संथपणे वाहणाऱ्या नदीच्या काठी बसून आपल्या जिवलग सख्यासोबत घरगुती भाषेत हितगूज साधावं, तशा पद्धतीनं या पुस्तकातील प्रत्येक लेख आपल्याशी संवाद साधतो
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘भटकंती’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 11 May 2024
  • ग्रंथनामा शिफारस भटकंती Bhatkanti हरमान हेसे Hermann Hesse

माणूस हा मुळात भटक्या प्राणी आहे. तो आदिम काळापासून आजपावेतो निरनिराळ्या उद्देशाने भटकंती करत आलेला आहे. पूर्वी जगणं धकवण्याच्या अपरिहार्यतेतून होणाऱ्या ‘भटकंती’चं भौतिक-आर्थिक प्रगतीच्या ओघात पुढे ‘प्रवासा’त रूपांतर झालं. नवा प्रदेश पाहणं, तिथली ऐतिहासिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं पाहणं, तिथल्या प्रादेशिक खाण्याची लज्जत चाखणं, धावपळीच्या जगण्यापासून सुटका करून घेत निवांतपणा शोधणं, करमणूक करून घेणं, हे हल्लीच्या प्रवासांमागचे हेतू असतात. अशा प्रवासांची आखणी सामान्यतः अगदी आखीवरेखीव असते.

या उलट प्रकार हा एकेकट्याने केलेल्या निरुद्देश भटकंतीत दिसून येतो. एकेकट्याने केलेल्या भटकंतीतही हेतू वेगवेगळे असू शकतात. मराठी साहित्यात या दोन्ही प्रकारच्या फिरस्तीवर आणि त्यांतल्या अनुभवांवर आधारित अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. लेखकांचे त्या प्रदेशांतील अनुभव आणि त्यांची निरीक्षणं, यांमुळे अशा प्रकारच्या प्रत्येक पुस्तकाला एक वेगळा बाज प्राप्त होतो.

याच आधारावर हेरमान हेसे या जर्मन लेखकाने इटलीच्या उत्तर भागात केलेल्या भटकंतीविषयक अनुभवांवर आधारित लिहिलेल्या पुस्तकाचं ‘भटकंती’ हे रेणुप्रसाद पत्की यांनी केलेलं मराठी भाषांतर मराठीतल्या फिरस्तीवरील अनुभवकथन करणाऱ्या पुस्तकांच्या भाऊगर्दीतही वेगळं उठून दिसेल.

निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करणं, यात तसं काही नावीन्य नाही. पण हेसे या भटकंतीचं अशा काही काव्यात्म शब्दांत निरूपण करतो की, आपण चकित होऊन जातो. या पुस्तकात निसर्गविषयक त्याच त्याच प्रतिमा वारंवार समोर येऊनही त्यांत प्रत्येक वेळी ताजेपणा राखला जातो, याचं मुख्य कारण म्हणजे हेसेची चिंतनशीलता. त्या चिंतनशीलतेमागे त्याचं पाहणं, अनुभव घेणं आहे तसंच निसर्ग जसा आहे तसा टिकून राहावा, अशी प्रामाणिक आसही आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हेसेच्या या लेखनात भटकंतीविषयी तीव्र असोशी, नव्या प्रदेशात सामोऱ्या येणाऱ्या विभिन्न संस्कृतीच्या लोकांचं जगणं समजावून घेण्याची ओढ जाणवते. तो काही प्रदेशांत वसणाऱ्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणांचं मोहक दृश्य चितारतो. उदाहरणार्थ, त्याने जेव्हा पहिल्यांदा दक्षिणेकडचा भाग पाहिला, तेव्हा अनुभवास आलेलं चित्र तो असं मांडतो -

“पहिल्याप्रथम दक्षिण पाहिली तेव्हाची धुंदी, अधाशासारखी निळ्या निळ्या तळ्यांकाठच्या बागांतली पिऊन घेतलेली हवा, संध्याकाळच्या वेळी शुभ्र बर्फाच्या डोंगररांगांपलीकडे दूरवर असणाऱ्या मायभूमीचे ऐकलेले पडसाद, रोमन साम्राज्याच्या त्या पवित्र खांबांसमोर केलेली प्रार्थना आणि खडकांपलीकडे फेसाळणाऱ्या समुद्राचं ते स्वप्नातीत दृश्य.” (पृ. १६, ‘डोंगरवाट’).

 तो त्याच्या भटकण्याला प्रेम करण्याच्या स्तरावर नेतो. त्याच्या छोट्याशा अनुभव तुकड्यांतून आणि त्यांवर त्याने केलेल्या भाष्यांतून मनाला टवटवीतपणा लाभतो आणि आपल्या वृत्तीत प्रगल्भतेचा वारा शिरू लागतो. तो ज्या प्रदेशांत जातो तिथल्या रहिवाशांचं - शेतकऱ्यांचं - शांत जगणं त्याला लुभावतं. तो त्या जगण्याचं चित्र सादर करतो आणि अशा जगण्यातील सौंदर्यखुणा उजागर करतो. जगाच्या दृष्टीने सूक्ष्म, बिनकामाच्या, दुर्लक्ष करावं, अशा गोष्टींचं खूप बारकाईने निरीक्षण केलं, तर त्यांतूनही जगणं समजून घेण्याची नवी वाट आपल्यासमोर उलगडत जाते, असा विश्वास तो अनेक लेखांतून व्यक्त करतो.

या लेखांच्या वाचनातून वाचक अधिकाधिक सहृदयी, उदार, ममताळू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे लेखन आपल्याला माणूसपणाच्या निकट घेऊन जाणारं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. भटकंती करायला सुरुवात केल्यानंतर त्याला त्याचं आधीचं ऑफिसचं जग हे कृत्रिम, खोटंनाटं वाटायला लागतं. युद्धाच्या काळात त्याला डोंगरांतून, नद्यांच्या काठांवरून धावावं लागतं, तेव्हाही त्याला आसपासचा निसर्ग खुणावत असतो. पण त्या वेळी त्याला सैन्य प्रमुखाच्या आदेशानुसार धावत राहावं लागतं.

कालांतराने त्याच्या भटकंतीच्या ओघात तो त्याच प्रदेशात भटकंती करत असतो, तेव्हा माथ्यावर युद्धाचे ढग वाहत नसतात. तेव्हा तो अधिक समरसून आसपासच्या वातावरणाचा अनुभव घेतो. या समरसून निसर्गास्वाद घेण्याच्या वृत्तीमुळे आणि बेफिकीरपणे भटकंती करण्यामुळे त्याची कोणत्याही अनुभवाला सामोरं जाण्याची मानसिक तयारी होते आणि अगदी मृत्यूचीही दहशत मनात निर्माण होत नाही, असं तो म्हणतो.

हे का घडतं हे सांगताना तो लिहितो की, ‘भटकंतीत पोचण्याचं ठिकाण महत्त्वाचं मानत नाही तर भटकंतीचा आस्वाद घेणं हे उद्दिष्ट असतं.’ आपण जर पाहण्याची कला शिकून घेतली, तर दूरच्या प्रदेशांची ओढ अस्वस्थ करत नाही, तर जे आसपास दिसतंय त्यातलं सौंदर्य बघण्याची कला अंगी रुजली जाते ती भटकंतीमुळे, असं साधं-सरळ तत्त्वज्ञान तो मांडतो. निसर्गाच्या जितक्या जवळ जाणं शक्य आहे, तितक्या जवळ जाऊन अनुभव घेणं, हे त्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

आपण निसर्गाशी सान्निध्य राखून जगलो, तर किती आणि कोणत्या प्रकारचं सुख मिळेल हे तो सांगतो आणि तसं न जगता आल्यामुळे आपण काय गमावून बसतो, हे त्याने न सांगताही आपल्याला जाणवत राहतं. हे या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. यात कोणताही उपदेश नाही, आविर्भाव नाही आणि आपल्यालाच सुखी जगण्याचा मंत्र गवसला आहे असा अभिनिवेशही नाही.          

तो तरुणपणी धर्मशास्त्राची थट्टा करायचा पण काळाच्या ओघात त्याला धर्मशास्त्राची शिकवण आकर्षक आणि अद्भुत वाटू लागते. तो धर्मशास्त्र म्हणतो, तेव्हा त्यात कर्मकांडांचा समावेश नसतो, तर त्यातली माणुसकीची शिकवण त्याच्यावर गारुड करते. तो जेव्हा आल्प्सच्या दक्षिण पायथ्याशी विसावलेल्या परिसरात जातो, तेव्हा त्याला तिथल्या द्राक्षबागा, पायवाटा, डोंगरउतार यांतील काहीही कृत्रिम किंवा निसर्गाला ओरबाडून घेतल्यासारखं वाटत नाही, तर ते निसर्गाचा एक भाग असल्यासारखं प्रतीत होतं. अशा ठिकाणी ‘जग सुंदर आहे आणि आयुष्य भंगूर आहे’, याची जाणीव माणसाला होते, असं तो लिहितो.

त्याला निसर्गाचा आस्वाद घेताना दोन डोळे अधिक असावेत, एक अधिकचं फुप्फुस असावं असं वाटतं. तो झाडांकडे आपले सांगाती म्हणून पाहतो. झाडाकडून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि जो झाडाचं बोलणं ऐकू शकतो, त्याला स्वत्व गवसू शकतं, असा विश्वास त्याला वाटतो. तो निसर्गाच्या जवळ असण्यातून स्वतःच्या जगण्याकडे पारदर्शीपणे पाहू लागतो. म्हणून तो आत्मटीकाही कठोरपणे करतो. निसर्ग सहवासामुळे आणि भटकंतीमुळे तितका खुलेपणा त्याच्या वृत्तीत आलेला असतो, हे त्याचं त्यालाही जाणवतं. निसर्ग सान्निध्यामुळे आयुष्यातील अनेक गोष्टी जटिल, गुंतागुंतीच्या न करता जगता येऊ शकतं, हे त्याला मनोमन पटत जातं. आणि म्हणून तो श्रद्धाळू असण्याची सोपी व्याख्या करतो.

तो म्हणतो, “स्वतःवरच्या निष्ठेनं खरी सुरुवात होते. हिशोबीपणा, दोष, अपराधीपणा, आत्मक्लेश, त्याग यांतून श्रद्धा साध्य होत नाही. आपल्या आत नसणाऱ्या देवाकडे नेणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. जो आपल्या आत वसतो, त्या देवावर आपली श्रद्धा हवी. जो स्वतःला नाकारतो, तो देवाला कधीच होकार भरू शकणार नाही.” (पृ. ४१, ‘चॅपल’).

भटकंतीत समोर येणाऱ्या ‘लाल घरा’ला उद्देशून त्याचं स्वगतपर भाष्य त्याच्यातल्या समंजस, विचारी व्यक्तीचं दर्शन घडवतं. आपल्या बऱ्याचशा इच्छा-आकांक्षा पूर्ण झाल्या की प्राप्त होणाऱ्या समाधानाचं, शिथिलतेचंही नंतर ओझं वाटू लागतं आणि त्यातून नवी अस्वस्थता, नव्या गोष्टींची ओढ वाटू लागते. आणि सगळ्याच इच्छा, स्वप्नं पूर्ण होतीलच असंही नाही. तेव्हा हे गाठण्यासाठीच्या धडपडीचा अर्थही आपल्याला उमगेल, असं त्याला वाटतं. तो भटकंती करताना निसर्गाच्या सहवासात येऊन आत्मशोधाकडे वळतो आणि त्या प्रवासात त्याच्या बाह्य जगाकडे पाहण्याच्या नजरेतही पालट घडून येतो. काही प्रसंगी त्याला जर्मन कवींच्या काव्यपंक्तीचं स्मरण होतं. त्या काव्यपंक्ती त्याच्या मनाची त्या त्या क्षणांतील तरल अवस्था नेमकेपणाने संप्रेषित करतात.

त्याने भटकंती करताना ती किती मनमुक्तपणे केली गेली पाहिजे आणि नव्या संस्कृतीला किती उदार दृष्टीकोन ठेवून भिडलं पाहिजे, याची चर्चा ‘प्रवासाविषयी’ या लेखात केलेली आहे. त्याच्या मते भटकंती कशासाठी करायची आहे याची नीट जाणीव असायला हवी. ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणच्या लोकांत त्यांच्यासारखं होऊन राहता आलं पाहिजे, परक्या संस्कृतीकडे आपल्या संस्कृतीच्या चष्म्यातून पाहू नये, तुलना करू नये, सामान्य माणसासोबत रहिवास आणि संवाद करण्यावर भर द्यायला हवा, नवीन प्रदेश मनावर कोणताही ताण न ठेवता अनुभवायला हवा, या त्याच्या भटक्यांकडून काही अपेक्षा आहेत. ही पथ्यं पाळली तर त्या त्या प्रदेशातील लोकांचं जगणं अधिक नेमकेपणाने आपल्याला आकळू शकेल, त्यांच्या जगण्याची सच्ची प्रतिमा कायमची आपल्या मनावर ठसू शकेल.

खुद्द हेसेला असा अनुभव फ्लोरेन्स या ठिकाणी आला होता. तो लिहितो, “मी फ्लोरेन्सचा विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर प्रथम डोमचं किंवा सिन्नोरियाच्या (फ्लोरेन्समधील एक ऐतिहासिक चौक) महालाचं चित्र उभं राहत नाही, तर मला जिआर्डिनो बोबोलीच्या (फ्लोरेन्समधील एक ऐतिहासिक इटालियन पद्धतीची बाग) मासे असणाऱ्या छोट्याशा तळ्याची आठवण होते. फ्लोरेन्समधली माझी पहिली दुपार मी त्या ठिकाणी घालवली होती. तिथे बसून मी काही बायकांशी आणि त्यांच्या मुलांशी संवाद साधला, गप्पा मारल्या, फ्लोरेंटाईन भाषा त्यावेळी प्रथमच माझ्या कानावर पडली, आणि खूप साऱ्या पुस्तकांतून परिचित असणारं फ्लोरेन्स शहर त्यावेळी मला पहिल्यांदाच जिवंत झाल्यासारखं, खऱ्या अर्थानं भेटल्यासारखं वाटलं. या शहराशी तेव्हा मी प्रथमच बोललो, शहराला प्रथमच स्पर्श केला असं मला वाटलं.” (पृ. ६७, 'प्रवासाविषयी').

भटकंती करताना ‘व्यापक दृष्टीकोन’ ठेवायला हवा असा सल्ला तो भटक्यांना देतो. आपण जर खऱ्या अर्थाने निसर्गसन्मुख झालो तर सृष्टीतल्या सगळ्या घटकांशी आपलं नातं प्रस्थापित करू शकू असा विश्वास त्याला वाटतो. प्रवासाचं सौंदर्य कशात आहे हे सांगताना तो लिहितो, “प्रवासाचं सौंदर्य हे कुतूहल शमवण्यातदेखील नाही. ते अनुभवण्यात आहे, अनुभवाने संपन्न होण्यात आहे, नव्याने संपादलेल्या अनुभवांच्या आपसूक घडणाऱ्या आंतरिक व्यवस्थेत आहे, वैविध्यामधील समान तत्त्वाला जाणून घेण्याच्या, पृथ्वी आणि संपूर्ण माणुसकीला बांधणाऱ्या समान धाग्याला समजून घेण्याच्या आपल्या वृद्धिंगत झालेल्या क्षमतेत आहे, जुनी पण वैश्विक सत्यं आणि धारणा ह्या संपूर्ण नवीन संदर्भात, नवीन उजेडात पाहण्यात आहे.” (पृ. ६५-६६, ‘प्रवासाविषयी’). त्या प्रदेशातील महत्त्वाच्या स्थळांची उदाहरणं देऊन तो आपलं म्हणणं स्पष्ट करतो. 

निसर्गाला सामोरं जाताना बनावटीपणा, हिशेबीपणा, कृत्रिमता या गोष्टींना पूर्णतः फाटा देऊन मनःपूतपणे त्याचा आस्वाद घेता यायला हवा, असा आग्रह तो ‘निसर्गास्वादाविषयी’ या लेखात मांडतो. तो भटकंती करताना निसर्गाशी तादात्म्य होण्याची आवश्यकता प्रतिपादितो. तो लिहितो, “पर्वत, तळं, आकाश हे कुठल्यातरी उद्देशानं, हेतुपूर्वक निरखायच्या, परीक्षण करायच्या वस्तू नव्हेत, आपण अगदी निर्हेतुकपणे, स्वच्छ मनाने त्यांच्यापाशी वावरायला हवं, जेणेकरून ते आपलं घर होऊन जातील.... आपण फक्त शरीरानेच नाही तर आपल्या पूर्ण असण्यानिशी समष्टीशी जोडले गेल्यानंतरच आणि तिचा भाग झाल्यानंतरच आपल्याला निसर्गाशी खऱ्या अर्थानं नातं जोडता येईल.” (पृ. ८०, 'निसर्गास्वादाविषयी').   

त्याला निसर्ग सहवासामुळे प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने, समंजसपणे पाहण्याची सवय लागल्याचा प्रत्यय ‘निद्राहीन रात्री’ या लेखात होतो. सामान्यतः निद्राहीन रात्री या आरोग्यासाठी अपायकारक ठरवल्या जातात, अशा रात्री कोणाच्या वाट्याला येऊ नयेत असं म्हटलं जातं, पण हेसे निद्राहीन अवस्थेत घालवलेल्या रात्री आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवून जातात, रात्रीच्या नीरव शांततेत कोणत्या गोष्टी चिंतन करायला भाग पाडतात, त्यांत गुंतवून ठेवू पाहतात याची सविस्तर चर्चा करताना दिसतो. त्याच्या मते प्रत्येक स्वस्थचित्त, सुशेगात जगणाऱ्यांच्या वाट्याला एक तरी निद्राहीन रात्र यायला हवी. कारण या निद्राहीन रात्रींतच आत्मशोधाचा प्रवास कदाचित सुरू होऊ शकेल, असा भरवसा त्याला वाटतो.

आपण निसर्ग सान्निध्यात राहतो, भटकंती करतो, म्हणून इतर जगाला तुच्छ लेखणं आणि त्या जगातील लोकांच्या जगण्याकडे तिरस्काराने बघणं, असं काहीही हेसेच्या लेखनात घडत नाही. उलट तो शहरातील धकाधकीच्या, काही प्रसंगी खोट्या वाटणाऱ्या जगण्याला समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा मनाचा मोकळेपणा त्याच्यात निसर्ग वाचनामुळेच निर्माण झालेला आहे, हे आपल्या लक्षात येतं. निसर्गाच्या निकट सहवासामुळे आणि त्याच्याशी संबंधित घटकांच्या जवळून केलेल्या निरीक्षणांमुळे विचारांतदेखील खुलेपणा येत जातो. त्याची वृत्ती ही विश्वबंधुत्वाला साद घालणारी घडत जाते.

माणसाने माणसांत भेद निर्माण करणाऱ्या ज्या सीमा तयार केल्या आहेत, त्याविषयीदेखील त्याला तिटकारा वाटू लागतो. तो लिहितो, “सीमा या एकूण संकल्पनेबाबतच अनास्था असणारे माझ्यासारखे लोक समाजात वाढतील, तेव्हा युद्ध आणि संघर्ष होणार नाहीत असं मला वाटतं. सीमा या संकल्पनेहून कुरुप आणि निर्बुद्ध दुसरी कुठलीच गोष्ट नाही. सीमा या शस्त्रांसारख्या किंवा सैन्यप्रमुखांसारख्या असतात. जोपर्यंत शांतता, माणुसकी, विचारशक्ती नांदताहेत तोपर्यंत आपल्याला त्या जाणवतही नाहीत, पण युद्ध आणि त्याच्यातून क्रौर्य भडकतं, तेव्हा त्याच सीमा अत्यंत महत्त्वाच्या आणि पूजनीय होऊन जातात. जशा आम्हा भटक्यांना त्या यातनादायक झाल्या. नरकात जावोत त्या सीमा.” (पृ. ११-१२, 'शेतातलं घर').

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

हेसेच्या या पुस्तकाचं रेणुप्रसाद पत्की यांनी केलेलं भाषांतर मूळ जर्मन भाषेशी किती प्रामाणिक राहून केलेलं आहे, याबद्दल प्रस्तुत लेखकाला जर्मन भाषा अवगत नसल्यामुळे काही भाष्य करता येणार नाही. पण या संहितेचं मराठीकरण खूपच प्रवाही, वाचनीय झालेलं आहे हे नक्की. हेसेच्या मूळ लेखनातील काव्यात्म लय त्यांनी मराठीकरणात अखेरपर्यंत टिकवून ठेवलेली आहे. संथपणे वाहणाऱ्या नदीच्या काठी बसून आपल्या जिवलग सख्यासोबत घरगुती भाषेत हितगूज साधावं, तशा पद्धतीनं या पुस्तकातील प्रत्येक लेख आपल्याशी संवाद साधतो. यात हेसेच्या लिखाणातील अंगभूत चिंतनाचा, साधेपणाचा जसा वाटा आहे, तसाच तो पत्की यांनी ओघवत्या शैलीत केलेल्या मराठीकरणाचाही आहे.

पत्की यांनी भाषांतर करताना घेतलेले परिश्रम पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी व्यक्ती, स्थळं, संकल्पना आदींची अधिकची माहिती देणाऱ्या ज्या टिपा जोडलेल्या आहेत, त्यातून दिसून येतात. पुस्तकाच्या शेवटी हेरमान हेसे आणि ‘भटकंती’ पुस्तकाविषयी छोटीशी टिपणं जोडलेली आहेत. हेसेविषयी अपरिचित असणाऱ्या वाचकांच्या दृष्टीने ती महत्त्वपूर्ण आहेत.

प्रकाशकांनी पुस्तक अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित केलेलं आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला असलेली आकर्षक, आशयाशी साधर्म्य असलेली रंगीत चित्रं विलोभनीय आहेत. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाचं केलेलं मुखपृष्ठ मनोवेधक आणि पुस्तकाचा स्वर यथोचितपणे साकार करणारं आहे. बाजाराचं (market economy) वर्चस्व असण्याच्या सध्याच्या दिवसांत जगण्यातला सहजपणा नाहीसा होऊन कृत्रिम, खोटं जगणंच खरं समजून उर फुटेस्तोवर धावत असताना थोडी उसंत घेऊन या पुस्तकातील कोणतंही पान उघडून वाचायला घेतलं तरी आपल्याला आत्मशोधाची वाट सापडू शकेल.

आपल्या संग्रही असावं असं कोणत्याही पुस्तक संग्राहकाला पाहताक्षणी वाटावं, असं हे उत्तम निर्मितीमूल्यं असलेलं पुस्तक वाचकांना आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर सतत साथसोबत करत राहील.

‘भटकंती’ - हेरमान हेसे, भाषांतर : रेणुप्रसाद पत्की 
वॉल्डन पब्लिकेशन | मूल्य - ३२५ रुपये. 

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......