आंबेडकरी समाजाच्या ज्या नेत्याकडे बोट दाखवा, तो भाजपच्या कळपात दिसतोय
पडघम - देशकारण
बंधुराज लोणे
  • जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले
  • Tue , 07 May 2024
  • पडघम देशकारण आंबेडकरी समाज Ambedkari Samaj रामदास आठवले Athawale Ramdas जोगेंद्र कवाडे Jogendra Kawade प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar

समवयस्क रिपब्लिकन कार्यकर्त्यांसोबत माझ्या नेहमी चर्चा होतात, वादही होतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं या कार्यकर्त्यांची अस्वस्थता आणि त्यांच्या मनातील चलबिचल दिसत आहे. खरं तर एकंदर आंबेडकरी समाजातच मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. राजकीय निर्णय प्रक्रियेत या समाजाचं स्थान जवळपास शून्यावर आलंय. एकेकाळी या समाजानं महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक अवकाश ढवळून काढला, अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राला पुरोगामित्वाची ओळख मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला, आज मात्र तो समाज दिशाहीन झाला असल्याचं दिसत आहे.

धार्मिक बाबतीत आम्ही शून्याकडून शिखरावर पोहोचलो, पण राजकीय पातळीवर शिखराकडून शून्याकडे आमचा प्रवास होतोय. याला अर्थातच ‘रिपब्लिकन’ नेतृत्व जबाबदार आहे. ज्या कोणाला आम्ही इतकी वर्षं नेता मानलं, त्याच्या पालणपोषणासाठी आपल्या मुलाबाळांच्या वाट्याचा घास काढून दिला, आज ते सारे नेते फॅसिस्टांच्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कळपात सामील झाले आहेत. त्याचबरोबर पॅंथर असल्याचा अभिमान बाळगणारे आणि आंबेडकरी चळवळीतल्या वेगवेगळ्या गटांतले बहुसंख्य नेते भाजपच्या वळचणीला गेले आहेत. 

सुरुवात करूया प्रा. जोगेंद्र कवाडेंपासून. ते स्वतःला ‘लाँग मार्च’चे प्रणेते समजतात. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याच्या मागणीसाठी त्यांनी नागपूर ते औरंगाबाद असा मार्च काढण्याची घोषणा केली होती! तो नागपुरातच दीड किलोमीटरवर संपला.) या कवाडेंना नितीन गडकरींच्या विजयाची चिंता लागली आहे. या कट्टर संघस्वयंसेवकाला निवडून आणण्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीत कवाडे नागपूरच्या गल्लीबोळांत फिरत आहेत. त्यांचा मुलगा, जयदिप कवाडे झेलकरी बनून त्यांच्यासोबत फिरतोय.  

रा. सू. गवई आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले. विधानपरिषदेचे तीन दशकं आमदार, सभापती, विरोधी पक्षनेते, खासदार, राज्यपाल अशी सत्ता त्यांना मिळाली. त्यांचे वारसदार डॉ. राजेंद्र गवई सुरुवातीला काँग्रेससोबत होते. या वेळी अमरावती लोकसभा मतदारसंघात डॉ. राजेंद्र गवई यांनी आपला उमेदवार उभा केला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इकडे मुंबईत स्वतःला पॅंथर समजणारे अनेक जण भाजपच्या कळपात आहेत. पॅंथर संस्थापकांपैकी राजा ढाले, नामदेव ढसाळ आणि भाई संगारे आज हयात नाहीत. ज. वि. पवार गेले काही वर्षं प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचं ओझं वाहत आहेत. खरं तर वंचितमध्ये पवारांना ‘वंचित’ केलेलं आहे. अविनाश महातेकर रामदास आठवलेंच्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेला तात्त्विक मुलामा देऊन ती जोरदारपणे मांडण्याचं काम इमानेइतबारे महातेकर करत आहेत. बाकी अनेक पॅंथर सैरभैर झालेले आहेत.

शिर्डीत पराभव झाल्यानंतर आठवलेंचा जीव कासावीस झाला. तीन दशकांहून अधिक काळ सत्तेत राहिल्यानंतर ते तरी काय करतील, गेले भाजपच्या कळपात. त्या आधी शिवसेनेसोबत त्यांनी मुंबई महापालिकेची एक निवडणूक लढवली होती. टी. एम. कांबळेंचे एकेकाळचे सहकारी दिलीप जगताप आणि ढसाळांचे एक सहकारी सुखदेव सोनावणे यांनी पत्रक काढून भाजपला पाठिंबा दिला आहे. तानसेन ननावरेही भेटून फडणवीसांना आलेत.

सर्व रिपब्लिकन गटांना एकत्र आणण्यासाठी चळवळ करणारे काकासाहेब खांबाळकर सर्व पक्ष फिरून आता रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्षपद घेऊन आनंदराज आंबेडकरांसोबत फिरत आहेत. छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेही भाजपच्याच कळपात. अर्जुन डांगळे सध्या उद्धव ठाकरेंसोबत, चंद्रकांत हंडोरे काँग्रेसमध्ये आणि जयदेव गायकवाड शरद पवारांसोबत आहेत. बाकी ज्याच्याकडे बोट दाखवा, तो भाजपच्या कळपात दिसतोय.

रिपब्लिकन गटांच्या सर्वच कार्यकर्त्यांसमोर प्रश्न आहे, मात्र रामदास आठवलेंच्या कार्यकर्त्यांची जरा जास्तच कोंडी झाली आहे. आता आठवलेंच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी काय करावं? गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आठवलेंच्या गटाला पाच जागा दिल्या होत्या, त्या जागांवर उमेदवारही भाजपनेच दिले आणि विशेष म्हणजे हे उमेदवार भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढले. त्यातले दोन जिंकले. या जिंकलेल्या आमदारांनी नंतर आठवलेच्या कार्यकर्त्यांना आपल्या पायरीवरच ठेवलं.

कार्यकर्ते, पदाधिकारी जाऊन जाऊन जातील कुठे? नेते करताहेत मजा, जमवताहेत संपत्ती आणि कार्यकर्ते मात्र आज-उद्या पालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत येईल आपली सत्ता, होईल काही तरी सकारात्मक या आशेवर दिवस ढकलाताहेत. 

गेली विधानसभा, लोकसभा आणि आता ही लोकसभा निवडणूक आठवलेंच्या गटानं लढवली नाही. निवडणूकच न लढणाऱ्या पक्षाचं, नेत्याचं काय करायचं? बी. सी. कांबळे प्रत्येक निवडणूक लढायचे. एकदा त्यांना मी विचारलं होतं की, ‘पराभव होणार हे माहीत असताना आपण निवडणूक का लढता?’ त्यावर ते म्हणाले होते की, ‘लोकशाही व्यवस्थेत पक्षानं निवडणूक लढलीच पाहिजे. त्यानिमित्तानं आपली भूमिका जनतेपुढं मांडला येते. निवडणुका जनतेला प्रशिक्षित करण्यासाठीही असतात.’

हे आठवले, कवाडे आणि इतर नेत्यांना कोण सांगणार? केवळ ‘विकसित भारता’चं तुणतुणं वाजवायचं आणि ‘मोदी मोदी’च करायचं असेल, तर मग कशाला हवाय कार्यक्रम आणि जाहीरनामा? या निवडणुकीत ‘रिपब्लिकन’ हे नावच निवडणूक प्रक्रियेत नाही, याची कोणाला खंत, लाजही वाटत नाही!

बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आशेनं पाहावं, तर त्यांची तिरकी चाल कोणालाच कळत नाही.

राज्यघटना तयार होत असताना भाजपच्या मातृसंघटनेनं म्हणजे संघ आणि जनसंघानं  बाबासाहेबांना त्रास दिला, त्यांचे पुतळे जाळले. राज्यघटनेला संघाने कधीच मान्यता दिली नाही. संघाचे दुसरे सरसंघचालक गोवळकरांनी राज्यघटनेला ‘ठिगळं लावलेली गोधडी’ संबोधून बाबासाहेबांचा अपमान केला. आज मात्र त्यांनाच स्वतःला ‘आंबेडकरवादी’ समजणारे नेते साथ देत आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

एक गरज म्हणून किंवा राजकीय डावपेच म्हणून हे नेते भाजपच्या कळपात गेले, असं गृहित धरलं किंवा भाजपसोबत गेल्यानं समाजाचे काही प्रश्न सुटत असतील, काही प्रगती होत असेल तरी ठीक होतं, पण वस्तुस्थिती तशी नाही. मोदींच्या प्रत्येक अर्थसंकल्पात मागासवर्गीयांसाठीचा विकास निधी कमी होत गेलाय. सर्व स्तरांवरील आरक्षण बंद करण्यात येत आहे. केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी कोणतेही नियम न पाळता भरती करण्यात आली. (मागासवर्गीयांनी या भरतीसाठी अर्ज करू नये, अशी अट यासाठी होती.)

विकास निधी असो वा इतर योजना, राज्यघटनेचं संरक्षण असो वा राज्यघटनेनुसार कारभार करणं, मोदी सरकार पातळ्यांवर नापास आहे. मग भाजपसोबत युतीचा काय फायदा? रामदास आठवलेंना फक्त तीन टक्क्यांचं मंत्रीपद!! (समाजकल्याण खात्याला फक्त तीन टक्के निधी आहे.)

हे सर्व नेते शिकलेले आहेत. ‘हिंदू अर्थात ब्राह्मणी राष्ट्र ही या देशावरील मोठी आपत्ती असेल’, हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा या नेत्यांना माहीत नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर हिंदुत्ववादी शक्तींच्या विरोधात लढले, ‘हिंदू कोड बिला’सारख्या कायद्यासाठी त्यांनी सत्ता सोडली. या संघर्षाचं काय? जातीअंताच्या लढाईचं काय? ‘राज्यकर्ती जमात बना’, या बाबासाहेबांच्या घोषणेचं काय?

‘अक्षर’च्या दिवाळी अंकात मी नामदेव ढसाळांवर एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं, ‘नामदेवचा प्रवास : गुलामांच्या यादीतून दलालांच्या यादीत’. आज हे सर्वच नेत्यांना लागू आहे. ब्राह्मणी व्यवस्थेनं आम्हाला गुलाम केलं होतं, आज या व्यवस्थेच्या रक्षणकर्त्यांनी आम्हाला दलालांच्या यादीत टाकलं आहे.

आता काय करायचं? कसा मार्ग काढायचा? आपण लढाईच सोडून दिलीय?

..................................................................................................................................................................

लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत.

bandhulone@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......