अजूनकाही
तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विजय बाणकर यांचे ‘कबीरविचार’ हे पुस्तक नुकतेच विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
एकाच वेळी साहित्यिक आणि आध्यात्मिक साधक यांना आकर्षित करणारे, सामान्य माणसे आणि पंडित यांना भावणारे म्हणून संत श्रीकबीर यांचा उल्लेख करावा लागेल. विशेष म्हणजे कर्मकांड करणारेही त्यांना पुजतात आणि विद्रोही, बंडखोर लोकही त्यांना आपले मानतात. एकाच वेळी पांडित्य-समीक्षा करणारे कबिरांच्या शब्दांचे तर्ककठोर विश्लेषण करतात आणि संगीत क्षेत्रातील लोक कबिरांच्या पदांचे त्यातील शब्दसामर्थ्य अजमावत, भान विसरून गायन करतात. हिंदू आणि मुस्लीम या दोघांनाही ते भावतात, हे पुन्हा वेगळेच.
एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या समूहांना प्रभावित करण्याचे कबिरांचे सामर्थ्य हाच एक अभ्यासाचा विषय ठरावा. त्यामुळे हिंदीभाषिक जनतेपलीकडे कबीर इतर भाविकांनाही सतत हाकारत राहतात. त्यांच्या हिंदी भजनांचा चाहता वर्ग इतर भाषेत आहेच; पण त्यांच्या भेदक, स्पष्ट आणि नेमकेपणाने प्रहार करणाऱ्या आणि त्याच वेळी शब्दचमत्कृती असलेल्या भाषेचा मोह अनेक अनुवादकांना होतो.
‘भगवद्गीते’वर भाष्य व तिचे अनुवाद अनेकांनी केले असले, तरी ती जशी अनेकांना भावते; तशीच गोष्ट संत श्रीकबिरांच्या दोह्यांचीदेखील आहे. मंगेश पाडगावकर यांच्यापासून अनेकांना कबिरांच्या दोह्यांचा अनुवाद करावा, असे वाटले आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
डॉ. विजय बाणकर हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. नगर जिल्ह्यातील अकोले या दुर्गम तालुक्यातल्या महाविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय लोकप्रिय केला. अनेक महाविद्यालयांत या विषयाला विद्यार्थी मिळत नाहीत; पण मी स्वत: त्यांचा विद्यार्थी असताना अनुभवले आहे की, कला शाखेतील विद्यार्थ्यांपैकी किमान ८० टक्के विद्यार्थी ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घेत असत आणि उरलेले व इतर शाखांमधील विद्यार्थीही केवळ बाणकर सरांचा तास ऐकायला बसत. तुलनेत कठीण आणि रुक्ष मानला जाणारा विषय हा माणूस ज्याप्रकारे सुलभ करून शिकवत असे, त्याला तोड नव्हती.
माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवर व वैचारिक जडणघडणीवर बाणकर सरांशी केलेल्या शेकडो तासांच्या चर्चेचा प्रभाव आहे. अध्यात्म केवळ भाबडेपणाने न बघता व्यासंगाच्या जोरावर त्यांनी आकळले आहे आणि गेली चाळीसहून अधिक वर्षे ते अभ्यासपूर्ण रीतीने संतसाहित्याचे अर्थ उलगडून मांडत आहेत. अशा माझ्या व्यासंगी शिक्षकांनी माझ्यासारख्या विद्यार्थ्याला प्रस्तावना लिहायला सांगावे, हा मी सन्मान मानतो.
डॉ. बाणकर यांनी यापूर्वी कबिरांच्या दोह्यांचा मराठीत अनुवाद / भावानुवाद केलेला आहे. कबीरांची आध्यात्मिक भूमिका अचूक समजली असल्याने, त्यांना ते दोहे समजणे सोपे गेले. त्यांच्या १०००पेक्षा जास्त दोह्यांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. या पुस्तकात त्यांनी कबिरांच्या दोह्यांतील विचार समजावून सांगितला आहे. किंबहुना, त्यांचा अर्थ मराठी संतांच्या ओव्याअभंगांच्या आधारे स्पष्ट केला आहे. त्यातून मराठी संत आणि कबीर हा एकच आध्यात्मिक संदेश मांडत आहेत, हे स्पष्ट होते.
एकेक दोहा स्पष्ट करताना ते इतके मराठी अभंग सांगतात की, जणू या मराठी अभंगाचा कबीरांनी अनुवाद केलाय की, मराठी संतांनी कबिरांच्या दोह्यांचा अनुवाद केलाय, असे वाटून जाते! हे विधान अतिशयोक्तिपूर्ण असल्याची मला जाणीव असूनही, त्यांतील एकत्व सांगण्याची फक्त ही भाषा आहे. जणू आपण एकच विचार दोन भाषांत एकाच वेळी वाचत आहोत, असे नकळत वाटत राहते.
डॉ. बाणकर हे अनेक वर्षे संतसाहित्याचा अभ्यास करत असल्याने आणि त्याचबरोबर ‘दीपरत्नाकर’, ‘योगवासिष्ठ’, ‘वेदेश्वरी’, ‘आगमसार’, ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’, ‘रामगीता’, अशा अत्यंत गूढगहन आध्यात्मिक ग्रंथांचे परिशीलन करत असल्याने, त्यातही त्यांची संशोधक वृत्ती असल्याने तौलनिक अभ्यास करून अंतिम सत्याचा स्वहितावह - म्हणजे नि:श्रेयस्कर बोध करून घेणे, हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. परिणामी, एकच विचार कोणत्या संतांनी कशा प्रकारे मांडला आहे, याविषयी ते उत्तम मांडणी करतात.
हीच अभ्यासाची पद्धती वापरून त्यांनी कबीर आणि मराठी संत व आध्यात्मिक साधक यांच्या(साठीच्या) विचारांचा एकत्रित तौलनिक अभ्यास केला आहे. कबिरांच्या गाजलेल्या दोह्यांचा (परम) अर्थ पटवून देण्यासाठी मराठी संत व साधक यांच्या अभंगांचा व मांडणीचा आधार घेतला आहे. ते वाचताना आपण गुंगून जातो. कबिरांच्या वाराणसीच्या वाहत्या वाणीच्या गंगेला जणू मराठी ओव्या-अभंगांचे घाट बांधले आहेत, असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
डॉ. बाणकर यांनी यापूर्वी ‘विष्णुसहस्रनाम’ आणि ‘कुराण’ यांचा असाच तौलनिक अभ्यास केला आहे आणि तो प्रसिद्धही झालेला आहे. त्यांच्या या पुस्तकाचे केवळ तौलनिक अभ्यास हे वैशिष्ट्य नाही; तर दोहे उलगडून दाखवण्याची शैली, हेही महत्त्वपूर्ण आहे. शिक्षक असल्याने सुगम भाषेत त्यांनी ते उलगडून सांगितले आहेत. पण शैली सुगम असली, तरी त्यांनी या दोह्यांचे सुलभीकरण मात्र केले नाही. कबिरांच्या वरवर सोप्या वाटणाऱ्या दोह्यांचे अर्थ किती खोल आहेत, हे त्यांनी उलगडून दाखवले आहे, हे मला या पुस्तकाचे सर्वांत मोठे योगदान वाटते.
आपल्याकडे पारंपरिक कर्मकांड आणि मूर्तिपूजा यांना भक्ती समजले जाते; किंबहुना, बहुसंख्य लोक ज्याला धर्म, भक्ती समजतात, तेच आपण वारंवार संतांवर आरोपित करतो. लोक आज मूर्तिपूजा, जप करणे, उपवास करणे, तीर्थयात्रा करणे, मंदिरात जाणे, आरती करणे, उत्सव साजरे करणे, यालाच भक्ती व ईश्वरप्राप्तीचा मार्ग समजतात व संतांच्या वचनांचाही तसाच अर्थ लावतात.
आपण ज्याला ‘भक्ती’ म्हणतो, तशीच भक्ती संत करत होते व तीच भक्ती संतांनी सांगितली आहे, असा गैरसमज करून घेतात. त्यातून संतवचनांचा अतिशय मर्यादित असा अर्थ ते लावतात. लोकांच्या या आकलन-मर्यादेतून संत कबीरही सुटले नाहीत की, आपले मराठी संतही. लोकांना असे वाटण्याचे आणखी एक कारण असे होते की, ही सारी संतमंडळी त्या काळात लोक जिथे जमत, त्या तीर्थक्षेत्री जात असत. त्याचे महत्त्वाचे कारण हे की, लोक एकत्र येण्याच्या त्या जागा होत्या व तीर्थक्षेत्रांना भेटी देणे, ही जनरित होती.
संत कबीर व संत नामदेव तर तीर्थक्षेत्र मानले जाते, तिथेच राहत होते. त्यामुळे संत मूर्तिपूजा आणि तीर्थक्षेत्र यांचे महत्त्व सांगत, हा समज दृढ झाला आहे; पण संतांनी जरी पारंपरिक तीर्थगावे मूर्तिभक्तीची पारंपरिक साधने ही भाषा वापरली आहे. संत तिथेच थांबले नाहीत, त्यातून ते खऱ्या अध्यात्माकडे अंगुलिनिर्देश करतात. शिक्षक जसे ज्ञाताकडून अज्ञाताकडे विद्यार्थ्यांना घेऊन जातात, त्याप्रमाणे संत जे लोकांना माहीत आहे, लोक ज्याला धर्म आणि भक्ती म्हणतात, त्या पारंपरिक शब्दांपलीकडे सामान्य माणसांना घेऊन जातात. तरीदेखील त्या शब्दांचा गूढ अर्थ ते जो सांगतात, त्याची मात्र फारशी चर्चा झालेली दिसत नाही.
या पुस्तकात ती खरी वा सफल तीर्थयात्रा कशी करावयाची, याची सुंदर प्रश्नोत्तरे आली आहेत. मराठी संतांनीही असे अनेक रूढ शब्दांचे अर्थ रूपकादी माध्यमातून उलगडून दाखवले आहेत. नामदेवांच्या अभंगात ‘पंढरपूर’ हा शब्द अनेकदा आला असला, तरी ‘जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर...’ असे सांगत, ‘ते हे पंढरपूर नव्हे’ याकडे ते लक्ष वेधतात. ‘देवां नाही रूप, देवां नाही नांव । देवां नाही गांव कोठे काही ॥’, असे उदाहरणार्थ संत ज्ञानदेवही लिहितात.
थोडक्यात, कबीर काय आणि मराठी संत काय, या सर्वांची मांडणी सारखीच आहे. ती म्हणजे, स्वत:च्या औट हात (साडेतीन हात लांबीच्या) देहातच तुम्हाला सर्व आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात. तीर्थक्षेत्र, मंदिर, देव हे सारे अनुभव अगोदर शरीररूपी क्षेत्रात येतात. त्यासाठी मूर्तिपूजा, आरती, उपास या कोणत्याही उपाधी गरजेच्या नाहीत. भक्ती हा एक यौगिक क्रियांचा प्रवास आहे. सर्व संतांनी राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, अशी नामे म्हटली, तरी त्यांचा गूढ गहन अर्थ त्यांनी अनुभवला होता व तोच त्यांना अभिप्रेत होता (आहे).
तसेच यौगिक साधनेने समाधी-अवस्थेचा अनुभव घेऊन, त्यांनी त्याबाबतचे स्पष्ट वा सूचक उल्लेखही करून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक दोह्याला, अभंगाला यौगिक अर्थ आहे, असे डॉ. बाणकर सप्रमाण प्रत्येक लेखात मांडतात. ते केवळ विधाने करत नाहीत; तर संतांचेच शब्द घेऊन, जो अर्थ वरवर दिसतो, तो त्यात नाही, हे प्रकर्षाने आपल्या लक्षात आणून देतात.
तेव्हा लक्षात येते की, कबिरांच्या शब्दांचे जे लोकप्रिय अर्थ लावले जातात, ते तसे नक्कीच नाहीत. ते यौगिक अनुभूतीची डूब असणारे आहेत आणि पारंपरिक भक्ती, नामोच्चार करणे, पूजा, उपवास, तीर्थ यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही.
डॉ. बाणकर यांनी कबिरांना अपेक्षित असलेले अध्यात्म कोणते, हे जे उलगडून दाखवले आहे, ते मला त्यांचे धार्मिक चर्चेत सर्वांत मोठे योगदान वाटते. यापूर्वीही त्यांनी ‘नामदेवांचे पंढरपूर’ नावाच्या पुस्तकातून हे उलगडून दाखवले आहेच. या पुस्तकात ते अधिक ठळकपणे उलगडून दाखवले आहे.
अर्थात, अशी मांडणी करताना जे धैर्य लागते, ते त्यांच्याकडे आहे. सारा समाज एक प्रकारे अर्थ लावत असताना, त्याचा अर्थ तसा नाही तर असा आहे, असे जणू प्रवाहाविरुद्ध जाऊन सांगणे, हे आव्हान असते. असे करताना कितीही सौम्य लिहिले, तरी मोठा समुदाय दुखावला जाण्याची शक्यता असते; कारण एक प्रकारे त्या समुदायाच्या समजुतींचा त्यातून आधारच काढून घेतला जात आहे, असे वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या समुदायातील लोक आक्रमक प्रतिक्रिया देऊ शकतात. पण वर्षानुवर्षे डॉ. बाणकर हे धाडस करत आहेत.
मूर्तिपूजा ते तीर्थक्षेत्र या सर्वांतील तथ्य शोधून घेण्याचे सप्रमाण आवाहनच त्यांच्या या पुस्तकातही अनुस्यूत आहे. कबिरांची बंडखोरी केवळ त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक भाषेत नाही, तर अध्यात्माच्या मूळ परिभाषेतच आहे. प्रत्येक पारंपरिक शब्दामागील रूढ अर्थ खरवडून काढत कबीर त्याचा गूढ गहन अर्थ स्पष्ट करतात; पण दुर्दैवाने कबिरांच्या दोह्यांचा अर्थ लावणारे पंडित आणि समीक्षक याच पारंपरिक धार्मिक समजुतींचे वाहक असल्याने त्यांनीही पुन्हा पारंपरिक अर्थ लावले.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
एकच उदाहरण द्यायचे तर, कबिरांच्या साहित्यात ‘रामा’चा उल्लेख येतो. त्याचा अर्थ पूर्वी होऊन गेलेला अयोध्येचा राम इतकाच लावला गेला; पण, डॉ. बाणकर यांनी चार रामांचा दोहा घेऊन, कबीर ज्या वेगवेगळ्या चार रामांचा सुस्पष्ट उल्लेख करतात, त्यांचा आशय उलगडून दाखवला आहे. यातून कबिरांचा ‘राम’ समजतो. तेव्हा समीक्षक व पंडित यांची समजण्यात गफलत तर होत नाही ना, असेच डॉ. बाणकर यांचा कबीर वाचल्यावर लक्षात येते.
नामदेव जेव्हा म्हणतात, ‘एक तरी ओवी अनुभवावी’, तेव्हा एका ओवीचा खोलवर अर्थ शोधला, तर खरे अध्यात्म उलगडते, असे त्यांना म्हणायचे असते. कबिरांचेही शेकडो दोहे वाचण्याची आवश्यकता नाही. या पुस्तकात जे निवडक दोहे आहेत, त्यांतील गूढ अर्थ जरी आपण खोलवर जाऊन बघितला, तरीसुद्धा आपल्याला कबीर अध्यात्म कशाला म्हणतात, हे समजू शकते. तो अर्थ पारंपरिक अध्यात्म परिभाषेपेक्षा खूप वेगळा आहे. कोणतीही उपाधी न करता स्वत:च्या अंतरंगात शोध घेणारी ही दिशा आहे. मराठी संतांनी जे मराठीत सांगितले, तेच कबीर फक्त हिंदीत (त्यांच्या मिश्र) भाषेत सांगत आहेत. मराठी संत-साधक आणि कबीर यांचे एकत्व सांगणारे पुस्तक, हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.
‘कबीरविचार’ - डॉ. विजय बाणकर
विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे | पाने – २२७ | मूल्य - ३२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment