अजूनकाही
आदरणीय बाबासाहेब,
जयभीम.
मला कल्पना हाय, कदाचित जयभीम ऐकून तुम्ही दचकला असाल? तुम्ही म्हणाल, ‘अरं, माझंच नाव भीमराव हाय आणि तुम्ही मला उद्देशून पत्र लिहितानापण संबोधन म्हणून ‘जयभीम’ असंच लिहिता व्हय? तुमचं म्हणणं रास्त हाय. पण काय करणार? अलीकडं नुसतं ‘जय’ म्हणायचं फॅड एवढं आलंय, की माझ्या हातूनही सहज लिहिलं गेलं. असो.
बाबा, उद्या, १४ एप्रिलला तुमची जयंती. समता, बंधुता, मानवता, धर्मनिरपेक्षता, अभ्यास, संघर्ष अशा कितीतरी गोष्टींची शिकवण देणाऱ्या माझ्या बापाचा म्हणजेच तुमचा वाढदिवस! आता वाढदिवस म्हटलं की, जल्लोष आलाच! यंदाही पोरांनी काही हयगय केल्याली नाही बघा!
गणपतीला वाजवत्यात ना, तसल्या डॉल्बीच्या भिंतीच उभ्या करायचा निर्धार केलाय पोरांनी! हा… तसं काही ठिकाणी आपल्या पोरांनी ढोल-ताशांची पथकं पण सांगितल्यात. पण डॉल्बीवर नाचल्याशिवाय काय रंगत येत नाय, असं त्या… आपल्या तुमच्याच नावानं स्थापन केलेल्या तरुण मंडळांच्या पोरांचं म्हणणं पडल्यानं २०-२५ हजार रुपये खर्चून चांगला मोठ्ठा डॉल्बीच सांगितलाय. हा पण, त्या डॉल्बीवाल्या पोराला चांगलंच बजावलंय… कायपण झालं, कुणी कितीबी म्हटलं तरी आपली विचारांची आणि चळवळींची गाणीच लावायची!
त्याचं काय झालं, गेल्या वर्षी पोरांनी जास्त डिमांड केली म्हणून एक-दोन चळवळीची गाणी लावून झाल्यावर त्या डॉल्बीवाल्यानं ‘शिंदें’च्याच आवाजातलं तिसरं गाणं लावलं आणि पुढं तासभर पोरं अगदी बेभान झाल्यागत नाचू लागली. तासाभरानं कुणाच्या तरी लक्षात आलं आणि मधूनच अचानक एक म्हातारं डॉल्बीसमोर आलं आणि त्यानं थेट त्या डॉल्बीवाल्याला शिव्याच घालायला सुरुवात केली. त्यो डॉल्बीवाला पोरगा लगेच बोलला, ‘का ओ, असं का वरडालायसा?’
ते म्हणाले, ‘अरं पोरा, कुठली गाणी लावायची याचं तरी जरा भान ठेव की!’
पोरगं म्हटलं, ‘शिंद्यांचीच हायत नव्हं?’
‘अरं व्हय, पण पिक्चरमधली हायत. आंबेडकर जयंतीची नव्हत…’
त्या पोरानं म्हाताऱ्याच्या या उत्तरानंतर खाड्कन डॉल्बी बंद केला आणि बेभान होऊन नाचणारी पोरं जागच्या जागी ‘स्टॉप’ झाली.
पोरं जाग्यावरनंच बोंबलायला लागली, ‘काय झालं? लाव की डॉल्बी…’
डॉल्बीवाला म्हणाला, ‘अरं डॉल्बीवर वाजत्याली गाणी आंबेडकर जयंतीची नव्हत.’
पोरं लगेच म्हणाली, ‘मग काय हुतंय त्याला? लाव की कुठली बी! पण डान्स बंद नाय झाला पाहिजे!’
तसं मला त्या म्हाताऱ्याचं पटलं म्हणा. पण आजकालच्या तरुण पोरांच्या पुढं बोलून चालतंय व्हय?
पण काय पण म्हणा, पोरासनी मानलं पाहिजे बघा! कालची अख्खी रात्र या पोरांनी जागून काढली. तुम्हाला वाटंल, तुमच्यासारखं लाईटीच्या प्रकाशात अभ्यासबिभ्यास करत होती की काय? पण तसं नाही. तुमच्या जयंतीनिमित्त पोरांनी मोठमोठ्ठं डिजिटल बॅनर बनवल्यात. एकेका बॅनरवर तुमचा मोठ्ठा फोटो, त्यावर तुमचा एखादा विचार आणि १५-२० पोरांचं बारकं-बारकं फोटो लावून, असलं बॅनर चौकाचौकात पोरांनी उभं केल्यात. रात्रभर जागून सगळ्या गल्लीत आणि गावगावात पोरांनी ‘निळं वादळ’च निर्माण केलंय.
तसं काही ठिकाणी लय काय-काय कार्यक्रम घेतल्यात. कुठं पोरं सलग १२ तास वाचन करणार हायत. कुठं तुमच्या विचारांचा जागर करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार हायत... व्याख्यानं होणार हायत. पण असल्या किरकोळ कार्यक्रमांपेक्षा जयंतीच्या दिवशीची मिरवणूक बाकी झक्कासच होणार हाय बघा.
कसं हाय, आजच्या काळात खरं तर तुमचा विचार समाजात पोचवण्याची लय गरज हाय. पण ते पुस्तक वाचन, विचार जागर, व्याख्यान असल्या कार्यक्रमाला आता गर्दी होत नाही हो! मग आता एवढा खर्च करायचा आणि माणसं मात्र हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच! म्हणूनच हे जरा डॉल्बी-मिरवणुकीचं नियोजन केलंय. कसं असतंय, नाचायला मिळतंय म्हटल्यावर आजकालची पोरं कार्यक्रमाला यायला तयार होत्यात. आता यातनं विचारबिचार काही जात नाही, हे आम्हालाबी माहिती हाय, पण वर्षाला मिरवणुकीमुळे तुमची जयंती बाकी जंगी होती बघा.
खरं तर, आजची तरुण पोरं मोठ्या संख्येनं जमतील असा मिरवणुकीशिवायचा दुसरा काय पर्याय मिळाला तर लय बरं होईल. तुम्हाला काय पर्याय सुचला तर आमच्या डोक्यात तेवढा प्रकाश पाडा. महाराष्ट्रातच नव्हं तर अख्या देशात तुमची जयंती साजरी व्हती. देशात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती तुमच्याकडं असंलच! तेव्हा अस्से कोण्ते कार्यक्रम देता येतील; ज्यानं आजकालची तरुण पोरं मोठ्या संख्येनं जमतील आणि तुमच्या विचारांना खऱ्या अर्थानं जागर करतील, ते जरा आम्हाला सांगा…
निदान पुढच्या वर्षापासून तरी नुसतंच ‘जय’ म्हणून धागडधिंगा करण्यापेक्षा काहीतरी विधायक कार्यक्रम करण्याची संधी या पोरांना मिळेल.
बाबा, जयंतीनिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
लेखक प्रसारमाध्यम व जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत.
sushillad1@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment