‘आमच्या थाळीत आमचं अन्न’ हे दयानंद कनकदंडे यांनी संपादित केलेलं आणि मैत्री पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले पुस्तक ३१ मार्च २०२४ रोजी संभाजीनगरात प्रकाशित होत आहे. या पुस्तकात शाहू पाटोळे, राजकुमार घोगरे, हेमंत राजोपाध्ये, पार्थ पोळके, संजय आवटे, गिरीश लता पंढरीनाथ आणि अश्विनी सातव-डोके यांचे खाद्यसंस्कृतीविषयीचे लेख आहेत. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
‘हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं,
आरं सोंगाढोंगाचा बाजार हितला,
साळसूद घालतोय अळीमिळी,
अन् सार वरपती, रसा भुरकती
घरात पोळी अन् भायेर नळी...’
१९७२ साली ‘पिंजरा’ हा व्ही. शांताराम यांचा मराठी चित्रपट आला अन् त्यातले हे जगदीश खेबुडकर यांचे गाणे (‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’) महाराष्ट्राच्या खाण्यापिण्याची सांगड जातीशी उघडपणे घालणारे एक ‘क्रांतिकाव्य’च ठरले! त्याआधी ‘आपले-तुपले’ चालणारे व्यवहार असे इतक्या बिनधास्तपणे कोणी उघड केले नव्हते. श्रीधरपंत नावाचे ब्राह्मण मास्तर अन् चंद्रकला नावाची ‘पिंजरा’मधली नर्तिका यांच्या नैतिक संघर्षाची कथा अशा तऱ्हेने मराठी समाजाच्या जातीय ढोंगाची एक प्रतिनिधी ठरली.
तो काळ म्हणजे महाराष्ट्राची स्थापना १९६० साली झाल्यानंतरचा काळ. सत्ताधारी मराठा व सत्ता गमावलेले ब्राह्मण यांच्या सुप्तसंघर्षाचा तो राहिला. नोकरशाही, शिक्षण, न्याययंत्रणा, आरोग्यव्यवस्था, साहित्य, कला, पत्रकारिता आदी क्षेत्रांतला ब्राह्मणांचा आकडा कमी होऊ लागला होता. साठचे दशक संपता संपता जगभर युवा पिढीची जी बंडखोरी चालली होती, ती भारतातही येऊन पोचली. महाराष्ट्र, बंगाल, बिहार, गुजरात ही राज्ये या बंडात आघाडीवर राहिली.
‘छबीदार छबी’ या गाण्यातल्या वरील ओळी त्या बंडाकडे एक ढोंग म्हणून बघतात. शाकाहारी राहणे म्हणजे नैतिक, पवित्र, शुद्ध, सात्त्विक राहणे, असा जो समज ब्राह्मण, वैश्य आणि वारकरी-माळकरी, छोट्या व मध्यम जातींत घट्ट रुजला होता, तोही या बंडाच्या अन् परिवर्तनाच्या झपाट्यात ढिला झाला. मांसाहार करणे अनेक तरुणांनी बंडखोरी व मूर्तीभंजनाच्या पातळीवर नेऊन पोचवले. त्याच वेळी गाजू लागलेल्या या गाण्याने जाती आणि अन्न यांच्यातल्या नात्याची सांगड सार्वजनिक केली.
तोवर मराठीत संभाषणात, शिवीगाळीत अथवा टोमणेबाजीत जातीनुसार खाणे-पिणे काढले जाई. ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’ (वा. कृ. भावे), ‘मराठी लोकांची संस्कृती’ (इरावती कर्वे), ‘रज:कण’ (ना. गो. चाफेकर), ‘पेशवाईच्या सावलीत’ (ना. गो. चाफेकर) या समाजशास्त्रीय अभ्यासपूर्ण पुस्तकांत जातीप्रमाणे खाणे-पिणे मांडलेले नसल्याचे आढळते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१९८१ साली न. र. फाटक यांचे ‘मुंबई नगरी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात खाणावळी, हॉटेले असे एक प्रकरण असून, दुसरे खाद्यपेये, पोषाख वगैरे असे आहे, पण दोन्हीत जातवार खाणे-पिणे कसे असते, याची काही मांडणी नाही. भंडारी जातींनी आधी पाव-बिस्किटाचे भटारखाने काढले व नंतर खाणावळी काढल्या एवढा उल्लेख आहे. अशा खाणावळीत मद्य-मांस मिळे, असे फाटक सांगतात. टोमॅटोची लागवड इंग्रजांनी केली म्हणून काही ब्राह्मण कुटुंबे टोमॅटो खात नसत, अशीही नोंद त्यांनी केली आहे. नंतर टोमॅटोचा विरोध मावळला. ब्राह्मणांच्या खाणावळी निराळ्या असत आणि त्यात सोवळ्यात जेवणारे ब्राह्मण दिसत, असे १९व्या शतकाचे वैशिष्ट्य फाटक नोंदवतात. गेल्या शतकात मात्र जातपात, बाटणे-बाटवणे हे खाण्या-पिण्यातले प्रकार नष्ट झाल्याचे ते सांगतात.
१८६३ साली प्रकाशित झालेले ‘मुंबईचे वर्णन’ हे गोविंद नारायण माडगावकर यांचे पुस्तकही मराठी, गुजराती, पारशी आदी नागरिकांचे प्रत्येक क्षेत्रांतले कर्तृत्व आणि कारभार यांबद्दल खूप सढळ गोष्टी करते. परंतु जातीचे, खाण्या-पिण्याचे प्रघात यांबद्दल ते बेफिकीर दिसते. किंबहुना सर्व संशोधक माणसाच्या भुकांविषयी पळकाढू तरी वाटतात अन्यथा अजाण. मैथुन व उदरभरण या दोन अत्यावश्यक बाबी जणू एकाच मापात ते तोलतात अन् त्या गुप्त ठेवतात, असे वाटते.
एकवेळ मैथुन थेट कामशास्त्र, कोकशास्त्र, खजुराहो आदींनी उघड केले, असा त्यांचा समज झाल्याने, त्यावर त्यांचे भाष्य नाही. जेवणासारख्या तेवढ्याच महत्त्वाच्या विषयाची त्यांनी उपेक्षा करावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. जातींची नोंद, उतरंड, व्यवसायवैशिष्ट्ये असे बरेच काही ते सांगतात मात्र खाद्यपदार्थांची आवडनिवड, निर्मिती आणि त्यांचे स्थान यावर त्यांनी भाष्य टाळलेले. नाही म्हणायला हिंदू खाणावळ, मराठा खाणावळ, शुद्ध शाकाहारी भोजन, कोल्हापुरी अशा विशेषणांची गजबज गेल्या शतकात सुरू झाली, पण तेथेही जातीबंद कप्पे ढासळत गेल्याचे आढळते.
शिवाय कोण कोणाला तपासणार? ग्राहकी महत्त्वाची की जातीपातीचा आग्रह? वात, पित्त, कफ ही दोषत्रिसुत्री आयुर्वेदाच्या पायाशी आहे. या वेदाने पथ्य आणि आहार यांचा इतका मिलाफ घालून ठेवला आहे की तो कडेकोट बंदोबस्त तर वाटतोच, त्याखेरीज सारे मानवी व्यवहार नियत करणारा घटक वाटत राहतो. उदरभरण असे भोजनाला न हिणवता एकप्रकारचा तो एक यज्ञ असतो, असे ठरवून आयुर्वेदाने ऋतू, हवामान, समय, वय, स्थल आदींत सारे अन्न बांधून टाकले.
भाजपचे सरकार व त्यांचा हिंदुत्ववादी परिवार या अशा बंदिस्त आयुर्वेदाचा आग्रह करतो. सरकारी पातळीवर जवळपास लादणूकच आयुर्वेदीय खाद्य-पेयव्यवस्थेची सुरू झालेली आहे. संघपरिवार आयुर्वेदाचा एवढा पाठीराखा असतो, म्हणजे त्यात नक्क्कीच ब्राह्मणी प्रथा-परंपरा आणि श्रेष्ठत्व यांचा अंश सर्वाधिक असावा; शिवाय पाश्चात्त्य व मुसलमान यांच्या खाद्यसंस्कृतीला विरोधही करता येतो.
स्वच्छता व शुद्धता यांचा सर्वाधिक वावर खाद्यसंस्कृतीत असला पाहिजे, हे सर्व जग मानते. मात्र भारतात ही स्वच्छता व शुद्धता हिंदू खाद्यसंस्कृतीत धर्म, सोवळे-ओवळे, सत्व आणि पथ्य या चौकटीत मांडली जाते. यातला एक मूर्खपणा असा की, ‘प्युअर व्हेजिटेरीयन’ या इंग्रजी शब्दाचे भाषांतर ‘शुद्ध शाकाहारी’ केले जाणे! ‘प्युअर’चा अर्थ निव्वळ, निखालस, पूर्णत: निखळ असा. याबाबतीत धर्माशी त्याचा जोड करणाऱ्यांनी ‘प्युअर’चा अर्थ ‘शुद्ध’ असा जातीय निवडला. विरुद्ध अर्थाने बघितल्यास सर्व प्रकारचा मांसाहार अशुद्ध, अपवित्र (म्हणून अब्राह्मणी) असतो, असे एकतर्फी ठरवून टाकणे.
त्यांच्या दृष्टीने रक्त, पंख, पिसे, हाडे, शेपटी, शिंगे, आतडी इत्यादी अशुद्ध! मांसाहाराचे भटारखाने म्हणजे खाटिकखाने ठरवण्याचा हा धर्मांध प्रयत्न झाला. कृष्णाचे गोकुळ भाकड गायी व म्हातारे बैल यांचे काय करायचे, कुणी सांगितले नाही. आजच्या प्रमाणे अशा या गोवंशाचे नमुने रस्ते अडवून बसत का, उकिरड्यावर चरत का, काहीही खाल्ल्याने आजारी पडत का, की त्यांची अखेरपर्यंत देखभाल करणाऱ्या गोशाला भरपूर असत, याचाही कोठे उल्लेख नाही.
स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. जे जे स्वच्छतेचे काम करतील, ते सारे ‘अनटचेबल’ म्हणजे केवढा अपमान, केवढी मानहानी! परिसर असो की गटार, मेलेले जनावर असो की, मृत माणसाचे अंत्यकार्य, स्वच्छता करणारे अस्पृश्य मानले गेले. गावाबाहेर त्यांना राहायला लावले. त्यांच्याशी कसलाच सामाजिक व्यवहार करायचा नाही, हाही नियम.
साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती. त्यामुळे या अस्पृश्य, श्रमिक जातींच्या खाद्यसंस्कृतीचे कोणाला ज्ञान असणे शक्यच नव्हते. अन्नाबाबत आणि खाद्यसंस्कृतीविषयी सवर्ण हिंदू समाजच आपल्या आवडीनिवडी सांगत राहिला.
अखेर मित्रवर्य शाहू पाटोळे यांनी ‘अन्न हे अपूर्णबह्म’ अशी आरोळी सवर्णांच्या गोटात मारली, तेव्हा तिकडे समाजाचे लक्ष वेधले गेले. म्हणून ‘आमच्या थाळीत आमचे अन्न’ ही अस्मिताही जागृत झाली. हिंदू धर्माने जातिव्यवस्थेचा तुरुंग इतका छळवादी केला की, एकमेकांविषयीची जिज्ञासा वा उत्सुकताही त्याने नष्ट करून टाकली. त्यात दोन जातींत बोलचाल फार न व्हावी म्हणून सर्वांत कठोर मनाई करण्यात आली, ती खाद्यपदार्थाच्या देवाणघेवाणीवर. तळच्या जातीघरी शिजलेले अन्न चक्क अशुद्ध ठरवण्यापर्यंत मजल सवर्णांची गेली.
त्यामागे अर्थातच अस्वच्छतेचे कारण दिले जायचे. आधी रोटीबंदी जाहीर झाल्यानंतर बेटीबंदीची घोषणा होणे अनिवार्य असणारच. कारण वंशातही शुद्धतेची वागणूक सवर्णांना आवश्यक वाटे. सवर्णांनी पिण्याचे पाणी देखील स्पृश्यास्पृश्य करून सोडले. आपल्या पाण्याचे स्त्रोत वेगळे, अस्पृशांचे वेगळे अशी ग्रामव्यवस्था ते करीत. ना आपण तिकडे जायचे, ना त्यांनी इकडे यायचे. उष्टे खाणे सवर्णांनी त्याज्य ठरवले. मात्र आपली उष्टावळ अस्पृश्यांनी खाल्लेली त्यांना चाले. ज्या अन्नाला लाळ लागलेली असते ते भ्रष्ट वा अशुद्ध असे ब्राह्मणांनी ठरवले होते. शरीराबाहेर जे घन व द्रवपदार्थ टाकले जातात, ते सारे अशुद्ध असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच स्त्रीची मासिक पाळी असे, तेव्हा तिला स्वयंपाकघर व देवघर या दोन ठिकाणी प्रवेशबंदी असे. स्वयंपाकघरात पादत्राणे घालून जाण्यास आजही मनाई असते.
मेलेल्या जनावरांच्या कातड्याची पादत्राणे, हा खरा या मनाईमागचा उद्देश असतो. ब्राह्मणांच्या सोवळ्या-ओवळ्यात चामडे वर्ज्य असते. रबरी चपला वा बूट मात्र सर्रास चालतात! जोड्यांना चिकटून येणारी घाण, धूळ आता जवळपास अदृश्य झाली आहे, तरीही बंदी आहेच.
द्विजेंद्र नारायण झा हे भारतातले एक बडे इतिहासकार होऊन गेले. ‘द मिथ ऑफ होली काऊ’ (२००२, लंडन) हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. अन्यत्र त्यांनी असे लिहिले आहे की, चरक, शुश्रुत व वाग्भट यांनी त्यांच्या भारतीय वैद्यकशास्त्रात मांसाहारी पदार्थांची शिफारस केलेली आहे. प्राणी आणि मासे, तसेच गोमांस यांच्यापासून तयार पदार्थाचे उपचार त्यांनी नमूद केले आहेत. झा यांचे म्हणणे असे आहे की, ब्राह्मणांच्या ‘ऑट क्विझिन’चे परिवर्तन अस्पृश्यांच्या रोजच्या आहारात गरज म्हणून कसे झाले, याचा अभ्यास करायला हवा. कारण ती फार प्रदीर्घ प्रक्रिया आहे. ब्राह्मण जे चोखंदळपणे आणि पाककला म्हणून करायचे ते मांसाचे पदार्थ असत.
झा त्यांच्या ‘अगेन्स्ट द ग्रेन’ या लेखसंग्रहात असेही सांगतात की, ‘गायीचे सर्व अवयव शुद्ध असतात, मात्र तोंड कधी नसते असे शंख या शास्त्रवेत्त्याने म्हटले आहे.’ याज्ञवल्क्य, पाराशर, व्यास आदी ऋषीही गायीचे तोंड अपवित्र असल्याचे सांगतात. गायीचे पावित्र्य अन् देवत्व यांवरही प्राचीन भाष्ये आज भले धक्कादायक वाटतील, पण गाय कोठेही तोंड घालत असते, हे आपण बघत असतोच. त्यामुळे काळ बदलला असला, तरी गाय काही बदलली नाही अन् तिला पवित्र मानणारे लोकही. बिचारे सावरकर!
जाती आणि खाणे-पिणे यांचा संबंध कसा असतो, त्याचे एक उदाहरण पाहू :
“शालेय शिक्षणातील साहित्यात जे जीवन दाखविले जाते ते खऱ्या जीवनापासून किती दूर असते! रामभाऊंकडे श्रीखंडपुरी केली होती किंवा शाम भटजींनी एका बैठकीत बुंदीचे पन्नास लाडू फस्त केले असे वाचायला मिळेल; पण रामजी पाटलाकडे झिंग्याचा रस्सा केला होता किंवा पापलेट स्वस्त झाल्यामुळे अमूक लोक खुशीत होते, असे जर कोणी लिहिले तर त्याला पाठ्यपुस्तकात जागा मिळणे पूर्ण अशक्य आहे. एवढेच काय, पण भाषेप्रमाणे कोण काय खातो यावरही आपल्या माणसाची शुद्धाशुद्धता अवलंबून राहते. बहुसंख्य शाकाहारी मुलांच्या आणि ब्राह्मण मराठ्यांच्या वर्गात मांसाहारी मुलांची कित्येकदा अतिशय कुचंबणा होते, ही गोष्ट बहुतेकांना ठाऊक असेल.” (भाषा आणि संस्कृती, ना. गो. कालेलकर, मौज १९८२, पृष्ठ ५७.)
१९६२ साली हे पुस्तक लिहिले गेले. साठ वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती त्यात त्यांनी मांडली आहे. आता असे होत नसणार, कारण बहुजन समाजातले लेखक, कवी, शिक्षक, विद्यार्थी यांची बहुसंख्या आज झाली आहे. तरीही अशा उदाहरणांमुळे दोन-चार पिढ्यांना तरी शाकाहार विरुद्ध मांसाहार या लढाईत कोणाची तरी बाजू घ्यावी लागली असणार हे नक्की. मात्र शालेय पाठ्यपुस्तकातून मांसाराचे महत्त्व न सांगण्याचे पथ्य अजूनही पाळले जाते. काही दलित साहित्यिकांच्या आत्मचरित्रातले भाग पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाल्याने जाती, अस्पृश्यता, अन्नान्न दशा यांची जाणीव निदान दोन तरी पिढ्यांना झाली असणार.
“अन्नाविषयी अत्यंत चौकस भारतीय माणसांखेरीज अन्य कोणी नसेल, त्यातल्या त्यात हिंदू. अन्न तयार करण्याबाबतच नव्हे तर त्याचे परिणाम माणसाचे शरीर व मेंदू यावर कसे होतात, याबद्दलही ते काळजी घेतात. म्हणूनच खाद्यबंदी खूप असते. या समजुतींचे मूळ आयुर्वेदात आहे हे अनेकांना ठाऊक नाही”, असे विश्लेषण सुधीर कक्कड व कॕथरीना कक्कड त्यांच्या ‘द इंडियन्स : पोट्रेट ऑफ पीपल’ या पुस्तकात करतात.
एखाद्या माणसाचा स्वभाव त्याच्या खाण्यापिण्यातल्या पदार्थांमुळे कसा घडतो, याचाही उहापोह हिंदुत्ववादी करत राहतात. त्यामागे आयुर्वेद आहे की नाही माहीत नाही, परंतु मांसाहार क्रोध आणि उन्माद यांना जन्म देतो, असा त्यांचा समज असतो. हिंदू नेभळट का, तर म्हणे ते मांस खात नाहीत म्हणून आणि तामस प्रकृती करील, असेही काही खात नाहीत म्हणून.
आयुर्वेदाचा पचनक्रियेचाही अभ्यास असल्याने कोणत्या पदार्थासह कोणता पदार्थ चालेल व कोणता वर्ज्य याचीही बरीच बंधनं त्यात आहेत. फळांचीही प्रकृती असते व तिचा पचनावर काय परिणाम होतो, हे आयुर्वेद सांगते. आयुर्वेदाचे वैद्य स्वयंपाक करण्यातही कुशल असावेत, असे सांगितलेले आहे. उष्ण, शीत, समशीतोष्ण अशी पदार्थांची प्रकृती माणसाच्या पचनावर आणि स्वभावावरही परिणाम करते, असे हे शास्त्र सांगते. बद्धकोष्ठ, अपचन, लंघन, पथ्य असाही विचार करणारे हे शास्त्र मानवाची विष्ठा घट्ट आहे की पातळ, दुर्गंधी देणारी आहे की नेहमीसारखी याचा गांभीर्याने ऊहापोह करते.
मग अमूक जातीची माणसे भोजनास सोबत घेऊ नयेत किंवा पंक्तीत दूर बसवावीत किंवा ‘परक्या’ जातीच्या माणसाहातचे काही खाऊ नये, असे नियम अथवा आज्ञा आल्या कोठून आणि का, यावर खोलवर विचार मात्र फार थोड्या लोकांनी केला. म्हणून फुले, आंबेडकर, आगरकर, शिंदे आदी थोर आधुनिकांचा वारसा पाटोळे यांनी चालवला आणि त्यांनी ‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच कसे उपेक्षिले गेले, हे सांगितले.
सुशिक्षित महाराष्ट्रीयांच्या घरात पाकक्रियांची जेवढी पुस्तके असतात अथवा घरात जी पाकसंस्कृती असते, ती उच्चवर्णियांची (ब्राह्मणांमधल्या पोटजाती, प्रभूंमधल्या पोटजाती, मराठा, राजपुतादी) असते. याचा अर्थ वरच्या जाती चवबदल म्हणून उच्चवर्णीय अन्नाचेच अनुकरण स्वयंपाकघरात करतात. जसजशा जाती मध्यमवर्गात जमा होत जातात, तशा त्या उच्चजातीय अल्पसंख्याकांची राहणी, पोशाख, वाणी, लकबी, हातवारे, वावर, शिक्षण, व्यवसाय वगैरे अनेक गोष्टी आत्मसात करत जातात, तसेच हे.
आणखी एक वास्तव असे की, वर्गाची श्रेणी वाढली की आणखी एका प्रकारचे अनुकरण केले जाते. वडापाव, पिठले-भाकरी, ठेचा, नूडल्स आदी गरिबांघरचे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात अन् आपले ‘खाद्यस्वातंत्र्य’ टिकवले जाते. जशा जाड्याभरड्या जीन्स कामगार आणि गुराखी वापरत, त्याची लोकप्रियता जगभर सर्व थरात पसरली आहे. तोंड मिटून खाणे, मिटक्या न मारणे, भुरके न मारणे, तोंडात घास असताना न बोलणे, शांतपणे चावून जेवणे, दातात अडकलेले न थुंकणे असे कितीतरी ‘टेबल मॅनर्स’ उच्चवर्गात पाळत. आता ते सर्वमान्य झालेले दिसतात.
आता एक वेगळ्याच प्रकारची सांस्कृतिक लादणूक खाद्यपदार्थ आणि माणसे सोसत आहेत. ‘जेनेटिकली मॉडिफाईड’ म्हणजे ‘जनुकीय’ बदल केलेले धान्य व त्यापासून तयार झालेले खाद्यपदार्थ यांचा अनेक ताटांत झालेला शिरकाव. भारत अजून त्यापासून मुक्त आहे, असे म्हणतात. बीटी बियाणे वापरात आहेत, मात्र खाण्यात तसले पदार्थ माहीत नाही. पाश्चात्त्य जग मात्र जवळपास अनेक प्रकारचे धान्य जनुकीय बदलांसाठी खाते आहे.
भारतात बीटी तंत्रज्ञानाला विरोध/पर्याय म्हणून सर्वस्वी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू झालेला आहे. तरीही आता केशरी दिसणारी गाजरे, बेचव झालेले टॉमॅटो, भली मोठी केळी, पांचट सफरचंद, बिनतिखट मिरच्या, पनीर, सोयाबीन, गुलाबी चिलखती ड्रॅगनफ्रुट, दाट हिरवी ब्रोकोली, लांबट होणारे बटाटे, गुलाबी गाभा हरवलेले पेरू असे कितीतरी आपल्या पोटात जाऊ लागले आहे. कोणीच ठामपणे सांगत नाही की, यांत काही बदल केले आहेत की नाहीत आणि कोणी त्याचा शोधही घेताना दिसत नाही.
भारतीयांची अनेक क्षेत्रे भांडवलदारांच्या घशात एका पाठोपाठ एक जात आहेत. खाजगीकरण, व्यापारीकरण, तंत्रज्ञानावर प्रचंड भर, असे करत सरकार आपली कर्तव्ये झटकून टाकत असताना ज्यांवर लोकांचा विश्वास बसत आलेला आहे, अशा अनेक प्रयोगशाळा, संस्था रडतखडत चालत आहेत.
शास्त्रज्ञांची भरती नाही की तज्ज्ञ लोकांची. धर्माधिष्ठित राष्ट्र उभे करू पाहणारा संघपरिवार शेतीचे आणि खाद्यपदार्थाचे झपाट्याने होणारे ‘कॉर्पोरेटीकरण’ सहज होऊ देत आहे. त्यात नफा हाच एकमेव उद्देश आहे. म्हणून सार्वजनिक उत्तरदायित्व असणाऱ्या सर्व वैज्ञानिक संस्था, प्रयोगशाळा निस्तेज व स्तब्ध होत आहेत.
कॅलरी, व्हिटामिन्स, कार्बोहायड्रेटस, प्रोटीन्स अशा ‘निरोगी आणि पौष्टिक’ वेष्टनात सर्व कंपन्या माणसांना काय काय खायला घालत आहेत, कोणाला सांगता येत नाही. माहीत असले तरी सांगू दिले जात नाही. रोजच्या अन्नपदार्थांमुळे भारतात स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, हाडांचा ठिसूळपणा, दृष्टीदोष असे अनेक शारीरिक विकार पसरत आहेत. केंद्र सरकार एकाएकी भरड धान्याचा वापर वाढवायला दबाव आणते, परंतु ते धान्य पिकवायचे कोणी, त्याला भाव काय मिळेल आणि लागवडीचा खर्च किती, याचा हिशेब मांडायचा कोणी?
भाजपचा म्हणजे हिंदुत्ववादी परिवाराचा हा एक डाव असावा, असा संशय येतो. बोलूनचालून तो शेठजी-भटजींचा पक्ष. व्यापाऱ्यांनी आपल्या नेत्यांकडे आग्रह धरावा आणि सरकारने तो पुरवावा, असे सध्या चालले आहे. संस्कृती, परंपरा, प्रकृती यानिमित्ताने एक ‘फूड नॅशनॅलिझम’ अर्थात ‘खाद्यसंस्कृती राष्ट्रवाद’ हा राजकीय पक्ष भारतीयांवर लादतो आहे. वंदना शिवांसारख्या अनेकांचे बीटीविरोधी आवाज आता बंद आहेत.
ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळीने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडली. त्यामुळे एक जुनाच सांस्कृतिक-सामाजिक संघर्ष नव्या मैदानावर उभा ठाकला. हे मैदान ब्राह्मणेतरांच्या कला, क्रीडा, साहित्य, संगीत, राजकारण, इतिहास, प्रथा आदी प्रकारांनी नक्कीच मारले. त्याची दखल जगाला घ्यावी लागली. बहुतेक समाजशास्त्र्यांनी उपेक्षिलेला खाण्या-पिण्याचा विषयही आता टेबलावर आला आहे.
खाणे-पिणे कधीही एकतर्फी नसते. निदान भारतात शेजारधर्म, मैत्री, नातीगोती, सण-समारंभ, यात्रा-जत्रा अशा कारणांनी बहुतेक घरे अनेक पदार्थांची देवाणघेवाण करतात. जो जातीय मज्जाव होता, तो शहरीकरणाच्या झपाट्यात लुप्त झाला. अनेक घरे व त्यातल्या व्यक्ती सर्रास मांसाहार, शाकाहार आलटूनपालटून करू लागल्या. खाद्याचा बाजारही इतका वाढला की, हवे ते मिळू लागले.
आधुनिक विज्ञानामुळे असंख्य पदार्थ गोठवलेल्या आणि डिहायड्रेटेड अर्थात निर्जलीकरणाच्या रूपात मिळू लागल्या. तत्काळ शिजवणे व खाणे घराघरांत गेले. दक्षिणेतले पदार्थ देशभर पसरले आहेत. अन्य दिशांतले पसरले नाहीत. गुजराती, पंजाबी, बंगाली, मराठी, इंदोरी, लखनवी, हैदराबादी असे प्रादेशिक खाद्यपरिचय चांगले रूळले आहेत. त्याने जाती, भाषा, धर्म, प्रदेश, लिंग अशा अनेक हद्दी ओलांडल्या आहेत. पुरुषांनी तर पाककलांमध्ये जागतिक कीर्ती पटकावलेली दिसते.
‘फास्ट फूड’च्या नावाखाली किंवा शिजवायला अन् पचवायच्या पद्धतीमुळे सुविख्यात झालेल्या अन्नपदार्थांनी आज देश जवळपास गिळंकृत केलेला दिसतो. खाद्य तयार करून ते घरपोच देण्याच्या व्यवसायाने तर सर्वांना थक्क करून सोडले आहे. मात्र या गतिमान खाद्यसंस्कृतीचा विपरित परिणाम होत असल्याचे इशारे डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ, पालक आणि तंदरुस्तीपटू देऊ लागले आहेत. वेगवेगळे अन्न शिजवायच्या नाना पद्धती, त्यासाठी लागणारा संयम, चवीतले सातत्य आणि पौष्टिक तत्त्वे, साऱ्याचा खात्मा होत चाललेला आहे. केवळ गिळणे, वचावचा खाणे, फक्त पोट भरण्याचा हेतू बाळगणे, वेळ वाचवायचा म्हणून वाट्टेल ते खाणे, असा सारा मामला माझ्या घराजवळच रोज मी बघतो.
सकाळी ब्रिस्क वॉक करून येताना दिसतात ते फास्ट फूडचे ग्रहण करणारे तरुण-तरुणी. नाइलाजाने ते हे पदार्थ खातात, हे मी जाणतो. त्यांचे शॉर्टकट्स तिथे दिसतात. ते खाजगी शिकवण्यांमुळे तिथे येऊ लागतात अन् पैसे, वेळ, मेहनत वाचवू पाहतात. ते चुकीचे आहे, हे ते जाणतात. तारुण्याच्या भरातही तसा विचार त्यांच्या डोक्यात येत असणार. त्यांना या सगळ्या बचतीच्या हव्यासात ढकलणारे त्यांचे पालक काय करतात, ते माहिती नाही. महाविद्यालयाच्या, वर्गाच्या जागी खाजगी ट्युशन्स सुरू झाल्या अन् प्रचंड संख्येने उगवलेल्या या शैक्षणिक ग्राहकांची भूक भागवायला खाणावळी, टपऱ्या, कॅफे, पोळी-भाजी केंद्रे, मोबाईल व्हॅन्स, रेस्तराँ, तऱ्हेतऱ्हेच्या चहांच्या फ्रँचायझी असे खूप काही सुरू झाले आहे. झटपट खाद्यसंस्कृती अर्थात जंकफूड टिकवायची दोन्ही बाजूंची ही कसली झटापट!
‘फास्ट फूड नेशन’ असे एक पुस्तक एरिक श्लाॕसर या पत्रकाराने लिहिले ते २००२ साली. ते प्रचंड गाजले. जगाला त्याने सावध केले. पुस्तकाचा परिसर अमेरिका असूनही जगातल्या अनेक देशांना आपण ‘अमेरिकेसारखे’ होऊन जाऊ, असे वाटू लागले. शेती, पशुपालन, पीकपद्धती, उत्पादन, उद्योग, जाहिराती, कार्यसंस्कृती, शहरीकरण, कर्ज पुरवठा, कायदे, अन्न तंत्रज्ञान, हॉटेल व उपाहार उद्योग अशी मोठी साखळी या पुस्तकाने जोडून दाखवली. झटपट खाणे ही एक गरज म्हणून ग्राहकांना पटवले गेले.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या पुस्तकाचे उपशीर्षक ‘व्हॉट द ऑल अमेरिकन मील इज डुईंग टू द वर्ल्ड’ असे असल्याने खाद्य उद्योगाची पुरी राजकीय अर्थव्यवस्था तीत उमटली. अमेरिकेचा खाद्यपदार्थ साम्राज्यवाद या निमित्ताने उघडानागडा झाला. हॉट डॉग, हँम्बर्गर, सँडविच, फिंगर चिप्स इत्यादी देणारी मॅकडोनाल्ड कंपनी, बर्गरकिंग कंपनी, जोडीला कोकाकोला, पेप्सी, कॅडबरी शॉप, कॉनाग्रा बीफ कंपनी आदी नावे पाहता पाहता आंतरराष्ट्रीय मक्तेदार झाली. जवळपास जेवणाचीच जागा या पदार्थांनी घेऊन टाकली!
लहान मुले व तरुण यांना लक्ष्य करत जाहिरातींचा व प्रायोजकत्वाचा मारा सुरू करण्यात आला. या झपाट्यात मूळचे अमेरिकन चौरस आहारातले पदार्थ, पाकक्रिया गायब व्हायची वेळ आली. या कंपन्यांनी नवा रोजगारही तयार केला. शिकता शिकता नोकरी करणाऱ्यांची भरपूर संख्या या कंपन्यांच्या दुकानात दिसू लागली.
‘स्विगी’, ‘झोमॅटो’ यांसारख्या कंपन्या घरचेच अन्नपदार्थ सादर करू लागल्याने खाद्यौगाचे पूर्णतः भांडवलीकरण-औद्योगिकीकरण झाले आहे. परिणामी, असंख्य नवविवाहित जोडपी, ‘लिव्ह इन’मधले जोडीदार, अविवाहित पगारदार तयार झटपट अन्नपदार्थ भूक भागवण्यासाठी खात आहेत. फोनवर मागणी नोंदवली, पैशाचे व्यवहार आधी केले काय, दारात केले काय ; इतक्या मिनिटांत जेवण आल्याचा ग्राहकांना आनंद तर पोचवणाऱ्यांना शब्दाला जागण्याचा. अन्न चवदार, पौष्टिक, ताजे, धड शिजवलेले होते का नाही, याची बातच नाही!
तेव्हा ‘थाळीही आमची नाही अन् अन्नही नाही’, अशी दुरावस्था तरुण पिढीने ओढवून घेतली आहे. घरी राहून काम करण्याची मुभा असल्याने हा घरपोच अन्नाचा उद्योग खूप वाढला आहे. अन्न निरीक्षक पूर्णपणे लुप्त झालेले आहेत. अन्न तयार करणाऱ्या कंपन्यांच्या भटारखान्यांवर धाडी पडल्याची बातमी एकदाही आलेली नाही. कामगार संघटना बांधून आपले हक्क व अधिकार मान्य करायची संधी हिरावली गेली आहे.
‘अन्न हे शून्य ब्रह्म’ अशी वेळ आलेली असताना, आता सामाजिक-राजकीय-आर्थिक असा संयुक्त लढा केल्यावाचून उपाय नाही. अन्यथा निःसत्व, निस्तेज, आजारी पिढी आपल्याला सतत जाब विचारत राहील.
‘आमच्या थाळीत आमचं अन्न’ : संपादक - दयानंद कनकदंडे | मैत्री पब्लिकेशन, पुणे | मूल्य - ९० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment