कन्हैय्या बाजी मारणार का? कन्हैय्या कुमारचा विजय हा संपूर्ण दिल्लीत, तसेच उत्तर भारतात राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, यावर अवलंबून आहे
पडघम - देशकारण
परिमल माया सुधाकर
  • ईशान्य दिल्ली मतदारसंघातील भाजपचे मनोज तिवारी आणि काँग्रेसचे कन्हैया कुमार लोकसभा उमेदवार
  • Mon , 27 May 2024
  • पडघम देशकारण भाजप BJP मनोज तिवारी Manoj Tiwari इंडिया आघाडी INDIA Alliance कन्हैया कुमार Kanhaiya Kumar आप Aap

ईशान्य दिल्ली मतदारसंघातील भाजपचे मनोज तिवारी आणि काँग्रेसचे कन्हैया कुमार यांच्यातील सामना हा २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील काही लक्षवेधी लढतींपैकी एक आहे. ईशान्य दिल्ली मतदारसंघाची रचना कदाचित असामान्य नसेल, पण हा मतदारसंघ नरेंद्र मोदींच्या ‘आकांक्षी’ मतदारांचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणाऱ्या मोजक्या मतदारसंघांपैकी एक आहे. येथील मतदार प्रामुख्याने पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतील स्थलांतरित आहेत. ते ग्रामीण भागातून यशस्वीपणे निसटले आहेत, पण महानगरात असले तरी सर्वार्थाने उपरे आहेत. अद्यापही त्यांचे मूळ ग्रामीण भागाशी मजबूत संबंध आहेत. नातेवाईक, येणेजाणे, जमीन-मालमत्ता अशा काही ना काही प्रकारे त्यांनी उगमस्थानाशी संबंध टिकवले आहेत. मात्र, ते मुळांकडे परत जाऊ इच्छित नाहीत.

शहरातील चांगल्या संधी आणि सुधारित राहणीमानाच्या आशेने ते २०१४पासून मोदींच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. पण त्यांच्याकरता ईशान्य दिल्ली मतदारसंघात मोदींनी नेमलेला प्रतिनिधी - मनोज तिवारी - यांनी अपेक्षेप्रमाणे काम केलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीचे रूपांतर चाचपडलेला व अपयशी मनोज तिवारी विरुद्ध नवा, आश्वासक, तडफदार कन्हैया कुमार, अशा लढतीत झाले आहे. मात्र, ईशान्य दिल्ली लोकसभेची निवडणूक या एकमात्र चौकटीत लढण्यात आलेली नाही. तसे असते, तर कन्हैय्याचा एकहाती विजय निश्चित होता.

ईशान्य दिल्ली मतदारसंघाची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. येथील बहुसंख्य मतदारांचे मूळ उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि इतर उत्तर भारतीय राज्यांमध्ये असल्याने हा मतदारसंघ गाय-पट्ट्यातील लोकभावनांचे प्रतिनिधित्व करतो. २०१५मधील आम आदमी पक्षाच्या झंझावाताचा अपवाद वगळल्यास, भाजपने कधीही न गमावलेला एक विधानसभा मतदारसंघदेखील या लोकसभेअंतर्गत आहे. त्यातही २०१५च्या निवडणुकीतील अपवादात जिंकून आलेल्या कपिल मिश्राने लवकरच आम आदमी पक्षाला राम-राम ठोकत भाजपमध्ये आश्रय घेतला होता. या निवडणुकीत कपिल मिश्रांनी मनोज तिवारी यांच्या प्रचारासाठी संसाधनांची जुळवाजुळवी करण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे स्थानिकांद्वारे सांगितले जाते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

ईशान्य दिल्ली मतदारसंघ हा २०२०मध्ये सीएएविरोधी आंदोलनात घडलेल्या हिंदू-मुस्लीम दंगलींचे केंद्र होते. या दंगलीमुळे मतदारसंघातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाचे धर्मांध ध्रुवीकरण झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचार-पथकाने २०१६च्या कथित व्हिडिओ क्लिप, ज्यामध्ये कन्हैया कुमार देशविरोधी घोषणा देत असल्याचे म्हटले जाते, मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्यात. कन्हैया कुमारसाठी हे पहिले मोठे आव्हान होते.

ईशान्य दिल्लीत भाजपचा प्रचाराचा सर्व भर या कथित व्हिडीओ क्लिपवर होता, ज्याच्या जोडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात सातत्याने मुस्लिमांबाबत केलेली वक्तव्ये होती. ईशान्य दिल्ली मतदारसंघाची निवडणूक भाजपला हवी तशी पूर्णपणे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणावर गेली असती, तर कन्हैय्या कुमारचा एकतर्फी पराभव निश्चित होता. किमान वरकरणी तरी असे ध्रुवीकरण घडले नसल्याचे या मतदारसंघात जाणवत होते. याचे पूर्ण श्रेय कन्हैय्या कुमारच्या प्रभावी वक्तृत्वशैलीला जाते. तो ‘देशद्रोही’ असल्याच्या मोहिमेचा परिणाम भाजपच्या निष्ठावंत मतदारांवर झाला होता, पण सामान्य लोकांमध्ये तो चर्चेचा मुद्दाही नव्हता.      

‘आप’ने दिल्लीतील चार लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार खूप आधीच जाहीर केले असतानाही काँग्रेसने शेवटच्या क्षणी कन्हैया कुमारची उमेदवारी जाहीर केली. दिल्लीत इंडिया आघाडीअंतर्गत आप चार आणि काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवत आहे. भाजपने सुरुवातीच्या टप्प्यातच मनोज तिवारी यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांची प्रचारातील आघाडी साहजिक होती. तरीसुद्धा कन्हैया कुमार काँग्रेसचा उमेदवार झाल्यावरच मनोज तिवारी झोपेतून जागे झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

पूर्वांचली मतदार कन्हैया कुमारच्या दिशेने झुकण्याच्या शक्यतेने मनोज तिवारी यांनी द्रुतगतीने मतदारसंघातील आपला संपर्क वाढवणे सुरू केले. हे दुसरे मोठे आव्हान होते. कन्हैया कुमारला केवळ दोन आठवड्याच्या काळात २५ लाखांहून अधिक मतदारांपर्यंत पोहोचायचे होते आणि क्षेत्रनिहाय प्रचार पथके स्थापन करत त्यांना कार्यरत करायचे होते. ईशान्य दिल्ली मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये संपर्क अभियान राबवत मतदारसंघात कन्हैया कुमारने आपले नाव कोरण्यात यश मिळवले खरे; तथापि, काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील संघटनात्मक यंत्रणेच्या अभावामुळे त्याच्या प्रचारात अडथळा आला. त्याचा प्रचार ‘आप’च्या यंत्रणेवर जास्त अवलंबून होता.

कन्हैया कुमारच्या विजयासाठी ‘आप’चे नेतृत्व वचनबद्ध होते, परंतु आपचे मुख्य लक्ष त्यांच्या वाटेचे चार मतदारसंघ जिंकण्यावर होते. दिल्ली, बिहार आणि देशाच्या इतर भागांतून कन्हैया कुमारचे समर्थक सक्रिय प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी अगदी कमी दिवसांत यशस्वीपणे प्रचार मोहीम उभी केली; मात्र त्यांची ताकद मतदानाच्या दिवशी उपयोगी पडणारी नव्हती.

भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रमुख स्टार-चेहऱ्यांपैकी एक होते. त्यांच्यासारख्या चेहऱ्यांनी या पक्षाला केवळ त्यांच्या मतदारसंघात समर्थनाचा आधार मजबूत करण्यात मदत केली नाही, तर संपूर्ण उत्तर भारतात मोदींची स्वीकारार्हतादेखील वाढवली होती. या ‘फेस व्हॅल्यू’मुळे त्यांना भाजपच्या उमेदवारांच्या यादीत पुन्हा-पुन्हा स्थान मिळाले आहे. २०१९मध्ये दिल्लीत जिंकलेल्या भाजपच्या इतर सहा खासदारांना पक्षाने घरी बसवले, पण मनोज तिवारी यांना डावलले नाही.

खरे तर, मनोज तिवारी यांनी लोकसभेत आणि लोकसभेबाहेर संसदपटू म्हणून क्वचितच काम केले आहे. २०१९मध्ये पुलावामा-बालाकोट प्रकरणानंतरच्या दुसऱ्या ‘मोदी-लाटे’वर स्वार होऊन तिवारी दुसऱ्यांदा निवडून आले. तेव्हा तिरंगी लढतीत, ज्यामध्ये भाजपने आप आणि काँग्रेसच्या उमेदवारांशी सामना केला होता, मनोज तिवारी यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा सहज पराभव केला होता. त्यांच्या मतांची टक्केवारी काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त होती. त्यामुळे या निवडणुकीत मनोज तिवारी विजयाची ‘हॅटट्रिक’ करेल, असा भाजपला विश्वास वाटत होता.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

............................................................................................................................................................

कन्हैया कुमारची उमेदवारी आणि आप-काँग्रेस युतीने ईशान्य दिल्ली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू लागलीत. ईशान्य दिल्ली या लोकसभा मतदारसंघातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सातमध्ये आपचे तर तीनमध्ये भाजपचे आमदार निवडून आले आहेत. सामान्यत: ‘आप’चे अनेक मतदार लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देण्यासाठी ओळखले जातात. कन्हैया कुमारच्या टीमसमोर त्यांची पसंती बदलणे, हे सर्वाधिक कठीण काम होते.

दोन लोकप्रिय आप नेते - गोपाल राय आणि संजीव झा, या लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एका विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. मनोज तिवारी, भाजप व मोदी यांच्यापेक्षा कन्हैय्या कुमार व आप-काँग्रेस युतीला प्राधान्य देण्याचे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न, हे आमदारसुद्धा करत होते. तरीदेखील कन्हैया कुमारसाठी सर्वांत मोठे आव्हान हेच होते की - विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून आपकडे गेलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत आपकडून भाजपकडे गेलेल्या मतदारांना काँग्रेसकडे वळवणे!

येत्या ४ जून रोजी आपल्याला कळलेच की, आव्हाने कन्हैय्या कुमारने कितपत पेलली आहेत. त्याने अत्यंत कमी काळात व मर्यादित साधनांसह मनोज तिवारीसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. पण कन्हैय्या कुमारचा विजय हा संपूर्ण दिल्लीत, तसेच उत्तर भारतात राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, यावर अवलंबून आहे.

दुसऱ्या बाजूने विचार केल्यास, ईशान्य दिल्ली मतदारसंघाचा जो निकाल असेल, त्याच प्रकारचा निकाल दिल्लीतील इतर सहा मतदारसंघांत बघावयास मिळेल आणि दिल्लीच्या मतदारांचा जो कौल असेल जवळजवळ तसाच कौल बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधील मतदार देण्याची प्रबळ शक्यता आहे. थोडक्यात, कन्हैया कुमारचा विजय किंवा पराजय हाच ‘इंडिया आघाडी’चाच निकाल असेल.

.................................................................................................................................................................

लेखक परिमल माया सुधाकर एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे इथे कार्यरत आहेत. या लेखातील त्यांची मते वैयक्तिक आहेत.

parimalmayasudhakar@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......