पुणे, पोर्शे, पोरंपोरी आणि पब्ज; पत्रकारिता व पश्चात्ताप, पश्चातबुद्धी किंवा पळा, पळा, कोण पुढे पळतो…
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेला अपघात आणि ड्रायव्हरला मारहाण करताना लोक
  • Mon , 27 May 2024
  • पडघम राज्यकारण पुणे पोर्श कार अपघात Pune Porsche Acciden कल्याणी नगर Kalyani Nagar

चरफडत, जळफळत अन् नाक मुरडत पाहिला जाणारा टीव्ही, म्हणजे त्या मराठी वृत्तवाहिन्या, त्या दिवसापासून बातमीसाठी अथवा उत्सुकता शमवायला पुन्हा पाहिल्या जाऊ लागल्या. एका दुर्घटनेने या वृत्तवाहिन्या आपल्या बातम्या देण्याच्या जुन्या जमान्यात शिरल्या. खूप वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकल्या. काही तरी ‘बातमीयोग्य’ घडले होते अन् अवघ्या वृत्तवाहिन्या घटना, घटनास्थळ, घटनेतली पात्रं, घटनाक्रम अशा जुन्या घडामोडींत गुरफटून गेल्या होत्या.

कित्येक दिवसांनी, महिन्यांनी की वर्षांनी टीव्हा नावाचा अनेक घरांमधला एक कोपरा अथवा भिंतीवर खिळून उभा (नव्हे, आडवा) राहणारा प्लॅस्टिकचा पदार्थ उजळला होता. त्वेष, संताप, हळहळ, दु:ख, तिरस्कार, संशय अन् कुतूहल या त्याच्या सरावातल्या भावना कित्येक दिवसांनी, महिन्यांनी की वर्षांनी, तो व्यवस्थित हाताळत होता. आश्चर्य एकच वाटत होतं की, टीव्हीची पत्रकारिता पूर्ववत व्हायला एका दुर्घटनेची गरज का पडली? दोन तरुण जीव का गमवावे लागले? तेही हकनाक आणि वाईट पद्धतीनं?

असं वाटत होतं जणू सगळी माध्यमं एका घाणेरड्या स्वप्नातून जागी झाली आणि त्यांना त्यांच्या जुन्या बातम्या द्यायच्या जगात जाग आली. संपादक, वृत्तसंपादक, बातमीदार, निर्माता, अँकर, संकलक, कॅमेरामन, मिक्सर, ग्राफिक्स अशी सगळी खाती आणि त्यातली कुशल माणसं पत्रकारितेच्या हरवलेल्या मूल्यांचा एक तेज:पुंज हिरा अभिमानानं मिरवत आहेत. जणू एका राक्षसाने तो हिरा खूप वर्षांपूर्वी हिसकावून आपल्या गुहेत लपवून ठेवला होता. किती बरं वाटत होतं- आपलेच विद्यार्थी, तरुण मित्र व परिचित ‘बातमी’ देत असल्याचं पाहून. किती वर्षं झाली, ‘हे म्हणाले…’, ‘ते म्हणाले…’, ‘थोबाड फोडले’, ‘टोले लगावले’ अशा वाक्यांमधून सुटका होऊन….

नाहीतर गेली काही वर्षं बातमी कशी ‘रेडिमेड’, ‘प्रीकुक्ड’ रूपात तरी मिळे किंवा अगदी निरपद्रवी अन् अनिंद्य विषयांमधली तरी सादर करावी लागे. आपण ‘पीआरओ’ आहोत की कार्यकर्ते, असा भ्रम झालेला साऱ्या पत्रकारांना.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

असो. आरोपी पोर्शे ही आलिशान कार नशेत चालवून दोन तरुण माणसांचा चाकाखाली बळी घेऊन खरं तर सटकू पाहत होता, पण सापडला. मार खाल्ला. लोक जमले. पोलीस, आमदार आणि अन्य मध्यस्थ सत्तेची सारी हत्यारं घेऊन बचावासाठी सरसावले. त्याला जामीनही मिळाला.

मुंबईतलं मतदान संपवून सारंच राज्य जरा विसावू बघत होतं. पत्रकारांना सकाळी उठून धावाधाव करायची नव्हती. तेवढ्यात पोर्शेने घातलेला हैदोस कानावर पडला. एक ‘हार्ड न्यूज’ दिसत होती अन् तीत सारे गुण साकळलेले होते. पैसा, श्रीमंतीचा माज, गुन्हेगारी, व्यसनं, चैन, निरपराध मृत्यू आणि तारुण्य.

कॅमेऱ्याला या साऱ्या गोष्टींचं विलक्षण आकर्षण. कितीदा दाखवा, कंटाळा म्हणून येत नाही त्याच त्याच पाहायला. कारण टीव्ही जन्माला येताना मनोरंजनही घेऊन आला. पत्रकारितेचा जुळा भाऊ किंवा जुळी बहीण म्हणजे ‘करमणूक’. तुम्ही काही प्रबोधन करायला जाता, तुम्हाला रंजक पद्धतीनेच ते करायची सक्ती असते. भारतात तर ज्यांनी टीव्हीत पैसा गुंतवलेला असतो, त्यांना लोक म्हणजे प्रेक्षक निर्बुद्ध वाटत असतात. त्यांचंही बरोबर आहे म्हणा. टीव्ही बघायला साक्षरता लागत नाही. त्यामुळे सारं हलकंफुलकं ठेवा, असं मालक बजावत असतात.

…तर पैसा, पब्ज, पोर्शे कार, धुंद मध्यरात्र अन् उधळायला तुडूंब असणारं तारुण्य असल्यावर दुसरं काय होणार? सनातनी राष्ट्रवाद्यांच्या मते जे झालं ते ‘पाप’. भारतीय संस्कृतीत जे नसतं, ते सारं यांच्या मते पाप, असंस्कृत आणि विकृत. त्यांच्या मताच्या माध्यमांनी ही घटना भरपूर दाखवली.

गेली १० वर्षं राज्यात अन् देशात उजव्या प्रतिगामी विचारांची सत्ता आहे. हा विचार आवर्जून प्रस्थापित आणि कायदे-नियम यांच्या राखणीचा असतो. त्याला आपली सत्ता हीच खरी सत्ता वाटत असते. कायदा मोडला अन् नियम तोडला एवढ्यापुरताच त्याचा गुन्ह्याकडे बघायचा दृष्टीकोन असतो. त्यामुळे जेव्हा अशा विचारांची माध्यमं एखादी दुर्घटनेची बातमी देतात, तेव्हा तीत कोणाचं चूक-बरोबर आणि काय घडलं, कसं घडलं याच्या भानगडीत पडत नाहीत. ते काम न्यायसंस्थेचं असं त्यांना वाटतं. कारण न्यायसंस्था ज्या कायद्यांच्या आधारावर न्याय देते, त्याविरोधात आपण काही करता कामा नये, हा त्यांचा दंडक.

उलट जी माध्यमं अथवा पत्रकार केवळ कायदे व नियम यांपुरते एखाद्या घटनेकडे न पाहता, तिच्या खोलात जाऊन ती का, कशी, कोणामुळे घडली यांबरोबरच वर्ग, वर्ण, जात, दर्जा, सत्ता, प्रभाव यांचाही संदर्भ बातम्यांत आणतात आणि ते वृत्त अधिक व्यापक, वैविध्यपूर्ण व परिणामकारक करतात, त्यांना उगाचच ‘व्यवस्थाविरोधी’ म्हटलं जातं. त्यांच्या डोक्यात समाजवाद वा भांडवलशाही असे वैचारिक प्रभावशाली काही नसते. बातमी देताना त्या घटनेमधले जेवढे महत्त्वाचे घटक देता येतील, तेवढे देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्पर्धा अर्थातच त्याहीमागे असतेच.

.................................................................................................................................................................

हेहपाहावाचाअनुभवा

धनाढ्य बिल्डरच्या मद्यधुंद मुलाच्या, वेदांतच्या गाडीने दोन खून केले असतील, तर न्याय विकत घेता येत नाही, कायद्यासमोर सर्व समान असतात, हे दिसायला हवे

आपण करतोय हे कृत्य चुकीचे आहे, हे ठाऊक असतानादेखील आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही, ही मानसिकता त्या अल्पवयीन मुलाची पक्की झालेली आहे. या मानसिकतेतून त्याने हे कृत्य केले आहे आणि त्यात हा अपघात घडलेला आहे. त्याला आणि त्याच्या पालकाला म्हणजे त्याच्या वडिलांना शिक्षा व्हायलाच हवी.

.................................................................................................................................................................

पोर्शेच्या अपघाताची बातमी तशी पहाटे घडून गेल्यावर बऱ्याच तासांनी उलगडत गेली. या दुर्घटनेतले जे घटक होते, त्यांचा प्रभाव जसजसा ज्ञात होत गेला, तशी ही बातमी विस्तारत गेली. या घटनाबाह्य घटकांनी अनुभवी, जुन्याजाणत्या पत्रकारांची जिज्ञासा चाळवली गेली. एकेक बाब बाहेर येत गेली अन् कित्येक दिवसांनी पत्रकारांच्या खांद्यावर कुदळ, फावडी, टोपली, पहारी इत्यादी खोदकामाची साधनं दिसू लागली.

प्रत्यक्ष घटना तशी साधी होती. म्हणजे दुचाकीवरच्या दोघांना एक चारचाकी धडक देते, ती दोघं ठार होतात, ती कार धडकून थांबते, लोक जमून ड्रायव्हरला बाहेर काढून चोपतात, पोलिसांचा प्रवेश होतो आणि पुढचे सोपस्कार पार पडतात.

परंतु एक महागडी कार बेदरकारपणे चालवून अपघात करणारे कोण असू शकते? तेही पहाटेच्या सुमारास? वाहनाला ना नंबर, ना वाहनचालकाचा पत्ता! ठाण्यात भारी भारी लोक कसे आले? असे खूप प्रश्न पडायला सुरुवात झाली अन् अनेक दिवसांचा पत्रकारितेचा हरवलेला किंवा हरलेला प्राण पत्रकारितेच्या देहात धडधडू लागला. संताप, तिरस्कार, न्याय, दु:ख, हळहळ, हताशा, त्वेष, सत्याची चाड अशा विचारांचा अन् भावनांचा कल्लोळ पत्रकारांच्या संवेदना जाग्या करून गेला. दिवस मावळता मावळता अवघं जग या दुर्घटनेतली सगळी बाजू ‘जाणते’ झाले. खलनायक, कुटिलता आणि कारस्थान पडद्यांवर झळकू लागले.

पण हा अपराध गंड होता का? ही पश्चातबुद्धी होती का? इतके दिवस अशाच श्रीमंत मालकांनी आपल्याला गावलेली, गवसलेली सत्यं आपल्या भरधाव महत्त्वाकांक्षेखाली चिरडली, याचा राग पत्रकारांना आला होता का? श्रीमंतीबद्दलचा तिरस्कार, धनदांडग्यांना प्राप्त झालेल्या आयत्या सत्तेविषयीची चीड आणि ‘काहीही होवो आम्हाला कोणी हात लावू शकत नाही’, असा या लक्ष्मीधरांचा दर्प पत्रकारांना (या अपघातामुळे) चिथावून गेला का? नक्कीच.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

गेल्या अनेक वर्षांची कुंठा या कल्याणीनगरातल्या दुर्घटनेनं संपवून टाकली. सत्ता, पैसा आणि कायदे रस्त्यावर आणता आले. चार भिंतीआडचे संगनमत तसेही त्यांना ठावूक नसते. ते जगजाहीर करणं तर फार लांबचं. पण भर रस्त्यावर एकत्र येऊन सामान्य माणसांना वाकुल्या दाखवणारी ही दोस्ती पत्रकारातल्या सामान्य माणसाला हादरवून गेली. मग मात्र त्यांच्या पत्रकारितेनं कोणाची पत्रास बाळगली नाही. लोकांना सांगू न शकणाऱ्या मैत्रीच्या अनेक कथासुद्धा या दुर्घटनेमुळे त्यांना समजल्या. स्वत:ला या निमित्तानं शोधताही आलं पत्रकारितेला. किती वाहवत, नादावत अन् गुंगत गेली होती ती इतकी वर्षं…

राहुल गांधी यांनी कल्याणीनगरच्या या दुर्घटनेला वर्गीय नजरेनं अलग करून दाखवलं. ‘कायदा सर्वांना समान’ हे तत्त्व कल्याणीनगरातल्या या दुर्घटनेनं कसं रक्तबंबाळ करून सोडलं, याकडे त्यांनी बोट दाखवलं. कायदेशीर सज्ञान, अज्ञान आणि सत्तासंपत्तीचे विज्ञान पोर्शे, पब्ज व पोरंपोरी यांच्या निमित्तानं भारताला समजले.

एक पत्रकार विद्यार्थीमित्र सांगत होता, न्यायालयाच्या जुन्या इमारतीपुढे किमान ५० तरी कॅमेरे ताटकळत उभे होते. पाहता पाहता सामान्य माणसांच्या मूक, अव्यक्त जायबंदी भावनांचा खराखुरा प्रतिनिधी मीडिया झालेला बघायला मिळाला. चार जून नंतरही त्याला सापडलेले त्याचे स्वत्व टिको, अशी अपेक्षा. सत्यमेव जयते…!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......