अजूनकाही
महाराष्ट्रीय मतदारराजेहो,
सध्या तुम्हाला चांगले दिवस आले आहेत. तसे ते प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस कमी-अधिक फरकाने येतात म्हणा. पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात राजकीय पक्ष, त्यांच्या संस्कृती, निष्ठा, मूल्ये यांचा जो काही खेळखंडोबा ‘सत्तेच्या द्रौपदी’साठी केला गेला, त्याची पहिली ‘लिटमस टेस्ट’ २०२४च्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यानंतर लवकरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. त्यात महाराष्ट्रातल्या राजकारणी कौरव-पांडवांचं कुरुक्षेत्र पाहायला मिळणार आहे.
सध्या देशाचे विद्वान, महान, कर्तुमकर्तुम पंतप्रधान यांना महाराष्ट्राच्या प्रेमाचे भलतेच भरते आलेले आहे. साहजिकच आहे, उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. उत्तर प्रदेशच्या ८० आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांची बेरीज १२८ होते. त्यामुळे या संख्येवर मोदींचा डोळा असणं तसं साहजिकच म्हणायला हवं.
भटकती आत्मा, सत्तेची हाव, कुटुंब न सांभाळता येणं, अशा शेलक्या उपमा वापरून पंतप्रधान शरद पवारांवर तोंडसुख घेत आहेत. बाकी हिंदू-मुस्लीम, ओबीसी-दलित, मराठा-ब्राह्मण अशा जातीपातींत परस्पर द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचे काम हा तर त्यांचा स्वभावधर्मच आहे! निवडणुकीत जातीय, धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची बेगमी करायची. तरीही ती होत नाही, तेव्हा इतर पक्षांतल्या नेत्यांना धमकावून, ईडी-सीबीआय यांच्या जोरावर घाबरवून स्वत:च्या पक्षात घ्यायचं. माणसं आयात करून करून पंतप्रधानांच्या पक्षाची अवस्था ‘पांजरपोळा’सारखी झाली आहे.
महाभारतात पुत्रप्राप्तीसाठी ‘नियोगा’चा वापर करून ती करून घेतली जात असे आणि आपल्या साम्राज्यासाठी वारसांची बेगमी केली जात असे. मोदीकालीन भारतात ‘उलट्या नियोगा’चा वापर करून सत्ता ‘बरकरार’ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गेल्या दहा वर्षांत या ‘उलट्या नियोगा’चा इतक्या प्रचंड प्रमाणात वापर झाला आहे की, आता ही मात्राच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्यामुळे तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत असलेले पंतप्रधान सध्या गेल्या दहा वर्षांत आपण काय विक्रम, पराक्रम, दिग्विजय संपादन केले आहेत, हे सांगण्याऐवजी विरोधी पक्षांची ऐनकेनप्रकारेन बदनामी करून त्यांच्याविषयी समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनकल्याणाचं, जनहिताचं काही करता आलं नाही, तरी इतरांच्या अन्नात माती कालवून आपलं ताट कसं पंचपक्वान्नांनी भरलेलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधान कितीही हिरीरीने करत असले तरी, आता त्यांत पूर्वीसारखा जोम, उत्साह आणि ताकद राहिलेली नाही. तरीही घसा ताणून, हवे ते शब्द ओरबाडून एक बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण गेली दहा वर्षं ही मात्रादेखील इतक्यांदा उगाळून झालेली आहे की, आता तिचा ‘असर’ही अतिवापरामुळे ‘अँटिबायोटिक्स रेझिटन्स’सारखा ‘ना के बराबर’ या वळणावर आलेला आहे.
त्यामुळे विरोधी पक्षांच्या जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला करण्याशिवाय पंतप्रधानांना गत्यंतर राहिलेलं नाही. भाजप सत्तेत आला तरी देशाची राज्यघटना बदलली जाईल किंवा त्यासाठीच भाजपचा ‘चार सौ पार’ हा नारा आहे, या ‘इंडिया आघाडी’च्या गोलंदाजीने पंतप्रधान हैराण झाले आहेत. ते रोज स्पष्टीकरणं देत फिरत आहेत. पण गेल्या दहा वर्षांत किती वेळा त्यांनी राज्यघटनेला धरून कारभार केला, याबद्दल ते अवाक्षर काढत नाहीयेत.
अर्थात त्यांचा शब्द म्हणजे केवळ बापुडवाणा वारा असल्याचे तुम्हीआम्हीआपणसगळ्यांनी गेल्या दहा वर्षांत सातत्याने अनुभवले आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्यासारखी उदाहरणार्थ तिळमात्र शक्यता उरलेली नाही.
आपल्या ताटात विष कालवणारे हात ओळखायला तुम्ही कधी शिकणार?
महाराष्ट्राला एकांड्या शिलेदारीचा फार मोठा शाप आहे. त्याचंच तुम्हाला भूषण वाटतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तुमच्या दैनंदिन समस्यांपेक्षा तुम्हाला इतिहासातली मढी डोक्यावर घ्यायला आवडतात, म्हणून त्याचीच अफू तुम्हाला राजकारणी सतत चाटवतात.
इतिहासाचा समंध डोक्यावर घेतल्याने तुमच्या घरची चूल पेटते, तुमच्या मुला-बाळांच्या शिक्षणाला पैसा मिळतो? राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्याने तुमच्या शेतातली कामं होतात? तुमच्या बैलांना चारा मिळतो? तुमच्या मुलांना रोजगार मिळतो? नोकरी मिळते?
तुम्ही एकजुटीने, एकदिलाने तुमचा कुठलाच प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाही, हीच तुमची शोकांतिका आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला सतत कुठल्या ना कुठल्या जातीचे भय दाखवत राजकारणी आपल्या मतांची बेगमी करत राहतात.
सुट्या काठ्या आणि त्यांची बांधलेली मोळी, याबाबतची शालेय पाठ्यपुस्तकातली गोष्ट तुम्हाला माहीत असेलच की! नसेल तर तुमच्या मुला-बाळांकडून समजावून घ्या. सध्याच्या काळाची गती ‘बुलेट ट्रेन’च्या वेगाची आहे. त्याच्याशी तुम्हाला बैलगाडीने कसा सामना करता येणार?
आपल्या गावात डांबरी सडक आली, शाळा झाली, नाले बांधले म्हणजे ते करणारा राजकारणी चांगला, इतका अल्पसंतुष्ट विचार किती काळ करत राहणार तुम्ही?
ही फार किरकोळ कामं असतात हो आणि त्यात भरपूर पैसा खाता येतो, म्हणूनच ती अनेकदा केली जातात.
खरं तर तुमचे राजकारणी आणि तुम्ही यांच्यात फारसा फरक राहिलेला नाही.
ते आपल्यापुरता आणि आजच्यापुरता विचार करतात आणि तुम्हीही तेच करता. लोकशाही शासन व्यवस्था ही सामूहिक हित, सामूहिक समृद्धीच्या आणि सामूहिक संवेदनशीलतेच्या जोरावर प्रगतिशील होणारी शासनप्रणाली आहे. तुम्ही मात्र तिच्याकडे वैयक्तिक कर्तबगारीचा स्रोत म्हणून पाहता. म्हणून तुम्हाला गंडवणं राजकारण्यांना सोपं जातं.
वैयक्तिक कर्तबगारीला एका मर्यादेनंतर अर्थ नसतो. सामूहिक कर्तबगारी आणि सामूहिक शहाणपण, यांच्यामुळेच आपले हक्क आणि स्वप्न पूर्ण होतात. आपल्या हक्कांबाबत तुम्ही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही बेफिकीर आणि अज्ञानीच राहत असाल, तर राजकारणी तुम्हाला हातोहात गंडवणारच की! आणि मृगजळ म्हणजे प्रत्यक्षातल्या विटा वा दगड नाहीत. त्यामुळे त्याच्या जोरावर कुठलाही चिरेबंदी वाडा बांधता येत नाही. अशी बांधकामं कल्पनेच्या साम्राज्यातच उभी करता येतात, वास्तवात नाही. गेली दहा वर्षं तुम्ही पाहिली-अनुभवली आहेतच की!
राजकारणी मग ते तुमच्या जातीचे असोत वा इतर - त्या सगळ्यांचीच राजकारण ही करिअर झाली आहे. तुमच्या गावातले, तालुक्यातले, जिल्यातले राजकारणी, त्यांचे कुटुंबीय आणि नातलग यांच्याकडे यांचा जरा तपास करून पहा, तुम्हाला दिसेल की, राजकारणात आल्यानंतर वर्षा-दोन वर्षांत त्यांची संपत्ती किती टक्क्यांनी वाढते! हे राजकारणी उमेदवारी अर्ज भरतात, तेव्हा त्यांच्या संपत्तीचे दरवर्षी वाढणारे आकडे पाहिले की, तुमच्या लक्षात येईल की, तुमच्यासाठीच्या सगळ्या विकास योजनांचा पैसा लाटून आणि सरकारी वरदहस्ताच्या जोरावर हव्या त्या सवलती पदरात पाडून घेऊन त्यांनी स्वतःची, स्वतःच्या नातेवाईकांची आणि चेल्या-चमच्यांचीच घरं भरली आहेत.
निवडणुकीआधी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांचा सगळा पैसा त्यांनी लाटलेला आहे. तोही संगनमताने. बहुतेक आमदार-खासदार यांचे साखर कारखाने, सूत गिरण्या, शिक्षण संस्था, पतपेढ्या, बँका, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पिढीजात उद्योजक असतील ते वगळून केवळ राजकारणात आल्यावर पुढच्या पाच-दहा वर्षांत एवढे साम्राज्य कसे उभे राहते, हे प्रश्न तुम्हाला पडायला हवेत.
तुम्ही शेतीत राब राब राबून वर्षभरात जे पिकवता, त्याची आवक थोडी जरी वाढली तरी, त्यांचे भाव पडतात, पण तुम्हीच निवडून दिलेल्या राजकारण्यांच्या शिक्षण संस्थेत मात्र तुमच्या मुलाच्या प्रवेशासाठी तुम्हाला दामदुप्पट पैसे भरावे लागतात. का? तुम्ही मतं दिलं तरी केवळ कुणीतरी कान भरल्यामुळे किंवा तुमच्याबद्दल संशय निर्माण करून दिल्यामुळे तुम्ही रक्ताचं पाणी करून पिकवलेला ऊस उभ्या शेतात वाळवला जातो, पण त्याच राजकारण्याची हांजी हांजी करणाऱ्या तुमच्याच शेजारच्याचा मात्र तुमच्या डोळ्यांदेखत वेळेत कारखान्यावर पोहचतो, त्याला वेळेवर पैसे मिळतात. त्याला पेरणीसाठी वेळेत बियाणं मिळतं, खत मिळतं. ते खरं तर तुमच्या नावानेच लाटलेलं असतं. हे काय तुम्हाला माहीत नसतं? तरी तुम्ही डोळ्यांवर कातडं ओढून मुकाटपणे ते पाहता आणि तरीही निवडणुकीच्या काळात आपल्या जात बांधवांचाच विचार करता? याला ‘गिनान्यात माती पडणं’ म्हणतात.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.............................................................................................................................................................
‘जातीसाठी माती खावी’ ही म्हण तुम्ही जगता आणि तुमचे राजकारणी मात्र बंगले बांधतात, शिक्षण संस्था, कारखाने, बँका, कंपन्या उभ्या करतात. आणि तिथं तुमच्या मुलाला साधी प्राध्यापकाची किंवा चपराश्याची नोकरी मिळण्यासाठी २०-२५ लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
तुमच्यात विष्णूशास्त्री चिपळुणकरांचा आदर्श जपणारे फारच निपजू लागले आहेत आणि तुम्हीही त्यांच्या आहारी गेला आहात. पण ही जमात तुम्हाला केवळ इतरांचा द्वेष, तिरस्कार करायलाच शिकवत आहे. मग कधी तो ब्राह्मणांचा असेल, मुसलमानांचा असेल, दलितांचा असेल, महिलांचा असेल, विरोधकांचा असेल, सत्याचा असेल, स्वातंत्र्य-न्याय-समतेचा असेल…
कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्या की, पाहणाऱ्या मजा येते, पण त्यात भाग घेणाऱ्यांचं मात्र हसंच होतं. तुमचंही तेच होतंय. त्यामुळे तुम्हाला द्वेष, तिरस्काराचा वारसा देणाऱ्यांना ‘टाटा, बाय बाय’ करून एका खुऱ्याखुऱ्या ‘लोकहितवादी’ची नितांत निकडीची गरज आहे. शिवरायांसारखी उदारता, परधर्म सहिष्णुता, विशाल अंत:करण आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्यासारखा विचारीपणा, यांचा केवळ उदो उदो करू नका, त्यांना तुमचा ‘स्वभावधर्म’ बनवा.
इतिहासातली भुतं इतिहासातच गाडलेली राहू द्या, भविष्याच्या शिखरांकडे पाहायला शिका. शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याचा आदर्श घ्या. चहूबाजूंनी मुसलमान राज्यकर्त्यांची सत्ता असतानाही त्यांनी जनतेचं स्वराज्य उभं केलं ते कशाच्या जोरावर? तर सर्व जातीधर्माच्या मावळ्यांच्या. जीवाला जीव दिला आणि खांद्याला खांदा लावून काम केलं, म्हणूनच औरंगजेबाच्या जबड्यातून दोन मुसलमानांनी त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्राण पणाला लावून मदत केली.
तुमच्या आवाजाची ‘डेसिबल’ पातळी ‘डॉल्बी साउंड सिस्टीम’ जोडून वाढवा, आणि राजकारण्यांना तुमच्या ‘डीजे’च्या तालावर नाचवा… त्यांच्या वरातीत नाचायला तुम्ही काय भाडोत्री मजूर आहात? सआदत हसन मंटो म्हणतो - “कीमत कोई भी हो‚ आदमी अगर बिक जाए तो कौड़ी का नहीं रहता हैं।”
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment