१४६)
‘विज्ञान आणखी ज्ञान नि तत्त्वज्ञान
त्याहून असे रे मोठे हे अज्ञान
हा बिंबाचा अन् प्रतिबिंबाचा खेळ
हे पडद्यापुढचे नाटक म्हणजे भूल।।’
तुम्ही विज्ञानात मोठे असा, तुम्ही ज्ञानी पंडित असा, किंवा मोठे तत्त्वज्ञानी असा. तुम्हाला एके दिवशी ह्या जगातील अज्ञान किती अथांग आहे, ह्याची जाणीव होते. लोकांच्या अज्ञानाला आणि मूर्खपणाला सीमा नसते.
ह्याही पलीकडे जाऊन मानव कितीही ज्ञानी झाला, तरी ह्या जगतातील अंतिम सत्य त्याच्या हातून निसटून गेलेले त्याला पाहावे लागते. अंतिम सत्याला गवसणी घालायची असेल तर, माणसाला, मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जावे लागते असे अध्यात्म सांगते. असे सर्व धर्म सांगतात. बुद्धीने मिळवलेले ज्ञान हे अज्ञानाचेच प्रतिबिंब असते.
जोपर्यंत हे जग ही एक माया आहे, हे लक्षात येत नाही, हे जग सत्य नसून केवळ एक नाटक आहे, हे लक्षात येत नाही, तोपर्यंत खरे ज्ञान झाले आहे, असे म्हणता येत नाही. पृथ्वी, निसर्ग, माणूस हे सारे नाटकासारखेच असत्य असते. ही सर्व भूल आहे. माणसाचे मन आणि बुद्धी ही सुद्धा भूल आहे - म्हणून मनाने आणि बुद्धीने मिळवलेले ज्ञान हीसुद्धा एक भूल असते. हे ज्ञान म्हणजे एक प्रकारचे अज्ञानच असते. अज्ञानाचे प्रतिबिंबच असते.
‘हा बिंबाचा अन् प्रतिबिंबाचा खेळ
हे पडद्यापुढचे नाटक म्हणजे भूल।।’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१४७)
‘छायेला असते स्वतंत्र का अस्तित्व
वस्तूला नसते स्वतंत्रतेचे तत्त्व
हे विकती खोट्या बाजारात रे वस्तू
ग्रंथातील वळवळणारे अक्षर जंतू।।’
खोट्या साहित्याबद्दलची रुबाई! छायेला स्वतंत्र अस्तित्व नसते. एखादी वस्तू आपण बाजारतून आणतो. तीसुद्धा स्वतंत्र नसते. तिला मालकाच्या तंत्राने राहावे लागते. लोकप्रिय होण्याच्या उद्देशाने जे लेखक लेखन करत असतात त्यांचे लेखनसुद्धा असेच परतंत्र असते. त्या लेखनात जान नसते. एखादी सावली असावी असे ते लेखन असते. ना कसला चेहरा, ना कसले व्यक्तिमत्त्व, ना कसले मन! लोकांना हे आवडेल का, ते आवडेल का, असा विचार करत लिहिल्यामुळे खरे जीवन त्या लेखनात अवतरत नाही. सगळेच जान नसलेले. कृत्रिम आणि विकावू!
बाजारातल्या वस्तू ज्याप्रमाणे विकण्यासाठी तयार केल्या जातात, त्या प्रमाणे हे लेखनसुद्धा विकण्यासाठीच तयार केले जाते. ते उत्स्फूर्त नसते. ते स्वयंभू नसते. खरं तर अक्षर ह्या शब्दाचा अर्थ - ज्याचा कधीही क्षय होत नाही असे - असा आहे. म्हणजे एका अर्थाने अक्षराला मानवाच्या आत्म्याची पदवी दिलेली आहे. पण विकावू लेखनात ह्या अक्षरत्वाची बूज राखली जात नाही. अशा लेखनात अक्षरे वळवळणारे जंतू बनून राहतात! जे जे काही खोटे आहे, कमअस्सल आहे, त्याबद्दल लिहिताना किणीकरांची लेखणी जहाल बनते. कधी कधी विषारीसुद्धा बनते.
१४८)
‘ही भूक शिकविते मागायाला भीक
अन् भीती म्हणते गळा काढुनी भुंक
ही भूक आणि भीती, देवाची दैवाची
शिकविते ज्ञातही कोणा अज्ञाताची।।’
भुकेसाठी भीक मागायला लागणे आपण पाहातच असतो.
‘अन् भीती म्हणते गळा काढुनी भुंक’
माणूस जन्मभर बोलत असतो. आपण थोडे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येते की माणसाच्या बोलण्यातल्या बहुतांश बोलण्याचा उगम कसल्या ना कसल्या भीतीतून झालेला आहे. भूक आणि भीती ह्या दोन गोष्टी माणसाचा पिच्छा सोडताना फारशा दिसत नाहीत. भीती फक्त भुकेमुळे येते असे नाही. देवाची आणि दैवाचीही भीती माणसाला जन्मभर वाटत असते. कारण देव आणि दैव ह्या अज्ञात गोष्टी असतात. मानवाला जसे जसे बाह्य जगाचे ज्ञान होत जाते, तसतशी त्याला अज्ञाताची जास्त जास्त भीती वाटू लागते. उदा. तुम्ही डॉक्टर झालात की, तुम्हाला किती प्रकारचे रोग होऊ शकतात हे कळू लागते. सगळे जीवन दैवाच्या हातात आहे, ही भावना वाढीस लागते.
‘ही भूक आणि भीती, देवाची दैवाची
शिकविते ज्ञातही कोणा अज्ञाताची।।’
१४९)
‘संपला भोग रतिकंठ फुटे धरतीचा
फेडती कवचकुंडले नवस मातेचा
रांगता पुरेना अंगण आकाशाचे
पांगळे चाक बघ झाले मनोरथाचे।।’
ह्या रुबाईचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी रती ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. रती ही कामदेवाची पत्नी. रती ह्या शब्दाचे दुसरेही अनेक अर्थ आहेत. रती म्हणजे खुशी, सुख. रती म्हणजे क्रीडा, विश्राम देणारी क्रीडा. आणि रती म्हणजे रमून जाण्याची अवस्था. मृत्यू झाला - भोग संपला. दुःखभोग संपला आणि सुखोपभोगसुद्धा संपला.
‘संपला भोग, रतिकंठ फुटे धरतीचा’
रतिकंठ फुटे धरतीचा. ह्या धरतीवर माणूस क्रीडा करण्यासाठी आलेला असतो. सुख आणि दुःख हे त्या क्रीडचेच भाग आहेत. त्यात माणूस रमून गेलेला असतो.
‘फेडती कवचकुंडले नवस मातेचा’
मातेच्या नवसाने आलेली कवचकुंडले आता फेडली गेली आहेत. मृत्यू झाला आहे. ही क्रीडा ही माया आहे. ती संपली आहे. पृथ्वीचे बंधन संपले आहे.
‘रांगता पुरेना अंगण आकाशाचे’
आता आकाशाचे आंगणसुद्धा पुरेनासे झाले आहे. पूर्ण स्वातंत्र्य!
‘पांगळे चाक बघ झाले मनोरथाचे।।’
आता मनच राहिलेले नाही, शुद्ध चैतन्य उरले आहे. मनच न राहिल्यामुळे मनोरथांनाही अर्थ उरलेला नाही.
मनोरथांमुळे आयुष्यभर माणूस बांधलेला राहतो. मनोरथांपासून सुटका हेसुद्धा एक स्वातंत्र्यच!
१५०)
‘लागता चोर चाहूल पापणी मिटली
घुमटात आंधळी पाकोळी फडफडली
उसवला श्वास ओठात सांडले स्वप्न
अन् कोंभ दुधाचे त्यावर रुतले दोन।।’
ही गर्भवतीच्या अवस्थेवरची रुबाई आहे.
गर्भ गर्भाशयात जरासा हलला. ती चोरटी, ओझरती चाहूल त्या गर्भवतीला लागली. सुखाने तिची पापणी मिटली. तिच्या स्तनांच्या घुमटात आंधळ्या मायेची पाकोळी फडफडली. त्या भावानेमुळे एक निश्वास सुटला. त्या निश्वासामुळे जणू काही मातृत्वाचे स्वप्न ओठांमधून ओसंडून बाहेर आले. आणि त्या भावनांमुळे स्तनांमध्ये दुधाचे कोंभ फुटायला लागले.
१५१)
‘विरहतप्त घुमला डमरू शिवरात्रीचा
हा प्रदोष मंगल पर्वकाल सृजनाचा
भिल्लीण भाळली डमरु पडला खाली
(अन्) मदिरेतुन मदिराक्षी जन्मा आली।।’
शिव म्हणजे सृजन आणि शिव म्हणजे मृत्यू. शिव म्हणजे कल्याण. शिव म्हणजे तांडव. शिवाचा डमरू वाजू लागतो तेव्हा मृत्यूचे तांडव सुरू होते. शैव परंपरेत शिव म्हणजे सगळे. शिव तत्त्वातून शक्ती निर्माण होते. शक्ती म्हणजे सृजनाची सुरुवात. ह्या अर्थाने शिव म्हणजेच सृजन, पण नवनिर्मितीसाठी जागा करून देणारा, संहार करणाराही शिवच!
शिवरात्रीला शिव शक्तीने संपन्न झाला आणि त्याने सृजनाची सुरुवात केली. भिल्लीण हे किणीकरांनी आदिस्त्रीचे प्रतीक म्हणून वापरलेले आहे. स्त्रीमधील सृजनाची प्रेरणा शिवाने रचली, ती शिवरात्रीच्या दिवशी. त्या सृजनाच्या रचनेमुळे स्त्री पुरुषावर भाळते. शिवाचा मृत्यूच्या वेळी वाजणारा डमरू ह्या प्रेरणेमुळे थोडा काळ गळून पडला.
सृजनाची सुरुवात झाली म्हणजे मायेची सुरुवात झाली. मदिरा हे मायेचे प्रतीक आहे. मायेमुळे जी नशा चढते त्याचे प्रतीक आहे. ह्या मदिरेची, मायेची सुरुवात झाली आणि त्या सृजनाच्या नशेतून मदिराक्षीचा जन्म झाला. जिचे डोळे मदिरेसारखे नशा आणणारे आहेत ती मदिराक्षी. मायेसाठी स्त्रीचा जन्म झाला. सृजनासाठी तिच्यात पुरुषाला मोहवणाऱ्या सौंदर्याची रचना झाली.
स्त्रीचा आणि तिच्यातील सौंदर्याचा जन्म मायेच्या मदिरेतून झाला. अशा रितीने कल्याणकारी शिवाचे नाते मदिरेशी आणि नशेशी जुळले. ज्यांना शिवाने निर्मिलेल्या ह्या मायेच्या नशेचा अर्थ माहीत नसतो, ते महाशिवरात्रीला खरी नशा करतात. कल्याणकारी शिवाला ‘मुक्तेश्वर’ असेही म्हणतात. तो प्रसन्न झाला की ह्या मायेतून, ह्या नशेतून मुक्ती मिळते. सृजन निर्माण करणाराही तोच. आणि त्यातून मुक्ती देणाराही तोच. मधला काळ नशेचा. मदिरेचा आणि मदिराक्षीचा!
१५२)
‘या इथेच पडलो होतो काल पिऊन
या इथेच पडले एक विलक्षण स्वप्न
पाहून रिकामे मद्याचे ते पात्र
उतरून पायऱ्या धावत आली रात्र।।’
ह्या रुबाईचे नाते ह्या आधीच्या रुबाईशी आहे असे मला वाटते. ह्या मायेने, ह्या मायेच्या मदिरेने नशा आल्यामुळे मी ह्या पृथ्वीवर काल पडलो होतो. त्या नशेमुळे मला एक स्वप्न पडले. म्हणजे मायेच्या स्वप्नामुळे एक स्वप्न पडले. माझ्या नशेत मी चूर होतो. मी मुक्तीच्या दृष्टीने काहीच विचार करत नव्हतो. म्हणजे मी मद्यासाठी आसूसलेल्या पात्रासारखा रिकामा होतो. हे बघून माझ्याकडे रात्र धावत आली. मला भरून टाकण्यासाठी अज्ञान धावत आले. ह्या मायेच्या मद्याला तुम्ही स्वतःच्या अस्तित्वात जेवढी जागा द्याल, तेवढी सर्व जागा हे मायेचे मद्य व्यापून टाकेल.
१५३)
‘जे आहे येथे तेच खरे रे एक
जे नाही येथे नसे कुणा ठाऊक
स्मृति म्हणजे जगणे, विस्मृति हे मरणे
मी प्यालो म्हणुनि सुचले हे बडबडणे।।’
जे आहे येथे तेच खरे रे एकडोळ्यांना जे दिसते आहे, तेच खरे. बाकी सगळे झूट!
‘जे नाही येथे नसे कुणा ठाऊक’
जे येथे दिसतच नाहिये, त्याचा हवाला कुणी द्यावा?
‘स्मृति म्हणजे जगणे, विस्मृति हे मरणे’
बाकी जे जग अनुभवाला येते आहे, त्यातसुद्धा जे आठवते आहे, तेवढेच खरे. तेवढेच जिवंत. बाकी जे विस्मरणात गेलेले आहे त्याचा काय उपयोग? विस्मृतीत गेलेले एक प्रकारे मरण पावलेलेच असते. एवढे सगळे लिहून किणीकर एक पलटी मारतात -
‘मी प्यालो म्हणुनि सुचले हे बडबडणे।।’
किणीकरांनी अध्यात्माचा उत्तम अभ्यास केला होता. आध्यात्मिक विचार चांगल्या पद्धतीने पचवलेला होता. मानवी तर्क एखाद्या क्षणी विचारी मनाला अध्यात्माच्या पायावर कसे नेऊन घालतो ह्याचा अनुभव त्यांनी नक्कीच घेतला असणार. त्याशिवाय अध्यात्म ही कवितांची थीम म्हणून त्यांनी इतकी वापरलीच नसती. पण, तर्कातून आलेला विचारसुद्धा त्यांच्याकडे येत होता. त्यातून वरील रुबाईतील पहिल्या तीन ओळी लिहिल्या गेल्या. आणि त्यांच्या आध्यात्मिक विचारांच्या ओघातून शेवटची कोलांटी उडी मारली गेली.
१५४)
‘हे मद्य नव्हे ही तृष्णा आहे अमर
हे मद्य नव्हे हे अमृत जाळील अधर
गति अगतिक होते जेव्हा भ्रमणामधली
घ्या मद्य दाखविल निर्मळ वाट निराळी।।’
मद्य, धुंदी, नशा हा रुबाईकारांचा अतिशय आवडता विषय! मद्य हे मद्य नाहिये. ती अमर अशी तृष्णा आहे. नाहीतर ह्या दृश्य जगात तृष्णेशिवाय अमर असे दुसरे काय आहे? मद्याची तृष्णा अमर आहे, म्हणून मद्य देखिल अमर आहे. पण हे अमृत ओठ जाळणारे आहे. मद्याची तृष्णा नवसृजन देणारी आहे, असे किणीकरांना वाटते आहे. जेव्हा जीवन रटाळ बनते, विचार चाकोरीत अडकतात, प्रज्ञा क्षीण बनते - तेव्हा ही वारुणी नवी आणि निर्मळ वाट दाखवते.
‘The Grape that can with Logic absolute
The Two-and-Seventy jarring Sects confute:
The sovereign Alchemist that in a trice
Life's leaden metal into Gold transmute;’
(द्राक्ष - पाडते खोटे शंभर धर्मांना
आपल्यामधील रसिल्या तर्काने
द्राक्ष - बनवते शिशासारखे मद्दड जीवन
एका क्षणात सळसळत्या सुवर्णाचे)
१५५)
‘वाजले किती? वा ! आहे बंद घड्याळ
मोजीत पाउले गेली संध्याकाळ
दारात उभी भिजलेली श्रावणरात्र
चल उशीर झाला पुन्हा भरू दे पात्र।।’
एका अत्यंत प्रसन्न आणि शांत मनःस्थितीतील रुबाई. कवी मद्याचा आस्वाद घेत बसला आहे. मनात विचार येतो - किती वाजले असावेत. मान वर करून बघतो तो घड्याळ बंद! मनात म्हणतो चला पीत बसू. आता घडाळ्याचे टेन्शन नाही.
‘वाजले किती? वा ! आहे बंद घड्याळ’
त्यानंतर घड्याळ बंद असल्यामुळे संध्याकाळ पावले मोजत जाते. नाहीतर ती मिनिटे आणि तास मोजत गेली असती. तिचे, स्वतःची पावले मोजत शांतपणे जाणे हे जास्त प्रसन्न नाही का? आता बाहेर बघावे तर बाहेर श्रावणातली भिजलेली रात्र उभी! ते ओले सौंदर्य बघून कवीचा पुन्हा एकदा मूड तयार होतो. तो म्हणतो -
‘दारात उभी भिजलेली श्रावणरात्र
चल उशीर झाला पुन्हा भरू दे पात्र।।’
१५६)
‘हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ
या विदुषकाला नाही रडाया वेळ
लावून मुखवटे नवा खेळ चल लावू
ठेवून सावल्या पडद्यामागे जाऊ।।’
ह्या जगताचा खेळ दोन घडीचा आहे. ह्या खेळाला तंबूतला खेळ म्हटलेले आहे कारण ह्या खेळाचे स्टेजदेखील तंबूसारखे कायमचे नाहिये. सर्कसचा तंबू असतो. पूर्वी तंबूमध्ये सिनेमे दाखवले जात. खेळ संपला की सगळेच जाणार असते. ह्या अस्थिर खेळात विदूषकाला रडायलासुद्धा वेळ नाहिये. तोंडाला खोट्या समाधानाचे आणि हास्याचे रंग लावून सगळे साजरे करायचे आहे.
ह्या खेळाचा आता कंटाळा आला आहे. ह्या विश्वाच्या पडद्यामागे दुसरा कुठला तरी खेळ सुरू असणार आहे. तिथे नवे मुखवटे लावले जाणार आहेत. ह्या मानवी शरीरांचे काही खरे नाही. एका फार मोठ्या अस्तित्वाच्या ह्या केवळ सावल्या आहेत. ह्या सावल्या इथेच मागे ठेवून नवा खेळ लावण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा आता पुढे जायला हरकत नाहिये.
१५७)
‘रंगीत मुखवटे मोहाचे तृप्तीचे
जयपराजयाचे प्रीतीचे विरहाचे
हे सिंह वाघ हे हत्ती गेंडे घोडे
संपला खेळ अन् पुढे चालले गाडे।।’
मोह, तृप्ती, जय, पराजय, प्रीती आणि विरह ह्या गोष्टी खऱ्या आहेत काय? का हे सगळे भास आहेत? हे जीवन आणि ही सृष्टी जर एक भास असेल, तर आपल्याला खऱ्या वाटणाऱ्या भावना ह्यासुद्धा भासात्मकच असणार. त्या मुखवट्यांएवढ्याच खोट्या असणार. सर्कसमध्ये सिंह, वाघ, हत्ती, गेंडे आणि घोडे फिरवले जातात, तसेच हे मुखवटेसुद्धा ह्या जगात नाचवले जातात. खेळ संपला की, सगळे हत्ती घोडे पुढच्या गावाला जातात, त्याचप्रमाणे ह्या मानवी भावनासुद्धा पुढच्या जन्मात मुक्काम हलवतात.
.................................................................................................................................................................
या लेखमालिकेतले आधीचे लेख
.................................................................................................................................................................
१५८)
‘ती माया ममता कृतज्ञता अन् प्रीती
बलिदान समर्पण श्रद्धा निष्ठा भक्ति
चल विसर शब्द ते, भरला बघ हा पेला
अर्थशून्य शब्दांची दुनिया असे स्मशानशाळा।।’
अगदी सुबोध अशी ही रुबाई आहे. माया, ममता आणि प्रीती ह्या भावनांना तसा काही अर्थ नाही. श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती ह्या खोट्या भावना आहेत. बलिदान आणि समर्पण वगैरे आदर्शांचे काही खरे नाही. हे सगळे फक्तं शब्द आहेत. विसरून जाण्याच्या लायकीचे आहेत.
ही दुनिया म्हणजे पोकळ आणि अर्थशून्य शब्दांची स्मशानशाळा आहे. येथे शेवटी सरणावर सगळे जळून जाते. उपाय एकच आहे, मद्याचा पेला उचलायचा आणि हे शब्द विसरून जायचे.
.................................................................................................................................................................
या लेखमालिकेतले आधीचे लेख
शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे?
.................................................................................................................................................................
१५९)
‘पण मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी
अश्रूत तुझ्या विस्मृतिची लपली लेणी
ये मिटून जाऊ दंश जोवरी ओला
मृद्गंध पांघरून घेऊ चंद्र उशाला।।’
अतिशय भावरम्य अशी ही रुबाई आहे. अतिशय आशयगर्भ, तरल आणि होश उडवून टाकणारी! ह्यात मंतरलेले पाणी आहे, विस्मृतीची लेणी आहेत, ओला दंश आहे. सगळेच अद्भुत! मद्यधुंद अवस्थेत गतकाळातील ओले दंश आठवले. विस्मृतीत गेलेली तिच्या आठवणींची लेणी पुन्हा एकदा कॉन्शसनेसच्या प्रकाशात आली. त्या आठवणींचे सगळे दंश बाहेर आले. कुणाला काय सांगायचे? अश्रू मूकपणे वाहत राहिले.
‘अश्रूत तुझ्या विस्मृतिची लपली लेणी’
तिच्या बरोबर काढलेल्या क्षणांना शब्दरूप कसे देता येईल? आणि कशासाठी द्यायचे? ती अमर लेणी लपलेलीच राहिलेली चांगली. त्या तरलतेतच संपलेले चांगले. ते आठवणींचे दंश ओले आहेत, तोवरच संपून गेलेले चांगले.
‘ये मिटून जाऊ दंश जोवरी ओला’
तरलता नसेल तर आयुष्यात काय उरले? सौंदर्य नसेल तर आयुष्यात काय उरले? प्रेयसीबरोबर, तेसुद्धा तरल क्षणांच्या साथीत मरून जाण्यात मजा आहे.
‘मृद्गंध पांघरून घेऊ चंद्र उशाला।।’
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
१६०)
‘गजबजली बघ ही लाल दिव्यांची पेठ
घालती शीळ ते रंगवलेले ओठ
या लुटा, नग्न देहाचे मिळती दान
या इथेच झाला परमेश्वर पाषाण।।’
पाहिल्या तीन ओळी सरळ जातात. चौथी ओळही सरळ आणि सुबोध आहे असे वाटते. देहविक्रयाच्या त्या लाल दिव्यांच्या पेठेत परमेश्वर पाषाणरूप घेऊन मुका होऊन राहिला आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे.
शेवटच्या ओळीचा अजून एक अर्थ संभवतो. परमेश्वर फक्तं पाषाण आहे हा विचार अशाच एखाद्या देहविक्रयाच्या पेठेत जन्माला आला असावा. निरीश्वरवादाचा उगम अशाच एखाद्या हीन स्वरूपाच्या मानवी जीवनातील अनुभवात झाला असावा.
‘या इथेच झाला परमेश्वर पाषाण।।’
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment