या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…
ग्रंथनामा - झलक
मंजिमा भट्टाचार्ज्या
  • ‘मॅनेक्विन’ या पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी आवृत्तीचे मुखपृष्ठ
  • Sat , 13 April 2024
  • ग्रंथनामा झलक मॅनेक्विन : वर्किंग वूमन इन इंडियाज ग्लॅम Mannequin : Working Women in India's Glam मंजिमा भट्टाचार्ज्या Manjima Bhattacharjya

भारताच्या ग्लॅमर जगतात काम करणाऱ्या कष्टकरी स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारलेल्या ‘Mannequin: Working Women in India's Glam’ या मंजिमा भट्टाचार्ज्या यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा नितीन साळुंखे यांनी त्याच नावाने मराठी अनुवाद केला आहे. मैत्री पब्लिकेशन्सतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला मूळ लेखिकेने लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

सदर पुस्तक हे २००३ ते २००७ या काळातल्या माझ्या डॉक्टरेटसाठीच्या संशोधनावर आधारित आहे. ‘भारतातल्या ग्लॅमर इंडस्ट्रीत मॉडेल म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांचा समाजशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास’, हा माझ्या संशोधनाचा विषय होता. त्यापूर्वी जवळपास सात वर्षे मी दिल्लीतल्या एका स्त्रीवादी गटाची सक्रीय सदस्य होते. स्त्रियांच्या शरीराचं एक वस्तू मानून प्रदर्शन करण्याच्या विरोधात झालेल्या निषेध कार्यक्रमांत मी अनेक वेळा सहभागी झाले होते. मग तुम्ही विचाराल, मी वैचारिकदृष्ट्या ज्याच्या विरोधात होते, त्याचाच अभ्यास करावा, असं मला का वाटलं? हा जरा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देण्यापूर्वी मला यासबंधी काही पार्श्वभूमी स्पष्ट करावी लागेल. 

एका संध्याकाळी मी टीव्हीवरचा एक शो, ‘द बिग फाईट’ बघत होते (एनडीटीव्ही, ३ एप्रिल २००४). चर्चेचा विषय होता : ‘सौंदर्यस्पर्धा निरर्थक आहेत का?’ पॅनेलमध्ये एक माजी मिस वर्ल्ड, स्त्री हक्कवादी कार्यकर्ती, मिस इंडिया सौंदर्यस्पर्धा आयोजित करणाऱ्या कंपनीचा कार्यकारी संचालक आणि चाकोरीबाहेरच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असलेली एक अभिनेत्री होती. सूत्रसंचालक त्या वेळचा त्या चॅनलचा राजकीय संपादक होता. चर्चा याप्रमाणे झाली -

माजी मिस वर्ल्ड : जर तुमच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांना ‘महिला सक्षमीकरणा’ची एवढी चिंता आहे, तर मग तुम्ही आमच्यासारख्या लोकांना या मुद्द्यांवर का बोलू देत नाही?

महिला हक्कवादी कार्यकर्ती : स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, बलात्कार या कशाबद्दल काहीच तुम्हाला माहीत नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? एकाही ‘ब्यूटी क्वीन’ला सामाजिक बांधीलकी नसते. त्या काही करतील, असं त्या म्हणतात, पण करत मात्र नाहीत.

कार्यकारी संचालक : असं पाहा, या सौंदर्य स्पर्धा… त्या सक्षमीकरण, विक्रीयोग्यता याबद्दलच आहेत… हा मंच हे सिद्ध करण्यासाठीच आहे की, भारतीय स्त्रिया कुठेही कमी…

प्रेक्षक महिला हक्क कार्यकर्ती : तुम्ही ‘महिला सक्षमीकरणा’बद्दल बोलता, पण तुम्ही हे विसरता की, या महिला हे दाखवत आहेत की, भारतीय स्त्रिया जगातल्या कोणत्याही भागातल्या स्त्रियांच्या इतक्याच सक्षम आहेत. (प्रेक्षकांतले काही लोक टाळ्या वाजवतात.)

चाकोरीबाहेरच्या भूमिका करणारी अभिनेत्री : तुम्ही म्हणताय ते ऐकून मला धक्का बसला. या ‘ब्यूटी क्वीन्स’मध्ये काही अर्थ नाही. मेधा पाटकर, किरण बेदी या भारतीय स्त्रियांचे खरे प्रतिनिधित्व करतात, माजी मिस वर्ल्ड नव्हे.

माजी मिस वर्ल्ड : इतर कोणाहीपेक्षा आम्ही कुठे कमी आहोत, असं मला अजिबात वाटत नाही; म्हणजे सामाजिक कार्यकर्ते वगैरेपेक्षा. असो. एक व्यक्ती म्हणून आम्हालासुद्धा मत असतं. आम्ही आज जिथं आहोत, तिथं आम्हाला जाता यावं, यासाठी स्त्रियांना त्यांचा आवाज मिळावा यासाठी तुमच्यासारख्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. आणि आज जेव्हा आम्हाला तो आवाज मिळाला आहे, तेव्हा तो आवाज तुम्हीच दडपणार आहात का? आणि या सगळ्यात जर सौंदर्यप्रसाधन कंपन्यांना आमचा काही उपयोग होत असेल, तर तुम्हाला काय अडचण आहे?  

सूत्रसंचालक : पण स्त्रियांनी त्यांचं आयुष्य त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दृष्टीने घडवलं पाहिजे!

माजी मिस वर्ल्ड : मी चौदा वर्षांची होते, तेव्हापासून मी माझं आयुष्य घडवते आहे. वीस वर्षांची असल्यापासून माझा चरितार्थ चालवण्यासाठी मी स्वतः काम करते आहे. मी काम केलं, कारण मला ते करणं भागच होतं.

माझे कान टवकारले गेले. अगदी स्त्रियांच्या सौंदर्यस्पर्धा आयोजित करणारेसुद्धा दावा करताहेत की, ते ‘स्त्री सक्षमीकरणा’साठी हे सगळं करत आहेत! मिस वर्ल्ड स्वतः सांगते की, ती परिस्थितीचा बळी होती. एक धक्कादायक खेळी करून ती चर्चेचा रोख बदलत एक नवीच भाषा सुरू करते - जगण्यासाठी काम करणं ‘भाग पडल्याची’.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या सौंदर्यवती, ‘काम करतात’?

मग, खरी भारतीय स्त्री कोण आहे, यावरून भांडण. कोणासाठी, जिला ‘मिस इंडिया’ म्हणून जगभर ओळख मिळाली आहे, तिला ‘खरी भारतीय स्त्री’ असं न म्हणणं धक्कादायक ठरू शकतं. ती यांच्यापेक्षा कमी आहे, आणि तिनं जे ‘साध्य’ केलं आहे, त्यासाठी अक्कल लागत नाही किंवा त्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही; त्यामुळे त्याला काही महत्त्व नाही, असा एक तिरस्काराचा, तुच्छतेचा सूर असं न म्हणण्यामागं  असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

अत्यंत हुशारीनं ‘मिस वर्ल्ड’ आणि ‘स्त्री हक्क कार्यकर्ती’ यांना परस्परांच्या विरोधात उभं करून त्या टीव्ही चॅनलनं एका वादाची सुरुवात करून दिली. इतक्यावर हे थांबलं नाही, तर त्या दोघींना परस्परांच्या परंपरागत ‘शत्रू’ म्हणून एकमेकींसमोर उभं केलं, जसं ते पाश्चिमात्य देशांत आजपर्यंत नेहमी करत आले आहेत. अटलांटिक शहरात १९६८ आणि १९६९मध्ये झालेल्या ‘मिस अमेरिका’ स्पर्धेच्या वेळी स्त्रीमुक्तीसाठीची प्रसिद्ध निदर्शने झाली होती. त्यांनी अमेरिकेत ‘स्त्रीमुक्ती चळवळी’ची एक नवी लाट आणली.

या चर्चेतल्या दोन गोष्टी मला खटकल्या. एक म्हणजे, आपणच त्या ग्लॅमर इंडस्ट्रीचा भाग असल्याप्रमाणं  आपलं आयुष्य या ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या लोकांच्या प्रतिमा आणि त्यांच्याबद्दलच्या माहितीमुळे भरून वाहत असतं, आणि त्याच वेळी फॅशनच्या जगाची वास्तव माहिती व त्यात काम करणाऱ्या स्त्रियांना येणारे अनुभव आपल्यापर्यंत पोचणं अवघड असतं. त्या काळात काल्पनिक चित्रणं करणारे जे चित्रपट आले. (उदा. एका बॉलिवुड निर्मात्यानं २००८मध्ये बनवलेला, चित्रपट उद्योगावर आधारलेला एक चित्रपट) त्यात नजर खिळवून ठेवणाऱ्या, खळबळजनक आणि त्याच त्या नेहमीच्या लोकप्रिय पद्धतीवरच भर दिला होता.

दुसरी गोष्ट म्हणजे, स्त्रियांचे हक्क (किंवा स्त्री हक्क कार्यकर्ती) ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या स्त्रियांच्या विरोधात उभे करणं. ही विभागणी खरी होती की, निर्माण केलेली होती?

यातला नंतरचा मुद्दा बाजूला ठेवून या स्त्रियांचा सध्या ऐकू येत नसलेला जो आवाज होता, तो मला माझ्या संशोधनाच्या साहाय्यानं शोधायचा होता. या क्षेत्रात काम करण्यासाठी त्या का आल्या, हे मला जाणून घ्यायचं होतं.

त्या जे ‘काम’ करत होत्या, त्याबद्दल. त्या नेमक्या काय आहेत, याबद्दल लोकांना काय वाटतं, त्याचं त्या काय करतात, याबद्दल. त्या म्हणजे एखादी वस्तू आहेत, अशी त्यांना जी वागणूक मिळते, त्याबद्दल त्यांना काय वाटतं, याबद्दल. स्त्रीवाद्यांच्या काही गटांतून या मुद्द्यावर काही समज पसरवले गेले होते. त्यांच्या स्वतःच्या दृष्टीतून मला त्यांच्याबद्दल लिहायचं होतं. त्यासाठी त्यांच्या त्या जगात मला मिसळून जायचं होतं. समाजशास्त्राच्या संशोधनामध्ये ही मानववंशशास्त्रातली एक पद्धत वापरली जाते. पण मी हे कसं करू शकणार होते? त्यांच्या त्या जगात मिसळून जाण्यासाठी, खोलवर बुडी मारून त्यांचं जग आतून निरखण्यासाठी मला त्यांच्या जगात प्रवेश तरी कसा मिळणार होता?

.....................................................

‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक २००४’मध्ये या जगाशी माझा पहिला संपर्क झाला. या अभ्यासात ‘कार्यक्षेत्र’ म्हणजे नेमकं काय असेल, याबद्दल मला जरा उत्सुकता होती (जिथं नैसर्गिक वातावरणात प्राथमिक माहिती गोळा केली जाते). आणि असं लक्षात आलं की, ‘फॅशन वीक’ हा या क्षेत्राशी संबंधित असा, जिथं ग्लॅमर इंडस्ट्रीतले अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सगळे लोक एकत्र येतात, असा सर्वांत जवळचा मार्ग आहे.

‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक’ १६८ तास चालला आणि संपला. मी त्याच्याशी जुळवून घ्यायचा, त्याचा सराव करून घ्यायचा तोवर प्रयत्नच करत होते. मानववंशशास्त्राच्या अभ्यासात सांगतात, तसं तिथं कोणात मिसळायला, ओळखी करून घ्यायला आणि त्यांच्यातली एक होऊन ते बघायला मला वेळच मिळाला नाही. ते ‘कार्यक्षेत्र’ पुन्हा खुलं होण्यासाठी मला एक वर्ष वाट बघावी लागणार होती. आणि मला हेसुद्धा माहीत होतं की, एक वर्षानं ते कार्यक्षेत्र बदललेलं असणार होतं. त्यातले खेळाडू नवे असणार होते. मैत्रीचे नातेसंबंध पुन्हा जुळवावे लागणार होते. पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागणार होती.

‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक २००४’मध्ये मी बाहेरची व्यक्ती होते. त्यामुळे मी फक्त सर्वांना खुली परवानगी आहे, तिथंच जाऊ शकत होते. मी त्या कार्यक्रमाच्या आयोजकांशी, ‘फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया’शी संपर्क साधला होता. सकाळच्या सत्रात होणाऱ्या त्यांच्या ‘द बिझिनेस ऑफ फॅशन’ या चर्चासत्रात उपस्थित राहण्यासाठी मला पास हवा होता. त्यांच्या फारसं मनात नसतानाही त्यांनी ते मान्य केलं. अतिशय मर्यादित लोकांनाच तिथं प्रवेश होता. तरीही अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची तिथं संधी होती. कार्यक्रम हॉटेलच्या मोठ्या हॉलमध्ये होता. मी त्या हॉलमध्ये सगळीकडं वावरू शकत होते.

या काळात तो उद्योग आतून निरखणं मला काही प्रमाणात शक्य झालं. मला नंतर त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत, असं सागण्यासाठी मी तिथल्या मॉडेलना आणि डिझायनरना भेटू शकले. मॉडेल, त्यांचे फोन नंबर, त्यांच्या एजन्सी आणि माझ्या या ‘कार्यक्षेत्रात’ मला सहकार्य करायची आणि मला मुलाखत देण्याची ज्यांनी तयारी दाखवली, अशा इतर अभिनेत्यांचा डाटाबेस तयार करायला मी सुरुवात केली.

‘लॅक्मे इंडिया फॅशन वीक २००५’मध्ये मला पूर्ण वेगळा अनुभव आला. मागच्या वेळी बाहेर तरंगावं लागणारी, फार तर समोर प्रेक्षकांत बसण्याची नाइलाजानं परवानगी मिळालेली मी, या वेळी स्टेजच्या मागच्या बाजूच्या ग्रीनरूममध्ये जाऊनसुद्धा बघू शकत होते. त्या आठवड्यात सादर झालेले तीस फॅशन शो मी तिथून, ग्रीनरूममधून बघितले.

या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्यावर स्पॉटलाइट असतो, ज्या प्रखर प्रकाशझोतात असतात, अशा स्त्रियांवर लक्ष केंद्रित करायचं, असं मी ठरवलं होतं. या स्त्रिया म्हणजे मॉडेलिंग करणाऱ्या स्त्रिया. दोन वर्षांच्या काळात मी मॉडेलिंग करणाऱ्या अशा तीस स्त्रियांच्या प्रदीर्घ आणि सखोल मुलाखती घेतल्या. त्यांच्या करिअरच्या वेगवेगळ्या टप्यांवर असलेल्या या स्त्रियांमध्ये काही स्त्रिया सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या आणि काही तर अशा सौंदर्यस्पर्धा जिंकलेल्यासुद्धा होत्या. फॅशन आणि स्त्रियांसाठी मासिकं चालवणारे संपादक, फॅशन क्षेत्रात प्रचंड विक्री करणाऱ्या उद्योगांचे प्रतिनिधी, फॅशन शोमधले नृत्य-दिग्दर्शक, मॉडेल्सचे समन्वयक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मॉडेलिंग एजन्सीजचे लोक अशी या क्षेत्रातील महत्त्वाची माहिती देऊ शकणाऱ्या सगळ्या लोकांच्या मी मुलाखती घेतल्या.

कोण होत्या या स्त्रिया? त्यातल्या बहुतेक दिल्लीतल्या होत्या. काही थोड्या मुंबईतल्या होत्या. भारताच्या ग्लॅमर इंडस्ट्रीतली दोन महत्त्वाची केंद्रे. आग्रा, वाराणसी, भोपाळ अशा मध्यम शहरांतल्या किंवा दिल्लीच्या फरीदाबाद आणि गाझियाबादसारख्या उपनगरातल्या किंवा जयपूर, गौहती, लखनौ अशा राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणावरून आलेल्या या स्त्रिया. त्यातली एक खेड्यातून आलेली होती. दोघींनी सांगितलं की, त्या मूळ भारतीय वंशाच्या, भारताबाहेरून आलेल्या होत्या. बहुसंख्य मुली साध्या, मध्यमवर्गीय पार्श्वभूमीच्या होत्या. तीसपैकी फक्त सहा स्त्रियांना संपन्न पार्श्वभूमी होती. 

यात बहुसंख्येने हिंदू होत्या, पण काही स्त्रिया शीख, ख्रिश्चन आणि मुस्लीमसुद्धा होत्या. हिंदूंमध्ये केवळ एक तृतीयांश स्त्रिया वरच्या जातीतल्या होत्या. बाकीच्या मध्यम जातींतल्या किंवा त्यांच्या प्रदेशातल्या प्रभावशाली जातींच्या होत्या. पण विशेष बाब ही की, मी मुलाखत घेतलेल्या या स्त्रियांपैकी एकही स्त्री अनुसूचित जातींपैकी किंवा अनुसूचित जमातींपैकी नव्हती. एकाही स्त्रीने तिची ओळख, ‘दलित’, अशी करून दिली नाही.

बहुसंख्य स्त्रियांचे ओळख सांगण्याचे निकष वेगळेच होते : त्यांचा आर्थिक वर्ग, जन्म ठिकाण, काही वेळा त्यांचा ‘समाज’ (आगरवाल किंवा काश्मिरी. अर्थात, याबद्दल बोलताना त्या समाजात मुलगी म्हणून त्यांच्यावर असलेली बंधनं, याबद्दलच त्या जास्त बोलल्या), त्यांची प्रादेशिक ओळख (ईशान्य भारतातली राज्ये) आणि त्यांची सैन्यदलातली पार्श्वभूमी.

इंडस्ट्रीमध्ये असा एक समज आहे की, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सैन्यदलातल्या मुलींचं प्रमाण जास्त आहे. कारण सैन्यदलातल्या लोकांचं नीटनेटकेपणाकडे जास्त लक्ष असतं आणि थाटामाटाच्या, भपकेबाज राहणीमानाची त्यांना सवय असते. त्यांच्या मुलींनासुद्धा तशाच राहणीमानाची सवय व्हावी, यासाठी ते लोक प्रोत्साहन देतात. पण मी मुलाखत घेतलेल्या तीसमधल्या फक्त तीन मुलींना सैन्यदलाची पार्श्वभूमी होती.

मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या, त्या स्त्रिया सतरा ते पन्नास या वयोगटातल्या होत्या. त्यांपैकी चार (मीरा, शिरीन, निहारिका आणि रितू) पहिल्या पिढीतल्या मॉडेल होत्या. ‘पिढी’ म्हणताना मला असं म्हणायचं आहे की, या इंडस्ट्रीत ज्या साधारण एकाच वेळी आल्या आणि या इंडस्ट्रीच्या इतिहासात त्या वेळी काही घडत होतं, त्याच्या त्या साक्षीदार आहेत. एकाच प्रकारच्या परिस्थितीत राहून त्या सगळं अनुभवलेल्या आहेत.

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या. कॉन्व्हेंट किंवा पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या. विवाहित. मुलं असलेल्या. १९९०च्या दरम्यान भारताची अर्थव्यवस्था परदेशी भांडवलाला खुली होईपर्यंत फॅशन इंडस्ट्रीतल्या या पहिल्या पिढीला दीर्घकाळ तसं फारसं काहीच काम नव्हतं.

त्यांच्यापैकी सहा जणी, (हनी, मेरी, जोसी, नोएल, विनिता आणि नैना) दुसऱ्या पिढीतल्या मॉडेल होत्या. मी त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा साधारण पंचवीस ते तीस या वयोगटातल्या. त्या सगळ्यांनी १९९०च्या दशकाच्या मध्यात मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्या वेळी भारतात उदारीकरणाचे वारे वाहायला सुरुवात झाली होती. मी त्यांना भेटले, तेव्हा त्या सगळ्या जणी कामात होत्या. पण त्यांनी ‘प्लॅन बी’चा विचार करायला सुरुवात केली होती. किंवा येत्या काही वर्षांत त्यांचं ‘शेल्फ लाईफ’ संपेल, तेव्हा न थांबता पुढे काय करायचं, याचा विचार सुरू केला होता. इतर कोणता व्यवसाय त्या करू शकतील, याची हळूहळू चाचपणी करत होत्या.

या गटात संमिश्र प्रकार होते. पदवीधर, पदवी न घेतलेल्या, काही विवाहित, काही त्यांच्या पुरुष मित्राबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आणि काही एकट्याच होत्या. काही इंग्रजी बोलत होत्या. काहींना इंग्रजी बोलता येत नव्हतं. इतका काळ या इंडस्ट्रीत राहिल्यामुळे कामचलावू इंग्रजी बोलायला शिकलेल्या काही. या गटातल्या एकीलाही मूल नव्हतं.

तिसऱ्या पिढीतल्या सात मॉडेल होत्या. (नान्सी, स्वाती, कविता, लेहेर, कमल, गुरप्रीत आणि रुही) या बावीस ते अठ्ठावीस या वयोगटातल्या होत्या. त्यांनी या शतकाच्या सुरुवातीला, २०००च्या दरम्यान इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. इंडस्ट्री अतिशय वेगानं बदलत असण्याचा हा काळ. यातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मुली होत्या. एक ईशान्य भारतातल्या आदिवासी समाजातली, एक हरयाणवी जाट आणि एक काश्मिरी पंडित. या सगळ्या पदवीधर होत्या. त्यांच्यापैकी काहींनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा दूरस्थ पद्धतीनं किंवा मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्या सगळ्यांनी कोणता तरी व्यावसायिक अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण केला होता; म्हणजे, शिलाई, किंवा ‘मीडिया आणि कम्युनिकेशन’.

तेरा मुली चौथ्या पिढीतल्या होत्या; २००२नंतर इंडस्ट्रीत आलेल्या. तेव्हा आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग एजन्सीज आल्यामुळे सगळी परिस्थितीच बदलून गेली होती (या तेरामधल्या मयुरी, टीना, प्रगती, मिता, हीरिना, शिवानी, नताशा, अनुप्रिया, रुपाली आणि पलाश यांचा या पुस्तकात उल्लेख आहे). या गटातल्या सगळ्या मुली सतरा ते पंचवीस या वयोगटातल्या होत्या. त्यांच्यापैकी काही मुली अजून कॉलेजमध्ये शिकत होत्या. पाच मुलींनी कॉलेज मध्येच सोडून दिलं होतं. एकीनं शाळा मध्येच सोडून दिली होती. 

वेगवेगळ्या ठिकाणी या मुलाखती झाल्या. या महिलांनी कधी मला त्यांच्या घरी बोलावलं, कोणी कॉफी शॉपमध्ये, क्वचित कोणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण बोलावलं आणि एक तासापासून ते चार तासांपर्यंत त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगितली. एका मॉडेलनं उपनगरातल्या तिच्या सुंदर अपार्टमेंटमध्ये मला बोलावलं. तिच्या त्या घराच्या भिंती तिनं स्वतः छान रंगवल्या होत्या. आणखी कोणी मला तिच्या खिडक्या नसलेल्या कळाहीन खोलीवर बोलावलं. तिथं फक्त एका गादीपुरती जागा होती, तिथं ती रात्री झोपायची.

एकीनं दिल्लीच्या ल्यूटन्स भागातल्या प्रासादतुल्य अपार्टमेंटमध्ये बोलावलं, तर कोणी लाजपत नगरमध्ये सर्वांत वरच्या मजल्यावरच्या व्हरांड्यात बोलावलं. किंवा मग तिने चालू केलेल्या ब्यूटी सलोनच्या, गोंधळ चालू असलेल्या रिसेप्शनवर बोलावलं. बोलताना काही एकाच वेळी अनेक कामं करत होत्या. घरातल्या कामात मदत करणं, ग्राहकांचे किंवा सासरच्या लोकांचे फोन घेणं, हट्ट करणाऱ्या मुलांना सांभाळणं किंवा कधी एखादी त्यातल्या त्यात शांत जागा बघून तिथं थंड झालेला चहा घेत माझ्याबरोबर बोलणं आणि हे सगळं करत असताना डोक्यावरचं हेल्मेट काढून ठेवण्यासारख्या शांत अलिप्तपणानं इंडस्ट्रीतला ग्लॅमरचा मुखवटा उतरवून बाजूला ठेवून देणं. त्यांची खरी ओळख गुप्त राहावी म्हणून मी त्यांची नावं बदलली आहेत.

एकदा मी टीव्हीवर कार्यक्रम करणाऱ्या निर्मातीला मुलाखतीसाठी विचारलं, तेव्हा ती म्हणाली की, “जर तू पूर्वग्रहातून एकतर्फी प्रश्न विचारणार असलीस, तर मला त्यात अजिबात रस नाही.” मी मुंबईतल्या स्टार टीव्हीच्या बिल्डिंगवर निषेधाचे फलक घेऊन येणारी कार्यकर्ती नाही, अशी तिची खात्री पटेपर्यंत ती मला भेटलीच नाही. खरं तर मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यांच्याबद्दल मला एकतर्फी मत बनवायचं नव्हतंच. उलट, एका अर्थी त्यांची काळजीच वाटत होती. कारण इतिहासानं आजपर्यंत नेहमीच स्त्रीवाद आणि फॅशन यांना परस्परांच्या विरोधात उभं केलं आहे. सध्याची व्यवस्था स्त्रीसौंदर्याच्या अवास्तव व्याख्या बनवते आणि स्त्रियांच्या शरीराचा आकार आणि ठेवण, यांबद्दलच्या अनारोग्यकारक प्रतिमा पुढे करते, याची मला जाणीव होती.

कशातूनही, काहीही करून नफा, या एकाच गोष्टीवर त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. ते इष्टता आणि कामुकता यांच्याबद्दलची वेगवेगळी रूपकं वापरून त्यांची विक्री वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. या स्त्रिया म्हणजे त्यांच्यासाठी जणू काही फक्त प्रदर्शन करण्याची शरीरं असतात. प्रदर्शनीय वस्तू. आणि एक माणूस म्हणूनही जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते. इथं खरं तर माझा वैचारिक गोंधळच झाला होता.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मी जेव्हा त्या स्त्रियांशी बोलायला जायचे, तेव्हा माझे विचार, माझी मतं त्यांच्या दाराच्या बाहेरच ठेवायला मानववंशशास्त्रातल्या पद्धतीनं मला शिकवलं. यामुळे मनातलं बोलून त्या त्यांचं मन मोकळं करू शकायच्या. त्यांच्या जगाच्या आणि मनाच्याही आत मला प्रवेश मिळायचा. तिथं त्या केवळ ‘मॉडेल’ नसायच्या. एक स्वतंत्र, परिपूर्ण व्यक्ती म्हणून त्या माझ्याशी बोलायच्या. शिवाय मला असं लक्षात आलं की, प्रत्येकजण सतत आजूबाजूच्या प्रत्येकाला जोखतंय. समोरची व्यक्ती कशी दिसते, कशी बोलते, कपडे कोणते घातलेत, या सगळ्यावरून.

मलाही अशा प्रकारे जोखलं गेलंच होतं. स्त्रियांविषयीच्या एका मासिकाच्या संपादिकेनं जेव्हा, निषेध करणाऱ्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांना, ‘कुरूप मुलींच्या कुरूप आया’, असं तिच्या मुलाखतीत म्हणून उडवून लावलं, तेव्हा मला राग आला, पण मी शांत राहिले. स्त्रीवादी महिलांना कुरूप म्हणायचं, ही या मासिकांची खूप जुनी युक्ती होती. अमेरिकेत स्त्रियांना मताधिकार मिळावा, यासाठी स्त्रियांची चळवळ चालू होती, तेव्हापासून त्यांची अशा प्रकारे हेटाळणी चालूच आहे. या स्त्रियांविषयी इतके वेगवेगळे पूर्वग्रह होते आणि त्यातून त्यांची प्रतिमा पुरुषद्वेष्टी, विनोदाचं वावडं असलेली अशी काहीही, त्या ज्या प्रदेशात राहत असतील, त्यानुसार ठरवली जात राहिली.

स्त्रीवादी महिलांबद्दल जसे पूर्वग्रह होते, तसेच ते फॅशनबद्दलही होतेच. संवाद, हाच या पूर्वग्रहांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचा मार्ग होता. ग्रीनरूममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवून आणि फॅशनच्या जगातल्या या स्त्रियांशी बोलत राहून, आमच्यातली ही जणू काल्पनिक युद्धरेषा आम्ही धूसर करत गेलो. आणि मग मी त्यांना बघू शकले, ऐकू शकले, जाणून घेऊ शकले की, या सगळ्याच्या वर त्यांचं अस्तित्व होतं. त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुण स्त्रिया म्हणून. त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तरुण, कष्टकरी स्त्रिया.

‘मॅनेक्विन’ : मंजिमा भट्टाचार्ज्या

मराठी भाषांतर नितीन साळुंखे | मैत्री पब्लिकेशन, पुणे | मूल्य – ४५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......