जोपर्यंत सृजनशीलता जीवंत आहे, तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज जीवंत आहे. जोपर्यंत माणूस सुख-दुःखाच्या भावनेनं भरलेला आहे, तोपर्यंत सृजनशीलतेची शक्यता जिवंत आहे
पडघम - साहित्यिक
संदीप शिवाजीराव जगदाळे
  • भारतीय भाषा परिषद, कलकत्ता यांचा ‘युवा पुरस्कार’ स्वीकारताना संदीप शिवाजीराव जगदाळे
  • Sat , 18 May 2024
  • पडघम साहित्यिक संदीप शिवाजीराव जगदाळे भारतीय भाषा परिषद Kolkata Bhasha Parishad युवा पुरस्का Yuva Puraskar

भारतीय भाषा परिषद, कलकत्ता यांचा ‘युवा पुरस्कार’ नुकताच संदीप शिवाजीराव जगदाळे यांना कलकत्ता येथे प्रदान करण्यात आला. भारतीय भाषा परिषद दरवर्षी चार भारतीय भाषांतील कवी-लेखकांना हा पुरस्कार देते. या वर्षी हा पुरस्कार जसिंता केरकट्टा (हिंदी), संदीप शिवाजीराव जगदाळे (मराठी), अरिफ राजा (कन्नड), गुजन श्री (मैथिली) यांना देण्यात आला. या प्रसंगी संदीप शिवाजीराव जगदाळे यांनी ‘वर्तमान संस्कृती आणि सृजनशीलता’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मूळ हिंदी भाषणाचा हा मराठी अनुवाद...

.................................................................................................................................................................

मी भारतीय भाषा परिषदेचा आभारी आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, मला सर्वांत जास्त आनंद याचा आहे की, एका मराठी कवीला हा पुरस्कार देण्यात येतोय. माझ्या कृषीजन संस्कृतीनं मला शब्द दिले, जगण्याचं वळण लावलं. कृषीजन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून मी नम्रपणे या सन्मानाचा स्वीकार करतो.

संस्कृतीविषयी आपण विचार करू लागतो, तेव्हा सगळ्यात आधी आपल्या नजरेसमोर येते सिंधू संस्कृती! शक्यतो हा पाठ्यपुस्तकांचा प्रभाव असेल किंवा एका समृद्ध संस्कृतीसोबत असलेला आपला जैविक संबंध. सिंधू संस्कृतीपासून ते आजपर्यंत आपण जवळपास पाच हजार वर्षांची पायपीट केलीय. मधल्या काळात पर्यावरण, माणसामाणसांतील संबंध, अभिव्यक्तीची माध्यमं आणि पद्धतींमध्ये बदल झाले. बदलांच्या या वैशिष्ट्यांवरूनच आपण वर्तमानकाळाला भूतकाळापासून वेगळं करतो. पर्यायानं वर्तमान संस्कृतीला भूतकालीन संस्कृतीपासून वेगळं करता येतं. आजच्या विषयाच्या अनुषंगानं वर्तमान संस्कृतीविषयी विचार करताना विशिष्ट काळ ठरवून त्यावर चर्चा करणं आवश्यक आहे.

माझ्या मते आपल्या वर्तमान संस्कृतीची सुरुवात १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानं झाली. तसं पाहिलं तर ७५ वर्षांचा हा काळ भारतीय प्रजासत्ताकाच्या इतिहासाचा काळ आहे. पण ज्या समाजाला पाच ते सहा हजार वर्षांच्या संस्कृतीचा इतिहास आहे, त्या समाजाच्या संस्कृतीचा वर्तमान आत्ताचा किंवा या क्षणाचा असू शकत नाही. खरं तर हा वर्तमान कमीत कमी मागच्या एका शतकाचा आहे‌‌. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत या दोघांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या खूप अंतर आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी पृथ्वीच्या नकाशावर फक्त एक देश जन्मला नाही, तर या अलौकिक घटनेनंतर भारतातील प्रत्येक नागरिकाच्या रोजच्या आयुष्यामध्ये अनेक स्तरांवर बदल झाले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्वातंत्र्यानंतर आपण स्वतःला वसाहतवादाच्या पिंजऱ्यातून मुक्त करून एक लोकतांत्रिक देश म्हणून प्रवासाला सुरुवात केली. लोकशाही ही फक्त लोकप्रतिनिधी निवडण्याची व्यवस्था नाही, तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे. त्यामुळेच एक प्रजासत्ताक देश म्हणून भारतानं स्वातंत्र्यानंतर जे चांगले आणि वाईट दिवस पाहिलेत, तीच आपली ‘वर्तमान संस्कृती’ आहे.

याच कालखंडाला समोर ठेवून मी ‘वर्तमान संस्कृती आणि सृजनशीलता’ या विषयावर बोलणार आहे. आधी मी ‘वर्तमान संस्कृती’ आणि नंतर ‘सृजनशीलते’वर बोलणार आहे.

भारतामध्ये संस्कृतीची दोन केंद्र आहेत. एक आहे - ‘शहरी संस्कृती’ आणि दुसरी आहे - ‘कृषीजन संस्कृती’. या दोन्ही संस्कृतींचा वर्तमान वेगवेगळा आहे. मागच्या काही काळापासून ‘ग्लोबल व्हिलेज’ या संकल्पनेचा खूप वाजतगाजत प्रचार करण्यात येतोय. काही लोक, त्यात काही लिहिणारेही सामील आहेत. त्यांच्या मते आता सगळं जग एक खेडं झालं असून, गाव आणि शहर यांच्यामधलं अंतर मिटलं आहे, पण मी या लोकांशी सहमत नाही.

‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना संपर्क क्रांतीची पैदास आहे. जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहणारे लोक संपर्क क्रांतीमुळे एकमेकांशी सहज संवाद साधू लागले, भेटू लागले. केवळ एवढ्या एकमेव कारणामुळं संपूर्ण जग एक खेडं बनलंय, असं आपण म्हणू शकत नाही. गाव आणि शहरांत काही मुलभूत फरक आहेत, ते या दोन्ही संस्कृतींना वेगळं करतात. कोणी कितीही ‘ग्लोबल व्हिलेज’चे नारे दिले, तरी दोन्ही संस्कृती वेगवेगळ्या आहेत. मी खेड्यातून आलोय, त्यामुळे कृषीजन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर बोलतोय.

गावाच्या निर्मितीचा पाया शेतीनं घातला. जवळपास दहा हजार वर्षांपूर्वी माणसानं शेती करायला सुरुवात केली. स्त्रियांनी शेतीचं तंत्र शोधून काढलं. आजही भारतामध्ये शेती क्षेत्रात बहुसंख्य प्रमाणात स्त्रिया आहेत. शेती हा केवळ आमचा व्यवसाय नाही तर जीवन जगण्याची पद्धत आहे. शेतीमुळेच भारतात एक मूल्य‌ व्यवस्था विकसित झाली. माणसांसोबतच परिसरातील सर्व सजीवांची काळजी वाहणारी ही मूल्य व्यवस्था आहे. ग्रामीण भारताची भाषा, चित्र, शिल्प, संगीत हे सर्व शेतीतूनच उगवले. गावाच्या सांस्कृतिक संपन्नतेची मूळं कृषी जीवनामध्ये आहेत. पण आज गावाच्या समृद्धीची चमक हळूहळू फिकी पडत आहे, हा उतार सांस्कृतिक आणि भौतिक दोन्ही क्षेत्रांत सुरू झालाय.

गावाचं वर्तमान विरोधाभासांनी व्यापलं आहे. व्यवस्था एकीकडं शेतकऱ्याला ‘अन्नदाता’ म्हणत कवितामय भाषेत त्याचं उदात्तीकरण करतात, परंतु दुसरीकडं प्रत्यक्ष धोरणं ठरवण्याची वेळ आली की, श्रमिक वर्गाच्या विरोधात जातात. हे दुतोंडेपणाचं लक्षण आहे. आपण विकासाची जी संकल्पना स्वीकारली, तिच्यात ‘कृषीकेंद्रित’ विकासाचा कधीच नीट विचार करण्यात आला नाही. युरोपीय भांडवलशाहीच्या दुष्प्रभावामुळे गावं बरबादीच्या टोकावर उभे आहेत. गावांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उपभोक्तावादी उत्पादनांचा महापूर आलाय, हे उत्पादनं एकावर एक फुकट विकण्यात येतायत आणि दुसरीकडं पिकांना लागणाऱ्या खतासाठी शेतकरी लांबलचक रांगेत ताटकळत उभा आहे. तरीही त्याला वेळेवर खताची एक गोणीही मिळत नाही. हा कसला विकास आहे?

‘समाजवादा’चा नारा देत देत आपण भांडवलशाहीच्या रस्त्यावर धाप लागेपर्यंत पळत आहोत. अमेरिका किंवा युरोपातील देशांची ‘करप्ट कॉपी’ बनण्यासाठी आपली मरमर चालू आहे. आपण कधीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही की, प्रत्येक समाजाची स्वतःची एक ‘देशी आधुनिकता’ असते. ही देशी आधुनिकता स्वतःच्या मातीतून येते‌. तिला युरोपातून आयात करता येत नाही.

आपण जर युरोपीय भांडवलशाही मागे पळालो नसतो, तर आपली ‘देशी आधुनिकता’ विकसित होऊन गावाच्या माध्यमातून प्रकृतीपूरक विकासाच्या मार्गावर चाललो असतो. महात्मा गांधी ‘ग्रामस्वराज्य’च्या माध्यमातून याच ‘देशी आधुनिकते’विषयी आयुष्यभर बोलत होते. गांधीजींनी गावाला देशाच्या विकासाचं केंद्र मानलं. त्यामुळेच गांधीजी म्हणाले होते-

“आपल्या लोकसंख्येच्या पंचाहत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आपण जर या लोकांच्या मेहनतीचं सगळं फळ हिसकावून घेत असू तर आपण असं म्हणू शकत नाही की आपल्यात स्वराज्याची भावना पूर्ण स्वरूपात आहे.” (‘स्पिचेस एंड राइटिंग्स ऑफ महात्मा गांधी’)

गांधीजींचं हे विधान आपल्याला आरसा दाखवतंय. या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याचं धैर्य आपल्यात आहे का? भांडवलशाही सोबतच गावांवर विस्थापनाचं संकट ओढवलं आहे. हे संकट भांडवलशाहीचंच प्रतिफळ आहे. औद्योगिकीकरण, धरणं यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी शेती, गावं अधिग्रहित करण्यात येतायत. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधताना जे १०७ गावं बुडवण्यात आले, त्यात एक गाव माझंही होतं. यामुळे विस्थापनाची वेदना काय असते, हे मला चांगलंच माहितीय.

एखादं गाव जेव्हा विस्थापनाच्या चक्रीवादळात सापडून नष्ट होतं, तेव्हा तिथली भाषा, रितीरिवाज ही नष्ट होतात. विस्थापित माणसाच्या आतलं जग मरून जातं. गाव बसण्यासाठी हजारो वर्षं लागतात, परंतु आपल्या व्यवस्था क्रूरपणे त्याला विकासाच्या नावाखाली काही दिवसांत नष्ट करतात. ही गावं पुन्हा कधीही पुनर्जीवित होत नाहीत.

भांडवलशाही गावांची शिकार करत आहे. हा गावांच्या मृत्यूचा आणि महात्मा गांधींनी जे ग्राम स्वराज्यचं स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नाची धूळधाण होण्याचा काळ आहे.

शेती क्षेत्राच्या सांस्कृतिक अंगाकडं कायमच डोळेझाक करण्यात आलीय. बाजार व्यवस्थेनं आपला आत्मविश्वास कमी केलाय. त्यामुळेच आपण मातृभाषांकडं संशयानं पाहतोय. मातृभाषांवर इंग्रजीच्या साम्राज्यवादाचा संकट ओढावलंय. इंग्रजी प्रस्थापित करण्यासाठी भाषिक साम्राज्यवादाच्या सर्व क्लुप्त्या योजन्यात येतायत. अभिजन वर्ग इंग्रजीच्या बळावर इतर समाजाचं शोषण करून, इंग्रजीच्या प्रचार प्रसारात रात्रंदिवस मग्न आहे.

मातृभाषेवर इतर भाषेच्या आक्रमणाची ही पहिलीच वेळ नाही‌. यापूर्वी संस्कृतचं आक्रमण आपण पाहिलय. विशिष्ट अभिजन वर्गानं संस्कृतला ‘ईश्वरीय भाषा’ म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीतील महान कवी-लेखकांनी संस्कृतच्या वर्चस्ववादाला नाकारत मराठीसारख्या लोकभाषेमध्ये आपल्या कलाकृती रचल्या. चक्रधर-नामदेव-जनाबाई-ज्ञानेश्वर-एकनाथ-तुकाराम या श्रेष्ठ लोकांनी मराठीला ज्ञानभाषा बनवलं. माझ्या गावचे, पैठणचे भक्ती चळवळीतील कवी संत एकनाथांनी संस्कृत विद्वानांना एक प्रश्न विचारला होता, त्यांनी विचारलं होतं- ‘संस्कृत देवे केली। मर्हाटी काय चोरापासूनी झाली।’

संस्कृतच्या तुलनेत इंग्रजीचं संकट जास्त मोठं आहे. बाजार व्यवस्थेनं इंग्रजीला विश्व भाषेच्या रूपात लोकांसमोर ठेवलय. उन्नतीचा मार्ग इंग्रजीच्या कवाडातून जातो असा लोकांचा भ्रम झालाय. तरीही मला विश्वास आहे की, गावातील लोक मातृभाषांना आणि बोलीभाषांना जिवंत ठेवतील. याच खेडूतांनी मातृभाषांना बनवलय आणि संपन्न केलय. पण हेही एक कटू सत्य आहे की, मातृभाषेतील काही वाक्यप्रचार, म्हणी लोकांच्या तोंडातून नष्ट झाल्यायत. शब्द वापरातून गायब होण्याची प्रक्रिया रोज सुरू आहे. मातृभाषा अपंग होत आहेत. मातृभाषा अपंग होण्याइतकं मोठं दुःख एका लिहिणाऱ्यासाठी दुसरं कोणतंच असू शकत नाही.

मी आत्तापर्यंत वर्तमान संस्कृतीच्या ज्या वैशिष्ट्यांवर चर्चा केलीय, हीच वैशिष्ट्यं सृजनशीलतेची ‘जमीन’ आहेत. वर्तमानात ज्या घटना घडत आहेत, ज्या विचारधारा प्रभावी आहेत, लोकांचे जे आचरण आहे, यांच्या एकत्रित प्रभावातून कलाकृतीचा जन्म होतो. आपण वर्तमानाविषयी नाखूश आहोत. आपलं जग कसं आहे आणि कसं असलं पाहिजे, या दोन्हीच्या दरम्यानच अंतर मोजण्याचं काम सृजनशीलता करते. समाज गोंधळाच्या परिस्थितीतून जातोय. सामान्य माणसासमोर अनंत प्रश्न आहेत आणि व्यवस्था त्याला मूळ प्रश्नांपासून बाजूला नेतायत. व्यवस्थेकडून दुसरेच आभासी प्रश्न समोर ठेवण्यात येतात, जे त्याचे नाहीत. तरीही तो त्या आभासी प्रश्नांविषयी विचार करण्यास बाद्य आहे. यामुळे सामान्य माणसात उद्विग्नता निर्माण झालीय. निराशा आणि पराभवाची भावना त्याच्या प्रत्येक श्वासातून प्रकट होतेय. अशा काळात एक चांगला कलावंत सामान्य माणसाच्या छातीला कान लावून त्याच्या ह्रदयाची धडधड अनुभवतो. तिचं मर्म जाणून घेतो आणि कलाकृतीच्या माध्यमातून त्या माणसाचा आवाज बनतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

शेतीविरोधी धोरणं, धार्मिक कट्टरता, विस्थापन, मातृभाषेवर इंग्रजीचं अतिक्रमण असे अनेक आव्हानं वर्तमान संस्कृतीनं सृजनशीलतेसमोर उभे केलेयत. आज प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आहे आणि या राजकारणात एका विशिष्ट वर्गाचं हीत सामील आहे. हे राजकारण समजून घेऊन त्याला सृजनशीलतेच्या केंद्रस्थानी आणून उघडं पाडावं लागेल. त्यासाठी आपण ज्या मातीतून आलोय, त्या मातीला उत्कटतेनं अनुभवलं पाहिजे, तिला छातीशी कवटाळलं पाहिजे. जर आपण शेतकऱ्याच्या नखात बसलेल्या मातीचा वास आणि चव चाखली असेल, तरच आपण आजच्या संस्कृतीची कलाकृती निर्माण करू शकतो. एखाद्या बेटावर बसून, समाजापासून तुटून आजच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी कलाकृती निर्माण होऊ शकत नाही.

वर्तमान संस्कृतीचा प्रभाव कलाकृतीच्या रूप आणि आशयावर झालाय. काळानुसार भाषेचा आणि कथनाच्या नवीन पद्धतींचा शोध घ्यावा लागेल. भक्ती चळवळीतील महान कवी-लेखकांसमोर भाषेचा जो संघर्ष होता तोच संघर्ष आपल्यासमोर आहे. इंग्रजी आणि मातृभाषा द्वंद्व स्थितीत आहेत. इंग्रजीचं आक्रमण सृजनशीलतेसमोर एक आव्हान आहे. अशा विपरीत स्थितीत कलाकृतीतून मातृभाषेची बलस्थानं शोधावी लागतील. मातृभाषांना इंग्रजीच्या भाषिक साम्राज्यवादासमोर भक्कमपणे उभं करावं लागेल.

वर्तमान संस्कृतीत सृजनशीलतेला किती स्थान आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलो, तर हाती निराशाच लागेल. लोकांच्या रोजच्या आयुष्यातून कला नष्ट होतायत. समाजामध्ये सृजनशीलतेविषयी ओढ असणारे मोजकेच लोक शिल्लक आहेत. अशा वेळेस कलाकाराचं उत्तरदायित्व वाढतं.

आपण हे समजून घेतलं पाहिजे की, जोपर्यंत सृजनशीलता जीवंत आहे, तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज जीवंत आहे. जोपर्यंत माणूस सुख-दुःखाच्या भावनेनं भरलेला आहे, तोपर्यंत सृजनशीलतेची शक्यता जिवंत आहे.

मराठीतील श्रेष्ठ कवी संत तुकाराम म्हणतात-

‘बुडता हे जन न देखवे डोळां।

येतो कळवला म्हणउनि।।’

अर्थात, हे लोक बुडत आहेत आणि मला हे पाहवत नाही. म्हणून मी चिंतीत आहे. मला वाटतं की, वर्तमान संस्कृतीत सृजनशीलतेचं हेच काम आहे.

..................................................................................................................................................................

लेखक संदीप शिवाजीराव जगदाळे तरुण कवी आहेत. 

sandipjagdale2786@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......