‘आणि मी रस्ता ओलांडला’ : लहानपणीचा धडपडीचा काळ, पत्रकारितेत येण्याआधीचा संघर्षपूर्ण काळ आणि सिनेक्षेत्रातील मुशाफिरीचा छोटासा काळ यांचा वाचनीय ‘कॅलिडोस्कोप’
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • श्रीकांत बोजेवार यांच्या ‘आणि मी रस्ता ओलांडला’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 25 May 2024
  • ग्रंथनामा शिफारस श्रीकांत बोजेवार Shrikant Bojevar आणि मी रस्ता ओलांडला Aani Me Rasta Olandla

पत्रकार आणि साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांच्या ‘आणि मी रस्ता ओलांडला’ या पुस्तकात त्यांनी ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकात लिहिलेल्या सहा लेखांचा समावेश आहे. पत्रकारांच्या अंगी दिलेल्या वेळेत लेखन करण्याचं कसब असतं, पण तरी बोजेवारांकडून हे लेखन झालं, त्यामागे ‘ऋतुरंग’चे संपादक अरुण शेवते यांच्या प्रेमळ तगाद्याचा मोठा हातभार आहे, असं त्यांनी मनोगतात म्हटलं आहे.

या पुस्तकातील ‘आणि मी रस्ता ओलांडला’ हा लेख लेखकाच्या तरुणपणातल्या धडपडीचा आलेख मांडणारा आहे. अनेकांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत नाही. त्यांच्यासाठी पोटासाठी करावयाचं काम आणि आवडीचं काम, या दोन स्वतंत्र गोष्टी होऊन बसतात. यांतल्या कोणत्याही कामाकडे वेळ देता आला नाही की, मनात ओढाताण निर्माण होते. काही जण आवडीच्या कामाला पूर्णतः सोडचिठ्ठी देऊन टाकतात. काही जणांच्या आयुष्यात मात्र कधीतरी अशी वेळ येते की, त्यांना ते त्या क्षणी ज्या टोकावर उभे असतात, तिथून जाणाऱ्या दोन रस्त्यांपैकी एकाची निवड करावयाची असते. योग्य मार्गाच्या निवडीनंतर त्यांच्या आयुष्यात कोणतीही ओढाताण उरणार नसते. लेखकाच्या जीवनातही असा प्रसंग उभा राहिला, तेव्हा त्याने कशा पद्धतीने तो प्रसंग निभावून नेला, हे या लेखात कथन केलं आहे.

लेखकाच्या वडिलांना मुंबईत राजकमल स्टुडिओत नोकरी करण्याची संधी मिळाली होती. पण काही कारणास्तव त्यांना गावी जावं लागतं. नंतर ते काही परत मुंबईत परतू शकले नाहीत. त्यामुळे लेखकाला जेव्हा बारावीत नापास झाल्यानंतर आयटीआयमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स उर्फ रेडिओ टीव्ही’ हा कोर्स पूर्ण करून मुंबईत जाण्याची संधी मिळत होती, तेव्हा वडिलांना मुलाने मुंबईत जावं आणि आपली अर्धवट राहिलेली स्वप्नं पूर्ण करावीत, असं साहजिकच वाटत होतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

याच काळात लेखकाचं काही ना काही लेखनही सुरू होतं. त्याच्या दोन कथा साताऱ्याच्या ‘गुन्हेगार’ मासिकात छापून आल्या होत्या. मुंबईत आल्यानंतर बाहेरून आलेल्या कोणालाही स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी जसा संघर्ष करावा लागतो, तो त्यालाही चुकला नाही. एक साधी नोकरी मिळवण्यासाठीही त्याला खूप झटावं लागलं. पण त्याही दिवसांत फावल्या वेळेत तो दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन वाचन करत असे. मग त्याला बऱ्याच काळाने टीव्ही दुरुस्तीच्या क्षेत्रात नोकरी मिळते. त्यात तो प्रगतीही करतो, पण आत कुठेतरी लेखनाची ओढही त्याला स्वस्थ बसू देत नाही.

त्याची टीव्ही दुरुस्तीच्या क्षेत्रातील नोकरी जाते आणि पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो. त्याला एकाच दिवशी, एकाच वेळी टीव्ही दुरुस्तीच्या क्षेत्रातील नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावणं येतं आणि ‘राजधानी मुंबई’ या वर्तमानपत्रातील नोकरीसाठीही. तो दुसरा पर्याय निवडतो आणि मग पुढच्या काळात याच क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभा राहतो आणि लेखनाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो.

या प्रवासात त्याला साहाय्य केलेल्या माणसांची लेखक कृतज्ञतापूर्वक नोंद करतो. हा प्रवास नोंदवताना तो स्वतःच्या झालेल्या फसगती, त्याच्या भोळ्या स्वभावामुळे निर्माण झालेले पेचप्रसंग, या गोष्टीही सांगायला विसरत नाही. त्याच्यावर गुदरलेल्या वाईट प्रसंगांचं वर्णन चार्ली चॅप्लिनच्या सिनेमांतील प्रसंगांप्रमाणे एकाच वेळेला मनाला चटका लावतं आणि त्याच वेळी चेहऱ्यावर हास्यही फुलवतं.

उदाहरणार्थ, लेखक ज्या वेळी मुंबईत त्याच्या आईच्या मानलेल्या भावाच्या घरी राहत होता आणि त्याच्याजवळ काहीही काम नव्हतं, त्या दिवसांत घडलेल्या एका प्रसंगाचं लेखक कशा तऱ्हेने वर्णन करतो ते पहा. खरं तर हा प्रसंग अत्यंत करुणास्पद आणि वाचणाऱ्याच्या आतड्याला पीळ पाडणारा आहे. पण लेखक अत्यंत मिश्कीलपणे त्याचं वर्णन करतो. तो प्रसंग असा :

“एकदा तर धमालच झाली. मी उपाशीच घरी आलो. घरात थोडे तांदूळ आणि डाळ होती. त्याची खिचडी करावी, असा माझा बेत होता. घरी आलो, तर मामा आणि त्याच्या हॉस्पिटलमधली काही वरिष्ठ डॉक्टर मंडळी वगैरेंचं दारूचं साग्रसंगीत काम सुरू होतं. मग मी आयताच हरकाम्या सापडलो. पाणी आण, सोडा आण वगैरेसाठी. थोड्या वेळाने भुर्जी खाण्याची टूम निघाली. मला पैसे देण्यात आले. मी बाहेर जाऊन पंधरा अंडी आणि ब्रेडचे तीन पॅकेट, कांदा, मिरची वगैरे घेऊन आलो. मोठ्या पातेल्यात भरपूर तेल वगैरे घालून भुर्जी केली आणि एका थाळीत काढली... मामा किचनमध्ये आला आणि थाळी घेऊन गेला. समस्त बेवडमंडळींनी मिटक्या मारत भुर्जी फस्त केली. माझ्या पोटात अक्षरशः कावळ्यांची शाळा कोकलत होती. दारू अति झाल्यामुळे बाहेरच्या रूममध्ये उलट्यांचे आणि शिव्यांचे सत्र सुरू असताना मी किचनमध्ये ब्रेडच्या पॅकेटमधील अगदी सुरुवातीचे जे अर्धवट तुकडे असतात ते भुर्जीच्या पातेल्यातील शिल्लक तिखट तेलाला पुसूनपुसून खात होतो. ‘ब्रेडचे तुकडे चोळीता तेलही मिळे’चा दुर्मीळ अनुभव घेत होतो!” (पृ. ३५-३६).    

‘आणि मी रस्ता ओलांडला’ हा २००८ साली ‘ऋतुरंग’मध्ये प्रकाशित झालेला लेख प्रचंड वाचकप्रिय ठरला. त्यावर त्यांना आजही कुठून कुठून प्रतिक्रिया मिळत असतात, असं त्यांनी मनोगतात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुस्तकाचं नाव याच लेखावरून ठेवलं आहे.

‘दिग्रस’ या लेखात दिग्रस या गावात लहानपणी घालवलेल्या दिवसांच्या आठवणी काही व्यक्ती, स्थळं यांच्याशी निगडित घटनांच्या माध्यमांतून शब्दबद्ध केल्या आहेत. या गावातील बस स्टॅण्डवरील गजबज, बुकस्टॉल, एसटींची ये-जा, खायचे पदार्थ यांची वर्णनं करून लेखक ‘या स्टॅण्डवर कुठल्याही गावाला जायचं नसताना माणसं न्याहाळत बसणं हा परमानंद होता,’ असं म्हणतो, तेव्हा पुढील काळात त्याच्या हातून लिहून झालेल्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रांची घडण करताना त्याला या स्टॅण्डवर माणसांचे व्यवहार पाहत घालवलेला काळ कामी आला असावा, असं आपण म्हणू शकतो.

या स्टॅण्डवरील स्टॉलवर सोमवारचा दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ गुरुवारी येत असे. लेखक नेमाने ते वाचत असे. त्यातून त्याची वाचनभूक वाढत गेली. मग त्याने स्टॉलवरील हिंदी, मराठी रहस्यप्रधान कथा-कादंबऱ्यांचा फडशा पाडायला सुरुवात केली. त्याची आई शिक्षिका होती आणि वडील लेखक, कार्यकर्ते. त्यांच्या व्यवसायाचा काहीएक प्रभाव लेखकाच्या जडणघडणीत निश्चितच असणार. त्यामुळे त्याचं वाचनाकडे वळणं हे अकस्मात घडलेलं आहे, असं म्हणता येणार नाही.

या लेखात लेखक या गावातील काही ना काही कारणांमुळे त्याच्या आठवणींत रुतून राहिलेल्या व्यक्तींची ओळख करून देतो. त्यांत स्टॅण्डवर पैशासाठी हात पसरणारा फाटका माणूस आहे, तसा अडचणीच्या वेळी खूप मायेनं मदत करणारा ताजुद्दीन रिक्षावालाही आहे. त्याचे चित्रपटवेडाने झपाटलेले लहानपणचे सवंगडी - पूर्ण्या आणि केशा - आणि त्यांच्यासोबत घालवलेले दिवस आठवणींत आजही ताजे आहेत. त्या वेळी या दोघांबरोबर चित्रपट बनवण्याचं खूळ लेखकाच्या डोक्यात घुसतं आणि मग त्यासाठी ते काय काय करतात, त्याची मजेदार हकिकत कथन केली आहे.

लेखक त्या काळातील गावाचं मोहक चित्र रेखाटतो. त्याची भाषा काही वेळा काव्यात्म वळण घेते. गावातील चित्रपटगृहांविषयी लिहिताना तो लिहितो, “गावातील शंकर टॉकीज आणि श्रीकृष्ण टॉकीज ही दोन चित्रपटगृहे म्हणजे स्वप्नांच्या जगाचे दोन रस्ते होते.”

‘लिहून थोडे लहान व्हावे...’ या लेखातही गावातील ऋतुमानाशी जोडलेल्या स्मृतींच्या दारांवर ठकठक करणाऱ्या काही घटनांचं वर्णन केलेलं आहे. ‘गावातील पावसाळ्याचे दिवस’ या लेखात कोणकोणते खेळ खेळले जायचे, वडील ट्रान्झिस्टरवर कोणती गाणी ऐकायचे, या आठवणी सांगताना काही वेळा लेखकाचा सूर स्मृतिकातर होतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

‘माझी चित्तरकथा’ या लेखात सिनेमांच्या शूटिंगच्या वेळी जे काही बरे-वाईट अनुभव आले, ते प्रामाणिकपणे कथन केले आहेत. त्यातून या क्षेत्रातील काही बड्या नट-नट्या, दिग्दर्शक-निर्माते यांचे चित्रविचित्र स्वभावविशेष, या क्षेत्रातील अनिश्चितता यांचा परिचय होतो. त्याने दासबाबू या दिग्दर्शकासोबत करायला घेतलेल्या सिनेमाचे निर्माते मराठवाड्यातील एक आमदार होते. या आमदार महाशयांना आपण सिनेमात झळकलो पाहिजे याची खुमखुमी होती. मग त्यांना भूमिका देता यावी, म्हणून लेखकाला पटकथेत अनेकवार बदल करावे लागले. मग पुढे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळेला आणखीच गमतीजमती घडत गेल्या. या चांगली कथा-पटकथा असलेल्या सिनेमाचा पुढे कसा बोऱ्या वाजला, याचं कथन अतिशय खुसखुशीत शब्दांत केलेलं आहे.

‘माणसं छोटी डोंगराएवढी’ या लेखात भेटलेल्या आणि काही कारणांमुळे लेखकाच्या मनावर प्रभाव टाकून गेलेल्या दोन व्यक्तींबाबत लिहिलेलं आहे.  

अखेरचा इरफान खान या नटावर लिहिलेला ‘तो भेटत राहणार’ हा लेख मात्र या पुस्तकात अस्थानी वाटतो. या लेखात इरफानच्या कारकिर्दीची त्याच्या काही मोजक्या चित्रपटांतील अभिनय कौशल्याची चर्चा करून ओळख करून दिलेली आहे. त्यात लेखकाचा त्याच्यासोबत व्यक्तिगत असा काही अनुभव निगडित नाही. आधीच्या पाचही लेखांत मात्र आत्मचरित्रात्मक तपशिलांतून तो पत्रकारिता, सिनेमा या क्षेत्रांतील अनुभव व्यक्त करतो. त्याचा संघर्षकाळ साक्षात उभा करतो. लेखक आपल्या सुख-दु:खांविषयी थेट वाचकापाशी मन मोकळं करतो. खुलं, मोकळंढाकळं स्वरूप या लेखनाचं आहे.

इरफानवरील लेखात या सगळ्या गोष्टी तर हरवून बसतातच, पण त्याचबरोबर हा लेख त्रयस्थपणे लिहिलेला आहे, हेही जाणवतं. त्यामुळे हा लेख पुस्तकात नसता, तर आशयाच्या अंगानं त्याला अधिक बांधीव स्वरूप प्राप्त झालं असतं, असं वाटतं. तरीही बोजेवार यांचं हे छोटेखानी पुस्तक त्यांचा दिग्रससारख्या आडबाजूच्या गावात गेलेला लहानपणीचा धडपडीचा काळ, त्यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्याआधीचा संघर्षपूर्ण काळ, सिनेक्षेत्रातील मुशाफिरीचा छोटासा काळ अत्यंत वाचनीय स्वरूपात साकार करतं.   

‘आणि मी रस्ता ओलांडला’ - श्रीकांत बोजेवार

ग्रंथाली, मुंबई | पाने - ९६ | मूल्य - १५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......