अजूनकाही
‘बसोली’ म्हणजे ‘चंद्रकांत चन्ने’ आणि ‘चंद्रकांत चन्ने’ म्हणजे ‘बसोली’, हेच समीकरण नागपूरकर-विदर्भाच्याच नाही, तर बसोलीचा कलावंत जगाच्या पाठीवर जिथं कुठं आहे, त्यांच्या मनात आहे. हा मजकूर प्रकाशित होईल, त्या दिवशी देशातील एकमेव एवढी मोठी बालकलावंतांची ‘बसोली’ ही चळवळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
राजकारणाच्या रणधुमाळीत कलावंतांच्या एखाद्या चळवळीचं ‘काय ते कौतुक’, असा विचार काहींच्या मनात येऊ शकतो, पण एक लक्षात घ्या, जो समाज सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असतो, तोच समाज सुसंस्कृत, सभ्य आणि संयत असतो. गेल्या पन्नास वर्षांत समाजात ‘रंगभान’ निर्माण करण्याचं ‘बसोली’नं केलेलं काम नि:संशय अतुलनीय आहे. म्हणूनच अशा संपन्न चळवळीचं नेतृत्व कसं असतं/असावं, त्याचा घेतलेला हा वेध...
अगदी काटेकोरपणे सांगायचं, तर २८ जानेवारी १९८४ रोजी दुपारी साडेचार वाजता पंचशील चौकातल्या नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात नागपूर-विदर्भात रंगभान निर्माण करणार्या आणि चित्रजागृतीला चेतना देणार्या चंद्रकांत चन्नेंची ओळख झाली. प्रकाश देशपांडेनी ती करून दिली. दहा-पंधरा मिनिटांतच आम्ही ‘अरे-तुरे...’वर आलो. तिघांनीही समोरच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन सिगारेटी फुंकत, दोन कॉफी तिघांत शेअर केली आणि एका दीर्घकाळ चालत राहणार्या मैत्रीचा उगम झाला.
तेव्हापासून आजपर्यंत चंदू आणि मी यांच्या मैत्रीचा अव्याहत नाद सुरू आहे. अतिशय नियमित गाठीभेटी नाहीत, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्याचे प्रसंगही खूप अपवादाने आलेले, एकमेकाला भेटवस्तू देणंघेणं नाही, परस्परांत कुठलाही व्यवहार नाही, एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात आजवर दोघांपैकी कुणीही, कधीही, कुठेही, केव्हाही डोकावूनही पाहिलेलं नाही, तरीही हा नाद आहे, साथीला अशी कोणतीही संगत नसतानाचा... निर्व्याज्य मैत्रीचा. प्रकाश देशपांडे नावाची या मैत्रीतली कडी इतकी अनपेक्षित गळून पडली आणि तीही अशा विचित्र पद्धतीने की, आजही त्याचा वास्तव म्हणून स्वीकार झालेला नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
चिमूरसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या, अत्यंत अभावग्रस्त जीवन जगलेल्या चंदूच्या जगण्याच्या वाटा अनेक वळणावळणांच्या आहेत. आधी शालेय आणि नंतर माध्यमिक शिक्षणासाठी झालेली परवड. मग बडोद्याहून संपादन केलेली मास्टर ऑफ फाईन आर्टची डिग्री, ग्राफिक्स शिकण्यासाठी शांतिनिकेतनला घेतलेली धाव, तेथून मुंबईला जे.जे.मध्ये, नंतर त्रिवेंद्रमला आणि अखेर मुक्कामाला नागपूर गाठलेलं...
नागपूर गाठलं, तेव्हा चंदूचं वय तिशीच्या आसपास असावं. आपल्या भूप्रदेशातल्या मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, म्हणून त्याने स्थापन केलेली ‘बसोली’ आणि त्या चळवळीची माहिती सर्वांनाच आहे. बसोलीच्या ४०पेक्षा जास्त वर्षांचा साक्षीदार मी आहे आणि सतरंजी उचलण्यापासून ते शिबिरातला प्रमुख पाहुणा होण्यापर्यंत चंदूसोबत राहण्याचा उद्योग या काळात झालेला आहे.
माणसासारखा माणूस असल्यानं चंदूत काही अवगुण असतील; असायलाच हवे, शिवाय कलावंत असल्यानं तर इच्चकपणाचे रंग गडदच आहेत, पण चांगला मित्र म्हणून चंदूवर ‘क्लोज अप’ टाकायचा झाला, तर एका वाक्यात असं सांगता येईल की, चंदू हा वर्तमानात जगणारा माणूस आहे. बसोलीच्या शिबिरासाठी भासणार्या आर्थिक टंचाईचा प्रश्न असो, की वैयक्तिक आयुष्यात कोसळलेला दु:खाचा पहाड असो, की जीवाभावाचा मित्र पाहता पाहता तुटून पडलेला असो, चंदू उन्मळून पडत नाही. म्हणजे खरं तर हे म्हणणंही अर्धसत्यच आहे. तो मनातून कोसळलेला असतो, पण ते काहीच न दाखवता समंजसपणाचा एक विलक्षण असा भाव त्याच्या डोळ्यांत अशा वेळी तरळत असतो.
समंजसपणाचा तो भाव समोरच्याच्या मनात उठलेल्या दु:खावेगाला मग आपसूक आणि नकळतपणे आवर घालतो. म्हणजे उदाहरणार्थ बसोलीच्या सुरुवातीच्या दिवसांत निधीची टंचाई असायची, तेव्हा उधार-उसनवारी ज्या शांतपणे चंदू करायचा, त्याच किंबहुना त्यापेक्षाही जास्त शांतपणे अलीकडच्या काही वर्षांत एखादं चित्र विकून त्यात आलेले तीन-चार लाख रुपये तो बसोलीच्या शिबिरावर बिनबोभाट खर्च करणार.
काही वर्षांपूर्वी एकदा चंदू, प्रकाश आणि मी यांच्यात एक घनघोर युद्ध रंगलं.... बसोलीचा कारभार एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरप्रमाणे सूत्रबद्ध पद्धतीने आणि आपण नसलो, तरी अव्याहतपणे कसा सुरू राहिला पाहिजे आणि त्यासाठी कसं नियोजन केलं पाहिजे, चंदूनंतरचे वारसदार कसे निवडले जातील, ते कोण असतील, वगैरे वगैरे मुद्दे या घनघोर युद्धात होते. म्हणजे चंदू ते ऐकत होता आणि मी व प्रकाश बोलत होतो. असे दोन-अडीच तास गेल्यावर युद्ध संपवताना चंदू म्हणाला, ‘उद्याचं नंतर काय व्हायचं ते होतच राहील, आपण असलो-नसलो तरी. आता या शिबिराच्या तयारीला लागायला हवं.’ आणि मग तो विषय त्याच्या बाजूने त्यानं संपवला आणि आम्हालाही तो उकरून काढू दिला नाही.
याहीपेक्षा खरा कसोटीचा क्षण होता, त्याची पत्नी माधुरीवहिनींच्या अपघाती निधनानंतर. दु:खाचे कढ ओसरण्याआधीच ते रिचवून माधुरीच्या निधनानंतर तिसर्याच दिवशी चंदू बसोलीच्या शिबिराच्या तयारीला लागला आणि पत्नीचं मरण इतरांसाठी बंद भूतकाळ ठरवून टाकला. एखादी नकोशी वाटणारी वस्तू संदुकीत कायमची बंद करून टाकावी, तसा तो विषय चंदूनं संपवला.
चंदूचं हे असं वागणं समोरच्याला अनेकदा अचंबित करतं, पण सख्ख्या मित्रांना मात्र शंभर टक्के माहीत असतं की, सारं काही पचवल्याचं एक सोंग चंदू वठवतो आहे, पण इतकं समंजस होणं प्रत्येकाला कधीच जमणार नाही, हेही आपल्याला ठाऊक असतं, हे जितकं खरं, तितकंच महत्त्वाचं म्हणजे ते सोंग चंदूला शोभतंही छान!
चंदूची माणसं जोडण्याची कला एक विलक्षण तर्हेवाईक आहे. म्हणजे कसं तर, चंदूची मैत्री आधी एखाद्या घरातल्या मुलाशी होते, मग मुलाच्या आईवडिलांशी होते, मग त्या मुलाच्या आजी-आजोबांशी होते आणि मग चंदू एकेक जणाशी जोडत जातो. आजूबाजूला दीडशे-दोनशे मुले वावरत असली, खेळत असली, खेळता खेळता भरपूर गोंगाट करत असली, तरीही त्याचा चंदूला काहीही त्रास होत नाही, उलट हा गोंगाट वगैरे आपल्यासाठीच ही मुलं करताहेत आणि तोच आपला खरा श्वास आहे, असा चंदूचा भाव असतो.
या गोंगाटात चंदू जितका रमतो तितका मोठ्या माणसात प्रत्येक वेळी रमतोच असं नव्हे, मुलांचा गोंगाट जर सलग दोन-चार दिवस ऐकू आला नाही, तर चंदूला डिप्रेशन आल्याशिवाय राहणार नाही, असं आम्ही जे म्हणतो ते काही उगाच नाही.
सहज बोलत चित्रकार चंदू ‘बसोली’चे बालकलावंत साथीला घेऊन अनेक वेगळे, विस्मय चकित करणारे उपक्रम राबवतो. नागपूर जवळचं मोवाड हे गाव अतिअति वृष्टी आणि पुरामुळे मोडून पडलं. तेव्हा मदतीचा ओघ सुरू झाला. ‘लोकसत्ता’नं एक शाळा बांधून देण्याचं ठरवलं. तेव्हा माधव गडकरी संपादक होते. त्यांना अशा उपक्रमात खूपच रस असायचा. ‘बसोली’चे कलावंत ऐन श्रावण सरीत भिजत नागपूरभर ट्रकमध्ये चित्र काढत फिरले आणि जमा झालेला निधी आम्हाला दिला. (‘लोकसत्ता’च्या वतीनं तो धनादेश मीच चंदूच्या हस्ते स्वीकारला!). ही चित्रंही आठ बाय बार फूट अशा भव्य कॅनव्हासवर काढली होती.
करायचं ते भव्य-दिव्य ही चंदू आणि ‘बसोली’ची खासीयत. या संदर्भातली एक आठवण खासच आहे. नागपूरच्या पत्रकार सहनिवासचं बांधकाम नुकतंच सुरू झालं होतं. त्या साईटवर एक दिवस संध्याकाळी चंदू, प्रकाश (देशपांडे) आणि मी गप्पा मारत बसलो होतो. समोर लांsssबलचक, शुष्क भासणारी कंपाऊंड वॉल चंदूला अस्वस्थ करत होती. ‘आपण या भिंतीवर म्युरल करू’, अशी कल्पना चंदूनं मांडली. प्रकाश संस्थेचा सचिवही होता. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागला आणि संस्थेच्या कार्यालयासमोर ‘बसोली’च्या बाल कलावंतांनी १२० फूट लांब आणि १० फुट उंचीचे म्युरल १०० दिवस काम करून साकारलं. या काळात आम्हा सर्वांचा मुक्काम याच साईटवर असायचा. लोक म्हणाले, ते आशियातील सर्वांत मोठं म्युरल आहे, पण काम संपल्यावर चंदूला त्यात काहीच रस उरलेला नव्हता. काम संपलं आणि निर्लेप मनानं तो आणि ‘बसोली’चे कलावंत बाजूला झाले.
बसोलीच्या नादी लागून अनेक वर्षे चंदू चित्रे विसरला. त्याचे हे ‘चित्र विसरणे’ प्रकाशला खूप खटकायचं. प्रकाश आणि चंदू हे दोघं तसे खूप जुने म्हणजे प्राचीन वगैरे म्हणता येतील, म्हणजे बालपणापासून एकमेकाला ओळखणारे. त्यामुळे बसोलीच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असला, तरी प्रकाशला चंदूच्या या चित्र विसरण्याचा भयंकर राग यायचा. हा राग तो व्यक्तही करायचा. मग, चंदू, ‘काढेननं बे चित्र कधीतरी, मी काय आत्ताच मरणार थोडीच आहे?’ अशा एका ‘स्टेटमेंट’ने या वादाचा समारोप करायचा.
चंदू तसा खूप गोष्टीवेल्हाळ वगैरे नाही पण, एखादा विषय सुरू करताना किंवा त्याच्या बाजूने संपवताना असं तिरकस स्टेटमेंटवजा बोलणं ही चंदूची खासीयत. स्टेटमेंट करताना मरण वगैरे असं सॉलिड काही आलं, तर समोरचा गप्प होणार नाही तर काय? यातलाही भावनिक भाग असा की चंदूनं पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली तर आता प्रकाश नाही. पण एक खरं, मरण शब्द त्याच्या बोलण्यातून तेव्हापासून गायब झालाय.
तिरकस स्टेटमेंट करताना चंदू बहुतेक वेळी आधार घेणार तो वर्हाडीचा म्हणजे मुलांचा गोंगाट आपल्याला असह्य झाला आहे, हे जर चंदूला जाणवलं चुकूनच तर; मग तो सौम्य आवाजात ओरडणार, ‘पोट्टेहो जरा कमी ओरडा ना रे, याईले त्रास होतोय!....’ हे स्टेटमेंट कसं, तर तुमच्या गोंगाटाचा यांना त्रास आणि मला आनंद होतोय, हे ध्वनित करणारं. ओंकारनं म्हणजे त्याच्या मुलानं परस्पर लग्न ठरवलं, तर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चंदू म्हणणार, ‘त्याच्यापेक्षा होणारी सून जास्त चांगली आहे!’ म्हणजे ओंकार किती चांगला आहे, हे सांगायचं नाही, होणारी सून चांगली आहे, हे सांगायचं, पण किती चांगली याबद्दल काहीच नाही आणि ओंकारचा लग्न ठरवण्याचा अधिकारही मान्य करायचा, हे असे वेगळे अर्थ एकाच वेळी ध्वनित करणारी ‘स्टेटमेंटस’ चंदूच करू जाणे!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
चंदू अनेकदा जेव्हा भेटतो, तेव्हा मधल्या काळात प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप काही घडून गेलेलं असतं. अशा वेळी आमच्यात फार काही बोलणं होत नाही. दु:खाचे काही प्रसंग जर घडून गेले असले, तर काहीच न बोलता आम्ही गप्प बसून राहतो. पूर्वी या शांततेत धुराची वर्तुळं काढायचो. अशी दहा-पंधरा मिनिटं गेली की, काहीच न बोलता किंवा कोणताही स्पर्श न होता एकमेकांचे सांत्वन म्हणा वा एकमेकाला समजणं म्हणा, ही प्रक्रिया आमच्यात घडून गेलेली असते. मग आमचं बोलणं सुरू होतं. मध्ये काहीच न घडल्यासारखं, कोणताही खंड न पडल्यासारखं. मग तो बोलण्याचा नाद उमटत राहतो.
चंदूचे झब्बे हा एक खास चर्चेचा विषय. चंदू ते कुठून शिवतो, त्यासाठीचं कापड कुठून आणतो, हे आम्हाला कधी कळलेलं नाही. आम्हा समवयस्कांसाठी नाही पण, त्याच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षांपेक्षा लहान असणार्या कुणी त्याच्या एका झब्ब्याची किंवा शर्टाची तारीफ केली तर मग ते सुख चंदूच्या चेहर्यावर ऐसपैस पसरतं. हे असं ‘अॅप्रिशिएट’ होणं आणि तेही विशेषत: धाकट्यांकडून चंदूला आवडतं आणि मानवतंही. असं कौतुक करणार्यांना मग पुढच्या शिबिराच्या वेळेस चंदूकडून एखादा आकर्षक झब्बा किंवा टी शर्ट किंवा तत्सम एखादं प्रेझेंट कौतुक करणार्याला हमखास मिळतं.
संदुकीत प्रदीर्घ काळ लपवून ठेवलेला कुंचला चंदूनं अशात पुन्हा बाहेर काढला. त्यामुळे त्याचे अनेक आर्थिक प्रश्न सुटले आणि झपाटलेपणही वाढलं आहे. चंदू त्रशैली अमूर्त आहे. वर्तमानात जगणारा चंदूसारखा चित्रकार मित्र अमूर्त सर्जनतेतून जगण्याचे कोणते अर्थ शोधतो आहे, असा प्रश्न मला पडलेला आहे.
(संदर्भ सहाय्य - भाग्यश्री बापट-बनहट्टी)
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment