या दुनियेत प्रेषित म्हणून आलेले, बुद्ध म्हणून आलेले, अवतार म्हणून आलेले सगळे मृत्यू पावलेले आहेत. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, देव असो, कुणालाही मरण चुकत नाही
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 01 April 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

७१)

‘गेले पैंगबर, येशू, बुद्धहि गेले

श्रीकृष्ण रामही गेले म्हणजे मेले

चुकणार नसे ते देवालाही मरण

वाचले कुणी का आभाळाचे पान।।

पहिल्या तीन ओळी सोप्या आहेत. ह्या दुनियेत प्रेषित म्हणून आलेले, बुद्ध म्हणून आलेले, अवतार म्हणून आलेले सगळे मृत्यू पावलेले आहेत. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, देव असो, कुणालाही मरण चुकत नाही. आणि हे लिहिल्यावर किणीकर एकदम लिहिलात -

‘वाचले कुणी का आभाळाचे पान।।’

हे आभाळाचे पान ही काय भानगड आहे? त्यासाठी आपल्याला ‘गीते’कडे जावे लागते. त्यात ह्या जगाच्या निर्मात्याचे वर्णन आहे.

‘द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वा: ।

दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ।। ११-२०।।

(पृथ्वी आणि स्वर्ग ह्या सर्वाच्या मधल्या पोकळीत आणि दाही दिशांमध्ये भरून तू राहिलेला आहेस. हे सर्व शक्तिमान अस्तित्वा, तुझे दर्शन झाले, तर सगळे थरथर कापू लागतात.)

राम, कृष्ण यांनी अवतार घेताना धारण केलेली शारीरिक अस्तित्वे त्या विराट तत्त्वाचाच अंश आहेत. त्यांना आपले अवतार कार्य झाले की, त्या विराट तत्त्वात लुप्त व्हावे लागते. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, सगळे त्या विराट तत्त्वाच्या आधीन आहेत. सगळे ‘आभाळा’च्या आधीन आहेत. त्याचे दर्शन कुणाला झाले आहे काय? त्या विराट तत्त्वाच्या ‘मनात’ काय आहे, हे कुणाला कळले आहे काय?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

७२)

‘हे असेच लिहिणे, असेच असते गाणे

जरि नसले अश्रू असेच आहे रडणे

का असे, तसे का, नका विचारू आता

तो निघून गेला उत्तर देता देता।

माणूस का लिहितो, माणसाला गाणे गावे असे का वाटते? अश्रू असले तरी आणि नसले तरी माणसाला रडावे का वाटते? का आहे हा रडण्याचा आणि गाण्याचा आणि अभिव्यक्तीचा तमाशा? माणसाला मनातले बोलावेसे का वाटते? सुख का बोलावेसे वाटते, दुःख का बोलावेसे वाटते? माणसाला लिहावेसे का वाटते? आपण का हसलो, का रडलो, आपण का लिहिले, ह्याची उत्तरे मिळण्याआधी आपल्यावर निघून जायची वेळ येते.

काय आहे हा खेळ? आपण हा खेळ खेळायचा आहे, तर आपल्याला ह्या खेळाचा कुठलाही नियम ठरवता का येत नाही? का आपल्याला खेळवले जाते आहे? किणीकर म्हणतात, उत्तरे मागण्यात अर्थ नाही. आपल्याशी खेळ केला जातो आहे, ह्यावर उमर खय्याम ठाम आहे.

‘But helpless Pieces of the Game He plays

Upon this Chequer-board of Nights and Days;

Hither and thither moves, and checks, and slays,

And one by one back in the Closet lays.’

(दिवस रात्रीच्या खेळपटावर खेळत बसतो खेळ

प्यादी कसली, नियम ही कसले, ना कसला मेळ,

ही चाल अशी, ती चाल तशी, बघ ते प्यादे मेले

हार कुणाची? जीत कुणाची? उगाच प्यादे मेले!)

७३)

‘अश्रूंना नाही रूप नि कसला रंग

का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग

जाणारा जातो, अनंत आहे काळ

तुटणार कधितरी मृत्यूची ती नाळ।।

खरंच भावनांना काय अर्थ आहे ह्या मानवी आयुष्याचा एकूण पट लक्षात घेतला तर? सगळ्या भावना शेवटी ओसरून जातात. वणवणीशिवाय हाती काही लागत नाही. ज्या प्रेमाशिवाय राहता येणार नाही, असे वाटत असते ते प्रेम निराशा करून निघून जाते, नाती तुटतात, मैत्रीचे बहर ओसरतात, कलेचे ओघ आटून जातात!

‘का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग’

कितीही भावना आळवल्या तरी मृत्यू शेवटी सगळ्यावर पडदा टाकतो. ज्याची वेळ आली आहे त्याच्या भावनांची फारशी फिकिर न करता त्याला नेले जाते. फक्त काळ अनंत आहे. भावना, कला आणि त्यांचा निर्माता - काहीही टिकून राहात नाही. फक्त मृत्यू टिकून राहतो. सगळे जग मृत्यूच्या नाळेने जखडले गेले आहे. पण मग अचानक किणीकर लिहितात -

‘तुटणार कधितरी मृत्यूची ती नाळ’

ही मृत्यूची नाळ कधीतरी तुटून जाणार आहे. हा अस्सल भारतीय आध्यात्मिक विचार! भावना, मन वगैरे सगळे पडदे उघडले जातील आणि अमर अशा अस्तित्वाची गाठ पडेल! उमर खय्यामसुद्धा त्या सनातन तत्त्वाच्या शोधात आहे. शेवटी त्या तत्त्वाची गाठ पडेल, असे त्यालाही कुठेतरी वाटत असावे.

‘Whose secret Presence through Creation's veins

Running Quicksilver-like eludes your pains;

Taking all shapes from Mah to Mahi and

They change and perish all—but He remains;’

(असते त्याचे गुप्त अस्तित्व निर्मितीच्या प्रत्येक रक्तवाहिनीमध्ये

वाहत राहतो पाऱ्याप्रमाणे तुमच्यामधुन 'तो' तुमच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत;

घेते त्याचे अस्तित्व प्रत्येक आकार - मत्स्यापासून तो थेट चंद्रापर्यंतचा,

बदलत राहतात, मरत राहतात, सगळे आकार...फक्त तो एकटा उरून राहतो)

७४)

‘म्हणु नकोस, तो साठाव्या वर्षी मेला

घेतली साठ वर्षे मरावयाला,

पाळणा हलवितो मृत्यू गाउनि गीत

सरपटे जन्म मरणाची टाकुनि कात।।

जीवन जगता जगता माणूस मरतो असे म्हटले जाते. पण खरं तर मरण सुरुवातीपासूनच आपल्याबरोबर असते. जीवनातच मरण आध्याहृत असते. जन्मणे म्हणजे एकप्रकारे मृत्यूची कात टाकून ह्या जीवनात सरपटायला सुरुवात करणे, असे किणीकर म्हणत आहेत. एक नवी कांती एवढाच जन्माचा अर्थ! ‘गीते’त म्हटलेलेच आहे -

‘अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।

अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२-२८।।

माणूस जन्माआधी अव्यक्त असतो, जन्म झाल्यावर मधल्या काळात तो व्यक्त असतो, आणि मृत्यू झाल्यावर परत अव्यक्त होतो. माणसाची व्यक्तता हा एक अस्तित्वात असण्याचा प्रकार आहे. अव्यक्त असणे, हासुद्धा अस्तित्वात असण्याचा एक प्रकार आहे. कात टाकली तरी साप बदलत नाही.

किणीकर माणसाच्या जिवंत असण्याची चेष्टा करत आहेत, असे वाटते. माणसाच्या व्यक्त असण्याची चेष्टा करत आहेत, असे वाटते. उमर खय्याम तर माणसाच्या व्यक्तित्वाचीही चेष्टा करतो आहे. प्रत्येकाला आपल्यासारखे दुसरे कोणीही नाही आणि आपल्यासारखे कोणी कधी जन्माला येणार नाही, असे वाटत असते.

हे जीवन तयार करणाऱ्या शक्तीला तुमच्या व्यक्तित्वाचे काही कौतुक असायचे काही कारण नाही. साकी प्याल्यात दारू ओतते, तेव्हा असंख्य बुडबुडे तयार होतात. तिला प्रत्येक बुडबुड्याच्या व्यक्तित्वाशी काही घेणे देणे असते का? तिच्या दृष्टीने सगळे बुडबुडे सारखेच!

‘And fear not lest Existence closing your

Account, and mine, should know the like no more;

The Eternal Saki from that Bowl has pour'd

Millions of Bubbles like us, and will pour.’

(बंद होताना खाते तुझे मानू नकोस राहील निर्मात्याच्या लक्षात ते,

लक्षात घे - सनातन साकी, दारू जेव्हा जीवनाची ओतत असते

ओतलेले असतात तिने लाखो बुडबुडे - तुझ्यामाझ्यासारखे

आणि ओतणारही असते ती लाखो बुडबुडे – तुझ्यामाझ्यासारखे)

७५)

‘ओलांडुनि काळे, हिरवे, पिवळे रान

भरधाव धावतो श्वासावरला प्राण

कोंडिलेस जरि तू बांधुनि भिंती थोर

फोडून समाधी, पहा पळाला चोर।।’

प्राण श्वासावर आरूढ असतात, मन प्राणावर आरूढ असते. हा प्राणाचा वारू चौफेर उधळलेला असतो. त्याला बांधून ठेवून आध्यात्मिक प्रगती करायची असते. ‘गीते’च्या सहाव्या अध्यायात मनाला बांध घालून त्याला सर्वोच्च अस्तित्वावर स्थिर कसे करायचे, ह्याविषयी सांगितलेले आहे.

‘सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषत: । मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्तत: ।।२४।।

शनै: शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मन: कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ।। २५।।

सर्व वासनांचा आणि इच्छांचा तर त्याग करावाच, पण त्यांच्या राखेचासुद्धा त्याग करावा, आणि सर्व इंद्रियें मनाच्या ताब्यात ठेवून ती अस्ताव्यस्त चहूबाजूला पळणार नाहीत, ह्याची व्यवस्था करावी. मनाची सर्व घावपळ स्थिर बुद्धीचा वापर करून संपवून टाकावी. असे करून मन सर्वोच्च अस्तित्वावर स्थिर करावे.

ठीक आहे. एवढे सगळे करून मनाला क्षणभर स्थिर केले, तर होते काय? एका क्षणात मनाचा वारू पुन्हा इच्छा आणि वासनांच्या आहारी जातो आणि सगळे बांध फोडून चौफेर उधळतो. 

‘कोंडिलेस जरि तू बांधुनि भिंती थोर

फोडून समाधी, पहा पळाला चोर।।’

७६)

‘ही माता कान्ता कन्या लेकुरवाळी

हे सगेसोयरे जमले बघ भवताली

ओघळला अर्धा अश्रू गालावरला

हातात राहिला तसाच अर्धा पेला।।

फारच साधी आणि सरळ रुबाई! भवताली आई, बायको, आणि तिच्या मुला-बाळांसह कन्या, असे सगळे जमले आहेत. इतरही गोतावळा जमला आहे. जायची वेळ झाली आहे. त्याचे वाईट वाटते आहे, जाण्यातली अपरिहार्यताही कळते आहे.

रडण्यात अर्थ नाही हे कळते आहे. तरीही अर्धामुर्धा अश्रू गालावर ओघळतोच आहे. इतके सगळे जमले आहेत म्हणजे आयुष्य खरे तर पूर्ण जगून झाले आहे. आई मागे राहणार आहे, हेसुद्धा खरे आहे. पण, नातवंडे आली म्हणजे खूप जगून झाले आहे, पण तरीही जाताना वाटते आहे की, हातातला जीवनाचा प्याला अर्धाच टाकून जावे लागते आहे.

७७)

‘देऊळ पाहिले दिसला नाहीं देव

ती नाव चालली, न दिसे कोठे गाव

घाटावर ठेवुनि यात्रिक गेला ग्रंथ

खळखळते यमुना, गंगा वाहे संथ।।’

देऊळ पाहिले, तरी देव भेटला नाही. नुसताच भाव झाला, देव नाही भेटला. नुसतेच कर्मकांड झाले, देव नाही भेटला. जीवनाच्या प्रवाहातून नाव चालली आहे, पण नुसताच प्रवास होतो आहे. वाटेत गाव लागतच नाहिये. नुसता प्रवासच, अर्थाचा मुक्काम नाही. ह्या जगाच्या निर्मात्याच्या सहवासाचा मुक्काम लागतच नाहिये.

कुठे एखादा तत्त्वज्ञानाचा घाट लागतो आहे. त्यावर कुणा यात्रिकाने एखादा ग्रंथ लिहून ठेवलेला दिसून येतो आहे.पण तो वाचूनही ‘त्याच्या’ गावाचा पत्ता लागत नाहिये. शेवटची ओळ तर अप्रतिम झाली आहे.

‘खळखळते यमुना, गंगा वाहे संथ।।’

यमुना खळखळते आहे आणि गंगा संथ वाहते आहे. युमनेकाठी श्रीकृष्णाच्या लीला घडल्या आहेत. तिथे ‘तो’ राहून गेला आहे. यमुनेकाठी कृष्णलीलांचे पुराणात वर्णन केले गेलेले खळखळते अध्यात्म आहे. गंगेकाठी ध्यानस्थ योग्यांचे शांत अध्यात्म आहे. लोकांचा प्रवास जीवनाच्या नौकेमधुन सुरू आहे. कितीही प्रवास झाला तरी ‘त्याचे’ गाव मात्र येत नाहिये.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

.................................................................................................................................................................

७८)

‘त्या तिथून गेली दिंडी आळंदीची

या इथे थांबली यात्रा अनामिकाची

चालली भिंत - आश्चर्य वाटले नाही

उघडेना ताटी - रडली मुक्ताबाई।

दिंडी दरवर्षी निघत राहते. दर वर्षी अनेक लोकांची यात्रा संपून जाते. कित्येक यात्रेकरू दिंडीतच देह ठेवतात. अध्यात्माची यात्रा सुरूच राहणार आहे. यात्रेकरूंच्या यात्रा संपत राहिल्या तरी! अध्यात्म करणारा, जगाची चिंता वाहणारा, जगाला तत्त्वज्ञान देणारा, तत्त्वज्ञान समजावून सांगणारा मोठाच असतो. त्याने अगदी भिंत जरी चालवली, तरी आश्चर्य वाटत नाही.

पण तो संत म्हणा, योगी म्हणा, तत्त्वज्ञ म्हणा - त्यालाही भावभावना असतात. भावनांच्या, मनाच्या पलीकडे जाणे त्याला जमलेले असले, तरी प्रत्येक क्षण कसे त्या भावातीत अवस्थेत राहणार. दिवसाचा मोठा काळ त्याला मनाच्या, भावनांच्या पातळीवरच राहावे लागते. त्या काळात त्याची काळजी घेणारे कोणी तरी असावे लागते.

ज्ञानेश्वर जगाची ‘माऊली’ झाले. पण त्यांची ‘माऊली’ कोण? श्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता गेल्यावर मुक्ताई लहान वयात सगळ्यांची आई झाली. संन्याश्याचा पोर म्हणून हिणवल्यावर ज्ञानेश्वर खट्टू झाले. मुक्ताई त्यांना समजावू लागली -

‘शुद्ध ज्याचा भाव झाला l दुरी नाही देव त्याला l

अवघी साधन हातवटी l मोले मिळत नाही हाटी l

कोणी कोणा शिकवावे l सारे शोधुनिया घ्यावे ll

लडिवाळ मुक्ताबाई l जीव मुद्यल ठायीचे ठायी l

तुम्ही तरुनी विश्वतारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा l’

ज्याचा शुद्ध भाव आहे त्याच्यापासून देव दूर नाही. अंतिम ज्ञान मिळवण्याची सगळी साधने स्वतःच्या हातांनी तयार करावी लागतात. ती बाजारात मिळत नाहीत. हे सारे कोण कोणाला शिकवणार? हे आपले आपल्याला शोधून घ्यावे लागते. ज्ञानेश्वरांना मुक्ताई ‘ज्ञान’ शिकवत असली तरी तिला माहीत आहे की, ज्ञानेश्वर स्वतःच ‘ज्ञानाचे ईश्वर’ आहेत. त्यांना ज्ञान शिकवण्याची काय गरज? त्यांना माया हवी आहे. म्हणून मग मुक्ताई त्यांच्या भावनेला आवाहन करते - लडिवाळ मुक्ताबाई तुम्हाला विनवते आहे की, जीव आणि बाकी मुद्दल राखून ठेवा. स्वतः हा भवसागर तरून जा. स्वतः स्वतःच्या भावनांच्या पार जा, आणि हे विश्व तारून न्या. ताटी उघडून बाहेर या आणि जगाला तत्त्वज्ञान समजावून सांगा.

आई-वडिलांच्या नंतर ज्ञानदेवांच्या जिवाला काय वाटते आहे, ह्याची जाण असलेली मुक्ताबाई. त्यामुळे जिच्या डोळ्यात पाणी येते आहे, अशी मुक्ताबाई!

‘चालली ली भिंत - आश्चर्य वाटले नाही

उघडेना ताटी - रडली मुक्ताबाई।

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

रॉय किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही…

.................................................................................................................................................................

७९)

‘संपली रात्र, संपले स्वप्नसंगीत

घुमटात पारवा घुमला एकान्तात

झोपला शेवटी अपर्ण वृक्षाखाली

दुमडून पंख पायाशी चिमणी बसली।।

ही एक गूढ रुबाई आहे. संपली रात्र, संपले स्वप्नसंगीत - म्हणजे मृत्यू आला आहे काय? पारवा घुमतो आहे म्हणजे काय? जीवनात असताना शांत राहिलेला आत्मा आता स्वप्नसंगीत संपल्यामुळे, स्वप्नमय जीवन संपल्यामुळे नवीन चक्रात स्वतःला झोकून देत आहे काय? नव्या चक्रासाठी हुंकार देतो आहे काय? पण मग अपर्ण वृक्ष कसला आहे? मायेचा अश्वत्थ वृक्ष तर जिवांच्या पानांनी नटलेला आहे. त्या स्वयंभू वृक्षाखाली ‘माये’ची चिमणी निजली आहे काय? का ही रुबाई म्हणजे एक साधे शब्दचित्र आहे?

एक असामान्य स्वप्नवत मैफल संपली आहे. पहाट होत आहे. घुमटात पारवा घूमू लागला आहे. तो गायक म्हणा, श्रोता म्हणा एका अपर्ण वृक्षाखाली झोपी गेला आहे. त्याच्या पायाशी त्याच्या जागृत अस्तित्वाची चिमणी पंख दुमडून बसून राहिली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

८०)

‘पाउले उमटली आभाळावंर येथे

संपले असे जे संपायाचे होते

कुणि लिहिल उद्या जे लिहिले नाही कोणी

जे लिहील ती होतील उद्यांची गाणी।

आभाळावर परमेश्वराची पावले उमटतात असे म्हणतात. तारका ही परमेश्वराची उमटलेली पावले असतात असेही म्हटले जाते. परमेश्वर म्हणजे सतत नवनिर्मिती. जुने मिटते ते नव्याने निर्माण होण्यासाठी! परमेश्वराने नव्याचा विचार जरी केला, तरी जुन्याला मिटायला होते.

‘पाउले उमटली आभाळावंर येथे

संपले असे जे संपायाचे होते

जुने संपले म्हणजे नवे येणारच!

म्हणून किणीकर म्हणत आहेत की, जे कुणी आतापर्यंत लिहिले नाही, ते उद्या कोणीतरी लिहिणार आहे. जे काही लिहिले जाईल ती उद्याची गाणी असतील. जुन्याला मिटायलाच लागते. जे नवे येते त्याचा स्वीकार होतो. त्याची परंपरा होते, पण तेसुद्धा पुढे कुणासाठी तरी मिटणारच असते. कारण आभाळावर नवनवोन्मेषशाली परमेश्वराची पावले परत उमटणारच असतात.

उमर खय्याम निर्मितीच्या ह्या सनातन तत्त्वाच्या अस्तित्वाचे वर्णन कसे करतो आहे, हे पाहण्यासारखे आहे. आयरम हे पर्शियाच्या दंतकथेतील विनाश पावलेले शहर. जसे आपल्याकडचे द्वारका. जमशीद हा पर्शियाच्या दंतकथेतील नायक. ह्याच्याकडे एक पेला होता. त्यात अमरत्व बहाल करणारे द्रव्य होते. हे पर्शियाच्या दंतकथेतील ‘अमृत’. आता ह्यावर खय्याम काय लिहितो आहे ते पाहू -

‘Iram indeed is gone with all his Rose,

And Jamshyd's Sev'n-ring'd Cup where no one knows;

But still a Ruby kindles in the Vine,

And many a Garden by the Water blows.’

(आयरम शहर गेले त्यातील अमर गुलाबांसह

गेला जमशीदचा प्यालासुद्धा त्यातील अमृतासह

पण अजून चमकतात लाल माणके द्राक्षांमधून

आणि अजून पाणी खळाळते रोज सगळ्या बागांमधून)

जमशीदला ‘जामशीद’सुद्धा म्हणतात. त्याच्या पेल्यात जे आहे ते अमृत. दारूच्या पेल्याला ‘जाम’ का म्हणतात, हे आता वाचकांच्या लक्षात आले असेल. लाल द्राक्षातील लाल रस सूर्यप्रकाशात माणकांसारखा चमकत राहतो. लाल द्राक्षांचे वारुणीशी असलेले नाते येथे आपल्या लक्षात येते, तसेच वारुणी आणि नवनिर्मितीचे तत्त्व येथे उमर खय्याम अधोरेखित करत आहे.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......