अजूनकाही
एक मेच्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचा गुजरात महाराष्ट्रापासून आणि महाराष्ट्रापेक्षा कसा वेगळा आहे, याचा प्रत्यय यावा, ही एक चांगली घटना पुण्यात घडली. कारण असे की, एक मे रोजी महाराष्ट्र राज्याचा ‘स्थापना दिन’ आहे, तसा तो गुजरात राज्याचाही असतो. का कोण जाणे, पण या विभाजनाला ‘दुसरी फाळणी’ अथवा मुंबई राज्याचा ‘तुकडा दिन’ असे म्हणताना आजवर ऐकू आलेले नाही. पुण्यासारख्या एकेकाळच्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या शहरात यावे, शहराची जमेल तशी नाटकी, खोटी स्तुती करावी अन् हळूचकन एका मराठी नेत्याची तुलना अत्यंत सुमार, नादान व बेमूर्तखोर उपमा देत ‘भटकत्या आत्म्या’शी करावी, याला धाडस म्हणावे की मूर्खपणा?
भाजपवाल्यांनाही मोदी हे काय बोलून गेले, असे झाले असणार, पण काय करता? अवघा पक्ष या एका माणसाच्या चरणी सुपूर्द केल्यावर अशी मुस्कटदाबी सहन करावीच लागणार ना! अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही गुजराती नेते शरद पवारांची यथेच्छ टिंगलटवाळी करत सुटले आहेत. पवारांनी काय कार्य केले, या प्रश्नापासून ते त्यांना ‘अतृप्त आत्मा’ संबोधून त्यांची जिवंतपणीच कुचेष्टा करणे शहा-मोदींना फार रुचते आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अंतुले, भोसले, निलंगेकर, नाईक यांची सरकारे पाडली, असा पवारांवर आरोप होत राहिला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारचीही भर पडली आहे. मोदींनी पवारांच्या निमित्ताने आणखी एक आरोप केला की, फडणवीस यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांना पवारांनी पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू दिला नाही. विलासराव देशमुख वगळता स्वत: पवारांचंही मुख्यमंत्रीपद चारही वेळा संपूर्ण कालावधीसाठी टिकू शकलं नाही.
तसं पाहिल्यास गुजरातनेही असंख्य मुख्यमंत्री पाहिले आहेत. २००१ साली मोदी मुख्यमंत्री होण्याआधी भाजपचेच केशूभाई पटेल (दोनदा), सुरेश मेहता, शंकर सिंग वाघेला, दिलीप पारीख असे सहा वर्षांत सहा मुख्यमंत्री त्या राज्याने पाहिले!
मोदी यांची उपद्रवक्षमता पाहून तेव्हाच्या नेतृत्वाने त्यांची रवानगी राज्याबाहेर केली होती. केशूभाई पटेल यांचे मुख्यमंत्रीपद बळकावून त्यांनादेखील मोदींनी कार्यकाल पूर्ण करू दिलेला नव्हता. तेव्हा त्यांना कोणी ‘अतृप्त आत्मा’ असे म्हटले होते की, नाही ठाऊक नाही!
राजकारणात आपली उपयुक्तता जशी दाखवून द्यायची असते, तशी ‘उपद्रवक्षमता’देखील दाखवली जाते. अतिआत्मविश्वास असणारे नेते कायम या दोन्ही गोष्टी पक्षनेतृत्वाला दाखवून देत असतात. जोवर आपली ताकद दाखवली जात नाही, तोवर आपल्याला कोणी ‘नेता’ म्हणत नाही, हे भारतीय राजकारणाचे वास्तव आहे. स्वत: मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत भाजपच्या भल्याभल्या नेत्यांना खुजे अन् खुरटे करून टाकले आहे!
राजकीय प्रचारात स्वत:ची टिमकी वाजवणे, फुशारक्या मारणे आणि अवास्तव आव्हाने स्वीकारणे चालते. लोकांनाही त्यात मजा वाटत असते. पण प्रतिस्पर्ध्यांचे वाईट अपेक्षिणे आणि त्यांची अतर्क्य व काल्पनिक उदाहरणांसह कुचेष्टा करणे, हे केवळ धक्कादायक नव्हे, तर ‘अमानवी’च असते. जारणमारण, चेटूक, जादू, अपशकून, पाप-पुण्य अशा शब्दांनी राजकीय वातावरण ‘अंधश्रद्ध’ करणे, हेही निषेधार्हच.
राजकीय कुरघोडीसाठी लोकांना हसवताना वा पटवताना, अशास्त्रीय व निव्वळ अफवा असणाऱ्या विषयांची उपमा वापरली जाणे केव्हाही चूकच. कार्यकर्त्यांना ‘भुतावळ’ म्हणणे आणि मतदारांच्या ‘वशीकरणा’ची गोष्ट करणे, हे तर आणखीच अपमानास्पद. भाषणांत असे असिद्ध, अवास्तव आणि अशक्य विषय आणणारा लबाडीनेच तसे करत असतो.
मोदी तारुण्यापासून संघाचे प्रचारक राहिले आहेत. गोळवलकर आणि हेडगेवार यांच्याकडे विज्ञानाच्या पदव्या होत्या. तरीही पुरावे, दाखले, इतिहास, वारंवारिता, संख्या, तर्क, प्रयोग आदी काहीही त्यांच्या लेखनात व मांडणीत सापडत नाही. निव्वळ कल्पनाविलास आणि अप्रमाण गोष्टींचा कचरा, हे दोघे उपसत राहतात. मोदी त्यांचेच स्वयंसेवक आहेत. आणि त्यांचीच स्वप्ने प्रत्यक्षात उतरवत असल्याचा कांगावा करत आहेत.
मोदींना याचेही भान राहिले नाही की, भाषणाच्या आरंभी पुणे शहराचे कौतुक त्यांनी विज्ञान, संशोधन, संरक्षण या निमित्ताने केले होते. कोविड पळवून लावण्यासाठी थाळ्या वाजवायला सांगणारा हाच स्वयंसेवक आहे. समजा ४ जूनला भाजपचा पराभव झाला, तर तो कोविडच्या काळात हकनाक मरण पावलेल्यांच्या भूतांनी केला, असे म्हटले, तर त्यावर संघवाले विश्वास ठेवतील?
मोदी मत्सरी अन् स्पर्धेला घाबरणारे आहेत. त्यांच्या तोंडून एकाही शास्त्रज्ञाचे, विद्वानाचे, लेखकाचे, कवीचे, तत्त्वज्ञाचे वा अर्थशास्त्रज्ञाचे नाव कधीही येत नाही. ना ते कधी आपल्या सरकारपेक्षा अन्य कोण्या संस्थेचा हवाला देतात, ना पक्षाचा. काही देशांची नावे घेऊन ते आपल्या काळात भारत कसा पुढे चालला आहे, एवढे मात्र सांगतात. पण ते असत्य असल्याचेच सिद्ध होत आलेले आहे.
मोदींच्या बोलण्यात सतत अत्यंत विखार येत असतो. त्यांच्या अंगात संघाचा प्रचारक पुरता मुरला असल्याचीच ही पावती आहे. ‘घुसपैठिये’, ‘ज्यादा बच्चेवाले लोग’, ‘भटकती आत्मा’ अशी निंदा त्यांना करायला फार आवडते. ‘काँग्रेसचा जाहीरनामा ‘मुस्लीम लीग’चा असावा, असाही त्यांचा वाह्यात आरोप आहे. थोडक्यात, सारे काही वाईट अपायकारक मुसलमानांत शोधायची मोदींना फार आवड आहे. ‘भटकती आत्मा’ असे अभद्र विशेषण वापरताना मोदी उजव्या मनगटावरचा काळा गंडा लोकांना दिसेल, अशा बेताने हात फिरवत होते.
मोदी कधीही आपल्या श्रद्धा लपवत नाहीत. किंबहुना संघाची ती युक्तीच असते. आपण किती धर्मनिष्ठ अन् सश्रद्ध आहोत, हे दाखवायची त्यांची फार धडपड असते. पण श्रद्धेला लगडून अंधश्रद्धाही येतात. मोदींच्या भाषणांत त्यांचा ‘भुताटकी’वरचा विश्वास ‘भटकती आत्मा’ या उपमेमधून प्रकटला. त्यांचा हा शब्दप्रयोग ‘हॉरर’ चित्रपट तयार करणाऱ्या रामसे बंधूंच्या ‘बी ग्रेड’ चित्रपटांच्या जातकुळीतला आहे!
हे ‘हॉरर’ चित्रपट पाहताना भय कमी, हसू जास्त येई. कारण त्यात काही चुका, गडबडी व फजित्या जशाच्या तशा पाहायला मिळत. ओढूनताणून भीती तयार करण्याचा त्या चित्रपटांचा प्रयत्न स्पष्ट दिसे. बजेट कमी, कच्चे कलाकार आणि लवकर चित्रपट पूर्ण करायची घाई, यामुळे स्वस्तातले भयपट म्हणून त्यांची काही काळ चलती होती. मोदींचेही तसेच दिसते आहे. नेहरूंना मागे टाकायची घाई त्यांना आणखी खाली खेचत राहते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पण असा भंपकपणा भारतीय माणसं किती काळ चालवून घेणार? माणूस वयाने वाढतो, शहाणा होतो, अनुभव व तर्क यांनी समृद्ध होतो; विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या प्रगतीत सामील होतो. मोदीच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यासारख्या विज्ञान-तंत्रज्ञान यांत प्रचंड झेप घेणाऱ्या शहरात ‘भटकती आत्मा’, ‘भुते’, ‘हडळी’ यांचा उल्लेख २०२४ सालात करणे, म्हणजे आपला मूर्खपणा जाहीर करणे!
अशा प्रकारे अतिशय स्वैरपणे उधळणाऱ्या मोदींच्या आवाहनाला मतदार ‘वैज्ञानिक’ प्रतिसाद देतात की, नाही ते ४ जूनला कळेलच. परंतु अशी भाषा करणारा नेता, त्याचा पक्ष, त्याचा विचार आणि त्याच्या अंधश्रद्धा देशाला फार त्रास देत राहणार...
नाही तरी सर्व बाबतीत संघ-भाजप देशाला ‘भूतकाळा’तच लोटत आहेत. इतिहासातली मढी उकरण्याच्या अतिरेकी अट्टाहासापायी मोदींनाच कशाने तरी झपाटले आहे, असे म्हटले तर...?
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
Pay Now
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment