१६१)
‘इंद्रिये वाहुनि गेली ठेवुनि दंश
कोरड्या शुष्क देहाचे झाले कंस
खिडकीतून दिसले आकाशाचे धरटे
रुतलेले मोजिन जाऊनि तेथे काटे।।’
म्हातारपण आले. ऐकू कमी येऊ लागले, कमी दिसू लागले. एखादी मुंगी अंगावर चढली, तर उशीरा कळू लागले. तरुणपणी एखाद्या पदार्थाची जशी चव लागायची, तशी लागेनाशी झाली. एकंदरीत इंद्रियांकडून मिळणारी सुखे कमी झाली, किंवा ती सुखे सपक होऊन मिळू लागली. तरीपण इंद्रियांतून मिळणाऱ्या सुखाच्या इच्छा तशाच उरल्या. हा दंश ठेवून इंद्रिये पुढे निघून गेली आहेत. असे असले तरी इच्छा मनामध्ये पूर्वीच्याच आवेगाने तयार होत आहेत. त्यांचे आवेगी समाधान आता होणार नाहिये. ह्याचेही दुःख आहे. हा इंद्रियांनी केलेला अजून एक दंश आहे. म्हणून किणीकर पहिल्या ओळीत म्हणतात -
‘इंद्रिये वाहुनि गेली ठेवुनि दंश’
देह कोरडा पडल्याची भावना झाली आहे. कांतीवरचा तजेला गेला आहे. कांतीवर सुरुकुत्या पडल्या आहेत. कांतीमधून दिसणारे स्नायू आता क्षीण दिसत आहेत. पाय कंसासारखे गोल झाले आहेत. वाकले आहेत. बोटे वाकली आहेत, पाठ वाकली आहे. मान झुकली आहे.
‘कोरड्या शुष्क देहाचे झाले कंस’
अशा ह्या अवस्थेत मृत्यूच्या पलीकडच्या जगाचा विचार सुरू झाला.
‘खिडकीतून दिसले आकाशाचे धरटे’
खरंतर आता इंद्रियांच्या दंशांमध्ये वेळ जातो त्याच प्रमाणे पुढच्या आकाशाच्या घरट्याच्या विचारांमध्ये वेळ जातो. आयुष्याने दिलेल्या जखमांवर विचार करायला वेळ कुठे आहे? आणि करायचा म्हटले तरी तेवढी तटस्थता कुठे आहे? आता पायात रुतलेले काटे आकाशाच्या घरट्यात जाऊन मोजायचे!
‘खिडकीतून दिसले आकाशाचे धरटे
रुतलेले मोजिन जाऊनि तेथे काटे।।’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१६२)
‘वाकला देह वाकली इंद्रिये दाही
चिरतरुण राहिली देहातील वैदेही
मन नाचविते अन् नेसविते तिज लुगडी
मन नपुसक खेळे शृंगाराची फुगडी।।’
ही रुबाई ह्या आधीच्या रुबाईचाच पुढचा भाग आहे. दाही इंद्रिये वाकली. पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय. इंद्रिये वाकली, देहसुद्धा वाकला. पण मनातील वैदेही चिरतरुण राहिली. वैदेही म्हणजे देह नसलेली. अस्तित्वासाठी देहाची गरज नसलेली. आत्म्याला ‘वैदेही’ म्हणतात, पण किणीकरांनी वैदेहीच्या संदर्भात स्त्री लिंग वापरलेले आहे.
‘चिरतरुण राहिली देहातील वैदेही’
तसेच ह्या वैदेहीला साडी नेसवली जाण्याची भाषा ते करतात. त्यामुळे देहात राहणाऱ्या पण अस्तित्वासाठी देहाची गरज नसलेल्या इच्छेला ते येथे वैदेही म्हणत आहेत, असे म्हणावे लागेल. देह वाकला तरी ह्या वैदेहीच्या नादी मन लागलेच आहे.
इच्छेच्या अवती-भवती ते पिंगा घालत आहे. त्याचा आता फारसा उपयोग नाहिये हे त्याला कळत आहे. इच्छा वैदेही असली तरी समर्थ देहाशिवाय कुठल्याही इच्छेची पूर्तता होत नाही. मनाला हे कळत नाहिये. ते इच्छेबरोबर श्रृंगाराची नपुंसक फुगडी घालत बसले आहे.
‘नपुंसक खेळे शृंगाराची फुगडी।।’
ह्यात नपुंसक मन श्रृंगाराची फुगडी घालते आहे असे वाटते, पण मन श्रृंगाराची नपुंसक फुगडी घालते आहे, असा अर्थ घेतला, तर रुबाईचा सगळा आशय हाती लागतो.
१६३)
‘वा! पहा उडाली चित्रातील ती चिमणी
वा! चंद्र पीतसे त्या डोहातील पाणी
छे! कुणी दिले या मनास माझ्या पंख
शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख ।।’
एखादी आई आपल्या लहान मुलाला सांगते की, ती बघ चिमणी भुर्र्कन् उडून गेली. आपण पाहावे तर तिथे फक्त चित्रातली चिमणी असते. एखादी कविता वाचायला जावे तर त्यात चंद्र पाणी पीत असल्याचे वर्णन असते. किणीकर विचारतात, मानवी मनाला हे पंख कुणी दिले? आणि नंतर शेवटच्या ओळीत त्यांच्या स्वतःच्या खास शैलीत सांगतात -
‘शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख ।।’
हे शाश्वत जग, भौतिकशास्त्राच्या, रसायनशास्त्राच्या, जीवशास्त्राच्या नियमांनी बांधले गेलेले आहे. त्याला अपवाद नसतो. ह्या अर्थाने हे शाश्वत जग फार कंटाळवाणे आहे, पण त्या कंटाळवाण्या जगात अशाश्वत मनाचा आविष्कार होतो आणि सगळे बदलून जाते. मग जीवनात काव्य येते, साहित्य येते, आपले स्वतःचे नियम बनवणाऱ्या भावना येतात, कायदेकानू येतात. सगळे मानवी आयुष्य अवतरते. सगळे नियम तोडून पुढे जाता येते, मानवाने मनाच्या पलीकडे जायला पाहिजे, हे सांगणाऱ्या अध्यात्माचा जन्मसुद्धा मनापासूनच होतो. नियमांचा तोरा मिरवणाऱ्या शाश्वत जगाला मनाचा हा डंखच!
१६४)
‘मी कोण? कोठला? कुठे मला जायाचे?
का एकच गाणे हेच तुला गायाचे
ते जुने प्रश्न आणि जुनाच त्यांचा वाण
प्राचीन तिरडीला नव्या सुतळीचा ताण।।’
ही किणीकरांची लाडकी थीम. माणूस त्याच त्याच प्रश्नात जन्मभर अडकून पडतो. मी कोण वगैरे प्रश्न त्याला सतत सतावत राहतात. त्यांची उत्तरेही मिळत नाहीत. वय वाढते तसे त्यांचे स्वरूपसुद्धा बदलत नाही. त्यांचा वाण जुनाच राहतो. ही प्रश्नांची तिरडी जुनीच आहे. तिच्यावरूनच सगळ्यांना जायचे आहे. फक्त दरवेळी तिला नव्या मानवांच्या मनाच्या सुतळ्यांनी ताणून घेतले जाते. इतकेच. बाकी त्यापुढे काही नाही.
१६५)
‘घे प्रेत आपुले खांद्यावरचे खाली
बघ तुझ्या मागुनी कोल्हे कुत्री आली
दे दगड उशाला लोट नि काळी माती
या जमल्या मुंग्या शोकगीत हे गाती।।’
ही रुबाई ह्या आधी थोड्या वेगळ्या स्वरूपात येऊन गेली आहे. कवी त्याला सुचलेल्या विचारांचे आणि भावनांचे दोन वेगवेगळे आविष्कार लिहितो. त्यातले जे उजवे वाटेल ते तो प्रसिद्ध करतो. काही वेळा उजवे काय आणि डावे काय, हे त्यालाच ठरवता येत नाही. मग तो दोन्ही प्रसिद्ध करतो.
माणसाला स्वतःच स्वतःची कबर गाठता आली तर बरे, हा विचार किणीकरांच्या स्वतःच्या मनात आला असणार. कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते. मन मरून गेलेले असते. प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच!
मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!
१६६)
‘उकरून जुने हा नवे बांधतो थडगे
पुटपुटतो मिटुनी डोळे, मोडुनि गुडघे
प्रार्थना कुणाची कशास माहीत नाही
मांडीवर शव अन् ओठावर अंगाई।।’
मला वाटते ही कालबाह्य आणि भ्रष्ट झालेल्या धर्मावरची रुबाई आहे. जुने, कालबाह्य झालेले धार्मिक ग्रंथ धुंडाळून जे काही धर्म म्हणून सांगितले जाते, तो धर्म नसतो, ते केवळ एक थडगे असते. जुन्या धर्माचे नवे थडगे!
ह्या थडग्यासमोर डोळे मिटून, विशिष्ट आसनात बसून काही प्रार्थना म्हटल्या जातात. आपण कुणाची प्रार्थना करतो आहे हे निश्चित माहीत नसते. नेमके कशासाठी आपण प्रार्थना करतो आहोत, तेसुद्धा माहीत नसते. पूर्वापार चालत आले म्हणून आपण सगळे करत असतो.
हे सारे करणे, म्हणजे मेलेल्या बाळाला मांडीवर घेऊन अंगाई म्हणण्यासारखे आहे, असे किणीकर खास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनिवार्य भाग असलेल्या तीव्र त्वेषाने म्हणतात.
१६७)
‘मी मुक्त म्हणे हा वृक्षावरचा पक्षी
आभाळ एकटे आहे त्याला साक्षी
पण कुणी दिले हे आभाळाला पंख
शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख।।’
ही रुबाई १५३व्या रुबाईचा थोडा वेगळा आविष्कार आहे. वृक्षावर पक्षी बसलेला आहे. तो म्हणतो मी मुक्त आहे. सांख्य तत्त्वज्ञानात मायेच्या झाडावर बसलेल्या दोन पक्षांचे रूपक आहे. एक पक्षी म्हणजे माणसाचा जीव आणि दुसरा ह्या जगात रस नसलेला पक्षी म्हणजे जन्माला आलेल्या मर्त्य अशा मानवाचा आत्मा.
जीव पार्थिव नियमांनी बांधलेला आहे. तो म्हणतो आहे की, मी मुक्त आहे. एक तर त्याला ह्या जगात फिरण्याचे स्वातंत्र्य आहे, किंवा त्याला आपल्यातील मुक्त आत्म्याच्या मुक्ततेची वैचारिक का होईना अनुभूती आहे.
ह्या सगळ्या नाट्याला फक्त आभाळ साक्षी आहे. निसर्ग साक्षी आहे. का आभाळ हे निर्मितीचे प्रतीक म्हणून येथे आले आहे? मायेच्या निर्मितीच्या शक्तीचे प्रतीक म्हणजे पाणी किंवा आभाळ. हे निर्मितीचे पंख ह्या आभाळाला कुणी दिले?
ही निर्मिती जरी पार्थिव नियम पाळून होत असली, तरी त्या निर्मितीमधून पार्थिवाचे कसलेच नियम न पाळणारे चैत्यन्य निर्माण होते आहे. पार्थिव शरीरात जीव निर्माण होतो आहे. जिवात मुक्ततेची अपार्थिव संकल्पना राहायला येते आहे. अपार्थिव मन राहायला येते आहे.
हा चैतन्याचा पार्थिवाला आर्शीवाद की, हा अपार्थिवाचा पार्थिवाला डंख! किणीकर म्हणतात की, पार्थिवाची कंटाळवाणी जडता चैत्यन्य ‘पंक्चर’ करते, म्हणून हा डंख आहे. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञाने म्हणतात, ही सारी चैतन्याची लीला आहे, हा सारा एक खेळ आहे.
किणीकरांना जो डंख वाटतो आहे, तो ह्या खेळाचाच एक भाग असावा!
१६८)
‘हे स्वरूप चिन्मय देहापुरते नसते
हे स्वरूप चिन्मय देह जाळता उरते
देहात वितळते कणकण स्वरूप जेव्हा
ना सरते, उरते स्वरूप चिन्मय तेव्हा।।’
चिन्मय म्हणजे पूर्ण शुद्ध. विशुद्ध ज्ञानमय. परमात्मास्वरूप. परमेश्वरासारखे. माणसात जो अमर भाग असतो, आत्मा असतो त्याला स्वरूप म्हणतात. ‘गीते’च्या १३व्या अध्यायात त्याचे वर्णन आलेले आहे.
‘ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस: परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ।।१३-१८।।’
तो आहे सर्व प्रकाशांचा प्रकाश. तो आहे आपल्या अज्ञानाच्या अंधारांच्या पलीकडचा प्रकाश. तो ज्ञान आहे. तो ह्या विश्वातील ज्या ज्या गोष्टींचे ज्ञान होणे शक्य आहे त्या गोष्टी आहे आणि ह्या जगात जे जे जाणले गेले आहे, ते सर्व तोच आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे आणि तोच ज्ञातासुद्धा आहे. तो सर्वत्र आहे, सगळ्यात आहे आणि तोच सगळे आहे. त्यामुळे किणीकर लिहितात -
‘हे स्वरूप चिन्मय देहापुरते नसते
हे स्वरूप चिन्मय देह जाळता उरते’
तेरावा अध्याय पुढे सांगतो -
‘यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ।।३३।।’
अवकाशाने ह्या जगातील सगळ्या गोष्टींना आपल्यात सामावून घेतलेले असते. पण अवकाश इतके सूक्ष्म असते की, त्याला जडाची बाधा होत नाही. जडरूप जगाचा इतका स्पर्श झाला, तरी अवकाश हे अवकाशच राहते. त्याचप्रमाणे ह्या सर्व शरीरात सर्वत्र चैत्यन्य राहात असते, पण त्याला शरीराच्या कुठल्याही लक्षणाचा कसलाही स्पर्श होत नाही. ह्या बाबतीत किणीकर लिहितात -
‘देहात वितळते कणकण स्वरूप जेव्हा
ना सरते, उरते स्वरूप चिन्मय तेव्हा।।’
हे स्वरूप जेव्हा देहाच्या कणाकणात वितळलेले असते, तेव्हा त्याचे शुद्ध असे चिन्मय रूप सरलेले नसते. तेच केवळ मागे उरलेले असते.
१६९)
‘ “तू अमूर्त, ना जन्म ना मरण तुला
मी मूर्तिमंत पण गर्भातच विकलेला”
“अशरिरी तू, तुज देहधर्म ना कळले
जन्मांतरिचे घाव घेत मी फसलेला”।।’
अध्यात्मात असे आहे की, पहिल्यांदा चिन्मय सत्य असते. ते अज्ञानाची ओढणी घेऊन ह्या जगात उतरते. आणि हळूहळू जन्मोजन्मीचा प्रवास करून, प्रत्येक जन्मात काहीतरी शिकून उत्क्रांत होत जाते. आणि मग पुन्हा शुद्ध स्थितीपर्यंत पोहोचते.
ह्या प्रवासात जे दुःख आहे ते आत्म्याला नाही, जन्माला आलेल्या जिवाला भोगायला लागते. ह्या रुबाईमध्ये तो जीव आत्म्याला आपली कैफियत सांगतो आहे.
‘तू अमूर्त, ना जन्म ना मरण तुला
मी मूर्तिमंत पण गर्भातच विकलेला’
तू अमूर्त आहेस. तुला जन्मही नाही आणि मरणही नाही. मला दोन्ही आहे. हा सगळा जन्माचा त्रास भोगताना मी स्वतंत्रही नाही. मी गर्भात असतानाच, तू माझ्यात राहायला येतोस. म्हणजे जन्माला येण्यापूर्वीच मी विकला जातो. मी मानव मूर्ती धारण करायची. तू आता अमूर्त स्वरूपात राहणार. जन्म माझा पण मालक तू. सगळी दुःखे मी भोगायची पण तू आत शांत राहणार.
‘अशरिरी तू, तुज देहधर्म ना कळले
जन्मांतरिचे घाव घेत मी फसलेला।।’
मला हा देह धारण केल्यामुळे काय काय सहन करायला लागते आहे, पण देहधर्माची ही तोशीस तुला अजिबात लागत नाहिये. तू ह्या जन्मातून त्या जन्मात निवांत प्रवास करतो आहेस आणि मी जन्म-जन्मांतरीचे घाव जातो आहे. ह्यात विचित्र प्रवासात मी फसवलो गेलो आहे.
१७०)
‘का प्रवास म्हणतो टप्पा हा शेवटचा
वर्तुळात फिरतो कोष मध्यबिंदूचा
प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला
प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला।।’
मानवाचा हा जन्म-जन्मांतरीचा हा प्रवास वर्तुळाकार आहे. शुद्ध चैतन्यावर अज्ञानाचा लेप चढणार आहे, आणि हे अज्ञान जन्माजन्मांच्या प्रवासात सुख-दुःख भोगत हळूहळू विरत जाणार आहे, आणि मग पुन्हा शुद्ध चैत्यन्य उरणार आहे.
वर्तुळाला कुठे शेवट असतो? त्यामुळे माणूस म्हातारा झाला की प्रवासाचा शेवटचा टप्पा आला असे कसे म्हणता येईल? शुद्ध आत्मा हा केंद्रबिंदू आहे. त्याच्या भोवती मानवी जीवनाचे कोष फिरत आहेत.
‘प्रारंभ नसे ना शेवट या रेषेला’
ह्या वर्तुळाच्या रेषेला सुरुवात नाही आणि शेवटही नाही.
‘प्रश्नातच असते उत्तर ज्याचे त्याला।।’
मानवी शरीरात जीव आणि आत्मा दोन्ही आहेत. आत्मा हे शुद्ध चैत्यन्य आहे, शुध्द ज्ञान आहे. जिवाला प्रश्न पडणार आहेत. किंबहुना जीव हा विविध प्रश्नांनी हैराण असणार आहे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शुद्ध ज्ञानाकडे असणार आहेत. ह्या अर्थाने मानवाला पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे त्याच्या आतच असतात. प्रश्नातच उत्तर दडलेले असते.
१७१)
‘ना उंबरठा, ना भिंत, इथे ना दार
कधी चूल पेटली नाही निघाला धूर
या इथे उगवली नाही हिरवी काडी
ही हीच असे रे, हीच तुझी ही वाडी।।’
ही रुबाई एकतर एखाद्या फकिराच्या आयुष्याबद्दल असावी किंवा मग कवीच्या सृजनशक्तीच्या ऱ्हासाबद्दल आहे असे वाटते आहे. फकिरी वृत्तीच्या माणसाला काहीच नको असते. त्याला कुणी बांधून ठेवू शकत नाही. ना उंबरठा, ना घराच्या भिंती ना कुठला दरवाजा. त्याला संसाराचे आकर्षण नसते. त्यामुळे चूल वगैरे प्रकार त्याच्या आयुष्यात नसतात. फकिराला कुठल्या सृजनाचेही कौतुक नसते. ह्या सगळ्यामुळे वैराण जग आणि जीवनदृष्टी हीच फकिराची वाडी असते, विरासत असते.
ह्याच्या उलट कलाकाराची निर्मिती-क्षमता! त्याला ह्या सगळ्या गोष्टींचे कौतुक असते. निर्मिती-क्षमता जवळ राहिली नाही, मनासारखी निर्मिती जमली नाही, तर आपले सगळे आयुष्य वैराण आहे अशी त्याची भावना होऊ शकते.
किणीकर सतत कलाक्षेत्रात राहिले, पण त्यांना स्वतःला आनंद होईल, अशी निर्मिती त्यांच्याकडून आयुष्याच्या शेवटी शेवटी झाली. ह्या परिस्थितीत आपले सर्व आयुष्य वैराण आहे, अशी त्यांची भावना झाली, तर ते समजण्यासारखे आहे.
१७२)
‘मिळवले परंतु एक मिळाले नाही
हरलो जरी येथे एक हरविले नाही
हरवले मिळाले काय, शेवटी सांग
जा उठा, घेतली आहे याने भांग।।’
नशेत असलेल्या माणसाचे तत्त्वज्ञान सगळ्यांना ऐकायला लागते. जगात सगळे मिळाले पण एक गोष्ट मिळाली नाही, जगात सगळे हरवले पण एक गोष्ट हरवली नाही, वगैरे स्वरूपाची बडबड नशेतला माणूस करत असतो.
किणीकर त्याला सांगतात की, बाबा तू काय हरवले आणि काय मिळवलेस हे नंतर सांग. आणि, त्या नशेतल्या माणसाचे ‘तत्त्वज्ञान’ ऐकणाऱ्या लोकांना किणीकर सांगतात, बाबांनो ह्याचे काय ऐकता? ह्याने भांग घेतली आहे!
.................................................................................................................................................................
या लेखमालिकेतले आधीचे लेख
https://www.aksharnama.com/client/author_articles
.................................................................................................................................................................
१७३)
‘पाकळ्या गुलाबी सुकल्या थडग्यावरती
अन् कधीच विझली त्यावरची ती पणती
सांगतील का रे कुजलेल्या त्या अस्थी
त्या मध्यरात्रीच्या कथा परिकथा मस्ती।।’
थडगे आता दुर्लक्षित झाले आहे. त्याच्याकडे लक्ष देणारे लोकसुद्धा आता थडग्याआड गेले असतील कदाचित! त्यावर आता कुणी फुले वाहत नाही, तिथे कुणी दिवा लावत नाही. आता त्या थडग्यातल्या अस्थी कुजून गेल्या असतील. पण त्यांना जिवंत असतानाचा रम्य प्रणय आठवत असेल का? त्या जिवंत प्रणयाची अनुभूती त्या कुजलेल्या अस्थींमध्ये जिवंत असेल का? आणि, भले त्या आठवणी त्यांच्यात जिवंत असल्या तरी, तरी त्या अस्थींमध्ये, त्या परिकथा सांगण्याची उमेद उरलेली असेल का?
मानवी सुखांची परिकथा क्षणभंगुर असते, हा विचार साधा असला, तरी स्वीकारायला किती अवघड जातो!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
१७५)
‘शहाण्या शब्दांनो हात जोडतो आता
कोषात जाऊनी झोपा मारीत बाता
रस रूप गंध अन् स्पर्श पाहुणे आले
घर माझे नाही, त्यांचे आता झाले।।’
‘इंटलेक्च्युअल लाईफ’ आता बास झाले! काही हाताला लागत नाही त्यातून! हे शब्दांनो, तुम्ही तर्काच्या किंवा बुद्धीच्या कोषात जाऊन झोपा. का, किणीकर शब्दांना शब्दकोशात जाऊन झोपायला सांगत आहेत? शब्दकोशांच्या कोषात! ते शब्दांना सांगत आहेत की, ह्या जगाबद्दल, ह्या मानवी जीवनाबद्दल, ज्या काही थापा तुम्हाला मारायच्या आहेत, त्या तिथे कोषात जाऊन मारत बसा!
सुंदर संवेदनांचे जग आता कवीच्या जीवनात उतरले आहे. संवेदनांचे जग, कवीला दुरावले होते. त्या दुरावलेल्या संवेदना पुन्हा एकदा जिवंत होऊन पाहुण्या म्हणून आल्या आहेत.
‘रस रूप गंध अन् स्पर्श पाहुणे आले’
हे संवेदनांचे जग शब्दांच्या जगापेक्षा कितीतरी जिवंत आणि रसरशीत आहे! त्यामुळे किणीकर त्यांना सांगत आहेत की, माझ्या ह्या अस्तित्वाचे घर आता माझे उरले नाहिये. हे सगळे अस्तित्व, हे सगळे घर आज संवेदनांचे झाले आहे!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment