एकीकडे गुरू ईश्वर; दुसरीकडे ध्वज गुरुस्थानी, तिसरीकडे समाज भगवंताचे रूप, तर मां भारती परमपूज्य आणि पवित्र. भरीस भर अजून एक ईश्वरी दूत…
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छायाचित्र
  • Sat , 01 June 2024
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

आम्ही शंकाकुल झालो की काय करतो, हे आता अनेक जाणतात. आमच्या गावात ‘हिंदुत्ववादी’ असे एक प्रस्थ असून त्यांच्यापाशी जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे असतात, असा आमचा अनुभव आहे. ते रोज संघाच्या शाखेत जातात. तिथेच त्यांना अनेक विषयांचे ‘ज्ञान’ होते, असे ते म्हणतात. ‘ज्ञान’ ही फार थोड्या लोकांना प्राप्त होणारी गोष्ट असल्याने ते आम्हाला त्यांच्यासोबत शाखेत नेत नाहीत. तिथे म्हणजे शाखेत बरेच ‘ज्ञान’ सांकेतिक व गूढ भाषेत दिले-घेतले जात असल्याने ते समजण्याचा मकदूर आमच्याकडे नसल्याची खात्री सदर प्रस्थाची आहे. सबब आम्ही ज्ञानाचे प्रचंड भोक्ते असलो, तरी आमच्याही काही मर्यादा आहेत. आणि त्याची कदर आमचे हे प्रस्थ करत असते.

तर आम्ही आंबे चोखत चोखत टीव्हीसमोर निवडणुकीची माहिती घेत होतो. आंबे फारच आवडत असल्याने आम्ही हात धुण्याच्या भानगडीत पडत नाही. सारखा ‘आंबापीळ’ आमच्याकडे चालू असतो. सबब आम्हाला मतदानास मज्जाव करण्यात आला. ‘दुधाची तहान ताकावर’ भागवावी, त्याप्रमाणे हापूसची गोडी गावठीवर भागवत आम्ही टीव्हीपुढे खबर घेत होतो. तेवढ्यात २०१४चे ‘प्रधानसेवक’, २०१९चे ‘चौकीदार’ समोर दिसू लागले.

ते चक्क दोघाच माणसांशी बोलत होते. आम्हाला सवय त्यांच्या प्रचंड जाहीर सभांची. त्यांना इतक्या थोड्या लोकांशी बोलायचा सराव आहे की नाही, या शंकेने आम्ही अस्वस्थ झालो. समोर कोणी नसले, फक्त कॅमेरा असला, तरी हे बोलू शकतात, याची खात्री होती. परंतु दोन पत्रकार पुढ्यात आणि हे साहेब विना टेलिप्रॉम्टर बोलणार? आमचे मन धास्तावले. ते कातर झाले. डोळे पाणावले! ओठ थरथरू लागले. अंगावर शहारे आले. कान टवकारले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘ईश्वराने आपल्याला धाडले असावे, ईश्वरच माझ्या हातून कार्य करवून घेत असावा…’ अशी ‘दिव्यवाणी’ आम्ही ऐकली. क्षणभर आम्ही दहा-बारा वर्षांपूर्वीची ‘आज तक’ वाहिनी बघत असून बातमीदार काही चमत्कृतीपूर्ण दृश्य दाखवू लागल्याचा भास आम्हाला होऊ लागला. पण छे! आम्ही जे पाहत होतो, ते खरे होते, आभासी काही नव्हते.

अत्यंत नम्र, अत्यंत विनयशील अन् अत्यंत स्पष्टपणे आढेवेढे न घेता किंवा मुळीच न लाजता साहेब आपले ‘प्रेषितत्व’ प्रकट करत होते. आमची खात्री पटली की, आता आमच्या या प्रिय प्राचीन राष्ट्राचे भवितव्य ‘परमेश्वराधिन’ झाले असून, चिंता करण्याचे काहीएक कारण नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये साहेब ‘परलोकशाही’चा अनुभव देशाला देणार आहेत.

या नव्या प्रेषिताला, पैंगबराला, देवदूताला घ्याव्या लागलेल्या जाहीर सभा, बोलावे लागलेले कठोर शब्द आणि तेवढे करण्यासाठी खर्चावे लागलेले कोट्यवधी रुपये वाया गेले, असे आम्हाला वाटू लागले. आम्ही अस्वस्थतेच्या पाचव्या टप्प्यांत गेलो. मग राहावेना. म्हटले नानांकडे गेल्यावाचून हे साशंक मन स्थिर होणार नाही. सातवा टप्पा आपल्याला गाठायच्या आधीच जाऊन आले पाहिजे, असे मन म्हणू लागले आणि आम्ही नानांच्या घराकडे कूच केले.

“नाना, आम्ही आलो आहोत. स्वत:हूनच! अन्य कोणाही व्यक्तीने, शक्तीने अथवा युक्तीने आम्हाला धाडले नसून आपण आपला अमूल्य वेळ थोडा काळ आम्हास द्यावा, ही विनंती”, असे आम्ही म्हणताच एक भयंकर आवाज आमच्या कानी आला.

“उदगीरकर, कळले बरे सारे आम्हाला. टोमणे मारणे तुम्हाला जमत नाही. ते आमचे काम. तुम्हाला आमच्या घरात यायला थोपवू शकणारे आभाळातून कोणी टपकले, तरी ते शक्य होणार नाही.”

हुश्श करत, घाम पुसत आम्ही चपला बाहेर ठेवून नानांच्या दिवाणखान्यात प्रवेश केला. एसी, पंखा आणि वाळ्यांच्या पडद्यांचा सुगंध आम्हाला काही क्षणातच गार करून गेला. आता विषय गरमागरम होता, म्हणून आम्ही सावरून बसलो. हलकेच खाकरलो. तर नानांनी स्वत:हून सुरुवात केली…

“स्वत:चे कवतिक कोणी कसेही करू लागला, तरी ते चिमटीनेच पकडायचे, असे तुम्हाला पत्रकारितेत शिकवले नाही की काय, उदगीरकर?”

झाले! आम्हाला नाना शाखेत का नेत नाहीत, ते झटक्यात लक्षात आले. त्यांचे हे वाक्य सांकेतिक अन् गूढ भाषेतले होते. पत्रकारितेचा त्यांनी सांगितलेला नियम बरोबर होता, पण तो ऐऱ्यागैऱ्याला लागू होता. नानांचा तो कोणी एक फार थोर गडी होता. तो तसे बोलला म्हणजे उगाच थोडेच बोलला असणार? ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्या’ला असा उच्छृंखलतेचा आरोप त्या थोरा-मोठ्यांवर कसा करू बरे आम्ही? काय शामत? तरी नानांची आमची घसट खूप असल्याने म्हणा, आम्ही चाचरत म्हणालो,

“नाना, ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे जोतीराव म्हणायचे. तुमच्यातल्या कवीने ‘देव देश अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती’ असे सारे एकरूप करून टाकले आहे. ‘राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा’ असे तमाम हिंदुत्ववादी सांगत असतात. तुमचे ना डॉक्टर कधी असे बोलले, ना गुरुजी, नंतरचेही कोणी असा दावा करणारे नव्हते, पण हे साहेब एकदम…”

नाना हे ऐकत असताना स्तब्ध होते. त्यांचे ओठ हलू लागले, पण त्यातून शब्द उमटेनात. वाटले, आता यांचा ताबा जाणार जिभेवरचा अन् काहीतरी भयंकर गचाळ ऐकावे लागणार. नाना शाखेत नव्हते. मुसलमान, पाकिस्तान, ख्रिश्चन, पाश्चात्य संस्कृती यांचा त्यांच्या तोंडून फार गचाळ उद्धार व्हायचा, असे आमच्या कानी आलेले. पण नाना त्यांच्याच घरात होते. त्यांनी संयम ठेवल्याचे दिसत होते. त्यांना एवढा संताप यायचे काही कारण नव्हते खरे तर. आम्ही संघातल्या माणसाविषयी प्रश्न विचारला होता. नसे उत्तर द्यायचे, तर नानांनी दिलेही नसते. तरीही नाना म्हणाले,

“उदगीरकर, आम्ही काही स्पष्ट बोललो, तर म्हणाल की, त्या जे.पी. नड्डांच्या ‘सक्षम’ उदगारामुळे आम्ही चिडलो. गप बसलो तर म्हणाल, आम्हाला सारे पटते त्यांचे. आपण दोघेच आहोत म्हणून सांगतो, आम्ही ‘कण कण में भगवान’ या हिंदू मताचे आहोत. ‘चराचरात ईश्वर’ असे आपण मानतो. इथे ईश्वर कोणी वेगळा नसतो. त्यामुळे पैगंबर वा प्रेषित ही संकल्पनाच मुळात आपली नाही.

अवतार आणि प्रतिनिधी या कल्पना भिन्न आहेत. अवतारात प्रत्यक्ष ईश्वराचा अंश असतो. जो दूत असतो वा तसे असल्याचे स्वत:च सांगतो, तो ‘निरोप्या’ असतो. फार तर आम्ही त्याला अथवा तिला ‘टपाल्या’ म्हणू. कारण जिथे जिथे पैगंबर निर्माण झाले, तिथे तिथे महाशक्ती वेगळी होती. प्रतिनिधी अथवा हस्तक शेवटी तसाच असतो. एजंटच म्हणा ना…”

बापरे! नानांनी एकदम नेम धरून बॉम्ब टाकला होता. त्यांचे म्हणणे खरे होते. हिंदू संस्कृतीत ईश्वर फक्त मनुष्याकृतीत कधी ठेवलेलाच नाही. तो अगदी डोंगर, झाडे, नद्या, पशुपक्षी, समुद्र, सूर्य-चंद्र, शिळा अन् गोटे, जमीन अशा कित्येक रूपांत बघितलेला आहे. हिंदू धर्माला कोणी एकमेव देव नाही, ना एकमेव पुस्तक, ना त्याला एकच एक तीर्थक्षेत्र, ना एकुलती एक प्रार्थना. कोणा एकापाशी किंवा एकीपाशी ईश्वरी शक्ती एकवटल्या, असे भारतात झाले नाही. उलट इथे अनेक देवदेवता एकमेकींशी स्पर्धकाप्रमाणे वागत अशा पुराणकथा आहेत.

“बरं का उदगीरकर”, नाना आम्हाला आता त्यांच्या मनातले बहुधा सारे खरेखुरे सांगून टाकणार असे वाटू लागले.

“तुम्हाला तुमचे पुरोगामी विचारवंत इतकी वर्षं सांगतात, तेच तुम्हाला ऐकवतो आता. तसे आम्ही म्हणजे संघवाले कधीच तुमच्या संतपरंपरेची महती गात नाही. कारण काय ठाऊक आहे तुम्हाला? अहो, या संतांनी परमेश्वर आणि आपण सामान्य माणसे यांच्यातला जो दुवा असतो, त्याच्या विरुद्ध आंदोलन केले होते ना! आम्हाला नाही पटत संतांचे असे विश्लेषण, पण चला, आता वेळ आलीच आहे, तर त्यावर विचार करू. ती तुमची भक्तीपरंपरा तसे एक आंदोलन होते, असा तुमचा दावा होता ना? कोणाविरुद्ध? मध्यस्थांविरुद्ध, दलालांविरुद्ध ना? म्हणजे कोण? ते आपले पुरोहित, भट-ब्राह्मण, पुजारी वगैरे.

काय करायचे हे लोक? तुमच्या मते भक्तांना लुबाडायचे, फसवायचे, भीती दाखवायचे. परमेश्वर कधी भीतीदायक किंवा भयंकर असतो का? नाही. ते तर प्रीतीचे, पावित्र्याचे, सुखासमाधानाचे रूप. पण या मध्यस्थांनी कर्मकांडे रचली, पापपुण्ये ठरवली आणि दर्शनाच्या वेळा अन् पद्धती ठरवल्या. साहजिकच, भक्त असहाय आणि लाचार होत. म्हणून अशा मधल्या माणसाची आम्हाला…”

नानांचे असे मध्येच वाक्य तोडणे आमच्यासारख्याला बुचकळ्यात टाकणारे ठरले. नानांनी विरोध केला की बाजू घेतली, आम्हाला काहीच कळेना. आम्ही लगेच नानांची चहाडी करू अन संघपरिवारात फाळणी घडवून आणू, अशी शक्यता नव्हतीच. तरीही आमचा गोंधळ काही थांबेना. पुन्हा शंका, पुन्हा संशय, पुन्हा संभ्रम आणि पुन्हा गूढ.

आता काय करावे? संघवाले कधीही आपली भूमिका उघड करत नाहीत. वेळ आली की, बघू आणि मैदान तर जवळ येऊ दे, मग लढायचे की नाही ते ठरवू, असा सदैव यांचा पवित्रा. कायम संधिसाधू अन् पलायनवादी. नानांच्या घरी जाताना अशी वेळ आपल्यावर येऊ शकते, असा अंदाज करून आम्ही ‘माईन काम्फ’ सोबत नेले होतेच. प्रकरण दोनच्या अगदी शेवटच्या तीन ओळी आम्ही नानांना वाचून दाखवायला प्रारंभ केला-

“I believe today that my conduct is in accordance with the will of the Almighty Creator. In standing guard against the Jew I am defending the handiwork of the Lord.”

जगातल्या सर्व फॅसिस्टांचे परमपूज्य वंदनीय व प्रात:स्मरणीय अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा हा साक्षात्कार आमच्या तोंडून बाहेर पडताच नाना आणखी अस्वस्थ झाल्याचे जाणवले. आम्ही एकदम अपराधगंडाने ग्रासलो. ज्यांना हिटलरचे जीवन खडानखडा ठाऊक आहे, त्यांनाच आम्ही त्याचे आत्मचरित्र वाचून दाखवत होतो. इतक्यात नाना काही बोलत असल्याचे भासले. आम्ही कानात प्राण आणले. अखेर शंकांचा सवाल होता. नाना आधीचे वाक्य पूर्ण करत होते -

“… जरा काळजी वाटते. म्हणजे संतांचे आंदोलन वगैरे ठीक आहे. लोकांना व भक्तांना माहीत असते का भजावे कसे, पूजावे कसे? अहो, विज्ञानाच्या प्रयोगांना जशी सारी सामग्री लागते, तशीच ती परमेश्वर प्रसन्न करवून घ्यायलाही लागते. जोडले हात अन् लाभला ईश्वर, असे कुठे असते का? जमिनीवर फेकले बी की, पिकली शेती, असे होते का? नाही ना? मशागत-कोळपणी, तणछाटणी करावी लागते, तेव्हाच शेत तयार होते. तसेच भक्तीभाव मनात असतो, हे दाखवायला काही कर्मकांडे करावी लागतात. पुरोहित, पुजारी, पुराणिक त्यासाठी लागतो. फक्त एवढे चांगले की, देवाज‌वळ आहेत म्हणून हे लोक देवदूत किंवा देवपूत्र होऊ शकत नाहीत. ते जन्मजात देवाचे सेवेकरी आहेत.”

नाना पुन्हा एकदा आम्हाला न समजेल अशा गूढ प्रकारे बोलून गेले. त्यांना नेमके काय म्हणायचे ते समजेना. तरीही आम्ही चंग बांधला होता की, नानांकडून संपूर्ण शंका-समाधान होऊस्तोवर हलायचे नाही त्यांच्या पुढून. आम्हाला राहावेना. शेवटी तोंडून एक शंका बाहेर पडलीच.

“नाना, तुमचे गुरुजी म्हणायचे की, समाजरूपी ईश्वर आणि त्याची सेवा हेच राष्ट्रकार्य. तर मग ईश्वर स्वतंत्र असतो की, समाज म्हणजे दुसरा ईश्वर? तुमच्या साहेबांनी आकाशाकडे बोट दाखवून आपली निवड प्रेषिताप्रमाणे भगवंताने केल्याचे सांगितले आहे. एक ईश्वर दुसऱ्या ईश्वरासाठी माणसाची निवड का करील? दोन्ही ईश्वर एकमेकांना साह्य करण्याएवढे समर्थ तर नक्कीच असतील ना? ईश्वरांना परस्परांत मध्यस्थाची गरज कशी काय पडते? त्यांच्या सामर्थ्यावर शंका घेतल्यासारखेच होईल ना हे?”

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

आमच्या शंकांची सरबत्ती नानांना बहुधा झोंबली. एरवी ते आम्हाला सतत झिडकारत, घरातून हाकलतात. आम्ही बुद्धू आहोत असे म्हणतात. आम्ही मात्र नानांचे एकनिष्ठ आहोत. आताच्या संवादाचा निष्कर्ष काय होतो, हे जाणून घेण्याची आमची खटपट फळास येते की नाही, याही शंकेने आम्ही त्रस्त असताना नानांनी तोंड उघडले,

“त्याचे असे आहे उदगीरकर, आम्ही संघवाले स्वयंघोषित सेवक असतो. कोणी आम्हाला नेमत नाही की, आम्ही कुणापुढे पदर पसरत नाही. आमचा धर्म सनातन असून तो कधीही न संपणारा आहे. इथे ३३ कोटी ईश्वर आहेत, म्हणजे ३३ प्रकारचे. त्यापैकी कोणा एकाचे नाव घेतले की, लगेच पंथ, जात, उपासनापद्धती यांचे शिक्के पडू लागतात अंगावर. म्हणून आमच्या पूर्वजांनी मातृभूमीला ईश्वरी रूप देऊन टाकले.

त्याचबरोबर समाजपुरुषांची आम्ही आराधना करतो म्हणून समाजसुद्धा ईश्वरीच. त्यामुळे कोण काय म्हणते, याकडे आम्ही ते समाजहिताचे आहे ना आणि भारतमातेच्या सुखासाठी आहे ना, एवढेच पाहतो. व्यक्तीश्रेष्ठत्व अथवा व्यक्तिस्तोम आम्ही पाळत नाही.”

झाले! नानांचा गूढवाद काही संपेना, तो आम्हाला काही समजेना. साधी सरळ सोपी उत्तरे मिळावीत ही आमच्यासारख्या लहानग्या सामान्य माणसाची अपेक्षा. बरे, नाना आम्हाला शाखेतही घेऊन जात नाहीत. आम्ही बारीक बारीक शंका फार काढू अन् शाखेत फक्त प्रश्नोत्तरांचाच करत बसू, या त्यांच्या शंकेने ते आम्हाला नेत नसावेत, असा कयास आम्ही केला.

जाउद्या. एकीकडे गुरू, ईश्वर; दुसरीकडे ध्वज गुरुस्थानी, तिसरीकडे समाज भगवंताचे रूप, तर मां भारती सर्वांची परमपूज्य आणि पवित्र. भरीस भर नरोत्तम नरेंद्र अजून एक ईश्वरी दूत यांच्यात. अरे वो सांबा, कितने आदमी हैं, बता दो जरा!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......