आजघडीला आपल्या समाजाला जातिसंस्थेच्या अरिष्टाने ग्रासले आहे. जाती-धर्म विद्वेषातून या अरिष्टाची सोडवणूक होणार नाही. महात्मा फुले (११ एप्रिल) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल) यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे तत्त्वज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन मांडून त्यांच्याबद्दल ‘वंशवादी विखार’ पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.
महाराष्ट्रदेशी सध्या प्रभुत्वशाली शेतकरी जातीतील काही चलाख अभिजनांद्वारे ब्राह्मणविद्वेषाचे ‘नवे वाण’ पेरले जात आहे. या वाणाच्या गुणावगुणांची चिकित्सा न करता हाच ‘फुले-आंबेडकरवाद’ आहे, असा गैरसमजही काही ‘मूलनिवासी’ मंडळी पसरवत आहेत.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा हा जातिसंस्थानिर्मूलन व स्त्रीमुक्तीशी निगडित असल्यामुळे या सर्वोत्तम गुरु-शिष्यांचा लढा हा मूलत: समतावादी तत्त्वज्ञानावर आधारित होता. या समतावादी तत्त्वज्ञानाचे विरोधक, मग ते कोणाही जाती-धर्माचे का असेनात, हे ‘फुले-आंबेडकरवादा’चे खरे विरोधक आहेत.
आजच्या महाराष्ट्रातील प्रभुत्वशाली शेतकरी समाजाच्या जागृतीला आणि प्रगतीलाही महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीची पार्श्वभूमी आहे. २०व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात हिरिरीने लढवल्या गेलेल्या ‘वेदोक्त की पुराणोक्त’ या सुप्रसिद्ध(?) वादात कोल्हापूर संस्थानचे शाहूजी राजे व राष्ट्रीय सभेचे लोकमान्य टिळक यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रात ‘ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर’ हा जातसंघर्ष विघातक परिमाणांसह उफाळून आला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
इतिहास असे सांगतो की, महात्मा फुले यांच्या शिक्षणविषयक क्रांतिकार्यात अनेक विवेकशील ब्राह्मणांनी सहभाग दिला होता. आपल्या अखंड प्रेरणादायी आयुष्यात फुले दाम्पत्याने पार पाडलेले एकमेव असे ‘जातीय’ कार्य म्हणजे ब्राह्मण जातीतील वाट चुकलेल्या विधवा महिलांसाठी प्रसूतिगृह चालवून, त्यांच्यासह नवजात बाळांची माता-पित्याच्या वात्सल्याने देखभाल करणे हे होय. तेथीलच एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला त्या काळी वैद्यकीय शिक्षण देऊन व प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्याइतपत सुसंस्कारित करणाऱ्या या परम करुणाशील महामानवांना ब्राह्मणविरोधक ठरवणारे जातीय हितसंबंधात येथेच्छ बरबटून सत्यापलाप करत आहेत.
ब्राह्मण विधवांच्या केशवपनाच्या विरोधात न्हाव्यांचा संप घडवून आणणारे, टिळकांना जामीन देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि त्यांचा सत्कार करण्याचा मोठेपणा दाखवणाऱ्या ‘सत्यशोधक’ महात्मा फुले यांना जातीयवादी ब्राह्मण आजही समजावून घेऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर आज ब्राह्मणेतरांच्या भीतीपोटी असुरक्षित वातावरणात जगण्याची पाळी आली आहे.
अशा कडव्या ब्राह्मण्यग्रस्तांनी, १९४७ साली मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या आधारे सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला असता, तर आज त्यांच्यासह समस्त भारतीयांना सुखाने मोकळा श्वास घेता आला असता. त्याऐवजी आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी या मंडळींनी धार्मिक मूलतत्त्ववादाचे भूत उभे केले आहे.
या भूताला बाटलीबंद कसे करायचे, याचे मंत्रतंत्र वेद/ धर्मशास्त्र/ पुराणांत अर्थातच नसल्यामुळे अनेक ब्राह्मणेतरांना डोक्यावर घेऊन मिरवण्याची पाळी या कर्मठ ब्राह्मणांवर आली आहे. त्यातून ‘ब्राह्मण हेच सर्वश्रेष्ठ’ या अहंगंडाचे (खरे तर न्यूनगंडाचे) पार मातेरे झाले आहे. अशा ब्राह्मणवादी ब्राह्मणांच्या अपयशातून सत्यशोधक वारसा लाभलेले प्रभुत्वशाली शेतकरी जातीतील ‘जातीयवादी’ काही शिकणार नसतील, तर ते महात्मा फुले यांचा वारसा चालवण्यास सक्षम नाहीत, असेच म्हटले पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर साधारणत: एका तपाच्या कालावधीत राष्ट्रीय सभेला ब्राह्मण-ब्राह्मणेतर या दोन समाजांत राज्यस्तरापुरते एक सत्तासंतुलन राखण्यात यश आले. धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक व प्रशासकीय सत्ता ब्राह्मणांकडे व ग्रामीण भागातील आर्थिक-लोकशाहीयुक्त अवकाश प्रभुत्वशाली शेतकरी जातीकडे असे हे सत्तासंतुलन होते. न्या. रानडे यांनी इतिहासकाळात राष्ट्रीय स्तरावर वर्णिलेली ही ब्राह्मण व लष्करी जातींची युती लोकशाही युगात राज्यस्तरावर अवतीर्ण झाली खरी, परंतु तथागत सम्यक संबुद्धप्रणीत ‘अनित्यता’ सिद्धान्तानुसार ही परिस्थिती कायम राहणे शक्य नव्हते.
ओबीसींच्या मंडल अहवालानंतर, भारतीय संविधानाच्या आधारे ५२ टक्के ओबीसी समाजाला २७ टक्के प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे, विशेषत: १९९०नंतर हे सत्तासंतुलन बिघडले. त्याचा परिणाम म्हणून ब्राह्मण समाजावर कुरघोडी करण्यासाठी हे ब्राह्मणविद्वेषाचे हत्यार देशपातळीवर पुढे आले आहे. प्रभुत्वशाली शेतकरी जातींना वेगळ्या आरक्षणाची मागणीदेखील यानंतरच्या काळात रेटली गेली, हेसुद्धा लक्षणीय आहे.
प्रभुत्वशाली शेतकरी जातींमधील चलाख अभिजनांद्वारे वेगाने पुढे आलेल्या या ब्राह्मणविद्वेषाचे वैशिष्टय़ म्हणजे या सत्तासंतुलनाच्या काळातील आपल्या ‘ब्राह्मण्यग्रस्त’ भूमिकेबद्दल चकार शब्दही न काढणे तसेच वर्तमान काळात प्रभुत्वशाली शेतकरी जातींकडून केल्या गेलेल्या अन्याय-अत्याचाराबद्दल वरकरणी मौन बाळगणे, एवढेच नव्हे तर असे अन्याय-अत्याचार करणाऱ्यांचे समर्थन करणे, वेळप्रसंगी त्यांना मदतीचा हातही देणे! यावरून त्यांच्या ब्राह्मणविद्वेषाचा पाया डावपेचात्मक असल्याचे सिद्ध होते. सांप्रतच्या ब्राह्मणविद्वेषाचे हे समाजविघातक वैशिष्ट्य विचारात न घेता अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ‘मूलनिवासीवादी’ हर्षोत्साहित झाले आहेत.
वास्तविक तथागत सम्यक संबुद्धप्रणीत ‘कार्यकारणभाव’ विचारात घेतला असता, तर प्रभुत्वशाली शेतकरी जातीमधून उगम पावलेल्या या ब्राह्मणविद्वेषाची कारणमीमांसा अगदी सहज उलगडता आली असती. एवढाही सारासार विवेक नसणाऱ्या या मंडळींना फुले-आंबेडकरवाद हे जातधर्मविरहित तत्त्वज्ञान आहे, याची गंधवार्ताही असण्याची शक्यता नाही.
दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या कर्मभूमीत त्यांना मानणाऱ्या संघटनांचे वर्चस्व असूनही तेथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्याय-अत्याचाराला पायबंद बसलेला नाही. उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणासारख्या राज्यांत यादव-जाट अशा ‘मूलनिवासी’ समूहांचे प्राबल्य असूनही, तेथील ‘मूलनिवासी’ ओबीसी व अनुसूचित जातींच्या हालअपेष्टांना पारावर राहिलेला नाही.
उघड्या डोळ्यांना दिसणारी ही उदाहरणे वंशवादाचे रातांधळेपण स्वीकारलेल्यांना कशी काय दिसणार? हल्ली हल्ली मराठा मोर्चाच्या निमित्ताने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यास केलेला विरोध व नाशिकसारख्या जिल्ह्यात झालेल्या दंगली यातून हे ‘मूलनिवासी’ पाखंड काहीसे भानावर आल्याचे दिसते.
कर्मठ ब्राह्मण व मूलनिवासी पाखंड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पहिल्याचे म्हणणे असे आहे की, आम्ही कोणी तरी वेगळे असून इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत. मूलनिवासीवादी नेमके याच वेगळेपणाच्या हव्यासाला वंशवादी साच्यात रूपांतरित करत आहेत. बेरोजगारी, शैक्षणिक व आरोग्यविषयक दुरवस्था यांचे बळी ठरलेल्या सर्वजातधर्मीय सामान्य भारतीय जनतेच्या सुखदु:खांशी या दोघांना काहीही देणेघेणे नाही. जीवनसंघर्षांत उरस्फोट करणाऱ्या सामान्य जनतेला एकमेकांविषयी भीती दाखवून ते आपल्या अमानुष महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला निघाले आहेत. त्याची परिणती अंतिमत: नकारात्मकच होणार आहे.
हा विनाश टाळण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर आणि गोखले, आगरकर, रानडे तसेच टिळक, चिपळूणकर, सावरकरांच्या महाराष्ट्राला आज हे समजून घेण्याची गरज आहे की, मुळात ‘जात म्हणजे काही तरी वेगळे, उच्च, शुद्ध वगैरे वगैरे’ या संकल्पनेला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहिलेला ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ वाचला तरी वर्णशुद्धीच्या संकल्पनेतील फोलपणा समजून येतो.
मानव प्रजातीचा (‘स्पीशीज’चा) जन्म सुमारे २५ लाख वर्षांपूर्वीचा असून साधारणपणे मागील ६०-७० हजार वर्षांपासून या प्रजातींमध्ये कोणतीही जैविक उत्क्रांती झालेली नाही. त्यामुळे जीवशास्त्रीयदृष्ट्या पृथ्वीतलावरील सारे मानव समान असून त्यांच्यातील वरपांगी दिसणारे भेद हे बाह्य भौतिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहेत. ‘पंजाबातील ब्राह्मणांचे साधर्म्य तामिळनाडूच्या ब्राह्मणापेक्षा खुद्द पंजाबमधील चर्मकाराशी अधिक आहे,’ असे डॉ. आंबेडकर सांगतात.
मानव प्रजातीचा पृथ्वीतलावरील इतिहास हा जसा इतर प्राण्यांच्या व पर्यावरणाच्या विनाशाचा आहे तसाच तो उन्नत मानवीय मूल्यांच्या विकासाचादेखील आहे. आपल्या भारत देशाला तर या मानवीय मूल्यांची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. बळीराजा, सीता, शंबूक, द्रौपदी, एकलव्य या मिथक पात्रांतून दृग्गोचर होणारी मानवी मूल्ये प्रेरणादायी आहेत.
महावीर, बुद्ध व त्यांच्या भिक्खू संघाचा ज्ञानमय वारसा, चंद्रगुप्त, अशोक, कनिष्क अशा सम्राटांचे शौर्य, मध्ययुगीन नामदेव, नानकांचे डोळे दिपविणारे कार्य, चक्रधर, चोखा, तुकोबाचे बलिदान, ‘बदअलम’ करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला शिक्षा देणारे शिवराय ही आणि यांसारखी आणखी कित्येक उदाहरणे या मातीच्या सर्जनशीलतेची ग्वाही देतात.
जातीधर्मविद्वेषातून या अरिष्टाची सोडवणूक होणार नाही. या पावन भूमीने विकसित केलेल्या उन्नत मानवीय मूल्यांची कास धरून संविधानाच्या आधारे या अरिष्टाची विधायक सोडवणूक कशी करता येईल, यावर मोकळेपणाने चर्चा होण्याची गरज आहे. देशहिताला प्राधान्य दिल्यास या जातधर्मनिरपेक्ष वैचारिक सुसंवादातून सर्व भारतीयांचे भले करणारी पुढील दिशा सापडू शकेल. महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांनाही नेमके हेच अभिप्रेत आहे !
ब्राह्मण विरुद्ध बहुजन (किंवा इतर) अशी नवी जातीय विभागणी केली जाऊ लागली आहे आणि ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असणे, असा एक घातक विचारप्रघात सुरू झाला आहे. अशा विचारावर काही संघटना, चळवळी उभ्या आहेत. त्यांचा दावा मात्र आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार मानणारे आहोत, म्हणजे पुरोगामी आहोत, असा असतो. अशी जातीय विभागणी करून आपण पुरोगामी असल्याचा आव आणणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील काही थोर विचारवंतांचाही समावेश आहे. त्यामुळेच फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार नेमके काय आहेत, पुरोगामित्व म्हणजे काय आणि पुरोगामी कोणाला म्हणायचे, याचा एकदा ताळेबंद मांडण्याची गरज आहे.
फुले-शाहू-आंबेडकर एका जातीच्या विरोधात होते की, माणसा-माणसांत भेद निर्माण करणाऱ्या, जन्मावर आधारित उच्च-नीच प्रवृत्तीचे पोषण करणाऱ्या, एका वर्गाला बहिष्कृत करणाऱ्या, गुलाम करणाऱ्या संपूर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधात होते?
खरे तर विषमतेवर, शोषणमूल्यावर उभी असलेली जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्थाही गाडून त्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, विज्ञानवाद, बुद्धिवाद, विवेकवाद या मूल्यांवर आधारित नवसमाजाची निर्मिती करायची होती. पुरोगाम्यांनी हे विचार स्वीकारले आहेत काय आणि ते अमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे काय, याचीही एकदा जाहीर चिकित्सा झाली पाहिजे.
फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार जात-धर्म या पलीकडे होते. त्यांना धर्म-जातीच्या बंधनातून मनुष्यप्राण्याला मुक्त करून त्याला माणूस बनवायचे होते. त्यांचे विचार व आचार तंतोतंत तसेच होते, त्यात तसूभरही असमतोल नव्हता. याबाबत काही उदाहरणे सांगता येतील. जोतिबा फुले यांनी जेव्हा विषमतामूलक हिंदू धर्म व्यवस्थेविरुद्ध वैचारिक उठाव केला, त्यावेळी त्यांच्या घरातूनच त्यांना पहिल्यांदा विरोध झाला. ज्या समाजात त्यांचा जन्म झाला होता, त्या माळी समाजाने त्यांना बहिष्कृत केले.
त्या वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये विष्णुपंत थत्ते, केशवराव भवाळकर-जोशी या ब्राह्मण समाजातील व रानबा महार व लहुजी साळवे या अस्पृश्य समाजातील विचारी माणसांचा समावेश होता. आता माळी समाजानेच विरोध केला म्हणून फुल्यांनी त्यांचा तिरस्कार केला का?
उच्च-नीचतेची उतरंड असलेल्या जातीव्यवस्थेशी लढताना त्यांनी जन्माने ब्राह्मण असलेल्या थत्ते, भवाळकर वा अन्य जणांचे सहकार्य नाकारले का? अथवा ब्राह्मण आपल्या बाजूने आले म्हणून त्यांनी ब्राह्मण्यग्रस्त धर्मव्यवस्थेशी दोन हात करण्याचे थांबवले का? तर नाही. कारण त्यांना धर्मव्यवस्थेचे गुलाम असलेल्या सर्वच समाजाला मुक्त करायचे होते. ते ब्राह्मणविरोधक असते, तर त्यांनी विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या मुलांना कशासाठी पोसले असते?
अशाच एका विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले होते. विधवा ब्राह्मण स्त्रियांचे मुंडन करण्याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. हे सर्व ते ब्राह्मणांच्या विरोधात होते म्हणून की, माणसाला दु:खद प्रसंगातही अवमानित जिणे जगायला लावणाऱ्या धर्म-रूढी परंपरेच्या विरोधात होते म्हणून?
एकदा एक जाहीर पत्रक काढून त्यांनी नीतिमान लोकांना आवाहन केले होते की, जो कोणी मनुष्य ईश्वरास स्मरून नीतीने वागत असेल, त्याच्या जाती-पातीच्या दर्जाचा, धर्माचा, देशाचा विचार न करता, सोवळ्या-ओवळ्यांचे बंड न माजवता, त्यांच्याबरोबर अन्नव्यवहार करण्यास मी तयार आहे. त्यातून त्यांना काय सांगायचे होते? काय संदेश द्यायचा होता? पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी पुन्हा एकदा फुले समजावून घेण्याची गरज आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाला वेदोक्त-पुराणोक्त प्रकरणाने कलाटणी दिली होती. तो इतिहास सर्वश्रुत आहेच. परंतु पुराणोक्त मंत्र म्हणून शाहू महाराजांचा अपमान करणाऱ्या नारायण भटजीचे कारस्थान उघडकीस आणणारे राजारामशास्त्री भागवत हे जन्माने ब्राह्मणच होते. वेदोक्त-पुराणोक्त प्रकरणाने लोकमान्य टिळक व शाहू महाराज यांच्यात वैचारिक संघर्ष उभा राहिला होता. तरीही इंग्रज राजवटीची बंधने असतानाही शाहू महाराज टिळकांच्या स्वराज्याच्या आंदोलनाला हस्ते-परहस्ते आर्थिक मदत करत होते. टिळक आजारी पडल्यानंतर, त्यांनी विश्रांतीसाठी पन्हाळ्याला यावे, असा आग्रह धरणाऱ्या शाहू महाराजांची मनाची विशालता आणि विचारांची उत्तुंगता दिसते.
शाहू महाराजांनीही इथल्या विषमतामूलक जाती व्यवस्थेला विरोध केला. जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही, अशी सुस्पष्ट भूमिका ते आयुष्यभर मांडत राहिले. सामाजिक समतेचा आग्रह धरणारे शाहू महाराज आपण स्वीकारले आहेत का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत भारतातील मानवमुक्तीच्या लढ्याला प्रारंभ झाला, त्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे एकच उदाहरण देता येईल आणि त्यांचे समतावादी विचार समजून घेण्यास पुरेसे ठरू शकतील. ४ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात सीताराम केशव बोले यांनी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे, देवालये, विद्यालये, धर्मशाळा खुली करण्यात यावीत, असा ठराव मांडला व तो मंजूर झाला. त्यांनतर महाड नगरपालिकेने त्याच्या अंमलबजावणीचा ठराव मंजूर केला. त्या वेळी नगरपालिकेचे अध्यक्ष होते सुरबानाना टिपणीस. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाडचा धर्मसंगर झाला. त्यावेळी ग. नि. सहस्रबुद्धे यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करण्याचा ठराव मांडला. दहन करण्यातही आले. धर्मव्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांच्या बाजूने लढण्यासाठी उभे राहिलेले बोले, टिपणीस, सहस्रबुद्धे कोण होते?
त्या काळचे जेधे-जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीचे लढावू पुढारी होते. महाडच्या सत्याग्रहात सहभागी होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली, परंतु त्यासाठी त्यांनी एक अट घातली. या सत्याग्रहात कोणाही ब्राह्मण गृहस्थाला सामील करून घेऊ नये, अशी ती अट होती. बाबासाहेबांनी ती फेटाळून तर लावलीच, परंतु त्यावर त्यांना दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे : ‘‘आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नाही, तर आमचा कटाक्ष ब्राह्मण्यावर आहे. ब्राह्मण लोक आमचे वैरी नाहीत, तर ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असे आम्ही समजतो. या भावनेने प्रेरित झाल्यामुळे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर आम्हाला दूरचा वाटतो व ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळचा वाटतो.”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
बाबासाहेब जन्माधिष्ठित विषमतेच्या विरोधात होते, तसेच ते आपला शत्रू कोण व मित्र कोण हे जन्माने कोण आहेत, हे ठरवण्याच्याही विरोधात होते. जे-जे समतावादी ते-ते त्यांचे मित्र होते व जे-जे विषमतावादी ते-ते त्यांचे शत्रू होते; मग ते जन्माने कोण का असेनात, ही त्यांची विचारधारा होती.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे तेच मर्म व महत्त्व आहे. जन्माने तुम्ही कुणीही असा, तुमचे विचार व आचार पुरोगामी विचाराला बळ देणारे आहेत की, प्रतिगामी विचारसरणी पोसणारे व वाढवणारे आहेत, हे महत्त्वाचे आहे. फुले-शाहू-आंबेडकरांना विषमतेवर, शोषणमूल्यावर उभी असलेली धर्म व्यवस्था-जाती व्यवस्था उद्ध्वस्त करायची होती, तेच त्यांच्या विचारांचे अंतिम ध्येय आहे.
फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार फक्त आणि फक्त माणसाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत. त्याचा स्वीकार करणे व तसे वर्तन करणे म्हणजे पुरोगामी असणे होय. आणि अर्थातच असा पुरोगामी असण्यासाठी निधर्मी असणे ही पूर्वअट आहे. ती पुरोगामी असल्याचा दावा करणाऱ्यांना मान्य आहे का?
..................................................................................................................................................................
लेखक नानासाहेब गव्हाणे साहित्याचे अभ्यासक आहेत.
gavhanenanasahebcritics@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment