अजूनकाही
रणरणत्या उन्हात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान एव्हाना पार पडलेलं आहे. आता पुढील टप्प्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याच वेळी प्रचाराची जी काही पातळी गाठली गेली आहे, ती अतिशय लज्जास्पद आणि कुरूपही आहे.
अर्थात हे काही आजच घडत नाहीये. गेल्या पाच-सहा निवडणुकांपासून प्रचारातील भाषेची ही घसरण सुरू आहे. अमरावतीत बोलताना एका महिला उमेदवारांच्या विरोधात प्रचार करताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी जी काही भाषा प्रयोगात आणली, त्याकडे म्हणूनच गंभीरपणे बघितलं गेलं पाहिजे. अशी भाषा केवळ गलिच्छ आहे असं नाही, तर ती वापरणाऱ्या सर्वांचीच वृत्ती कुरूप आहे, असंच म्हणायला हवं.
या ‘टोळी’त एकटे संजय राऊत नाहीत, तर जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, नवनीत राणा, अशी अनेक मंडळी आहेत आणि निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात त्या यादीत आता सुधीर मुनगंटीवार हेही आले आहेत.
आता स्वप्नवत वाटतं, पण एकेकाळी, म्हणजे माझ्या तरुणपणी, कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराची भाषणं अतिशय आब राखून होत. त्यात नर्म विनोद असे, टोमणे-प्रतिटोमणे असत अनेकदा उखाळ्या-पाखाळ्याही असत, पण कंबरेखालचे वार नसत. नेत्यांची प्रचाराची भाषणं ऐकायला लोक गर्दी करत असत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
माझ्या पिढीनं जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ते शरद पवार यांच्यासह मधू दंडवते, एन.डी. पाटील, जांबुवंतराव धोटे, मोहन धारिया, बाळासाहेब ठाकरे, केशवराव धोंडगे, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रधान मास्तर, दत्ता पाटील, रा. सु. गवई असे एकापेक्षा एक मान्यवर बघितले. (त्यानंतर सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांनाही आमच्या पिढीनं अनुभवलं आहे.)
त्यांची भाषणं म्हणजे वक्तृत्वाची मेजवानी असे. लोक सर्वच पक्षांच्या प्रचाराच्या भाषणाला गर्दी करत तरी मतदान कोणाला करायचं यांचा निर्णय सुज्ञपणे घेण्याचे ते दिवस होते. अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकायला मोठी गर्दी होत असे, पण त्यांच्या सभेला जितके लोक हजर असत तेवढीही मते अनेकदा त्यांच्या पक्षाला मिळत नसत, पण त्याचा बोल कधी या नेत्यांनी लोकांना लावला नाही.
मृणाल गोरे, एन.डी. पाटील आणि जांबुवंतराव धोटे यांची भाषणे घणाघाती, आक्रमक असत. त्यामुळे एक वेगळी चेतना उपस्थितात जागृत होत असे. या यादीतले शरद पवार आता त्यांच्याच घरच्यांना उद्देशून ‘घरचे’ आणि ‘बाहेरचे’ अशी जहरी भाषा वापरू लागल्यावर त्यांचे चेले-चपाटे तरी कशाला सभ्यता पाळतील म्हणा! ते वक्तृत्व आणि ते वक्ते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत आणि राजकीय भाषणांचा स्तर एखाद्या ‘गटारगंगे’सारखा झाला आहे.
निवडणुका म्हटलं की, आक्षेप घेतले जाणार, विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप होणार आणि सत्ताधारी त्या आरोपांचं खंडन करणार, हे ओघानं आलंच, पण या निवडणुकीत जे काही प्रचाराच्या नावानं घडत आहे, ते सभ्यतेच्या सीमा ओलांडणारं आहे; आपल्या राजकीय नेत्यांत शिष्टाचारची किमान चाड व सुसंस्कृतपणा नावालाही शिल्लक उरलेला नाही, याची खात्री पटवून देणारं सध्याचं चित्र आहे.
प्रचाराची खालची जी पातळी विरोधकांनी गाठली, त्यापेक्षा दहा पट खालच्या पातळीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते उतरले आहेत आणि म्हणे हा साधन-सुचिता जपणारा पक्ष आहे! दोन्ही बाजूंच्या समर्थक/भक्तांकडून त्यांचे नेते आणि पक्षाच्या या प्रचाराचे अत्यंत चुकीचे दाखले देत हिरिरीनं केलं जाणारं समर्थन, तसंच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना प्रतिस्पर्धीऐवजी एकमेकांचे हाडवैरी समजताहेत, हे काही आपली लोकशाही सुदृढ असल्याचं लक्षण नाही.
अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते, हे खरं असलं, तरी जेव्हा अध:पतन व्यक्तीगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं, तेव्हा कुणीही विवेकी आणि संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो. बाय द वे, पक्षात फूट पडल्यावर महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अशीच म्हणजे भाषेचा तोल घसरल्याची स्थिती आहे.
भाजपवर आवेशाने तुटून पडतात, तेव्हा उद्धव ठाकरे केविलवाणे दिसतात आणि वाटतातही, हे त्यांना कुणी तरी सांगायला हवं. पूर्वीच्या संयत पद्धतीनं त्यांनी हल्ले चढवले, तर ते त्यांच्या प्रतिमेला शोभून दिसेल. या अशा बेताल वागण्यामुळे यापेक्षाही जास्त गंभीर आहे, ते येणाऱ्या/नवीन पिढीच्या मनात राजकारणाविषयी निर्माण होणारी घृणा मतदानाच्या न वाढणाऱ्या टक्केवारीचं एक कारण असावं, असं किमान माझं तरी मत आहे.
निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदांनापासून दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? याच मानसिकतेतून जर ‘नोटा’ची चळवळ जोर पकडत असेल तर ती उभारणाऱ्यांवर टीका करता येणार नाही. गेल्या दोन-तीन निवडणुकांत तर ‘खुनी’, ‘तू चोर-तुझा बाप चोर’, ‘दरोडेखोर’, ‘जल्लाद’, ‘मांड्या-चड्ड्या’, महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग, अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पोलिसांचा आणि जवानांच्या हुतात्म्यांची खिल्ली व अक्षम्य अवमान... अशी किती उदाहरणं द्यायची?
सत्ताधाऱ्यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला, असा दावा करणाऱ्या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळले आहेत? गेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीला कुणबी व कोष्टी विरुद्ध ब्राह्मण, शिरुर मतदार संघात मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे आणि त्याआधारे मत मागणारे ‘सेक्युलर’ कसे?
देशातील एका मोठ्या आणि प्रमुख पक्षाच्या अध्यक्षाला ‘पप्पू’ म्हणणं जितकं अशोभनीय व अवमानकारक आहे, त्यापेक्षा जास्त अशोभनीय व अवमानकारक देशाच्या पंतप्रधांनांना ‘फेकू’ आणि ‘चोर’, ‘तडीपार’ म्हणणं आहे. कमरेचं गुंडाळून ठेवून ही अशी पातळी गाठल्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची लायकी जगाला नक्कीच समजली असेल आणि त्यांची नव्हे तर आपल्या देशाची जगभर नाचक्की झाली असणार.
केवळ आमची टीका योग्य आणि विरोधक उठवळ, हा समज तर निर्भेसळ ढोंगीपणा आणि आत्मप्रतारणाही आहे. गेल्या निवडणुकीत ‘त्याच्या’ माजी पंतप्रधान पित्यानं हवापालटासाठी कुठे आणि ‘कशी’ सहल केली होती याची उजळणी करणं, असे प्रकार केवळ निंदनीयच नाही, तर हिडीसही होते! आदबशीर वागण्याच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची जबाबदारी मोठी असते. स्वत:चा एक आब राखून त्यांनी राहायचं असतं, पण भाजपचे नेतेत तसा आब राखून वागत नाहीत, हा दैनंदिन अनुभव आहे.
या संदर्भात निवृत्त व्हाइस अॅडमिरल विनोद पसरिचा आणि निवृत्त नौदल प्रमुख रामदास यांनी दिलेली माहिती वाचल्यावर नरेंद्र मोदी किती खुजे आहेत, हे वेगळं सांगायची गरजच राहत नाही. म्हणूनच त्यांचा उल्लेख काही वर्षांपूर्वी जागतिक कीर्तीच्या ‘टाईम’ या नियतकालिकाच्या एका अंकाच्या मुखपृष्ठावरच ‘इंडियाज डिव्हायडर-इन-चीफ’ (भारतात दुफळी निर्माण करणारा नेता) असा उल्लेख ‘टाईम’ या नियतकालिकानं केला असावा!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आणखी एक मुद्दा, मतदान यंत्रे मॅनेज केली जाऊ शकतात या दाव्यातील राजकीय स्वार्थ एव्हाना पुरेसा स्पष्ट झालेला आहे. विजय मिळाला तर तो लोकशाहीचा, आपल्या पक्ष आणि नेत्याच्या लोकप्रियतेचा आणि पराजय झाला, तर तो मतदान यंत्रे मॅनेज केल्यामुळे, ही सर्वपक्षीय राजकीय चिखलफेक आणि अकाडतांडव करणारे कांही ‘व्रती’ राजकारणी वाढले आहेत.
त्यात २०१४ पूर्वी त्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता, आता काँग्रेस, राष्ट्रवादी, तेलगू देसम, नॅशनल कॉन्फरन्स आदी वीसपेक्षा जास्त पक्षांचे नेतेही त्या ‘व्रता’त सहभागी झालेले आहेत. आता भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले बनवारीलाल पुरोहित यांनी २००४च्या निवडणुकीत पराभव झाल्यावर (तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती!) मतदान यंत्रे मॅनेज होत असल्याचा आरोप करून केलेली आदळआपट आणि केलेली न्यायालयीन लढाई किमान पत्रकार तरी विसरलेले नाहीत!
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला ‘बंपर’ विजय मिळाल्यावर ते सर्व दावे सोयीस्करपणे विसरून तेच बनवारीलाल पुरोहित राज्यपालपदाच्या खुर्चीत विराजमान झाले आणि मतदान यंत्र मॅनेज होत असल्याचा आरोप त्यांनी रेशीमबागेतल्या बासनात गुंडाळून ठेवला, हे या राजकीय आकांडतांडवाचे वर्तमान आहे, हे विसरता येणार नाही.
निवडणूक म्हटल्यावर कुणाचा तरी जय आणि कुणाचा तरी पराजय होणारच. २०२४ची लोकसभा निवडणूक मात्र जय-पराजयापेक्षा घसरलेल्या उन्मादी प्रचारासाठी आणि नेत्यांचा उन्माद, असुसंस्कृतपणा आणि वाचाळपणासाठीही लक्षात राहील, हे काही चांगलं नाही...
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment