अजूनकाही
पंतप्रधान मोदी यांच्या तोंडून संघाचीच विषारी वाणी बाहेर पडत असताना संघाने मोदींना मांडीवरून उतरवले, असा बभ्रा कोण बरे करू लागले आहे? आजवर मोंदींनी संघाला आपल्या मांडीवर बसवून राज्यकारभार हाकल्याचा गाजावाजा चालला होता. अचानक संघ आणि मोदी यांच्या मांड्या कशा काय बदलल्या? मुंबईच्या एका इंग्रजी दैनिकाने बातमी छापली की, मोदी बेकाबू झाले, बदनाम झाले अन् नाकाम झाले, त्यामुळे संघ आता त्यांना आटोक्यात आणायच्या बेतात आहे. मोदी संघाला डोईजड होऊ नयेत, म्हणून संघच त्यांना डोईवरून खाली उतरवण्याच्या विचारात आहे.
मोदी यांचा अपप्रचारसुद्धा म्हणावा तसा प्रभाव उत्पन्न करीनासा झाला, तेव्हा मोदींची उपयुक्तता संपली, असे ठरवून संघ त्यांच्यापासून स्वत:ला अलग करू लागल्याच्या बातम्या, तर्क, अंदाज अन् कयास वेगवेगळ्या माध्यमांतून पसरत आहेत. आपली शंभरीही संघ साजरी करणार नसल्याचे ऐकू येत आहे.
संघ कसा सदैव कर्तुमकर्तुम शक्तीवान असतो, असा भ्रम देशभर संघानेच पसरवलेला असतो. देशभर म्हणत आहात म्हणजे तुम्हीच कबूल करत आहात, त्याच्या ताकदीचा व्याप, असे कोणी म्हणेल, पण तसे नाही. मोक्याच्या ठिकाणी पेरलेले लोक असे बोलत सुटले की, तसा भ्रम पैदा करता येतो. प्रचार आणि त्याचा प्रभाव हे संघाचे अत्यंत जमलेले पक्वान्न आहे. नुसत्या घमघमाटाने जशी भूक चाळवते किंवा मिटते, तसे हे आहे.
तेच तर मोदी यांच्या निमित्ताने उघडे पडले. करून करून प्रचार कितीसा कामी येणार? मोदी उत्कृष्ट प्रचारक नक्की आहेत. परंतु प्रचारक उत्कृष्ट कार्यवाहक अथवा अमलदार नसतो. कधीच नसतो. संघाच्या मुशीमधून घडलेला एक प्रचारक केवळ प्रचाराच्या बळावर पंतप्रधानपदावर पोचला, एवढेच संघाचे यश. तेवढीच ती संघाची मर्यादासुद्धा.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
म. गांधींकडे लोकांना भुरळ घालणारे वक्तृत्व अजिबात नव्हते. नेहरूंचा आवाज मृदू होता. त्यामुळे त्यांनाही मर्यादा होत्या. वल्लभभाई पटेल, सुभाष(बाबू)चंद्र बोस, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण हे फर्डे वक्ते अथवा गगनभेदी आवाजाचे धनी नव्हते.
संघाचा प्रचारावर भर का? तर उघड आहे, प्रचार म्हणजे बुद्धिभेद किंवा धूळफेक किंवा दिशाभूल! सामान्य डोक्याला समजणारही नाही, इतक्या शिताफीने खऱ्याचे खोटे अन् खोट्याचे खरे करणे. जोडीला आवेश, हावभाव, भावनाविष्कार, वेश, व्यक्तिमत्त्व आणि प्रतिमा असली की, पुरे!
गोळवलकर नव्हे का संन्याशासारखे दिसत! लांब दाढी, लांब केस, धोतर-सदरा आणि कृश शरीर, साधी राहणी… त्यामुळे झाले असे की, आधी शत्रू ठरवणे आले. कारण प्रचार करायचा तो कोणाच्या तरी विरोधात असावा लागतो. एरवी धर्मप्रचाराच्या नावाखाली पोवाडे, कीर्तने, प्रवचने, निरुपणे, गीते, कथा आपल्या समाजात सदैव चालूच असतात. जे माहीत आहे ते सांगून काय फायदा? अन् जे इतर करतात ते आपण करून आपले राजकीय हित कसे साधणार? प्रचार एकतर्फीच असतो. समुदाय अंकित करणे, हाच त्यांचा उद्देश असतो.
म्हणजेच त्याचा छुपा हेतू राजकीय अन् स्वार्थी असतो. कथा, कीर्तन यांचा हेतू लोकांना सन्मार्गी बनवणे आणि सुख-शांतीचा मार्ग दाखवणे असतो. संघाचे ध्येय भारताचे ‘हिंदूराष्ट्र’ करण्याचे आहे. त्यासाठी तसा विचार डोक्यात घुसवायचे आहे. पण संघाची अडचण म्हणा, किंवा वृत्ती म्हणा, त्याला काहीही घडवणे जमत नाही. माणूस घडवतो, मन घडवतो असे तो म्हणतो, पण विधायक दृष्टी संघात नाही. व्यापक औदार्य किंवा विशाल क्षमाशील वृत्ती संघात नाही.
त्याचा परिणाम असा होतो की, जे संघदीक्षित नसतील ते सारे संघ ‘हिंदूराष्ट्रा’च्या उभारणीला नालायक व मठ्ठ ठरवतो. सर्वसामान्य माणूस फक्त सैनिकासारखा वापरायचा असतो, एवढेच त्याला ठाऊक. काडर म्हणजे एक शिस्तीचे प्रशिक्षित दळ ‘हिंदूराष्ट्र’ उभारणीला लागते, या भूमिकेपायी संघ सामान्य माणसापासून दुरावलेला असतो. आपला हुकूम व आपला विचार संपूर्ण स्वीकारलाच पाहिजे, असा हट्टी संघ असल्याने त्याला सामान्यांना पडणारे प्रश्न ऐकून घ्यायची ना सवय, ना आवड.
अगदी हीच सवय किंवा कार्यपद्धती मोदी यांची सर्वांना माहीत झाली, त्याचे काय कारण? ती खुद्द मोदींनीच प्रचलित केली. प्रतिप्रश्न, शंका, प्रतिवाद आणि नकार जसे संघाला आवडत नसतात, तसेच मोदींनाही आवडत नाहीत, हे त्यांनीच गेल्या दहा वर्षांत दाखवून दिलेले आहे. त्यामुळे मोदी एककल्ली, एकांडे अथवा एकांगी आहेत, हे सांगायची गरज नाही.
१३ वर्षं हा माणूस गुजरातचा मुख्यमंत्री होता. तरीही त्या राज्यात असंख्य समस्या उग्र होत असताना तो देशाला विकसित करण्याची बात करतो, ती कशाच्या बळावर? प्रचार हीच ज्यांची ताकद असते, त्यांचे वैगुण्य कार्य अथवा कृती हेच असते. कृतीशील माणूस काही न सांगता, जाहीर न करता खूप काही करून जातो. संघही स्वत:चा परिचय ‘प्रसिद्धीविन्मुख’ असा करत असतो. याचे खरे कारण संघाकडे करून दाखवले असे अत्यंत कमी आहे, आणि असणार! जे करायचे ते सहेतूक असे ठरवल्यावर त्याचा प्रचार, प्रसिद्धी, टिमकी अथवा डंका न पिटून कसे चालेल? सामान्य माणूस ‘नेकी कर, दरिया में डाल’ या स्वभावाचा असतो. पण संघ तर जन्मजात राजकीय आणि घातकी. शिवाय स्वत:चे काहीही उघड न करणारा, सर्व काही छुप्प्या पद्धतीने करणारा.
शाळा, रक्तपेढ्या, बँका, वृत्तपत्रे संघ चालवतो, असे म्हणतात. संघाची मालकी कशावरही नाही. कारण संघच मुळात अधिकृत नोंदणी झालेला नाही. संघदीक्षित माणसे काही संस्था हाकतात म्हणे! याचा अर्थ असा की, त्या संस्था जी माणसे हाकतात त्या शिक्षणाने, प्रशिक्षणाने, कौशल्याने अन्य संस्था-संघटना यांत तयार झालेल्या. त्यांचा हेतू मात्र ‘हिंदूराष्ट्र’ तयार करण्याचा. त्यांना बँकिंग वा सहकार वा वृत्तपत्रकारिता यांचे कौशल्य संघाने दिलेले नाही. अभियंता, डॉक्टर, लेखापाल, वकील आदींचेही तसेच. संघ कसा आईतखाऊ, लबाड अन् डल्लामारू आहे, हे यातून दिसते. ‘आपला माणूस’ असे वर्णन एखाद्या बँक अधिकाऱ्याचे एक जातवाला करतो, तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या घडणुकीत त्या जातीचा काही वाटा नसतो, तसेच हे संघाचे.
मोदी अपयशी का दिसतात? त्यांच्या सरकारचे घोषणा आणि प्रत्यक्ष कृती यांत अंतर का दिसते? पाच मंत्र्यांव्यक्तिरिक्त मोदी सरकारचे उरलेले मंत्री इतके अज्ञात व अनोळखी कसे? संघाची आता मोदीकार्यापासून स्वत:ला लांब ठेवायची धडपड केवळ व्यर्थ जाणार; कोण कोणाला जबाबदार धरणार? मोदींचे अपयश खुद्द संघाचे अपयश असल्यावर तर एकमेकांच्या डोळ्यांत बघून जाब विचारणेही जड जाणार दोघांना.
संघाकडे म्हणजे भाजपकडे कर्तृत्ववान नेते नव्हते असे नाही. भैरवसिंह शेखावत, केशुभाई पटेल, सुंदरलाल पटवा, कैलाश जोशी, वसुंधराराजे शिंदे आदी नेते मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरले. ते सारे मोदींसारखे वाचाळ, महत्त्वाकांक्षी, प्रचारकी आणि निष्ठुर राजकारणी नव्हते. जातीय हिंसाचार आणि विरोधकांची निंदा यांबाबतीत मोदींनी सर्वांवर मात केली. घात, सूड, चालबाजी, असत्यकथन असे प्रकार भाजपच्या वरील एकाही नेत्याच्या खाती नसतील, परंतु हे सर्व नेते ‘बेटांवरचे राज्यकर्ते’ राहिले.
संपूर्ण सत्ता फक्त मोदींहाती आली अन् बघता बघता मोदींहातूनच संघाला भारताचे ‘हिंदूराष्ट्र’ बनवायची घाई लागली. शिक्षण, साहित्य, कला, चित्रपट, क्रीडा, आरोग्य, विज्ञान, उद्योग, पत्रकारिता, बँकिंग, अर्थ… हावरटासारखी अनेक क्षेत्रे संघ ताब्यात घेत निघाला. ताब्यात म्हणजे संघाचे स्वयंसेवक अथवा सहानुभूतीदार जागजागी नेमत सुटला. का तर म्हणे, या क्षेत्रांवर डाव्यांचा, समाजवाद्यांचा अन् काँग्रेससमर्थकांचा कब्जा होता!
पाहता पाहता दहा वर्षांत ७० वर्षांचा विकास भुईसपाट झाला. बेकारी वाढू लागली. महागाई चढू लागली, भ्रष्टाचार प्रचंड मातला, गुन्हेगारीला भरपूर वाव मिळू लागला, शेती परवडेनाशी झाली, लघुउद्योग व अन्य व्यापार आखडले, चीनकडून अतिक्रमण आणि पाकिस्तानकडून चिथावणी थांबण्याचे नाव घेईना.
पण मोदी व शहा कायम प्रचाराच्या नादात! पक्षांची फोडाफोड, विरोधकांची धरपकड, पत्रकार व कलावंत यांना कैद आणि ‘इलेक्टोरेल बाँड’च्या निमित्ताने उद्योजकांवर धाडी, यांचीही त्यांनी रांग लावली. पर्यावरणाचा नाश आणि अंबानी-अदानी यांनाच तेवढा सरकारी आश्रय ढळढळीत दिसू लागला.
‘विकसित भारता’कडे जायला मोठमोठ्या इमारती अन् पुतळे, प्रतीके व बोगदे यांची बांधकामे वाढली. घरोघर पाणी, वीज आणि शौचालये यांसारखे पालिकापातळीवरचे कार्यक्रम मोदींचा अग्रक्रम होत चालला. रस्ते, पूल, रेल्वेगाड्या यांचा रतीब रोज भारत पाहू लागला, पण यांत बढाई मारण्यासारखे काही नव्हते. पायाभूत रचना उभारणाऱ्या व्यवस्था आपल्या हाती एकवटायच्या आणि राज्ये, जिल्हा परिषदा, पालिका यांना पांगळे करायचे यांत कसला आला विकास? संघाचे तत्त्वज्ञान एकचालकानुवर्ती असल्याचा प्रत्यय देशाला येत चालला तो मोदींमुळेच ना?
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
संघाची प्रतीकांवर अतोनात श्रद्धा. प्रतीकपूजा दोन पद्धतींनी फायदेशीर ठरत असते. एक, इतरांनी बनवलेली प्रतीके आपलीशी करून टाकणे आणि दोन, अज्ञात, अप्रसिद्ध व संशयास्पद प्रतीके आणून ती माथी मारणे. मोदी यांना आपले स्वत:चे नेतृत्व देशावर व जगावर ठसवायचे असल्याने त्यांनी त्यांचा सर्व काही अगडबंब प्रमाणात करायचा, पण अनेक बाबतीत अमलात आणला. उंचीवरचा पूल, समुद्रावरचा पूल, लांब बोगदा, पाण्यावरची विमाने, काशी कॉरिडॉर, जलदगती रेल्वे, ३७० कलम इत्यादी.
संघ जसा सोहळाकेंद्री व्यवहार करत राहतो व आपले अस्तित्व दाखवत राहतो, त्याचप्रमाणे मोदी करत बसले, पण त्यांचे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ असे होत राहिले. पाय रोवून कार्य करत राहायची सवय नसल्याने मोदी उघडे पडत चालले. आपलेच कार्यक्रम कसे पाठ वळता क्षणी कोलमडले, याची त्यांना खबरबात मिळेना. किंबहुना तसा त्यांचा स्वभावच नाही. संघ जसा शाखा वाढवणे, नवी माणसे जोडणे, दुसऱ्यांनी उभ्या केलेल्या संस्था बळकावणे, असे करत शंभराव्या वर्षापर्यंत पोचला, तसे मोदी फक्त योजनांचा झपाटा दाखवत बडे नेते बनले. पण ते पोकळ निघाले. कारण संघाप्रमाणेच मोदींनी ना कधी रस्त्यावर अंग मळवले, ना पोलिसांची लाठी खाल्ली, ना कैद भोगली, ना कधी काही कष्ट केले. बस्स! प्रचार एके प्रचार करत राहिले आणि टपकन मुख्यमंत्रीपदावर येऊन बसले!
संघ जन्मापासून साम्यवाद-समाजवाद विरोधी. त्याची जवळीक भांडवलदारांशी. अंबानी-अदानी यांसारखे भांडवलदार मोदींनी जवळ केले अन् त्यांची इतकी भरभराट केली की, काँग्रेसने तो प्रचाराचाच मुद्दा बनवला. त्या दोघांसकट ज्या ज्या भांडवलदारांची धन मोदी-भाजप-संघ यांनी केली, तिचे पुनर्वाटप गरिबांना करायचा राहुल यांचा उतारा खास समाजवादी आहे. तो प्रतिसाद मिळवू लागला, तसा संघ अस्वस्थ झाला आणि त्याला मोदींसमवेत आपण कसे वाहवत गेलो, याचे भान आले. परंतु असे मोदींना अलग पाडणे, म्हणजे स्वत:चीच प्रतारणा करणे होय. सबब, विविध माध्यमांमधून संघ मोदींवर नाराज अन् नाखूश झाला आहे, याच्या कहाण्या बिननावाने छापून येत आहेत.
समजा मोदी बुडाले, तर मोदींबरोबर संघ बुडेल काय? मुळीच नाही. फॅसिझमचा धोका भारतासमोर आहेच. फॅसिस्टांना आपण एक नार्सिसिस्ट वापरत असल्याचे समजले नाही, असे आपण धरून चालूया. संघाने गेल्या दहा वर्षांत पोखरलेला भारत आपल्या पुढ्यात आहे. ही वाळवी वेचून वेचून काढून टाकायचे काम लई अवघड आहे. हो ना? पण सबूर, ४ जून अजून लांब आहे. ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’च…
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pranjal Bobade
Tue , 14 May 2024
लेख वाचला आणि भावला सुद्धा. लगेच अक्षरणामाचे ॲप डाऊलोड करायला play store वर गेलो तर कळाले की ॲप play store वर उपलब्ध नाही. याबाबतीत काहीतरी करावे ही विनंती. आजच्या काळाची अक्षरणामा ही गरज आहे.