अजूनकाही
गेल्या आठवड्यात एक छोटी बातमी सर्व प्रमुख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली आणि पेल्यातील वादळाप्रमाणे दोन दिवसांतच विरून गेली, पण कित्येकांच्या मनात संशयाचे बीज पेरून गेली. बातमी छोटी असली तरी राष्ट्रीय स्तरावरील एका मोठ्या व्यक्तीच्या संदर्भात असल्याने विशेष महत्त्वाची आहे, म्हणून तिची दखल घेणे आवश्यक तर आहेच, पण त्या निमित्ताने आपल्या सुशिक्षित समाजाच्या एका वैगुण्याची प्रचिती पुन्हा एकदा आली याची नोंद करणेही आवश्यक आहे. त्याचे असे झाले...
दि. १ एप्रिलच्या सकाळी बातमी आली की, “नरेंद्र मोदी हे भारताचे तिसरे यशस्वी पंतप्रधान आहेत, असे रामचंद्र गुहा म्हणताहेत.” त्या बातमीचा विस्तार असा की, ‘जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांचेच नाव यशस्वी पंतप्रधान म्हणून घ्यावे लागेल.’ ही बातमी ऐकून जाणकारांच्या भुवया उंचावल्या. मोदींवर सातत्याने टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या तोंडून असे वक्तव्य आलेच कसे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला. त्यातील काहींनी तो दिवस १ एप्रिल असल्याने ‘एप्रिल फुल’ची गंमत म्हणून ती बातमी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिली. पण इतरांनी त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. प्रादेशिक भाषेतील प्रतिष्ठित वृत्तपत्रेही कधीकधी खोडसाळपणा करतात, म्हणून नामवंत इंग्रजी वृत्तपत्रांत ती बातमी शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तिथेही तशीच बातमी पाहिली, तेव्हा मात्र खळबळ माजली. काही लोकांनी ‘अरेरे, अखेर गुहांनीही नांगी टाकली; सतत सरकारवर व मोदींवर टीका करणाऱ्या गुहांनी व्यवस्थेशी जुळवून घ्यायचे ठरवलेले दिसतेय,’ अशी खंत व्यक्त केली. याउलट काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि ‘उशीरा का होईना गुहांना जाग आली, अखेर मोदीजींचे कर्तृत्व उमगले’ अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. उर्वरित लोकांना चिंता वाटली, कारण दोनच दिवस आधी ‘मला धमकीचे मेल येताहेत’ असे ट्विट गुहांनी केले होते. म्हणजे या उर्वरितांना वाटले की, ‘मोदी, शहा व केंद्र सरकारवर टीका कराल तर याद राखा’ या धमकीला गुहा घाबरले.
या तीनही प्रकारच्या प्रतिक्रिया इ-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक व फोन-एसएमएस यांच्याद्वारे १ व २ एप्रिल या दोन दिवसांत बऱ्याच फिरल्या. गुहांच्या विरोधकांकडून, समर्थकांकडून आणि परिघावरच्यांकडूनही! यातील काही प्रतिक्रिया साधनाकडे येणेही साहजिकच होते, कारण मागील चार वर्षे गुहा यांचा ‘कालपरवा’ हा पाक्षिक स्तंभ साधनातून नियमितपणे प्रसिद्ध होतो आहे. त्यामुळे काही हितचिंतकांनी असेही सुचवले की, ‘या वक्तव्यासंदर्भात त्यांचे काय म्हणणे आहे ते समजून घ्यावे.’ त्या हितचिंतकांना आम्ही एवढेच सांगितले की, ‘गुहांना विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मुळाशी जा, मागचे पुढचे संदर्भ जाणून घ्या आणि स्वस्थ व्हा!’ त्यांतील किती लोकांनी तसे केले हे कळले नाही, पण एवढे मात्र खरे की, चिंता व खंत व्यक्त करणार्या किंवा आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या बहुतेकांनी मुळाशी जाऊन वस्तुस्थिती समजून घेण्यापेक्षा तो विषय सोडून देणे पसंत केले असावे.
प्रत्यक्षात काय घडले, ते जरा तपासून पाहू. रामचंद्र गुहा यांचे ते भाषण दिल्लीत झाले, तो कार्यक्रम ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इंडिया समिट’ या तीन दिवशीय (२९, ३० व ३१ मार्च) चर्चासत्राचा एक भाग होता. भारताच्या स्वातंत्र्याला येत्या १५ ऑगस्टला ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने आयोजित केलेले ते चर्चासत्र होते. त्या भाषणात मागील ७० वर्षांच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीवर काही कवडसे टाकण्याचा प्रयत्न गुहांनी केला. त्यात एक मुद्दा आला आहे देशाच्या नेतृत्वाचा, म्हणजे पंतप्रधानांचा. त्यासंदर्भात विवेचन व भाष्य करताना गुहा म्हणतात, ‘पक्ष आणि सरकार यांच्यावर पकड किंवा हुकूमत आणि देशात सर्वत्र करिश्मा व अपिल या दोन निकषांवर विचार केला तर नेहरू व इंदिरा यांच्यानंतर मोदींचाच क्रम लागतो.’ म्हणजे भाषा, जात, प्रदेश यांची बंधने तोडून लोकप्रिय होणे/चर्चेत येणे, लोकांनी स्वीकारणे आणि पक्ष व सरकार यांच्यावर पकड असणे याबाबतीत नेहरू व इंदिरा यांच्यानंतर मोदींचेच नाव घ्यावे लागेल. म्हणजे या दोन निकषांवर यश मोजायचे असेल तर मोदी हे देशातील तिसरे यशस्वी पंतप्रधान आहेत.’ ही मूळ वाक्ये नीट समजून घेतली (जी वस्तुत: वृत्तपत्रांतील बातम्यांतही आली आहेत.) तर गुहांचे म्हणणे चिंताजनक वा खंत वाटावे असे नाही आणि कोणालाही आनंदाच्या उकळ्या फुटावे असेही नसून, केवळ वस्तुस्थिती सांगणारे आहे, असेच बहुतांश लोक मान्य करतील.
त्या दोन निकषांवर उर्वरित पंतप्रधानांकडे पाहिले तर काय दिसते? लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, चरणसिंग, राजीव गांधी, व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर, पी.व्ही.नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल, एच.डी. देवेगौडा, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग हे आपले उर्वरित अकरा पंतप्रधान. यातील सात पंतप्रधान पक्षावर पकड आणि देशभर अपिल या दोनही निकषांवर नेहरू-इंदिरा-मोदी यांच्या बरेच मागे आहेत, याबद्दल वाद होऊ शकत नाही. लोकप्रियता या निकषावर कदाचित वाजपेयी हे मोदींच्या पुढे होते असे म्हणता येईल, परंतु स्वत:च्या पक्षावर पकड किंवा हुकूमत याबाबत ते बरेच मागे होते. त्या दोन्ही निकषांवर राजीव गांधी कदाचित मोदींच्या जवळ जातील, असे म्हणून वाद-चर्चा होऊ शकेल. परंतु गुहांचेच मूळ वाक्य असे आहे की, ‘पक्षावर हुकूमत व देशभर अपिल या निकषांवर मोदी हे देशातील तिसरे यशस्वी पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, कदाचित ते स्थान त्यांनी मिळवले आहे.’ म्हणजे मोदींचा अद्याप उरलेला कालखंड पाहता आणि राजीव गांधींची लोकप्रियता ते पंतप्रधान झाल्यावर साडेतीन वर्षांनीच घसरणीला (बोफोर्स, शाहबानो इत्यादी प्रकरणामुळे) लागली होती, हे लक्षात घेता गुहांचे ते भाकित किंवा भाष्य धक्कादायक वा अनपेक्षित आहे असे म्हणताच येणार नाही.
येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, ‘लोकशाहीच्या संवर्धनाबाबत, धर्मनिरपेक्षतेच्या जपणुकीबाबत, देशातील अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या रक्षणाबाबत मोदी हे तिसरे यशस्वी पंतप्रधान आहेत,’ असे गुहा म्हणत नाहीत. एवढेच कशाला, आंतरराष्ट्रीय सामंजस्य किंवा परराष्ट्रीय संबंध व देशांतर्गत विकास याबाबत मोदींनी केलेल्या प्रयत्नांची बरीच चर्चा होत असली तरी, त्या दोन निकषांवर मोदी तिसरे यशस्वी पंतप्रधान आहेत, असेही गुहा म्हणत नाहीत. शिवाय, ज्या दोन निकषांबाबत गुहा बोलताहेत त्यातील पहिला निकष (पक्षावर पकड/हुकूमत) हा घटक एका मर्यादेनंतर अवगुणात रूपांतरित होतो आणि इंदिरा गांधी यांच्यावर लिहिताना-बोलताना गुहांनी तो घटक अवगुण म्हणूनच वापरला आहे. (नेहरूंची पक्षावरची पकड मात्र त्यांच्या त्याग, बुद्धिमत्ता व कर्तृत्वामुळे होती असा गुहांचा रोख राहिला आहे.) आणि २०१४ च्या लोकसभा निवडणूक निकालापासून मोदी व इंदिरा यांच्यातील काही साम्यस्थळे दाखवण्याचे काम अनेकांचा रोष पत्करूनही गुहा करीत आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला जात, भाषा, प्रदेश यांच्या सीमारेषा ओलांडून मोदी व इंदिरा यांचा करिश्मा किंवा मास अपिल का राहिले, याबाबत विवेचन करताना त्यांच्या सवंग लोकप्रियतेचा किंवा नाटकी वर्तनाचा उल्लेख गुहांनी अनेक वेळा केला आहे आणि त्यावरूनही स्वत:वर टीका ओढवून घेतली आहे. (अर्थात, मोदी व इंदिरा यांची गुहा करीत असलेली तुलनाही कितपत योग्य आहे, यावर जरूर वाद होऊ शकतो.)
अशा पार्श्वभूमीवर ती बातमी किंवा केवळ शीर्षक वाचून ‘गुहांनीही नांगी टाकली व व्यवस्थेशी जुळवून घेतले’ असे म्हणणारे उतावळेपणा करीत होते असे म्हणावे लागते. ‘गुहांना जाग आली आणि मोदींचे कर्तृव उमगले’ अशा गैरसमजात वावरणाऱ्यांचा आनंद अल्पकालीन ठरणार हे उघड आहे. आणि ‘धमकीचा मेल आला म्हणून गुहांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न करून मोदी स्तुती केली असावी’ अशी भाबडी समजून करून घेणाऱ्यांना एवढेच विचारता येईल की, कावळा बसला म्हणून फांदी मोडते काय? असो.
गुहांच्या त्या भाषणात खरी स्फोटक विधाने वेगळीच आहेत. १. हिंदू आणि इस्लाम हे असे दोन धर्म आहेत, ज्यांच्या धर्मग्रंथांत आणि प्रत्यक्ष व्यवहारातही स्त्रियांना अतिशय हीन लेखले आहे, वाईट वागणूक दिली आहे, कमालीची पिडा दिली आहे. २. मानवाने आतापर्यंत जे काही शोध लावले आहेत, त्यातील सर्वांत कठीण व त्रासदायक आणि सामाजिक धृवीकरण करणारा शोध म्हणून जातिव्यवस्थेचा उल्लेख करावा लागेल आणि आपण हिंदूंनी हा शोध लावलेला आहे. ३. विसाव्या शतकातील भारतावर बौद्धिक, सामाजिक, राजकीय या बाबतीत अधिक सखोल व व्यापक परिणाम (ऑक्सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांपेक्षा जास्त) ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेने केला आहे.
या तीन विधानांवर वाद-चर्चा करायची सोडून माध्यमांनी आणि त्यांना ‘फॉलो’ करणाऱ्यांनी गुहांच्या भलत्याच विधानावर राळ उडवून बौद्धिक खुजेपणाचे प्रदर्शन तेवढे घडवले आहे.
(साधना साप्ताहिकाच्या २२ एप्रिल २०१७च्या अंकामधून पूर्वपरवानगीसह पुनमुर्द्रित)
लेखक साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment