१६ मार्च २०२४ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने १८व्या लोकसभेसाठीचे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले. १९ एप्रिल ते १ जून २०२४ या काळात सात टप्प्यांत ही निवडणूक पार पडेल. सत्ताधारी भाजपने हे वेळापत्रक जाहीर होण्याच्या आधीपासूनच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. प्रत्यक्षात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय प्रचारसभांचा शिमगा नेहमीप्रमाणे रंगू लागला आहे. अर्थात अलीकडच्या काळात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका इथपासून अगदी ग्रामपंचायतीपर्यंत कुठलीही निवडणूक ही जनतेच्या समस्या-प्रश्न यांच्यासाठी लढवली जात नाही, ती सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी, एकमेकांना शक्य तेवढे बदनाम करण्यासाठीच लढवतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, एकमेकांना खोटे ठरवणे, एकमेकांचे चारित्र्यहनन-बदनामी करणे, एकमेकांना तुच्छ लेखणे, एकमेकांचा द्वेष-तिरस्कार करणे, हाच जवळपास सर्व राजकीय पक्षांचा कमी-अधिक फरकाने एकमेव ‘अजेंडा’ असतो.
सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्षांच्या तुलनेत जरा जास्त प्रमाणात करतो. त्यात भाजपसारखा आक्रमक, हिंसक आणि शिरजोर सत्ताधारी पक्ष तर सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसतो. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही वेळी त्याचे प्रत्यंतर येत आहे…
सत्ताधारी पक्षांच्या प्रचारसभेतली भाषणे, त्यात केली जाणारी वक्तव्ये पाहिल्यावर गेली दहा वर्षे सत्तेत असलेला भाजप हा पक्ष निवडणुकीचा प्रचार करतो आहे की, विरोधी पक्षांशी युद्ध करतो आहे, हे समजत नाही. अर्थात लोकसभेची निवडणूक ही अटीतटीची असल्यामुळे प्रचारसभेतल्या भाषणांना सभ्यता, शिष्टाचार आणि सुसंस्कृतपणाचे निकष फार काटेकोरपणे लावले जाऊ नयेत, हे खरे; पण निदान इतकी अपेक्षा तरी नक्की बाळगता येईल की, महिलांबाबत अभद्र, गलिच्छ आणि विकृत प्रकारची भाषा वापरली जाऊ नये.
पूर्वीच्या काळी राजेमहाराजे युद्धाच्या काळात शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांच्या बायका पळवून आणणे, त्यांच्यावर अत्याचार करणे वा त्यांची विटंबना करणे, असे प्रकार युद्धनीतीचा एक हातखंडा भाग म्हणून करत. भाजप-संघपरिवार कायमच ‘निवडणुकी’च्या मोडवर असल्याने तो देशातल्या, त्यातही विरोधी पक्षांतल्या महिलांबाबत अनेकदा गलिच्छ आणि विकृत प्रकारची भाषा वापरताना दिसतो.
याची भाजप सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या काळातली अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. त्यातील काही निवडक उदाहरणे पाहू या. अगदी ताजी ताजी घटना. ८ एप्रिल २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर-वर्णी-आर्णीचे महायुतीचे लोकसभा उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोरवा येथे प्रचारसभा झाली. या सभेत राज्य सरकारमध्ये वनमंत्री असलेले मुनगंटीवार काँग्रेसवर टीका करताना गांधी कुटुंबाविषयी काय म्हणाले ते पहा : “भाऊ-बहिणींना एकाच बेडवर विवस्र झोपणारे हे काँग्रेसवाले…”.
(या विधानांवर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि आयोगानेही त्याची तातडीने दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे, अशी बातमी आज काही मराठी वर्तमानपत्रांत प्रकाशित झाली आहे. पण निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांविरोधात फारशी कडक पावले उचलत नसल्याचा पूर्वइतिहास पाहता, या बाबतीत समज देण्यापलीकडे फार काही वेगळे घडेल, अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.)
महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे नेते थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षात आहेत, हे खरे असले तरी, सत्ताधारी भाजप-संघपरिवारामध्ये त्यांची संख्या सर्वाधिक आहे, हेही तितकेच खरे. भाजप-संघपरिवारातले अनेक लोक गांधी कुटुंबाविषयी अतिशय अभद्र, गलिच्छ आणि विकृत भाषा वापरतात. बलात्काराबद्दल तर भाजपनेत्यांची मुक्ताफळे त्यांच्या कुटुंबातल्या महिलांनाही लाज वाटावी, इतक्या नीचतम पातळीची असतात. त्याची काही उदाहरणेच पाहू या.
१) सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले रमेश बैस हे भाजपनेते जानेवारी २०१३मध्ये म्हणाले होते : “लहान मुलांवर होणारे बलात्कार घृणास्पद आहेत. एक वेळ मुली-स्त्रियांवर झालेले बलात्कार समजू शकतो.”
२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत जानेवारी २०१३मध्ये म्हणाले होते : “बलात्कार इंडियामध्ये होतात, भारतात नाही.”
३) छत्तीसगडचे भाजपनेते रामसेवक पाइक्रा जून २०१४मध्ये म्हणाले होते : “बलात्कार कोणी मुद्दाम करत नाही, ते चुकून होतात.”
४) मध्य प्रदेशचे भाजपनेते बाबुलाल गौर जून २०१४मध्ये म्हणाले होते : “बलात्कार हा सामाजिक गुन्हा आहे, तो कधी योग्य, तर कधी अयोग्य असतो. सरकार बलात्कार थांबवू शकत नाही.”
https://www.dw.com/hi/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE
५) त्यानंतर याच मंत्र्याच्या पुतण्यावर चार वर्षांनी, जुलै २०१८मध्ये एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात खटला दाखल करण्यात आला होता.
https://thewirehindi.com/49887/chhattisgarh-home-minister-nephew-rape/
६) मुंबईतले भाजपनेते राम कदम यांनी सप्टेंबर २०१८मध्ये जाहीर कार्यक्रमांत मुलांना आश्वासन दिले होते : “तुम्ही सांगाल त्या मुलीला पळवून आणून तुमच्याशी लग्न लावून देईन.”
७) वरची सहा उदाहरणे ही झाली भाजप पुरुषनेत्यांची. आता राजस्थानच्या भाजपच्या महिला नेत्या शोभा चौहान डिसेंबर २०१८मध्ये काय म्हणाल्या होत्या ते पहा : “आमच्याकडे सत्ता आहे, संघटना आहे. आम्ही पोलिसांना बालविवाह थांबवू देणार नाही.”
८) उत्तर प्रदेशच्या भाजपनेत्या साधना सिंग या महिला उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल जानेवारी २०१९मध्ये काय म्हणाल्या होत्या ते पहा : “मायावती या ना स्त्री आहेत, ना पुरुष. त्या छक्यांपेक्षाही वाईट आहेत.”
९) भाजपनेते जेव्हा गांधी कुटुंबाबद्दल बोलतात, तेव्हा त्यांची भाषा अतिशय विकृत म्हणावी अशीच असते. त्याचे हे एक उदाहरण. गुजरातचे भाजपनेते जितू वाघानी जानेवारी २०१९मध्ये राहुल-प्रियांका गांधीविषयी म्हणाले होते : “राहुल आणि प्रियांका कमांडोजच्या घेराव्यात जन्मले, तर कमांडोच्या घोळक्यातच त्यांना दूध पाजलं जायचं का?”
१०) कर्नाटकच्या भाजपनेत्या भारती शेट्टी या महिला महिलांबद्दल काय म्हणतात ते पहा. फेब्रुवारी २०१९मध्ये त्या म्हणाल्या होत्या : “स्त्रियांना पुरुषांबरोबर सर्व बाबतीत समानतेची आवश्यकता नाही.”
११) भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे एप्रिल २०१९मध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्याविषयी बोलताना म्हणाले होते : “राबडी देवी यांनी घुंघटातच राहणं उत्तम.”
१२) राहुल गांधी यांनी २०१९ साली ‘चौकीदार चोर हैं’ असे म्हटले होते. त्यावर हिमाचल प्रदेशातले भाजपनेते सत्पाल सिंह सत्ती यांनी काय टीका करावी? एप्रिल २०१९मध्ये ते म्हणाले होते : “राहुल म्हणतोय की, ‘चौकीदार चोर आहे, तर तो मादर ** आहे.”
https://www.bbc.com/hindi/india-47928716
१३) महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे तर त्यांच्या अभद्र वक्तव्यांमुळे कायमच वादात असत. पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांना आपण विद्यापीठातल्या मुला-मुलांसमोर बोलतोय याचे भान राहिले नाही. ते म्हणाले होते : “आपले जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचं लग्न त्या काळाला अनुसरून लहान वयात झालं होतं. विचार करा, ते काय करत असतील?” आणि नंतर ते हसलेदेखील होते.
१४) गुजरातचे भाजपनेते सी. के. राउलजी बिल्कीस बानो यांच्यावर बलात्कार करणाऱ्या अपराध्यांचे समर्थन करताना ऑगस्ट २०२२मध्ये म्हणाले होते : “बिल्किस बानोचे बलात्कारी संस्कारी होते.”
असा सगळा भाजपचा पूर्वइतिहास असल्यामुळे मुनगंटीवार यांच्या वक्तव्यात आश्चर्यकारक काहीच नाही. ही अभद्र भाषा मुनगंटीवार बोलत होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित होते, समोरच्या श्रोत्यांमध्ये कितीतरी महिला उपस्थित होत्या. खरे तर मोदींनी त्यांना ताबडतोब थांबवायला हवे होते, पण त्यांनी तसे केले नाही आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या भाजपच्या इतर नेत्यांनीही नाही.
मुले जशी आपल्या पालकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या प्रत्यक्ष वागण्याचे अनुकरण करतात, तसेच स्वत:ला ‘मोदी का परिवार’ म्हणून घेणारे भाजपनेते करत असावेत. कारण पंतप्रधान मोदीही आजवर महिलांबद्दल अनेकदा अपमानास्पद बोलले आहेत. किंबहुना ‘महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान’ असे त्यांचे एक ऐतिहासिक योगदान नक्कीच इतिहासात नोंदवले जाईल, यात शंका नाही.
त्यांची काही विधाने पाहा -
१) २०१२ साली एका जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे नेते शशी थरुर यांची मैत्रीण सुनंदा पुष्कर यांना ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ असे म्हटले होते.
२) जून २०१५मध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते : “स्त्री असूनदेखील त्या दहशतवाद सहन करत नाहीत.”
३) फेब्रुवारी २०१८मध्ये राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसनेत्या रेणुका चौधरी यांना उद्देशून म्हणाले होते : “रामायणानंतर शूर्पणखेसारखं राक्षसी हसणं, म्हणजे रेणुका चौधरी यांचं.” अर्थात त्यावरून नंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. चौधरी यांनी मानहानीचा खटलाही दाखल केला, पण मोदींनी साधा खेदही व्यक्त केला नसावा, असं उपलब्ध माहितीवरून दिसतं.
या प्रकरणाबाबतचा ‘न्यूज क्लिक’ने केलेला हा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे :
https://youtu.be/zIfv_3gE3d4?si=itGwGsw25CYYNsxB
४) डिसेंबर २०१८मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांना उद्देशून एक प्रश्न विचारला होता : “काँग्रेसच्या कोणत्या विधवेच्या खात्यात पैसे जातात?”
५) एप्रिल २०२१मध्ये पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारातल्या अनेक भाषणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्देशून ‘दीदी ओ दीदी’ हे शब्द आक्षेपार्ह पद्धतीने म्हणत. त्यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली माहीत नाही. (एवढेच कशाला, राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत मोदी उपस्थित श्रोत्यांना म्हणाले होते : ‘कमल का बटन ऐसे दबाओ, जसे उन्हें (काँग्रेस) फासी दे रहें हो.’ त्यावरही निवडणूक आयोगाने काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.)
गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी मिळेल तेव्हा, आपल्या आई, हिराबा यांचे मुक्तकंठाने गुणगान गायले आहे. १८ जून २०२२ रोजी त्यांच्या आई हिराबा यांनी शंभराव्या वर्षांत पर्दापण केले, त्यानिमित्ताने मोदींनी ‘नरेंद्र मोदी डॉट इन’ या त्यांच्या पोर्टलवर पाचेक हजार शब्दांचा हिंदी लेख लिहिला होता. ३० डिसेंबर २०२२ रोजी हिराबा यांचे निधन झाल्यावर त्या लेखाची बरीच चर्चा झाली होती. या लेखात मोदी आपल्या आईबद्दल म्हणतात –
“आज माझ्या आयुष्यात आणि व्यक्तित्वात जे काही चांगलं असेल, ती आई-वडिलांचीच देण आहे. माझी आई जितकी सामान्य आहे, तितकीच असामान्य आहे. तशी प्रत्येकच आई असते. माझ्या आईविषयी हे लिहिलेलं वाचताना तुम्हाला असं वाटेल की, ‘अरे, आपली आईही अशीच आहे, तीही असंच करते’. हे वाचताना तुमच्या मनात तुमच्या आईची प्रतिमा तरळेल.
आईची तपश्चर्या तिच्या मुलाला लायक माणूस बनवते. आईचं प्रेम तिच्या मुलाला मानवी संवेदनांनी परिपूर्ण करून टाकतं. आई केवळ एक व्यक्ती, एक व्यक्तित्व नाही, तर आई हे एक तत्त्व आहे. आमच्याकडे म्हणतात- भाव तसा देव. तसंच आईच्या बाबतीत आहे. ज्याच्या मनात आईविषयी जशा भावना असतील, तशी त्याला त्याची आई दिसेल.”
१५ ऑगस्ट २०२२ रोजी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाचे भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, ‘महिलांचा अनादर करू नका.’ पण नुसते म्हणून काय होते? तसे करणाऱ्या आपल्या पक्षातल्या नेत्यांवर आजवर त्यांनी कुठली कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नसल्याचा वादग्रस्त केला. त्याला प्रत्युत्तर करताना भाजपने ४ मार्चपासून ‘मोदी का परिवार’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली. देशभरातील भाजपनेत्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ‘मोदी का परिवार’ या टॅगलाईनचा समावेश केला. मोदींनीही ‘देशातील १४० कोटी देशवासी माझे कुटुंब असल्याचे सांगत ‘तुम्ही मोदींचे, मोदी तुमचे’ ही घोषणा दिली.
१७ मार्च रोजी राहुल गांधी यांनी मुंबईतल्या सभेमध्ये बोलताना म्हणाले होते – “हिंदू धर्मामध्ये शक्ती हा शब्द आहे. आम्ही शक्तीविरोधात लढत आहोत. ही शक्ती नेमकी काय आहे? राजाचा जीव ईव्हीएम, ईडी, सीबीआय यांच्यामध्ये असून आम्ही या शक्तीविरोधात लढत आहोत.” त्याला प्रत्युत्तर देताना १८ मार्च रोजी तेलंगणातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “माझ्यासाठी प्रत्येक माता-भगिनी ही शक्तीचे स्वरूप असून मी त्यांची पूजा करतो. विरोधकांना या शक्तीला संपवायचे आहे, तर मी त्यांचे आव्हान स्वीकारतो. मी माझ्या प्राणांची बाजी लावून माझ्या माता-भगिनींचे संरक्षण करेन.”
त्यामुळे असा प्रश्न पडतो की, मोदींची देशातल्या माता-भगिनींना शक्ती मानणारी विधाने ही केवळ ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’ तर नाही ना? कारण मग स्वत:च्या आईचा महिमा गाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वत:ला ‘मोदी का परिवार’ म्हणून घेणारे भाजपनेते इतरांची आई, बहीण, मुलगी, पत्नी यांच्याबाबत अनुदार, असभ्य, असंस्कृत, अभद्र, गलिच्छ आणि विकृत स्वरूपाची भाषा का वापरतात?
(या लेखासाठी मेधा कुलकर्णी आणि सूरज सामंत यांनी दिलेल्या माहितीचा विशेष उपयोग झाला आहे. विशेष आभार.)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment