अजूनकाही
प्रज्ञावंत गायक पं.कुमार गंधर्व यांचा भाषा, साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. शिवाय नृत्य, चित्रकला, शिल्पकला व वास्तुकला या कलांविषयी सखोल चिंतन होतं. विचारांचा विशाल कॅनव्हास असलेल्या कुमारजींना इतिहासाची जाण व वर्तमानाचे चोख भान होते. ते भविष्याचा वेधही घेऊ शकत होते. त्यामुळे सर्व क्षेत्रांतील लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असत. हे जाणणाऱ्या ‘ग्रंथाली’ने १९८५ साली त्यांची सलग सहा दिवस मुलाखतमैफल आयोजित केली होती. त्यात त्यांनी स्वर-लय-ताल, रागसंगीत व त्यातील प्रकार, लोकसंगीताचा पैस, त्यांनी ऐकलेले, पाहिलेले गाणे व त्यांचे गाणे यांवर सविस्तर मांडणी केली होती. हा ऐवज आता ‘गंधर्वांचे देणे - पं. कुमारजींशी संवाद’ या नावाने पुस्तकरूपात उपलब्ध होत आहे. त्या वेळचे कुमारजींचे गायन अनुभवता यावे, यासाठी पुस्तकात ५४ क्यूआर कोड पुस्तकात दिले आहेत. प्रसिद्ध लेखक अतुल देऊळगावकर यांनी संपादित केलेले हे पुस्तक ‘ग्रंथाली’ कडून ४ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित होत आहे. या पुस्तकामधील हा एक अंश….
.................................................................................................................................................................
आमच्या गुरुजींनी रेडिओवर प्रोग्रॅम केला होता. त्यामुळे लोकगीतं माहीत होती. कारण कोणाचाच अभ्यास नाही. नुसतंच सांगतात. माळव्यात गेल्यावर काय झालं की, लोकगीतांवर अभ्यास करणारे काही लोक माझ्या संपर्कात आले. गुरुजींचा काहीही प्रोग्रॅम असला की, मला त्यात भाग घ्यावा लागायचा. गीतांना चाली लावणं वगैरे करून तो प्रोग्रॅम द्यायचा.
असंच एकदा आमच्या गुरुजींनी होळीचा प्रोग्रॅम दिला होता. होळीचा प्रोग्रॅम म्हणून खास ब्रजमधल्या होळीचा प्रोग्रॅम केला पाहिजे म्हणून माधवबागेत गेलो. तिथं मथुरेचे बरेच लोक आहेत. तिथल्या एका म्हाताऱ्याला, खास खास धुना म्हणणाऱ्याला, आम्ही घेऊन आलो. तर त्याच्याकडून होळीचा एक प्रोग्रॅम गुरुजींनी रेडिओवर दिला. तेव्हा लोकगीतांकडे माझं थोडं लक्ष गेलं होतं. परंतु मी असं काहीतरी करेन, इतकी गडबड करेन, तेव्हा काही कल्पना नव्हती. तर तिथं गेलो असताना मी काही धुना लिहून घेतल्या आणि झोपलो असताना त्यावर विचार करू लागलो.
जुने लोक म्हणतात, ‘लोकसंगीतातून रागसंगीत निघालंय.’ पण सांगत कोणीच नाही की, कसं निघालं? कारण अभ्यास कोणाचाच नाही. नुसतंच सांगतात. म्हटलं हे काही बरोबर नाही. आपण बघितलंच पाहिजे. हे सर्व होत असताना मी काही मित्रांसोबत बोलायला सुरुवात केली होती. तेव्हा बसल्याबसल्या मी काय करू लागलो, मी गीतं लिहून घेत असे, तेव्हा स्वर लिहून घेत असे. गीताच्या भानगडीत मी पहिल्यापासूनच पडलो नाही. आणि आजवर मी जितकी गीतं ऐकली आहेत, ती सारी गाण्यासाठीच आहेत. त्याच्यातून रागनिर्मिती होण्यासारखी गीतं नाहीत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हो, पण लोकगीतं म्हटल्यानंतर फार मोठा कॅनव्हास आहे. अगोदर एक धून मला मिळाली. मी कुठलीही गोष्ट करायची असं ठरवलं ना की, माझ्यावर तेव्हा त्याचा भयंकर काहीतरी परिणाम होतो. काही करायचं ठरवल्यावर त्या वेळी मी फार वेगळा होतो. मी एक धून घेतली. एक राग घेतला. एका प्रकारे करून बघितलं, दुसऱ्या प्रकारे करून बघितलं. काही वेळेला लिहून बघितलं. मात्र रागसंवाद होत नव्हता. म्हटलं, हे बरोबर नाही. आपण जुन्या रागात बघू. आपल्याला जे येतात तेच बघू. हे संवाद आहेत की नाही ते बघू. मग जे अतिशय जुने राग आहेत ते घेऊ.
असं विचार करता करता, कोणता राग घ्यावा, म्हणून ‘श्री’ राग घेतला. पण, तो राग काही मला दाद लागू देईना. मला श्री राग येत होता. सर्व गातात तसा मी गातच होतो. श्री राग काही माझ्याशी संवाद करेना. महिना झाला, दोन महिने झाले. डोकं दुखण्याची पाळी आली. म्हटलं, हे केल्याशिवाय सोडायचं नाही. हा इतका जुना राग आहे, त्यात संवाद असलाच पाहिजे. आणि एके संध्याकाळी एकदम मला जाणवलं की, श्री राग, हा असा आहे. आपण शिकवलं ते असं आहे आणि श्री राग असा आहे. तर तो आणखीच कठीण झाला.
असं का? तीव्र रिषभ येतो. असं का? असा मध्यम येतो? असा पंचम का येतो? असा निषाद का येतो? तर श्री राग वगैरे केलेले राग नाहीत, ते स्वाभाविक राग आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून रागांबद्दल मी नेहमी म्हणतो, ‘राग बनाये नहीं जाते, राग बनते है.’ मी तर त्याच्यावर व्यवस्थित पाय रोवून उभा आहे. और पहले का जो पुराना मटेरियल होता हैं, उसपर आप संकीर्ण राग बना सकते हैं, नंबर ‘बी’चे, नंबर ‘सी’चे. ‘ए’ क्लास राग हा स्वतः निर्माण होतो.
तर संवाद झाल्यावर खूप आनंद झाला. तर संवाद झाल्यावर दुसरे जे राग आहेत ना, ती काय मामुली गोष्ट झाली. मी सर्वांना लिहूनच काढलं. संवाद कसा होतो हे शोधूनच काढलं. एकदम मला तो शोधच लागला. त्यामुळे तुम्हांला माझा बिहाग वेगळा वाटेल, माझा हा राग वेगळा वाटेल, तो राग वेगळा वाटेल. कारण प्रत्येक रागाचं थर्मामीटर इथं लावून बघ, तिथं लावून बघ, तो खेळच झाला माझा!
हे झाल्यानंतर म्हटलं आपण आता हे बाजूला ठेवू. मग पुन्हा त्या लोकगीतांकडे वळलो. आपल्या रागसंगीतामध्ये बरेच प्रकार आहेत. चारही बाजूंनी राग होणारे आहेत. संवाद व्हायला पाहिजेत.
तर मी खूप लोकगीतं गोळा करू लागलो. त्यासाठी मी बाहेर जात होतो, पण सर्वांत मदत झाली ती म्हणजे भानुताईची. कारण ती हेडमिस्ट्रेस होती आणि तिची मोठी बहीण डॉक्टर होती. ती खेड्यात जायची. त्यामुळे बायकांचं येणं-जाणं फार. बायकांना लोकगीतं गोळा करणं फार सोपं पडतं. ते पुरुषांना जमत नाही. कारण इतक्या सहजासहजी बायका आपल्याजवळ येऊ शकत नाहीत. आपणही त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही. ज्या गीतांना लोकगीतं म्हणतो ना, ती बायकांची आहेत, हे मी पहिल्यांदा सांगितलं. ती गीतं स्वाभाविक म्हणत असतानाच घ्यावी लागतात. गीतं, स्वर व अक्षरं गोळा करून आणू शकतो, पण धून म्हणून जी चीज आहे, ती फार नाजूक आहे.
तर बैलगाडी निघाली, बायका गात निघाल्या आहेत. तेव्हा छोट्या छोट्या मशीन वगैरे काही नव्हतं. ते सर्व लिहून घ्यावं लागत असे. मग त्या गात असताना धुना लिहून घ्यायच्या. मग घरी यायचं. मग पुन्हा त्याचा अभ्यास करायचा. एकदा तर मार खायचीसुद्धा पाळी आली होती! मी पावसाळ्याच्या दिवसांत कुठंतरी जाऊन उभा होतो. बारीकबारीक पाऊस सुरू होता. बायका गात होत्या. मी फार दूर उभा होतो. हातात डायरी होती. दूर लाइट होता. असं न बघता मला लिहिता येतं. स्वरच तर लिहायचे होते. बघायला कशाला पाहिजे? तर मी त्या खांबाच्या ठिकाणी उभा होतो. कोणीतरी बघितलं हो मला. हा कोण उभा आहे इथे? तो जवळ आला, तेव्हाच मला कळलं. त्याला मी कसंतरी समजावलं. ‘ऐसा हैं क्या? फिर चला जा.’ जातो म्हटलं. मग पुन्हा कधी गेलो नाही हं. हे असं काम करताना कोणी मारलंबिरलं तर करायचं काय? कारण त्या लोकांचं डोक्याचं तंत्र बिघडलं, तर फार कठीण असतं. मी फार बाहेर पडत नसे, त्यामुळे लोक तेव्हा फार ओळखत नसत. आता सर्वच ओळखतात, ही गोष्ट वेगळी.
मी अनेक धुना गोळा केल्या. भानुताई कुठेही जाऊ शकत असे, कुणाच्याही घरात. तिथं त्या बाईला धुना येतात म्हटल्यावर, भानुताई तिथं जायची. माझे केस कापायला न्हावी यायचा. तो म्हणाला, ‘मेरी माँ को अच्छे गीत आते है.’ मग भानुताई गेल्याच, तिच्याकडे. त्याच्या आजीकडेही गाणी होती. म्हातार्या बायकांकडे फार छान गीतं असतात. नवीन मुलींना फार काही येत नाही. लोकगीतंसुद्धा जुन्या बायका, वयस्कर बायका नवीन मुलींना शिकवतील असं काही नाही. जसं खाँसाहेब, बुवा वगैरे लोक नव्या शिष्यांना काही राग शिकवत नाहीत, तसं. ‘इसको दे के क्या करना? ये खराब कर देगी. गंदी कर देगी.’ त्यामुळे त्या शिकवत नाहीत. कारण त्या सबंध गीतांवर त्यांचं फार प्रेम आहे. गीत गात असताना बायका रडतात. गाणी ज्या अर्थाची असतात त्याच्यामध्येच त्या जातात. आमच्याकडे एक बाई होती लक्ष्मीबाई म्हणून. ती होती युपीची तिला कळलं एकदा की, ‘साब को गीतों का बडा शौक हैं.’ तेव्हा भानुताई म्हणाली, ‘तेरे को लोकगीत आते हैं क्या री?’ ‘हां. हम मोही आती. हम तो गाती.’ ‘तो फिर तू गा.’ लाजली बिचारी. मी म्हटलं, ‘अरे, मैं नहीं बैठता इधर. तू गा. मैं उपर जाता. दूर से सुन लुंगा.’ ते सीतेला वनवासात टाकलेलं असं काहीतरी गाणं होतं. ती म्हणू लागल्यावर रडूही लागली. कारण त्या बायका त्या गाण्यामध्ये पार्टी होऊन जातात. सीतेला कसा त्रास झाला, वनवासाची वेदना वगैरे, याचं गाणं होतं. ती रडूच लागली, पटापटा. म्हटलं, ‘नको बाबा. जा तू.’ तर अशी लोकगीतं गाणारे आहेत.
आता माझ्याकडं स्त्री-गीतांचा जवळजवळ पूर्ण माळवा लिहिलेला आहे. प्रत्येक गीतावर नोट लिहिली आहे की, कसे स्वर काढले पाहिजेत, त्यांचा अर्थ, म्हणण्याच्या धुना व राग हे सर्व लिहिलंय.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
लोकांना लोकगीतं काय आहेत, हे कळावं हे त्याच्यामागचं कारण आहे. फार छान आहेत. मुख्य म्हणजे माळवा आहे ना, हा फार समृद्ध आहे. माळव्याचे सूरच वेगळे आहेत. इतर ठिकाणची लोकगीतं मला माहीत आहेत. धुना माहीत आहेत. पण माळव्याचं कारणही आहे. स्त्रीगीतं खासकरून. इतकं तिथं कम्पाउंड झालेलं आहे की, इथून आले राहिले, तिथून आले राहिले, कारण खाण्यापिण्याच्या बाबतीतही तो समृद्ध भाग आहे. अशा ठिकाणी जो स्वरांचा लगाव लोकगीतांमध्ये मिळतो; तसा दुसरीकडे मला आढळलेला नाही.
मला इतर लोकसंगीताची माहिती आहे. ‘राजस्थानी’ हा तर व्यवसायासारखा लोकगीतं गाणारा एक ग्रुप आहे. म्हणून लोकगीतं म्हटलं की, आपण म्हणतो ना, चार स्वर, पाच स्वर आहेत. ठीक आहे. ते स्वाभाविक आहे. पण, आता आमच्या झाबुआकडचे आदिवासी लोक, तिथंही जाऊन बघितलं. ती लोकगीतंही कंटाळवाणी असू शकतात. माळव्याची लोकगीतं कंटाळवाणी तर ठीक आहे, पण स्वर फार चांगले आहेत. त्यांनी मला फार मोहित केलेलं आहे. त्यांचे स्वर असे कसे येतात? त्यांची लय अशी कशी येते? मी काही धुना, परिष्कृत करत बसलो, तेव्हा मी त्यांचे राग केले नाहीत. त्याची जरूर वाटली नाही. म्हणजे राग होऊ शकतो. पण, झाला तरी हा नकोच. बाजूला व्हा, असं म्हणत हटवून देतो आणि हे गीतच ठेवतो. हा राग होत नाही असं माझ्याकडे होत नाही.
ह्या धूनउगममधून तयार झालेले माझ्याकडे अकरा राग आहेत. पण ते करत असताना मी बघितलं की, त्यात जोडरागासारखे दोन-दोन रागसद्धा आहेत. माळव्याची लोकगीतं कंटाळवाणी वाटली, तरीपण त्यांचे स्वर फार चांगले आहेत. आपण आपलं ज्ञान त्या गीतावर लादतो. आपण त्या ज्ञानाच्या माध्यमातून काय बघत असतो? तर दोन-तीन रागसुद्धा एवढ्या लहानशा धुनांमध्ये स्वच्छ दिसून येतात. अशी गीतं गाण्यासाठी वापरू शकतो. त्यातून रागनिर्मिती होऊ शकते. तेव्हा त्याला स्वतंत्र रूप येतं. परंतु परिष्कृत झाल्यानंतर त्याचं रूपच बदलतं. म्हणजे काही बदल न होता, रागनिर्मिती करण्याचं सूत्र मला सापडलं. तसं ते फार कठीण आहे. त्यासाठी बरीच लॅबोरेटरी वगैरे तयार करावी लागते. केमिकल घालून हा राग आहे की नाही, ते हलवून बघावं लागतं. मग तो झाल्यानंतर आनंद होतो. असे अकरा राग निर्माण झाले आहेत.
‘गंधर्वाचे देणे : पं. कुमारजींशी संवाद’ - संपादन - अतुल देऊळगावकर
ग्रंथाली, मुंबई | पृष्ठे- १९२ | मूल्य - ८०० रुपये, सवलत मूल्य – ५०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment