बुकर टी. वॉशिंग्टन आणि कर्मवीर भाऊराव पाटील : आत्मभानातून मोठे होत ‘महात्मा’ झालेली व्यक्तिमत्त्वे
पडघम - सांस्कृतिक
दीपक बोरगावे
  • बुकर टी. वॉशिंग्टन आणि कर्मवीर भाऊराव पाटील
  • Thu , 09 May 2024
  • पडघम सांस्कृतिक बुकर टी. वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील

आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रातील क्रांतिकारक महर्षी आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन (९ मे) आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

काही थोर लोकांच्या जीवनात घडणाऱ्या घटना, त्यांनी बजावलेले कर्तृत्व, त्यांच्या मनात चालणाऱ्या तत्कालीन मानसिक व तात्विक प्रक्रिया (त्या काळातल्या सर्व भवतालातील मर्यादा लक्षात घेऊन) यांत बऱ्याचदा साम्य आढळते.

स्वतःच्या स्वार्थापलीकडे असणाऱ्या जगाला यांनी चांगले ओळखलेले असते. त्यांना जे दिसते, ‘ते’, म्हणून वेगळे असते. काय करायचे? आणि काय करायचे नाही? हे त्यांना नेमके कळलेले असते. व्यक्तिगत मोहाच्या जाळ्यात म्हणून ही माणसे सापडत नाहीत. स्वतःशी बोलत, ते समष्टीशी बोलत असतात. त्यातून त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या जीवनप्रवासात आणि एकूणात त्यांच्या हातून पार पडलेले कार्य, समाजात, राजकारणात आणि सांस्कृतिक इतिहासात घडवून आणलेले/घडलेले परिवर्तन या आणि अशा अनेक गोष्टी अपारंपरिक, क्रांतिकारक आणि म्हणून ऐतिहासिक ठरतात.

शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्य बजावणाऱ्या बुकर टी. वॉशिंग्टन (१८५६-१९१५) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७-१९५९) या दोन महान व्यक्तिमत्त्वांमध्ये काही साम्य/काही भेद (भेद... विशेषतः सांस्कृतिक अर्थाने) आढळतात.

बुकर टी. वॉशिंग्टन यांनी काय केले? पंचविसाव्या वर्षी १८८१मध्ये टक्सिगी शिक्षण ट्रेनिंग संस्थेत (teacher's college) महत्प्रयासाने त्यांना प्रवेश मिळाला. नंतर शिक्षक म्हणून खेड्यापाड्यांतून छोट्या-मोठ्या संस्था काढून कृष्णवर्णीय लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून दिले. त्यांनी कृष्णवर्णीय समाजात प्रबोधनाची एक क्रांतिकारी ज्योत पेटवली. शिक्षणाचा संपूर्ण अभाव असल्यामुळे कृष्णवर्णीय लोक भयंकर अशा प्रकारचे पशूतुल्य जीवन जगत होते. जेवण कसे करावे? कसे खावे? काय खावे? काय खाऊ नये? रोज दात घासावे लागतात, हेही या लोकांना जवळपास माहीतच नव्हते. झोपावे कसे? आरोग्याची काळजी, याबाबत हे लोक (संपूर्णतः) अनभिज्ञ होते. स्वतः बुकर टी. वॉशिंग्टन यांनी आपलाच एक किस्सा त्यांच्या आत्मचरित्रात (Up from Slavery, १९०१) सांगितला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सुरुवातीला हॅम्प्टन या संस्थेत त्यांनी तेथील वस्तीगृहात कसाबसा प्रवेश मिळवला. तिथे वस्तीगृहात झोपण्यासाठी त्यांना एक गादी दिली होती. तोपर्यंत बुकर टी. वॉशिंग्टन हे जमिनीवरच झोपत असत. त्यामुळे त्यांना ही गादी कशी वापरावी? गादी हे प्रकरण काय आहे, हे समजत नव्हते. म्हणून ते खूप गोंधळून गेले. त्यांना काही कळेना. शेवटी नेहमीप्रमाणे जमिनीवर झोपून त्यांनी रात्र काढली. पण गादीचे काय करायचे? हे त्यांना न समजल्यामुळे त्यांनी ही गादी अंगावर घेतली. पण असे करणे हे चुकीचे आहे. गादी जमिनीवर अंथरायची असते आणि त्यावर झोपायचे असते, हे त्यांना नंतर समजले.

गुलाम असणे म्हणजे काय? गुलामीचे जीवन काय असते? तुम्हाला कुणीतरी विकलेले असते. तुम्ही गुलाम असता म्हणजे तुमचे कोणीतरी मालक असतात. तुमची आईदेखील विकली गेलेली असते. तिला कुणीतरी विकत घेतलेले असते. ती एक वस्तू असते. तिला अनेकांबरोबर जावे लागते, झोपावे लागते, जनावरांप्रमाणे काम करावे लागते. म्हणजेच तुम्हीही एक वस्तू असता. आपला कोणीतरी मालक असतो. माणूस हा माणूस नसून तो एक विकला गेलेला / किंवा विकत घेतलली क्रयवस्तू असते/बनते.

हे काय सारेच आहे भयंकर? असेच उद्गार कोणाचेही निघावेत, असा हा मानवी इतिहासातील ब्लॅक पॅच कृष्णवर्णीय इतिहासातील आजही फारसा फिका नाही. तो जिवंतच आहे. (अलीकडेच अमेरिकेत २५ मे, २०२० या दिवशी काय घडले? हे आपणाला माहीत आहे. ४६ वर्षाचा जॉर्ज फ्लॉइड  (George Floyd) या कृष्णवर्णीय तरुणाला अमेरिकन श्वेतवर्णीय पोलिसांनी एखाद्या कृमी कीटकाला चिरडावे, तसे दिवसाढवळ्या सर्वांसमोर भररस्त्यावर चिरडले).

नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका टोनी मॉरिसन (१९३१-२०१९) यांनी या भयंकर अशा अत्याचाराचा आणि अन्यायाचा अभ्यास करून एक मोठा ग्रंथ लिहिला आहे. त्यात ह्या सार्‍या यातना आणि भयंकर अशा व्यथांचे चित्रण आहे. त्यांच्या ‘द बिलव्हड’ (१९८७) आणि ‘साँग ऑफ सोलोमॉन’ (१९९३) या कादंबऱ्यांमधूनही हे चित्र उमटलेले आहे.

आपल्याकडे वंशवादाचा संसर्ग नाही (असला तर असावा कदाचित. पण मला माहिती नाही). पण जातवादाचा आहे आणि तो तितकाच भयंकर आणि दाहक आहे. ‘राजकीय अर्थशास्त्रा’च्या अंगाने विचार केल्यास, गरीब, श्रमकरी आणि शोषित समाज आणि प्रस्थापित झालेला समाज यांच्यामध्ये असणारी दरी ही मोठी कशी? व का? याचा अंदाज घेता येतो. कृष्णवर्णीय लोकांची परिस्थिती ही अगदी वेगळी, हे खरे आहे असे आपण मानूया. पण याचे रूप जरी वेगळे असले तरी, आर्थिक आणि सांस्कृतिक शोषणाचा विचार करता, आशय मात्र तोच राहिला आहे.

म्हणून भाऊराव पाटील काम करत होते, तेव्हा इथली परिस्थिती ही भयंकरच होती (आजही ती तशीच आहे. फार काही फरक झालेला नाही. उलट अजून रंग वाढले आहेत). अशाच स्वरूपाच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील गोरगरीब समाज राहत होता. मोलमजुरी करत होता. अल्पभूधारक अपार कष्ट उपसून अर्धपोटी राहत होता. यांना शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हे लक्षात घेऊन भाऊराव पाटील यांनी काम  केले. जर आपण हे काम केले तरच, या लोकांचे कल्याण होईल. समाजामध्ये बदल/परिवर्तन होईल. हा द्रष्टा विचार या दोन्ही महात्म्यांमध्ये आपणांला दिसतो.

बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या योगदानामुळे तत्कालीन (एकोणिसावे शतक संपताना) अमेरिकेतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि वंशवादाने व रंगभेदाने पछाडलेले जग ढवळून निघाले. भाऊराव पाटलांच्या कर्तृत्वामुळे बहुजन आणि गरीब समाजाचा शिक्षणाच्या रूपातून (थोड्याफार फरकाने) महाराष्ट्रात आणि आपल्या देशात हेच घडले. बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या शैक्षणिक कार्यामुळे श्वेतवर्णीयांची शिक्षण क्षेत्रातील मक्तेदारी जरी संपुष्टात आली नाही तरी, या क्षेत्रातील त्यांचा वर्चस्ववाद आकसून गेला, याबद्दल काहीच शंका नाही.

नेमकी हीच गोष्ट महाराष्ट्रात भाऊराव पाटील यांच्यामुळे झाली. महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांना पकडून आणि तो विचार पुढे घेऊन जाण्याचे, या विचारांच्या आधारांवर आपल्या प्रत्यक्ष कार्यातून भाऊराव पाटलांनी फुले यांचे काम महाराष्ट्रात साकार केले. यामुळे शिक्षण क्षेत्रातील ब्राह्मणांच्या मक्तेदारीला तडे गेले. बहुजन समाज, कृषी संस्कृतीत व्यस्त असणारा समाज आणि शहरांमध्ये स्थानांतरीत झालेला कामगार वर्ग... यातून कार्यकर्ते, विचारवंत, नेते, संघटना, चळवळी, नवे लेखक, कवी, कलावंत निर्माण झाले. या पाठीमागे भाऊराव पाटील यांचे फार मोठे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही.

शतकानुशतके निरक्षर असणाऱ्या कष्टकरी, गरीब आणि कृषी क्षेत्रात व्यस्त असणाऱ्या लोकांना अक्षरांची ओळख झाली. जिथे सरकार पोचणार नाही तिथे भाऊराव पाटील पोचले. जवळपास कुठल्याच शाळा नाहीत, काहीच सुविधा नाहीत, मुले राहणार कुठे? शिक्षणासाठी काही स्थिरता आणि मानसिक तयारी असावी लागते. तीच मुळात या समाजात नव्हती. त्यामुळे भाऊरावांनी सुरुवातीला शाळा काढल्या नाहीत, तर बोर्डिंग्स सुरू केले. त्यामुळे मुले या ठिकाणी येऊन राहतील. काही काम करतील. दोन पैसे मिळतील, आणि मग त्यांचे शिक्षण सुरू होईल. हा मूलभूत विचार यामागे होता. लोकमान्य टिळकांनी शिक्षणक्षेत्रात (वास्तविक पाहता टिळकांचे योगदान हे राजकीय क्षेत्रामध्ये अधिक होते) मोठे काम केले आहे, असे म्हटले जाते. पण टिळकांनी बोर्डिंग्स सुरू केली नाहीत. त्यांनी महाविद्यालये सुरू केलीत. कारण 'त्यांच्या' समाजाची ती गरज होती. त्यांच्या समाजातील युवकांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण हे आपसूकच होत होते. त्यांना बोर्डिंग्स आणि शाळा काढाव्यात, हा विचार सुचणे म्हणून कदापीही शक्य नव्हते. त्यामुळे बोर्डिंग, शाळा, कमवा आणि शिका योजना अशा गोष्टी त्यांच्या गावीही नव्हत्या. टिळक आणि भाऊराव पाटील त्यांच्या कामाची सुरुवात, ही अशी झाली होती.

बुकर टी. वॉशिंग्टन यांनीदेखील सुरुवातीला कृष्णवर्णीय समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने (बोर्डिंग आणि शाळा एकत्र... ज्याला आपण ‘रेसिडेन्शिअल स्कूल’ असे म्हणू शकतो) यशस्वी प्रयत्न केले. ही गोष्ट या दोन्ही महात्म्यांमध्ये आपणास पाहायला मिळते.

‘कृष्णवर्णीयांचे हित विविध प्रकारच्या व्यवसायिक कौशल्याचे प्रशिक्षण संपादन करण्यात आहे’, असे बुकर टी. वॉशिंग्टन यांनी म्हटले आहे. गरीब, अर्धशिक्षित, अशिक्षित, निरक्षर, शेतमजूर असलेल्या कृष्णवर्णीय लोकांना औद्योगिक व शेतीविषयक कौशल्याचे प्रशिक्षण द्यायला हवे, हे त्यांनी हेरले होते. यातून आर्थिक स्थैर्य लाभून त्यांना शिक्षण घेणे शक्य होईल, हा त्यांचा प्रकल्प होता. यातूनच ‘कमवा आणि शिका’ ही एक अभूतपूर्व अशी शिक्षणाची पद्धत बुकर टी. वॉशिंग्टन यांनी प्रत्यक्षात राबवली. नेमकी हीच गोष्ट भाऊराव पाटील यांनी केली. कारण शिक्षणासाठी गरीब समाजाला पैसे कोण देणार? त्यांना स्थैर्य कसे लाभणार? आणि स्थैर्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही. शिक्षण प्राप्तीचा हा सिद्धान्त या दोन्ही महात्म्यांना चांगला माहीत होता.

या दोन्हीही युगपुरुषांनी हे काम पुढे सातत्याने लावून धरले. आपल्या कामापासून आयुष्यभर हे दोघे एक क्षणही विचलित झाले नाहीत. हे यांचे महात्म्य. भाऊराव पाटलांच्या सुरुवातीच्या काळात जवळपास सगळ्याच शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या इमारती विद्यार्थानी ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून बांधलेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेचे साताऱ्यातील पहिले महाविद्यालय, शिवाजी कॉलेज हे विद्यार्थ्यांनी श्रम आणि कष्ट करून बांधले. अशाच प्रकारचे काम बुकर टी. वॉशिंग्टन यांनी केले. टक्सिगी संस्थेमार्फत कृष्णवर्णीयांना शिक्षणाची संधी त्यांनी मिळवून दिली. कृष्णवर्णीयांना सरकारी व इतर मार्गातून आर्थिक मदत उभारण्याचे त्यांनी मोठे काम केले.

बुकर टी. वॉशिंग्टन हे उच्चशिक्षित होते, पण भाऊराव पाटील हे सातव्या वर्गापर्यंत कसेतरी पोहोचले होते. इंग्रजी, गणित आणि संस्कृत हे विषय म्हणजे भाऊराव पाटलांचे शत्रू नंबर एक. पण मोठ्या लोकांचे एक विशेष असते. भाऊरावांनी याच विषयाच्या साताऱ्यात ट्युशन्स केल्या. या ट्युशन्स त्या काळात साताऱ्यात खूप लोकप्रिय होत्या. आपल्याला इंग्रजी येत नाही? ओके. मग ते साताऱ्यातील एका ख्रिश्चन धर्मगुरुकडे जाऊन इंग्रजी शिकायचे आणि तेच आपल्या ट्युशनमध्ये येऊन आपल्या पोरांना शिकवायचे. आपणाला संस्कृत येत नाही. ओके. मग त्यांनी साताऱ्यातील एक संस्कृत पंडित पकडला. त्यांनी सांगितलेल्या वेळेला ते जाऊन त्यांच्याकडे संस्कृत शिकायचे. कधी कधी ही वेळ भल्या पहाटे चार वाजतादेखील असायची. मग ते भल्या पहाटे चार वाजता त्या पंडितांच्या घरी जायचे आणि तिथे जे संस्कृत ते शिकायचे आणि तेच मग ट्युशनमध्ये येऊन आपल्या पोरांना शिकवायचे. हीच गोष्ट गणिताची. बहुजन आणि गरीब समाजातील मुलांविषयी असलेल्या ‘अपार प्रेमामुळे’ हे त्यांनी केले.

त्या काळातील पालकांमध्ये त्यांचे नाव ‘पाटील मास्तर’ असे होते. पाटील मास्तरांबद्दल पालकांना अपार आदर होता. याचे प्रमुख कारण काय होते? तर पाटील मास्तर एकच गोष्ट अनेकदा शिकवतात. याबद्दल भाऊराव पाटलांचे म्हणणे वेगळेच होते. ते म्हणायचे की, हे विषय शिकवताना जर मुलगा शिकायला कच्चा असेल, तर मला त्याचा अधिक फायदा व्हायचा. कारण त्याला एकच गोष्ट अनेकदा शिकवून तो विषय माझाही पक्का व्हायचा, असे त्यांनी अनेकदा सांगितले. आपल्या मनामध्ये नकारात्मक गोष्टींना कधीही भाऊराव पाटील यांनी थारा दिला नाही. त्यांच्या कार्यात आणि जगण्यात आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा प्रकारच्या अडचणी आल्या. पण त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली. हीच गोष्ट बुकर टी. वॉशिंग्टन यांच्यामध्येदेखील दिसते.

या दोन महान कार्यकर्त्यांमध्ये अजून एक महत्त्वाचे साम्य आहे. हे दोघेही फर्डे वक्ते होते. त्यांचा समाजशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्या विषयांचा अभ्यास दांडगा होता. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणांमधून उमटायचे. तत्कालीन राजकारणात भाऊराव पाटील हे जाऊ शकले असते. तसा त्यांना मोह व्हावा, अशी परिस्थिती नक्कीच होती. शेतकरी कामगार पक्षाचे ते संस्थापक (फाउंडर) सभासद होते. त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा, अशा प्रकारचा आग्रह अनेकांचा होता. पण नाही. भाऊरावांनी हे केले नाही. कारण त्यांना काय करायचे नाही? हे पक्के ठाऊक होते. गरिबाच्या पोरांना शिकवणे हेच आपले जीवनकार्य आहे, हे त्यांनी ओळखले होते. अशा प्रकारचे मोठेपण आत्मभानातून येत असते.

शिक्षणाच्या माध्यमातूनच अगदी बुकर टी. वॉशिंग्टनसारखेच ते काम करत राहीले. त्यांनी महाराष्ट्राचा संपूर्ण सांस्कृतिक चेहराच बदलून टाकला. अशा प्रकारचे अजून कोणी काम केले आहे का? असा जेव्हा विचार आपण करतो, तेव्हा पंजाबराव देशमुख आणि कर्मवीर हिरे ही नावे यासंदर्भात पटकन डोळ्यासमोर येतात. पण या दोन्हीही व्यक्ती (पंजाबराव देशमुख आणि कर्मवीर हिरे) राजकारणात काहीएक भूमिका बजावत आपले शैक्षणिक क्षेत्रातले काम करत राहिले. भाऊराव पाटील यांनी हे केले नाही, हे त्यांचे विशेष. त्या वेळचे त्यांचे सहकारी गाडगे महाराज आणि स्वतः गांधीजी यांनीदेखील भाऊरावांच्या कामाबद्दल, त्यांच्या प्रचंड अशा या योगदानाबद्दल आणि टोकाच्या बांधीलकीबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

बुकर टी. वॉशिंग्टन यांच्याबद्दलही हीच गोष्ट पाहायला मिळते. भाऊराव पाटील यांच्यासारखेच तेही फर्डे वक्ते होते आणि जाणून-बुजून, ठरवून, सकारण ते राजकारणात कधीच गेले नाहीत. तशा प्रकारची संधी आणि तशा प्रकारचा आग्रह त्यांना कायम होत राहिला. पण ते राजकारणात गेले नाहीत. असे झाले असते, तर शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य झाले नसते. राजकारणात जाणे, ही गोष्ट त्यांना स्वार्थाची वाटली. असा उल्लेख त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे-

“The reputation that I made as a speaker during this campaign induced a number of persons to make an earnest effort to get me to enter political life, but I refused, still believing that I could find other service which would prove of more permanent value to my race. Even then I had a strong feeling that what our people most needed was to get a foundation in education, industry and property and for this I felt that they could better afford to strive than for political parmanent. As for my individual self, it appeared to me to be reasonably certain that I could succeed in political life, but I had a feeling that it would be rather selfish kind of success -- individual success at the cost of failing to do my duty in assisting, in laying a foundation for the masses.” (Booker T. Washington, Up from Slavery First Print 1901, Reprint, 2020, Maple Classics, Noida, India, p. 75).

बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या या कामामुळे कृष्णवर्णीय व श्वेतवर्णीय समाजामध्ये एक संवाद साधला गेला. द्वेष, जळफळाट, हिंसा, बदला अशा या दुष्कृत्यांना कवटाळण्यापेक्षा प्रेम, सहकार्य अशा सम्यक मार्गाने कार्य करता येते, हे त्यांनी दाखवून दिले. हेच तत्त्व त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पाळले. भाऊराव पाटील यांनीही मुस्लीम आणि इतर समाजातील लोकांना जवळ केले. ब्राह्मण लोकांना आपल्या संस्थेत त्यांनी समावून घेतले होते. बुकर टी. वॉशिंग्टन आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यातील हे साम्य  आजच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचे आहे.

‘शिक्षणाच्या माध्यमातून बरेच काही आपण करू शकतो’, ही ऊर्मी आज संपत चाललेली असताना या महान आत्म्यांच्या योगदानामुळे निराशाजनक भावना पुसट होत जातात/जाव्यात जातील, असे राहून राहून वाटते.

.................................................................................................................................................................

लेखक दीपक बोरगावे भाषाशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

deepak.borgave7@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......