कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी समाजासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत. ते प्रश्न व त्यांना सुचवण्यात येणारी ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम युबीआय’सारखी उत्तरे यांचा उहापोह करणारा, वाचकाला प्रश्न गहराईत उतरवणारा, एका लेखक - अभ्यासकाचा लेख....
.............................................................................................................................................................
मी सौंदर्यशास्त्रज्ञ, समीक्षक वगैरे नाही. मी कार्यकर्ता आहे. लेखकही आहे. आजचा विषय खूप व्यापक आहे. मात्र मी प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे ए.आय.च्या संदर्भात बोलणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अवतरल्यानंतर सर्जकतेचे आणि भाषेचे काय होईल? या दोघांचे भवितव्य काय? एकंदरीतच भावी समाज कसा असेल? असे सगळे प्रश्न आपल्या पुढे आहेत.
प्रथम आपण हे मान्य करू या की, आता आपल्याला सुखाची भीती वाटायला लागली आहे. हे वाक्य थोडे विक्षिप्त वाटेल. मात्र गेल्या तीस-पस्तीस वर्षांत तंत्रज्ञानामुळे आपण इतके सुखात लोळतोय की, भविष्यात विचार करायचेसुद्धा कष्ट आपल्याला करायला लागणार नाहीत, याचा आपण कधीच अंदाज केला नव्हता.
ज्या मार्गावरून आपण जायला सुरुवात केली त्याचा पुढचा टप्पा हाच असेल, असे आपण देशी-विदेशी विज्ञान साहित्यात वाचत होतो. पण तरीही आपण सांगू त्याच वेगाने तंत्रज्ञान प्रगती करेल, ते आपल्या ताब्यात राहील, असा भाबडा विश्वास आपल्यात होता.
माणूस म्हणून माझी जी काही मूलभूत वैशिष्ट्ये असतील, त्यांची काही गरज राहणार नाही, अशी परिस्थिती लवकरच येऊ घातली आहे. अनेक जण या विधानाला आक्षेप घेतात. त्यांची भूमिका अशी असते की, नवे तंत्रज्ञान आले की, नवीन रोजगार निर्माण होणारच. त्यात काय एवढे? ही एक संक्रमणावस्था समजा. अशा वेळी आपण तग धरून राह्यला शिकले पाह्यजे.
यावर माझे म्हणणे असते की आजवर तंत्रज्ञानात प्रथमच बुद्धिमत्ता शब्द वापरला आहे. ही धोक्याची घंटा नाही का? बरे, हा माझा कल्पनाविलास नाही. न्यूरल नेटवर्कचा पितामह जेफ्री हिंटन याने गुगलचा राजीनामा देताना जाहीरपणे मांडले की, वातावरण बदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता जास्त धोकादायक आहे.
ओपन ए.आय.चे सॅम अल्टमन आग्रह धरतात की, ए.आय.वर नियंत्रण असावे. त्याच वेळेला जगातल्या मान्यवर व्यक्ती आणि ए.आय. तज्ज्ञ (ज्यांमध्ये बिल गेट, इलोन मस्क इ.चा समावेश आहे) यांनी एक पत्रक काढून आवाहन केले की ए.आय.ची निर्मिती सहा महिने थांबवावी आणि प्रथम त्याचे नियम बनवावेत.
या सगळ्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की, ‘आम्ही भस्मासुर जन्माला घातला आहे. आता तुम्ही सांभाळा!’ तरीही दुसरे विचारवंत युवाल नोव्हा हरारी म्हणतात, “It is just a baby. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर नुकत्याच तयार झालेल्या एकपेशीय प्राण्यासारखा आताचा ए.आय. आहे. पुढे अजून खूप काही होणार आहे.”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ए.आय.ची राक्षसी ताकद
माणूस म्हणून विचार करणे आणि श्रमातून संपत्ती निर्माण करणे, या माझ्या दोन्ही कृती सर्जनशील असतात. यातून माणूस म्हणून माझा विकास होत असतो. माझे माणूसपण अधिकाधिक प्रगल्भ आणि उन्नत होत असते. या पार्श्वभूमीवर आपण चार उदाहरणे घेऊ.
माझ्या मित्राने चॅटजीपीटीला प्रश्न विचारला की, औरंगाबाद शहराचे कचरा व्यवस्थापन अधिक चांगले करण्यासाठी ए.आय. कोणती मदत करू शकेल? काही सेकंदांत त्याला एक प्रकल्प मिळाला. कुठल्या वस्तीतून कधी कचरा उचलायचा, त्यात ए.आय. कशी मदत करेल, याचा संपूर्ण तपशील त्याने दिला होता. अगदी एखाद्या एनजीओच्या प्रपोजल सारखा.
दक्षिण ध्रुवावर मी मुंबईची पाणीपुरी खातोय, अशी कविता मला गुलजारच्या शैलीत हवी, असं आदित्यने चॅटजीपीटीला लिहिले. त्याला कविता मिळाली. ‘अक्षर’च्या २०२३ दिवाळी अंकात हा प्रसंग त्याने लिहिला आहे.
‘सिक्स्टी मिनिट्स’ नावाच्या पॉडकास्टमध्ये जॉफ्री हिंटन आपल्याला एक प्रात्यक्षिक दाखवतात. गुगलच्या ‘बार्ड’ नावाच्या एआयला पुढील सहा शब्द दिले- For, sale, Baby shoes, Never, worn आणि त्याला त्यावर आधारित कथा लिहायला सांगितली. काही सेकंदातच चॅटबॉटने एक सुंदर भावुक कथा लिहून दिली. पत्नी गरोदर आहे. बाळाच्या स्वागताचे सगळे सामान घेतले आहे, पण तिचा गर्भपात होतो. अशी हृद्य गोष्ट होती. त्यामध्ये ही गोष्ट ए.आय. कशी तयार करतो, हे हिंटन जेव्हा समजावून सांगतात, तेव्हा आपण चक्रावून जातो.
‘अक्षर’च्या या दिवाळी अंकात आशिष दीक्षित या बीबीसीच्या पत्रकाराचा एक लेख आहे. ते स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेत गेले होते. तेव्हा एमआयटीमध्ये एक ए.आय. तज्ज्ञ आणि एक पत्रकार अशा दोघांनी मिळून एक चॅटबॉट तयार करायचा, असा एका दिवसाचा कार्यक्रम होता. त्यांनी दिवसभर बसून चॅटबॉट तयार केला. दीक्षितांनी देवनागरी लिपीत मराठी भाषेत एक प्रश्न विचारला. चॅटबॉटने त्यांना मराठीत उत्तर दिले. दीक्षितांनी इंजिनियरला प्रश्न केला ‘हे उत्तर कसे आले? चॅटबॉटने उत्तर इंग्रजीत तयार करून मराठीत भाषांतर केले की, मूळ मराठीतच लिहिले?’ इंजिनियर म्हणाला, ‘हे सांगणे कठीण आहे.’ दीक्षितांनी लेखात पुढे लिहिले आहे की. गुगलच्या सुंदर पिचईंनी या वर्षीच्या एप्रिल महिन्यात कबूल केले की, ‘चॅटबॉट कसे काम करतात हे आम्हाला पूर्णतः समजत नाही.’
ही चार उदाहरणे घेण्याचे कारण असे की, चॅटजीपीटी किंवा त्याचे नातेवाईक ‘बार्ड’ किंवा ‘बिंग’ हे काही अतिप्रगत ए.आय. नाहीत, तरी ते काय करू शकतात, याची ही झलक आहे. यांतील शेवटचे ‘तो कसा वागतो हे आम्हाला माहीत नाही’ हे विधान मला अतिशय धोकादायक वाटते. म्हणून सुरुवातीला मी म्हणालो होतो की, सुखाची भीती वाटायला हवी, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.
साहित्य, चित्रकला आणि ए. आय
आता आपण मानवी सर्जनशीलतेकडे वळू. मला गुलजारच्या शैलीत कविता हवी. ए.आय.साठी शैली म्हणजे काय असेल? कवीने विशिष्ट शब्द सातत्याने वापरणे, त्यांची विशिष्ट प्रकारेच मांडणी करणे, विशिष्ट प्रतिमांचे कवींना आकर्षण असणे, हे सगळे कवींच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असले तरी ए. आय.साठी ते समान पॅटर्न आहेत. ते गुलजार असोत की, ग्रेस की ढसाळ!
ए.आय.साठी कवींची विभागणी पॅटर्ननुसार होणार. ए.आय.ने त्यांच्या कविता वाचून पचवल्यावर तो त्या कवींची नवीन कविता सहज लिहून देऊ शकेल. कदाचित त्या कवीने न लिहिलेली ती सर्वश्रेष्ठ कविता ठरेल.
चॅटजीपीटी, बार्ड, बिंग ही शब्दांशी खेळणारी आहेत, तर मिडजर्नी किंवा अडोबे यांसारखे चॅटबॉट प्रतिमांशी संबंधित आहेत. आजपर्यंत चित्रकारांचे माध्यम खडू, रंग, ब्रश, पेन्सिल वगैरे राहिले आहेत. रेषांची मांडणी आणि रंगलेपन यांतून चित्र तयार होते. चित्रकार शब्दांच्या माध्यमात ते अडकू इच्छित नाहीत. त्यांची चित्रभाषा वेगळी असते असे ते सांगतात. अपवाद प्रभाकर बर्वेचा म्हणता येईल.
आज ‘मिडजर्नी’वर तुम्हाला हवे ते चित्र मिळते. त्यासाठी तुम्हाला भाषेचा वापर करावा लागतो. तुम्हाला नेमके काय हवे, ते लिहावे लागते. त्याला ‘प्रॉम्प्ट’ म्हणतात. काही सेकंदात तुम्हाला हव्या असलेल्या चित्राचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. तुम्हाला क्युबीस्ट, इम्प्रेशनिस्ट, सरिअॅलीस्टिक अशा कुठल्याही शैलीत चित्र काढून मिळू शकते. ते सर्व पर्याय तुम्हाला दिले जातात. त्यापुढचा प्रश्न असेल- ‘कोणत्या चित्रकारासारखे हवे?’ पिकासो, दाली, सेझान, गॉग, क्ली यांच्यासारखे कुणाचेही नाव देऊन तसे चित्र मिळते. या प्रक्रियेत तुमची सर्जकता शब्दांद्वारे प्रॉम्प्ट देण्यात वापरावी लागते. म्हणजे कुठलेही चित्रकलेचे शिक्षण न घेतलेला, चित्र न काढणारा माणूस उत्तम चित्र, भाषेच्या आधारे बनवू शकतो. आता चित्रनिर्मितीचे माध्यम पूर्ण बदलत आहे. भविष्यात चित्रभाषा लयाला जाऊन शब्दभाषा हीच चित्राची भाषा बनणार आहे.
आपल्या लिखाणाचे किंवा चित्राचे पॅटर्न बनू शकले, तर ते पचवून चॅटबॉट आपले साहित्य किंवा सहजतेने कृत्रिमरित्या निर्माण करू शकेल. आपल्या निर्मितीची कॉपी ए.आय.ने करू नये, असे आपल्याला वाटत असेल, तर त्या ए.आय.च्या डोक्यात आपल्याला गोंधळ उडवावा लागेल.
म्हणजेच आपल्याला आपल्या लिखाणात किंवा चित्रात सतत नावीन्यपूर्ण कल्पक, आणि वेगवेगळ्या शैलीत निर्मिती करावी लागेल. मनुष्य प्राणी म्हणून आपण सतत इतके वैविध्यपूर्णरित्या सर्जक राहू शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.
भाषा आणि विचार करणे, यांचा फार जवळचा संबंध आहे. माझ्याकडे शब्दसंख्या कमी असेल, तर मी माझ्या भावना कशा व्यक्त करणार? किंबहुना माझ्या भावना नेमक्या काय आहेत, हे तरी मला कळेल का? सध्या समाजमाध्यमांवर ‘स्मायलीं’चा वापर शब्दांपेक्षा जास्त होत आहे. ‘सेल्फी’ आणि ‘रील्स’ हे रोग सर्वत्र पसरले आहेत.
ही झाली सर्वसाधारण निरीक्षणे. आज मला कुठल्याही विषयावर माहिती मिळवायची असेल, संशोधन करायचे असेल, प्रश्नांची मांडणी करायची असेल, तर त्यासाठी डोक्याला ताण देऊन विचार करणे आणि व्यक्त होण्यासाठी शब्दसाठा या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत. आज कुठल्याही पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना विचारा की विद्यार्थी उत्तरे, निबंध, प्रबंध कसे लिहितात?
तुम्हाला ध्यानात येईल की, सर्वत्र विद्यार्थ्यांऐवजी चॅटजीपीटी, बार्ड, बिंग उत्तरे लिहीत आहेत. यातली एक गंमत म्हणजे, मला वैद्यकीय क्षेत्रात कुठलेही ज्ञान नसताना मी चॅटबॉट वापरून वैद्यकीय परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊ शकतो.
थोडक्यात कुठल्याही विषयावर आपल्याला लिहायचे असेल तर त्या विषयाची माहिती असण्याची गरज नाही. त्याचे प्रॉम्प्ट लिहिता आले की झाले! समजा चॅटबॉटने लिहिलेला प्रबंध तुम्हाला आवडला नाही, तरी हरकत नाही, नवीन प्रॉम्प्ट द्या, नवीन प्रबंध मिळवा!
अनेकांची तक्रार असते की, चॅटजीपीटीने काही प्रश्नांना चुकीची उत्तरे दिली आहेत. काहींनी हेही नोंदवले आहे की, त्याने काहींची उत्तरे त्याला माहीत नाही म्हणून ‘सॉरी’ म्हटले आहे. खरे आहे ते. त्याची रचनाच स्वयंशिक्षकाची आहे. तो चुका करतच शिकतो आणि प्रगत होत जातो. आपणही लहानपणापासून चुका करत शिकत मोठे होतो. पुरेशी समज यायला आपल्याला १५ ते २० वर्षे लागतात, तर चॅटबॉटला अचूकपणा यायला फक्त काही दिवस लागतात. परत त्यांची रचना सतत प्रगत होण्याची असल्याने पुढच्या काळात तो जेवढा वापरला जाईल, तेवढा तो अधिक प्रगत होईल. आपल्यात आणि ए.आय.मध्ये हा महत्त्वाचा धोकादायक फरक आहे.
सर्जकतेचे लोकशाहीकरण की, फॅसिझमचा धोका?
सर्जकतेच्या बाबतीत दोन मुद्दे सांगावेसे वाटतात. साहित्य, संगीत, चित्रकला, सिनेमा अशा काही मोजक्या प्रकारांत सर्जकता दडून होती. आज समाजमाध्यमांनी सर्जकतेच्या धरणाला सुरुंग लावून ते उदध्वस्त केले. सर्जकता सर्वत्र पसरली. प्रत्येकाकडे कॅमेरा आला. तो पत्रकार ते फिल्ममेकर काहीही होऊ शकतो.
रील्स, इन्स्टाग्राम आणि युट्युबवरच्या सिरियल्स, गाणी या सगळ्यांना मिळणारा अफाट प्रतिसाद, त्यातून एक वेगळीच वर्गवारी तयार होणे, त्यातून उत्पन्नाचे स्रोत तयार होणे, हे सगळेच आपल्याला नवीन आहे. याला ‘सर्जकता’ म्हणणार का? हा पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा असा आहे की, तुमची सर्जक कलाकृती ही पुढच्या क्षणाला डाटा असते. मग ते साहित्य, शिल्प, चित्र, संगीत काहीही असो. आणि आता निर्मितीसाठी पूर्वीसारखा विचार करायची गरज लागत नाही.
आतापर्यंत जे बोललो ते चॅटजीपीटी 4, बार्ड, बिंग यांच्या प्राथमिक काळातले. लवकरच ‘चॅटजीपीटी 5’ येत आहे. त्यामध्ये भाषा, प्रतिमा, आवाज सगळे असेल. तुम्ही काहीही केलेत तरी त्याचा डाटा होऊ शकतो. त्याचा वापर करून नवीन घडवता येईल. त्यात पूर्वीच्या सगळ्या सिनेमांचा डाटा वापरला, तर उद्या १९५०च्या दशकातील (आज अस्तित्वात नसलेली) मधुबाला आणि २०२०च्या दशकातील राजकुमार राव या जोडीचा सिनेमा निघू शकेल.
त्याच्यासोबत आपण हेही जाणून घ्यायला हवे की, उद्या आपल्यापैकी कोणीही ‘पाकिस्तान झिंदाबाद’ किंवा तत्सम राष्ट्रविरोधी घोषणा देत आहे, असे व्हिडिओ सोशल मीडियावर येऊ शकतात. त्या वेळी पोलीस कोणाला पकडणार, हा महत्त्वाचा राजकीय प्रश्न आहे. कारण तुमच्या चित्राचा किंवा वेगळ्याच व्हिडिओचा वापर करून तुमच्या प्रतिमेच्या तोंडून हवे ते वदवून घेणे सहज शक्य होईल.
या वर्षी भारत आणि अमेरिकेसह अनेक देशात निवडणुका आहेत. तेव्हा या साधनांचा वापर कसा होईल, याचा अंदाज करून पहा, म्हणजे ए.आय.च्या भल्याबुऱ्या सामर्थ्यांची तुम्हाला कल्पना येईल.
तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत जाते, तसतसे त्याच्या वापरातून संपत्तीचे केंद्रीकरण होते. ए. आय.चाही हा थेट परिणाम आहे. त्याचा दुसरा थेट, गंभीर व अद्याप चर्चिला न गेलेला परिणाम म्हणजे बेरोजगारी. ऑटोमेशन, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, आय.ओ.टी., थ्रीडी प्रिंटिंग अशी अनेक तंत्रज्ञाने ए.आय.च्या साथीला आहेत.
या सगळ्यांचे मिळून एक नाव आहे- ‘चौथी औद्योगिक क्रांती’. ही क्रांती प्रत्यक्षात अवतरली, त्यालाही आता दहा वर्षे उलटून गेली. हे जग लवकरच ‘पाचव्या औद्योगिक क्रांती’त प्रवेश करणार आहे. या सगळ्या तंत्रज्ञानातून भरमसाठ वस्तुवैपुल्य मिळते. वरून ही उत्पादने उत्तम दर्ज्याची व सुबक असतात. मात्र ह्याचे दोन दूरगामी दुष्परिणाम होणार आहेत-
१) संपत्तीच्या केंद्रीकरणाने विषमतेची दरी वाढत जाईल. खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होत जाईल.
२) एकाच प्रकारचे प्रमाणित उत्पादन येईल.
आपला देश सर्व अंगांनी विविधतेने नटलेला आहे. मात्र ए.आय.मुळे खाणे, पोशाख तशाच इतर अनेक गोष्टींतील विविधता नष्ट होईल. सरसकट सपाटीकरण होईल. खाण्यापासून कपड्यांपर्यंत आपण सगळे एकसाची बनू. वाढती बेकारी आणि सांस्कृतिक विविधता धूसर होत जाणे, यांतून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धारदार अस्मितांच्या संघटना निर्माण होतील. अस्मिता चेतवत या संघटना देशाच्या संपत्तीमधील आपल्या गटाचा वाटा मागतील. बेरोजगारीमुळे देशातील ‘गिग इकोनॉमी’चे (तात्पुरते रोजगार, उदा. स्वॅगी, झोमॅटो देऊ करणारी अर्थव्यवस्था) प्रमाण वाढत जाईल.
१८ जानेवारी २०२४ रोजी ‘नेटवर्क १८ लोकमत’मध्ये अशी बातमी आली आहे की, यापुढे सरकारी नोकरीतील चतुर्थ श्रेणी ते द्वितीय श्रेणीतील ८५ संवर्गातील पदांवरील भरती कंत्राटी पद्धतीने होईल, असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. आता हळूहळू सरकारी नोकरी हा प्रकारच लोप पावेल.
संपत्तीचे केंद्रीकरण हे राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाला नेहमीच पोषक असते. अशा प्रकारे होणारे सत्तेचे केंद्रीकरण आणि ए.आय.मुळे वाढलेले संस्कृतीचे सपाटीकरण यांमुळे फॅसिझमसाठी फारच अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. आपल्या संस्कृतीत जेवढी विविधता जास्त, तेवढे फॅसिझमचे सावट दूर असते, याची जाणीव आपल्याला ठेवायला हवी.
बेरोजगारी व युबीआय
एआयमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी पसरेल, हे निश्चित. त्याचे समर्थक म्हणतात, त्याप्रमाणे काही प्रमाणात नवे रोजगार तयार होतीलही, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प असेल. शिवाय ते रोजगार अशाच लोकांना मिळतील, ज्यांना यापूर्वीच तंत्रज्ञानाच्या बळावर चांगले रोजगार उपलब्ध होते आणि जे एआयच्या मदतीने आपल्या कौशल्यात भर घालू शकतील. इतरांना पाचव्या-सहाव्या औद्योगिक क्रांतीच्या जमान्यात रोजगार मिळणार नाहीत. देशातील अशा कोट्यवधी बेरोजगारांना आपण काय देणार, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
सध्या तरी जगभरातील तज्ज्ञांकडून याचे उत्तर ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ (यूबीआय) असे सांगितले जाते. समाज या लोकांना रोजगार द्यायला असमर्थ असल्याने त्यांना उदरनिर्वाहासाठी दर महिन्याला काही ठराविक रक्कम समाजाने / सरकारने द्यावी, अशी ही संकल्पना आहे. या विषयावर जगात काही सर्वेक्षण आणि प्रयोग झाले आहेत.
या संकल्पनेचे समर्थक सांगतात की, पोटापाण्याचा प्रश्न सुटला की, माणूस कलांचा आस्वाद घेईल. नवनवीन कला शिकेल. त्यामुळे हाताला काम नसणाऱ्यांची मने रिकामी राहणार नाहीत. पण या गोष्टीकडे त्या बेरोजगार तरुणांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर काय दिसेल? माझ्या बेकारीला मी सोडून अनेक कारणे असतात. शासनसंस्थेच्या मते युबीआयचा अर्थ काहीही असेल. माझ्या दृष्टीने मात्र त्याचा अर्थ आहे, आम्ही तुला कुठलेच काम देऊ शकत नाही. म्हणून तुला उदरनिर्वाहासाठी पैसे देत आहोत.
याचा मला जाणवणारा गर्भितार्थ असा आहे की, आम्ही तुला निरुपयोगी म्हणून ठार मारू शकत नाही, म्हणून तुला मरेपर्यंत युबीआय देतोय. असे असताना युबीआय घेणाऱ्याचा आत्मसन्मान टिकून राहील का? युबीआय हा माझा हक्क नसून मी मरेपर्यंत जगावे म्हणून फेकलेला भाकरतुकडा नव्हे का? अशा मनस्थितीत मी सर्जक नवनिर्मिती करू शकेन का? हे प्रश्न उभे राहतात.
मनस्थिती स्थिर नाही, आत्मसन्मान नाही, त्या वेळी माणूस सवंगपणा, उथळपणा आणि जमल्यास हिंसा यांना तात्काळ जवळ करतो. बेफाट उथळपणा, विचार करण्याची गरज नसणे, भाषेचे आक्रसणे, श्रमाशिवाय पैसे मिळण्याची सोय, हे एकमेकात गुंतलेले प्रश्न मानवी समाजासमोर प्रथमच उभे आहेत.
मार्क्स असे म्हणाला, गांधी असे म्हणाले, बाबासाहेब असे सांगतात, हे असे किंवा कोणाही व्यक्तीला उदधृत करून हे प्रश्न सुटणार नाहीत, तर मूल्यांच्या आधारावर आपल्याला सर्व विचारधारांची फेरमांडणी करावी लागेल. अनेक कल्पना पुन्हा पुन्हा तपासून घ्याव्या लागतील.
या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर भारतातला एकही राजकीय पक्ष भूमिका घेत नाही आहे. कागदोपत्री सगळेच भूमिका घेतात, पण त्यात काही अर्थ नसतो. ‘कल्याणकारी राज्या’ची कल्पना तर इतिहासजमा झाली आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
या पार्श्वभूमीवर, ए.आय. आला आहे की, उद्या येणार आहे, हा एवढा छोटा मुद्दा वादाचा असू शकतो. त्याला शरण जायचे किंवा नाही जायचे, असे दोनच मार्ग शिल्लक राहतात. तडजोड करणे, जुळवून घेणे या प्रकारांत तर तुम्हाला ए.आय. कधी गिळंकृत करेल ते कळणारसुद्धा नाही.
मी माणूस म्हणून विचार करणे आणि श्रम करून पोट भरणे, हे तुम्हाला मान्य असेल, आत्मसन्मानाने ताठ उभे राहण्याची इच्छा असेल, तर काही कडक निर्णय घ्यावे लागतील. पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीचा नरेटिव्ह तयार करावा लागेल. त्यावर चर्चा करायला मला आवडेल. पण त्यासाठी वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल.
हा ‘नरेटिव्ह’ तयार करताना आपल्याला सर्वसमावेशक असावे लागेल. त्यात कलावंत, इंजिनियर, माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, व्यवस्थापनातील तज्ज्ञ असे विविध प्रकारचे व्यावसायिक मित्र गोळा करावे लागतील.
सर्जकता ही फक्त साहित्य, कला आणि संगीतात नसते. नवा नॅरेटिव्ह तयार करणे, ही नवनिर्मिती किंवा सर्जकता नाही का? कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्याला मुळापासून हादरवून सोडले आहे. आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अशा वेळी माझी आपल्यासारख्या लेखक, कवी, कलावंतांना नम्र विनंती आहे की, आपल्या सर्जकतेच्या कक्षा व्यापक आणि रुंद करा. मला खात्री आहे, यातच नव्या संस्कृतीची बीजे दडलेली असतील.
लेखकाने विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे २४ जानेवारी २०२४ रोजी केलेल्या भाषणावर आधारित
.................................................................................................................................................................
‘सर्वंकष’ या त्रैमासिकाच्या जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०२४च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
लेखक विजय तांबे सांस्कृतिक क्षेत्रातील सजग कार्यकर्ता, ‘सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान’चे सचिव आणि कथाकार आहेत.
vtambe@ gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment