थेची गरज बनल्या आहेत. अशा सत्तांना संकुचित-वर्चस्ववादी अशा धार्मिक-सांस्कृतिक-‘राष्ट्रवादां’चा आधार घ्यावा लागतो आहे. परिणामी सर्वच अल्पसंख्य (जे खरेतर सर्व मिळून बहुसंख्य असतात!) हे अशा व्यवस्थांच्या पायात चिरडले जाणं, ही व्यवस्थात्मक परिणती आहे.
अशा वेळी अल्पसंख्य समूहांनी निडरपणानं उभं राहावं, स्वत:च्या प्रतिमा आणि स्वत:वरची बंधनं झुगारून द्यावीत, आत्मविश्वासानं कृतीप्रवण व्हावं असं हे पुस्तक सांगतं. हे पुस्तक जगण्याच्या सम्यक शोधात पुढं जायला मुस्लीम समाजाला तर मदत करेलच, पण असा शोध घ्यायला व सम्यक जगण्याकडं जायला सर्वच समाजांना ते प्रवृत्त करेल. स्वत:ला आणि भारताला योग्य दिशेनं बदलायचं तर सर्वांनीच हे केलं पाहिजे.
याची सुरुवात या पुस्तकाच्या लेखिका हिनाकौसर खान म्हणतात तशी, करणे ‘प्रेम आणि संवाद’; तसेच, विचार, जगणं आणि अनुभव यांची देवाणघेवाण करण्यापासून व्हायला हवी. हे पुस्तक असा संवाद वाढवायला नक्कीच मदत करेल.
‘इज्तिहाद : जगण्याच्या सम्यक शोधात मुस्लीम’ - हिनाकौसर खान
हरिती प्रकाशन, पुणे
पाने - ८० | मूल्य - १४० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment