अजूनकाही
‘मी नाही म्हणतो
मी होय म्हणतो
राखून ठेवतो
संक्षेपाने
वाहतुकीसाठी पाणी
खडतर उन्हाळ्यापूर्वी
मैलोगणती विस्तार वाळवंटाचे
गवताखाली सांडलेले
आणि देवबाप्पाचे लहानसे भूत
या दृश्यामागे दडलेले
मी नाही म्हणत नाही
सांधून ठेवतो
समजुतीपूर्वीचा पूर्णविराम
देवदूतांचे पूर्वज
सर्वभर नंतर
माझ्या डोळ्यांत
ढसाढसा’
- तुळसी परब (हृद)
हा कवी ना शेतकरी होता, ना खेड्यात राहणारा, ना तो ग्रामविकास अधिकारी होता, ना सरपंच. पण तो ही कविता लिहिताना वाचकांना एका रखरखीत, उष्ण, कोरड्या रानात उभे करून भवताल निरखायला लावतो अन चित्र उभे करतो. महत्त्वाचे म्हणजे आढेवेढे घेत का होईना, तो पाणी द्यायला तयार झालेला दिसतो. पाण्याचे वहन त्याला मान्य आहे आणि त्याचा स्वभाव समजूतदार आहे. देवदूत जिथून येतात ते ढग कवीच्या डोळ्यांत पाणी आणतात, कारण सर्वत्र पाऊस पडू लागला आहे.
भारतातले सारे कवी पाण्यावर कविता करतात, तेव्हा त्यांत पावसाचा आवर्जून उल्लेख असतो. नद्या, कालवे, चाऱ्या, तलाव शक्यतो त्यांच्या कवितांचा विषय नसतो. कारण शेतकरी पार्श्वभूमी मिळालेले अनेक कवी पावसावरच पाण्यासाठी विसंबून असतात. परब यांच्या या कवितेत कसा काय वाहतुकीसाठी पाणी राखून ठेवायचा उल्लेख आला, ते समजत नाही. वहनसाठी साठवण असा पाण्याचा एक विरोधाभासी प्रयोग या कवितेत दिसतो.
पाऊस, पाणी, नद्या या निसर्गातल्या गोष्टी. साहजिकच त्यात राजकारण कुठून येणार? कालवे, तळी, धरणे, चाऱ्या या मनुष्यनिर्मित. त्यामुळे त्यामध्ये नफा, नुकसान, स्वार्थ, हाव, वंचना असे सारे काही येणार. पण पाण्याचे राजकारण आणि अर्थकारण कवितांमधून आणून लबाड्या आणि फसवणुकी उघड्या पाडायला जरा धैर्य लागतेच. पाण्याचे वाटप-वितरण किंवा पाण्यावरचा अधिकार या बाबी अभ्यासाने कळतात तसे, जागरूक नागरिकाला त्यातल्या कुतूहलाने.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हवा, पाणी, जमीन, झाडेझुडपे आदी मानवाची गृहितकेच. त्यात डोळे घालून अभ्यास करण्यासारखे काय, असा त्याला प्रश्न पडतो अन् तो दिवसेंदिवस खराब, महाग व कमी कमी होत चाललेल्या या गृहितकांकडे दुर्लक्ष करत राहतो. या नैसर्गिक घटकांबाबतीत तो का, कशामुळे, कोणापायी असे प्रश्न मग विचारीनासा होतो अन् मग अखेर सर्वनाश होतो! तो होत असल्याचे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कशाचीच म्हणजे कारणे, निमित्ते आणि निष्कर्ष यांची नोंद ठेवली गेलेली नसते.
‘पाण्याशप्पथ - भाग दोन’ या लेखसंग्रहांचे लेखक प्रदीप पुरंदरे कवीही आहेत. परंतु त्यांनी पाण्यावरचे अधिकार आणि अधिकारी, पुढारी यांचे पाण्याबाबतचे राजकारण यांची बिंगफोड गद्यलेखनातूनच केली आहे. ‘वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’ (वाल्मी) या संस्थेत पुरंदरे अध्यापक होते. सरकारी कर्मचारी व संबंधित यांच्यापुढे पाण्याच्या नियोजनाबाबत व्याख्याने देता देता त्यांना हेही जाणवले की, त्यांचे ज्ञान किंवा त्यांना झालेला पाण्याबद्दलचा उलगडा सर्वसाधारण नागरिकांनाही करून द्यायला हवा, म्हणून त्यांनी वेळोवेळी सदरे लिहिली, लेख तयार केले व व्याख्यानेही दिली. त्या मजकुराचा हा दुसरा संग्रह.
महाराष्ट्रात त्यांच्यासारखे अभ्यासू, स्पष्टवक्ते आणि कार्यकर्त्या वृत्तीचे लोक दुर्मीळ होत चालले आहेत. इतके की, पुरंदरे पुण्यात स्थायिक झाल्याने आणि विजय दिवाण हैदराबादेत राहायला गेल्याने आम्हा औरंगाबादकरांना अक्षरक्ष: आपल्या हक्काचे पाणी हातचे गेल्यासारखे सतत वाटत राहते.
विद्या जेव्हा खरोखर दुर्मीळ, अमूल्य अन् आवश्यक होती, तेव्हा ‘विद्येशप्पथ’ असा उच्चार आपल्या तोंडून बाहेर पडत असे. या खऱ्याखोट्याच्या तपासणीसाठी व परीक्षेसाठी त्या काळी विद्या पणाला लावली जाई. आता विद्येच्या जागी पुरंदऱ्यांनी पाणी आणून ठेवले, याचे कारण पाणी खरोखर दुर्लभ, महाग अन अनमोल द्रव्य होऊन बसलेले आहे. (पुरंदऱ्यांच्या पत्नीचे नाव विद्या आहे!) सबब, खऱ्याखोट्याचे निर्णय नव्या पर्यावरणात पाण्याची शपथ घेऊन करावे लागणार, हे पुरंदरे इशाऱ्याने सांगतात. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्याकडे सत्ता, राजकारण आणि राजकीय विचार यांचा कल असावा लागतो. लोकशाही राज्यव्यवस्थेत अशा गरजांची हमी देत मते मिळवली जातात. मात्र राजकारणाला लोभ, मोह, यांची लागण झाली की, क्रोध आणि मत्सर उगवायला लागतात. याच्या तळाशी मद असतो, तो वर्षानुवर्षे सत्तेच्या दोऱ्या हाती ठेवणाऱ्यांचा. कायदे तेच करणार आणि मोडणारही तेच!
महाराष्ट्र राज्य अवर्षणप्रवण. कमी पावसाचे प्रमाण असणारा. त्यामुळे अन्नधान्य ते उद्योग-व्यापार यांना लागणारे पाणी मोजके व कामापुरते उपलब्ध. धरणे, कालवे, तळी इंग्रजांप्रमाणे नव्या राज्यकर्त्यांनी बांधली. मात्र राजकारणाला उदात्ततेचा आधार असला, तरच समानता, न्याय यांची अंमलबजावणी होणार. ‘तळे राखील, तो पाणी चाखील’ या जंगली नियमाप्रमाणे माणूसही राज्य करू लागला, तर काय भयंकर जगणे सोसावे लागते, याची वर्णने या पुस्तकात नाहीत. मात्र पाण्याच्या हव्यासापोटी मोठमोठे प्रदेश कसे वंचित राहून जातात, त्यामागे कसकश्या लबाड्या चालतात, हे पुरंदरे पाण्याचे वितरण, अधिकार, पाळ्या, साठवण, देखभाल आदी पैलूंची नेमकी मांडणी करून समजावून सांगतात.
कोणत्या त्या गोष्टी? खूप पाणी खाणारा ऊस, नदीजोड प्रकल्प, नद्यांचे पूर, जलसंसाधन, सिंचनासाठी प्रकल्प, जलयुक्त शिवार, धरणफुटी, कालवे व त्यांवरचे दरवाजे, बंधारे व त्यातले पाणीवाटप, अशा असंख्य घडामोडी आपण बातम्यांमधून वाचलेल्या-ऐकलेल्या असतात. परंतु त्यातल्या कायद्यांचे व नियमशर्तींचे कसे उल्लंघन केले जाते, हे पुरंदरे आपल्याला समजावून सांगतात.
पाटबंधारे खाते, पाण्याचे वितरण, आठमाही व बारमाही पाण्याचे वास्तव आणि यांच्यामागे सरकार नामक एक बेगुमान शक्ती कसे स्वार्थाचे अन् अप्पलपोटेपणाचे वर्तन करते, याचे एका पाठोपाठ एक तपशील पुरंदरे देतात. मराठवाड्यासारखा अवर्षणप्रवण भाग पाण्याची नाकेबंदी केल्यामुळे कसा दरवर्षी तडफडतो, हे पुरंदरे साधार सांगतात. अशा अन्याय निर्मूलनासाठी नेमलेल्या सरकारी समित्यांकडेसुद्धा सरकार कसे दुर्लक्ष करते, यांवरही पुरंदरे लिहितात. स्वत: लेखक अनेक समित्यांचे सदस्य राहिलेले. अनेक उपयुक्त सूचना त्यांनी केलेल्या, पण अनेकदा त्या पाण्यात गेलेल्या.
पुरंदऱ्यांच्या लेखनातून असे जाणवते की, पाणी आणि त्याचा हव्यास, यांमुळे महाराष्ट्र देशात सर्वाधिक धरणे बांधणारे राज्य झाले खरे. सोबत पाण्याच्या समान वाटपात किंवा हक्काच्या वाटपात सर्वाधिक चुकार अन् लबाड राज्य हेच! पाण्याच्या वाहतुकीचे बारीकसारीक ज्ञान असणारे एकीकडे, तर दुसरीकडे खोलीकरण व रूंदीकरण करून नाले, ओढे यांची वासलात लावणारे अडाणी आणि लहरी!
पुरंदरे मूळचे अभियंते. मात्र त्यांनी पाण्यावर आपले लक्ष केंद्रित करून अभ्यासपूर्वक काही निष्कर्ष आणि उपाय तयार केले. त्याला मान्यताही मिळू लागली. तरीही म्हणावा तसा महाराष्ट्रातल्या पाण्याचा व पाण्याच्या अधिकाराचा प्रश्न नागरिकांना समजला, असे मानता येत नाही. आताच्या लोकसभा निवडणुकीतही कित्येक मतदारसंघांत पाण्याची पारंपरिक टंचाई हाच मतदारांचा अग्रक्रमाचा मुद्दा बनून गेला काही संबंध नसताना.
प्रा. पुरंदरे यांची महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नावरची सारी पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. मात्र ती अभ्यासक, शास्त्रज्ञ, अभियंते आणि नोकरशहा यांच्यासाठी. जे या पाणी पळवण्याच्या कटामागे असतात, तसेच सिंचन घोटाळ्यासारख्या प्रचंड भ्रष्टाचारामागे असतात किंवा अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेल्या योजना व अहवाल धाब्यावर बसवून उजळ माथ्याने पुन:पुन्हा सत्तेत असतात. त्यांना आलेला मेद अशा गंभीर व साधार मांडणीने कधी उतरेल, असे वाटत नाही.
भ्रष्टाचार कसा करावा याची पुस्तके बाजारात नसतात. तो करू नये, असे सांगणारी खूप असतात. जोवर नावे घेऊन, हितसंबंध कोणाचे आणि का जपले जात आहेत, ते स्पष्ट करून आणि त्यांचे पक्ष, विचार व कार्यप्रणाली कशी आहे, ते थेट सांगितल्यावाचून कशावरही परिणाम होणार नाही.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपती होण्याने अमेरिकेत लोकशाही, संविधान, हक्क, स्वातंत्र्य, वंशवाद, विषमता, न्याय यांबरोबरच फॅसिझम आणि हुकूमशाही यांवर भाष्य करणारी शेकडो पुस्तके बाजारात आली. तशी भारतातल्या भ्रष्टाचारावर, भानगडींवर, लबाड्यांवर आणि धोरणांच्या मोडतोडींमागच्या बाबींवर यायला हवी. येऊन-जाऊन इंदिरा गांधी व त्यांची आणीबाणी, बोफोर्स व राजीव गांधी आणि हर्षद मेहतादी भानगडबाजांवर तपशीलवार पुस्तके आली. पुरंदऱ्यांना काय घडले, याचे विलक्षण अचूक भान असते. ते का, कोणासाठी, त्यामागचे उद्दिष्ट काय आणि त्याने नुकसान काय, असा क्ष-किरण त्यांनी वापरला असता, तर वाचकांना व्यक्ती, पक्ष, राजकारण व भूमिका स्पष्ट समजल्या असत्या. सोबतीला जाती, जिल्हे, मतदारसंघ, राजकारण हेही…
सत्तेचे राजकारण जास्तीत जास्त लाभार्थी तयार करून ते आपला हक्काचा पाठीराखा कसे होतील, यांभोवती चालते. लाभार्थ्यांना नीतीमत्ता, साधनशूचिता आणि अपराधभावना यांच्याशी काही देणे-घेणे नसते. लाभ, प्रलोभन, गरज यांच्या एकत्र गुंफणीतून ना सत्तेचे राजकारण मोकळे होते, ना लोक मोकळे होऊ इच्छितात. जोवर या प्रकारचे राजकारण चेहऱ्यांसकट अन हेतूंसकट उजागर होणार नाही, तोवर खरे प्रबोधन आणि जागृती होणार नाही.
परंजय गुहा ठाकुरता यांनी गौतम अदानी यांच्या ऊर्जाविषयक उद्योगधंद्यांची साधार व थेट मांडणी केली. त्याबद्दल त्यांची नोकरी गेली. खटलेही मागे लागले. तसे सिंचन, पाणीचोरी, धरणांचे बांधकाम, कालव्यांचा अपव्यय, नदीपात्रातले अतिक्रमण आदी असंख्य विषय कोण कोणाच्या वतीने जिवंत ठेवते, याचा सनाम व सहेतूक तपास लोकांपुढे आला पाहिजे.
या पुस्तकात तक्ते, आकडेवारी, छायाचित्रे, चौकटी छापून विवेचन आणखीनच सुस्पष्ट करण्यात आले आहे. हे सारे नैतिक, तात्त्विक बांधणी उत्पन्न करायला पुरेसे आहे. तत्त्वत: साऱ्या गोष्टी पुढाऱ्यांना मान्य असतात. लाभ देते-घेते वेळी सारी मोडतोड होत असते. म्हणून लाभार्थी, भागधारक अथवा वाटेकरी यांनीही आपण कोणत्या व्यवस्थेला अन व्यवस्थापकांना पोसत आहोत, हे जाणले की, अन्याय, लबाड्या, फसवणुकी, टंचाई यांसारख्या खूप समस्या कमी होतील. पाण्याने भरलेले वा रिकामे खापर फोडायला समोर माथे अवश्य पाहिजे मात्र…!
‘पाण्याशप्पथ - भाग दोन’ - प्रदीप पुरंदरे | लोकवाङ्मय गृह, मुंबई | मूल्य - ४०० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment