‘लापता लेडीज’ : जग कितीही बदललं असलं, तरी काही वैश्विक शाश्वत मूल्यं अजूनही आहेत, ती जपणारी माणसं आहेत, यावर हा सिनेमा विश्वास ठेवायला भाग पाडतो
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
प्रिया काळे
  • ‘लापता लेडीज’चं एक पोस्टर
  • Sat , 18 May 2024
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा लापता लेडीज Laapataa Ladies किरण राव Kiran Rao

‘लापता लेडीज’ हा सिनेमा रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘नौकाडुबी’ (१९०६) या कादंबरीवर आधारित आहे. मध्य प्रदेशातील सिहोर तालुक्यामधील बामूलीया व धामनखेडा या गावांमधील खऱ्याखुऱ्या घरांमध्ये चित्रित केला आहे. तगडी स्टारकास्ट, मारामाऱ्या, ग्लॅमर, डोळे दिपवणारं नेपथ्य, उत्तेजक दृश्य, चटपटीत (‘बोल्ड’ म्हणणं रास्त ठरेल इथं) संवाद, गाणी, नृत्य, भपकेबाजपणा यातलं काहीही नसूनसुद्धा हा सिनेमा प्रेक्षकाला खिळवून ठेवू शकतो. याचं श्रेय किरण राव यांचं दिग्दर्शन कौशल्य आणि चित्रपटातील पात्रांच्या सहजसुंदर अभिनयाला जातं. 

लग्न झाल्यावर घरी नेताना दीपक कुमारच्या बायकोची ट्रेनमध्ये अदलाबदली होते. त्याच्यासोबत दुसरीच कोणीतरी येते. त्याची बायको फूल हरवते. तो जवळच्या पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करतो आणि स्वतःसुद्धा फूलला शोधायचा प्रयत्न करतो.

इकडे बदली होऊन आलेली जया आपलं नाव पुष्पा असल्याचं सांगून वेगळेच बेत आखते. खूप साऱ्या घडामोडींनंतर फूल आणि दीपक एकमेकांना भेटतात, तर जयाच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते.

दीपक कुमारचं घर आणि घरातली माणसं आपल्याला आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये दिसतील. वयस्क आजोबा, मिश्किल आजी, कष्टाळू आणि अबोल वाहिनी, परखड आई, व्यवहारी वडील, पुतण्या असे त्याचे कुटुंब. एकमेकांना धरून राहणारे, एकमेकांच्या सुखदुःखाची पर्वा करणारे, एकमेकांना खंबीर आधार देणारे अगदी एकजीव असे. या घरात आलेल्या जयाला त्यामुळे कुठेच अवघडलेपण जाणवत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तिची सगळ्यांशी मैत्री होते. दीपकचा एक मित्र तिच्याकडे अगदी सहज आकर्षिला गेलाय. तिलाही ते माहीत आहे, पण ते तितक्याच स्वाभाविकपणे दोघांनीही कबूल केलंय. या आकर्षणाला कोणतंही लेबल न लावता ते स्वाभाविकपणे वावरताना दिसतात. त्याचं तिला मदत करणं, तिच्या आसपास राहणं, ती सांगेल ते ऐकणं आणि तिची बाजू ऐकून घेऊन तिच्या बाजूने उभं राहणं खूप छान रंगवलंय. त्याचं हे सहानुभूतीतून आलेलं आकर्षण आणि नंतर तिच्याबद्दल असलेलं कौतुक कुठलाही भडकपणा येऊ न देता अभिनयातून साकारलंय.

ऑरगॅनिक म्हणजे शेती या विषयात शिक्षण घ्यायचं जयाचं स्वप्न असतं. वडलांनी विकून टाकलेली जमीन तिला परत मिळवायची असते. पण तिची आई मात्र लग्न होणं हेच मुलीचं नशीब मानणाऱ्यांपैकी असल्याने ती तिच्या शिक्षणाला विरोध करते. शेतीवरचा विश्वास आणि शेती ही श्रद्धा समजुतीतून नाही, तर विज्ञानाच्या आधारे करण्याची गोष्ट आहे, हे जयाला कळून चुकतं. त्यामुळे तिला शेतीत आधुनिक शिक्षण घेऊन स्वतःची शेती सोडवून त्यात उत्तम प्रयोग करून चांगली पिकं घ्यायची असतात. आजच्या काळात शेती, शेतकऱ्यांबद्दल विचार मांडण्याचं, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं धाडस किरण राव यांनी केलं आहे.

जया जेव्हा दीपकच्या आईने केलेल्या भाजीचे कौतुक करते, तेव्हा तिला त्याचं खूप नवल वाटतं. ‘खाने की, भी कोई तारीफ करता हैं?’ असा भाबडा प्रश्न ती विचारते. तिच्या लेखी जेवण बनवणं आणि ते रुचकर बनवणं, हे कर्तव्य किंवा जास्त समर्पक शब्दांत सांगायचं झाल्यास एक ‘थॅंकलेस जॉब’ आहे.

या आणि अशासारख्या अनेक भाबड्या समजुती आणि श्रद्धांवर आपली विवाहसंस्था खंबीरपणे उभी आहे. याच वेळी जयाचे आणि दीपकच्या वहिनीचं मैत्रिणीचं नातं सासूच्या नजरेतून सुटत नाही. तिला याचा खूप आनंद होतो. स्त्रीला आई मिळते, नणंद, भावजय, काकू, आजी अशी नाती मिळतात, पण मैत्रीण मिळत नाही, अशी खंत ती व्यक्त करते. सासूला विचारते, ‘तुम्ही व्हाल का माझी मैत्रीण?’ यावर तिची सासूही हसून “टीराय करके देखते हैं” म्हणते. वरवर पाहता अगदी सहज वाटणारा हा प्रसंग स्त्रीजीवनाची खूप मोठी गोष्ट सांगून जातो.

स्त्री ही स्त्रीची मैत्रीण नसून शत्रू असते, हा अनंतकाळापूर्वी लागलेला शोध मात्र हा सिनेमा खोटा ठरवतो. स्त्री ही दुसऱ्या स्त्रीला आधार देते, तिला पाठीशी घालते, तिच्यासाठी आनंदी होते, तिच्यासाठी खंबीरपणे उभी राहते, वेळप्रसंगी तिच्यासाठी लढासुद्धा देते, हे खूप साऱ्या प्रसंगांतून दाखवून दिलंय.

दुसरीकडे फूल ज्या स्टेशनवर हरवते, तिथं तिला छोटू आणि मंजू माई भेटते. त्यामुळे फूलला तात्पुरता आसरा मिळतो, पण ती सतत दीपक आपल्याला शोधायला बाहेर पडला असेल आणि लवकरच आपल्याला घेऊन जाईल, या आशेवर येणारा दिवस घालवते.

मंजू माई कडक असली, तरी तितकीच मायाळूही आहे, पण वास्तव दुनियेत भावनापेक्षा व्यवहाराला किंमत आहे, हे अनुभवाने आलेलं शहाणपण सोबत घेऊन ती वागताना दिसते. फूलला सासरच्या गावचे नावही माहीत नाही, तिकडे कसे जायचे हेही माहीत नाही, याबद्दल तिला रागावते. आधी नवऱ्याचे नाव घ्यायला शीक, मग पैसे कमावून त्याला मदत कर, असे मंजू माई फूलला सुनावते. एकट्याने आनंदी राहणे खूप अवघड आहे, ते जमलं पाहिजे, असा मोलाचा सल्ला तिला ती देते.

फूल तिच्या गावी सुखरूप पोहोचली, हे समजल्यावर एकीकडे डोळ्यातून पाणी येत असताना ती गोड पदार्थ चाखताना दिसते. माझ्या आयुष्यात गोड खाण्यासारखं काही घडतच नाही, असं म्हणणारी मंजू माई फुलाच्या हातचा कलाकंद खाताना बघून आपलेही डोळे पाणावतात.

.................................................................................................................................................................

या सिनेमातले काही भावलेले संदेश

- कुटुंबात फक्त स्पर्धा, द्वेष, संघर्ष, हेवेदावे नसतात, तर आपुलकी, प्रेम, विश्वास, आदरही असतो, जिव्हाळा असतो.

- परस्परावलंबी असल्याने कोणाचंही नुकसान होत नाही, उलट नाती जपली जातात

- सगळ्याच स्त्रिया शोषण होऊ देत नाहीत

- स्त्री ही स्त्रीची शत्रू नसते. 

- पुरुषाशिवाय जगणं अशक्य नाहीये.

- स्त्रीवाद हा फक्त स्त्रियांनी स्त्रियांचा स्त्रियांसाठी मांडलेला विचार, इतकं संकुचित नसून त्यामध्ये पुरुषांची स्त्रियांबद्दल असणारी मानसिकतादेखील महत्त्वाची आहे.

- सगळेच पुरुष शोषक नसतात.

- सगळीकडेच नवीन पिढी मानसिक गोंधळ, संघर्ष, पैसा, आत्मकेंद्रितता, व्यसने यात हरवलेली नाही.

- स्वत्वाची जाणीव, स्वतःची ‘स्पेस’ नसली तरीही स्वतःचे आणि इतरांसाठीही आयुष्य छान जगता येते.

.................................................................................................................................................................

अजूनही मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या हुंड्याची, लग्नाची तयारी करणाऱ्यावर भर देणारे आई-बाप वास्तव दुनियेची सफर घडवतात. एका प्रसंगात दीपक आपल्या घुंघट घेतलेल्या पत्नीची छायाचित्रं दाखवत ‘हिला कुठे पाहिलं का?’ असं विचारात फिरत असतो. त्यावर एक दुकानदार त्याला, ‘घुंघट देना मतलब पेहेचान छीन लेना’ असे म्हणतो. नेमके त्याच वेळेला त्याची बुरखा घातलेली बायको त्याला चहा आणून देते. तो दुकानदार, त्याची बायको, दीपक यांचा काही सेकंदाचा कुठलाही संवाद नसलेला प्रसंग खूप काही बोलून जातो. यात कुठेही धर्माचा गहजब केलेला नाही. कुठल्याही अजूनही बरेचदा बाईची ओळख पुरुषावरूनच ठरते. बाईचं स्थान दुय्यमच ठरवलं जातं, हे या प्रसंगांमधून अधोरेखित होतं.

फूल, जया, दीपकची आई, सासू, वहिनी मानसशास्त्रीयदृष्ट्या परिपक्व वाटतात. त्यांना त्यांचे कर्तव्य, त्यांच्याकडून समाजाच्या, कुटुंबाच्या असलेल्या अपेक्षा माहीत आहेत आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्या मान्य आहेत. समाजाने घालून दिलेल्या चौकटीमध्ये त्या खुश आहेत आणि यातच सुख आहे, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यांना त्यांची ‘स्पेस’ आहे का, समानता मिळतेय का, त्यांना काही अधिकार आहेत का, ते मिळतायत का, ते कोणी ओरबाडून घेतायत का, ते कसे मिळतील, याची पुसटशीही कल्पना नाही. कुटुंबासाठी, घरासाठी बाईने हेच करायचं असतं, इतका सोपा विचार आणि त्याप्रमाणे त्यांचं वागणं आहे. इतक्या भाबडेपणाने आणि सच्चेपणाने आयुष्य जगता येऊ शकतं आणि या सगळ्या शक्यतांशिवाय जगणं सुंदर होऊ शकतं, हे या चित्रपटातून जाणवतं. 

छाया कदमने मंजू माई अप्रतिम रंगवली आहे. संघर्षातून आलेलं शहाणपण, एकटीने जगताना खंबीरपणे घ्यावे लागणारे निर्णय, स्वभावात थोडासा कडवटपणा आला, तरी मूळचा स्वाभाविक मायाळूपणा, फुलावर ममतेची पाखर, व्यवहारासोबतच प्रेमळपणा, या परस्परविरोधी छटा सहज सुंदर अभिनयातून तिने ताकदीने पेलल्या आहेत.

रवी किशनने इन्स्पेक्टर शाम मनोहर सहज साकारला आहे. पोलिसी बारकावे, त्यांचा धूर्तपणा, त्याच्या सराईत खेळी, कायद्याबरोबरच फायद्याची समीकरणे जुळवताना एक चांगला पोलीस ऑफिसर, महिलांना पाठिंबा देणारा एक चांगला माणूस त्याने छान रंगवला आहे. इतर भूमिकांप्रमाणेच ह्याही भूमिकेला त्याने उत्तम न्याय दिला आहे. पोलीस चांगलेसुद्धा असतात. ते मदतही करतात. ते कायदा पाळतात. हे जरा नवीन आणि सुखद समीकरण या चित्रपटात पाहायला मिळतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

यातील सर्व पात्रं मेकअपशिवाय वावरताना दिसतात. त्यांचा सगळा अभिनय फक्त डोळ्यांतून आणि देहबोलीतून दिसतो. कुठेही नवखेपण, बुजरेपण दिसत नाही. लहानातली लहान व्यक्तिरेखा तितक्याच आत्मविश्वासानं आणि ताकदीनं कलाकार साकारतात. त्यामुळेच सर्वच पात्रं त्यांच्या अभिनयासह लक्षात राहतात. फुल, दीपक, जया, प्रदीप, इन्स्पेक्टर या पात्रांभोवती वावरणारी दोस्तमंडळी, आई-बाबा, वहिनी, आजी-आजोबा, हवालदार, रेल्वे स्टेशनवरील दादी, छोटू, स्टेशन मास्तर, या प्रत्येकानं आपापली भूमिका चोखपणे पार पाडली आहे.

एकंदरीतच हा सिनेमा मनात घर करून राहतो. जग कितीही पुढे गेलं असलं, तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली असली, तरी काही वैश्विक शाश्वत मूल्यं अजूनही आहेत, ती जपणारी माणसं आहेत आणि त्यांच्यातूनच शाश्वतता, चिरंतन शाश्वत विकास शक्य आहे, यावर हा सिनेमा विश्वास ठेवायला भाग पाडतो, ही खूप जमेची बाजू मानावी लागेल.

याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शिका किरण राव यांना जातं. गावाकडचे जीवन, तिथली माणसे यांच्यातले सूक्ष्म बारकावे टिपत अशा प्रकारे चिरंतन मूल्यांचे दर्शन घडवून आणणारी एक कलाकृती त्यांनी प्रेक्षकांपुढे ठेवली आहे.

चित्रपटाबाबत थोडीशी माहिती

मुख्य पात्रे -

नितांशी गोयल - फूल

प्रतिभा रानता - पुष्पा / जया

स्पर्श श्रीवास्तव - दीपक कुमार

छाया कदम - मंजू माई

रवी किशन - इन्स्पेक्टर शाम मनोहर

दिग्दर्शन - किरण राव

निर्माते - किरण राव, आमीर खान, ज्योती देशपांडे

लेखक - बिप्लाब गोस्वामी

.................................................................................................................................................................

लेखिका प्रिया काळे एमआयटी विश्वशांती विद्यापीठ (कोथरूड, पुणे) इथं सहाय्यक प्राध्यापक आहेत.

kaprish226@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......