जयप्रकाश सावंत हे सातत्याने हिंदी भाषेतून कथा, कविता, कादंबरी, वैचारिक लेख, मुलाखती आदी विविध साहित्यप्रकारांतील साहित्य मराठीत अनुवादित करत आले आहेत. हिंदी साहित्यातील अनवट, वेगळ्या धाटणीचं लेखन मराठीत आणताना आशयासोबतच मूळ हिंदी लेखनाची लय जपायचा ते कसोशीने प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे अनुवाद वाचनीय आणि अस्सल असतात. त्यांची साहित्य निवडदेखील केवळ लोकप्रिय, पुरस्कारप्राप्त पुस्तकं कोणती यावर अवलंबून नसते. हिंदी साहित्य त्यांना आशय, रचना आणि घाट यांच्या बाबतीत नावीन्यपूर्ण वाटलं तरच ते त्याच्या अनुवादाकडे वळतात.
हिंदीतून मराठीत भाराभर अनुवाद करून अनुवादित पुस्तकांची ‘फॅक्टरी’ उघडलेल्या अनुवादकांच्या गर्दीत सावंत यांचं नाव आदराने घेतलं जाण्यामागे आणि त्यांच्या प्रत्येक अनुवादाच्या कामाकडे गांभीर्याने पाहिलं जाण्यामागे त्यांची अनुवादकर्मावरची अविचल निष्ठा, साहित्यनिवडीतील चोखंदळपणा व अनुवाद करताना दर्जा अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असलेला संयम या बाबी कारणीभूत आहेत. त्यांनी हिंदीतील दहा लेखकांच्या निवडक कथांचे अनुवाद काही वर्षांपूर्वी करून ‘मुक्त शब्द’ या नियतकालिकात वेळोवेळी प्रकाशित केले होते. त्यांतल्या १७ कथा एकत्रित करून ‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ हा कथासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ हिंदी कथाकार-कादंबरीकार काशीनाथ सिंह यांनी २००८ साली आयोजित केल्या गेलेल्या एका परिचर्चेत असं म्हटलं होतं की, “२००० सालानंतर आलेल्या तरुण लेखक-लेखिकांनी त्यांच्या कथांतून वास्तववादापासून किंवा वास्तववादाच्या अतिरेकापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.” चंदन पांडेय, कुणाल सिंह आदी लेखकांच्या कथांतील फँटसीबाबत त्यांनी चर्चा केली आहे. या लेखकांच्याही आधी काही निवडक कथाकारांच्या कथांत वास्तवाकडे एका वेगळ्या कोनातून पाहता यावं म्हणून कल्पित कथानकाची मांडामांड करण्याचे प्रयत्न झाल्याचं दिसून येतं. यांतल्या काही कथाकारांच्या अशा स्वरूपाच्या कथा या संग्रहात वाचता येतील.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
विष्णु नागर हे हिंदीत व्यंगकथा लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आधुनिक जगण्यातील ताणतणाव, विशेषतः सत्तारचनेचं जनताविरोधी स्वरूप फँटसी, उपहास, उपरोध यांआधारे कथात्म साहित्यातून उघड करण्याची त्यांची हातोटी आहे. सावंत यांनी त्यांच्या ज्या दोन कथा निवडल्या आहेत त्यांत ही वैशिष्ट्यं साकार झालेली आहेत. 'राजा आणि प्रजा यांची प्रेमकथा' या कथेत राजा व प्रजा हे रूपक योजून सध्याच्या राजकीय पक्ष व जनता यांच्या संबंधांवर विनोदी अंगाने भाष्य केलेलं आहे. राजा हा प्रजेवर प्रेम करतोय असं वरकरणी दाखवत असला, तरी जेव्हा प्रजा चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून काही गोष्टींची मागणी त्याच्याकडे करते, तेव्हा मात्र तो आपल्या मूळ बनवेगिरीच्या चरित्रानुसार प्रजेच्या तोंडाला पानं पुसणारी उत्तरं देतो, प्रसंगी धमकावतोही. कथाकार आधुनिक लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांच्या लेखी प्रजेला कोणती किंमत असते, हे रूपकात्मक पद्धतीने कथन करतो.
'सत्य आणि न्याय यांच्या मार्गावर श्रीयुत ‘क्ष' या कथेत आयुष्यभर लबाडी केलेला श्रीयुत ‘क्ष' हा जेव्हा निवृत्तीनंतर सत्य व न्यायाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार व्यक्त करतो आणि तसा मार्ग शोधू लागतो, तेव्हाच तो या मार्गावरून घसरणार, हे जाणवत असतं. कथाकार या ‘क्ष' ला आणि पर्यायाने तो ज्या लाखो लबाडी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करताना दाखवलाय, त्यांना हास्यास्पद ठरवतो. तो उपहासाच्या अंगाने या लोकांच्या विचारांतील तकलादूपणा दाखवून देतो.
नागर यांच्या कथांप्रमाणेच असग़र वजाहत यांच्या 'तमाशात बुडालेला देश', 'इथून पहा देश' या कथांतही राजकीय क्षेत्रातील मंडळींचं जनतेपासून तुटलेलं जगणं, भ्रामक भाषणं करणं आणि जनतेनेही सारासार विवेकबुद्धी बाजूला सारून त्यांना हवा तसा प्रतिसाद देणं, पोलीस, न्यायव्यवस्था यांनी लोकशाहीची थट्टा करायला सुरुवात केल्यासारखं वागणं, समाजात क्रूरता, हिंसाचार वाढणं आणि त्याला समाजातल्या मोठ्या वर्गाची मान्यता मिळणं, या सगळ्या गदारोळात पिचल्या जाणाऱ्या सामान्य माणसाला त्याची जाणीवही नसणं हे विदारक वास्तव फँटसी, उपरोध यांआधारे अभिव्यक्त केलं आहे.
गेल्या वीस-तीस वर्षांत आपल्या समाजात सामाजिक-राजकीय क्षेत्रांत जे काही नैतिक पतन झालेलं आहे, मूल्यह्रास झालेला आहे त्याचंही प्रतिबिंब यांतल्या काही कथांत समर्थपणे उमटलेलं दिसून येतं. संजय खाती यांची 'हुकूमशाही आणि पक्षी' या कथेत एका पक्ष्याच्या अस्तित्वाने त्रस्त झालेला हुकूमशहा त्या पक्ष्याला पकडण्यासाठी देशात हिंसाचार घडवून आणतो. त्याच्या विरोधात छुप्या पद्धतीने कारवाया सुरू असतात, भिंतींवर चिकटवल्या जाणाऱ्या पत्रकावरील मजकुरातून लोकांच्या मनातील असंतोष व्यक्त होत असतो. पण मनातून घाबरलेला हुकूमशहा अधिकाधिक सैन्याची कुमक गोळा करून आपली सत्ता टिकवू पाहतो. पण त्याची अखेर जगातल्या तमाम हुकूमशहांप्रमाणेच होते. या कथेतील पक्षी हे विरोधाचं प्रतीक आहे.
खाती यांची 'गांधीजींचं घड्याळ' ही कथा एखाद्या ऐतिहासिक घटनेची कल्पित साहित्यात किती कुशलतेने आणि कल्पकतेने गुंफण केली जाऊ शकते याचा उत्तम नमुना आहे. १९४७ साली कानपूर स्टेशनवर गांधींच्या दर्शनासाठी गेलेल्या भुवनचंद्रला तिथे उसळलेल्या गर्दीत खिशाला लावायचं घड्याळ पडलेलं मिळतं. तो ते गांधी बापूंचा प्रसाद मानून खिशात ठेवून देतो. दुर्गम भागांत राहणाऱ्या माणसांच्या जगण्यातील समस्या, त्यांच्या जगण्यासंबंधीच्या धारणा, त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी व्यवस्थेकडून नाकारल्या जाणं आणि लोकांनी त्या विरोधात सनदशीर मार्गाने विरोध करू पाहिला तर तो हिंसाचाराचा अवलंब करून मोडून काढणं, अशा अनेक गोष्टी पुढे या घड्याळाचा जो प्रवास कथाकार चित्रित करतो त्यातून उजागर होतात. कथाकार कथेला कल्पना आणि वास्तव अशा दोन्ही स्तरांवर एकाच वेळी खेळवत ठेवतो.
कुमार अंबुज यांच्या 'पितळेचा माणूस' या कथेत पितळी भांड्यांचं रूपक योजून आणि एकूणच पितळेविषयी रंजक हकिकती संवादांत गुंफून शेवटी सामान्य माणसाच्या असहाय स्थितीवर भाष्य केलं आहे. त्यांच्या 'समस्या' या कथेत दोन भिन्न विचारसरणींच्या व्यक्तींचं त्यांच्या विचारसरणीवरील श्रद्धेपोटी नातेसंबंधांत कशी तणातणी निर्माण होते याचं चित्र हट्टी बाप आणि त्यांचा सांप्रदायिक विचारांना थारा न देणारा तरुण मुलगा या पात्रांच्या चित्रणातून उभं केलं आहे.
जितेंद्र भाटिया यांची 'वारसा' ही कथा एका कुटुंबातील मुलाच्या आपल्या दिवंगत आजोबांविषयी माहिती मिळवण्याच्या शोधाची धडपड आहे. त्याच्या या शोधातून फाळणीचा काळ, दोन विचारधारांमधला व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष, त्याचे आजच्या काळातील घटनांत उमटणारे पडसाद उजागर होतात. या कथेतल्या पात्रांच्या मनात हिंसा आणि अहिंसा यांविषयी एक द्वंद्व सुरू असतं. कथेतल्या घटितांतून फाळणीच्या काळातही हिंदू-मुसलमान एकमेकांना कसे आधार देत होते हे अधोरेखित केलंय तसंच त्या काळात दंगलींत अग्रभागी असणारे पुढच्या काळात जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा ती तोडायला गेलेल्या लोकांमध्ये आपल्या ओळखीची माणसं टीव्हीवर शोधताहेत असं विषण्ण करणारं चित्रही उभं केलंय.
या संग्रहातील कथाकार हे सगळे पुरुष आहेत. यात एकाही स्त्री लेखिकेची कथा नसणं ही गोष्ट खटकते. तरी या पुरुष लेखकांमधल्या काही लेखकांच्या कथांतून स्त्रियांच्या जगण्याचं काही प्रमाणात चित्र उभं राहतं, वेगवेगळ्या स्तरातल्या स्त्रियांच्या व्यथा-कथांचा वेदनादायी कोलाज साकारला जातो. असग़र वजाहत यांची 'ड्रेनेजमध्ये राहणाऱ्या मुली' ही कथा फँटसीचा वापर करून वास्तव जीवनातल्या अतिशय महत्त्वाच्या विषयाला अग्रभागी आणते. आपल्या समाजात अजूनही मुलींचा जन्म नकोसा असणारा समूह मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. या मुलींना लग्न झाल्यानंतर अपमान, मारहाण सहन करावी लागते. कथाकार या कथेत वास्तवातल्या घटनांपुढेच काल्पनिक प्रसंग उभारत जातो. फँटसीत घडणाऱ्या घटना या वास्तवात घडणाऱ्या घटनांचा विरोध करताना दर्शवल्या आहेत. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या स्त्रिया पुरुषांचं पुरुषत्व काढून घेतात या फँटसीत घटित होणाऱ्या प्रतीकात्मक प्रसंगातून कथाकार स्त्रियांच्या मनातील क्षोभ व्यक्त करतो.
ही कथा स्त्रियांचं दुःख तर मांडतेच पण नवजात मुलींच्या वाट्याला येणारा भोगवटा, अंधारही तितक्याच ताकदीने साकार करते. योगेंद्र आहुजा यांच्या 'स्त्री-विमर्श' या कथेतही स्त्रियांच्या मनोविश्वाचा खूप सखोल वेध घेण्याचा प्रयत्न केला गेल्याचं दिसून येतं. पुरुषांची स्त्रीकडे पाहण्याची नजर कशी आहे, तिच्या जगण्याबाबत तो कोणत्या कल्पना घेऊन तिच्याभोवती वावरत असतो हे कथाकार कथेतल्या स्त्री पात्रांच्या संवादांतूनच व्यक्त करतो.
चेतना सक्सेना या बायोलॉजी शिक्षिकेचं 'ग्लोबल जमान्यातल्या पुरुषांकडे एकही मानवी शब्द उरलेला नाहीय' हे म्हणणं किंवा सिनियर इन्स्पेक्टर व्ही. के. पाठक याच्या पत्नीने त्याला सुनावणं की - 'तुम्ही लोक बायकांच्या मनाबद्दल जो काही विचार करता ना ते सर्व तुमच्या स्वतःच्या गलिच्छ विचारांचं प्रतिबिंब असतं... त्यांना फक्त समजुतीचं किंवा हृदयाला स्पर्श करणारं एक वाक्य हवं असतं. बायका त्याचीच वाट पाहत असतात. पण ते कोणीच उच्चारत नाही. एक जणही नाही. सर्व आयुष्य असंच निघून जातं' या अशा वक्तव्यांतून कथाकार स्त्रीमनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कथेत जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर छोट्या शहरांतदेखील कशी भ्रष्ट संस्कृती आकार घेऊ लागलीय याचं प्रत्ययकारी चित्रण आलेलं आहे.
या शहरातील तरुणांच्या हाताला काम नसतं. चाकू, सुरे चालवणाऱ्यांना रिकव्हरी एजंट म्हणून कामाला ठेवणाऱ्या कंपन्या असतात. या तरुणांना त्यांच्या वस्तीच्या पलीकडे असणाऱ्या सिव्हिल लाइन्समधील चमचमतं जग खुणावत असतं. तिथल्या झगमगत्या जगाला कथाकार 'अमेरिका' असं सूचक नाव योजतो. त्या जगाचे नागरिक होण्यासाठी हे तरुण काहीही करायला तयार असतात. प्रेम सिंह या बिल्डरला चेतना सक्सेना आणि तिच्या विद्यार्थिनी जिथे राहत असतात त्या घराची जागा हवी असते. पण चेतना सक्सेना ही समाजातल्या गरीब मुलींसाठी तिच्या घरात राहण्याची सुविधा पुरवून मोफत शिक्षण देत असते. त्यामुळे ती या प्रस्तवाला नकार देते. मग प्रेम सिंह या रिकामटेकड्या तरुणांना हाताशी धरून चेतना सक्सेना व तिच्या विद्यार्थिनींना त्रास द्यायला सुरुवात करतो. त्यातून तणातणी आणि संघर्ष निर्माण होतो आणि कथाकार मोठ्या कौशल्याने कथेचा बिंदू स्त्री मनोविश्वाकडे सरकवतो.
मणि मधुकर यांच्या 'सरतेशेवटी' या कथेत दुष्काळ, शेतीवरची संकटं, पारंपरिक विचारांचा जनमनावर घट्ट बसलेला पगडा यांच्या पार्श्वभूमीवर माणसांच्या जगण्याची जी वाताहत होते आणि काही घाव कसे त्यांना आयुष्यभर वागवत जगावं लागतं याचं चित्रण केलं आहे. नौबतराम आणि जस्मा या पात्रांच्या जीवनातील चटका लावणाऱ्या घटना त्यांच्या आपसांतील संवादांतून मुखर करत कथाकार मानवी स्वभावाचे अत्यंत वेगळे, विलक्षण असे पैलू साकार करतो. या पात्रांची भेट आणि नंतर संवाद होत असताना बाहेर वाहत असलेली गरम हवा हीदेखील एखादं पात्र असावं अशी उपस्थित असते. आणि तिचा दाब पूर्ण कथाभर जाणवत राहतो. स्त्रीला दिलं जाणारं दुय्यम स्थान आणि तिचं सगळे आघात सहन करूनही आयुष्य धकवून नेणं या दृष्टीनेही या कथेकडे पाहता येऊ शकतं.
शिवमूर्ति या ग्रामीण परिसरातील जनजीवनाचं समर्थपणे चित्रण करणाऱ्या कथाकाराची 'भरतनाट्यम' ही कथा प्रामाणिक आणि सचोटीने जगू पाहणाऱ्या शिक्षित तरुणांच्या जीवनाची आदर्शवादी जगण्याच्या अट्टाहासापायी कशी वाताहत होते याचं चित्रण एका कुटुंबात घडणाऱ्या काही घटनांच्या माध्यमातून करते. समाजात, कुटुंबात आदर्शापेक्षा पैशाला आलेलं महत्त्व, भ्रष्टाचार आणि संधिसाधूपणा करणाऱ्या व्यक्तींची होणारी बरकत, त्यांना मिळणाऱ्या सुखसोयी यांच्या तुलनेत इमानदारीने आपलं कर्तव्य बजावणाऱ्या, नेकीने सगळ्या जबाबदाऱ्या उचलू पाहणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्तींचं जगणं कसं विसकटून जाऊ शकतं याचं शोकात्म चित्र या कथेत चितारलं आहे. तसंच या कथेत ग्रामीण भागात मुलाला जन्म न देऊ शकणाऱ्या स्त्रीला कुटुंबातील महिलांकडून होणाऱ्या मानहानीमुळे सहन करावी लागणारी कुचंबणा कोणत्या स्वरूपाची असते आणि त्या स्त्रीला आपल्या पोटी मुलगाच जन्माला यावा म्हणून कोणत्या पातळीवर यावं लागतं याचंही खिन्न करणारं चित्रण आलेलं आहे.
ग्रामीण भागांतून वा छोट्या शहरांतून रोजगारासाठी महानगरांत स्थलांतर होणं आणि त्यातून स्थलांतरितांचे निरनिराळे प्रश्न निर्माण होणं या गोष्टी आपल्या देशातील असमान विकासाकडे निर्देश करणाऱ्या आहेत. या संग्रहातील दोन कथा या शिक्षित आणि अशिक्षित वर्गाचं रोजगारासाठी होणारं महानगरातील स्थलांतर, महानगरात त्यांना मिळणारी तिरस्काराची वागणूक (विशेषतः अशिक्षित समूहाला), महानगरात त्यांना जाणवणारा परकेपणा आणि मानवी व्यवहारांतील मतलबीपणा (विशेषतः शिक्षित आणि ऑफिसांत काम करणारा समूह), महानगरात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष असे स्थलांतर या विषयाला असणारे अनेक पैलू या कथांत उलगडले जातात.
शशांक यांच्या 'दारोदार' या कथेत छोट्या शहरातून दिल्लीसारख्या महानगरात मोठ्या आशेने नोकरी मिळवण्याच्या हेतूने आलेल्या तरुणाचा शहराप्रती होत जाणारा भ्रमनिरास चितारला आहे. मुन्ना हे पात्र जेव्हा दिल्ली रेल्वे स्थानकात उतरतं तेव्हा त्याला रुळांपलीकडे जे जग दिसतं त्याचं कथाकाराने केलेलं वर्णन मुन्नाची खिन्न मनःस्थिती अधिक सघनतेने व्यक्त करतं. मुन्नाला या महानगरात मदत करणारा दुबे हा मनुष्य बरीच वर्षं शहरात राहूनही स्वतःचं घर करू शकलेला नाही, चार वर्षांत एकदाही घरी जाऊ शकलेला नाही. या दुबेला 'आपण आयुष्य व्यवस्थितपणे जगायला हवं होतं, आता काहीच नाहीय, माझं कोणीच नाहीय. ना पुढे ना मागे. मी कोणालाही मारून टाकीन. जेलमध्ये जाईन. मेहनत केल्यावर दोन वेळचं जेवण तिथेही मिळेल,' असं वाटतं तेव्हा कथाकार त्याच्या या उद्गारातून छोट्या शहरातून महानगरात आलेल्या असंख्य स्थलांतरितांचं दुःख, निराशा काळजाला भिडणाऱ्या संवादांतून व्यक्त करतो. मुन्नाचे बेरोजगारीचे दिवस, सगळं निरर्थक वाटायला लावणारा दिल्लीतला काळ, शहरातील गळेकापू स्पर्धा आणि नोकऱ्यांतील अनिश्चितता जाणवणारे दिवस कथाकार कधी प्रसंगांच्या माध्यमातून तर कधी निवेदनातून साकार करतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथाही नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात. त्या आठवणींतून कथाकार या समूहाचं गरिबीचं जिणं, कर्जात बुडून जाणं, घर-दार वाचवायचं म्हणून पंजाबसारख्या दूरच्या शहरांत जाऊन पैसे कमावणं, परक्या शहरात मालकांचं शोषण सहन करणं, त्यांचे तिरस्कारयुक्त बोल साहणं, बारा बारा तास ढोरमेहनत करणं असा सगळा त्यांच्या जीवनातील कोलाहल अभिव्यक्त करतो. मुलाला धोका असलेल्या भूभागात पैसे कमावण्यासाठी पाठवायला लागणाऱ्या आईच्या काळजाला किती घरं पडत असतील, हे कथाकार माई या पात्राच्या माध्यमातून व्यक्त करतो.
बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो. पण त्यातही कथाकार ढोबळ काळ्या-पांढऱ्या रंगांत चित्रण करत नाही. रामदेवला रेल्वेतले प्रवासी, बस डेपोतले कर्मचारी यांच्यासारखे उपहासात्मक बोलणारे, खोचक टिप्पण्या करणारे लोक भेटतात तसेच आतल्या भागात गावातील सरपंच, इतर काही माणसं प्रेमळ वागणूक देतात आणि त्याला लागेल ते साहाय्य करतात असं दुहेरी चित्र कथाकार रंगवतो. 'पंजाबातून थोडंसं भविष्य आणायला गेलेल्या' विशुनदेवच्या जगण्याची जी शोकांतिका रंगवली आहे ती लाखो श्रमिक बिहारी समूहाची प्रातिनिधिक कहाणी आहे. हा श्रमिक समूह मोठ्या शहरांत स्थलांतर करून काय कमावत असेल ते माहीत नाही पण त्याला जबरी किंमत चुकवून आपलं सर्वस्वदेखील गमवावं लागू शकतं, याची जाणीव ही कथा वाचणाऱ्याला नक्की होईल.
सावंत यांनी ज्या लेखकांच्या कथांचा अनुवाद करून त्यांच्या कथनशैलीची, आशयवैविध्याची ओळख मराठी वाचकांना करून दिली आहे, त्या लेखकांचं आणखी साहित्य वाचायची इच्छा वाचकांना जरूर होऊ शकेल. यासाठी प्राथमिक पातळीवर सावंत यांनी पुस्तकाच्या अखेरीस दिलेला 'लेखक परिचय' हा विभाग साहाय्यभूत ठरू शकतो. या संग्रहात काही लेखकांच्या दोन-तीन कथा आहेत, तर काहींची केवळ एकच. ज्या लेखकांची केवळ एकच कथा आहे, त्यांची ती एकच कथादेखील त्यांचं लेखन सामर्थ्य दाखवून देणारी आहे. या सर्व लेखकांच्या कथा वाचल्यानंतर वाचक जर त्यांच्या इतर हिंदी भाषेत वा मराठी अनुवाद स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या कल्पित साहित्य वाचनाकडे वळला, तर सावंत यांच्या अनुवाद परिश्रमाचं साफल्य झालं, असं म्हणता येईल.
‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ - अनुवाद : जयप्रकाश सावंत
शब्द पब्लिकेश, मुंबई | पाने - २२० | मूल्य : ३८५ रुपये
..................................................................................................................................................................
लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.
vikas_palve@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment