ताजमहाल : शकिल बदायुनी आणि साहिर लुधियानवी यांचा!
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • ताजमहाल
  • Sat , 15 April 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi ताजमहाल Taj Mahal शकिल बदायुनी Shakeel Badayuni साहिर लुधियानवी Sahir Ludhianvi ग़झल Ghazal लीडर Leader

एकच वर्ष आहे (१९६४). मोहम्मद रफी हा एकच गायक आहे. ताजमहाल हा एकच विषय आहे. पण गाणी दोन टोकाची आहेत. पहिलं गाणं नौशादचं आहे ‘लीडर’ या दिलीपकुमार-वैजयंतीमाला यांच्या गाजलेल्या चित्रपटात शकिलनं लिहिलेलं. चित्रपट रंगीत आहेत. ताजमहालचं त्या काळाच्या मानानं अप्रतिम असं चित्रण केलं आहे. नुसता ताजमहालच नव्हे तर भोवतालची बाग, कारंजं हे सगळंच यात येतं. शकिलचे शब्द तसे पारंपरिक म्हणजे ताज कसं प्रेमाचं प्रतीक आहे, इथं प्रेमाला अप्रतिम रंग कसा चढला आहे, गरीब असो की श्रीमंत सगळ्यांसाठीच ही जागा म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे वगैरे वगैरे. 

लता आणि रफीने आपल्या मधुर आवाजात या गीताचं सोनं केलं आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. ललत रागातील चाल या गाण्याला नौशाद यांनी बांधलेली आहे. त्या काळात ज्या पद्धतीची गाणी असायची त्याच पठडीत हे गाणं आहे. 

इक शहेनशाह ने बनवा के हसी ताजमहल

सारी दुनिया को मुहोब्बत की निशानी दी है

इसके साये मे सदा प्यार के चर्चे होगे

खत्म जो हो न सकेगी वो कहानी दी है

हे शब्दही तसे साधेच पण लक्षात राहणारे आहेत. सोपेपणा हा शकिलच्या शायरीचा एक गुणधर्म राहिला आहे. नौशाद यांच्या चालीतही सोपेपणा आहे. शास्त्रीय संगीतावर आधारित चाली हे तर त्यांचं वैशिष्ट्यच. 

‘देवदास’ (१९५४, संगीत-एस.डी.बर्मन), ‘नया दौर’ (१९५७, सं-ओ.पी.नय्यर), ‘मधुमती’ (१९५८, सं-सलिल चौधरी), ‘पैगाम’ (१९५९, सं-सी.रामचंद्र), ‘गंगा जमुना’ (१९६१, सं-नौशाद), ‘लीडर’ (१९६४, सं-नौशाद) आणि ‘संघर्ष’ (१९६८, सं-नौशाद) असे सात चित्रपट दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांनी दिले. या सगळ्यांतील गाणी गाजली. वेगवेगळे संगीतकार असले तरी दिलीपकुमार यांच्या चित्रपटांतील गाणी नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. देवआनंद-राज कपूर-गुरूदत्त यांच्यासारखाच काहीतरी संगीताचा कान दिलीपकुमार यांना निश्चितच असणार. नसता संगीतकार बदलूनही त्यांच्या चित्रपटात गाणी दर्जेदार राहिली, यामागे दुसरं काय कारण असावं? पण नौशादच्या संगीतातले दिलीपकुमारचे चित्रपट सांगीतिकदृष्ट्या जास्त गाजले हे खरं! 

‘लीडर’मध्येही इतर गाणी सुंदरच आहेत. तीन कडव्याचं ‘इक शहेनशाह ने बनवा के हसी ताजमहल’ हे मोठंच गाणं आहे. या गाण्याची रचना शकिलने सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवूनच केली आहे. फक्त ध्रुवपद म्हणून ‘शहेनशाह ने बनवा के’ असे शब्द वापरले आहेत.

याच वर्षी ‘गझल’ चित्रपटात साहिरची ताजमहालवरची कविता मदनमोहनने गाणं म्हणून घेतली आहे. त्याचाही गायक रफीच आहे. सुनील दत्त व मीनाकुमारी यांचा हा कृष्णधवल चित्रपट. काय योगायोग आहे! साहिरला शकिलच्या कवितेवर टीका करायची होती, किंबहुना त्याच्या विरोधी भावना व्यक्त करायची होती. आणि त्या रंगीत गाण्याला उत्तर म्हणून हे गाणंच कृष्णधवल असावं म्हणजे काय!

मूळ साहिरची ही कविता मोठी आहे. यातील दोनच कडवी मदनमोहनने वापरली आहेत.

अनगिनत लोगों ने दुनिया मे मोहब्बत की है,

कौन कहता है कि सादिक न थे जज्बे उनके?

लेकिन उनके लिए तशहीर का सामान नही,

क्योंकि वे लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे ।

ताजच्या सौंदर्याचं वर्णन करणं शकिलने टाळले होते. खरं तर शकिल पूर्णपणे चित्रपटासाठी एखादं गाणं लिहावं असं लिहून गेला आहे. त्या पातळीवर ते पूर्णत: बरोबरच आहे. त्याला आपल्या पद्धतीनं गायक, कलाकार, संगीतकार सगळ्यांनीच न्याय दिला आहे.

पण साहिरचे तसं नाही. ही कविता म्हणूनच लिहिली गेली आहे. चित्रपटात येताना ते गाणं जबरदस्ती आलं असंच वाटत राहतं. शिवाय ही चालही लक्षात राहत नाही. गाण्यात नसलेली पण कवितेतील एका कडव्यात साहिर लिहितो -

मेरे मेहबूब! उन्हे भी तो मुहोब्बत होगी

जिनकी सन्नाई ने बक्षी है इसे शक्ले-जमीन ।

उनके प्यारों के मकाबिर रहे बे-नामो-नमूद 

आज तक उनपे जलाई न किसीने कंदील ।

ही जी डावी विचारसरणी साहिर कलेच्या प्रांतातही मांडू पाहतो, तिला तेव्हा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एखाद्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी मालकाविरुद्ध लढावं तसा साहिर ताजमहालसाठी काम करणाऱ्या छोट्या छोट्या कारागिरांसाठी लढतो आहे. त्यांची बाजू मांडतो आहे असंच वाटतं. पण प्रत्यक्षात या कामासाठी प्रचंड रक्कम खर्च झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कामगारांना बिनावेतन राबवून घेतलं असं नाही, पण साहिरला कोण सांगणार?

गाण्यात जे कडवं शेवटी आलं आहे त्यात साहिर लिहितो -

ये चमनजार, ये जमना का किनारा ये महल

ये मुनोक्कश दरो-दिवार ये मेहराब ये ताक

इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर,

हम गरिबों की मोहब्बत का उडाया है मजाक।

मेरे मेहबूब ! कही और मिला कर मुझसे!

शोषण करणारा आणि शोषित अशी मांडणी मार्क्सने केली. त्याभोवती जगभरचे विचारवंत फिरत राहिले. पण लिखाणातही आणि विशेषत: प्रेमासारख्या विषयातही मार्क्स आणण्याचं काम हिंदी गाण्यात साहिरनं केलं. 

आज ही दोन्ही गाणी ऐकत असताना ‘लीडर’मधील गाणंच उजवं वाटतं. साहिरची कविता श्रेष्ठच आहे. तुलनाच करायची तर शकिलपेक्षा साहिर जास्तच प्रतिभावंत होता, यात काही वाद नाही. पण गाणं म्हणून मनात रेंगाळतं ते शकिलचंच. कदाचित गाण्यासाठी शब्दांची जी तडजोड करावी लागते, ती साहिरने केली नसावी. साहिरच्या कवितेतील शब्द गाण्यात मावत नाहीत, त्यांचे अर्थ चटकन उलगडत नाहीत. 

किंवा असंही म्हणता येईल की मदनमोहन हा आशय पोचवण्यासाठी असमर्थ ठरला. कारण ‘प्यासा’मध्ये ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’चा साहिरलिखित आशय एस.डी.बर्मनने फार परिणामकारकरीत्या संगीतातून पोचवला होता. इतकंच काय साधना चित्रपटात एन.दत्ताने ‘औरत ने जनम दिया मर्दो को, मर्दो ने उसे बाजार दिया’ ही साहिरची कविताही तिच्या दाहकतेसह पोचवली होती. त्या आशयाला उचित न्याय दिला होता. पण इथं मात्र काहीतरी कमी पडलं आहे. साहिरचा आशय नीट पोचतच नाही.

जिच्यासाठी हा ताजमहाल बांधला, त्या मुमताज महलचा १७ एप्रिल हा जन्मदिवस. म्हणून ही एक आठवण.    

 

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख