मनमोहनसिंग : देशाच्या विकासाला निर्णायक दिशा देणारा नेता
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग
  • Sat , 06 April 2024
  • पडघम देशकारण मनमोहनसिंग Manmohan Singh

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ.मनमोहनसिंग राज्यसभेतून निवृत्त झाले, ही बातमी माध्यमांच्या कोपऱ्यात लपून गेली. (जग जरी ‘मनमोहनसिंग’ या नावानं त्यांना ओळखत असलं, तरी ते मात्र स्वाक्षरी ‘मनमोहन सिंह’ अशी करत.) देशाचे माजी पंतप्रधान आणि त्या आधी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्री, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ एवढीच काही मनमोहनसिंग यांची ओळख नाही. आजचा जो विकसित भारत दिसतो आहे, त्यांची पायाभरणी करणारे मनमोहनसिंग आहेत.

पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून काम करताना मनमोहनसिंग यांनी या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाची जी मुहूर्तमेढ  केली, त्याची फळं आज आपण चाखत आहोत. म्हणूनच त्यांचं या नव्या भारतातलं स्थान आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचं वय आता ९१ आहे, म्हणजे ते एका अर्थानं राजकारणातूनही निवृत्त झाल्यासारखे आहेत, पण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा निरोप मनमोहन सिंग यांना देणं टाळलं. कारण ऐन निवडणुकीच्या वातावरणात मनमोहनसिंग यांना त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा निरोप देणं नरेंद्र मोदी यांना अडचणीचं वाटलं असणार.

शिवाय विरोधी विचारांच्या लोकांशी किमान उमदेपणानं वागल्याचे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या किरकिर्दीतले दाखलेही फारसे नाहीत. नरेंद्र मोदी यांच्याऐवजी जर आज अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असते, तर मनमोहनसिंग यांना सन्मानानं निरोप दिला गेला असता, यात शंकाच नाही. मनमोहनसिंग यांना देशातर्फे निरोप देणं भारतीय संसदीय लोकशाहीच्या उच्च परंपरेला साजेसं ठरलं असतं, पण हे कुणाला सांगणार आणि ते कुणाला कळणार? आधी म्हटल्याप्रमाणं विद्यमान सत्ताधार्‍यात तेवढा उमदेपणा नाही, सुसंस्कृतपणा  नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मनमोहनसिंग नावाच्या आपल्या या हिमालयाच्या उंचीच्या नेत्यांच्या सन्मानार्थ एखादा शानदार कार्यक्रम आयोजित करावा, एवढं शहाणपण पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेस पक्षाकडे उरलेलं नाही, हे तर वेगळ्या पातळीवरचं दारिद्र्य आहे.

देशाला विकासाच्या वेगळ्या वाटेवर नेणारं व्यक्तिमत्त्व एवढीच काही मनमोहनसिंग यांची ओळख नाही. त्यांच्या राजकारण आणि प्रशासनाला अर्थकारणांची खोलवार जाण होती. राजकारणाचा अर्थशास्त्रीय विचार करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. याचा अर्थ ते कुशल राजकारणी नव्हते असे नव्हे. अमेरिकेशी केलेल्या अणुकराराच्या वेळी तीव्र विरोध करणाऱ्या डाव्यांना एकटं पाडण्याचा मुत्सद्दीपणा त्यांनी कसा दाखवला आणि परिणामी देशाच्या डाव्यांची ताकद कशी क्षीण झाली, हे काही वेगळं सांगायला नको.

मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत जाहीरपणे बोलत नाही, म्हणून ‘मौनी बाबा’, ‘सोनियांच्या ताटाखालचं मांजर’ आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याकडून तर ‘देशाचा सर्वांत कमजोर पंतप्रधान’, अशी जहरी टीका त्यांना सहन करावी लागली, पण या टीकेला त्यांनी कधीच भीक घातली नाही, हेही तेवढंच खरं.

पक्षांतर्गत त्यांचे काही कमी विरोधक नव्हते, पण त्या कुणाबद्दलही मनमोहनसिंग कधीच आकसाने वागले नाहीत, कारण त्यांचा स्वभावच ऋजु आणि सुसंस्कृत होता. याचा अर्थ ते मुखदुर्बल होते असा नव्हे; जे काही बोलायचं ते संयत आणि ठामपणे बोलण्याची त्यांची शैली होती. मनमोहनसिंग यांचा पक्ष किंवा सरकारात कोणताही दबाव गट नव्हता; होता तो केवळ त्यांच्या विद्वतेचा आणि स्वच्छ प्रशासनाचा सात्त्विक दबदबा!

आता संसदीय आणि सक्रिय राजकारणातून डॉ. मनमोहनसिंग निवृत्त झाल्यातच जमा असलं,  तरी या देशाला आर्थिक खाईतून वर काढणारे, देशात विविधांगी प्रगतीच्या वाटा निर्माण करणारे आधी अर्थमंत्री आणि नंतर सलग दहा वर्षं पंतप्रधान राहणारे द्रष्टे नेते म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहणार आहे.

प्रदीर्घ काळच्या पत्रकारितेत मनमोहनसिंग यांना केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणूनही मला अनुभवता आलं. प्रसंग १९९३च्या फेब्रुवारी महिन्यातला. स्थळ नागपूरच्या रवी भवनातील हॉल. केंद्रीय अर्थमंत्र्याची पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकारानं एका राष्ट्रीयीकृत बँकेचा उल्लेख करून या बँकेच्या सेंट्रल अव्हेन्यू शाखेत नेहमीच जुन्या व फाटक्या नोटा मिळतात, अशी तक्रार केली आणि नवीन करकरीत नोटा देण्याचे आदेश त्या बँकेच्या व्यवस्थापकाला द्यावेत, अशी मागणी केली.

पत्रकार परिषदेत सन्नाटा पसरला, कारण ज्यांची अर्थशास्त्रज्ञ व तज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवर ओळख होती, ते डॉ. मनमोहनसिंग समोर होते आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना कोणता प्रश्न विचारू नयेत, याचं तारतम्य पूर्ण मातीत मिसळलेलं होतं. डॉ. मनमोहनसिंग यांनी एक पॉझ घेतला, नंतरच्या काळात सर्व परिचित झालेलं त्यांचं हलकंसं स्मित दिलं आणि ‘वुईच बँक’ असं विचारलं. त्या पत्रकारांनं बँक आणि शाखेचं नाव सांगितलं. ‘आय वुईल लुक इन टू द मॅटर’, असं डॉ. मनमोहनसिंग यांनी सांगितलं आणि ‘नेक्स्ट क्वश्चन प्लीज’ असं आमंत्रण पत्रकारांना पुढील प्रश्न विचारण्यासाठी दिलं. हे सगळं अचानक घडलं, तरी डॉ. मनमोहनसिंग यांच्या त्या शांतपणानं आम्ही स्तिमितच झालो.

दुसरा अनुभव तर हृद्यच आहे. जगातील काही प्रमुख देशांची शिखर संस्था असलेल्या जी-२० संघटनेची बैठक रशियातील सेंट पीटसबर्ग इथं २०१३मध्ये झाली. या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या चमूत एक पत्रकार म्हणून माझा समावेश झाला, तो विजय दर्डा यांच्यामुळे. त्या वेळी मी ‘लोकमत वृत्तपत्रसमूहा’त ‘राजकीय संपादक’ म्हणून दिल्लीत कार्यरत होतो. (बाय द वे, परदेशी दौऱ्यात तर पत्रकारांना सोबत सहभागी करून घेण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केली आहे.)

मायदेशी परतीच्या प्रवासात पंतप्रधानांनी उडणार्‍या विमानातच एक पत्रकार परिषद घेण्याचा रिवाज तेव्हा होता. (‘पंतप्रधानांच्या विमानातून’ अशी डेटलाईन असलेल्या बातम्या अनेकांना आठवत असतील.) त्याप्रमाणे पत्रकार परिषदेसाठी रशियातून भारतात परतताना, पत्रकार बसलेल्या विमांनाच्या मध्यवर्ती भागात डॉ. मनमोहनसिंग आले. सर्व पत्रकारांनी अदबीनं उठून उभं राहून त्यांना अभिवादन केलं. हात जोडून सस्मित पत्रकारांनी केलेल्या सामूहिक अभिवादनाचा स्वीकार केल्यावर, स्वत:च्या आसनाकडे जाण्याऐवजी त्यांनी प्रत्येक पत्रकाराच्या आसनाजवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन केलं. हे इतकं अनपेक्षित घडलं की, उपस्थित २२-२३ पत्रकारांपैकी कुणालाही डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचंही भान राहिलं नाही. अर्थात याची चुटपुट नंतर सर्वांनाच लागली.

महापालिकेचा तर सोडाच, नगर पंचायत किंवा पंचायत समितीचा सदस्य झाल्यावर माज ओतप्रोत अंगात भिनलेले लोकप्रतिनिधी गल्लीबोळात एका किलोग्रॅमला हजार पाहायला मिळत असल्याचे दिवस आलेले असताना, पंतप्रधानांसारख्या देशाच्या सर्वोच्च्चपदी असणार्‍या शिवाय उच्चविद्याविभूषित असणार्‍या या माणसाचा हा सुसंस्कृतपणा आणि नम्रता ‘वाखाणणे’ या शब्दात मुळीच मावणारी नाही. चार दशकांच्या पत्रकारितेत काही पंतप्रधान जवळून, तर काही लांबून पाहता आले, मात्र असा सच्चा साधा, नम्र आणि सुसंस्कृत पंतप्रधान केवळ डॉ. मनमोहनसिंग हेच एकमेव!          

.................................................................................................................................................................

हेहीवाचापहाअनुभवा

सिंग विल बी किंग, ऑल्वेज!

मोदींची ‘शक्ती’ आणि राहुलचा ‘न्याय’!

कहाणी रावांच्या ‘भारत बदला’ची

.................................................................................................................................................................

मनमोहनसिंग आता संसदीय आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यातच जमा होणार असले, तरी या देशाला आर्थिक खाईतून वर काढणारे, देशात विविधांगी प्रगतीच्या वाटा निर्माण करणारे आधी अर्थमंत्री आणि नंतर सलग दहा वर्षं पंतप्रधान राहणारे द्रष्टे नेते म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहणार आहे.

कोणत्याही वादळ-वार्‍याला न जुमानता एखाद्या विस्तीर्ण माळरानावर एकमेव हिरवा कंच, विस्तीर्ण, डेरेदार महावृक्ष अविचल उभा असावा, तसे भारतीय राजकारणात डॉ. मनमोहनसिंग किमान मला तरी कायम वाटत आले. ते काही कोणत्याच अंगानं राजकारणी नव्हते, ते होते एक सुसंस्कृत, अ‍ॅकेडेमिशियन, अर्थतज्ज्ञ. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना राजकारणात ओढलं आणि थेट देशाचं अर्थमंत्री केलं, तर सोनिया गांधी यांच्यामुळे ते पंतप्रधान झाले.

माणसांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन अनेकदा दृष्यमान नसलेल्या बाबींवरून करायचं असतं. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांनी देशात जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचं धोरण अंमलात आणलं; त्यांचं सरकार पायउतार झाल्यावर केंद्रात नंतर आलेल्या देवेगौडा, इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही सरकारांनी त्या धोरणात किंचितही बदल केला नाही, यावरून त्या धोरणांची आणि ते आखणार्‍या माणसाच्या दूरदृष्टीची महती लक्षात घ्यायला हवी.

पी.व्ही. नरसिंहराव यांनी पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व स्वीकारलं, तेव्हा देश एकाच वेळी अनेक अरिष्टांच्या खाईत सापडलेला होता. राजीव गांधी यांची नुकतीच हत्या झाल्यानं राजकीय आघाडीवर सैरभैरता होती; ‘मंडल आयोगा’च्या अंमलबजावणीनंतर देशभर आगडोंब उसळवण्यात आलेला होता, त्यामुळे देशाच्या अनेक भागात हिंसक वातावरणही होतं. त्यातच राममंदिराच्या उभारणीच्या नावाखाली हिंस्र धर्मांधतेची लाट देशभर निर्माण केली जात होती. देशाचं सोनं गहाण टाकलेलं होतं आणि आर्थिक वाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा खाली गेलेला होता.

नरसिंहराव यांनी देशाला या खाईतून वर काढलं, कारण त्यांना समर्थ साथ मिळाली, ती डॉ. मनमोहनसिंग यांची. (नरसिंहराव यांना डॉ. मनमोहनसिंग गुरू मानतात, हेही नोंदवून ठेवणं, जसं गरजेचं आहे, तसंच पक्षश्रेष्ठींकडून गुरूचा अक्षम्य अवमान झाला, तरी त्यांच्या या शिष्यानं त्यासंदर्भात आवाज न उठवता कायम नमतं घेतलं, याचीही नोंद घ्यायला हवीच.) पुढे पंतप्रधान झाल्यावर हीच धोरणं डॉ. मनमोहनसिंग यांनी शांत पण कणखरपणे राबवली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आज आपल्याकडे जी आर्थिक सुबत्ता आलेली आहे; आधुनिक तंत्र आणि यंत्रज्ञान अभिमानानं मिरवणारा मूलभूत सोयी-सुविधांच्या वाटांवर चालणारा जो देश दिसतो आहे, ती त्या धोरणाला लागलेली मधुर फळं आहेत. त्याबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना भारतीयांनी कायम बाळगायला हवी. डॉ. मनमोहनसिंग नावाच्या ३३  वर्षं राज्यसभेचं सदस्यत्व भूषवलेल्या सदस्यानं त्या धोरणांची बीजं पेरली होती, हे विसरता कामा नये. म्हणूनच डॉ. मनमोहनसिंग यांची राज्यसभेतून निवृत्ती ही एका माणसाची नाही, तर एका सुबत्त कर्तृत्वाची आहे. कधीही वायफळ न बोलता, स्वकर्तृत्वाचा कोणताही गाजावजा न करता, टिमकी न वाजवता ‘सिंग इज किंग’ हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असा ‘राजा’ लोकांच्या मनातून कधीच निवृत्त होत नसतो!

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. मनमोहनसिंग नावाचा हा वृक्ष अनेक वादळ-वार्‍यांना तोंड देत अविचल होता. त्यांना त्यांच्या तोडीचे सहकारी फारच कमी लाभले; त्यांचे बहुसंख्य सहकारी विचारानं खुरटे आणि उंचीनं खुजे होते. या खुरट्या आणि खुज्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना पूर्ण क्षमतेने काम करू दिलं नाही, उलट सतत अडवणूकच कशी केली, याचे असंख्य दाखले चर्चेत आहेत.

पक्षातूनही त्यांना कायम प्रखर विरोध झाला, सरकारात अनेक मंत्र्यांनी त्यांची अडवणूक केली. त्यांच्याच पक्षातील भावी नेतृत्वाकडून जाहीरपणे अवहेलना वाट्याला आली, तरी डॉ. मनमोहनसिंग नावाचा विशाल वृक्ष देशाला सुबत्तेची सावली देण्यासाठी अविचल राहिला. डॉ. मनमोहनसिंग नावाच्या या महावृक्षाची सुबत्त सावली, या देशाला यापुढेही अशीच मिळत राहो.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......