अजूनकाही
चंदिगढनंतर लोकशाहीच्या पतनाचा आणखी एक अध्याय गुजरातमधल्या सूरत येथे लिहिला गेला. तिथे भाजपने काँग्रेससह इतर विरोधी उमेदवारांचे आधीच ‘प्लांट’ केलेले सूचक पळवून लावले. या सूचकांनी उमेदवारांच्या नामांकन अर्जावरील सह्या आमच्या नाहीत, असे शहाजोगपणे सांगितले. भाजपचे ‘दैवी’ समर्थन लाभलेले उमेदवार बिनविरोध निवडून आले. हाताला मळ नाही नि पाठीला कळ नाही. म्हणजेच, निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपने खाते उघडले. क्रिकेटचा प्रत्यक्ष सामना सुरू होण्याआधी धावफलकावर पहिली धाव नोंदली गेली.
इकडे, त्याच काळात अमरावती मतदारसंघातल्या खासदार नवनीत राणांचे जात वैधता प्रमाणपत्र आधी सरसकट रद्द झाले होते. त्याचा निकाल ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून लागला. खालच्या न्यायालयाचा निकाल रद्द न होता चक्क जात वैधता बहाल केली जाते. पुढच्या काही तासांत नवनीत राणा वाजतगाजत भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरतात. मात्र त्याच वेळी रामटेकमधील काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांचे जात प्रमाणपत्र वैध असताना, त्याच ठिकाणची समिती तातडीने ते अवैध ठरवते. नवनीत राणा यांचा निकाल तब्बल चार वर्षांनी, पण ऐन निवडणुकीतच लागतो.
या सगळ्या घटना आणि कारनामे एकामागून एक रचणे, हे भाजपचे नित्य कर्म बनले आहे!
आयत्या बिळावर भाजप
भाजप हा असा पक्ष आहे, जो २४ तास निवडणुकांचे गणित करत बसलेला असतो. एक-दोन नव्हे, तर शेकडो प्रकारे उमेदवार शोधणे, उचलणे, यात भाजप सतत व्यग्र असतो. काँग्रेसकडे नवीन नवीन नेते जातात, त्यांना संधी मिळते. कुठून तरी ते निवडून जातात. नगरसेवक, जि.प. अध्यक्ष इत्यादी बनतात. असा आयता\रेडिमेड नेता दिसला की, त्याच्यावर जाळे टाकले जाते. थेट ‘ऑफर’ देण्यात येते - राजकारणात राहून तू काय करणार? त्याचे उत्तर असते, माझा बिझिनेस आहे, किंवा मी गरीब आहे, किंवा मला अमुक एक गोष्ट करायची आहे. मला २०-३० कोटी रुपये कमवायचे आहेत. तर, या सगळ्या गोष्टी आम्ही तुला देतो, तू फक्त आमच्या पक्षातून निवडणूक लढव.
असे करत करत भाजपने गेल्या १० वर्षांत काँग्रेसला गळती लावली आहे. भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांना लहानाचे मोठे करत नाही. ‘गुजरात पॅटर्न’मुळे तो काळ केव्हाच मागे पडला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लोकांना चक्क ‘विकत’च घ्यायचे असते, हेच भाजपने ठरवलेले आहे. चालू लोकसभा निवडणूक हंगामातही हेच सुरू आहे. अनेक उमेदवारांना अगदी फॉर्म काढून घेण्याच्या दिवशी दुपारी दोनपर्यंत ऑफर्स दिल्या जात होत्या की, बघा एकच तास राहिला आहे. आम्ही लगेच एबी फॉर्म देऊन टाकतो. प्रचारसुद्धा करायची गरज भासणार नाही तुम्हाला वगैरे...
भाजपने याचीच पुढची पायरी सूरतमध्ये गाठलीय आणि त्याच्याही पुढची पायरी इंदूरमध्ये ओलांडली गेली आहे. तिथल्या अक्षय कांती बाम या काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही तास आधी २९ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेत्यांसोबतचे त्याचे छायाचित्रही ताबडतोब ‘व्हायरल’ झाले. पुढच्या टप्प्यातील नामांकनाच्या वेळी विरोधी उमेदवाराने गळाला लागावे, यासाठी सूरत आणि इंदूरमध्ये भाजपने उघडउघड राजकीय कांड केले आहे.
केवळ तेथील उमेदवार निवडून आणायचाच, हा तर साधा भाग झाला, पण या पद्धतीने आक्रमण वाढवणे, ही आजच्या भाजपची ‘नीती’ आहे. ही फक्त राजकीय चाल नाही, तर विकृती आहे, राजकीय हिंसासुद्धा आहे. विनाकारण समोरील व्यक्ती, पक्ष, यंत्रणा, नियम, कायदा यांची फरफट करायची आणि उन्माद साजरा करायचा, याला अलीकडे भाजपमध्ये ‘रणनीती’ मानले जात आहे.
जमिनीच्या वरून आणि खालून विरोधी प्रवाह उत्तेजित
या ठिकाणी एका हिंदी चित्रपटाची आठवण येते. त्यात खलनायक असलेला अमरीश पुरी म्हणतो की, ‘मुझसे लडने की ताकद तो तुम जुटा पाओगे, लेकिन मेरे जैसा कमीनापन कहां से लाओगे?’ भाजप हेच तर सांगत आहे की, आमच्या विरुद्ध तुम्ही प्रचार करू शकाल, मुद्दे आणू शकाल, पण आमच्यासारखा बिनदिक्कत नीचपणा कुठून आणणार आहात? सोनिया गांधींना ‘काँग्रेस की विधवा’ म्हणणे, ममता बॅनर्जींना ‘दीदी ओ दीदी’ अशी छपरी हाक देऊन जाहीर नाचक्की करणे, हा भाजपच्या ‘राजकीय संस्कृती’चा भाग बनला आहे.
भाजपच्या आयटी सेलमधले ट्रोल अशी कामे दिवस-रात्र करत असतात. भाजपचे पक्ष कार्यकर्ते राजकीय काम करतच नाहीत. नेमलेल्या एजन्सी ठरवून दिलेले फॉर्म्युले वापरत पक्षाचे काम करतात. यात आधी कुणाचा फॉर्म बाद करायचा, हे ठरवून त्याला त्यात ओढले जाते आणि काम फत्ते होते!
उमेदवार बिनविरोध निवडून आणला, याचा हा आनंद नसतो, तर संबंध निवडणूक यंत्रणा आमच्या कशी ताब्यात आहे देशभर सांगणे, हा हेतू असतो. परंतु अशानेच भाजपची ‘सूरत’ काळवंडत चाललीय. भाजपचा कुटील चेहरा लोकांच्या नजरेस आला आहे. लोकांना आपला खोटारडेपणा स्पष्टपणे समजला असून जमिनीच्या वरून आणि खालून विरोधी प्रवाह उत्तेजित होऊ लागले आहेत, हे भाजपच्या आयटी सेल आणि बाह्य रोबोंनाही कळलेले आहे.
भीती पळालीय
पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचेस्तोवर दुसरा टप्पा संपून तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झालेला असेल. या दरम्यान, सबंध देशात असे चित्र आहे की, भाजपच्या उमेदवारांना निवडणूक जड जात आहे. मागच्या निवडणुकीला लोकांच्या मनात बऱ्याच प्रमाणात भीती, शंका होती, धर्मद्वेष होता. सरकारवरचा विश्वास जरा कमी वाटला, तर मग तुमच्याकडे पर्याय कुठे आहे, असे म्हटले की, अनेक जण गप्प बसत.
२०२४मध्येदेखील याच प्रश्नाला उत्तर देण्यास सामान्य लोक आणि सामाजिक राजकीय कार्यकत्यांना यश आल्याचे दिसत आहे. पण असे दमदार उत्तर बाहेर पडतेय : आम्हाला पर्याय नकोच आहे. रोगाला पर्याय नसतो, चॉईस नसतो. त्यावर उपाय असतो. आम्ही आमचा उपाय शोधला आहे, तो म्हणजे भाजपला पराभूत करणे, हे नागरिक म्हणून आमचे कर्तव्यच आहे, असे जाहीरपणे सांगण्याची शक्ती लोकांमध्ये आलेली आहे. त्यांच्या मनातील भीती पळून गेलीय.
या बदलाचे श्रेय सर्वप्रथम जाते राहुल गांधी यांना. कसलाच अंदाज-अपेक्षा नसताना अत्यंत हुशारीने आणि तन्मयतेने त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा कमालीची यशस्वी करून दाखवली. एरवी घरात दडून बसणारे सर्व स्तरांतले प्रामाणिक लोक रस्त्यावर येऊन धावू लागले आणि एकमेकांना विश्वास देऊ लागले. भीती बाळगू नका, ‘डरो मत’ हा साधाच नारा होता, पण त्याने देशाचा ‘नूर’ पालटून गेला.
संसदेत प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या वाढली आणि बदला घेण्याच्या सूडाच्या भावनेतून १५४ खासदारांचे निलंबन करण्यात आले, पण हे निलंबन तेवढ्यापुरते त्या वर्षासाठी म्हणून झाले नव्हते. तर काही थातूरमातूर कारणे जन्माला घालून ती कायद्याच्या चौकटीत कोंबून संसदेतून खासदार बाहेर काढता येतात, त्यांचा कामकाजातील निर्णयातील सहभाग उडवता येतो, यासंबंधातला तो यशस्वी प्रयोग होता. किंबहुना, कुणीही उठतोय आणि भारतीय राज्यघटना बदलणार असे म्हणतोय, पण त्याला पूरक राजकीय मानसिकता आणि भीती तयार करण्यासाठीच ते निलंबन होते. एखाद्या क्षेपणास्त्राची जशी चाचणी करतात, तशी ती चाचणी होती. अशा कारवाईची जनतेला ओळख व पुढे सवय व्हावी, असाही तो डाव होता.
तो खेळताना भाजपला वाटले की, खासदार थोडे ओरडतील आणि गप्पा बसतील. पण त्या ऐवजी लोकांमध्येच प्रचंड राग तयार होईल, याचा पक्षाला अंदाज आला नाही. मुळात एकाधिकारशहा हा नेहमीच स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत असतो. त्यात त्याचे आयटी सेलमधले सैनिक ऑलरेडी रोबोप्रमाणे काम करत असतील, तर त्यांना माणसांच्या उत्स्फूर्त ऊर्मींचा अंदाज येणे तसेही कठीण असते.
आमचे ठरलेय
आता, राजकीय पक्ष याबाबतीत किती जागरूक, किती सक्षम आहेत, हा भाग संशोधनाचा आहे. पण सामान्य लोकांनी त्याचीही फिकीर सोडून दिली आहे. यासाठी नांदेडचे उदाहरण उदबोधक आहे. नांदेडमध्ये स्थानिक लोकांनी चक्क अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या प्रतिमांची प्रेतयात्रा काढली. त्याला लोकांची जबरदस्त गर्दी.
लोक जाहीरपणे चव्हाणांना उद्देशून म्हणत आहेत, आम्ही काय कमी केलं तुमच्यासाठी की, तुम्ही आम्हाला गद्दार झालात? कोण निवडून येणार याच्याशी आम्हाला देणे-घेणे नाही. कुणाला पाडायचे आहे, हे फक्त आम्ही ठरवलं आहे. स्थानिकांच्या या संतापाला तोंड देताना चव्हाण यांचा चेहरा इतका आक्रसलेला आहे की, त्यांना काही आजार झाला की काय, असे एखाद्यास वाटावे.
इकडे बसवराज पाटील म्हणजे, उगाचच दबदबा असलेला नेता. त्यांचा एक अंडरग्राउंड भक्कम किल्ला. असा रुबाब, अशी अक्कड! कोणत्याही मोठ्या नेत्याला मोजायचे नाही. जे हवे तेच करायचे, हा त्यांचा हेका. आज त्यांची अवस्था शेवटच्या रांगेतील स्थानिक कार्यकर्त्यासारखी झाली आहे. त्या भागातील प्रत्येक जण म्हणतोय की, कोण कुठे गेले आम्ही ओळखत नाही. आम्ही आमचे ईमान सोडणार नाही.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
बार्शी भागात तर राजा राऊत यांची समांतर सत्ता चालते. त्यांच्यासमोर नजर उचलून कुणी बघू शकत नाही. त्यांचा कार्यकर्ता त्यांना म्हणतोय, काय कराल तुम्ही? माराल तर मारा, पण लोकसभेला आम्ही तुमचे ऐकणार नाही. अशोक चव्हाण आणि राऊत आता गयावया करताहेत की, तसे करू नका, माझी लाज राखा. मी देवेंद्रजींना शब्द दिलाय की, आम्ही लीड देऊ. लोक म्हणतायत, कुणाला विचारून शब्द दिला? ते तुमचे तुम्ही बघून घ्या. आमचं ठरलंय.
ही फक्त महाराष्ट्रातील काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. यामधून निकाल काय येतील, याचे अनेक सर्व्हे जाहीर होत आहेत. इतके नवनवे अंदाज, जास्तीचे सर्व्हे मागच्या निवडणुकीला आले नव्हते. या वेळी काळजीने पछाडलेल्यांना माहीत करून घ्यावेसे वाटतेय की, खरेच भाजप विरुद्ध लोकांमध्ये नाराजी आहे की काय!
त्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे. पक्षाच्या बैठकीत एक सामान्य माणूस म्हणतोय, अहो यांनी घर फोडले, पक्ष फोडले आणि यांनी रामालाही वेगळं केलं. आपण लहानपणापासून कसला राम बघितला? राम-सीता-लक्ष्मण आणि समोर हात जोडलेला हनुमान, पण यांनी सगळे बाजूला सारले. बॅनरवर एकटाच बाण मारतानाचा राम दाखवायला लागले. कशापायी चाललंय हे?
प्रचारात असलेल्या लहान-मोठ्या नेत्यांना कामावर जाणारे शेतमजूर म्हणत आहेत, साहेब या टायमाची निवडणूक नेत्यांच्या हातात राहिली नाही. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. कदाचित याचे अहवाल आधीच गृह मंत्रालयाकडे गेले असतील. त्यामुळेच ‘सर्वशक्तिमान महाशय’ ‘ज्यांना जास्त लेकरे होतात, त्यांच्याकडे विरोधक मालमत्ता देतील’ असला भंगार डायलॉग जाहीर सभेत मारताहेत. तर दुसरीकडे चारशे जागांचा गांजा ओढणाऱ्यांची तोंडे पार सुकत चाललेली आहेत.
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या मे २०२४च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment