निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा मानला जातो. कोणत्याही लोकशाही राष्ट्रात जनसामान्यांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब निवडणुकीतील मतदानाद्वारे उमटत असते. जनतेला नको असणारे सरकार आणि नको असणारे नेते, यांना नाकारण्याचा अधिकार मतपेटी देते. पण यासाठी निवडणुका ‘धनमुक्त’ आणि ‘भयमुक्त’ असाव्या लागतात. तसेच त्या धर्म, जात, वंश, पंथीयांच्या प्रभावापासूनही मुक्त असाव्या लागतात. पण प्रत्यक्षात जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात लोकशाही प्रक्रिया परिपक्व आणि आदर्श होण्याआधीच तिची घसरण सुरू झाली.
स्वातंत्र्य मिळाल्यावर काही काळातच निवडणुकांचे स्वरूप बदलायला सुरुवात झाली. धनशक्ती आणि दंडशक्तींनी निवडणूक प्रक्रियेत शिरकाव केला. ‘नोट लो, वोट दो’ ही घोषणा बनली. मतांचा बाजार भरू लागला. मतदारांना आमिषे दाखवली जाऊ लागली. या आमिषांनी साड्या ते वॉशिंग मशीन, अशी चढती भाजणी पकडली. मतदारांना आमिषे देण्यासाठी धार्मिक उत्सवांचा वापर होऊ लागला. महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते धार्मिक मंडळांचा सत्तेकडे जाण्याची शिडी म्हणून वापर करू लागले.
बघताबघता कधीही साजरे न होणारे धार्मिक उत्सव धूमधडाक्यात साजरे होऊ लागले. कार्यकर्त्यांना धर्माचे सुरक्षा कवच आणि प्रचंड पैसा हे दोन्हीही मिळू लागले. धार्मिक उत्सव साजरे करण्याची आर्थिक गणिते आकाशाला भिडू लागली. धार्मिक मंडळे उत्सव साजरे करण्यासाठी फक्त जनतेकडून, आणि व्यापाऱ्यांकडूनच नाही, तर लोकप्रतिनिधींकडूनही प्रचंड पैसा घेऊ लागली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आपल्या राजकीय विचारधारेच्या विजयासाठी रक्त आटवून आणि चपला झिजवून प्रचार करणारा कार्यकर्ता लुप्त होऊ लागला. त्याची जागा रोजंदारीवर काम करणाऱ्या, बाटली हातात घेऊन बिर्याणीवर ताव मारणाऱ्या, बुलेट किंवा जीपने हिंडणाऱ्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी घेतली. त्याचबरोबर जात आणि धर्म यांची गणिते सुरू झाली. मतदार आणि मतपेट्या यांचा ताबा ‘बाहुबली’ घेऊ लागले. मतदार खरेदीबरोबर माध्यमेही खरेदी केली जाऊ लागली.
निरनिराळ्या मार्गांनी, विविध सामाजिक उपक्रमांच्या नावाखाली वर्षभर भावी उमेदवार प्रचाराची राळ उठवू लागले. लोकप्रतिनिधींना जनतेच्या कामासाठी दिला जाणारा ‘निधी’ हा त्यांचा ‘प्रचारनिधी’ बनला. बघता बघता निवडणुकांचे खर्च कोटींची उड्डाणे करू लागले. निवडणुकीचा खर्च ही भावी राजकीय व्यवसायाची गुंतवणूक बनली. या खर्चाची दामदुपटीने वसुली, निवडून येणारे उमेदवार जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेच्याच पैशांवर डल्ला मारून करू लागले. फाटक्या चपला घालणारा राजकीय कार्यकर्ता साधा नगरसेवक झाला की, वर्षभरातच ‘फॉर्च्युनर’मधून हिंडू लागला. आमदार-खासदारांची बातच वेगळी. त्यात मंत्रीपद हाती लागल्यावर तर संपत्तीचे इमले उभे राहू लागले.
निवडणूक हे भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र बनू लागले. निवडणुकांच्या या बदलत्या स्वरूपामुळे निवडणुकीच्या राजकारणातून सुशिक्षित, सज्जन, सार्वजनिक जीवनात नैतिकतेचा आग्रह धरणारी, विशिष्ट राजकीय विचारधारेवर श्रद्धा ठेवून निरलसपणे सामाजिक सेवा करणारी, वेळ येईल तेव्हा जनतेसाठी लढून तुरुंगवास पत्करणारी माणसे हद्दपार झाली. कार्यकर्ते बदलले, तसेच नेते बदलले.
या अध:पतनाची सुरुवात सामान्य कार्यकर्त्यापासून झाली की, नेत्यांपासून झाली, हे ठरवणे कठीण असले, तरी नेत्यांची सत्तापिपासू वृत्ती, हे त्याचे सर्वांत मुख्य कारण आहे, असे आम्हाला वाटते. नेते सत्तापिपासू का बनत गेले, याचे स्वतंत्र विश्लेषण करावे लागेल. सत्ता टिकवण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा बिनदिक्कत वापर सुरू झाला. त्याचबरोबर कपडे बदलावेत, इतक्या सहजतेने नेते पक्ष बदलू लागले आणि वैचारिक निष्ठाही! ‘आयाराम-गयाराम’ हा राजकारणाचा दुसरा मंत्र बनला.
भारतीय राजकारणातील या सर्व बदलांची सुरुवात करून राजकीय नैतिक अध:पतनाचा पाया काँग्रेसने घातला, हे मान्य केले, तरी भाजपने यावर फक्त एका दशकातच कळस चढवला, हेही मान्य करावे लागेल. या कर्तृत्वाला भाजप हा राजकीय पक्ष आणि त्याच्यामागे उभे असणाऱ्या सर्व हिंदुत्ववादी संघटना या जबाबदार आहेतच, पण याचे मुख्य श्रेय जाते, ते त्यांचे नेतृत्व करणाऱ्या जोडगोळीला. या जोडगोळीने भारताच्या राजकारणाच्या नैतिक अध:पतनाचा नवा इतिहास लिहिला असेच म्हणावे लागेल.
काँग्रेसच्या नैतिक राजकारणाची घसरण ही दिशाहीन होती. त्याच्यामागे एक निश्चित सूत्र नव्हते. भाजपने भारतीय राजकारणात घडवलेल्या नैतिक घसरणीमागे ‘मनुवादी हिंदुत्वा’चे एक निश्चित सूत्र आहे. मुळात संघाची स्थापना ही ‘हिंदुराष्ट्रा’चे स्वप्न शेकडो वर्षे उराशी बाळगणाऱ्या ब्राह्मण्यवाद्यांनी त्या उद्दिष्ट्याकडे जाण्यासाठी केली. यात ‘हिंदुराष्ट्र’ हा बहाणा होता. ‘हिंदुराष्ट्र’ म्हणजे जातिव्यवस्थेतील पाचही वर्णांच्या समान हक्कांचे राष्ट्र. पण खरे उद्दिष्ट ब्राह्मण श्रेष्ठत्वाची प्रतिष्ठापना म्हणजे ‘मनुवादी हिंदुराष्ट्र’ हे होते.
तसे पाहिले, तर हे धार्मिक उद्दिष्ट आहे, पण या मागे एका विशिष्ट समूहाचा प्रचंड स्वार्थ दडलेला होता. स्वातंत्र्य मिळाल्यावर लोकशाही प्रस्थापित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे एक भक्कम प्रजासत्ताक स्थापन झाले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त संघ पुरेसा नाही, एका राजकीय चेहऱ्याची गरज आहे. त्यासाठी संघाच्या मागे ‘जन’ हा शब्द लावून १९५१मध्ये ‘जनसंघ’ या राजकीय चेहऱ्याची स्थापना करण्यात आली.
संघात इतर धर्मीयांना आणि स्त्रियांना प्रवेश नाही. संघाचे नेतृत्व आणि सूत्रे ही कायम ब्राह्मणांच्या हाती राहतील, अशी व्यवस्था आहे. जनसंघात मात्र इतर जातींना आणि स्त्रियांना प्रवेश देऊन, त्यांना ‘हिंदुराष्ट्रा’च्या मायाजालात अडकवून, राजकीय सत्तेचे गाजर दाखवत, त्यांचे पद्धतशीर ‘ब्राह्मणीकरण’ करणे सोपे झाले.
हे करून संघाने समांतर काम करत देशातील सर्व यंत्रणांमध्ये ब्राह्मण्यवादी पेरण्याचे काम अत्यंत पद्धतशीरपणे चालूच ठेवले. खरे उद्दिष्ट झाकण्यासाठी त्याला सामाजिक कामाचा मुलामा चढवण्यात आला. काही दशके या पद्धतीने काम केल्यावर संघाच्या लक्षात आले की, हे पुरेसे नाही. देशाची सत्ता अशी हाती येणे सोपे नाही. त्यात इंदिरा गांधींनी पुकारलेली आणीबाणी संघाच्या पथ्यावर पडली. थोर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचंड आंदोलन उभे राहणे, त्यामध्ये संघ नेते नानाजी देशमुख यांचा सहभाग असणे, समाजवादी नेते राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला जिंकून न्यायालयाने इंदिरा गांधींवर निवडणूक लढवण्याची बंदी घालणे, या सर्व परिस्थितीतून इंदिरा गांधी आणीबाणीच्या निर्णयापर्यंत पोहोचणे, देशातील सर्व विरोधकांना त्यांनी तुरुंगात टाकणे आणि अचानक आणीबाणी उठवून पुन्हा निवडणुका घेणे, या सर्व घटनांमागे अनेक सत्ये आणि षडयंत्रे दडलेली आहेत, असे आम्हाला वाटते. त्यांचे संशोधन होणे गरजेचे आहे.
आणीबाणीने समाजवादी आणि जनसंघ या, तात्त्विकदृष्ट्या दोन टोकांना असलेल्या दोन राजकीय शक्तींना ‘जनता पक्ष’ या नावाखाली एकत्र आणले. ही ‘अनैसर्गिक युती’ होती. ती टिकणे कदापि शक्य नव्हते, पण यामुळे या दोन्ही शक्ती केंद्रात निर्विवाद बहुमताने सत्तेवर आल्या. केंद्रात सत्तेवर येण्याचा पुरेपूर फायदा संघाने घेतला आणि देशाच्या सर्व यंत्रणा पोखरण्यास सुरुवात केली. आता जनता पक्षातून बाहेर पडून पुन्हा स्वतंत्र अस्तित्व धारण करणे गरजेचे होते. शेवटी त्यांनी जनता पक्ष फोडला. त्याचे खापर समाजवादी नेत्यांवर फोडण्यात यश मिळवले; जसे फाळणीचे खापर महात्मा गांधींच्या डोक्यावर फोडण्यात यश मिळवले. पण बाहेर पडताना त्यांनी ‘जुन्या बाटलीतील दारू’ तीच ठेवून बाटलीचे नाव बदलले, ‘भाजप’!
एवढे करूनही भाजपला केंद्रातील सत्ता हुलकावण्याच देत राहिली. ‘हिंदुराष्ट्रा’च्या इमारतीचा पाया आहे मुस्लीम द्वेष. भाजपच्या राजकारणाचा पायाही तोच असणे स्वाभाविक आहे. मुस्लीम द्वेषाचे विष हिंदूंच्या जातींना एक करते, हे त्यांच्या फार पूर्वीच लक्षात आले होते. यातून हिंदूंची एक मतपेटी तयार होऊ शकते. या मतपेटीद्वारे निर्विवाद बहुमत मिळाले की, संविधान बदलणे सोपे होईल, पण त्यासाठी मुस्लीम द्वेषाची देशव्यापी मोहीम गरजेची होती.
‘रथयात्रा’ आणि ‘बाबरी मशीद’ या घटनांनी हे काम केले. हे सर्व कितीही विषारी असले, तरी यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना दाद द्यायला हवी. दुसरी दाद त्यांना द्यायला हवी, ती नरेंद्र मोदी या कार्यकर्त्याला पोतडीतून अचानक बाहेर काढून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल… भले या निर्णयाने त्यांच्या भारताचे पंतप्रधान होण्याच्या प्रदीर्घ काळ उराशी बाळगलेल्या स्वप्नाचे तुकडे झाले असले तरी! मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या ‘वजीरपदी’ अमित शहा विराजमान झाले आणि भारतीय राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाला.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होताच गोध्रा घडले. त्यांना या घटनेचा प्रचंड फायदा झाला. देशातील हिंदूंच्या गळ्यातील ते ताईत बनले. त्यांना आता देशाच्या सर्वोच्चपदाची स्वप्ने पडू लागली. तेथे पोहोचण्यासाठी ‘विकासपुरुष’ म्हणून त्यांची प्रतिमा उभी करणे गरजेचे होते. तसेच काँग्रेस नालायक आणि भ्रष्ट आहे, असा माहोल उभा करणे गरजेचे होते.
मोदींच्या मदतीला अदानी, अंबानी आणि काही उद्योगपतींची फौज उभी राहिली. काँग्रेसची सत्ता असूनही माध्यमे ताब्यात घेण्यात आली. मदतीला संघाने पेरलेली प्रशासनातील, पोलीस यंत्रणेतील, न्यायव्यवस्थेतील, शिक्षणव्यवस्थेतील मंडळी, व्यापारी आणि उद्योगपती होतेच. मोदींची प्रतिमा उभी करण्यासाठी जागतिक मार्केटिंग कंपन्या कामाला लागल्या. ‘गुजरात मॉडेल’ उभे करण्यात आले. मोदींचे सत्य शोधून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चुचकारण्यासाठी भाडोत्री ‘ट्रोलिंग ब्रिगेड’ उभे करण्यात आले. शेवटचा घाव घालण्यास केजरीवाल आणि अण्णा हजारे सरसावले. शेवटी, मोदी पंतप्रधान झाले आणि देशाच्या राजकारणाचा आणखीन एक नवा अध्याय सुरू झाला.
या काळात भाजप या राजकीय पक्षाने राजकारणातील सर्व साधनशुचितांना पूर्ण तिलांजली दिली. ‘हिंदुराष्ट्रा’चे स्वप्न बाळगणारा हा राजकीय पक्ष, म्हणजे एका धर्माधिष्ठित राष्ट्राचे हे स्वप्न. धर्म आणि नीती यांचा तर अविभाज्य संबंध असला पाहिजे. धर्माचा बुरखा घेऊन राजकारण जे करतात, त्यांना धर्म आणि नीती यांच्या संबंधांची गरज वाटत नसते, पण धर्माचा बुरखा त्यांच्या अनैतिक राजकारणाला नैतिक अधिष्ठान मात्र देत असतो.
सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे मोदी सत्तेवर येताच अल्पावधीतच देशाचे राजकारण एका व्यक्तीच्या भोवती फिरू लागले. यामध्ये अमित शहा यांना बेदखल करून चालणार नाही. पण अजून तरी ते मोदींचे निष्ठावन ‘वजीरेआझम’ वा ‘चाणक्य’ मानावे लागतील.
मोदींनी देशातील सर्व प्रशासकीय यंत्रणा, तपास यंत्रणा, लष्कर, न्यायव्यवस्था, माध्यमे दावणीला बांधली. मंत्रीमंडळ आणि पक्ष यांची सामूहिक निर्णय प्रक्रिया संपू लागली. देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाकडे नेण्याचा आणि देशाला आधुनिकतेकडे नेण्याचा कोणताच ठोस आराखडा नसल्याने ते धडाधड नोटबंदी, जीएसटी, कृषी कायदे, एनआरसी, ३७० कलम हटाव सारखे निर्णय घेऊ लागले. देशापुढे खोटी आकडेवारी फेकण्यात येऊ लागली.
कोविड ही सामान्यांसाठी आपत्ती आणि मोदी यांच्या उद्योगपती मित्रांसाठी इष्टापत्ती ठरली. या काळातही जनतेचे लक्ष होणाऱ्या दुरवस्थेवरून उडावे म्हणून टाळ्या-थाळ्या-दिवे, अशा बालिश सामूहिक कवायती करण्यात आल्या. अल्पावधीतच त्यांच्या मर्जीतील एक-दोन उद्योगपतींनी देशाच्या सार्वजनिक उद्योगांना ताब्यात घेण्याचा सपाटा लावला.
देशाचे कृषिक्षेत्र मित्रांच्या घशात घालण्यासाठी कृषी कायदे निर्माण केले गेले. नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टीने अत्यंत संपन्न अशी काश्मीर, लडाख, मणिपूरसारखी राज्ये, मित्रांच्या घशात घालण्यासाठी कायदे बदलले जाऊ लागले. देशाच्या संपत्तीचा मोठा वाटा दोन-चार उद्योगपतींच्या मुठीत गेला. मोजक्याच उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केली गेली. बँकांना बुडवलेले अनेक उद्योगपती देश सोडून दिवसाढवळ्या परदेशांत जाऊन लपले, ते वेगळेच. देशावरील कर्जाचा डोंगर अनेक पट वाढला. जीडीपी घसरू लागला. रुपयाची पत घसरू लागली. महागाई विकोपाला गेली. बेकारीने शिखर गाठले.
दुसऱ्या बाजूला हे सर्व झाकण्यासाठी पटेलांचा भव्य पुतळा, राममंदिर उभे केले गेले. आपण करत असलेली कृत्ये आणि चुका झाकण्यासाठी, जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठी विविध वाद सातत्याने उकरून काढण्यात येऊ लागले. धार्मिक उन्माद पेटवण्यात येऊ लागले. बुवा-बाबा महाराजांच्या फौजा मोकाट सुटू देण्यात आल्या. माध्यमे २४ तास अशा वादांमध्ये जनतेला गुंगवून ठेवू लागली. यातूनच ‘गोदी मीडिया’ या शब्दाने जन्म घेतला.
हे पुरे नाही म्हणून समाजमाध्यमांमधून मोदींवर टीका करणाऱ्या व्यक्तींवर अत्यंत अश्लाघ्य टीकेचा भडिमार करणाऱ्या ‘अंधभक्त’ नावाच्या जमातीनेही जन्म घेतला. प्रत्येक क्षेत्रात ‘अंधभक्त’ जन्म घेऊ लागले. मोठमोठ्या, अगदी विद्वानांच्या कार्यक्रमात मोदींचे नाव घेण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यांच्या द्रष्टेपणावर स्तुतिसुमने उधळण्यात येऊ लागली. मोदींनी आपल्याकडे कटाक्ष टाकला, एवढ्यावर भलेभले ‘कृतकृत्य’ होऊ लागले.
कलाक्षेत्रही वेठीला धरून दर्जाहीन प्रचारकी चित्रपटांचा मारा सुरू झाला. हिंदुत्वाला जो कोणी विरोध करून धर्मनिरपेक्षतेची भूमिका मांडेल, त्याला पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येऊ लागला. जो कोणी मोदींना विरोध करेल, त्याला ‘राष्ट्रद्रोही’ ठरवण्यात येऊ लागले.
मोदींमधील स्वप्रेमी, स्वयंमग्न, एककल्ली, एकाधिकारवादी व्यक्ती वेगाने बाहेर पडू लागली. त्यांना प्रश्न विचारलेला आवडेनासा झाला. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता आले, तर फजिती होईल, ही भीतीही यामागे असावी. किंवा ‘मला प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत कशी झाली?’ हा अहंकारही असावा. त्यामुळे पत्रकारांना सामोरे जायचे नाही, हे त्यांनी सुरुवातीपासून ठामपणे ठरवले. जनतेशी ते एकतर्फी संवाद साधू लागले.
सुरुवातीपासून ते दिवसातून अनेकदा कपडे बदलत होतेच, कपडेही महागडे डिझायनर वेयर. आता ते विविध वेषांत, विविध ‘लोकेशन्स’वर ‘फोटोसेशन्स’ करू लागले. पुलवामा घडले, तेव्हा ते अशाच एका फोटोसेशनमध्ये मग्न होते. त्यांच्या छायाचित्राच्या चौकटीतही येण्याची त्यांच्याच पक्षातील नेत्यांची हिंमत होईनाशी झाली. प्रत्येक नव्या गोष्टीचे, प्रकल्पाचे, रेल्वे स्टेशनचे, विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान करू लागले. अनेक जुन्याच प्रकल्पांची, योजनांची नावे बदलण्यात येऊन, त्या नव्या असल्याचा दावा करण्यात येऊ लागला.
प्रत्येक निर्णय त्यांचा, प्रत्येक श्रेय त्यांचे! ते आले आणि स्वातंत्र्य मिळाले, ते आले आणि देश निद्रेतून जागा झाला. ते आले आणि जग देशाला मान देऊ लागले. ते आले आणि देश श्रीमंत झाला, ते आले आणि विज्ञान आले. ते आले आणि सर्व काही घडले...
‘आजपासून २५ वर्षांनी आम्ही महासत्ता बनणार’ या स्वप्नांमध्ये जनता गुंग झाली. ते मोदी सत्तेवर येण्याआधी हा देश आदिम, अर्धनग्न, अडाणी, असंस्कृत, भुकेकंगाल, बेकार, विज्ञानाची तोंडओळख नसलेला, जगात किंमत नसलेला असा होता, अशा कथा प्रसृत केल्या जाऊ लागल्या. त्यांच्या आयुष्याचे दंतकथेत रूपांतर करून पुस्तके लिहिली जाऊ लागली. अनेक लोकांना हे खरेही वाटू लागले. या सर्वांतून स्वतःबद्दल अवास्तव भावना निर्माण होत ते वैज्ञानिकांना विज्ञान शिकवू लागले, डॉक्टर्स ना प्लॅस्टिकसर्जरी शिकवू लागले आणि बिल गेट्सना ‘एआय’! त्यांचे अज्ञान आणि हास्यास्पद वागणेही कौतुकाचा विषय बनू लागले.
पण याचबरोबर जो जो विरोधी आहे, जो जो टीकाकार आहे, ज्याच्यापासून थोडाही धोका आहे, त्याला सर्व मार्ग वापरून संपवण्यात येऊ लागले. ईडी आणि सीबीआय हे फक्त मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर विरोधकांवर हल्ले करू लागले. सर्वोच्च न्यायालयाचा आणि काही अत्यल्प न्यायाधीशांचा अपवाद वगळता न्यायव्यवस्थाही दावणीला बांधली गेली. अमित शहांना अडचणीत आणणाऱ्या न्या. लोयांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून ‘सांभाळून राहा, नाहीतर लोया होईल’ असा वाक्प्रचार प्रचलित झाला.
या सर्वांमुळे विरोध करणारे नेते तुरुंगात विनाचौकशी सडू लागले. इंदिरा गांधींनी विरोधकांना राजकीय बंदी केले. राजकीय बंद्याला जनतेची सहानुभूती मिळते, हा धडा स्वतः मोदींनी आणीबाणीत तुरुंगात न जाता घेतला. मोदींच्या म्हणण्यानुसार आणीबाणीत ते वेष पालटून पोलिसांना चकवत कार्यकर्त्यांना मदत करत होते. आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले नेते बाहेर आले आणि जननायक झाले.
कदाचित हे पाहून मोदींनी ठरवून टाकले असावे की, विरोधकांना तुरुंगात पाठवायचे, पण गुन्हेगार ठरवून! हे शक्य झाले नाही, तर संघप्रणित यंत्रणा त्यांच्या पारंपरिक मार्गांनी विरोधकांचे चारित्र्यहनन करून, त्यांच्या विरुद्ध खोटानाटा प्रचार करून हे काम करेल.
डाव्या विचारांच्या संस्था संपवण्याचे नियोजन करून त्याचा धडाका लावण्यात आला. डाव्यांना ‘अर्बन नक्षलवादी’ ठरवून अतिरेक्यांसारखी वागणूक देण्यात येऊ लागली. याच्याविरुद्ध स्वपक्षातील गुन्हेगार, बलात्कारी, भ्रष्ट नेते ‘देशप्रेमी’, ‘संस्कारी’ ठरवण्यात येऊ लागले. ‘मुकाट आमच्या पक्षात या आणि मोदींच्या पायापाशी लोळण घ्या, नाहीतर तुरुंगात जा’, हा राजकीय पर्याय बनला. मुळातच भ्रष्ट असणारे अनेक विरोधी नेते गद्दारी करून ‘लाचार’ बनले. ज्यांनी हा पर्याय स्वीकारला, ते लाल दिव्यांच्या गाडीतून हिंडू लागले. त्यांच्यावर असणारे सर्व आरोप दूर करून त्यांना ‘शुद्ध’ करून घेण्यात येऊ लागले.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
‘इलेक्टोरेल बाँड’ नावाच्या मोदी सरकारच्या ‘व्हाईट कॉलर फ्रॉड’ची ‘क्रोनोलॉजी’ समजून घेतली पाहिजे…
इलेक्टोरेल बाँड’ प्रकरणानंतर ‘मोदीकालीन भारता’तील राजकारणानं एक जबरदस्त वळण घेतलं…
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही!
बहुधा भाजप ‘गंगे’सारखा ‘पवित्र’ असावा. ती गंगा कशी आहे, तेवढे मात्र ‘तपासून’ घ्यावे लागेल…
.................................................................................................................................................................
भाजप हा पक्ष सर्व अनैतिक कृत्ये करणाऱ्यांना शुद्ध आणि स्वच्छ करणारे ‘धुलाई यंत्र’ बनला. ज्यांनी हा पर्याय नाकारला, त्यांची रवानगी भ्रष्टाचारांच्या आरोपावरून तुरुंगात करण्यात आली. याचबरोबर मोदींनी देशातील सर्व महत्त्वाच्या पदांवर मर्जीतील निष्ठावन ‘होयबा’ बसवण्याचा सपाटा लावला.
कोणत्याही पदावर येणाऱ्या व्यक्तीची संघ पार्श्वभूमी महत्त्वाची ठरू लागली. एखाद्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने मोदींची आज्ञा पाळण्यात कुचराई केली, तर तिला हटवण्यात येऊ लागले. यातून ‘जशी आज्ञा महाराज’ म्हणणाऱ्या अधिकारी आणि नेत्यांच्या फौजा उभ्या राहिल्या. जो आज्ञेचे पालन करेल, त्याच्यावर पदांची खैरात होऊ लागली. ‘अग्निवीर’ योजनेच्या नावाखाली सैन्यात आपली माणसे घुसवण्याचे नियोजन करण्यात आले.
मोदी आणि अमित शहा क्षणभरही शांत न राहता सतत निवडणुकीच्या ‘मोड’मध्ये राहत गेले, हा त्यांचा आणखीन एक विशेष. प्रत्येक निवडणूक जिंकलीच पाहिजे, हा त्यांचा अट्टहास. त्यासाठी अपरंपार पैसा उभा केला जाऊ लागला. वर्तमानपत्रे आणि वाहिन्या यांच्यामार्फत प्रचंड प्रचार यंत्रणा उभ्या केल्या जाऊ लागल्या. लाखालाखांच्या सभा आणि लाखालाखांचे ‘रोड शोज्’ हा निवडणुकांचा अविभाज्य भाग बनला. विरोधकांचा काटा काढायचा, नाहीतर विरोधी पक्ष उभे फोडायचे, त्यांच्यात बंडाळ्या घडवायच्या. फुटलेल्या लाचारांना निवडणूक आयोगाने मान्यता द्यायची. विरोधी पक्षांची नावे बदलायची, चिन्हे बदलायची, त्यांची खाती गोठवायची. त्यांच्यावर कर आणि दंड लावायचे. विरोधक विरोध करण्याच्या अवस्थेतच ठेवायचा नाही, संपवून टाकायचा. एवढ्याने भागले नाही, तर ईव्हीएम आहेच!
या सर्वांवर कळस म्हणजे निवडणूक रोखे, देणगीच्या नावाखाली खंडणीला राजमान्यता! पुन्हा कोणी कोणाला देणगी दिली, हे जनतेला कळणार नाही, पण सरकारला कळेल अशी व्यवस्था. खंडणी द्या काम घ्या, ईडीची धाड टाकू नाहीतर खंडणी द्या! एखादी कंपनी आपल्या नफ्याच्या कित्येक पट देणगी कशी देऊ शकते, हा प्रश्न जनतेने विचारायचा नाही. खंडणीच्या या साखळीत सरकारचा साथी कोण, तर जनतेच्या पैशावर चालणारी स्टेट बँक ऑफ इंडिया.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
‘निवडणूक रोखे’ हे भाजपच्या राजकीय भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक आहे, तशीच ती भारतीय राजकारणाच्या अध:पतनाची परिसीमाही आहे. नुसते हे टोक बाहेर पडल्यावर भाजप नेत्यांनी मारलेल्या कोलांटउड्याही राजकीय निर्लज्जपणाची परिसीमा आहे. ‘काळा पैसा बाहेर काढण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे’, ‘निवडणूक रोखे चेकने घेतले जातात, म्हणजे तो पांढरा पैसा असतो’, ‘तुलनेत काँग्रेसला जास्त पैसा मिळाला आहे’, ते ‘हा एक प्रामाणिक प्रयोग होता’, असे प्रयोग फसू शकतात, अशा सर्व कोलांट्या भाजप आणि संघनेत्यांनी मारल्या.
भारतीय राजकारणाचे हे अधःपतन आपल्याला कुठे नेणार आहे, हा खरा प्रश्न आहे. भाजपचे लक्ष्य स्पष्ट आहे, ४०० पार. हे एकदा घडले की, भारतीय संविधान आणि अंतिमतः लोकशाही मोडीत काढणे सहज शक्य आहे. मोदींना रशियाच्या पुतिनसारखे सत्तेवर आमरण बसायचे आहे. संघाला हे मान्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. संघाने ‘गुजरात मॉडेल’च्या धर्तीवर ‘यूपी मॉडेल’चा प्रचार सुरू केला आहे. सर्व अंधभक्त आता यूपीच्या अफाट प्रगतीबद्दल (यूपी प्रत्यक्ष हिंडून न पाहताच) बोलू लागले आहेत.
यातून पुढचा नेता योगी आदित्यनाथ असणार, असे तर सुचवले जात नाही? ‘मोदी ते योगी’ असा भारतीय राजकारणाचा प्रवास हा राजकारणाच्या अध:पतनाचा नवा अध्याय आणि ‘भारत’ नावाच्या लोकशाहीचा अंताकडचा प्रवास असेल, यात शंका नाही!
देश वाचवायचा असेल, तर हा प्रवास इथेच थांबवावा लागेल. विरोधी पक्ष काय करतील, एकत्र येतील का, पर्यायी नेता कोण हे प्रश्न न विचारता भाजपला नाकारणे एवढीच भूमिका जनतेने ठेवली, तरी देश वाचेल हे निश्चित.
‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाच्या एप्रिल २०२४च्या अंकातून साभार.
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. अभिजित वैद्य ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
puja.monthly@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment