अजूनकाही
अमेरिका भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत आहे, लोकसभेची निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे, हा रशियाचा आरोप अत्यंत गंभीर आहे. आपल्याकडील नेते, अभ्यासक वगैरे मंडळी अनेकदा या ‘परकीय हाता’विषयी बोलत असतात. पण आजवर बहुतांश वेळा हा आरोप भारतीयांकडूनच झालेला आहे. ही पहिलीच वेळ आहे की, रशियाने अमेरिकेवर थेट आणि जाहीरपणे हा आरोप केलेला आहे. अमेरिकेने तो अर्थातच फेटाळून लावला आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालय कोणती प्रतिक्रिया देते, हे पाहणे औत्सुक्यजनक होते.
अमेरिका हा आपला मिठीबद्ध मित्रदेश. रशियाही मित्रच. इतका की, रशिया-युक्रेन युद्धात कसलेल्या डोंबाऱ्याला लाजवील अशा प्रकारची तारेवरची कसरत करत भारताने रशियाची पाठराखण केली आहे. अशा कसरतीलाही अलीकडे ‘मुत्सद्देगिरी’ म्हणतात. तर त्यानुसार एकीकडे राष्ट्रांचे सार्वभौमत्त्व, प्रादेशिक एकात्मता यांचा गौरव करायचा आणि दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांत व्लादिमीर पुतीनांच्या युद्धखोरीचा निषेध करण्याची वेळ आली की, तटस्थ राहायचे, असा प्रकार भारत करत आलेला आहे. दोन दगडांवर पाय ठेवताना नैतिकतेची डगमग होतेच. परंतु ते ‘रिअल पॉलिटिक’च्या नावाखाली खपवून नेले जाते. तर अशा परिस्थितीत रशियाने हा आरोप केलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत ‘परकीय हाता’चा मुद्दा उचलला होता. जगातील काही लोक भारतीय निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. रशिया नेमके तेच नाव घेऊन सांगत होते, मात्र त्यावर भारताकडून फारच गुळमुळीत प्रतिक्रिया आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये यावर थेट बोलणे टाळले. ते एवढेच म्हणाले, ‘कोणत्याही परकीय शक्तीने भारताच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. असे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत.’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आंतरराष्ट्रीय संबंध आणि संवादात ‘लाल आँख’, ‘नानी याद दिला देंगे’, ‘घर में घुस के मारेंगे’ अशा प्रचारी वल्गनांना स्थान नसते. ते येथील भोळ्याभाबड्या मतदारांसाठीच योग्य ठरते. आता मुद्दा रशियाच्या त्या आरोपाचा.
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखरोव्हा यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका भारताच्या संसदीय निवडणुकांत लुडबूड करण्याचा आणि तेथील अंतर्गत राजकीय संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे कशावरून तर, खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचण्यात काही भारतीयांचा समावेश असल्या अमेरिकेचा दावा असला, तरी त्याबाबत अमेरिकेने अद्याप कोणताही विश्वासार्ह पुरावा दिलेला नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अमेरिकी आयोगाचा भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयीचा अहवाल. त्यात भारतावर टीका करण्यात आलेली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तो पक्षपाती असल्याचे म्हणतानाच, हा आयोग नेहमीच भारतविरोधी प्रोपगंडा प्रसिद्ध करत असल्याचा प्रत्यारोपही केला आहे.
रशियन परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणेही असेच आहे. अमेरिका नेहमीच धार्मिक स्वातंत्र्याबाबत बिनबुडाचे आरोप करत आहे. अमेरिकेला भारताच्या राष्ट्रीय मानसिकतेची आणि इतिहासाची समजच नाही, असेही रशियाने म्हटले आहे. वरवर पाहता रशिया भारताची बाजू घेत असल्याचे यातून दिसेल. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात दिसते तसे नसते आणि नसते तेही अनेकदा दाखवले जाते. ते कसे हे समजून घेण्यासाठी रशिया, अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांच्या इतिहासाकडे पाहावे लागेल.
भारतास स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून हा अवघा उपखंड तत्कालिन सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्या संघर्षाचे मैदान बनलेला होता. स्वातंत्र्यानंतरची पहिली किमान तीन दशके या दोन्ही देशांनी आणि त्यांच्या गुप्तचरसंस्थांनी भारतात अनेक उपदव्याप केलेले आहेत. भारताला आपल्या तंबूत खेचण्यासाठी त्यांनी अनेक कारस्थाने केलेली आहेत.
इंदिरा गांधी ज्यास ‘परकीय हात’ म्हणत तो हाच. आपले तेव्हाचे राजकीय नेतृत्व समर्थ आणि शहाणे. त्यांनी राष्ट्रीय गरजेच्या चौकटीतच या दोन्ही गोटांशी संबंध ठेवले आणि त्याच वेळी ‘अलिप्त राष्ट्रांची चळवळ’ उभारून आपले स्थान बळकट केले. मात्र तेव्हाचा तो संघर्ष, ती दोन महासत्तांची भारतीय संदर्भातील लढाई संपलेली नाही. रशियाचा ताजा आरोप हे त्याचेच सातत्य अधोरेखीत करत आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेली ती विधाने ही सहज प्रसंगोपात आलेली नाहीत.
वरवर पाहता असे वाटू शकेल की, दैनंदिन मीडिया ब्रिफिंगच्या वेळी कोणा पत्रकाराने सवाल केला आणि त्याच्या उत्तरात त्या प्रवक्त्या बाईंनी ते वक्तव्य केले. माध्यमविश्वाची जाणकारी असलेला कोणीही सांगेल की, अनेकदा असे प्रश्न पेरलेले असतात. परराष्ट्र मंत्रालयाला जे काही सांगायचे आहे, त्यासाठी आपल्या एखाद्या ‘सहानुभूतीदार’ पत्रकारास त्या संदर्भातील प्रश्न विचारण्यास सांगितले जाते आणि मग तो प्रश्न आला म्हटल्यावर काय करणार, उत्तर तर द्यावेच लागणार असा आव आणत म्हणायचे ते म्हटले जाते.
ही युक्ती काही नवी नाही. रशियाच्या प्रवक्त्याबाईंनी तीच वापरल्याचे दिसते. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या समोरील नोट्स वाचताना दिसत होत्या. याचा अर्थ उघड आहे. पेपर आधीच ‘सेट’ केलेला होता. तो प्रश्न ‘इम्प्रॉम्प्टू’ प्रकारचा नव्हता. बाईंनी दिलेले ते उत्तरही साधेसरळ नव्हते. तो उघड उघड रशियाच्या ‘ॲक्टिव्ह मेझर्स’चा भाग होता.
‘ॲक्टिव्ह मेझर्स’ म्हणजे रशियाच्या परराष्ट्र धोरणास साह्य होईल, अशा रितीने केलेल्या कपट कारवाया. ‘प्रोपगंडा’ हा त्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. तो केला जातो तो जनमत हवे तसे वाकवून घेण्यासाठी किंवा व्यक्ती वा सरकार यांची मते प्रभावित करण्यासाठी. रशिया आता नेमके तेच करताना दिसत आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
भारतीयांच्या मनात अमेरिकेविषयी संताप निर्माण व्हावा, या हेतूने रशियाने तो आरोप केल्याचे दिसते. आपल्या देशात ‘परकीय हस्तक्षेप’ होत आहे, तोही ऐन निवडणुकीच्या काळात, हे कोण सहन करणार? या बाबतीत त्या एकट्या पन्नूचा मुद्दा परिणामकारक ठरणार नाही, हे जाणूनच त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य अहवालाची फोडणी त्यास दिलेली आहे.
पन्नूच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका यांच्यात खटाखटी सुरू आहे हे खरे. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग - रॉ - चा त्या कटात हात असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. तिकडे कॅनडानेही भारतावर निज्जर हत्या प्रकरणी आरोप केलेले आहेत. पाकिस्तानात झालेल्या काही ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांबाबत पाश्चात्य दैनिकांतून संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे असे प्रकार रॉ पहिल्यांदाच करत आहे, असे मानायचे कारण नाही. अशा प्रकारे उघड मात्र ते पहिल्यांदाच झाले आहेत. याचा प्रतिकूल परिणाम भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि परदेशी गुप्तचर यंत्रणा यांच्यातील सहकार्यावर होणार आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र निवडणूक प्रभावित करण्याचा प्रश्न असेल, तर तेथे मात्र हा विषय विद्यमान सरकारच्या फायद्याचाच ठरणार आहे.
आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारतो, हे केंद्र सरकारचे म्हणणे निज्जर आदी हत्यांवरून खरेच ठरते असे म्हणता येईल. पण निवडणूक प्रचारात अगदी म्हशी आणि मंगळसूत्रासारख्या गोष्टी आणणाऱ्या मोदी आणि मंडळींनी आपल्या या कारवायांबद्दल अवाक्षरही काढलेले नाही. यात आश्चर्याचे कारण नाही. याबाबत मारलेल्या डिंगा परराष्ट्र संबंधांत अडचणीच्या ठरू शकतात एवढे शहाणपण अद्याप शिल्लक आहे.
अर्थात आपण परदेशांत घुसून दहशतवाद्यांना टिपतो, हे उघडपणे प्रचारात सांगणे अडचणीचे असले, तरी समाजमाध्यमांतून त्याचा प्रचार करता येतोच. तेव्हा अमेरिकेतून त्याबाबतच्या बातम्या आल्या, तरी त्या येथे सरकारला फायद्याच्याच ठरतात. किंबहुना त्या हेतूने तर तशा बातम्या पेरण्यात येत नाहीत ना, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. धर्मस्वातंत्र्याच्या अहवालाचे तसे नाही. त्यातील टीका उघडच तोट्याची ठरू शकते. ते लक्षात घेऊनच रशियाने तो मुद्दा उचलला. भारतास भडकवण्याचा तो प्रयत्न आहे. भारत-अमेरिका संबंधांत काडी घालणे, हा त्याचा हेतू आहे. आंतरराष्ट्रीय पटावरील ‘प्रोपगंडा’ची ती एक चाल आहे. ही ‘परकीय हाता’ची वळणे. ती नीट समजून घेणे गरजेचे.
.................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ आणि ‘परकीय हात’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment