१.
१८व्या लोकसभेसाठी १९ एप्रिल ते १ जून २०२४ या दरम्यान सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीचे निकाल काल, ४ जून २०२४ रोजी जाहीर झाले. या वेळी भाजपने २४० जागा जिंकल्या, तर भाजप नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला २९२ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने या वेळी ९९ जागा जिंकल्या, तर काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला २३४ जागांवर आघाडी मिळाली आहे. २७२ हा बहुमताचा आकडा असल्याने या वेळी केवळ भाजपचे नव्हे, तर एनडीए आघाडीचे सरकार स्थापन होईल, असे दिसते.
२०१४ साली देशभर मोदींची ‘लाट’ होती. त्यामुळे भाजपने एकट्याने २८२ जागा मिळवून बहुमताचा आकडा पार केला होता (तर भाजप नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ३३६ जागा मिळाल्या होत्या.). २०१९ साली लाटेचा प्रभाव उलट वाढला असल्याचेच दिसले. कारण या निवडणुकीत भाजपला ३०३, म्हणजे बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या होत्या (एनडीए आघाडीला ३५३ जागा मिळाल्या होत्या). म्हणजे २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने भाजपला पूर्ण बहुमताची सत्ता दिली होती. १४पेक्षा १९ला जास्त जागा देऊन अधिकच विश्वास दाखवला होता.
२०२४च्या निवडणुकीत मात्र भारतीय जनतेने भाजपचा जवळपास पराभवच केला आहे, असंच म्हणावं लागेल. कारण १४ व १९मध्ये भाजपला इतके बहुमत मिळाले होते की, त्याला सरकार स्थापन करण्यासाठी घटक पक्षांचा टेकू घ्यावा लागला नाही. उलट बहुमतापेक्षाही जास्त जागांमुळे एनडीएतील घटक पक्षांना भाजपमागे फरफटत जावे लागले होते. २०२४मध्ये हे चित्र पूर्णपणे उलट झाले आहे. या वेळी भारतीय जनतेने भाजपचा रथ २४० जागांवरच (म्हणजे बहुमतापेक्षा ३२ जागा कमी देऊन, बहुमत २७२) अडवला आहे. नीतीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एनडीएतील दोन नेते ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत. त्यामुळे या वेळी भाजपला घटक पक्षांच्या जीवावर, भरवश्यावर आणि त्यांना योग्य प्रकारे न्याय देऊनच सरकार स्थापन करावे लागेल, अशी परिस्थिती आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
याचा दुसरा अर्थ असा आहे की, १४ व १९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला एकहाती यश मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘करिश्मा’ ओसरत चालला असल्याचे या वेळी स्पष्ट झाले. स्वत:ला ‘ईश्वराचा दूत’ मानत २०४७पर्यंत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणाऱ्या मोदींना भारतीय जनतेने २०२४मध्येच निर्वाणीचा इशारा देत, स्वत:वर काबू ठेवा, असेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
(सध्या मोदी ७३ वर्षांचे आहेत, २०४७ साली ते ९६ वर्षांचे असतील. त्यांच्याच दाव्यानुसार वयाच्या नव्वदीनंतर दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस ते काम करू शकतील का, असा ‘लॉजिकल’ प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. पण ते असो.)
त्याच वेळा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला या लोकसभा निवडणुकीत २३४ जागांवर आघाडी देऊन भारतीय जनतेने यशाच्या जवळ आणून उभं केलं आहे. याचा अर्थ असा होतो की, या आघाडीने अजून जरा जास्त प्रमाणात जोर लावला असता, अजून थोडे जास्त कष्ट घेतले असते आणि आपल्या ऐक्याचे अजून चांगले प्रदर्शन केले असते, तर या आघाडीला बहुमताचा आकडा नक्की गाठता आला असता. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ आणि ‘भारत जोडो न्याय यात्रा’ या भारत उभा-आडवा पिंजून काढणाऱ्या यात्रांबाबत तज्ज्ञांबाबत कितीही मतभेद असोत, पण त्यांनी देशभर ‘मोहब्बत की दुकान’ची अतिशय उत्तम प्रकारे पेरणी केली आहे.
गेल्या दहा वर्षांत राहुल गांधी या विरोधी पक्षातला एकमेव नेत्याने मोदी आणि त्यांच्या सरकारला जे वेळोवेळी आव्हान दिले, त्यांच्यावर सडेतोड टीका केली आणि त्यांच्या लबाड्या उघड केल्या, तेवढे सातत्य इतर कुणाही विरोधी पक्षातल्या नेत्याने सातत्याने केलेले नाही. या दहा वर्षांत मोदी शिखराकडून पायाकडे चालल्याचे दिसले, तर राहुल गांधी पायाकडून शिखराकडे, हे आता कुणालाही फारसे नाकबूल करता येणार नाही.
थोडक्यात, भारतीय जनतेने या वेळी एनडीए आघाडीला बहुमत देऊनही मोदी आणि भाजपच्या ‘अब की बार, चारसौ पार’ या अतिआत्मविश्वासपूर्ण वल्गनांचा फुगा फोडला आहे; तर अतिशय विपरित परिस्थिती असूनही शर्थीने प्रयत्न करणाऱ्या इंडिया आघाडीला यशाच्या अगदी जवळ नेऊन ठेवले आहे. हेच दुसऱ्या शब्दांत असंही सांगता येईल की, भारतीय जनतेने एनडीए आघाडीला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली.
२.
२०१४ साली ‘मसिहा’, ‘तारणहार’ म्हणून उदयाला आलेल्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत जो संवैधानिक बेजबाबदारपणा दाखवला, मॉब लिचिंग, करोना काळातील जनसामान्यांची परवड, मणिपूर हिंसाचार, महिलांवरील बलात्कार अशा गोष्टींबाबत जो बेफिकीरपणा दाखवला, रोजगारांबाबत जी उदासीनता दाखवली आणि द्वेष-तिरस्कार आणि फोडाफोडीचे जे राजकारण केले, त्याविरोधात तीव्र नापसंतीचा सूर भारतीय जनतेने लावला आहे, असेच म्हणाणे लागेल. काल ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेल्या लेखात ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी ‘भाजपचा नक्षा उतरवणारा कौल!’ असे, तर ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पोर्टलवर लिहिलेल्या लेखात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप भानू मेहता यांनी ‘Suffocating shadow has lifted, balance restored’ असे यथार्थ वर्णन केले आहे.
सलग दहा वर्षं सत्तेत राहूनही मोदींनी निवडणूक प्रचाराच्या काळात भारतीय जनतेला काय सांगितले? तर ‘गेल्या दहा वर्षांत तुम्ही विकासाचा फक्त ‘ट्रेलर’ पाहिलाय, खरा विकास अजून तुम्हाला पाहायचाय’. ‘विकासा’चा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्यासाठीच जर मोदींना दहा वर्षे लागत असतील, तर ‘विकासा’चा ‘सिनेमा’ तयार करण्यासाठी किती वर्षे लागतील? कदाचित म्हणूनच ते २०४७च्या ‘विकसित भारता’चे दिवास्वप्न दाखवत असावेत.
साधनशुचिता, सभ्यता, प्रामाणिकपणा खुंटीला टांगून सतत ‘खोटे’ बोलणे आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा व मुस्लिमांचा द्वेष-तिरस्कार करणे, हेच मोदी यांचे, त्यांच्या मंत्र्यांचे-नेत्यांचे, त्यांच्या भाजपनामक राजकीय पक्षाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामक मातृसंस्थेचे एकमेव ब्रीद आहे, हे गेल्या दहा वर्षांत सातत्याने भारतीय जनतेला पाहायला मिळत आले आहे. या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनतेने सणसणीत त्याला चाप लावत, ‘आवरा आता, फार अति होतंय’ असेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
३.
राजकारण हे असे क्षेत्र आहे की, त्यात तुम्ही फक्त ‘असून’ चालत नाही. तुमच्याकडे ‘करिश्मा’ असावा लागतो, अमोघ वक्तृत्व असावे लागते. आपण किती शक्तिमान आणि प्रभावशाली आहेत, हे सतत दाखवून द्यावे लागते. निदान तशी वातावरणनिर्मिती करावी लागते. धमक, तडफ, ऊर्जा, चैतन्य आणि सभा जिंकण्याचे कौशल्य, यांच्या सातत्यपूर्ण प्रचितीने स्वत:बद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. पण फक्त हेच करत राहून चालत नाही. त्या जोडीला कामही करावे लागते. मुख्य म्हणजे ते संविधानाला धरून, अनुसरून करावे लागते.
अर्थात राज्यघटनेला अनुसरून काम करण्याचा मोदींचा पूर्वइतिहास नव्हता आणि त्यांची पंतप्रधानपदाची दहा वर्षेही नाहीत. २०१४ साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा संसदेत प्रवेश करणाऱ्या मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर सपशेल लोटांगण घातले खरे, पण संसदेच्या मूल्य, परंपरा आणि आदर्शांची जपणूक करणे तर सोडाच, संधी मिळेल तेव्हा त्यांना मुरड घालून, धाब्यावर बसवून आपली बहुमत ‘मनगटशाही’ रेटली आहे. त्याबाबतही भारतीय जनतेने या वेळी चांगलेच डोळे वटारले आहेत.
विकासाच्या गप्पा तर मोदींनी इतक्या मारल्या आहेत की बस्स. काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत जे केलं नाही, ते आम्ही करून दाखवू, असे ते सुरुवातीला म्हणायचे, अजूनही म्हणतात, पण प्रत्यक्षात काय केले, हे मात्र सांगत नाहीत. साधी गोष्ट आहे, केले असते, तर प्रचारसभांच्या भाषणांत त्यांना काँग्रेस-मुस्लीम यांचा द्वेष-तिरस्कार करण्याची आणि ‘मंगळसूत्रा’सारख्या खोटारडेपणाची गरजच पडली नसती.
विकासासाठी व्यापक समाजहिताच्या योजना राबवाव्या लागतात. ‘सर्वांगीण विकासा’चे प्रयत्न करावे लागतात, तरच तुमच्यावर लोकांचा विश्वास बसतो, राहतो आणि टिकतो. पण मोदींचा तसा पूर्वइतिहासही नाही आणि त्यांची पंतप्रधानपदाची गेली दहा वर्षेही नाहीत. केवळ आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर मोदी मोठमोठ्या घोषणा करत आले आहेत. वेगवेगळ्या योजनांचाही धडाका त्यांनी लावला खरा, पण प्रत्यक्षात त्या योजनांचे काय झाले, तर ‘फजितवडा’ झालेला आहे. उदा., ‘१०० स्मार्ट सिटी’, ‘स्किल इंडिया’, ‘मेड इन इंडिया’, ‘खेलो इंडिया’, ‘स्वच्छ भारत’…
हल्ली मोदी ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असे सांगत नाहीत, कारण गेल्या दहा वर्षांत तसे काही झालेले नाही. उलट देशातली बेरोजगारी ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. २०१४ साली मोदींची ‘विकासपुरुष’ म्हणून भारतीय राजकारणाच्या राष्ट्रीय स्तरावर ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा उभी केली गेली होती, गेल्या दहा वर्षांत ती पूर्णपणे धुळीला मिळाली आहे, असेच म्हणावे लागेल. कदाचित म्हणूनच सर्व लोकांना काही काळच फसवता येते, सर्व काळ सर्व लोकांना फसवता येत नाही, हेही भारतीय जनतेने या वेळी मोदींना दाखवून दिले आहे.
४.
सत्ता माणसाला भ्रष्ट करते, हा जगाचा इतिहास आहे. भारतीय राजकारणाचा तर तो ‘डीएनए’च झालेला आहे. त्यात दीर्घकाळ मिळालेली सत्ता माणसाला ‘मतिभ्रष्ट’ही करते. याचे भारताच्या इतिहासातले इंदिरा गांधी हे पहिले उदाहरण आणि नरेंद्र मोदी हे दुसरे. आपल्या लोकप्रियतेचा आणि सामर्थ्याचा अंदाज आल्यानंतर इंदिरा गांधींनी आपल्या पक्षाअंतर्गत आणि पक्षाबाहेरच्या राजकीय विरोधकांचा नि:पात करण्याचे धोरण अतिशय कठोरपणे राबवले. तेच मोदींनी गेल्या दहा वर्षांत केले आहे. त्यांच्या द्वेषपूर्ण राजकारणाचे बळी त्यांच्या पक्षातही आहेत आणि पक्षाबाहेर, इतर पक्षांतही.
इंदिरा गांधींसारखेच मोदीही प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि अहंकारी नेते आहेत. इंदिरा गांधींना मतभेद सहन होत नसत. पक्षातल्या मतभेद व्यक्त करणाऱ्यांना त्या युक्ती-प्रयुक्तीने बाजूला सारत, तर विरोधी पक्षांतल्या विरोधकांवर जोरदार प्रहार करून त्यांना नामोहरम करत. मोदीही हेच धोरण राबवताना दिसतात. परिणामी इंदिरा गांधींच्या काळात भारतीय लोकशाही राजकारणाची जी शोकांतिका झाली, तशीच मोदींच्या काळातही झालेली आहे.
अर्थात असंवेदनशीलता, बेदरकारपणा, विरोधक-पत्रकार यांच्याविषयी तुच्छता, मुस्लिमांविषयी द्वेष-तिरस्कार आणि रेटून खोटून बोलण्याची वृत्ती, हे मोदींकडे असलेले गुण इंदिरा गांधींमध्ये फारसे नव्हते. याशिवाय त्या अहंकारी असल्या तरी उद्दाम आणि बेताल नव्हत्या. अहंकारी व्यक्ती आणि नेत्यांना शत्रूची गरज नसते. त्यांचा बेलगाम अहंकार हाच त्यांचा मोठा शत्रू असतो, असे म्हणतात. याची प्रचितीही काही प्रमाणात या लोकसभा निवडणुकीत आली, हे बरेच झाले म्हणायचे.
सुरुवातीपासूनच या वेळी ‘मोदी-लाट’ वगैरे अजिबात नाही, हे दिसत होतं. त्यामुळेच ‘अब की बार चारसौ पार’ या त्यांच्या दाव्यातली हवा हळूहळू विरत गेली, तर ‘मोदी की गारंटी’चाही फारसा प्रभाव पडताना दिसला नाही. निवडणुकांचे टप्पे जसे जसे पुढे गेले, तशी त्याची कल्पना मोदींनाही येत गेली असावी. त्यामुळे त्यांनी ताळतंत्र सोडून बोलण्याची आपली नेहमीची पद्धत अवलंबत ध्रुवीकरण करण्याचे काम केले. पण त्यांच्या जिथे जिथे सभा झाल्या, त्यातल्या जेमतेम अर्ध्याच जागा त्यांना मिळाल्या. याचा अर्थ असा होतो की, लोकांना तुम्ही एकदा फसवू शकता, दुसऱ्यांदाही फसवू शकता, पण तिसऱ्यांदा फसवू शकत नाही. भारतीय जनता इतकीही दुधखुळी नाही.
५.
यशासारखे काहीही चमकदार नसते. त्यात राजकारणासारख्या बेभरवश्याच्या क्षेत्रात तर कुणाचेही लागोपाठचे यश ‘चमत्कार-माहात्म्य’ निर्माण करते. अशी व्यक्ती अतिआक्रमक, चढेल वृत्तीची, कुणाचेही काहीही ऐकून न घेणारी असेल आणि ती सर्वोच्चपदी असेल, तर भारतीय राजकारणी तिच्यापुढे सपशेल शरणागती पत्करतात. ‘बॉस इज आलवेज राईट’ हे वाक्य अनेकदा विनोद म्हणून किंवा उपहास म्हणून उच्चारले जात असले, तरी ती भारतीय राजकारणाची आणि एकंदर भारतीय समाजाचीही ‘बायोलॉजिकल रिअॅलिटी’ आहे.
‘मोदी-गुण-संकीर्तन’ यातच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानण्याइतकी लाचार अगतिकता भाजपच्या (आणि एनडीएतील घटकपक्षांमध्येही) देशभरातील नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे, ती कशामुळे? तिचे उघड कारण आहे, मोदींनी २०१४ आणि २०१९ अशा दोन वेळा भाजपला केंद्रात सत्ता मिळवून दिली. आपल्याशी एकनिष्ठ नसलेल्या आणि आपले ‘गुण-संकीर्तन’ न गाणाऱ्या कुणाचीही गय मोदी करत नाहीत, हे गेल्या दहा वर्षांत भाजप-संघ यांना पाहायला मिळाले आहेच, त्याचबरोबर देशालाही.
थोडक्यात, मोदींच्या राष्ट्रीय राजकारणातल्या प्रवेशाने भारतीय राजकारणात एक घातक अपप्रवृत्ती बळावली आहे. आपले मोदींबाबतचे मतभेद विसरून राजकारणात कसेबसे तगून राहण्याची आणि त्यासाठी आपल्या तत्त्वांना तिलांजली देण्याची विघातक प्रवृत्ती भारतीय राजकारणात निर्माण झाली आहे. खरं तर ती मोदींनीच जोपासली आणि वाढीला आणली आहे. तोच त्यांचा ‘यूएसपी’ आहे. त्याचे दुष्परिणाम गेल्या दहा वर्षांत भारतीय राजकारणात पाहायला मिळाले आहेत, पुढच्या पाच वर्षांत ते कितपत पाहायला मिळतात किंवा कसे, हे येत्या काळात दिसेलच.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
‘सौहार्दपूर्ण मतभेद’ हे भारतीय राजकारणाचे वैशिष्ट्य पं. नेहरू आणि वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जसे दिसले, तसे ते एरवी इतर कुठल्याही पंतप्रधानाच्या काळात फारशा विशेषत्वाने दिसलेले नाही. सक्षम विरोधी पक्ष ही लोकशाहीची एक पूर्वअटच असते. पण प्रबळ सत्ताधारी विरोधी पक्षांना कायमच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात. इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हे प्रामुख्याने दिसते.
इंदिरा गांधींना भारतीय जनतेने १९७७च्या निवडणुकीत धडा शिकवला होता आणि जनता पक्षातल्या सुंदोपसुंदीनंतर परत इंदिरा गांधींना निवडूनही दिले होते. मोदींबाबत काही तसा कठोर निकाल भारतीय जनतेने दिला नाही, पण या वेळी आघाडीअंतर्गत आणि संसदेतही त्यांच्यावर ‘चेक अँड बॅलन्स’ राहील, याची मात्र अगदी पुरेपूर दक्षता घेतली आहे.
काँग्रेसला २०१४मध्ये अवघ्या ४४ तर आणि २०१९मध्ये केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या पक्षाला या दोन्ही वेळी संसदेत विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही. या वेळी मात्र काँग्रेस ‘सेकंड लार्जेस्ट पार्टी’ ठरली. त्यामुळे या पक्षाला या वेळी संसदेत पंतप्रधानांनंतर सर्वांत महत्त्वाचं असलेले ‘विरोधी पक्षनेता’ हे पद मिळेल. सरकारवर अंकुश ठेवण्याचा आणि संसदेत त्याला धारेवर धरण्याचे काम, ही घटनात्मक जबाबदारी ‘विरोधी पक्षनेत्या’कडे असते, हे लक्षात घेतल्यावर या निवडणुकीचा अर्थ चांगल्या प्रकारे समजू शकतो.
६.
२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या ‘द टेलिग्राफ’मधील आपल्या सदरात लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच.
गेल्या दहा वर्षांत मोदींनी भारतीय राज्यघटनेला हरताळ फासण्याचेच काम केले, संसदेत आणि संसदेबाहेरही. त्यामुळे भाजपला चारशे जागा देशाची राज्यघटना बदलण्यासाठी हव्या आहेत, या इंडिया आघाडीच्या प्रचाराने भारतीय जनतेला, विशेषत: दलित, बहुजन, आदिवासी यांना खडबडून जागे करण्याचे काम केले. त्याचा परिणाम असा झाला की, मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही न मिळण्यात झाला (आणि त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए तीनशेचाही आकडा पार करू शकली नाही.), हेही नसे थोडके.
.................................................................................................................................................................
भाजपचा नक्षा उतरवणारा कौल! - प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7253
मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा कसाबसा का असेना विजय झाला आहे आणि तो मिळवताना मतदारांनी भाजपचा नक्षा पार उतरवला आहे. भाजप सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी आता इतर पक्षांच्या कुबड्या घेत या पक्षाला देशाचा कारभार हाकावा लागणार आहे. खरं तर भाजपला न मिळालेल्या बहुमताची ‘ईश्वराचा अंश’ असण्याला साजेशी नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाचा त्याग करायला हवा...
.................................................................................................................................................................
त्यामुळे भारतमातेचे हे ‘प्रधानसेवक’ आता तरी भारतीय राज्यघटनेला स्मरून, धरून आणि तिचे पालन करत राज्यकारभार करतील, अशी आशा आहे. गेल्या दहा वर्षांत जे ‘अच्छे दिन’ मोदी आणू शकले नाहीत, ते येत्या पाच वर्षांत आणतील, यावर आता भारतीय जनतेचाही फारसा विश्वास राहिलेला दिसत नाही. त्यामुळे आता या जनतेला मोदींना पूर्वीसारखे सदासर्वदा गृहित धरता येणार नाही.
या वेळच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि कौल हा काहींना ‘होल्डॉल’ वाटू शकतो, विशेषत: मोदीअंधभक्तांना. पण जे ‘आयडिया ऑफ इंडिया’चे आणि ‘गंगाजमनी तहजीब’चे समर्थक, पुरस्कर्ते आहेत, त्यांना हा निकाल आणि कौल ‘कॅलिडोस्कोपिक’ नक्की वाटेल. रूळावरून घसरलेले रेल्वेचे डब्बे रिमोट कंट्रोलचे बटन दाबून पूर्वीसारखे सरळ करता येत नाहीत, ते शक्तीपेक्षा युक्तीनेच आणावे लागतात. भारतीय जनतेने तो ‘सांगावा’ मोदींपर्यंत धाडला आहे, हे काही कमी महत्त्वाचे नाही. हर्षोल्हास व्हावा, इतके ते आपल्या लोकशाहीला धरून आहे. मात्र मोदी त्याचा ‘फालुदा’ करतात की ‘मठ्ठा’, यावरच बहुधा २०२९च्या लोकसभा निवडणुकीचे कल, कौल आणि निकाल अवलंबून असतील, हे नक्की.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment