५१)
‘तोडून शृंखला ओरडला तो कैदी
सांडु द्या रक्त, रक्ताची चढू द्या धुंदी
नौबती झडू द्या रणांरणावर आता
पोलाद पेटु द्या, जाळा जुलमी सत्ता।।’
किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या राजकीय विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. मानवेंद्रनाथ रॉय (१८८९-१९५४) हे विचारवंत सुरुवातीला कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर ते कम्युनिझमपासून दूर गेले. त्यांनी ‘रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. त्यांना ‘रॉयिस्ट’ म्हणत. ह्यात यशवंतराव चव्हाण, गोविंदराव तळवळकर अशा अनेकांचा समावेश होता.
हे सारे लोक कम्युनिझमपासून दूर आले, तरी कामगारांना आणि एकूण गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, ही भावना कायम होती. ‘रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पाया सामाजिक आणि आर्थिक न्याय हाच होता. त्यासाठी रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार. त्यातूनच ही रुबाई आली आहे.
‘तोडून शृंखला ओरडला तो कैदी
सांडु द्या रक्त, रक्ताची चढू द्या धुंदी’
अन्यायकारक अर्थव्यवस्थेच्या श्रृंखला तोडून तो अर्थव्यवस्थेचा कैदी, क्रांतीची हाक देतो आहे.
तो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध नौबती झाडण्याची भाषा करतो आहे. त्याला संग्रामाचे पोलाद पेटवायचे आहे. सर्व जुलमी आर्थिक सत्ता नष्ट करायच्या आहेत.
‘नौबती झडू द्या रणांरणावर आता
पोलाद पेटु द्या, जाळा जुलमी सत्ता।।’
खरं तर ‘रॅडिकल ह्यूमॅनिझम’ ह्या शब्दातच माणुसकी आहे. माणुसकीमध्ये क्रांती आणि रक्तपात कसा बसेल? पण किणीकर बहुतेक तारुण्याच्या नशेत वरील रुबाई लिहून गेले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
५२)
‘भोगलीस सत्ता, सत्तेतुनं संपत्ती
उघडली मूठ, सत्तेची झाली माती
तुज लपावयाला आता जागा नाही
घर तुझे जळाले, जळशिल आता तूही।।’
माणूस सत्ता भोगतो. त्या सत्तेतून संपत्ती येते, तिचाही स्वीकार करतो. पण सत्ता ही पैशाहूनही चंचल गोष्ट आहे. सत्ता बहुधा परिस्थितीमुळे माणसाला मिळालेली असते. पण माणसाला वाटत असते की, आपण सत्ता आपल्या कर्तृत्वाने मिळवलेली आहे. ती परिस्थिती बदलली की सत्ता जाते.
झाकली मूठ सव्वा लाखाची असते, हे सत्तेबाबत पैशापेक्षा जास्त खरे असते. ही मूठ उघडी पडली, की सत्तेवरून माणूस हाकलला जातो. लपायला कुठेही जागा राहत नाही. सगळी व्यवस्था बदलून जाते. म्हणजेच घर जळून जाते. सत्ता उपभोगलेला माणूस साधारणपणे सत्तेशिवाय आनंदात राहात नाही. मनातून म्हणा, मरून जाऊन म्हणा, तो जळून जातो.
५३)
‘हा असाच ! याला जगावयाची भीती
बांधून राहतो काळोखाच्या भिंती
नागवाच येसी, नागवलो का म्हणसी
गंगेत बुडाली गंगेची रे कळशी।।’
हा असाच ह्याला जगावयाची भीती - ही अवस्था बहुतेक सगळ्यांचीच असते. मुक्त आणि मनसोक्त असे काही नाही. लोक सुरक्षा महत्त्वाची म्हणून मन मारून राहतात. जिवाची भीती, आर्थिक सुरक्षेची भीती, अपमान होईल ही भीती, काहीतरी अघटित घडेल ही भीती, कायद्याची भीती, लोकोपवादाची भीती, समाजाची भीती, देवाची भीती, आपल्या धर्माची भीती, दुसऱ्या धर्माच्या लोकांची भीती, उन्हाची भीती, पावसाची भीती, थंडीची भीती. सगळ्या जगण्याचीच भीती.
ह्या अशा अनेक काळोखाच्या भिंती बांधून त्यांच्या आत कुढत कुढत लोक जगत असतात. मर्ढेकरांनी ह्या जगण्याचे वर्णन ‘पिपात मेले ओल्या उंदिर’ ह्या कवितेत केले आहे.
‘गरीब बिचारे पिपात जगले
पिपात मेले उचकी देऊन’
किणीकर अपयशाला कधी घाबरले नाहीत. प्रछन्न दारिद्ऱ्यातसुद्धा मनसोक्त जगले. त्यांना लोकांचे असे काळोखाच्या भिंती बांधून जगणे फार डाचत असणार.
अपयश तर किणीकरांच्या नशिबालाच चिकटले होते. पण ते सर्जनशील राहिले. साहित्यावर प्रेम करत राहिले. जे गेले त्याचे त्यांनी फार वाईट वाटून घेतले नाही. जे आले ते आले, जे गेले ते गेले, अशी मुक्त आणि मनस्वी मानसिकता त्यांच्याकडे होती.
काही गेले, तर लोक रडत बसतात. आपण ह्या ना त्या प्रकारे नागवले गेलो आहोत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी तयार होते. कुणाचे पैसे जातात, कुणाची बायको कुणाला फसवते, कुणाचा नवरा कुणाला फसवतो, कुणाची समाजात आब्रू जाते. शंभर गोष्टी!
अशा रडणाऱ्या लोकांना किणीकर गंमतीने म्हणतात – लेका तू नागवाच आला होतास मग, मी नागवला गेलो असे का म्हणतोस? ह्या जीवनाच्या गंगेतून तू जी कळशी भरून घेतली होतीस, ती परत त्या गंगेतच सांडून गेली, तर त्यात काय एवढे?
‘नागवाच येसी, नागवलो का म्हणसी
गंगेत बुडाली गंगेची रे कळशी।।’
५४)
‘या इथून गेली वाजत एक वरात
या इथेच रुतला रणगाडा चिखलात
या इथे भंगला भगवंताचा कळस
राखेतुन आली इथेच काळी तुळस।।’
निर्मिती आणि विनाश ह्यांचे चक्र अव्याहतपणे चालू आहे. ज्या रस्त्यावरून नवनिर्मितीच्या आवेगाने भरलेल्या नव-दांपत्याला वाजत-गाजत घेऊन जाणारी वरात जाते त्याच रस्त्यावर युद्धकाळात जीवनाचा संहार करणारा रणगाडा स्वतःच मारला जाऊन खालच्या चिखलात रुतून पडतो. जीवन आणि मरणाचे एक चक्र पूर्ण होते.
येथे भंगवंताच्या मंदिराचा कळस भंगून जातो. ह्या विश्वाचा जो निर्माता, त्याच्या निर्मितीचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे कळस. तो कळससुद्धा भंगून जातो. इथे कायमस्वरूपी असे काहीही नाही. अगदी विनाशसुद्धा कायमचा नाही. विनाशात राख जरी झाली असेल, तरी त्या राखेतून काळी तुळस जन्माला येते.
इथे राखेतून काळी तुळसच का जन्मते? काळी तुळस हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. राखेतून परत एकदा लक्ष्मी उगवून येते. भक्तिसंप्रदायामध्ये तुळस भक्तीचे प्रतीक आहे. राखेतून, विनाशातून भक्ती उगवून येते.
पहिल्या दोन ओळीत, जीवन ते मरण असा प्रवास आहे. दुसऱ्या दोन ओळीमध्ये मरण ते जीवन असा प्रवास आहे. उमर खय्यामने हे चक्र कसे चित्रित केले आहे, हे पाहण्यासारखे आहे-
‘Each Morn a thousand Roses brings, you say:
Yes, but where leaves the Rose of Yesterday?
And this first Summer month that brings the Rose
Shall take Jamshyd and Kaikobad away.’
(म्हणता तुम्ही प्रत्येक सकाळ हजारो गुलाबांना घेऊन येते,
खरे आहे, पण कालच्या गुलाबांना कोण कोठे घेऊन जाते?
येत्या वसंताचा पहिला महिना घेऊन येईल हजारो फुलांना
पण तोच कदाचित घेऊन जाईल जमशीद, कैकोबाद सारख्या राजांना)
५५)
‘या इथेच सुचली भगवंतांना गीता
या इथेच वाहुनि आली अभंग गाथा
प्रवरेत नाहली इथे न्हाणुली ओवी
अन् प्रदक्षिणा घातली विटेला डावी।।’
ही ओवी सोपी वाटते. ह्या ठिकाणी भगवंताना गीता सुचली, ह्या इथे ह्या नदीत अभंग गाथा वाहत आली. ह्या नदीत छोट्याश्या ओवी ह्या छंदाने स्नान केले. आणि कवीने ह्या इथेच विठ्ठलाच्या विटेला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा डावीकडून घातली जाते म्हणून डावी प्रदक्षिणा!
पण इथे प्रवरा नदीचा संदर्भ का आला आहे? प्रवरेच्या काठावर कुठे गीता सांगितली गेली? प्रवरेत कुठे अभंग गाथा वाहून आली? प्रवरेच्या काठावर कुठे विठ्ठलाची वीट आहे? ती तर पुंडलिकाने भीमेकाठी फेकली होती.
‘प्रवर’ ह्या शब्दाचा अर्थ ‘श्रेठ’ असा आहे. आपण कुठल्या ऋषीचा वारसा घेऊन आलेलो आहोत, हे सांगण्यासाठी गोत्र आणि प्रवराचा उल्लेख केला जातो. ज्ञानाचा उच्च वारसा घेऊन आलेली संस्कृतीची नदी म्हणजे प्रवरा नदी.
हा ज्ञानाचा स्रोत आहे. ह्या उच्च ज्ञानाच्या स्रोता समोर किणीकर नतमस्तक होत आहेत. ह्या ज्ञानाच्या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला ते प्रदक्षिणा घालत आहेत.
उमर खय्यामला त्याच्या मागे चालत आलेल्या ज्ञानाच्या वारश्याचा असाच अभिमान आहे, त्याविषयी अशीच कृतज्ञता आहे. ज्ञानाशिवाय ह्या जीवनात, बाकी कशातही अर्थ नाही, असे तो म्हणतो आहे-
‘With them the seed of Wisdom did I sow,
And with mine own hand wrought to make it grow;
And this was all the Harvest that I reap'd—
‘I came like Water, and like Wind I go.’ ’
(ज्ञानाचा पेरा केला मी ज्ञानवंतांच्या साथीने
घेतले हे एकमेव पीक मी माझ्या हातांनी, जिद्धीने
ही ज्ञानाचीच सुगी साधली मी आयुष्यभर
बाकी, आलो पाण्यासारखा मी आणि निघून गेलो वऱ्यावर)
५६)
‘ख्रिस्ताने नेला वाहुनि येथे सूळ
सिद्धार्थ वदे, दु:खाला तृष्णा मूळ
जन्म आणि मृत्यु - देहाचे हे नृत्य
सौंदर्य जळे सरणावर, जळते सत्य।।’
ख्रिस्ताने आपला सूळ वाहून नेला, कारण पाँटिलस पायलेटने ख्रिस्ताला शिक्षा सुनावताना तसा हुकूमच दिला होता. पण सूळ वाहून नेण्याचा सांकेतिक अर्थ काय? एक म्हणजे जगाला मानवता शिकवताना ख्रिस्ताकडून रोमन साम्राज्याला आव्हान उभे केले गेले. राज्यव्यवस्था विरुद्ध मानवता असा लढा उभा राहिला. म्हणजे मानवतेच्या पुनर्स्थापनेसाठी ख्रिस्त सुळावर गेला.
दुसरा अर्थ असा सांगितला जातो की, ख्रिस्ताने मानवाने केलेल्या पापांची शिक्षा स्वतः सुळावर जाऊन भोगली, त्यामुळे, मानवाचे देवाशी असलेले नाते पुन्हा एकदा स्थापित झाले. मानवाने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि ‘फॉरबिडन अॅपल’ खाल्ले. तेव्हापासून मानवाचे आणि देवाचे नाते संपले होते. त्या पापाची शिक्षा ख्रिस्ताने भोगली. ते नाते पुन्हा एकदा प्रस्थापित झाले.
तिसरे म्हणजे गोरगरिबांसाठी, किती त्याग केला जाऊ शकतो, ह्याचा एक आदर्श जगात उभा राहिला.
म्हणजे न्याय, अध्यात्मिक प्रगती आणि मानवता ह्यांचे आदर्श स्थापित करण्यासाठी ख्रिस्त सुळावर गेला.
‘ख्रिस्ताने नेला वाहुनि येथे सूळ’
ही झाली ख्रिस्ताची गोष्ट! स्वतः सुळावर जाऊन त्याने जगाचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. बुद्धाचे काय? बुद्धाने ज्ञान देऊन जगाचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याने मानवाला - दुःख आपल्या वाट्याला का येते ह्याचे मूळ कारण सांगितले.
‘सिद्धार्थ वदे, दु:खाला तृष्णा मूळ’
शारिरीक आणि मानसिक तृष्णा माणसाच्या आयुष्यात दुःख आणते. तृष्णा म्हणजे तहान, इच्छा, वासना, आस, आणि हाव.
शरीर आणि मन ह्या दोन्ही पातळ्यांवर आपण सतत तहानलेले असतो. म्हणून आयुष्यात दुःख येते. सगळे हवे असते म्हणून आपण कर्मे करतो आणि ह्या दुःखमय आयुष्यात अडकतो.
ख्रिस्त आणि बुद्ध ह्यांनी इतका प्रयत्न केला हे ठीक आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींच्या आयुष्यात प्रगती आणि आनंद आलाही असेल. पण ह्या जगातील अस्थिरता थांबली का?
जन्म-मृत्यूचे तांडव तसेच राहिले. बुद्धाच्या मार्गाने जाऊन काही लोक जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटलेही असतील, पण जग तसेच राहिले.
‘जन्म आणि मृत्यु - देहाचे हे नृत्य
सौंदर्य जळे, सरणावर जळते सत्य।।’
सौंदर्याला शेवटी सरणावर जळावे लागते हे ह्या जगातील जळते सत्य आहे, आणि ते किणीकरांना फार दाहक वाटते.
५७)
‘खांद्यावर घेऊ नको सोन्याचा सूळ
चार्वाक म्हणाला, पुनर्जन्म हें खुळ
देहाला कसले आहे पुण्य नि पाप
आत्म्यास भोगु द्या अमरत्वाचा शाप।।’
सोन्याचा सूळ वाहून नेणे म्हणजे कुठल्या तरी आदर्श गोष्टीसाठी त्याग करणे. कशासाठी आपण त्याग करायचा? लोकांसाठी का म्हणून आपण त्रास सहन करायचा?
ह्या रुबाईच्या आधीच्या रुबाईमध्ये आपण ख्रिस्ताचे उदाहरण बघितले आहे. त्याने न्यायासाठी, मानवतेसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सूळ वाहून नेला. ह्या रुबाईत किणीकर बरोब्बर उलटे दर्शन मांडत आहेत. हे भारतीय संस्कृतीमधील चार्वाक दर्शन.
ह्या विचारसरणीला ‘लोकायत’ दर्शन असेही म्हणतात. काही लोक म्हणतात की, चार्वाकाचेच अजून एक नाव ‘लोकायत’ असे होते. एक विचार असा आहे की, ‘लोकेषु आयातः’ म्हणजे लोकायत. साधारणपणे सामान्य लोकांत जी विचारसरणी दिसून येते ते लोकायत दर्शन.
चार्वाकाच्या विचारसरणीत ज्ञानाचा स्रोत हा मर्यादित केला आहे. जे आपल्या डोळ्याला दिसते आहे तेवढेच खरे. जे आपल्याला अनुभवाला येते आहे तेवढेच खरे. अनुमान हा सुद्धा ज्ञानाचा एक स्रोत मानला जातो. उदा. ह्या जगात कुठलीही गोष्ट घडायला एक कारण असावे लागते. त्यावरून असे अनुमान काढता येते की हे जग घडायलासुद्धा एक कारण असणार आहे, आणि त्या कारणाला आपण देव असे म्हणू.
चार्वाकाला हे असले अनुमान मान्य नाही. देव डोळ्याला दिसत नसेल, तर ते अनुभवाला न येणारे अनुमान मान्य नाही. सूर्य प्रकाश देतो ह्या अर्थी ज्या ज्या गावात प्रकाश आहे तेथे तेथे सूर्य आहे - एवढेच अनुमान चार्वाकाला मान्य आहे.
एकदा जे दिसते, तेवढेच सत्य असे म्हटल्यावर पाप आणि पुण्य ह्या संकल्पनाच मोडीत काढल्या जातात. ह्या जगात वाईट आणि पापी लोकांचे चांगले चाललेले दिसते. त्यांना पुढच्या जन्मात शिक्षा होईल असे सांगितले जाते. आता आत्मा असेल तरच पुनर्जन्म शक्य आहे. चार्वाकाच्या विचारसरणीला आत्माच मान्य नाही. मग कसला पुनर्जन्म? कारण आत्मा पुनर्जन्माला जातो. आत्मा नसेल तर पुनर्जन्माला कोण जाणार? मग पापाची शिक्षा कोण भोगणार आणि पुण्याचे फळ तरी कोण भोगणार? ह्या अर्थाने किणीकरांनी लिहिले आहे -
‘देहाला कसले आहे पुण्य नि पाप’
मजा करा ह्या जगात. कर्ज काढा, त्यातून सुखं उपभोगा. चैन करा. हे आयुष्य एकदाच येते, सोन्याचे सूळ वाहण्यात हे आयुष्य वाया घालवू नका. हे आयुष्य जगून झाल्यावर मरून जाण्यात मजा आहे. अमरत्व हा शाप आहे. किती कंटाळवाणी गोष्ट! न मरता अनंत काळापर्यंत जगत राहायचे. तो शाप आत्मा ह्या संकल्पनेला आहे. त्या संकल्पनेला तो शाप भोगू द्या!
‘आत्म्यास भोगु द्या अमरत्वाचा शाप।।’
किणीकरांनी सगळी दर्शने वाचली होती. सगळ्या धर्मांवर त्यांनी विचार केला होता. कोणत्याही दर्शनाचा ते तटस्थपणे विचार करू शकत होते. जीवन मानवाला काही अनुभव देते, त्यातून विविध विचारसरणी जन्माला येतात. कोठल्याही विचारसरणीच्या मागची जीवनानुभूती कळली तरच ती विचारसरणी कळते. नाही तर ते फक्त शब्दज्ञान राहते.
किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते.
५८)
‘जागृतीस पडले इथेच पहिले स्वप्न
माणूस म्हणाला, परब्रह्म हे अन्न
गौतमास घडला इथेच साक्षात्कार
एकदांच जळते ज्योत, पुढे अंधार।।’
पहिल्या दोन ओळी तैत्तिरीय उपनिषदामधून आलेल्या आहेत. मानव जसा जसा विचार करू लागला, तसे तसे तत्त्वज्ञान आकार घेऊ लागले. तैत्तिरीय उपनिषद अगदी सुरुवातीच्या उपनिषदांमधील आहे. म्हणून किणीकर लिहितात -
‘जागृतीस पडले इथेच पहिले स्वप्न’
ह्या अगदी सुरुवातीच्या उपनिषदामधील अगदी सुरुवातीचा धडा काय आहे? ह्या उपनिषदात, भृगू ऋषींचा पिता वरुण, तरुण भृगूला तत्त्वज्ञानाचे धडे देतो. ब्रह्म हे अंतिम सत्य आहे. आता ह्या ब्रह्माला कसे जाणायचे? वरुण भृगूला सांगतो की - अन्न, भावना, डोळे, कान, मन आणि वाचा ही दारे आहेत. ह्या दारांमधून ब्रह्मज्ञान आत येते.
हे ऐकून तरुण भृगु ह्या अन्नस्वरूप ब्रह्माला भेटायला निघतो. तो निघतो तेव्हा वरुण त्याला तपस्या करायला सांगतो, ध्यान करायला सांगतो.
तपस्या करताना भृगूच्या मनात अन्नब्रह्माविषयी विचार घोळत राहतात. अन्नामुळे सर्व जीव जगतात...
तो पुढचा विचार करतो - अन्नामुळे सर्व जिवांचे लालन-पालन होते, त्या मुळे जड स्वरुपात मिळणारे अन्नच ब्रह्म ह्या अंतिम सत्याच्या संकल्पनेचे पहिले तत्त्व असणार.
जडस्वरूप अन्न म्हणजेच ब्रह्म!हे अन्नरूप ब्रह्म जड सृष्टीत सर्वत्र पसरलेलले आहे. ह्याला भृगूने नाव दिले अन्नमय कोष. जिवाचे जड आवरण. ह्या सगळ्या अर्थाने किणीकर लिहितात -
‘जागृतीस पडले इथेच पहिले स्वप्न
माणूस म्हणाला, परब्रह्म हे अन्न’
पुढे भृगू ऋषी हळूहळू मानवातील प्रगत अशा कोषांकडे जातात - अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष! ह्यातला आनंदमय कोष म्हणजे आत्मा - साक्षात ब्रह्मन् चा अंश! पहिल्या दोन ओळीत इथपर्यंत येऊन किणीकर पुढे बौद्ध दर्शनाकडे जातात.
‘गौतमास घडला इथेच साक्षात्कार
एकदांच जळते ज्योत, पुढे अंधार।।’
तैत्तिरीय उपनिषदातील दर्शन आत्म दर्शन आहे. इथे आत्मा हे अंतिम सत्य मानले गेले आहे.
गौतम बुद्धाचे दर्शन ह्याच्या नेमके उलटे आहे. त्याचे अनात्म दर्शन आहे. पण बुद्धाच्या तत्त्वज्ञानात पुनर्जनमाला स्थान आहे. मग बुद्धाला प्रश्न विचारला गेला - आत्मा नसेल तर पुनर्जन्म कोण घेतो? बुद्ध म्हणाला जिवाचे संस्कार उरलेले असतात, कर्मे उरलेली असतात ती पुढे जातात - एका ज्योतीने पुढची ज्योत प्रज्वलित व्हावी त्याप्रमाणे एका जन्मातून पुढचा जन्म सुरू होतो.
‘एकदांच जळते ज्योत, पुढे अंधार।।’
ह्या ओळीत एवढे रामायण साकारलेले आहे. पहिल्या दोन ओळीत आत्म दर्शन, पुढच्या दोन ओळीत अनात्म दर्शन. ही दोन्ही मानवाच्या जागृतीला पडलेली दोन स्वप्ने! किणीकर दोन्ही दर्शनांकडे तटस्थपणे बघत राहतात.
किणीकर ह्या गृहस्थाकडे विशाल मन होते, आणि त्या मनाने लखलखते तत्त्वज्ञान पचवलेले होते, हेच खरे!
.................................................................................................................................................................
या लेखमालिकेतले आधीचे लेख
.................................................................................................................................................................
५९)
‘दिसणार कसा भाकरीत लपला देव
भाकरी करपली, करपुनि गेला देव
मायावी स्वार्थी कृतघ्न आहे धरती
एकाला साखर, एकाच्या तोंडी माती।।’
ह्या आधीच्या रुबाईमधीलच विषय ह्या रुबाईमध्ये ओढला गेलेला आहे. अन्नमय कोष आहे, तो ब्रह्मन् चेच एक रूप आहे, हे सर्व ठीक आहे. पण सामान्य माणसाला हा देव दिसणार कसा? आणि भाकरी करपली तर देव करपुन गेला असे होते का? देव करपत नाही हे खरे आहे, पण करपलेल्या भाकरीचा अन्न म्हणून काय उपयोग? आणि हे अन्न, हा देव तरी सगळ्या मानवांना सारखा मिळतो का?
हे अन्न धरित्रीमधून उगवून येते. चैतन्य धरित्रीमधून उगवून येते, म्हणजे तीसुद्धा चैतन्याचाच एक भाग आहे. पण ही धरित्री मायेमध्ये अडकली आहे. त्यामुळे तिच्यातून उगवून आलेले अन्न तिच्या सगळ्या लेकरांना सारखे मिळत नाही.
‘मायावी स्वार्थी कृतघ्न आहे धरती
एकाला साखर, एकाच्या तोंडी माती।।’
धरित्रीचे हे मायेत अडकणे हे स्वार्थाचे लक्षण आहे. ही तिच्यातील चैतन्याशी तिने केलेली प्रतारणा आहे. एका बाजूला ती तिच्यातील देवत्वाशी कृतघ्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला ती तिच्यावर अवलंबून असलेलेल्या तिच्या लेकरांवर अन्याय करते आहे.
‘एकाला साखर, एकाच्या तोंडी माती’
ह्या रुबाइत देवाचा विषय काढला गेला आहे. पण ह्या रुबाईतून मार्क्सवादाचेही प्रतिध्वनी येत राहतात.
तारुण्य मार्क्सवादात घालवून पुढे आध्यात्माकडे आल्यावर ही दोन दर्शने एकमेकांच्या डोळ्यात डोळा घालून बघणारच!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
६०)
‘आभाळ फेडुनी रात्र नागवी आली
रस्त्यात कडेला चिंध्या चिवडित बसली
दुर्बीण लावुनी बघतो एक विधाता
नग्नता जळाली चिंध्या जळता जळता।।’
आधुनिक कविता प्रतिमांमधून आपल्याकडे येते. वाचकाच्या मनाला भिडणाऱ्या प्रतिमामधून!
इथे आभाळाचे वस्त्र फेडून नागव्याने रात्र जगावर आली, आणि कुणा शहरातील रस्त्याच्या कडेला चिंध्या चिवडित बसली.
इथे एका नागव्या वेडीची प्रतिमा आपल्या मनात तयार होते. टी. एस. एलियट हा नवकवितेच्या जनकांपैकी एक. त्याच्या ‘लव्ह साँग ऑफ जे अल्फ्रेड प्रुफ्रॉक’ ह्या कवितेतील ओळी इथे बघण्यासारख्या आहेत-
‘Let us go then, you and I,
When the evening is spread out against the sky
Like a patient etherized upon a table...’
(चल तर जाऊ आपण, तू आणि मी मिळून
संध्याकाळ बघ पसरली आहे आकाशावर
एखादा भूल दिलेला रोगी जसा पसरलेला असतो (ऑपरेशनच्या) टेबलावर…)
ह्या ज्या ह्या प्रतिमा आपल्या मनाच्या डोळ्यासमोर तयार केल्या जातात, त्या आपल्याला कवीच्या मनःस्थितीची खोल जाणीव करून देतात. स्वतः टी. एस. एलियट खूप वर्षे डिप्रेशन खाली होता. किणीकरांनाही डिप्रेशनचा त्रास असावा.
नुकत्याच झालेल्या मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये दिसून आले आहे की, ९४ टक्के कवींना आयुष्यात केव्हा ना केव्हा डिप्रेशनला - निराशेला सामोरे जावे लागते. काही त्यातून बाहेर येतात. सिल्व्हिया प्लाथसारख्या दैवी कवितेचे देणे असलेली कवयित्री त्यात आत्महत्या करते. किणीकर, एलियटसारखे कवी त्यातून बाहेर आलेले दिसतात. त्यासाठी ते तत्त्वज्ञानाचा किंवा आध्यात्माचा मार्ग वापरतात.
प्रत्येक कवीला आपल्या संवेदनशीलतेची किंमत डिप्रेशनच्या मार्गाने चुकवावीच लागते. डिप्रेशनसारखी गूढ निराशा साध्या शब्दात कशी सांगणार? डिप्रेशन हे अबोध आणि मुके दुःख असते. त्याचा उगम कळत नाही, त्यातून बाहेरचा मार्ग दिसत नाही. बालकवी म्हणालेच आहेत -
‘कोठून येते काही कळेना, उदासीनता ही हृदयाला…’
डिप्रेशनसारख्या गूढ भावना व्यक्त करण्यासाठी नवकवितेत प्रतिमा वापरण्यात आल्या. ‘नागव्या वेडीसारखी रात्र आली’ ही ओळ लिहिताना कवीची मनःस्थिती काय असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
ज्या मनाला संध्याकाळ भूल दिलेल्या रोग्यासारखी वाटते आहे त्याच्या मनावर दुःखाची कुठली भूल चढली आहे, ह्याचा अंदाज येतो.
‘दुर्बीण लावुनी बघतो एक विधाता
नग्नता जळाली चिंध्या जळता जळता।।’
विधाता म्हणजे विश्व निर्माण करणारा! तोच आपण स्वतः तयार केलेले उदास मन आणि त्याची उदासी दुरून बघतो आहे. आपणच रचलेल्या मायेच्या ह्या चिंध्या जळताना तो पाहतो आहे. इथे अस्तित्वाच्या चिंध्या पराकोटीच्या दुःखाने तर जळत आहेतच, पण नग्नतेसारख्या संकल्पनांनाही अर्थ उरत नाही. ना मनाला अर्थ, ना त्यात राहायला आलेल्या दुःखाला अर्थ, ना नागड्या शरीराला अर्थ, ना नग्नतेच्या संकल्पनेला अर्थ.
डिप्रेशनच्या तडाख्यात जग जेवढे अर्थहीन वाटते, तेवढे अर्थहीन ते दुसऱ्या कुठल्याच भावनेच्या दंशाने वाटत नाही. किणीकर, मर्ढेकर, विंदा करंदिकर, सिल्व्हिया प्लाथ, टी. एस. एलियट ह्या सर्वांनी मानवी दुःखाला प्रतिमांतून वाचा फोडली. बालकवींचा उदास उंबर जळात पाय टाकून बसला आहे. दुःखाच्या जळात पाय टाकून बसलेले हे सर्व संवेदनशील कवी बालकवींच्या उंबरासारखेच गूढ आणि उदास आहेत! उमर खय्याम उदास नाहिये, तो दुःख फार त्रयस्थपणे बघतो. दुःखाच्या जळात उमर खय्याम आपले पाय भिजू देत नाही.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment