अजूनकाही
सवयीप्रमाणे मी सकाळी फेसबुक उघडतो. नुकत्याच घडलेल्या घटनेवर सामाजिक वाद पेटला आहे. मी पोस्ट वाचतो. मला त्यातील तर्कविसंगती दिसू लागते. पूर्वग्रह जाणवू लागतात. मी कमेंट लिहू लागतो, क्षणभर थांबतो. वरच्या पन्नास टिप्पण्या वाचतो. व्यक्त केलेली मते पोस्टची भलामण करणारी, बहुमताची. माझी कमेंटच विसंगत असहमतीने उठून दिसेल का? मी ट्रोल होईन का? माझ्यावर अमुक विचारांचा म्हणून लगेच शिक्का बसेल का? मी कमेंट डिलीट करतो. पोस्ट लाईक करत नाही, एवढेच समाधान मानून शांत राहतो.
मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट आठवते. एका राजाला त्याचे प्रजाजन कंटाळले होते. त्याची फजिती करण्याची संधी शोधत होते. एके दिवशी एका चतुर शिंप्याने एक उंची वेश ‘शिवून’ आणला. त्याने राजाला सांगितले, ‘महाराज, हा कपडा इतका तलम आहे की, तो जवळजवळ दिसतच नाही. तुम्ही आपले सारे वस्त्र उतरवा, हा वेश परिधान करा. हा इतका तलम आहे की, तुम्हाला वाटेल आपण काही घातले की नाही!’
राजाने सगळे कपडे उतरवले. शिंप्याने शिवलेला वेश ‘परिधान केला’. राजा नागडा दिसत होता. शिंप्याने त्याला फसवले होते. पण राजा इतका खुश होता की, त्याला कुणी सत्य सांगायचं धाडस करेना! एक विद्वान म्हणाला, ‘अहाहा, काय दिसताय तुम्ही महाराज, काय तलम वस्त्र!’ काही इतर दरबाऱ्यांनी त्याची ‘री’ ओढली, मग सगळ्यांनी. काहींना सत्य सांगावेसे वाटले, पण सगळ्यांचे मत राजाने कपडे घातले आहेत, असे असेल तर वेगळे का पडा, टीकेचे धनी का व्हा, म्हणून ते गप्प बसले.
आधुनिक काळातील राजा, कॉर्पोरेट कंपनीचा मालक, बोर्ड मिटिंगमध्ये एक भयंकर कल्पना मांडतो. ही कल्पना मूर्खपणाची आहे, कंपनीला नुकसान होईल, हे सगळे जाणतात, मात्र एकदम विरोध नको म्हणून एक-दोघे ‘हो’ला ‘हो’ लावतात. लगेच हेच सगळ्यांचे मत असावे, म्हणून इतर त्यात सामील होतात, आणि बघता बघता ‘कन्सेन्सस’ तयार होते! या निर्णयाने कंपनी खड्ड्यात जाईल, असे मत असणारे गप्प बसतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
तत्कालीन प. जर्मनीतील एक राज्यशास्त्रज्ञ एलिझाबेथ नोएल-न्यूमन हिने मांडलेला हा ‘स्पायरल ऑफ सायलन्स’चा (शांततेचा भोवरा!) सिद्धान्त. एखाद्या विषयावर तुमच्या दृष्टीकोनातून सामाजिक मतप्रवाह कुठल्या दिशेने चालला आहे, यावर तुम्ही आपली राजकीय, सामाजिक मते व्यक्त करायची की, शांत पडून राहायचं ठरवता, हे सांगणारं तत्त्व.
४८ वर्षापूर्वी, १९७४ साली जर्मनीतील निवडणुकांमध्ये सामान्य माणसे राजकीय मुद्द्यांवर व्यक्त होतात का, त्यांच्या मतांवर बहुजनमताचा कसा प्रभाव पडतो, ते अनेकदा शांत का राहतात, यावर संशोधन करताना एलिझाबेथला असे आढळून आले की, एखाद्या समूहात आपल्या मतांना इतरांकडून पुष्टी मिळते आहे, असे दिसून आले, तरच माणसे आपले मत प्रकट करतात, अन्यथा समूहातील बहुसंख्यांना आपली मते पटत नाहीत असे त्यांना वाटले, तर ते गप्प बसतात. समाजात मतांचा हा भोवरा सतत गरगरत असतो, त्याच्या डोक्याकडे सर्वाधिक समान धारणांचे वर्तुळ. जसे खाली जाल, तसे आसावर गरगर स्थिरावल्यासारखी दिसते, ती स्थिरता गप्प बसलेल्या अल्पमतांची. या भोवऱ्याला गती देतो, तो हाच स्थिर आस.
जर्मनीतील निवडणुकांत दोन बलाढ्य पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. मतप्रवाह दोन्हीकडे जवळपास समसमान होते, मात्र अखेरच्या काही दिवसांत भोवरा गरगरला. जनमत काय म्हणते, याचा अंदाज घेणाऱ्या तीन-चार टक्के लोकांनी आपले मत त्यानुसार फिरवले आणि एक पक्ष जिंकला.
आता संशोधकांना प्रश्न पडला की, जनमत असेच म्हणते, हे सामान्य माणसे कोणत्या आधारे ठरवतात? त्यात माध्यमांचा हात किती? त्यात व्यक्तींच्या पूर्वग्रहांचा, धारणांचा, श्रद्धांचा भाग किती? माणूस भोवऱ्यासोबत कसा गरगरत जातो? या भोवऱ्याला गती कोण देते?
हे संशोधन करण्यासाठी एलिझाबेथने तिच्या नवऱ्यासोबत यापूर्वीच ‘पब्लिक ओपिनियन रिसर्च ट्रस्ट’ स्थापन केला होता. या दोन निवडणुकांत तिला संशोधनाची उत्तम संधी मिळाली, त्याआधारे तिने ‘स्पायरल थिअरी’बाबत पाच महत्त्वाचे निष्कर्ष मांडले -
१) समाजमताला महत्त्व देणारे (आणि घाबरणारे) लोकच या स्पायरल भोवऱ्यात सापडतात, आणि खरे सांगायचे तर बहुसंख्य लोक असेच असतात. त्यांना वेगळं मत मांडून समाजापासून तुटायचं नसतं.
२) आपली मते समूहात पसरताना आढळल्यास (आधुनिक भाषेत ‘व्हायरल’ होताना दिसल्यास) माणसे ती मोकळेपणाने व्यक्त करतात. तसे न दिसल्यास गप्प बसणे पसंत करतात.
३) लोक ज्याबद्दल हिरिरीने बोलताना दिसतात, त्या बाजूला समाजमन झुकते, ते योग्य आहे की नाही, हा मुद्दा अलाहिदा. मात्र त्याची चर्चा होते म्हणजेच ते मत योग्य आहे, असं मानण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. ज्यांची चर्चा होत नाही, अशा मताला मानणारे कमी होत जातात, मग ते कितीही योग्य असो.
४) मतांचा भोवरा गरगरू लागतो. एखादं मत हे ‘बहुसंख्यांचं मत’ म्हणून मान्यता मिळवतं आणि या चक्राच्या शीर्षस्थानी पोचतं. जे अल्पमताचे त्यांचा आवाज क्षीण होत भोवऱ्याच्या तळाशी पोचतो आणि लुप्त होतो. आता भोवरा पाण्याचा न राहता पक्का लाकडाचा होऊन जातो!
मुळात ‘जनमत’ म्हणजे काय, हाही एक मुद्दा महत्त्वाचा. तर्कसंगत चर्चेचे फलित की, समाजावर पकड ठेवण्याचे साधन? जेथे जिवाचे आणि सामाजिक बहिष्काराचे भय नाही, तेथेच एखाद्या मुद्द्यावर तार्किक आणि तात्त्विक चर्चा होऊन जनमत तयार होऊ शकते, मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. ‘पब्लिक ओपिनियन’ हे काहींचे समाजावर अंकुश ठेवण्याच्या उद्दिष्टापोटी वापरलेले साधन होऊन जाते, हाच ‘स्पायरल सायलन्स’चा उगम.
एलिझाबेथने हिटलरचा काळही पाहिला होता. सामान्य विवेकी जर्मन नागरिक जगावर युद्ध लादले जात असताना, निष्पाप ज्यूंचे शिरकाण होत असताना शांत का राहिले, हा तिच्या संशोधनाचा मूळ विषय. त्याचे उत्तर तिने या भोवऱ्यातील भीषण शांततेत पाहिले. त्यात भर म्हणजे हिटलरने ‘मिनिस्ट्री ऑफ प्रपोगंडा’ स्थापन केलेले. एखादे सरकारी मत माध्यमांत सोडून द्यायचे, मग ते ‘जनमत’ म्हणून हस्तकांनी त्याची ‘री’ ओढायची, अखेर ते सार्वमत करून टाकायचे. ते मत न पटणारे बहुसंख्य शांत राहिले, तो ‘स्पायरल ऑफ सायलन्स’.
१९९१ साली अमेरिकेने आखाती युद्ध छेडले, त्याला लोक अनुकूल नव्हते. संभ्रमात होते. मात्र काही प्रमाणात माध्यमांचा वापर करून, ‘युद्ध हाच पर्याय’ असल्याचे मत पसरवून त्याचे ‘जनमतात’ रूपांतर करण्यात आले. विद्रोही आवाजांना तटस्थ माध्यमांपासून दडपण्यात आले आणि ‘युद्ध हाच उपाय’ असल्याचे ‘सर्वांना’ वाटू लागले.
‘स्पायरल ऑफ सायलन्स’वर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. त्यात ठळक घटक संस्कृतीचा. पाश्चात्य समाज व्यक्तिवादी, तेथे समाजाला अमान्य, अशी मते मांडायची मुभा आणि व्यक्तिस्वातंत्र्य जपलेले. पौर्वात्य समाज समष्टीवादी, त्यात ‘लोक काय म्हणतील’ याचा पगडा अधिक. त्यामुळे तेथे ‘स्पायरल’ अधिक वेगाने गरगरते.
व्यक्तिस्वातंत्र्य असलेल्या देशांतही हे स्पायरल गरगरते, तर हुकूमशाही असलेल्या देशांचे काय? खरे म्हणजे ते गरगरण्यासाठी कुठलीही राजवट चालते, कारण आता त्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भर पडली आहे. आता आंतरजाल सगळ्या जगाला जोडते. समाजमाध्यमे सर्वव्यापी झाली आहेत. या युगात ‘स्पायरल ऑफ सायलन्स’चे स्थान काय?
माध्यमांचे दोन प्रकार : बातम्या देणाऱ्या वाहिन्या या एकतर्फी संवाद साधणाऱ्या, तर व्हॉट्सअप किंवा फेसबुक हे कथित मुक्त विचारपीठ. त्यात वाहिन्या या ‘स्पायरल’ कार्यान्वित करण्याचे उत्तम साधन! ‘बहोत सारे लोगों का मानना हैं, अधिकतर लोग समझते हैं’ अशा वाक्यांनी सुरू होणारी मते ही आपण सांगतो, तेच जनमत असल्याचा आभास निर्माण करणारी. एकतर्फी, अप्रत्यक्ष आणि मतांचा आक्रस्ताळी पुरस्कार करणारी. मग ऐकणारा अक्रीय श्रोता, दर्शक, ती बातमी किंवा तथाकथित वादविवाद पाहताना आपले मत वेगळे असल्यास गप्प बसतो किंवा जनमताशी सहमत होतो.
या प्रकाराला ‘सिरींज इंजेक्शन मॉडेल’, ‘मॅजिक बुलेट मॉडेल’ असेही म्हणतात. वृत्तवाहिन्यांचा संवाद म्हणजे इंजेक्शन दिल्यासारखा, तो थेट रक्तातून मेंदूत पोचतो. किंवा श्रोत्याच्या मेंदूचा वेध घेणाऱ्या माध्यमांनी बातम्यांच्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीसारखा.
फेसबुक किंवा तत्सम समाजमाध्यमांत माणूस संवाद साधू शकतो, लोकप्रिय प्रवाहाविरुद्ध आपले स्वतंत्र मत मांडू शकतो, असे सकृद्दर्शनी वाटू शकते. विशेषतः जेथे आपली ओळख दाखवण्याची गरज नाही, जेथे प्रत्यक्ष कुणा व्यक्ती किंवा समूहासमोर उभं राहण्याची गरज नाही, अशा ठिकाणी हे स्पायरल काम करणार नाही, असा संशोधकांचा कयास, आणि काही प्रमाणात तो दिसतो. मात्र येथेही ट्रोलिंग आहे, ग्रुपमधून काढणे (पक्षी बहिष्कार टाकणे) आहेच.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
याव्यतिरिक्त डिजिटल दुनियेत हवे तसे ‘जनमत’ निर्माण करण्यात आणि असहमतीचा आवाज दाबण्यात एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना अलीकडे आढळून आले. त्या तंत्राचे नाव ‘सोशल बॉट’. हे आभासी खाते, यंत्र-तंत्राने चालवलेले, जे समाजमाध्यमांवर विशिष्ट मतांचा रेटा निर्माण करून ‘जनमत’ तयार करतात. ते शब्दांचे फेरफार करून कमेंट टाकतात, जिवंत लोकांनी प्रगट केलेल्या मतांचा प्रतिवाद करतात किंवा त्यांची दिशाभूल करतात आणि आपल्याला हवी तशी हवा तयार करतात.
एका पाहणीनुसार ट्विटरवरील २३ टक्के खाती ही ‘सोशल बॉट्स’ आहेत, कृत्रिम आहेत. २०१६ या वर्षी अमेरिकेत ट्रम्प निवडणुकीत उतरले आणि त्यांच्या वतीने समाजमाध्यमांवर क्लिंटनविरुद्ध या सोशल बॉट्सनी धुमाकूळ घातला. क्लिंटन यांचेही ‘सोशल बॉट्स’ होते, पण ते संख्येने कमी पडले!
असे मानण्यात येते की, याच वर्षी ब्रिटनमधील सार्वमतात हजारो सोशल बॉट्सनी ब्रिटिश नागरिकांचे जनमत ब्रेक्झिटच्या दिशेने वळवले. ‘युरोपियन एकजुटीच्या बाहेर पडणे हेच ब्रिटिशांच्या हिताचे आहे अशी हवा आहे’ असे सामान्य नागरिकांना वाटावे, यासाठी बॉट्सचा वापर करण्यात आला. परिणामी आधी जनमत बाहेर पडले, मग जनता. साधेसोपे क्यापटचा ओळखण्याइतपत ‘बुद्धी’ही या बॉट्सनी विकसित केली आहे. स्पायरलशिवाय गरगरायला लावणारे हे वास्तव.
सुरुवातीच्या कथेत एक निरागस मुलगा अखेर राजाकडे पाहून ओरडतो, ‘अरे, हा तर नागडा’ आणि हसू लागतो! जनमताला घाबरायचे असते, हे माहीत नसलेली निरागसता दुर्दैवाने मोठेपणी लोप पावते. जे ती जपून ठेवतात, तेच या आभासी भोवऱ्यातून बाहेर पडू शकतात. आपला आणि ‘आतला आवाज’ कायम कायम ठेवू धजतात.
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. नंदू मुलमुले मानसरोगतज्ज्ञ आहेत.
nmmulmule@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment