​​​​​​​शिरोजीची बखर : प्रकरण १७ - ‘ओपिनियन पोल्स’ वगैरे बकवास प्रकार असतो सगळा. चार-पाच टक्के ‘फ्लोटिंग व्होटर्स’ असतात, ते निवडणूक ‘डिसाइड’ करतात!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 16 April 2024
  • संकीर्ण व्यंगनामा लोकशाही मतदान मतदार ओपिनियन पोल फ्लोटिंग व्होटर्स

२०२४ सालच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीची झिंग संपूर्ण भारतावर चढली. म्हणजे राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या सगळ्या भारतावर. हे लिहायचे कारण असे की, २०२४मध्ये जे तरुण-तरुणी अठरा ते एकवीस वर्षांचे होणार होते, त्यातील साठ टक्के मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवण्याचे कष्ट घेतलेले नव्हते. ही प्रजा त्या काळी इन्स्टाग्राम, रील्स वगैरे क्षुल्लक गोष्टींमध्ये मग्न होती. स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत होत्या आणि ही प्रजा अत्यंत बालिश गोष्टींमध्ये रस घेत होती. हीच गोष्ट अनेक प्रौढ नागरिकांबद्दलही खरी होती. या लोकांचा इतका त्रास शिरोजीला झाला की, त्याने शेवटी असे एक पात्र आपल्या बखरीमध्ये रेखाटले.

शिरोजीने ‘मोदीकालीन भारता’विषयीची आपली वेदना रोजनिशीमध्ये लिहून ठेवली आहे. त्यात त्याने इंग्रजी कवी विल्यम वर्ड्सवर्थच्या ओळी उदधृत केल्या आहेत-

‘Bliss it was in that dawn to be alive

But to be young was very heaven.’

(ती पहाट होताना फार मोठी धन्यता होती जिवंत असण्यात;

परंतु, तरुण असणे त्या पहाटे म्हणजे तर केवळ स्वर्ग होता साक्षात…)

फ्रेंच राज्यक्रांती होत असताना, लोकशाही तत्त्वे अंगडाई घेत असताना, जे वातावरण होते, त्याबद्दल वर्ड्सवर्थने या ओळी लिहिल्या आहेत. त्यापुढे शिरोजीने खाली लिहिले आहे - “जो समाज उदात्त तत्त्वांसाठी लढतो आहे, अशा समाजाची बखर लिहिता आली असती, तर मला खूप आवडले असते. परंतु नियतीने माझ्यावर लोकशाही तत्त्वे ज्या काळात अवनत होत जात आहेत, अशा काळाची बखर लिहिण्याची जबाबदारी टाकली आहे, याचा मला खेद होतो आहे.”

शिरोजी या काळाला ‘An age of self-engrossed intellectual dwarfs’ (आत्ममग्न आणि बौद्धिकदृष्ट्या खुज्या लोकांचा काळ) म्हणतो.

लोकशाहीसारखी ‘उदात्त तत्त्वे’ सोडून हुकूमशाहीची ‘गावठी स्वप्ने’ या काळातील ५२ टक्के लोकांना पडत होती. मोदीकालीन भारतातील अनेक सर्व्हे ५२ टक्के लोकांना लोकशाहीपेक्षा हुकूमशाही आवडत होती, असं दर्शवताना दिसतात.

असे असले तरी शिरोजी मन लावून आपले इतिहासलेखनाचे कर्तव्य करत होता. शेवटी त्या काळातील घटनांना तो स्वतः जबाबदार नव्हता. त्या काळात बौद्धिकदृष्ट्या सक्रीय असणे, ही त्याची नियती होती. आपल्या नियतीबद्दल कुरबूर करत बसण्याचा त्याचा स्वभाव नव्हता, परंतु फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात जे लोक जिवंत होते, त्यांचा त्याला निश्चितच हेवा वाटत होता, हे आपल्याला आज नाकारता येत नाही.

महात्मा गांधीजी, पंडित नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर अशा लोकांनी भारतात लोकशाही आणि घटना आणली. मोदीकालीन भारतात या नेत्यांची, लोकशाहीची आणि भारतीय घटनेची नृशंस बदनामी झाली.

नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्ष लोकशाहीची गळचेपी करण्यात आघाडीवर होता, याबाबत कोणतेही दुमत असू शकत नाही. परंतु गंमत अशी होती की, भाजपचे विरोधक स्वतःला जरी लोकशाहीचे रक्षणकर्ते म्हणवत होते, तरीही थोडे जवळ जाऊन पाहिले, तर जवळ जवळ सगळे विरोधी पक्ष आपल्या पक्षांच्या अंतर्गत हुकूमशाही राबवत होते. या विरोधकांना भारतात लोकशाही हवी होती, परंतु आपला स्वतःचा पक्ष मात्र हुकूमशाही तत्त्वांवर चालवायचा होता. आपली पक्षांतर्गत हुकूमशाही चालत राहावी, म्हणून या लोकांना भारतात लोकशाही हवी होती. परंतु तरीही ‘मोदीकालीन भारता’त अशी परिस्थिती आली होती की, या ‘परिवारवादी’ विरोधकांच्या मागे उभे राहण्यावाचून विचार करणाऱ्या कुणाही व्यक्तीला काहीही पर्याय उरलेला नव्हता.

अशा विचित्र परिस्थितीत शिरोजी सापडला होता. नरेंद्र मोदी, त्यांचे सहकारी आणि त्यांचे राजकीय विरोधक हे सारेच ‘तत्त्वज्ञानात्मक लिलिपुट’ होते. ‘भारतीय राजकारणाच्या उदात्त स्टेजवर एक कोता तमाशा मांडला गेला आहे’, असे शिरोजीने रोजनिशीमध्ये लिहून ठेवले आहे. आजच्या बाविसाव्या शतकाच्या चोविसाव्या सालातील वाचकाने शिरोजीच्या विनोदाला हसत असताना त्याच्या हृदयातील ही तगमग लक्षात ठेवली पाहिजे. असो.

शिरोजीच्या मनातील वेदनेचा हुंकार वाचकांच्या समोर ठेवून आम्ही शिरोजीच्या वाचकांच्या समोर त्याचा विनोद ठेवत आहोत.

आजच्या बाविसाव्या शतकातील भारतात ही हुकूमशाही तत्त्वे संपूर्णपणे गाडली गेली आहेत. आज बाविसाव्या शतकात धर्म-जात अशा कुठल्याही तत्त्वावर मतं मागायचा प्रयत्न जरी झाला, तरी निवडणूक आयोगाकडून त्या उमेदवाराची उमेदवारी तडकाफडकी रद्द होते. आजच्या भारतात राजकीय विरोधकांना ‘देशद्रोही’ वगैरे विशेषणे लावणे कायद्याने अशक्य करून ठेवले आहे. ‘देशभक्ती’ हा कुणा एका विचारसरणीचा अथवा पक्षाचा ठेका नाही, हे संपूर्ण भारताने आज मान्य केले आहे. आज कुणी उमेदवार अशी भाषा वापरायला लागला, तर आज अशा उमेदवाराचे ‘डिपॉझिट’ जप्त होताना दिसते. ‘मोदीकालीन भारता’तील वाह्यात वातावरणापासून आपण फार पुढे आलेलो आहोत. ‘अंधभक्त’ अशी जमात ‘मोदीकालीन भारता’त अस्तित्वात होती, यावर आज विश्वास ठेवणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. असो.

या बखरीमध्ये शिरोजीने एक नवीन पात्र निर्मिले आहे, हे आम्ही आवर्जून पुन्हा एकदा सांगत आहोत. त्याचे नाव आहे ‘निशिगंध’. या माणसाला राजकारणाचा कणभरसुद्धा गंध नाही. निशी ‘अ-पोलिटिकल’ आहे. भारतभर एक खूप मोठा वर्ग होता, ज्याला राजकारणात काडीचा रस नव्हता. निशी त्या वर्गाचा प्रतिनिधी आहे. निशी ‘अ-पोलिटिकल’ आहे, याचा अर्थ तो असंवेदनशील आहे असे नाही. तो हुशार आहे आणि आनंदी आहे. कित्येक वेळा असे वाटत राहते की, बखरीतील इतर पात्रांपेक्षा निशीनेच मानवी आयुष्य आणि भारत देश या दोन्ही गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने ओळखल्या आहेत की काय? ‘पोलिटिकल’ वातावरणात ‘अ-पोलिटीकल’ निशी फार धमाल उडवून देतो.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लोकसभेच्या निवडणुका २०२४च्या मार्च महिन्यात जाहीर झाल्या आणि मोदीभक्त आणि विरोधक यांच्यात घमासान सुरू झाली. मोदीजींच्या दहा वर्षांच्या कालात भारताने प्रगती केली की अधोगती, यावर भयंकर त्वेषाने चर्चा सुरू झाली.

मोदीभक्त म्हणत होते की, भारताने ‘सर्वांगीण प्रगती’ केली तर विरोधक म्हणत होते की, भारताची ‘सर्वंकष अधोगती’ झाली.

मोदीकालीन भारतात इंग्लंड-अमेरिकेसारख्या देशांत भारताचे ‘प्रेस्टीज’ वाढले, भारताच्या ‘पासपोर्ट’चा मान वाढला, अशा गोष्टी व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीत रोज वाचायला मिळत होत्या. लोकसभेच्या निवडणुका जसजशा दिवसा-दिवसाने जवळ येत होत्या, तसतसा ‘मोदीभक्ती’चा ज्वर वाढत होता.

पांडेजींच्या ठेल्यावर आज मोठी मैफल जमली होती. नाना तर आज ऐन उकाड्यात ब्लेझर घालून त्यांच्या ऑडी Q7मधून आले होते. त्या गाडीच्या थंड एसीमध्ये त्यांना ब्लेझर गोड लागत होता. नानांच्या गोऱ्यापान तनुवर तो अतिशय गोड दिसतही होता. देशाचे पंतप्रधान स्वतः भारी भारी कपडे, चष्मे, गॉगल, पेन्स वापरत होते. त्यांच्या एका एका घड्याळाची किंमत काहीच्या काही लाख रुपयांत असे. गॉगल चार चार लाख रुपयांचे असत. मोदीजी या जगातील सगळ्यात ‘स्टायलिश राष्ट्रप्रमुख’ होते.

देशातील गरिबीची आठवण राहावी म्हणून गांधीजी एकच वस्त्र पेहनून राहिले. आज त्या काळापासून भारत आज फार फार पुढे आला होता. सिनेनटांनाही परवडणार नाही, अशी रहन-सहन राजकीय पुढाऱ्यांची झाली होती. नानांचा ब्लेझर हा याच संस्कृतीचा परिपाक होता. खरं तर नानांनी सगळे आयुष्य खस्ता काढत काढले, हवाई चप्पल घालून काढले. आपल्या विचारसरणीसाठी त्यांनी गरिबी सोसली होती, ही गोष्ट सगळ्या दुनियेने आदराने पाहिली होती. त्यांची आताची भ्रष्ट श्रीमंती तीच दुनिया हैराण होऊन पाहत होती.

(तत्त्वनिष्ठ नानांनी मोदीकालीन भारतात आपली सरकारी पक्षाशी असलेली जवळीक वापरून मंत्रालयात नाही नाही ती कामे करवून घेतली आणि संपत्ती जमवली, अशी चर्चा पुण्याच्या सदाशिव पेठेत सुरू असल्याचे आम्ही पूर्वी वाचकांना सांगितलेलेच आहे. - संपादक) 

नानांना ब्लेझरमध्ये अस्वस्थ होऊ लागले. उकाडाच तसा होता. नानांच्या मुलीने ऑस्ट्रेलिया वरून ‘चार्ल्स ट्रायव्हिट प्रॉपर’ या ब्लेझरच्या जगप्रसिद्ध ब्रँडचा ब्लेझर त्यांच्यासाठी पाठवला होता. चाळीस हजार रुपयांचा ब्लेझर होता तो. हा ब्लेझरचा जगातला सगळ्यात प्रसिद्ध ब्रँड आहे, हे भिकारड्या ‘लिबरल’ लोकांना माहीतही नसणार, ही खंत नानांना वाटत होती. ते मनातून त्यांची दया करत होते. फारच उकडायला लागले, तेव्हा नानांनी आपल्या पांढरे कपडे घातलेल्या ड्रायव्हरला बोलवले आणि ब्लेझर गाडीमध्ये नीट हँगरला अडकवून ठेव, असे सगळ्यांना नीट ऐकू जाईल, अशा मोठ्या आवाजात सांगितले. ऐन उन्हाळ्यात इतका श्रीमंती ब्लेझरसुद्धा गर्मी तयार करतो, हे नानांना आवडले नव्हते.

समर - मोदी आल्यापासून भ्रष्टाचार फार वाढला आहे.

(यावर नाना कावरेबावरे झालेले दिसले. पैसा केला होता, तरी नाना अजून पुरेसे निर्ढावले नव्हते. - संपादक )

अविनाश - तुला कुठे दिसला रे भ्रष्टाचार?

भास्कर – अरे, तुम्ही ‘इलेक्टोरल बाँड’ घेऊन ईडीच्या आणि सीबीआयच्या केसेस बंद केल्यात, बाँड घेऊन कंपन्यांना मोठी मोठी कंत्राटं दिली आहेत. अजून काय दिसायचाय भ्रष्टाचार? नुसताच दिसत नाहिये, वाससुद्धा येतोय भारतभर भ्रष्टाचाराचा!

समर - कुबट्ट् वास येतोय.

अविनाश - भारतात औषधालासुद्धा भ्रष्टाचार उरला नाहिये. बघ सगळीकडे कसं स्वच्छ वातावरण आहे.

पांडेजी - (नानांची अवस्थता बघून) अरे, छोड दीजिए वो बातें. लास्ट टाईम उसी विषयपर बहस हुई थी!

भास्कर - जो सामने दिखता हैं उसी पे बहस होनी चाहिए पांडेजी.

पांडेजी - आज ये बहस छोड दीजिए. नानाजी के लिए! कितने इत्मिनानसे बैठें हैं देखिए नानाजी. कितने मुतमईन लग रहें हैं!

अविनाश - आदरणीय नानांबद्दल घाणेरडे शब्द नका वापरू पांडेजी. सांगून ठेवतोय तुम्हाला.

पांडेजी - क्या गलत बोले हैं हम?

अविनाश - नानांबद्दल ‘मुतमईन’ हा शब्द का वापरला तुम्ही?

पांडेजी - मुतमईन म्हणजे आरामसे बैठा हुआ, रिलॅक्स्ड! इसमें बुरा क्या हैं?

अविनाश - किती घाणेरडा आहे हा शब्द. त्याचा अर्थ असेल चांगला, पण उच्चार किती बेकार आहे. ‘मुतमईन’ म्हणे!

(इतक्यात पांडेजींचा मित्र निशी येतो.)

पांडेजी - आइए आइए निशीजी. (इतरांकडे बघत) आप हैं निशीजी! हमारे परमप्रिय मित्र.

अविनाश - हम नहीं हैं निशीजी! ये होंगे निशीजी. हम अविनाश हैं!

भास्कर - (हसत) अरे, तेच निशीजी आहेत.

अविनाश - अरे भास्कर, आत्ता पांडेजी माझ्याकडे बघत म्हणाले की, आप हैं निशीजी.

समर - (हसत) अरे, हिंदीमध्ये बोलताना ज्याची ओळख करून द्यायची असते, त्याच्याकडे बघत नाहीत. ज्याला ओळख करून द्यायची असते त्याच्याकडे बघतात.

अविनाश - पण ते मला म्हणाले आप हैं निशीजी!

भास्कर - तसंच म्हणायची पद्धत आहे हिंदीमध्ये. टीव्हीवर कशी ओळख करून देतात बघितलं नाहीस का? आपल्या शेजारी बसलेल्या पत्रकाराची प्रेक्षकांना ओळख करून द्यायची असेल, तर अँकर लोक प्रेक्षकांकडे बघतात आणि म्हणतात- ‘आप हैं प्रसिद्ध पत्रकार!’.

अविनाश - असं का करतात पण हिंदीमध्ये?

भास्कर - मला काय माहिती?

निशी - (हसत) उद्या मोदीजींशी राहुल गांधीजींची ओळख करून द्यायची असेल, तर म्हणतील - मोदीजी, आप हैं राहुलजी गांधीजी.

(भास्कर, समर, पांडेजी आणि अच्युत हसतात)

अविनाश - (प्रचंड संतापत) तुम्ही जे कोणी असाल ते गप्प बसा. मोदीजींना राहुल गांधी म्हणताय!

(भास्कर आणि समर जोरात हसतात)

नाना - राहुलजी गांधीजी म्हणतायत.

निशी - काही चुकलं का माझं?

अविनाश - कुणालाही जी लावताय तुम्ही!

निशी - ओह सॉरी! पण चांगला माणूस आहे तो. स्वभावानं गोड आहे. कमालीचा ‘फिट’ आहे.

अविनाश - पांडेजी अहो काहीही काय बोलतोय तुमचा मित्र?

पांडेजी - वो ऐसेही बोल रहें हैं. उनको कोई रुची नही हैं सियासत में.

अविनाश - ऐसा कैसा हो सकता हैं? मोदीजी एवढं काम कर रहें हैं, देश के लिए और इनको रुची नहीं हैं राजकारण में? 

पांडेजी - नहीं.

निशी - हमें राहुलजी का ‘फिटनेस’ बहुत भाता हैं! तीन तीन हजार किलोमीटर पैदल चलता हैं ये आदमी, सौ सौ पुश-अप्स कर सकता हैं, समुंदर में अकेला कूदता हैं. क्लास-अपार्ट हैं उनका ‘फिटनेस’.

अविनाश - मोदीजी भी गए थे समुंदर में.

निशी - वो क्या कूदना था समुंदर में? नेव्ही के तीन तीन डायव्हर साथ थे मोदीजी के.

अविनाश - कुछ भी मत बोलिए! तीन नहीं थे डायव्हर्स. दो ही डायव्हर्स थे उनके साथ.

निशी - राहुलजी के साथ कोई नहीं था!

नाना - मोदीजी राहुलसे फिट हैं. योगा करते हैं मोदीजी.

निशी - मोदी एक सौ पुश-अप कर सकते हैं क्या?

नाना - योगा करनेवाले को पुश-अपकी जरूरत नहीं होती हैं.

अविनाश - पुश-अप वाला ‘योगा’ नाही कर सकता हैं.

निशी - राहुलजी ‘योगा’ भी करते हैं.

समर - विपश्चनाभी करते हैं.

अविनाश - तुम चुप बैठो. तुमको और उस पप्पू को कुछ नहीं आता.

पांडेजी - जाने दीजिए! मोदीजी राहुल से ‘फिट’ हैं, मानते हैं हम आपकी बात.

अविनाश - माननीही पडेगी. मोदीजी चोवीस चोवीस तास काम करते हैं कुर्सीपर बैठ के! अलग ही ‘फिटनेस’ हैं उनका. राहुल समुंदर में अकेला कूदता होगा, मगर अगर वो मोदीजी के कुर्सीपर बैठा तो पाच मिनिट में गिर जाएगा.

भास्कर - बघू आपण. या वेळेस राहुलच जिंकणार आहे तेव्हा कळेलच!

अविनाश - शक्य नाही. इस बार चारसौ पार हैं मोदीजी.

समर - अरे मोदीजींची थाप आहे ही. दक्षिणेच्या दीडशे सीट्समध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाहिये. ५४०मधल्या दीडशे गेल्या म्हणजे राहिल्या तीनशे नव्वद. त्या सगळ्याच्या सगळ्या मिळाल्या तरी शक्य नाही चारसौ पार.

अविनाश - तू गप! एवढे सगळे ‘ओपिनियन पोल्स’ म्हणतायत त्याला काही अर्थ असेलच की नाही?

नाना - भाजपला या वेळेला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतायत. लक्षात घ्या.

(२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या ‘ओपिनियन पोल्स’मध्ये भाजपला ५० टक्के मतं मिळतील, असा अंदाज बहुतेक ‘ओपिनियन पोल्स’नी वर्तवला होता - संपादक)

भास्कर - पन्नास टक्के मतं एकदाच मिळाली होती भारतात. इंदिरा गांधींची हत्या झाली, तेव्हाच्या ‘सिंपथी वेव्ह’मध्ये काँग्रेसला पन्नास टक्के मतं मिळाली होती.

अविनाश - पन्नास टक्के मतं मिळाली की, ४०० जागा मिळतात. काँग्रेसला तेव्हा ४०५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी मोदीजींना मिळणार आहेत!

भास्कर - ती परिस्थितीच वेगळी होती.

अविनाश – त्या वेळी फक्त इंदिरा गांधी गेल्या होत्या, या वेळी स्वतः ‘रामलला’ आलेले आहेत.

नाना - (गालातल्या गालात हसत) बघू आपण. दीड महिना चालणार आहे इलेक्शन!

समर - गेल्या वेळी पुलवामा झालं. त्यामुळे तुमच्या पन्नास-साठ जागा वाढल्या आणि तुम्ही ३०३वर गेलात. नाहीतर तेव्हाच २२०वर आला असता तुम्ही. तेव्हाच आटोपला असता तुमचा कारभार!

(एकोणीस सालच्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना पुलवामा या काश्मीरमधील गावाजवळ अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन चाललेल्या गाड्यांच्या काफिल्यावर बॉम्बहल्ला केला. त्यात चाळीस जवान शहीद झाले. त्या नंतर पाकिस्तान या अतिरेक्यांना मदत करते, हे कारण देऊन मोदीजींनी पाक-व्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. म्हणून मग पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या हद्दीत येऊन हल्ला केला. दोन दिवसांनी दोन्ही देश शांत झाले, पण या पार्श्वभूमीवर ‘भारताने पाकिस्तानला करारा जबाब दिला’, अशी भावना तयार होऊन मोदीजींना लोकसभेच्या निवडणुकीत फायदा झाला आणि ते पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा निवडून आले. - संपादक)  

भास्कर - हे बघ, पुलवामा-बालाकोट झालं, तरी तीनशेलाच पोहोचलात तुम्ही, चारशेला नाही. आता कुठला पुलवामा येणार आहे मदतीला तुमच्या?

समर - अजून शंभर जागा कुठून येणार आहेत तुम्हाला?

अविनाश - येणार नाही, आल्या आहेत त्या जागा. प्रत्येक ‘ओपिनियन पोल’मध्ये भाजपला पन्नास टक्क्यांच्या वर मतं आहेत.

नाना - शिवाय हिंदुत्व आहे. लोकांना भारत ‘हिंदुराष्ट्र’ झालेला हवा आहे.

भास्कर - काल सीएसडीएसचा पोल आला आहे. भरतातल्या फक्त ८ टक्के लोकांना ‘हिंदुराष्ट्र’ हवं आहे. ७८ टक्के लोकांना भारत हा अनेक धर्म असलेल्या लोकांचा देश आहे असं वाटतंय.

अविनाश - मूर्ख आहे तो सर्व्हे.

नाना - राममंदिर हा किती मोठा विषय आहे भारतीय मनासाठी, हे माहीत नाहिये तुम्हाला.

अविनाश - पाचशे वर्षांची गुलामी संपली राममंदिरामुळे.

भास्कर - लोकांना तसं वाटत नाहिये पण. 

समर - राममंदिर हा मुद्दा फक्त आठ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटतोय.

अविनाश - खड्ड्यात गेला तुझा तो सर्व्हे. तो सर्व्हे म्हणजे काही भारत नाहिये.

भास्कर - मग काय तुझ्या मोदीजीला चारशे सीट्स मिळणार म्हणतायत, ते पोल्स म्हणजे भारत आहे का?

अविनाश - तू गप!

निशी - मला काय वाटतं सांगू का?

भास्कर - सांगा की!

निशी - हे ‘ओपिनियन पोल्स’ वगैरे बकवास प्रकार असतो सगळा. खरं तर भारतात चार-पाच टक्के ‘फ्लोटिंग व्होटर्स’ असतात ते निवडणूक ‘डिसाइड’ करतात.

अविनाश - कसले ‘फ्लोटिंग व्होटर्स’?

निशी - या लोकांचं काहीही ठरलेलं नसतं. शेवटच्या दोन-तीन दिवसांत हे निर्णय घेतात कुणाला मत टाकायचं ते. या लोकांचा अंदाज कुठल्याच ‘ओपिनियन पोल’वाल्यांना येत नाही.

नाना - मोदीजींना माहीत नसेल का हे? ते काढतील काहीतरी गुंडी शोधून या ‘फ्लोटिंग व्होटर्स’वर.

अविनाश - ही इज द बॉस!

निशी - या ‘फ्लोटिंग व्होटर्स’ना काही घेणं-देणं नसतं कुणाबद्दल. मोदी नाही अन् बिदी नाही.

अविनाश - मोदीजी म्हणा. मोदीबिदी काय?

निशी - मला मनापासून वाटलं तर जरूर आदर देईन मी मोदीजींना.

अविनाश - तुम्ही ‘लिब्रांडू’ आहात का?

निशी - मी कुणीच नाहिये. भक्त नाहिये आणि लिबरल पण नाहिये.

नाना - (छद्मीपणे) तुम्हाला मोदीजींबद्दल आदर नाहिये, म्हणजे तुम्हाला नेहरूंबद्दल आदर असेल नाही का?

निशी - अजिबात नाही. नेहरू बहुत पुरानी चीज हो गई हैं. जो माणूस जिवंत नाही, त्याचा विचार करत नाही मी. (स्वतःशीच जोरात हसतो).

समर - फारच फ्रेश जीवनदृष्टी आहे तुमची.

निशी - आय लाईक टू कीप थिंग्ज सिंपल. मेलेल्या माणसांबद्दल विचार करत बसायचं म्हणजे लाईफ किती कॉम्प्लिकेट होत जातं?

भास्कर - वा वा, क्या बात हैं!

पांडेजी - एक अलगही हस्ती हैं हमारे निशीजी!

अविनाश - काही अलग वगैरे काही नाही. ‘लिब्रांडू’ आहे हा माणूस.

नाना - हा माणूस फार विचित्र आहे. मोदीजी नाही, नेहरू नाही. मग काय मानता काय तुम्ही?

निशी - मला जे वाटत असतं, ते मानतो मी.

अविनाश - म्हणजे?

निशी - आधी काही ठरवायचं नाही. निर्णय घ्यायच्या क्षणी जे मनात येईल ते करायचं.

नाना - चौदा साली तुम्ही कुणाला मत दिलं होतं?

निशी - मोदीजीला.

नाना - का?

निशी - मला, प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देण्याची थाप आवडली होती.

भास्कर - (जोरात हसतो)

निशी - ही थाप सुचणंच अवघड आहे कुणाला. भारताची एकूण संपत्ती तीस लाख कोटी असताना तीस लाख कोटी वाटायची आयडिया सुचणंच ‘ग्रेट’ होतं!

अच्युत - मोदीजींनी फार मोठी थाप मारली ती!

निशी - एकोणीस साली मी राहुलला मत द्यायला निघालो होतो, तेव्हा त्यानं दाढी चांगली वाढवली होती. पण मग मनात म्हणालो मोदीजींना अजून एक चान्स दिला पाहिजे.

भास्कर - या वेळी कुणाला?

निशी - या वेळी राहुलला! पुश अप चांगले मारतो.

अविनाश - अतिशय नॉन-सीरियस आहात तुम्ही. मतदानाच्या पवित्र कर्तव्याची चेष्टा केली आहे तुम्ही.

निशी - हे बघा माझं मत आहे, मी कसंही देईन.

अविनाश - मत देणं हे पवित्र कर्तव्य आहे.

निशी - देतो आहे ना मी मत!

अविनाश – खरं तर, मोदीजींना मत देणं हे पवित्र कर्तव्य आहे!

निशी – सॉरी, मला नाही तसं वाटत. मला ज्याला वाटतं, त्याला मत देणं, हे पवित्र कर्तव्य आहे.

अविनाश - राहुल गांधी पुश अप मारतो म्हणून तुम्ही मत देता.

निशी - २०१४ साली मोदीने थापा मारल्या म्हणूनसुद्धा मी मत दिलं होतं!

(भास्कर, समर, पांडेजी आणि अच्युत असे सगळे हसतात)

अविनाश - (चिडून) तुम्ही काहीही विचार करताय मत देताना. तुमचं नागरिकत्व रद्द केलं पाहिजे.

भास्कर - काय विचार करून मत द्यायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

भास्कर - माझ्या एका मित्राची बायको आहे. ते राहतात त्या चौकात कचरा जरा जास्त वाटला म्हणून ती २०१४ साली म्हणाली या वेळी मनमोहनसिंग कट. आता अजूनही कचरा पडतोय, तिथं म्हणून ती म्हणाली या वेळी मोदी कट!

अविनाश - चौकातल्या कचऱ्याचा आणि पंतप्रधानांचा काय संबंध? त्याला काय तेवढाच उद्योग आहे का?

नाना - अशा लोकांमुळे काही फरक नाही पडत निवडणुकीत.

भास्कर – अहो, असे चार-पाच टक्के लोक असतात. फार मोठा आहे हा आकडा. इलेक्शन फिरवायला खूप मोठा आहे.

अविनाश - काहीही हं भास्कर!

भास्कर – अरे, असं काय करतो आहेस? एकोणीस साली भाजपच्या ४४ जागा पन्नास हजारपेक्षा कमी मार्जिनने निवडून आल्या होत्या, आणि ७७ जागा एक लाखापेक्षा कमी मार्जिननं.

अविनाश - मग?

भास्कर - आज भारतातल्या लोकसभेच्या मतदारसंघात १२ लाख मतदार असतात साधारणपणे. त्यातले साधारण सहा लाख मतदान करतात. त्याच्या दहा टक्के किती झाले?

अच्युत - साठ हजार

भास्कर - म्हणजे फ्लोटिंगवाले झाले तीस हजार. हे लोक फिरले, तर त्या ४४ जागा जातात. कारण तीस हजार मतं गेली, तर जी जागा पन्नास हजारांनी आली, ती दहा हजारांनी जाणार.

समर - कारण भाजपकडून गेलेली मतं विरोधकांना मिळणार.

भास्कर - यात गेल्या दहा वर्षांत नाराज झालेले अजून वीस हजार विरोधकांकडं आले, तर एक लाखच्या खालच्या मार्जिनवाल्या जागापण गोत्यात येतात.

पांडेजी - त्यात दहा-पंधरा हजार लोक दर वेळी भाकरी उलटायची वेळ झाली, असं म्हणून ‘बाय डिफॉल्ट’ विरोधी पक्षाला मत देणारे असतात.

भास्कर - म्हणजे सव्वा लाखाने जिंकलेल्या जागासुद्धा गेल्या.

समर - भाजपच्या तीनशे तीन जागा होत्या गेल्या वेळी. त्यातल्या शंभर जरी गेल्या तरी भाजप २०३वर येणार.

अविनाश - काहीतरी बोलू नकोस.

भास्कर - भारतात एक मजा आहे. दहा नवऱ्यांनी मत बदललं की, किमान पाच बायका तरी नवरा म्हणेल त्याला मत देतात.

समर - म्हणजे भाजपने दीड लाखाने जिंकलेल्या जागासुद्धा गोत्यात येतात.

निशी - मला मोदीजी हरले तर बरं वाटेल.

अविनाश - मोदीजींनी काय घोडं मारलं आहे तुझं?

निशी - काही नाही. मला नवीन चेहरा हवा आहे पंतप्रधान म्हणून.

अविनाश - काय बोलतोस काय तू? एवढा तेजःपुंज पंतप्रधान नको आहे तुला?

निशी - मला ते तेज-बीज काही कळत नाही. वेगळा माणूस हवा आहे मला आता.

अविनाश - का?

निशी - मला वाटतंय म्हणून.

अविनाश - मोदीजी अजून पंधरा वर्षं राहणार आहेत पंतप्रधान म्हणून.

निशी - बाप रे!

भास्कर - घाबरू नकोस निशी, या वर्षीच विसर्जन होणार आहे तेजःपुंज नेताजींचं.

अविनाश - मोदीजी हरले तर भारतात मुसलमान लोकांचं राज्य येईल, अशी भीती नाही वाटत?

भास्कर - मोदीजी राहिले तर भारतात हुकूमशाही येईल असं वाटतंय त्याला.

निशी - इतक्या पुढचा विचार का करताय तुम्ही दोघंही? सध्या चांगलं चाललंय ना? एन्जॉय युवर लाईफ!

नाना - असे लोक असतील, तर परमेश्वराने ठरवलं तरी तो वाचवू शकणार नाही भारताला?

अच्युत - निशी, फार इंटरेस्टिंग आहात तुम्ही. मुसलमानी राज्य किंवा हुकूमशाही येण्याचा विचार खरंच का करावासा वाटत नाही तुम्हाला?

 निशी - खरं सांगू का? तसं काही होईल यावर विश्वासच नाहिये माझा. भारत आहे असाच राहील कायम असं वाटतं मला.

भास्कर - निशीसारखे लोक फिरले तर उत्तर प्रदेशमध्येच चाळीस जागा जातील भाजपच्या.

पांडेजी - वो कैसे?

भास्कर - वहाँ ‘ओपिनियन पोल्स’ भाजप को पचास परसेंट व्होट दिखा रहें हैं और सपा-काँग्रेस को मिलकर ४०. निशी जैसे लोगों के पाच परसेंट भाजप से खिसक जाते हैं, तो दोनो ४५ परसेंटपर आ जाएंगे.

समर - च्यायला उत्तर प्रदेशमध्ये चाळीस जागा गेल्या, तर मोदीजी १६०वरच येतील.

अविनाश - (एकदम) गप बस! मूर्ख माणूस!

भास्कर – उत्तर परदेशमध्ये चाळीस जागा गेल्या, तर मोदीजी १६०वर येतील, असं का वाटतंय तुला?

समर – अरे, ज्या राज्यात राममंदिर झालंय, तिथंच त्या राज्यातल्या ८० पैकी ४० जाणार असतील, तर बाकीच्या राज्यांमध्ये मिळून १०० नाही का जाणार? तीनशेमधून १४० गेल्यावर किती उरतात?

निशी - खरं सांगू का? पेट्रोल पाचशे रुपये झालं, दूध ३०० झालं आणि गॅस सिलिंडर ३००० झाला, तरी आम्ही मोदीजींनाच मत देणार, असं म्हणणारा फक्त १२ टक्के ‘व्होटर’ आहे भाजपचा. अगदी कमिटेड. एवढ्या मतांवर फार तर १२० जागा येतात. १२०वर तर भाजप कधीही येऊ शकतो. त्याच्याखाली मात्र आणता येणार नाही मोदीजींना.

अविनाश - (उठत) नाना चला, या मूर्ख लोकांच्यात बसायला नको आपण.

नाना - (गालात हसत) बस अविनाश. यांना बोलू दे. यू-ट्यूबवरचे व्हिडिओ बघून बोलतायत हे लोक.

अच्युत – हो, यू-ट्यूबवर खूप चर्चा चालू आहे मोदीजी २०० ते २२०वर येणार म्हणून.

नाना - ते यू-ट्यूब चॅनेलवाले लबाड आहेत. त्यांना माहिती आहेत की, या देशातल्या ‘लिब्रांडू’ लोकांना मोदीजी पडलेले हवे आहेत म्हणून. पन्नासेक लाख लोक असतील असे ‘लिब्रांडू’. मोदी पडणार म्हटलं की, ही सगळी गाढवं बघायला जातात ते यू-ट्यूब चॅनेल. लाख लाख व्ह्यूज येतात त्यांना या गाढवांमुळे. दोन दमड्या मिळून जातात मोदीजी पडणार म्हणणाऱ्या लबाडांना.

अविनाश - ते चॅनेल बघून नाचायला लागलेत हो हे लोक? पण शेवटी आयेगा तो मोदीजीही! (हुहुहु)

नाना - चौदा साली हेच झालं, एकोणीस साली हेच झालं आणि आता चोवीस साली हेच होणार आहे.

भास्कर - समर हे लोक ‘गोदी मीडिया’ बघून बडबड करत बसतात. चारसौ पार आणि पांचसौ पार! खरं तर गेल्या वेळीच विसर्जन व्हायचे, पण पुलवामाने वाचवले. ‘फ्ल्यूक होता’ एकोणीसचा!

अविनाश – या वेळी मोदीजी पाकव्याप्त काश्मीर घेतील, अचानक निवडणूक मध्यावर आलेली असताना! (हु हु हु)

भास्कर - ते काय ढोकळा खाण्याएवढं सोपं आहे का?

समर - पाकिस्तान आणि चीनकडे अणुबॉम्ब आहेत माहीत आहेत ना?

अविनाश - एक मोदी अणुबॉम्बपर भारी! मोदीजी सपकन घेऊन टाकतील पीओके. बॉम्ब टाकायला वेळच नाही मिळणार त्यांना.

भास्कर - (हसत) वय काय आहे तुझं?

समर - सगळ्या ‘मोदीभक्तां’चं राजकीय वय सातच्या खाली असतं.

अविनाश - अरे मूर्ख माणसा, जरा विचार कर. एकदम घेऊन टाकला मोदीजींनी ‘पाकव्याप्त’ काश्मीर, तर नंतर आता अणुबॉम्ब टाकून काय उपयोग, असा विचार करणार नाहीत का पाकिस्तान आणि चीन? काय खायचं काम आहे का अणुबॉम्ब टाकणं म्हणजे?

भास्कर - धन्य हो अविनाश तुम और धन्य हैं वो मोदीजी!

अविनाश - आणि घेतलं मोदीजींनी पीओके तर काय देशील?

भास्कर - एक सेव्हन स्टार हॉटेल बांधून देईन मी तुला पीओकेमध्ये पाच हजार खोल्यांचं.

(समर, पांडेजी अच्युत आणि निशी फिदीफिदी हसतात).

अविनाश - देवा कशाला मोदीजींना जन्म दिलायस या मूर्ख लोकांच्या देशात. किंमत नाहिये कुणाला त्या महात्म्याची!

समर - मूर्ख नसते तर कसे निवडून आले असते मोदीजी?

अविनाश - तू गप!

नाना - अगदी पाकव्याप्त काश्मीर नाही घेतलं मोदीजींनी, तरी काही महत्त्वाच्या ‘टेररिस्ट’ना तरी मारतील मोदीजी पाकिस्तानात घुसून! सय्यद सलाहउद्दीन आहे, जकी-उर-रहमान लखवी आहे आणि मसूद अजहर आहे. या तीन विकेट तरी काढणारच मोदीजी पाकिस्तानात घुसून!

अविनाश - (मधलं बोट नाचवत) मग काय करतील तुमचे ‘फ्लोटिंग व्होटर्स’?

भास्कर - तुम्हाला वाटतंय की, खूप फरक पडेल, पण आता मोदीजींवर विश्वास उरला नाहिये लोकांचा. लोक म्हणतील खोटं खोटं उठवून दिलं आहे नेहमीप्रमाणे.

नाना - खरं की खोटं ठरायलाच एक महिना जातो. तोपर्यंत इलेक्शनचं काम तमाम झालेलं असतं!

अविनाश - बालाकोट खोटं आहे, तीनशे अतिरेकी मारलेच नाही गेले असं ओरडत बसला होता तुम्ही लोक २०१९ साली, तोपर्यंत इकडे मोदीजींनी शपथसुद्धा घेतली होती पंतप्रधानपदाची! (हुहुहु)

नाना - असं काहीतरी करणारच मोदीजी! पण या सगळ्याच्या पलीकडं जाऊन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही लोक. भाजप आज विनाकारण पन्नास टक्क्यांवर नाही गेलेलं. राममंदिराची अक्षत गेली आहे पाच कोटी घरांमध्ये. राब राब राबलो आहोत आम्ही अक्षत द्यायला. या पाच कोटी घरताली घरटी दोन जरी मतं मिळाळी, तरी दहा कोटी मतं होतात. काँग्रेसला गेल्या वेळी पंचावन्न तरी जागा मिळाल्या होत्या, यावेळी वीससुद्धा नाही मिळणार.

(अयोध्येत राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होती, तेव्हा भाजप कार्यकर्ते आमंत्रणाची अक्षत घेऊन घरोघरी पोहोचले होते. १९ सालच्या निवडणुकीच्या प्रचाराची एक प्रकारे सुरुवातच होती ती! - संपादक)

अविनाश - उद्या रामनवमी आहे. देशातल्या प्रत्येक मंदिरात रामजन्माचा कार्यक्रम आहे. अयोध्येत तर केवढा मोठा कार्यक्रम होईल बघ.

नाना - हे निशीसारखे लोक त्यांना काही कळायच्या आत मोदीजींना मत देऊन येतील बघ!

निशी - मी ठरवलंय की, मी या वेळी राहुल गांधीला मत देणार काहीही झालं तरी!

अविनाश – ‘देशद्रोही’! जे लोक मोदीजींना मत देणार नसतील, त्यांचा मतदानाचा अधिकारच काढून घेतला पाहिजे. ‘देशद्रोही’ लोकांना कशाला पाहिजे मत?

नाना - (गालातल्या गालात हसत) होईल तेसुद्धा होईल. मोदी हैं तो मुमकिन हैं!

भास्कर - २४० हे अपर लिमिट आहे मोदीजींचं या वेळी.

अविनाश - उद्याचा रामनवमीचा सोहळा बघ. लोक कसे उत्साहात असतील ते. ‘इस बार पाचसौ पार’ असं तूच येऊन म्हणशील मला!

भास्कर - मला एक सांग तुझ्याकडे धंदा करायला पुरेसे पैसे असतील, तर तू लांबच्या लांबच्या मित्रांकडे धंदा करायला पैसे मागशील का?

अविनाश - काय कारण?

भास्कर - मग मोदीजींना जर आपण आपल्या स्वतःच्या जिवावर चारसौ पार करणार आहोत, असं वाटतंय ठामपणे, तर ते छोट्या छोट्या नेत्यांकडं मदत का मागतायत?

अविनाश - कुणाकडं मागितली मदत?

भास्कर -  एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे, जयंत चौधरी, ओमप्रकाश राजभर, नीतीश कुमार, जीतनराम माँझी, चिराग पासवान, अशा नको नको त्या नेत्यांकडे मदत मागत बसलेत मोदीजी!

अविनाश - काहीतरी बोलू नकोस. मोदीजी कुणाकडेही मदत मागायला जात नाहीत.

नाना - या लोकांना त्यांनी प्रेमानं जवळ घेतलं आहे. प्रेमळ आहेत मोदीजी.

अविनाश - सबका साथ, सबका विकास! 

पांडेजी - (हसत) सबका साथ, हमारा विकास!

अविनाश - काहीतरी बोलू नका. हे लोक कोण मोदीजींचा विकास करणारे? मोदीजीच करतील यांचा विकास.

समर - विकास करायला हेच बरे सापडले तुम्हाला?

भास्कर - तेसुद्धा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना!

अविनाश - तू गप्प बस, मूर्ख माणूस!

समर - जाऊ दे सध्या कितीही उत्साह दिसला ‘गोदी मीडिया’वर तरी आम्ही आमची मतं बदलणार नाही.

भास्कर - चार जूनला निकाल आहे, तोपर्यंत मी थांबणार आहे.

निशी - मी पण चार जूनपर्यंत थांबणार आहे. चार जूनला जी पार्टी जिंकेल त्यांच्या मिरवणुकीमध्ये जाऊन मी नाचणार आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

२०२४ सालच्या एप्रिल महिन्यात असा सगळा माहौल होता. या निवडणुकीत भारतीय लोकशाहीचा कस लागणार होता. धर्म फक्त आठ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटत होता, परंतु त्या जोरावर भारतीय जनता पक्ष मात्र धर्माचा रथ आपल्याला तीन चतुर्थांश जागा देईल, अशी आशा धरून बसला होता. तसं बघायला गेलं तर, रोजमर्राच्या जीवनाच्या स्तरावर भाजपची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मोदीजींच्या दबावापोटी विकल्या गेलेल्या ‘गोदी मीडिया’चे ‘ओपीनियन पोल्स’ भाजपला मोठे बहुमत मिळेल, असे सांगत होते. त्यावर अविनाश आणि नाना यांच्यासारखे लोक निर्धास्त होते. खरी गोष्ट सांगितली जात नाहिये, असे म्हणून भास्कर, समर आणि पांडेजी हे लोक आशा धरून होते.

महागाई, बेरोजगारी, आर्थिक प्रगतीमधील असमतोल आणि इलेक्टोरल बाँड घोटाळा, अशा गोष्टी बघितल्या, तर भास्कर आणि त्याच्या मित्रांच्या म्हणण्यात अर्थ होता. एप्रिल आणि मे या महिन्यात मतदानाच्या सात फेऱ्या झडणार होत्या. त्यात भक्त मोदीजींना मतदान करणार होते आणि लिबरल लोक त्यांच्या विरोधात मतदान करणार होते. मोदीजी आणि विरोधी पक्ष असे दोघेही निशीसारख्या लोकांची मतं आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करणार होते. कुठल्याच बाबतीत निश्चित मत नसलेले निशीसारखे लोक त्या निवडणुकीचा निकाल ठरवणार होते. ते काय ठरवणार आहेत, याचा त्यांनाच पत्ता नव्हता. त्यामुळे तो इतर कुणाला  लागायची काहीच शक्यता नव्हती. मोदी, मोदीभक्त, मोदी-विरोधक, दोन्ही बाजूंचे ‘ओपिनियन पोल्स’वाले असे सगळेच हवेत बोलत होते.

- संपादक, श्रीमान जोशी, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......