२०२४च्या मे महिन्याच्या शेवटी शेवटी! भारताच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाविषयीची उत्सुकता अतिशय ताणली गेली होती. निकालाचा ‘उंट कौनसी करवट पर बैठेगा’ याविषयी प्रत्येक जण विचार करत होता. या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ‘गोदी मीडिया’चे ‘ओपिनियन पोल्स’ आणि सोशल मीडियावरचे निकालांबद्दलचे अंदाज यांच्यात झालेले युद्ध! गोदी मीडिया एकमुखाने सांगत होता की, मोदीजी प्रचंड बहुमताने येणार आणि सोशल मीडिया एकमुखाने सांगत होता की, मोदीजी पराभूत होत आहेत.
पाचव्या फेरीच्या अखेरीस गोदी मीडियाने आपली भूमिका हळूहळू बदलायला सुरुवात केली. ‘लोकनीती’चे संदीप शास्त्री, ‘सी-व्होटर’चे कार्तिकेय बात्रा आणि अॅक्सिसचे प्रदीप गुप्ता यांनी सांगायला सुरुवात केली की, एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात जवळ जवळ प्रत्येक सीटवर ‘कडा मुकाबला’ होतो आहे.
वातावरण अशा रितीने तापलेले असतानाच सट्टा बाजाराच्या अंदाजांनी अजनूच गोंधळ उडवून दिला. मुंबई आणि राजस्थानातील फलौदी या दोन महत्त्वाच्या सट्टा बाजारांनी पाचव्या फेरी अखेर एनडीएच्या जागा कमी करून इंडिया आघाडीच्या जागा वाढवल्या.
खरं तर, पहिल्या दोन फेऱ्यांचे मतदान एप्रिल महिन्याच्या १९ आणि २३ रोजी संपन्न झाले तेव्हाच मोठ्या गोंधळाला सुरुवात झाली होती. भाजपचे जाणते समर्थक मतदानाच्या या दोन फेऱ्यांनंतर चिंतेत पडले. याचे कारण असे सर्वदूर मतदान कमी झाल्याच्या बातम्या आल्या. मतदान कमी झाले, याचा अर्थ काय असा कयास सगळे राजकीय निरीक्षक बांधू लागले.
भाजपचा मोठा समर्थक वर्ग नाराज आहे आणि तो निषेध म्हणून घरी बसला आहे, असा अंदाज काही लोकांनी नोंदवला. काही लोक म्हणू लागले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपच्या मातृसंघटनेने मोदींना सहकार्य करायचे नाही, असे ठरवले आहे आणि संघाने आपल्या समर्थकांना घरी बसायला सांगितले आहे.
गेल्या दोन निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विषयी अत्यंत उत्साह जनतेमध्ये होता. त्यांच्या विविध आश्वासनांमुळे जनता अत्यंत उत्साहात होती. त्यात बालाकोट घडले. ‘पाकिस्तान को घर में घुस के मारा’ ही भावना सर्वदूर उमडून आली. लोक उत्साहात मोदीजींना मतदान करायला बाहेर पडले. या वेळी असा उत्साह काही दिसेना. ही गोष्ट भाजपला महागात पडणार, असे काही राजकीय निरीक्षक म्हणू लागले. त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून भाजपच्या दृष्टीने चिंताजनक बातम्या येऊ लागल्या. १४ आणि १९ च्या निवडणुकीत या दोन राज्यांनी जवळ जवळ सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपला दिल्या होत्या.
‘मेनस्ट्रीम मीडिया’च्या- याला मोदीकालीन भारतात ‘गोदी मीडिया’ म्हणत असत - मते या दोन राज्यातच काय, पण दक्षिणेतील राज्यांमध्येही भाजपला यश मिळणे अपेक्षित होते, परंतु आता काहीच्याबाही बातम्या येऊ लागल्या. खरे मोदीभक्त, मात्र आनंदात होते. भाजप गोत्यात आला आहे, असे विरोधक म्हणत आहेत, याचाच अर्थ मोदीजींना चारशे सीट्स मिळणार, असे मोदीभक्त एकमेकांना मिठ्या मारून म्हणत होते.
मोदीकालात ‘अंधश्रद्धा’, ‘अंधभक्ती’ हे अध्यात्मातले शब्द ‘राजकीय’ शब्द झाले होते. अंधभक्त म्हणजे मोदी यांच्याविषयी अंधभक्ती असलेली व्यक्ती, असा अर्थ भारतभर होऊ लागला होता. अंधश्रद्धा याचा अर्थ भारतात भ्रष्टाचार वगैरे कमी होऊन ‘अच्छे दिन’ आले आहेत, अशी श्रद्धा असा अर्थ भारतभर होऊ लागला.
लवकरच निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतर जवळजवळ दहा दिवसांनंतर मतदान ६६ टक्के झाले आहे, असा रिव्हाइज्ड आकडा जाहीर केला. हा आधी जाहीर केलेल्या आकड्यापेक्षा जवळजवळ सहा टक्क्यांनी जास्त होता. त्यामुळे भाजपच्या अंधभक्तांना हायसे वाटले. काही अंधभक्तांनी कमी मतदानाला घाबरून भाजपचा आकडा चारशे वरून तीनशे पन्नासवर आणला होता, तो घाईघाईने परत एकदा चारशेच्या पार नेला. बालाकोटच्या हाईप नंतरही भाजप ३०३लाच पोहोचला होता. त्यामुळे असला कसलाही ‘हाईप’ नसताना भाजपच्या जागा का वाढतील, असं विचारल्यावर भक्तलोक राममंदिर झाले, भारत ‘विश्वगुरू’ झाला, अशी कारणे देऊ लागले. काही भक्त तर चक्क महागाई कमी झाली आहे, असं सांगू लागले. काही भक्त ‘गोदी मीडिया’ने केलेल्या सर्व्हेंच्या कडे बोट दाखवू लागले.
पण भाजपच्या जागा यावेळी घटणार आहेत, ही चर्चा लिबरल लोकांमध्ये काही थांबेना. लिबरल लोकांचेही यू-ट्यूब चॅनेल्स होते. त्यांचेही विश्लेषक म्हणजे अॅनॅलिस्ट होते. यू-ट्यूब, पार, कट्टे, चौराहे, कॅन्टीन्स अशा सगळ्या ठिकाणी चर्चेच्या ठिणग्या उडाल्या. मोदी विरोधकांना चालना मिळाली. रोज नवी विश्लेषणे केली जाऊ लागली.
मोठे मोठे राजकीय विश्लेषक, मोठे मोठे पत्रकार, मोठे मोठे लेखक आणि विचारवंत आपली मते सांगू लागले. फील्डवर रात्रंदिवस फिरणारे स्थानिक पत्रकार, स्थानिक विश्लेषक यांच्या विश्लेषणाला फार महत्त्व प्राप्त झाले. मे महिन्याच्या १३ तारखेला मतदानाची चौथी राऊंड संपली, तेव्हापर्यंत भाजपला चारशे सोडा, तीनशे सोडा फक्त २०० जागा मिळणार, या चर्चेला ऊत आला. महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, राजस्थान अशा सगळीकडून ‘भाजप पिछड रहा हैं’ अशा बातम्या येऊ लागल्या.
आपल्याला सर्वदूर प्रचार करता यावा, म्हणून मोदीजींनी निवडणुक दीड महिना ताणली होती. ज्या राज्यात आपल्याला अजिबात यश मिळणार नाही आणि ज्या राज्यात आपल्याला निर्भेळ यश मिळणार आहे, अशा राज्यांत निवडणूक एका दिवसात आटोपली गेली होती. उदाहरणार्थ तामिळनाडू, केरळ आणि गुजरात. तमिळनाडू आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यात भाजपला यशाची अजिबात अपेक्षा नव्हती, तिथे एका दिवसात निवडणुका आटोपल्या गेल्या. गुजरात मोदीजींचे स्वतःचे राज्य होते, तिथे सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपला मिळणार, अशी अपेक्षा होती. तिथेही एका दिवसात मतदान आटोपले गेले. महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश वगैरे राज्यात प्रचाराची जरूर होती, म्हणून तिथे सात फेऱ्यात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले.
आता बाबिसाव्या शतकातील आजचा वाचक म्हणेल की, मोदीकालीन भारतात निवडणूक आयोग नव्हता का? याचे उत्तर ‘होता’ असे आहे. पण या काळात ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ हा जंगली न्याय लागू झाला होता. निवडणूक आयोग सगळ्या पक्षांना ‘लेव्हल प्लेईंग फील्ड’ प्राप्त करून देण्यापेक्षा मोदीजींची वैयक्तिक चाकरी करण्यात धन्यता मानत आहे, असे आरोप तेव्हा केले जात होते. त्यात अर्थ असावा असे आज शंभर वर्षांनंतर पाहताना वाटते आहे. नाही तर तामिळनाडूसारख्या ३९ जागा असलेल्या राज्यात एका दिवसात निवडणूक आणि महाराष्ट्रासारख्या ४८ जागा असलेल्या राज्यात सात फेऱ्यांमध्ये निवडणूक याचा दुसरा अर्थ आपण काय लावू शकतो?
पण चौथ्या फेरीनंतर निवडणूक दीड महिना लांबवण्याचा डाव अंगाशी आला आहे की काय, असे मोदीजींच्या विरोधकांना चौथी फेरी जवळ आली तसे वाटू लागले. कारण ‘भाजप पिछड रहा हैं’ ही चर्चा जोर धरू लागली आणि भारतदेशी सर्वदूर पसरू लागली. राजस्थान गोत्यात आला, हरयाणा गोत्यात आला, महाराष्ट्र गोत्यात आला, कर्नाटक गोत्यात आला, अशी चर्चा निवडणूक एका महिन्यात झाली असती, तर फार पसरली नसती.
गेल्या काही निवडणुकांमध्ये मोदीजींची प्रत्येक चाल यशस्वी होत होती, या वेळी ही परिस्थिती बदलू लागली आहे काय, असे सगळ्या विरोधकांना वाटू लागले. अंधभक्त मात्र मोदीजी जे करतील, त्याला टाळ्या वाजवायला ‘कंडिशन’ झाले होते.
शिरोजी सगळी परिस्थिती आपल्या विचक्षण नजरेने बघत होता. दोन्ही पक्षांची मनःस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. भाजप परिस्थिती गंभीर होत चालली आहे, असे त्याचे स्वतःचे मत झाले होते. त्याने तसे आपल्या रोजनिशीमध्ये लिहूनही ठेवले आहे. पण आपले मत तो आपल्या बखरीवर लादणार नव्हता. काही झाले तरी तो ‘प्रोफेशनल इतिहासकार’ होता. असो!
थोडक्यात सांगायचे तर, पाचव्या फेरीपर्यंत दोन्ही पक्ष पुरेसे एक्साईट झाले होते. चर्चेची एक फेरी पांडेजींच्या ठेल्यावर झालीच पाहिजे, अशी उर्मी दोन्ही पक्षांच्या मनात सळसळू लागली. लवकरच फोनाफोनी झाली आणि दोन्ही पक्ष एका रम्य संध्याकाळी एकमेकांच्या आमने-सामने उपस्थित झाले.
इथे अजून एक सांगायचे म्हणजे शिरोजीने या बखरीमध्ये राजा नावाचे एक नवीन पात्र निर्माण केले आहे. काहीही झाले तरी स्वतःला महत्त्व देणारे हे पात्र आहे. बखरीतील नेहमीची पात्रे आपल्या राजकीय भूमिकांना आपल्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देताना दिसतात. राजा मात्र स्वतःचा मोठेपणा कधीही विसरताना दिसत नाही. त्याला चर्चा करायचीच नाहिये. स्वतःचे महत्त्व वाढवणे, हे एकमेव उद्दिष्ट राजाचे आहे. राजा या बखरीमध्ये फार धमाल उडवून देताना दिसतो. असो. आता ही बखर आम्ही वाचकांच्या समोर फार उशीर न करता ठेवत अहोत
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ऐन मे महिन्यातली रम्य संध्याकाळ असं म्हटले, तर लोकांना ते वर्णन खोटे वाटेल. पण मे महिन्यातील काही संध्याकाल खरंच सुंदर असतात. प्री-मॉन्सूनचे ढग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर येऊ लागतात. दुपारी मोठ्या मोठ्या सरी कोसळू लागतात. उन्हाळा मोडतो. या सरींनंतर वातावरण सुंदर होऊन जाते. अशाच एका संध्याकाळी समर आणि भास्कर पांडेजींच्या ठेल्यावर जमले. त्यांनी सहज फोन केला तर नाना, अविनाश आणि अच्युत जवळच होते. ‘या’ म्हटल्यावर ते लगेच आले.
आल्या आल्या नाना पांडेजींना म्हणाले
नाना - पांडेजी ये इलेक्शन तो चलता रहेगा, लेकिन ये सुंदर हवा नहीं रहेगी - भजिया लाव!
पांडेजी - (खुशीत) जरूर!
पांडेजी भजी आणे पर्यंत राजा आला.
त्याची ओळख करून देत समर
समर - नाना, हा राजा, आमचा फार जुना मित्र आहे.
नाना - तुमचा मित्र म्हणजे ‘लिबरल’ असणार!
भास्कर - अर्थात!
समर - आम्ही याला सुब्बू म्हणतो.
अविनाश - का?
भास्कर - सुब्रमण्यम स्वामी यांच्यावरून हे नाव ठेवलं आहे.
(सुब्रमण्यम स्वामी हे मोदीकालीन भारतातील राजकारणी आणि इंटलेक्च्युअल होते. हे हॉर्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. पुढे त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा अनुनय केल्यावर हार्वर्ड विद्यापीठाने त्यांची प्राध्यापकी रद्द केली. आपण ज्या पक्षात आहोत, त्याला विविध प्रकारे त्रास द्यायचा, ही यांची खासीयत होती.)
नाना - सुब्रमण्यम स्वामींवरून? का बरे?
समर - (हसत) कळेल तुम्हाला लवकरच!
(राजा बसतो)
राजा - आपण नाना ना?
नाना - हो?
राजा - भास्कर आणि समरकडून खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. मी लिबरल आहे, पण तुमचं तत्त्वज्ञान समजून घ्यायला आवडेल मला!
नाना - (खुश होत आणि एक भजे तोंडात टाकत आणि खात भास्कर आणि समरला ) फॉरच सभ्य आहेत हे! तुमच्या सॉरखे नॉहियेत.
(अविनाश मोठ्याने हसतो.)
भास्कर - (हसत) कळेल तुम्हाला लवकरच कसे आहेत राजाजी?
राजा - काय आहे, मोदीजींनी फार मोठे आव्हान उभे केले आहे लिबरल तत्त्वज्ञानासमोर.
नाना - (अतिशय खुश होत) असे कुणीतरी करायलाच हवे होते. लिबरल तत्त्वज्ञानामुळे फाळणी झाली देशाची.
राजा - याला उत्तर दिले गेलेच पाहिजे. लिबरल लोकांनी याला उत्तर दिलेच पाहिजे!
भास्कर - तू दे की! तूसुद्धा लिबरल आहेस ना?
राजा - मी आहेच लिबरल, पण मी ‘सॉफ्ट’ लिबरल आहे. नानांसारखे देशभक्त लोक जेव्हा प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा त्या प्रश्नांना उत्तर देणे तुमच्यासारख्या कडव्या लिबरल लोकांचे काम आहे.
भास्कर - आपण मिळून देऊ उत्तर. तू सुरुवात कर सुब्रमण्यम स्वामी!
समर - (हसत) कळलं नाना याला आम्ही सुब्बू का म्हणतो ते! आपण ज्या पक्षात आहोत, त्याचीच गोची करायची.
राजा - तुम्ही मला सुब्बू म्हणा नाहीतर फुब्बू म्हणा, आय डोन्ट केअर! नानांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तर दिलंच पाहिजे.
भास्कर - एकतर ‘द्विराष्ट्रवादा’ची संकल्पना सावरकरांनी मांडली. तीच पुढे जिन्हांनी उचलून धरली.
राजा - अगदी बरोबर! नाना तुम्ही याला उत्तर दिलंच पाहिजे. अगदी योग्य मुद्दा आहे.
नाना - काहीतरी काय बोलताय? मुसलमान लोकांना फुटून निघायला कुणी शिकवायला लागतं का?
राजा - अगदी बेष्ट मुद्दा! भास्कर तू उत्तर दे याचं!
अविनाश - हा चर्चा करत नाहिये. भांडणं कशी लागतील हे बघतो आहे.
राजा - अजिबात नाही. मी शांततावादी आहे, ‘सॉफ्ट’ लिबरल आहे म्हणाल तर सॉफ्ट हिंदुत्ववादीसुद्धा आहे. शांत वातावरणात चर्चा व्हावी, एवढाच माझा उद्देश असतो.
भास्कर - हिंदुत्ववादी लोकांशी बोलताना हा सॉफ्ट लिबरल असतो आणि लिबरल लोकांशी बोलताना सॉफ्ट हिन्दुत्ववादी असतो.
अविनाश - आज आम्ही निवडणुकीवर चर्चा करायला जमलो आहोत.
राजा - काही हरकत नाही. नाहीतरी फाळणी झालेली आहे. आता त्यावर बोलून काहीही उपयोग नाही.
अविनाश - आम्हाला ‘अखंड भारत’ हवा आहे आणि तो आम्ही करणारच.
राजा - अगदी बरोबर! भास्कर, तू ‘अखंड भारता’चे स्वप्न कसे शक्य नाही हे दाखवून देऊ शकतो आहेस का अविनाशला?
भास्कर - (राजाकडे दुर्लक्ष करत) मला वाटते आहे की भाजप हरणार आहे ही निवडणूक!
अविनाश - इस बार चारसौ पार!
राजा - भास्कर तू विषय बदलू नकोस. ‘अखंड भारता’चा प्रश्न निवडणुकांपेक्षा महत्त्वाचा आहे.
नाना - चारशे शक्य नाही, पण ३३० तरी मिळवतील मोदीजी!
भास्कर - (राजाकडे पुन्हा दुर्लक्ष करत) नाना महाराष्ट्र गेला आहे हातातून तुमच्या, कर्नाटक गेला आहे. दोन्ही मिळून चाळीस तरी जागा जातील तुमच्या!
नाना - अख्खा उत्तर भारत आमचा आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल, दिल्ली सगळीकडं मोदीच मोदी आहे.
समर - तोच तर प्रश्न आहे. तिकडे ९६ टक्के जागा आहेत तुमच्याकडे. म्हणजे तिथे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला लॉस कसा भरून काढणार तुम्ही? ११० टक्के जागा मिळवणार आहात की काय?
नाना - बंगाल आहे, ओरिसा आहे, तेलंगणा आहे, केरळ आहे.
अविनाश - आणि महाराष्ट्रात आणि कर्नाटकात चाळीस जागा नाही जाणार आमच्या.
राजा - अगदी योग्य. या जागा कशा जाणार हे तू सांगायला पहिजेस भास्कर.
भास्कर - का नाहीत जाणार हे सांगू दे की त्याला.
राजा - आपण लिबरल आहोत. आपण कनव्हिन्स करायला शिकलं पाहिजे.
भास्कर - तू सांग मग, महाराष्ट्रात त्यांच्या जागा कशा जाणार आहेत.
राजा - तू मुद्दा उपस्थित केला आहेस तू सांग.
समर - वाद नको आहे, मी सांगतो. विदर्भात राहुल गांधी यांची ‘वेव्ह’ आहे. मराठवाड्यात आणि कोकणात उद्धव ठाकरे यांची ‘वेव्ह’ आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांची ‘वेव्ह’ आहे.
भास्कर - मराठे चिडले आहेत आरक्षणावरून, शेतकरी चिडले आहेत शेतमालाच्या भावावरून, एकूण लोक चिडले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली म्हणून.
भास्कर - सगळी कडे दाणादाण उडणार आहे भाजपची.
अविनाश - शक्य नाही. फारतर १२ जागा मिळतील तुम्हाला. गेल्या वेळी ६ होत्या. या वेळी जरा कटकट झाली आहे, म्हणून अजून सहा घ्यायच्या तुम्ही आणि गप्प बसायचं!
नाना - कर्नाटकात गेल्या वेळी दोन मिळाल्या होत्या, या वेळी अजून तीन घ्या. जास्त नाही.
भास्कर - ते बघू आपण.
समर - राजस्थानात आणि हरयाणामध्येसुद्धा बोंब झाली आहे तुमची.
राजा - हे सगळे कशावरून म्हणताय तुम्ही?
भास्कर - अनेक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मतदारसंघांचा अभ्यास करत असतात. लोकांमध्ये मिसळून अंदाज घेत असतात.
अविनाश - आम्ही ‘ओपिनियन सर्व्हे’वर बोलतोय. शिवाय आमचेही इनपुट्स असतात.
भास्कर - मग बिहारबद्दल काय इनपुट आहेत तुमचे?
अविनाश - टोटल स्वीप. चाळीसपैकी चाळीस!
नाना - गेल्या वेळी एकोणचाळीस होत्या बिहारमध्ये आम्हाला. या वेळी बिहारी बाबू एकसुद्धा जागा देणार नाहिये तुम्हाला!
अविनाश - कोणी विचारतसुद्धा नाहिये बिहारमध्ये तुम्हाला!
भास्कर - या वेळी प्रत्येक जागेवर लढत आहे. तेजस्वी यादव डेप्युटी सी एम होता, तेव्हा चार लाख नोकऱ्या दिल्या त्यानं. तरुण विसरलेले नाहीत.
अविनाश - अरे सोड! राममंदिर झालंय आणि मोदीजी म्हणालेत की, २०४७ सालापर्यंत वेळ द्या मला मी भारताला नंबर एकची अर्थसत्ता बनवून दाखवतो.
समर - आज नोकरी मागणारा २२ वर्षांचा तरुण तेव्हा ४६ वर्षांचा झालेला असेल. तोपर्यंत काय खायचं त्यानं?
अविनाश - पाच किलो रेशन देतायत नं मोदी त्याला.
भास्कर - त्याला नोकरी हवी आहे.
अविनाश - तो पकोडे तळू शकतो, पाणीपुरी विकू शकतो तो. शिवाय पाच किलो रेशन.
समर - आर्थिकदृष्ट्या सबळ भारताचं फारच तेजस्वी ‘व्हिजन’ आहे हे. विश्वगुरू मोदी तरुणांना सांगतायत की, पकोडे तळा, पाणीपुरी विका आणि पाच किलो रेशनमध्ये सुखी राहा!
अविनाश - तू चुप!
समर - उत्तर प्रदेश-बिहारच्या तरुणाला आत्मसन्मान हवा आहे. तो म्हणतोय की - राशन नको आत्मसम्मान चाहिये. तो म्हणतोय की, मी बीएससी आहे, मी फुकटचं राशन घ्यायला रांगेत उभं राहू का?
भास्कर - तेजस्वी आणि राहुल म्हणतायत आम्ही वीस लाख नोकऱ्या देऊ. तू बिहारी तरुणाच्या जागी असतास तर कुणाला मत देशील?
अविनाश - त्यांना माहीत आहे की, तेजस्वीच्या नोकऱ्या खऱ्या नाहियेत.
भास्कर - मोदीजी पंधरा लाख देणार म्हणाले, तेव्हा त्याला ते खरं वाटलं होतं. आता त्याला हे खोटं का वाटावं?
अविनाश - अरे, किती खोटं बोलाल गरिबाशी?
भास्कर - (जोरात हसतो) तेजस्वीने लाखो नोकऱ्या ऑलरेडी दिल्या आहेत. मोदीजींच्या पंधरा लाखांसारखं नाही.
अविनाश - तू गप! मोदीजी पंधरा लाख रुपये देईन असं म्हणाले नव्हते. देशाबाहेर गेलेला सगळा काळा पैसा भारतात तर प्रत्येकाला पंधरा लाख देता येतील, असं म्हणाले होते.
नाना - पंधरा लाख रुपये नसतील दिले त्यांनी, पण पाच किलो रेशन खरंच दिलंय त्यांनी.
भास्कर - पंधरा लाख कुठं आणि पाच किलो रेशन कुठं!
अविनाश - मागची इलेक्शन मोदीजींनी पाच किलोवर जिंकली होती.
समर - राहुल म्हणतोय की, आम्ही १० किलो देऊ.
अविनाश - अरे, देश बुडवायचा आहे का तुम्हाला? रेवड्या वाटतायत रेवड्या!
भास्कर - सगळ्या गरीब लोकांना कळून चुकलंय की, आता कुठलंही सरकार आलं, तरी फ्री रेशन द्यायलाच लागणार आहे!
समर - आणि त्यात आता राहुल म्हणतोय की, आम्ही १० किलो देऊ.
भास्कर - अविनाश तू गरीब असतास तर कुणाला मत दिलं असतंस? ५ किलोला का १० किलोला.
नाना - हे बघा, गरीब आणि बेरोजगार तरुण यांच्यापेक्षा ‘स्त्री फॅक्टर’ महत्त्वाचा आहे. भाजप सरकार आल्यापासून ‘लॉ अँड ऑर्डर’ सुधारली आहे. स्त्रिया रात्री बाहेर पडू लागल्या आहेत.
समर - राहुल म्हणाला आहे की, गरिबी रेषेच्या खालच्या कुटुंबातील एका स्त्रीला आम्ही एक लाख रुपये देऊ दर वर्षी. साडे आठ हजार रुपये महीना.
भास्कर - अविनाश तू गरीब स्त्री असतास तर कुठलं स्वातंत्र्य हवं वाटलं असतं तुला? आर्थिक स्वातंत्र्य की, संध्याकाळी दहा मिनिटे एकट्याने बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य?
नाना - हे लोक गरिबाला ऐतखाऊ बनवणार आहेत.
राजा - हे बघा भास्कर आणि समर, तुम्ही दोघांनी इथं सांगायला पाहिजे की, कोणतं स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं आहे! आर्थिक स्वातंत्र्य की, अंधार पडल्यावर मुक्तपणे फिरण्याचं स्वातंत्र्य?
भास्कर - इथं काय चांगलं आणि काय वाईट ही चर्चा सुरू नाहिये. मोदीजींची लोकानुनयाची कार्डं एक एक करून निकामी कशी केली जात आहेत, ते सांगतोय आम्ही.
राजा - नक्की कुठलं स्वातंत्र्य महत्त्वाचं, याचीच चर्चा करायला पाहिजे आपण! राजकारणापेक्षा तत्त्वज्ञान जास्त महत्त्वाचं आहे.
नाना - तुम्ही जरा गप्प बसा सुब्बूस्वामी!
अच्युत - पांडेजी राजाजींना भजी द्या!
नाना - हे बघा, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांत जात फार महत्त्वाची असते. लोक जात बघून मतं देतात. बाकी नोकरी, अन्न आणि पैसा वगैरे मुद्दे गौण ठरतात तिथं.
अविनाश - काल आमचे आदित्य शिक्षक सांगत होते की, तेजस्वी आणि अखिलेश हे दोन्ही यादव ‘एम-वाय’ फॉर्म्युल्यामध्ये अडकून पडले आहेत.
राजा - आदित्य शिक्षक म्हणजे?
भास्कर - त्यांच्यात सिनियर कार्यकर्त्याला ‘शिक्षक’ म्हणतात.
राजा - का?
अच्युत - (राजाकडे दुर्लक्ष करत) ‘एम-वाय फॉर्म्युला’ म्हणजे?
भास्कर - मुसलमान आणि यादव!
नाना - या दोघांच्या पलीकडं कुणी मत देत नाहिये त्यांना.
समर - या वेळी अखिलेश आणि तेजस्वी या दोघांनीही सगळ्या जातीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे. कमीत कमी यादव उमेदवार दिले आहेत. अखिलेशनं तर ८०पैकी फक्त तीन यादव उमेदवार दिले आहेत. बाकी ७७ उमेदवार बाकीच्या जातींचे आहेत. कुर्मी, कोयरी, कुशवाहा, राजभर, पासवान, निषाद, लोध, सैनी, अशा सगळ्या जातीचे उमेदवार आहेत त्यांचे.
पांडेजी - इस वजहसे बहुत बडी सेंधमारी होगी.
अच्युत - सेंधमारी म्हणजे?
नाना - साठमारी. खूप लुटालूट होईल.
भास्कर - (हसत) अहो नाना सेंधमारी म्हणजे स्प्लिट! इतर जातींची खूप मतं स्प्लिट होतील, असं म्हणायचं आहे पांडेजींना!
पांडेजी - सेंध लगाना म्हणजे स्प्लिट करना!
राजा - आपण ‘सेंध’ हा शब्द कसा आला ते बघायचं का?
अच्युत - पांडेजी यांची भजी संपली आहेत, यांना वडा देता येईल का?
अविनाश - हे बघा, नीतीश कुमार यांच्यामागं कूर्मी, कोयरी आणि अतिपिछडा वर्ग आहे. तो त्यांच्या बरोबर राहणार.
नाना - मोदीजींनी नीतीशला बरोबर घेऊन अचूक तीर मारलाय जातींवर!
अविनाश - पिछडा आणि अतिपिछडा मतदार विश्वास नाही ठेवणार तेजस्वी आणि अखिलेशवर.
भास्कर - पिछडा आणि अतिपिछडा राहुलच्या बाजूला आलाय आरक्षणाच्या मुद्द्यावर!
राजा - कसला आरक्षणाचा मुद्दा?
भास्कर - भाजपचे नेते म्हणायला लागले की, मोदीजींना चारशे जागा द्या, कारण आपल्याला घटना बदलायची आहे. त्यावर राहुल म्हणाला की, घटना बदलून हे लोक आरक्षण रद्द करणार आहेत.
समर - ही बातमी सगळ्या भारतात व्हायरल झाली. सगळे दलित विरोधात गेले भाजपच्या!
अविनाश - मोदीजी म्हणाले ना, पण की घटना कोणीच बदलू शकणार नाही!
भास्कर - मोदीजी इतक्या वेळा खोटं बोललेत की, आता कोणी विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर!
समर - आशुतोश वार्ष्णेय यांच्या लेख वाचलास का ‘इंडियन एक्सप्रेस’मधला?
अविनाश - कोण आशुतोश वार्ष्णेय?
भास्कर - ब्राऊन यूनिव्हर्सिटीचा पोलिटिकल सायंटिस्ट आहे.
अविनाश - त्याला काय कळतंय? या हार्वर्ड वगैरेच्या लोकांना काहीच कळत नाही. मोदीजी म्हणाले आहेत हार्वडपेक्षा हार्डवर्क महत्त्वाचं!
भास्कर - हार्वर्डमध्ये जायचं असेल तर हार्ड वर्क करायलाच लागतं. मोदीजींना कळणार नाही ते!
अविनाश - गप्प बस!
समर - आशुतोश वार्ष्णेय फिरला उत्तर प्रदेशमधून. तो म्हणतोय ७० टक्के दलित काँग्रेसला मत देताय या वेळी.
पांडेजी - मैं लगातार संपर्क में हूँ हमारे लोगोंसे यूपी में, सब कह रहें हैं की बदलाव की, हवा हैं इस बार!
अविनाश - इस बार मोदी सरकार!
पांडेजी - सब जाती के व्होट छिटक रहें हैं बीजेपी से!
समर - भारतभरचा दलित तुमच्या विरोधात गेला आहे, हे खरे आहे. आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरला आहे आज. ही निवडणूक तुमच्या हातातून गेली, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ‘आम्हाला घटना बदलण्यासाठी चारशे जागा द्या’ ही तुमची घोषणा!
भास्कर - तुम्हाला आरक्षण कॅन्सल करायचंय, असा अर्थ घेतायत लोक!
समर - तुमचे आनंद हेगडे, तुमचे लल्लू सिंग, तुमच्या ज्योती मिर्धा सगळे ओरडून ओरडून सांगत होते की, आम्हाला चारशे जागा द्या आम्हाला घटना बदलायची आहे. त्यांचे व्हिडिओ राहुल, अखिलेश आणि तेजस्वी यांनी व्हायरल केलेत भारतभर.
भास्कर - पंधरा साली मोहनजी भागवत म्हणाले होते की, आरक्षणाचा समीक्षा झाली पाहिजे, तो व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे.
समर - सगळी बोंब झाली आहे.
अविनाश - बोंबबिंब काही नाही. आणि काहीही झालं तरी एक अकेला मोदी सब पर भारी!
समर - सब पर भारी तर मोदीजी घाईघाईनं कशाला सांगत फिरतायत की, कुठल्याही परिस्थितीत घटना बदलली जाणार नाही म्हणून, आरक्षण रद्द होणार नाही म्हणून?
नाना - गेल्या वेळी तुम्ही म्हणत होता की, बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे, आता मोदी जाणार! झालं काय? आला मोदीच!
अविनाश - या वेळी तुम्ही आरक्षण आरक्षण करून नाचताय - येणार मोदीच
भास्कर - कळेल!
समर - सीएसडीएसचे संजय कुमार म्हणत होते की, गेल्या वेळी लोकांनी भावनेला जास्त महत्त्व दिलं, या वेळी लोक आर्थिक मुद्द्यांना महत्त्व देताना दिसतायत.
अविनाश - बस म्हणावं बोंबलत तुझ्या संजय कुमारला!
भास्कर - या वेळी मोदी येणार असं म्हणतायत ते पोल्स चुकणार आहेत उत्तर प्रदेशबाबत.
नाना - का?
भास्कर - आशुतोष वार्ष्णेय म्हणतोय की, लोग चुप्पी साधे हुए हैं. बोल नहीं रहें हैं! टेरर हैं!
नाना - कसला टेरर?
भास्कर - भाजपचा!
अविनाश - तू गप्प बस. भाजप सुसंस्कृत पार्टी आहे. तुमच्यासारखी नाहिये ‘अर्बन नक्षल’.
भास्कर - अरे, हे मी नाही म्हणत, आशुतोष वार्ष्णेय म्हणतोय.
अविनाश - तो ‘हार्वर्ड नक्षल’ आहे.
समर - अरे, कॅपिटॅलिस्ट यूनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो वार्ष्णेय!
अविनाश - ‘कॅपिटॅलिस्ट नक्षलवादी’
भास्कर - (जोरात हसतो) हे ‘बॉयलिंग आइसक्रीम’ म्हणण्यासारखं आहे.
अविनाश - म्हणजे?
समर - कॅपिटॅलिस्ट लोकांना संपवण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला होता.
अविनाश - ते काही महत्त्वाचं नाही. हा वार्ष्णेय कसला तरी नक्षलवादी आहे हे नक्की!
भास्कर - तो म्हणतोय की दलित आणि ओबीसी दबा धरून बसले आहेत. बोलत नाहियेत. मतदानाच्या वेळेला भाजपला काम दाखवणार आहेत.
भास्कर - राजस्थान, हरयाणामध्ये जाट, दलित आणि मुसलमान एकत्र आले आहेत. शेतकरी चिडले आहेत.
नाना - दर वेळी तुमचं हेच चाललेलं असतं. हा चिडलाय आणि तो चिडलाय. येतो मात्र मोदीच!
अविनाश - इकडं मूर्ख शेतकऱ्यांमुळे जागा गेल्यातर मोदीजी आंध्रा, ओरिसा आणि बंगालमधून भरून काढतील त्या जागा!
समर - अग्निवीरचा मुद्दा आहे शेतकरी चिडलाय.
भास्कर - हरयाणा सरकार पडायला आलंय.
अविनाश - पंजाब- हरयाणाच्या शेतकऱ्याचं काही सांगू नकोस. ‘खलिस्तानी’ आहेत ते.
भास्कर - ज्यांना तुम्ही ‘खलिस्तानी’ म्हणालात, त्याच शेतकऱ्यांकडं मतं मागायला जायला लागतंय तुम्हाला आता.
समर - ते म्हणतायत आम्ही ‘खलिस्तानी’ आहोत, तर आता कशाला मतं मागताय?
अविनाश - तोच तर प्रॉब्लेम आहे. जे जे लोक मोदीजींनी केलेल्या कायद्याला विरोध करतील, त्यांचा मतदानाचा अधिकार रद्द केला पाहिजे. खलिस्तानी साले!
भास्कर - अरे, असं कसं करता येईल?
अविनाश - एवढं काम करतायत मोदीजी देशासाठी आणि तुम्ही त्यांना विरोध करताय?
पांडेजी - इस बार ये सब बातें चल नहीं रहीं है!
अविनाश - क्या नहीं चल रहीं हैं?
पांडेजी - मोदीजीका अठारा अठारा घंटे काम करना, अच्छे दिन, विश्वगुरू कुछ चल नहीं रहां हैं! ये सब ‘कांठ की हंडी’ हो गई हैं.
अविनाश - ‘कांठ की हांडी’ म्हणजे?
नाना - बिरबलाची काठ्यांवरची हांडी!
समर - नाही नाना, कांठ की हांडी म्हणजे लाकडाचे पातेले! एकदाच स्वयंपाक करता येतो त्यात. परत परत नाही.
भास्कर - १४ आणि १९ साली स्वयंपाक झाला या भांड्यात, आता लोक विचारतायत कामं काय झाली ते सांगा.
समर - आता बेरोजगारी, महागाई असे मोठे प्रश्न! बाकी काही बोलायचं नाही.
पांडेजी - इन सभी चीजोंके बारेमें मोदीजीका रिकॉर्ड ‘जीरो बटा सन्नाटा’ हैं!
अविनाश - ‘जीरो बटा सन्नाटा’ म्हणजे?
भास्कर - झीरो भागिले सन्नाटा! (जोरात हसतो)
अच्युत - आयला भारी फ्रेज आहे. मराठीत रूढ केली पाहिजे. जीरो बटा सन्नाटा!
समर - लोक म्हणतायत की, मोदी म्हणजे ‘जीरो बटा सन्नाटा’!
अविनाश - अरे सोड! सत्तर वर्षात झाली नाही, एवढी प्रगती झाली आहे भारतात गेल्या दहा वर्षात!
भास्कर - एक सांग, एवढी प्रगती झाली आहे, तर मोदीजी आपल्या भाषणात काय काय प्रगती झाली आहे ते का नाही सांगत?
नाना - त्याचं काय आहे, प्रगती तर लोकांना दिसतंच असते. चुनावी भाषणात चित्ताकर्षक मुद्दे बोलायचे असतात.
भास्कर - चित्ताकर्षक मुद्दे म्हणजे कांग्रेस सत्ता में आई तो आपका मंगलसूत्र छीन के मुसलमानों को देगी?
समर - किंवा कांग्रेस सत्ता में आई तो आपकी दो भैंसोंमेसे एक मुसलमानों को देगी?
अच्युत - आपकी संपत्ती कांग्रेस ज्यादा बच्चे पैदा करनेवालों में बांट देगी! हा माणूस पंतप्रधान असून असं बोलतो. लाज आणली आहे यानं! (हसतो)
अविनाश - हसू नकोस अच्युत. मोदीजींना हसायला तू ‘लिब्रांडू’ आहेस का?
अच्युत - अरे, हसायचं नाही तर काय? हे काय चुनावी मुद्दे आहे का?
नाना - मोदीजींना सर्वसामान्य मतदाराला काय भिडतं ते बरोबर कळतं. तुम्ही हसा आज, चार तारखेला निकालाच्या दिवशी कळेल तुम्हाला ‘मोदी का जादू’!
अच्युत - अशी जादू नकोय आम्हाला आता. मी दोन वेळा मोदीजींना मत देऊन फसलो आहे. या वेळी मी काँग्रेसला मत दिलं आहे.
अविनाश - तुझ्याविषयी मला शंका होतीच. तुझ्यात ‘लिब्रांडू’पणाची सुप्त बीजं होतीच.
पांडेजी - चिढिए मत अविनाशजी! इसे एन्टीइंन्कम्बन्सी कहते हैं.
भास्कर - अच्युतनं जर काँग्रेसला खरंच मत दिलं असेल, तर भाजप गोत्यात आली आहे, हे मनात नक्की धरून चाला!
समर - आपला हा छोटासा सर्व्हेच आहे. आपल्या ग्रूपमधला २० टक्के मतदार फुटला आहे. मोदी तो गयो!
राजा - आपण एक पैज लावू.
नाना - नक्की लावू!
अच्युत - काय लावायची पैज?
राजा - मोदी जिंकले तर भास्कर आणि समर मोदीजींनी केलेली दहा चांगली कामे, यावर निबंध लिहितील आणि मोदीजी हरले, तर मोदीजींच्या दहा चुका, यावर नाना आणि अविनाश निबंध लिहितील.
नाना - ही कसली पैज? काहीतरी खायची पैज लावा.
अविनाश - मोदीजींनी एकसुद्धा चूक केलेली नाही. मोदीजी पडणार नाहीत. संपला विषय.
राजा - तुम्हाला नुसत्या गप्पा मारायाच्या आहेत, दुसऱ्याची बाजू लक्षात न घेता.
समर - आणि तुला भाव खायचा आहे, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळा कसा आहे हे दाखवून! सुब्रमण्यम स्वामी!
अविनाश - नुसता सुब्रमण्यम स्वामी नाही, ‘लिब्रांडू सुब्रमण्यम स्वामी’!
पांडेजी - इस बात पर मेरी तरफसे सबको भजिया और चाय! राजाजी की वजह से समर और अविनाश का जिंदगीमें पहली बार एकमत हो गया किसी बातपर!
भास्कर - या राजाला दिल्लीला पाठवा मोदीजी आणि राहुल यांच्यातही एकमत होईल!
अविनाश - मोदीजी आणि राहुल यांची तुलना करू नकोस प्लीज! मोदीजी फार मोठे आहेत!
भास्कर - आयेगा तो राहुलही!
अविनाश - आयेगा तो मोदीही!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
तर मतदानाच्या पाचव्या फेरीअखेर असा सगळा माहौल होता. निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण फार महत्त्वाची आणि लोकशाहीच्या दृष्टीने फार आश्वासक गोष्ट मतदानाच्या या फेऱ्यांच्या दरम्यान अनेक लोकांच्या लक्षात आली. ती गोष्ट म्हणजे, भारतातील भारताच्या राज्यघटनेचे खरे रक्षणकर्ते दलित आणि ओबीसी आहेत. भाजपच्या नेत्यांनी राज्यघटना बदलण्यासाठी ज्या क्षणी चारशे जागा मागितल्या, त्या क्षणी भाजप विरुद्ध लोकमताचे वादळ घोंगावू लागले. आरक्षण हा दलित आणि ओबीसी समाजासाठी अतिशय संवेदनशील विषय होता. पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी आपली जमीन जाईल की काय, या शंकेने पेटून उठला होता. त्या भीतीमुळे २०२१ सालचे शेतकरी आंदोलन पेटले होते. पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांनी तीन शेतकी कायदे मागे घ्यायला लावले होते.
तीच गोष्ट दलित आणि ओबीसी यांच्या बाबतीत आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले.
राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार होते. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते. घटना बदलू पाहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या हिंदुत्ववादी शक्तींसाठी याची तीव्र जाणीव या निवडणुकीच्या दरम्यान झाली. हिंदुत्ववादी शक्तींसाठी हा फार मोठा ‘रिअॅलिटी चेक’ होता. घटनाबदलाचे आणि आरक्षणद्वेषाचे कार्ड यावेळी भाजपच्या अंगाशी आले होते. परंतु, मुस्लिमद्वेषाचे कार्ड आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचवेल, असे भाजपच्या ‘थिंक टँक’ला या निवडणुकी दरम्यान वाटत राहिले होते.
निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे लोकशाही बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment