शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे?
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 05 April 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

८१)

‘हे कुठचे गाणे, असले कसले शब्द

गाऊन बघा ते, होइल जग नि:शद्ब

अक्षरे निरक्षर फसली जरि शब्दात 

जे अनिर्वाच्य ते अवतरते कंठात।।

जे अनिर्वाच्य ते अवतरते कंठात

ही फार गूढ ओळ आहे. जे बोलण्याच्या पलीकडचे आहे ते कंठात कसे अवतरेल? ह्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला गीतेच्या सातव्या अध्यायाकडे जावे लागेल-

‘रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।

प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।७:८।।’

पाण्यामधील चव म्हणजे मी आहे. चंद्र आणि सूर्यामधील प्रकाश म्हणजे मी आहे. वेदांमधील प्रणव म्हणजे मी आहे. मी अवकाशातील स्वर आहे आणि मी आहे मानवामधील कर्तृत्व! श्रीकृष्ण म्हणत आहेत की, मी स्वतः प्रणव आहे. प्रणव म्हणजे ‘ॐ’. हा ह्या जगातील सर्वांत पहिला स्वर म्हटला गेलेला आहे. हा ‘अ’, ‘ऊ’ आणि ‘म्’ अशा तीन मात्रा मिळून झालेला आहे. निर्मिती, मध्य आणि अंत अधोरेखित करणाऱ्या तीन मात्रा. 

‘ॐ’ अनिर्वाच्य आहे. तो परमेश्वराइतकाच कवेत न सापडणारा आहे. ‘ॐ’ म्हणजे परमेश्वरच आहे. शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे? ‘ॐ’ हे परमेश्वराच्या निर्मितीचे गाणे आहे. ते गाता आले तर बघा, ते आपल्या कंठात उमटवायचा प्रयत्न करा. सगळे जग निशब्द होऊन जाईल.

‘हे कुठचे गाणे, असले कसले शब्द

गाऊन बघा ते, होइल जग नि:शब्द’

जग निशब्द होऊन जाईल म्हणजे तुमच्या अवती भवतीच्या जगातील शब्द संपून जातील असे नाही. तुमचे जग निशब्द होऊन जाईल. तुम्हाला शब्दांची गरज राहणार नाही. अक्षरांना खरं तर हे जग सापडत नाही. ह्या अर्थाने ती निरक्षर असतात. ती शब्दात अडकून राहतात. जे अनिर्वाच्य आहे ते कंठात अवतरते. तसे सगळेच शब्द कंठात अवतरतात. पण हे शब्द बोलण्याची शक्ती म्हणजे परमेश्वर आहे.

‘प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु’

ज्या मूळ प्रणवातून वेदातील शब्द उमटले तो मी आहे. मी अवकाशातील स्वर आहे. मी मानवातील कर्तृत्व आहे.

‘जे अनिर्वाच्य ते अवतरते कंठात’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

८२)

‘पण लिहावयाचे लिहून झाले नाही

पण सांगायाचे सांगुनि झाले नाही

संपली कथा जी कुणी ऐकली नाही

संपली रात्र, वेदना संपली नही।।’

ह्या आयुष्यात काय पूर्णत्वास जाते? सगळे अर्धेमुर्धेच राहून जाते. लिहायचे ते लिहून होत नाही. सांगायचे ते सांगून होत नाही. एवढी सगळी निराशा होते, आणि कथा संपते. पण कुणाला ती कथा ऐकण्यात रस नसतो. जीवनाची रात्र संपली तरी वेदना संपते का? तर नाही! पुन्हा एकदा जन्म सुरू होणार असतो. पुन्हा सगळी फरफट सुरू होणार असते. पुन्हा एक अर्धी कहाणी सुरू होणार असते.

८३)

‘छे! तुटला पतंग तुटला मांजा दोरा

अंधार उतरला सुटला वादळ वारा

तो पहा फाटला पतंग खाऊनि गोते

चिमुकले पीस बघ घरटे शोधित होते।।

पतंग आकाशात असताना हवा अचानक बदलते. सगळे काही सुरळीत चालू असताना काहीतरी अचानक घडते. सगळे आयुष्य सैरभैर होऊन जाते. आयुष्याचा तुटलेला पतंग गोते खाऊन खाऊन फाटून जातो. उडता उडता पक्षाचे एखादे पीस मोकळे होते, किंवा उंचावर बसलेल्या पक्षाने अंग झाडले की, एखादे पीस त्याच्या पंखापासून मोकळे होते, ते दिशाहीनपणे हवेवर भिरभिरत राहते. त्याला आता परत घरट्यात जाता येणार असते का?

मानवी जीवनाच्या वादळात एखाद्या पिसासारख्या भिरभिरणाऱ्या जिवाला कधी विसावा मिळणार असतो का? हे सर्व तरंगलेपण - आपण कोठून आलो आहोत, कोठे जाणार आहोत, आपण येथे का आलो आहोत, ह्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे येते.

ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती, तर आपण आपण आपली सुखे खूप चवीने भोगली असती. आपली दुःखे आपण खूप शांतपणे भोगली असती. दुःख, दुःखाचे नसते. खरे दुःख माझ्याच वाट्याला का आले, ह्या प्रश्नामुळे असते. ज्ञान नसल्यामुळे सगळेच क्षणभंगूर आणि अर्थहीन ठरते.

‘There was the Door to which I found no Key;

There was the Veil through which I might not see:

Some little talk awhile of ME and THEE

There was—and then no more of THEE and ME.’

(समोर दार दिसते आहे, पण, ते मी उघडू शकत नाही

समोर पडदा आहे, त्यातून मी पार पाहू शकत नाही

आपण असतो तेव्हा तुझ्या-माझ्यात थोडी चर्चा होते

पण नंतर तुझे आणि माझे अशा नावाचे मागे काहीच उरत नाही)

८४)

‘फिरतसे काळजावरती करवत धार

पंखात घेत आकाश फिरतसे घार

थकलेले माती म्हणतसे पायदळीची

दाखवा वाट गर्भात परत जायाची।।

सगळे आकाश कवेत घेत घार आकाशात फिरत असते. पण घरट्यात माझी पिले सुरक्षित आहेत ना, ह्या भीतीची करवत तिच्या हृदयावर फिरत असते. माणसाची स्थितीसुद्धा अशीच असते. जीवनाचा कलह, जिवंत राहण्याचा कलह माणसाला करावाच लागतो. त्याचवेळी आपल्या कच्च्याबच्च्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मनाला डसत राहतो.

इतरही असेच अनेक कलह असतात. ह्या कलहाच्या वातावरणात वाटचाल करून जीव थकून जातो. आपण थकलो की, पायाखालचा रस्ताही थकून गेला आहे, असे वाटते. पायाखालची मातीही थकून गेली आहे असे वाटते. ह्या असहाय्य वाटचालीत आईच्या पदराखाली अनुभवलेली सुरक्षा आणि ऊब आठवते. वाटते परत जावे तिथे. किंबहुना, आईच्या गर्भाच्या उबेतच परत जाण्याची इच्छा होते.

मातीला आईच्या गर्भाची आठवण होते, ह्या कल्पनेवरून अध्यात्मात एक उत्क्रांतीवाद आहे त्याची आठवण होते. तो उत्क्रांतीवाद असा - ब्रह्म सगळ्या विश्वाच्या ठाई आहे. मातीच्या प्रत्येक कणातही ब्रह्म आहे. त्यामुळे मातीलाही स्वतःच ब्रह्मपद मिळवण्याची आस लागलेली असते. ह्या सगळ्या विश्वाचा प्रवास ब्रह्मत्वाच्या दिशेने सुरू असतो. हे जग म्हणजे माती आणि आत्मा ह्यांची जुगलबंदी आहे, ही भावना उमर खय्यामच्या कवितेतसुद्धा दिसून येते-

‘I tell you this—When, started from the Goal,

Over the flaming shoulders of the Foal

Of Heav'n Parwin and Mushtari they flung,

In my predestined Plot of Dust and Soul.’

(गुरू आणि सप्तर्षींच्या झगमगीत पंखांच्या मागून

जेव्हा दिले गेले मला पृथ्वीच्या दिशेने भिरकावून

मला माहीत होते, माती आणि आत्म्याच्या ह्या कथेमध्ये

घडणार सगळे - नियतीच्या हुकुमाने - आधीच ठरवले गेल्याप्रमाणे)

८५)

‘पश्चिमेस कलला निळ्या पुलाचा खांब

ओघळले त्यावर नक्षत्रांचे थेब

त्या पुलाखालुनी गेले उदंड पाणी

अन वाहुनि गेली अज्ञातातील गाणी

परत एकदा अप्रतिम प्रतिमा! आकाशाचा निळा पूल. सूर्य हा त्या निळ्या पुलाचा खांब. तो पश्चिमेला कलला. संध्याकाळ झाली, आणि हळूहळू त्या निळ्या पुलावर नक्षत्रांचे थेंब ओघळले. किती शांत मनःस्थितीत ह्या ओळी लिहिल्या गेल्या असतील! अशा ह्या पुलाखालून उदंड पाणी वाहून गेले आहे. कसले पाणी? कालाचे पाणी? आणि त्या पाण्यात अज्ञाताची गाणी वाहून गेली आहेत.

अज्ञाताची गाणी म्हणजे अज्ञाताने लिहिलेली मानवांची आयुष्ये? अज्ञाताने आपल्या अस्तित्वाने भारून सोडलेल्या मानवी आयुष्यांच्या होड्या? का ह्या निसर्गात फिरत राहतात ती असंख्य जिवांची, वृक्षांची आणि ऋतुंचीही चक्रे? किणीकरांच्या हातून लिहिली गेलेली ही अतिशय सुंदर रुबाई!

८६)

‘जे माझे होते माझे नाही उरले

नसताना ओळख श्वास सोबती झाले

छत कोसळले देवावर देवाघरचे

अन् जाळुनि कोळसे झाले उंबरठ्याचे।।

खरं तर ही रुबाई, व्यापारात वगैरे उद्ध्वस्त झालेल्या माणसाची आहे, असे वाटते. पण ही रुबाई इतकी सोपी नसावी, असा संशय दोन ओळींमुळे येतो. नसताना ओळख श्वास सोबती झाले आणि ‘अन् जाळुनि कोळसे झाले उंबरठ्याचे’ ह्या दोन ओळींमुळे ही ओळ मुमुक्षु अवस्थेतील माणसाची आहे, असे वाटते.

मुमुक्षुला परमात्म्याची आस लागलेली असते, पण त्याला परमेश्वराचा पूर्ण विश्वास वाटत नसतो. अर्धवट श्रद्धा, थोडा संशय. परमेश्वर मिळेल, असे वाटत असते, निश्चित आशा वाटावी, अशी थोडीदेखील प्रचिती आलेली नसते. हे देहातील, संसारातील सुख-दुःखांचे आयुष्य फोल आहे, असे त्याला वाटते. संसारात रस वाटत नाही.

‘जे माझे होते माझे नाही उरले’

तो ध्यान-धारणा करण्याच्या प्रयत्नात असतो. प्राणायाम वगैरे गोष्टी करायच्या प्रयत्नात असतो. श्वासावर नियंत्रण आणून मन स्थिर करायच्या प्रयत्नात असतो.

‘घेत आणि सोडीत राहावे प्रभंजनासी।’

श्वास घेत आणि सोडीत राहावे - हीच तपस्या हे रामदासांचे वचन पाळायच्या प्रयत्नात तो असतो. श्वासांची एक नवी ओळख त्याला झालेली असते.

‘नसताना ओळख श्वास सोबती झाले’

मूर्तीतील देवात फारसा अर्थ नाही. मूर्तीमागील तत्त्व भेटले पाहिजे असे त्याला वाटत राहते. ह्या अर्थाने ‘छत कोसळले देवावर देवाघरचे’ आणि घरात तर अजिबात रस वाटत नाही. वास्तूत रस राहत नाही, पैशात रस राहत नाही, इतकेच काय जवळच्या माणसांतही रस राहत नाही.

‘अन् जाळुनि कोळसे झाले उंबरठयाचे।।’

मनातून त्याने घराचा उंबरठा जाळून टाकलेला असतो. नामदेवांनी विठ्ठलाला ‘घर घेणा’ म्हटलेले आहे, ते ह्याच अर्थाने. मुमुक्षत्वावर नवीन मराठी काव्य परंपरेत किती कविता लिहिल्या गेल्या असतील?

८७)

‘रात्रंदिन वडवानळ जळतो आहे

ही आग आजची राख उद्याची आहे

जा घरी आपुल्या परत सखे दमयंती

अन् ओली असु दे तुळशीखाली माती ।।

रात्रंदिवस वणवा जळतो आहे. ही आजची आग उद्याची राख आहे. आजचे भीषण प्रश्न उद्या रक्षेत रूपांतरित होणार आहेत. आजची सुखेसुद्धा उद्याची राख असणार आहेत. मानवाने जग नाकारून कालातीत अशा परमेश्वराशी नाते जोडायला पाहिजे.

दमयंती नल राजाच्या प्रेमात पडली. कशी पडली? नल राजा कसा आहे ह्याचे वर्णन तिला एका हंसाने सांगितले आणि ती प्रेमात पडली. तिने स्वयंवरात देवांना नाकारले आणि नल राजाचा स्वीकार केला. त्यामुळे कली काल रागावला आणि तिच्या आयुष्यात विरह आणि दुःख आले. कालाने बद्ध असलेल्या ह्या जगात दमयंतीची निवड चुकीची ठरते. तुळशीने जसे श्रीकृष्णाला वरले त्याप्रमाणे तिने कालातीत अशा परम् ईश्वराशी नाते जोडायला पाहिजे होते. तिने तुळशीखालची माती ओली ठेवायला हवी होती. श्रद्धा म्हणा, अध्यात्म म्हणा, विसरायला नको होते.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

.................................................................................................................................................................

८८)

‘नि:शद्व निरामय निश्चल आणि निवांत

निखळल्या पायऱ्या तुटला फुटला घाट

वाहती खडावा, अरे कुणाची छाटी

डोहावर जळते बघ सूर्याची कवटी।।’

ही अजून एक प्रतिमा! निशब्द, निरामय, निश्चल आणि निवांत असा घाट आहे. पायऱ्या निखळल्या आहेत.

घाट आहे म्हणजे आजूबाजूला कुठेतरी स्मशान असणारच! त्यात कुणा संन्याश्याचे दहन झाले असावे. त्याच्या खडावा आणि त्याची छाटी ह्यांचे विसर्जन केले गेले आहे. त्या हळूहळू वाहत चालल्या आहेत. आणि अशा वेळी किणीकर लिहून जातात -

‘डोहावर जळते बघ सूर्याची कवटी’

ही शेजारीच चितेवर जळणाऱ्या ज्ञानसूर्याची कवटी आहे का? का सूर्य हे सुद्धा मायेचेच प्रतीक आहे? ती माया त्या डोहातल्या आगीमध्ये जळत आहे. का चैतन्य उडून गेले आहे आणि मागे फक्त जळणारा प्रकाश राहिला आहे? का डोहावर सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. आणि तो प्रकाशमान गोल पाहून जळणाऱ्या कवटीची आठवण येते आहे? शेवटी मानव सुद्धा चैतन्याचेच प्रतिबिंब आहे. येथे गीतेतील पाचव्या अध्यायातील सतरावा श्लोक आठवतो-

‘तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः।।५.१७।।’

आपले सारासार विचार करू शकणारे मन 'त्याच्या'पाशी सोपवून, आपले सगळे चैतन्य ‘त्याच्या’पाशी सोपवून, ‘त्याला’च आपले सर्वस्व आणि अंतिम ध्येय मानून; ते (कर्मसंन्यासी) तिथे जातात, जिथून कधीही परत यावे लागत नाही. त्यांची सगळी कर्मे ज्ञानाच्या पाण्यात वाहून जातात.

संन्यासी निघून गेला आहे, त्याची कवटी, त्याचे पार्थिव प्रतिबिंब डोहावर जळत राहिले आहे आणि त्याची कर्मे, त्याच्या खडावांसारखी आणि त्याच्या छाटीसारखी पाण्यात वाहून चालली आहेत. सगळा घाट नि:शब्द झाला आहे.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

रॉय किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही…

या दुनियेत प्रेषित म्हणून आलेले, बुद्ध म्हणून आलेले, अवतार म्हणून आलेले सगळे मृत्यू पावलेले आहेत. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, देव असो, कुणालाही मरण चुकत नाही

.................................................................................................................................................................

८९)

‘तू द्युती, देवयानी तू, तू दमयंती

रागिणी पूर्वजन्माची जयजयवंती

ये जवळ, गाऊ ये शेवटचे हे गीत

अन् दिवा मालवू विझावयाच्या आत।।

द्युती म्हणजे चमक, सौंदर्याची चमक, सुंदर कांती असलेली स्त्री! हे सुंदरी, तूच साक्षात सौंदर्याची प्रभा आहेस, तू देवयानी इतकी सुंदर आहेस, दमयंती इतकी सौंदर्यप्रभावती आहेस. तू पूर्वजन्मात कधीतरी मला मंत्रमुग्ध करून गेलेली रागिणी आहेस. तू साक्षात जयजयवंती आहेस. जयजयवंती हा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा अतीव सुंदर राग.

राग जयजयवंती, आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण करतो. पण त्याचबरोबर जयजयवंतीला दुःखाची किनार आहे. हातातून काहीतरी निसटून जाणार आहे ह्या भावनेतून येणाऱ्या दुःखाची किनार! पूर्वजन्मीपासून ओळख असलेली आणि अप्रतिम सौंदर्यवती अशी प्रेयसी लाभली आहे. उत्तररात्री ती मिठीतसुद्धा येते आहे. हा फार मोठा आनंद आहे. पण, आयुष्यातून जे जे काही प्रेयस आहे ते निघून जात असते ही जाणीव कुठेतरी त्या प्रियकराला दुःख देते आहे. किणीकर म्हणतात -

‘ये जवळ, गाऊ ये शेवटचे हे गीत

अन् दिवा मालवू विझावयाच्या आत

आपले प्रेम विझून जाण्याच्या आत हे शेवटचे गीत गाऊ. आपल्या प्रेमाचा दिवा मालवून जाण्याच्या आत एकमेकांच्या मिठीत येऊ. आपली आयुष्ये मालवून जाण्याच्या आत, एकमेकांच्या मिठीत येऊ! जयजयवंती ह्या रागाच्या सारखीच एकाच वेळी आनंदी करणारी आणि वियोगाच्या जाणीवेच्या दुःखात ढकलणारी ही अलौकिक रुबाई!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

९०)

‘भेटणार नाही, शपथ नको तू घालू

डोळ्यांत कोंडला श्वास, नको तू बोलू

जा घरी सांग लाजून जराशी नीट

जाताना चुकली पाणवठ्याची वाट ।।

प्रियकराने प्रेयसीला अडवले आहे. तिलाही ते अडवणे आवडले होते. एकमेकांच्या बरोबर वेळ कसा गेला ते कळले नाही. आता घरी जायला उशीर झाला आहे. ती अस्वस्थ झाली आहे. तिला काही सुचत नाहिये.

तिला जाणवते आहे की असे भेटणे लोकरीतीला धरून नाही. घरचे काय म्हणतील? कुणाकुणाला काय काय उत्तरे द्यायची?

ती त्याला पुन्हा असे न भेटण्याविषयी शपथ घालते आहे. श्वास कोंडल्यामुळे ती नीट बोलूही शकत नाहिये. तिच्या डोळ्यातून तिची अस्वस्थता दिसते आहे. तो तिची समजूत काढतो आहे - बरं बाई, नाही भेटणार आता. आज, पाण्याला जाताना वाट चुकल्याचे कारण घरच्यांना सांग, त्यात काय एवढे?

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......