रॉय किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 29 March 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

६१)

‘नरमेध चालला, पहा पेटली सीमा

आहुती मागतो पिशाच्च अश्वत्थामा

अन्नसूक्त मागते यमरात्रीची अवस

मागती गिधाडे मंतरलेले मांस।।

किणीकर लहान असताना पहिले महायुद्ध झाले. त्यांच्या ऐन तारुण्यात दुसरे महायुद्ध झाले, भारत-पाकिस्तान फाळणी झाली. पुढे कोरियन युद्ध झाले. त्यानंतर १९६२चे भारत-चीन युद्ध झाले. त्या पाठोपाठ १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले आणि १९७१चे बांगलादेश युद्ध झाले. किणीकरांनी आयुष्यात खूप नरसंहार पाहिला. सततची युद्धं! सर्व सीमा सतत पेटलेल्या. सततचा नरसंहार!

‘नरमेध चालला, पहा पेटली सीमा’

सतत कुठली ना कुठली सीमा पेटलेलीच! अवतीभवती सतत पेटलेले युद्धकुंड! अश्वत्थामा हा मोठा योद्धा, पण मरणाला न घाबरणारा. वडिलांच्या अन्याय्य हत्येसाठी आणि मित्रांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्याने रात्री पांडवांच्या शिबारात घुसून सर्व पांडव सेना कापून काढली. पुढे ह्याचा बदला घेण्यासाठी अर्जुन आला. अश्वत्थाम्याने त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडले. त्याच्या उत्तरादाखल अर्जुनाने ब्रह्मशिरास्त्र सोडले.

ही अस्त्रे भिडली तर जगाचा नाश होईल, म्हणून व्यास मध्ये आले आणि त्यांनी ही अस्त्रे मागे घ्यायला सांगितली. अर्जुनाने त्याचे अस्त्र मागे घेतले, अश्वत्थाम्याला ते मागे घेता येईना. त्याने पांडवांची सून उत्तरेच्या गर्भावर ते सोडून संपवले. त्या महा अस्त्राने एका गर्भाची हत्या झाली. अश्वत्थाम्याला मृत्यूची किंमत नाही, म्हणून कृष्णाने त्याला शाप दिला - तुला मृत्यू भेटणार नाही. तेव्हापासून अश्वत्थामा मृत्यूसाठी तरसतो आहे. नव्या जगातील युद्ध घडवून आणणारे नेते म्हणजे अश्वत्थाम्याची पिशाच्चेच आहेत.

‘आहुती मागतो पिशाच्च अश्वत्थामा’

त्यांच्यामुळे हा नरसंहार सतत चालू आहे. माणसाच्या मनातील अंधार, त्याच्या मनातील अवस, हे नरसंहाराचे अन्न मागते आहे. देशातील जनता आणि तिचे नेते ह्यांच्या मनातील सूड, स्वार्थ ह्या भावना म्हणजे हा सारा अंधार आहे. त्यामुळे युद्धे पेटतात. ही सारी मानवजातीतील गिधाडेच आहेत.

‘अन्नसूक्त मागते यमरात्रीची अवस

मागती गिधाडे मंतरलेले मांस।।

त्याग, देशप्रेम, हौतात्म्य ह्या साऱ्या शब्दांनी मंतरलेले मृत्यू ही गिधाडे मागत असतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

६२)

‘लागली कवाडे चारहि सीमान्ताची

चहुबाजूनि वाहे गंगा रक्ताश्रूची

गर्भकोष फुटले, तुटले अनंत पाश

मातीत हरपले ममतेचे आकाश ।।

ह्या रुबाईत ह्या आधीच्या रुबाईतीलच विषय चालू आहे. ह्या जगातील प्रत्येक देशाच्या चारही सीमा बंद आहेत. चारी कवाडे बंद आहेत. आणि बंद दारांमुळे युद्धे होत आहेत.

‘लागली कवाडे चारहि सीमान्ताची

चहुबाजूनि वाहे गंगा रक्ताश्रूची

त्या दारांखालून रक्त पाझरते आहे. अश्रू वाहत आहेत. मातांच्या डोळ्यादेखत त्यांची लेकरे मरत आहेत. त्यांच्या गर्भकोषांच्या चिंध्या उडत आहेत. मायेचे किती पाश ह्या सीमांमुळे कायमचे तुटत आहेत! आईची माया आकाशाएवढी असते, ते ममतेचे आकाश, मातीत कोसळलेल्या तिच्या लेकराबरोबर मातीत मिळून जाते आहे.

‘गर्भकोष फुटले, तुटले अनंत पाश

मातीत हरपले ममतेचे आकाश ।।

६३)

‘या इथे काढली निराश्रितांनी रात्र

पानावर पिवळ्या पडले भिक्षापात्र

तळतळला ओला गोळा भिंतीआड

चिर - मातृत्वावर पडला पहिला दगड।।

भारत-पाकिस्तान फाळणीत जे निराश्रित झाले, त्यांच्या कहाण्यांनी सर्वच संवेदनशील लोकांच्या मनावर खोल परिणाम झाले. भारतातदेखील अनेक कारणांनी वेळोवेळी लोक निराश्रित झाले. पूर आले, भूकंप झाले, दुष्काळ पडले. धरणे वगैरे विकासाच्या कामांनी लोक निराश्रित झाले. कुठल्या तरी झाडाखाली निराश्रित झोपले आहेत. त्या झाडाच्या पडलेल्या पिवळ्या पानांवर त्यांचे भिक्षापात्र कलंडले आहे. पुढच्या ओळी जास्त व्यथित करणाऱ्या आहेत.

‘तळतळला ओला गोळा भिंतीआड

चिर - मातृत्वावर पडला पहिला दगड।।

ह्या ओळी भिंतीआड झालेल्या कुणा निराश्रित स्त्रीच्या गर्भपाताची कहाणी सांगते आहे का? तिचे हाल झाले आहेत म्हणून हा गर्भपात झाला आहे का? स्त्रीमध्ये असलेल्या मातृत्वाच्या सनातन भावनेवर पडलेला हा दगड म्हणजे गर्भपात आहे का? का ही ओळ कुणा कोवळ्या कुमारीवर झालेल्या बलात्काराची कहाणी सांगते आहे?

६४)

‘अणु फुटला, उठला प्रलयाग्नीचा डोंब

थडग्यातुन आला रांगत हिरवा कोंब

शास्त्रज्ञ खेळतो विज्ञानाचा खेळ

मृत्यूला नाही मरावयाला वेळ।।

पहिल्याच ओळीत हिरोशिमा आणि नागासाकीवरचे हल्ले आध्याहृत आहेत. अणुस्फोटामुळे मृत्यूचे तांडव झाले. पण जीवन थांबले का? हिरोशिमा आणि नागासाकीमधील थडग्यांमधून हिरवे कोंब रांगत बाहेर आलेच ना?

शास्त्रज्ञ त्यांचे त्यांचे संशोधन करत राहतात, पण साधले काय जाते? शास्त्रज्ञ औषधे आणि लसी शोधून काढतात. त्यामुळे अनेक माणसांचे जीव वाचतात. त्याच बरोबर शास्त्रज्ञ युद्धाच्या साहित्यात आणि शस्त्रास्त्रात सुधारणा घडवून आणत असतात, त्यामुळे अनेक लोकांचे जीव जाणार असतात. शास्त्रामुळे नक्की काय मिळते? एक खेळच तो. ती काही गंभीर गोष्ट नाही.

जागतिक आरोग्य संघटना अनेक लोकांचे जीव वाचवते पण संयुक्त राष्ट्रसंघ त्या वाचवलेल्या जिवांना अन्न देऊ शकत नाहीत. मृत्यूचे तांडव तसेच सुरू राहते. शात्र मृत्यूचे अंतिम सत्य संपवू शकत नाही. त्याचे तांडव सुरूच राहते. पण त्याच बरोबर थडग्यातून हिरवे कोंब अंकुरतच राहतातच! जीवन आणि मृत्यूची ही लपाछपी सुरूच राहते. उमर खय्यामने हीच भावना फार सुंदर पद्धतीने व्यक्त केली आहे-

‘Whether at Naishapur or Babylon,

Whether the Cup with sweet or bitter run,

The Wine of Life keeps oozing drop by drop,

The Leaves of Life keep falling one by one.’

(असू द्यात शहर कुठलेही, निशापूर अथवा बॅबिलॉन

वाहू द्यात पेले तुमचे सुखाने वा दुःखाने भरभरून;

वारुणी जीवनाची ठिबकत राहते एक एक थेंब करून

पालवी झाडांची झडत राहते एक एक पान करून)

६५)

‘का नकाशात मावते निळे आभाळ

आणशील कोठुनि माप भराया काळ

घे भरून ओंजळ, म्हणते गंगामाई

माणूस उलटा गंगेला काडी लावी।।

माणसाने कितीही प्रगती केली तरी ह्या विश्वातील काही दिव्य गोष्टी त्याच्या हाती लागत नाहीत. नकाशाचा शोध लागला हे खरे आहे. त्यात अमर्याद निळे आभाळ कसे निर्देशित होणार? अनंत काल तुम्ही कसा मोजणार?

निसर्ग म्हणा, ह्या विश्वाचा निर्माता म्हणा, तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरून देत असतो. गंगामाई तुम्हाला ओंजळ भरून पाणी द्यायला तयार असते, जीवन प्रदान करायला तयार असते. पण हे प्रसाद स्वीकारायची माणसाची औकात आहे का? त्याच्या शहाणपणाला स्वार्थाच्या मर्यादा आहेत. तो जीवन नाकारतो, त्याचा अव्हेर करतो. तो गंगेला काडी लावू पाहतो. निसर्ग ओरबाडून घेऊ पाहतो.

उमर खय्यामनेही माणसाच्या मर्यादा सांगितल्या आहेत. माणसाने तत्त्वज्ञानाचा शोध लावला, माणूस तर्क वापरायला शिकला. पण त्याने माणसाला नक्की काय मिळाले?

‘A Hair perhaps divides the False and True;

Yes; and a single Alif were the clue—

Could you but find it—to the Treasure-house,

And peradventure to THE MASTER too;’

(केसाएवढी रेखा असते सत्य आणि खोट्यामध्ये

अक्षर इवले उभे असते सत्य आणि खोट्यामध्ये;

मार्ग अंतिम पावला का, तर्क लढवला तू तरी?

दिसला स्वामी ह्या जगाचा का तुला क्षणभर तरी?)

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

.................................................................................................................................................................

६६)

‘हे दक्षिण वाऱ्या तिथे जरासा थांब

रे हिला पिऊ दे शेवटचा तो थेंब

मांडीवर काळोखाच्या ठेवुनि हात

तडतडली क्षणभर मावळतीची वात।।

वाऱ्यावर ज्योत थरथरत असते. वाऱ्यामुळे ती कोणत्याही क्षणी विझून जाणार असते. वातीमध्ये तेलाचे किती थेंब आहेत, ह्याची वाऱ्याला परवा नसते. ह्या रुबाईतील वारा दक्षिण दिशेचा वारा आहे. दक्षिण दिशा यमाची, मृत्यूची.

हा मृत्यू एका जिवाची ज्योत विझवायला आला आहे. ज्योतीच्या वातीमध्ये काही तेलाचे थेंब प्यायचे उरून गेलेले असतात, त्या प्रमाणे जिवाच्या काही इच्छा उरलेल्या असतात. विझणे चुकणार नसते, पण तेल संपत आल्यामुळे तडतडणाऱ्या वातीला एखादा उरलेला थेंब पिता आला, तर बिघडले कुठे? मृत्यू आल्याचे दुःख नसते. पूर्णत्वाची भावना येऊन संपणे चालते. समजून घेता येते. अपूर्णत्वाची भावना घेऊन संपणे थोडे खटकते.

शेवटचा तेलाचा थेंब पिता येणे महत्त्वाचे असते. तो पिता येण्याएवढा क्षण वारा थांबला, तर काय हरकत आहे? नाहीतरी काळोखाच्या मांडीवर ज्योतीने आपले हात हरून जाऊन ठेवलेच आहेत ना? तिने काळोखात विरून जाणे स्वीकारले आहे, तिची एक इच्छा स्वीकारली जायला काय हरकत आहे? पण असे होते का?

६७)

‘आकाशदिवा थरथरला आकाशात

थांबली, संपली, विझली निश्चल ज्योत

चंदनी बाहुली गेली झोपायाला

पाळणा मातिचा लागे डोलायाला।।

आकाशदिवा - चंद्र आकाशात थरथरू लागला. कदाचित डोळ्यावर झोप आल्यामुळे तसे दिसत असावे. कदाचित चंद्रावरून अभ्रे सरकत जात असावीत! समई किंवा पणतीमधील ज्योत विझली निश्चल झाली.

आणि चंदनाची बाहुली झोपायाला गेली. पण ही बाहुली चंदनाची का आहे? चंदनाची बाहुली म्हणजे काय? ‘गीते’मधील सातव्या अध्यायात एक श्लोक आहे -

‘पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।

जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥७- ९॥

(ह्या पृथ्वीमधून जो शुद्ध गंध वर येतो तो गंध म्हणजे मी आहे. अग्निमधील तेजामध्ये मी आहे. सर्व जीवांचे जीवन म्हणजे मी आहे. ह्या पृथ्वीवर तप करणाऱ्या सर्व ऋषींची तपःचर्या म्हणजे मी आहे.)

चंदनाची बाहुलीत सुगंध असतो तसा माणसात परमेश्वर असतो. चैत्यन्य असते. कॉन्शसनेस असतो. रात्र झाली आहे, आकाशात चंद्र थरथरू लागला आहे. घरातली ज्योत विझली आहे. डोळ्यांवर झोप आली आहे. आणि -

‘चंदनी बाहुली गेली झोपायाला

पाळणा मातिचा लागे डोलायाला।।

झोपेच्या अंमलाखाली बुद्धीचा पाळणा डोलायला लागला. चैत्यन्याचा पाळणा डोलायला लागला. अंतर्मनातील हेतू डोलू लागले. स्वप्नांचे राज्य सुरू झाले. का स्वप्न हाच बुद्धीचा पाळणा आहे? किती मोहक, हळूवार असे आशयचित्र किणीकरांनी रेखाटलेले आहे!

६८)

‘रंगला डाव तो रंगित बावनपानी

हुकमाचे माझे पान चोरिले कोणी

छे, डाव मोडला संपायाच्या आत

झोळीत अडकला भगवंताचा हात।।

स्वप्नांचा चक्काचूर होणे हा मानवी आयुष्यातील नेहमीचा अनुभव आहे. असे अनेक कडवट घोट घेत माणसाला जगावे लागते. रंगलेले अनेक डाव मोडले जातात. हातात हुकुमाची पाने असतानाही हरण्याची नौबत येते. किणीकरांना स्वतःला आयुष्यात अनेक गोष्टी हातून गेल्याचे पाहावे लागले.

'दीपावली' हा दिवाळी अंक त्यांनी जमवून आणला. पुढे तो त्यांना एका व्यवहारापोटी दीनानाथ दलाल ह्यांना द्यावा लागला. ‘दीपावली’ने उदंड यश मिळवले. मानसन्मान मिळवला, आर्थिक यश तर फार मोठे होते. ‘दीपावली’ ही किणीकरांची निर्मिती असूनही त्यांना स्वतःला त्यातले काहीही मिळाले नाही. सगळे दुरून पाहावे लागले. भगवंत सगळे देणार होता, सगळे जमूनही आले होते, पण अखेरच्याच्या क्षणी त्याचा हात झोळीत अडकला, त्याने यशाचे दान किणीकरांच्या पदरात टाकले नाही. असे अनेक आघात किणीकरांनी पचवले. ह्या आघातांमुळे त्यांची निर्मिती कधीच थांबली नाही. पण एक माणूस म्हणून खंत राहिलीच.

खरंच काय हरकत होती, किणीकरांना आर्थिक सुबत्ता मिळायला? एवढा मोठा कवी, त्याला गरिबीत का राहावे लागले? उमर खय्याम प्रचंड श्रीमंतीत जगला, तसे जीवन किणीकरांच्या वाट्याला आले असते, तर किती बहार आली असती? ही रुबाई फक्त किणीकरांच्या आयुष्यावरच नाहिये. त्यांच्या आयुष्यातील एक संदर्भ ओघाने आला म्हणून द्यावा वाटला.

माझे हुकुमाचे पान कुणीतरी चोरून नेले गेले आहे, असे ह्या जगातील बहुतेकांना वाटते. जवळजवळ प्रत्येकाला वाटत राहते -

‘छे, डाव मोडला संपायाच्या आत

झोळीत अडकला भगवंताचा हात।।

६९)

‘येणार, म्हणाला मृत्यू, भेटायाते

पांघरून स्वप्ने निद्रा जागत बसते

निद्रेस म्हणाला मृत्यु, आलो आई

स्वप्नांच्या दुलईत झोपला तोही।।

अपार सौंदर्य आणि सखोलता असलेली ही रुबाई! खरंच, किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही.

मृत्यूची चाहूल लागते. अंतरीच्या इच्छा स्वप्ने बनून निद्रेच्या पाण्यावर तरंगत राहतात. जणू काही निद्रेचे पाणी जागत बसले आहे. मृत्यूच्या अपेक्षेत का त्याच्या भीतीत? ह्या ओळींनंतर एक वळण मिळते - मृत्यूच बोलू लागतो - निद्रेला तो आई म्हणून संबोधतो. मृत्यू म्हणजे तरी काय, निद्रेचीच एक आवृत्ती! निद्रेवर जशी स्वप्ने तरंगतात, तशीच ती मृत्यूच्या पाण्यावरसुद्धा तरंगतात का? का ही माया म्हणजेच एक निद्रा आहे, मृत्यूच्या पाण्यावर तरंगणारे एक स्वप्न आहे? का मृत्यू हा मायेच्या स्वप्नाचाच एक भाग आहे? आणि त्यामुळेच आपण जसे मायेत रमतो, तसा मृत्यूसुद्धा स्वप्नांच्या दुलईत रमून गेला आहे?

जागृती, निद्रा, स्वप्न, मृत्यू ह्या सर्वांचे एकमेकात रमून जाणे, ही तत्त्वज्ञानात्मक दृष्टी मराठीतील किती कवींकडे होती? आणि ही ह्या दृष्टीला अशा रुबाईचे स्वप्न मराठी भाषेत किती वेळा पडले? मग इतर मोठ्या कवींना जे मिळाले, ते किणीकरांना का नाही मिळाले?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

७०)

‘गहिवरले डोळे पाण्यांनी डबडबले

का उगा गाळसी व्यर्थ थेंब हे ओले

जातील उद्या ते अश्रु तुझे वाळून

जाणारे जातिल, पाहतील ना वळुन।।’

गेलेल्या माणसाबद्दल शोक सगळ्याच प्रियजनांना होतो. पण त्या शोकाचा नक्की काय उपयोग कुणाला होतो? ते अश्रू वाळूनच जाणार असतात. कालांतराने दुःखही कमी होणार असते.आणि ज्यांच्या साठी तुम्ही रडत आहात ते तरी कुठे मागे वळून पाहणार असतात? त्यांच्यासाठी तुम्ही शोक करत आहात हे त्यांना कळत आहे, ह्याची तरी तुम्हाला खात्री आहे का?

ही रुबाई वाचली की, दुःखाच्या व्यर्थतेवर मराठीत किती कविता लिहिल्या गेल्या असतील, असा विचार मनात येतो. कवी आणि दुःखाचे फार जवळचे नाते असते, कारण खरी संवेदनाशील व्यक्तीच कवितेकडे वळते. संवेदनशील व्यक्तीला दुःखाची भावना व्यर्थ आहे असे कसे वाटेल?

भा. रा. तांबे ह्यांनी ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ही कविता लिहिली. त्यात मानवी दुःखाचा फोलपणा जाणवत राहतो. पण ती कविता तांबे ह्यांनी स्वतःचा मृत्यू समोर आलेला असताना, ते स्वतः विकलांग झालेले असताना लिहिली आहे.

स्वतःचा मृत्यू समोर आल्यावर सगळे व्यर्थ आहे, ही भावना तयार होणे वेगळे, आणि दुसरी एखादी व्यक्ती गेल्यावर तिच्या बद्दल होणाऱ्या शोकाची व्यर्थता जाणवणे वेगळे. पहिली व्यर्थतेची भावना आहे, दुसरीत व्यर्थतेची तात्त्विक जाणीव आहे. भावना हा कवितेचा आत्मा असतो हे खरे आहे, पण तत्त्वज्ञानात्म जाणीव कवितेला फार मोठी गहराई प्रदान करते.

तांबे स्वतःच्या विसरले जाण्यावर बोलत आहेत. किणीकर कुणी मृत्यू पावलेला कसे सगळे विसरून जातो ह्यावर बोलत आहेत. उमर खय्याम स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या बेदखल येण्या-जाण्यावर बोलत आहे.

‘When You and I behind the Veil are past,

Oh, but the long, long while the World shall last,

Which of our Coming and Departure heeds

 As the Sea's self should heed a pebble-cast.’

(तू आणि मी, जाणारच आहोत कधीतरी दोघे आपण पडद्यामागे

तरीही, खूप खूप युगे राहील हे जग जिवंत आपल्या मागे

का घ्यावी त्याने दखल मग,  तुझ्या आणि माझ्या येण्याजाण्याची?

घेतो कधी सागरतळ दखल का, येऊन पडलेल्या वाळूच्या एका कणाची?)

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......