अजूनकाही
मतमतांतरांचा गलबला, प्रसारमाध्यमांची चवितचर्वणं, सोशल मीडियाचा धबधबा, साहित्याची चमकधमक, ओसंडलेल्या बाजारपेठा, गजबजलेले शॉपिंग मॉल्स, ओसंडून वाहणारी रेस्टॉरंटस आणि इंटरनेटपासून व्हॉटसअॅपपर्यंतची माध्यमं आपल्या पुढ्यात ओतत असलेला माहितीचा ढिगारा… हे आजचं आपल्या सर्वांचं वर्तमान जग आहे. घटना पाहता पाहता व्हायरल होतात, वस्तुस्थितीविषयी विविध दृष्टिकोन मांडले जातात, पण सत्याची एखाद-दुसरी बाजू समजून घेण्यासाठी मोठे प्रयास पडतात. माहितीच्या ढिगाऱ्यातून नेमकी घटना समजून घेणं अनेकदा शक्य होत नाही, ते झालं तर त्यातल्या वस्तुस्थितीविषयी नक्की कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे अनेकदा सामान्यांपासून सुशिक्षितांपर्यंत आणि बुद्धिजीवींपासून बुद्धिवाद्यांपर्यंत सर्वच जण गोंधळ, संभ्रम यांच्या आवर्तात सापडलेले दिसतात. गेल्या पंचवीस वर्षांत आपल्या गल्लीत, गावात, शहरात, राज्यात, देशात आणि जगात कितीतरी पटापट परिस्थिती बदलत गेली. काळाबरोबर धावू इच्छिणाऱ्यांचीही जिथं भंबेरी उडतेय तिथं काळाच्या बरंच मागे असलेल्यांचं काय होणार! व्यक्ती, संस्था, समाज, राज्य, देश आणि संबंध जगच स्थित्यंतरांच्या सोसाट्यात सापडलं आहे. तंत्रज्ञानाचा जनमानसावरील दबदबा वाढत चालला आहे. त्यामुळे या सोसाट्यात सामील न होण्याचा, त्याच्या कचाट्यात न सापडण्याचा पर्याय निदान सुशिक्षितांना तरी फारसा उरलेला नाही. काळाचा बेफाम वारू चौखूर उधळतो आहे आणि जगभरचा सुशिक्षित, बुद्धिजीवी मध्यमवर्ग त्यावर स्वार होऊ पाहतो आहे. जणू काही मध्यमवर्गाची रॅटरेस चालू आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था एखाद्या अभयारण्यात हरवल्यासारखी होते.
मुद्रित-इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि सोशल मीडिया हे समाजाचे आरसे असतात, कान-डोळे असतात आणि दिशादर्शकही. पण त्यांच्याही आवाक्यात येणार नाही, असं काय काय आपल्या आजूबाजूला सतत घडत राहतं. एकाची उकल होईपर्यंत नव्या दहा गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्यांची उकल होईपर्यंत अजून पन्नास गोष्टी घडून जातात. त्यामुळे कुठलीच गोष्ट पूर्णांशानं समजून घेता येत नाही. जणू काही साऱ्यांचाच संक्रमण काळ चालू आहे.
याचा अर्थ आपण कडेलोटाच्या टकमक टोकावर उभे आहोत असं नाही किंवा परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे असंही नाही. या सगळ्याकडे कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं, काय घेऊ नये, हे अधिकारवाणीने सांगणारे लोक आपल्यामध्ये नाहीत, असंही नाही. फक्त झालंय असं की, मागून पुढे आलेल्या लोकांनी सगळे बुरुज किल्ले काबीज केले आहेत. कारण इतिहासाचा, अस्मितांचा, स्व-उत्कर्षाचा समंध अनेकांना लपेटतो आहे. या समंधाच्या बाधेतून आपल्यासह इतरांनाही वाचवता आलं तर पाहावं, निदान त्याबाबत सजग करावं, या दृष्टिकोनातून ‘अक्षरनामा’ची रुजुवात केली आहे.
आश्वासनं, अभिवचनं, महत्त्वाकांक्षा, ध्येय, उद्दिष्टं यांच्या अर्थांमध्ये न अडकताही असं म्हणता येईल की, एक तारतम्यपूर्ण दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न इतकाच आमचा मानस आहे. आम्हाला कुणाच्या पुढे जायचं नाही की, कुणाशी स्पर्धाही करायची नाही. कशाचा न्यायनिवाडा करायचा नाही की, कुणाची उपेक्षा करायची नाही. आम्हीच तेवढे नि:पक्षपाती असा आमचा दावा नाही आणि आम्हीच तेवढे अग्रेसर अशी अहमअहमिकाही नाही. ‘वर्तमानकाळाविषयी सत्यापेक्षाही तारतम्यपूर्ण विवेक बाळगणं ही आपली जबाबदारी असते,’ असं व्हॉल्टेअर म्हणतो. ती आपल्यापरीनं निभावण्याचा आमचा प्रयत्न असेल.
राजकारणापासून समाजकारणापर्यंत, साहित्यापासून संस्कृतीपर्यंत, नाटकांपासून सिनेमांपर्यंत, पुस्तकांपासून ई-बुकपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत, अर्थकारणापासून अनर्थकारणापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, लोकलपासून ग्लोबलपर्यंत, फटाक्यांपासून धमाक्यांपर्यंत, फॅशनपासून पॅशनपर्यंत… प्रत्येक विषयाची घटना, वास्तव आणि सत्य या निकषांवर मांडणी करण्याची ‘अक्षरनामा’ची भूमिका असेल.
प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या शब्दांचा आधार घेत असं म्हणता येईल की, मतभेदांवर आमचा प्रामाणिक विश्वास आहे. अनेक माणसं नाइलाज म्हणून मतभेद सहन करतात, आमचं तसं नाही. आमच्यापेक्षा भिन्न भूमिकांविषयीही आम्हाला आस्था आहे. कारण वेगवेगळ्या बाजू मिळूनच कोणताही विचार पूर्णत्वाला जात असतो, ही आमची श्रद्धा आहे. भारतीय राज्यघटनेनं सर्वांना विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिलं असलं, तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आणि विचार म्हणजे व्यभिचार नव्हे! मतभेदांचं आम्हाला अगत्य राहील, फक्त त्यामागे सद्हेतू असावा; व्यक्ती, संस्था, पक्ष, वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा व्यापक समाजहित असावं. आधुनिक जगात सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांवर भारतीय राज्यघटना उभी आहे. या मूल्यांचं आपल्या परीनं रक्षण करणं हे ‘अक्षरनामा’चंही धोरण असेल.
‘अक्षरनामा’मध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आम्हाला त्यांच्या सूचना आवर्जून कळवाव्यात. प्रत्येक माध्यमाची काही सामर्थ्यं असतात, तशा काही मर्यादाही असतात. परंतु त्या मर्यादांवर मात करत स्वत:ची लवचीकता आणि आपल्या वाचकांची अभिरुची जोपासण्याचा आमचा प्रयत्न असेल. अर्थात, हे आव्हान आमची संपादकीय टीम मान्यवर लेखकांच्या बळावरच पेलू शकणार आहे. कारण कुठल्याही माध्यमाचा कस हा त्यासाठी लेखन करणाऱ्या लेखकांवर अवलंबून असतो आणि त्याचं यश हे वाचकांवर निर्भर असतं. त्यासाठी आम्हाला वाचकांच्या पाठबळाची नितांत निकडीची गरज आहे. ‘अक्षरनामा’च्या या टाहोमध्ये तुम्हीही सामील व्हा!
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment